महाबळेश्वर/सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें.

विकिस्रोत कडून



सार्वजनिक भक्तीचीं ठिकाणें.

 हिंदुस्थानांतील पाहिजे तें रमणीय स्थान घ्या, तेथें आमच्या लोकांनीं एखाद्या देवालयाची स्थापना करून परमेश्वराच्या सर्वव्यापित्वाची, सर्वशक्तिमत्वाची आठवण मनुष्यमात्रास दिली नाहीं असें सहसा होत नाहीं. निर्जन अरण्य, ओसाड माळ, किर्र झाडी, खोल दरी, उंच डोंगर, असल्या सर्व ठिकाणीं कोणीना कोणी तरी देव अथवा देवी यांच्या मूर्तीची स्थापना झालेली असावयाचीच ! महाबळेश्वर डोंगरावरही अनेक देवतांचीं देवालयें आहेत.

 हल्लीं या वस्तीला आमचीं पांच देवळे झालीं आहेत. मारूतीचीं तीन, श्रीराम व विठोबा यांचें एक व शंभूचें एक. यांपैकीं बहुतेक देवळे मुख्य पेठेतच आहेत. ह्या देवळांना सालिना किंवा एकदम अशी सरकारांतून कांहीं मदत मिळालेली नाही. यांचा नेहमींचा खर्च येथील पेठकरी व्यापाऱ्यांच्या शिरावर आहे. कधी कधीं कोणीं हिंदु बडे लोक कांहीं देवाच्या उत्सवास हातभार लावितात. या सर्व देवळांपैकीं रामाचें देऊळ अगदीं अली कडचें आहे. या देवळाची इमारत मजबूत असून आटोपशीर अशी बांधलेली आहे. याच्या सभामंडपाचें लांकूडकाम चांगलें केलें आहे. या देवळास एकंदर दोन अडीच हजार रुपये खर्च झाला तो गांवकरी लोकांनीं याचकवृत्ती करून केला आहे. या गांवकरी लोकांत कोणीं रामाचें उपासक व कोणीं गाणपत्य आहेत म्हणून यांत आणखी गणेश स्थापनाही झाली आहे. आतां गोकुळ अष्टमीला विठोबाचा, रामनवमीस रामाचा, हनुमानजयंतीस मारुतीचा असे उत्सव होत असतात. सर्वांत रामाचें देवळाची इमारत व देवांच्या मूर्ति पाहण्यासारख्या ‘ आहेत. हीं देवळे पेठेत आहेत.

 आजकाल श्रीरामाच्या देवळाची सर्व लोकांस फार भक्ति आहे. कांहीं भक्तिमान् लोक दररोज तेथें " रामकृष्णहरि " वगैरे नामघोष करून भजन करितात.

 ख्रिस्ति लोकांनींही येथे प्रार्थना करण्याची मंदिरें बांधिलीं आहेत. ज्यांस क्राइस्ट चर्च म्हणतात, तें विस्तीर्ण ख्रिस्तमंदिर बाजारच्या जरा उत्तर बा  जूस आहे. १८४२ सार्लीं क्वार धर्मगुरूंनीं ही इमारत सार्वजनिक कामाकरितां म्हणून अर्पण केली होती ती नवी जुनी करून हल्लीं ईश्वरसेवोपयोगी केली आहे. तारक येशु, मोझेस, आणि महा साधु योहान्न वगैरे पवित्र मूर्तीची सुंदर चित्रे विलायतेतून तयार करून आणून उंच तक्ताजवळ बसविलीं आहेत. यांत निरनिराळ्या उपासकांचीं देवळांत २१० प्रार्थनासनें मांडलीं आहेत. हें मंदिर सातारच्या धर्माध्यक्षाच्या ताब्यांत दिलें असल्यामुळे उन्हाळ्यांत ते आपला डेरा येथें देऊन राहतात. लोकांस या मंदिरांत येऊन आसनारूढ होण्यास आतां कांहीं दक्षणा यावी लागत नाहीं. येथील फूटतूट दुरस्ती इंजिनियर खात्याकडून होत असते. आदित्यवारचा दिवस देवळांत साहेबलोक ईश्वरभजनांत घालवितात. सकाळीं आठ वाजतां दर्शन व सायंकाळीं ५-३० वाजतां प्रार्थना व धर्माचे विषयावर चर्चा अशा गोष्टी रविवारी होतात.

 संताक्रुज-बाजाराच्या पेठेत क्याथालिक धर्माचें एक देऊळ आहे, तें गोमांतकी पाद्री साहेबांच्याह वालों केलेलें असतें. हे पाद्री आक्टोबरपासून पावसाळा लागेपर्यंत येथें राहून पावसाळ्याला परत गोंव्यास जातात. त्यांला गोवें सरकारांतून नक्त वेतन मिळतें, खेरीज बापतिस्मा देणें, लग्नें लावणें, प्रेतसंस्कार करणें, आणि आवांतर कृत्यें हीं त्यांचीं येथील कर्तव्यें होत. याबद्दल जी फी येईल तिच्यावर यांची मालकी असते.

 मरेचें घर-मरेसाहेब हिंदुस्थान सोडून निघाले तेव्हां त्यानीं आपलें घर अमेरिकन मिशन पैकीं साध्वी ग्रेव्हाबाईसाहेब यांस इनाम दिलें होतें. त्यांनी आपल्या पतीप्रमाणेच या ठिकाणी आमरणांत दिवस काढले. तेव्हां त्यांच्या पश्चात हें देऊळ अमेरिकन मिशन मंडळींला चर्चाचे कामास आयतेंच सांपडलें. आणि यामुळे आतां या इलाख्यांतील कोणत्याही अमेरिकन मिशनरीला किंवा त्यांच्या कुटुंबाला हवा बदलणेचें प्रयोजन पडल्यास येथें बदल करून घेऊन चांगल्या आरोग्यकारक हवेत राहण्यास फार सोईकर झालें आहे. ह्या देवळांत रविवारी ११ वाजतां प्रसंगोपात इंग्रजीतून प्रार्थना  होते. बाजारांतील लहान देवळांत, दर आठवडयास मराठींतही एक प्रार्थना होत असते- तेथे सर्व शाखेचे ख्रिस्ती लोकांस येण्यास सदर परवानगी असते.




-----------------