महाबळेश्वर/महाबळेश्वरी येणारे लोकांच्या

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
महाबळेश्वरीं येणारे लोकांच्या
वेळाचा व्यय.
--------------

 शरीरसमृद्धीस मुख्य कारणें येथील हवा व रमणीय ठिकाणींं फिरणें हीं होत.

 याकरितां पहाटेंस मोठया झुंझुरका सूर्योदयापूर्वी उठण्याचा येथें परिपाठ आहे, व कोंवळे उन्ह पडतें तोंच व्यायाम करून घरीं परत यावे हा विहित मार्ग आहे. परंतु या नियमास उल्लंघणारे पुष्कळ असतात. कारण पांच वाजतां साखर झोंप मोडून थंडीच्या तडाक्यांत उठण्याचा निश्चय सर्वांचे हातून चालत नाहीं. याकरितां उशीरानें उठून व उशीरानें व्यायाम करून परत येणारे लोक फार आढळतात. आणि मुख्यत्वेंकरून आपल्या लोकांमध्यें अशा प्रकारचा आळस पुष्कळ आढळतो. इंग्रज लोकांच्या नियमांत मात्र अंतर होत नाहीं. ते सकाळच्या वेळीं घोडयावर बसून रपेटीस जातात. तथापि पायीं फिरण्याचाही प्रघात फार आहे. सायंकाळीं फिरते वेळीं मात्र गाडया घेतात. दिवसास उत्तमान्नसेवन किंवा मित्र मंडळीकडे मेजवान्या होत असतात. पुढे साडेचार पांच वाजेपावेतों गंजिफा, बुद्धिबळे वगैरे घरांतील खेळ चालले असतात. मग उन्हें जात चाललीं ह्मणजे बग्या, फैटणी, शिग्राम, टांगे वगैरे यांत बसून थव्यांचे थवे पुनः बाहेर फिरण्यास निघतात. व कोठे तरी सुंदर व रमणीय ठिकाणी बसून सुस्वर, मनोरम आणि वीरश्रीजनक किंवा आनंदकारक वाद्यसंगीत ऐकतात. या ठिकाणींं हजारो रुपये खर्च करून विहाराच्या जागा तयार केल्या आहेत. तेथें क्रिकेट व बाडमिंटन हे खेळ मोठया झपाटयाने चालले असतात. यांपैकीं क्रिकेट ह्मणजे काय व त्यापासून हितावह परिणाम काय होतात हें सांगणें नको. परंतु इंग्रज लोकांमध्यें हा खेळ अलीकडे किंचित् मागेंं पडत चालला आहे; व बाडमिंटनचा नाद इंग्रज लोकांस चोहीकडे अतिशय लागला आहे. क्रिकेटपेक्षां हरएक प्रकारें याजपासून फायदे फार आहेत. स्त्रियांचे कोमल जातीस तर हा खेळ फारच प्रशस्त आहे. सुमारें दहा हातांचे अंतरावर दीड पुरूष उंचीचे खांब रोंविलेले असतात. व त्यांच्या वरच्या भागाला, अडीच तीन हात रुंदीचा जाळीदार तारांचा एक पत्रा बांधितात, आणि दोन्ही बाजूनें खेळणारे लोक उभे राहून या पत्र्यावरून या बाजूकडून त्या बाजूकडे पिसांचीं फुलें टाकीत असतात. या खेळाचे वेड इंग्रज लोकांस व विशेषेकरून त्यांच्या स्त्रियांस इतकें असतें कीं, महाबळेश्वरीं दुसरा कांहीं नियमित उद्योग नसल्यामुळे प्रत्येक दिवशीं निमेअधिक काळ बाडमिंटन खेळण्यांत गुजरतो. राजविलासी मेजवान्या कधीं गव्हरनर साहेबांकडे, कधीं सेनाधिपतीकडे, कधीं इतर श्रीमंत लोकांकडे होतच असतात. अशा प्रसंगीं गायन सदोदित चालत असतें, याखेरीज आठ दहा दिवसांनीं फ्रिअर हालमध्यें नाटयनाटकें होत असतात. कधी कधी वेण्या सरोवरावर जलक्रिडेकरितां पुष्कळ लोक जातात व इतर रमणीय ठिकाणीं वनभोजनें वारंवार होत असतात. धर्मादायाची सत्कृत्येंही येथें होत असतात. सारांश- या ठिकाणींं ऐहिक अर्थास अनुलक्षून तनु, मन, धन, खर्च करून इंग्रज लोक शारीर सुखाच्या पाठीमागें लागलेले असतात. व्यग्रता किंवा चिंता उत्पन्न करणारी कामें ते बिलकुल करीत नाहींत. परंतु केवळ शरीराची समृद्धी व चित्ताची प्रसन्नता ते ठेवीत असतात.

 इंग्रज लोकांत विवाह होतात ते स्वयंवरविधीने होत असतात. ते होण्यात प्रथमतः उपवर वधुवरांचा विद्या, नीति, कला, वगैरेंचा तपास होऊन एकमेकांची परीक्षा करण्याची त्यांच्यामध्यें आवश्यकता असते. तशी परीक्षा होण्यास एकमेकांची भेट होणें इष्ट आहे. तेव्हां हा भेटीचा योग येथें फिरतेवेळी, खेळांमध्यें, नृत्यगायनाचे समयीं, भोजने व वनविहार यांच्या निमित्तानें, अनायासें घडून येतो. तेणेंकरून परस्पर संघट्टण व मैत्री होऊन वाक््निश्चय होऊन जातात; व महाबळेश्वराहून खालीं गेलें, ह्मणजे लग्नांची एकदम गर्दींं उडते. याकरितां शुद्ध, निर्मळ, व निष्कपटी प्रेमाच्या वृद्धीस महाबळेश्वरचें हें स्थळ सर्वांशीं उपयोगी आहे.

 आपल्या राजेरजवाडयांपैकीं जे दोन चार गृहस्थ येथे येतात, त्यांना व मोठमोठया व्यापाऱ्यांस जास्त कमी पैसा खर्च करण्याचें सामर्थ्य असल्यानें महाबळेश्वरचें सुख बरें मिळतें. तरी त्यांचा बहुतेक सर्व ऐषा राम उंबरठयाच्या आंतल्याआंत असल्यामुळे शारीरिक समृद्धिपेक्षां मानसिक सुखाच्या लहरीत ते अगदीं गढून गेलेले असतात. बाहेरील उघडया हवाशीर ठिकाणीं, सकाळ सायंकाळ फिरून येण्यापलीकडे, यांजकडून जास्त कालक्रमण होत नाहीं. दुपारीं किंवा रात्रींच्या वेळीं त्यांच्या बंगल्यांतून खेळ, गाणें, किंवा शिळोप्याच्या गप्पा मारणें या व्यवसायांत आपल्या मित्रमंडळीसह ते गर्क होऊन गेलेले असतात. कोणी कोणी बडे लोक आपल्या बंगल्याचे कंपौंंडांतच टेनिस कोर्ट तयार करून आपल्या सौंगडयाबरोबर खेळ खेळत असतात. कित्येक वेळीं जिमखान्याच्या जागीं जाऊन साहेब लोकांच्या नानाप्रकारच्या घोडयावरील वगैरे खेळांचे चमत्कारही पहावयास कित्येक जातात. त्यांच्या क्रीडा पाहून वेळ कसा आनंदानें घालवावा याचा कित्ता घेण्यासारखा आहे.


---------------

घोडयावरून अगर गाडींतून फिरावयास
जाण्याचीं ठिकाणें व पादचारी
लोकांना रपेटीस किंवा
व्यायाम करण्याचीं
ठिकाणें.

 भव्य अशा सृष्ट किंवा कृत्रिम वस्तु पाहण्याची हौस सर्व लोकांस असते. अशा वस्तु आमच्या देशांत कांहीं थोडया थोडक्या नाहींत, परंतु अति परिचयामुळे संनिध असलेल्या प्रेक्षणीय व वर्णनीय वस्तूंची आपल्या हातून अनेक वेळां अवज्ञा होते, आणि त्यामुळे त्या वस्तूंच्या दर्शनापासून होणाऱ्या ज्ञानास व आनंदास आपण अंतरतों. त्याचप्रमाणें येथील उंच उंच भयंकर कडे, मोठमोठे धबधबे, अनेक शैलसमुदाय, घनदाट झाडी, रायगड, प्रतापगड, यां सारखे किल्ले, यांची आजपर्यंत स्थिति झाली आहे. कारण, त्यांजकडे कोणींच लक्ष देऊन त्यांच्या प्रेक्षणीय स्थितीचें कधीही वर्णन करून ते लोकांत प्रसिद्धीस आणले नाहीत. अखेरीस परके लोक येथें येऊन येथील वस्तूंच्या आल्हादजनक दर्शनानें तल्लीन होऊन जाऊन जेंव्हांं हजारों रूपये खर्च करूं लागले, व नानातऱ्हेच्या मजा मारीत फिरूं लागले तेव्हां कोठे आम्ही जागे झालों. परंतु अलीकडे आमचे लोकांस ही जागृति होऊन ऐतिहासिक स्थळे पाहण्याची इच्छा झाली आहे. ही अत्यंत अभिनंदनीय स्थिति होय अशा उत्सुक शोधकांस उपयोग व्हावा ह्मणून या पुस्तकांत येथील दर्शनीय वस्तूंची वेडींंवांकडी वर्णनें दिलीं आहेत, ती वाचून किंवा ऐकून त्या पाहण्याविषयी त्यांच्या अंतःकरणातील उत्सुकता अधिक तीव्र झाली पाहिजे.

 महाबळेश्वरीं दाट झाडी असल्यामुळे बसल्या ठिकाणींं फार वारा मिळत नाही, व हवेच्या थंडपणामुळे वारा घेण्याची इच्छाच होत नाहीं ही गोष्ट निराळी; पण एखादे वेळीं बंगल्यांतल्या बंगल्यांत किंवा घरांतल्या घरांत सोसाट्याची झुळूक पाहिजे, असें कोणी ह्मणेल तर ती त्याला सहसा प्राप्त व्हावयाची नाहीं. याचे कारण उघडच आहे. झाडें हे पंखे खरे पण हे सजीव पंखे हालूंं लागून त्यांपासून वारा सुटण्यास हीं झाडे फार विरळ असलीं पाहिजेत. येथें तर ती एकमेकांस लागून गेलीं असल्यामुळे, अगोदर तीं मोठयानें हालत नाहीत व थोडी बहुत हालली, तरी त्यांपासून मोठा वारा सुटत नाहीं. तसेंच बाह्य प्रदेशांतून आलेला वाराही या झाडांत गुरफटून जातो आणि क्षणोंंक्षणीं लहान लहान टेकड्यांचा व वृक्षरायीचा त्यास प्रतिबंध होत असल्यामुळे त्यांची गति खुंटते; आणि सर्वत्र सामसूम होतें! ज्याला वाहता वारा पाहिजे असेल, त्यानें आपला बंगला किंवा घर सोडून एखाद्या उंच व मोकळ्या ठिकाणी गेलें पाहिजे. अशी येथें दाट झाडी लागून गेली असल्यामुळे अशा मोकळ्या जागा येथें मुद्दाम केलेल्या आहेत त्यांस पांइट म्हणतात. या पांइटांला येण्यास गाड्याचे घोडयांचे व पायीं जाण्याजोगे रस्ते केलेले आहेत.

 ज्याप्रमाणें एखाद्या मोठया किल्ल्याच्या तटांस सोडून पुढें आलेले बुरूज असतात त्या प्रमाणें पर्वताच्या मुख्य रांगेपासून उजव्या व डाव्या बाजूस कांहीं कांहीं अंतरावर फुटलेल्या ज्या शाखा किंवा बाहू दिसतात त्यांस पॉइंट असें ह्मणतात. अशा प्रकारच्या दोन पर्वत शाखांत किंवा बाहूंत मोठी थोरली दरी असते. या बाहूंच्या टोकांस येऊन उभे राहिले ह्मणजे समोरचा डोंगराळ प्रदेश साफ दिसतो आणि प्रतिबंधाच्या अभावामुळे जोरानेंं वाहणारा वारा मिळतो. साहेब लोकांनींं या पाइंटांवर हवा खात बसण्यासाठींं फार चांगल्या सोई केल्या आहेत, त्या अशा कींं त्या ठिकाणी आसपासची झाडी तोडून व जमीन साफ करून गाडया फिरविण्याजोगेंं मैदान केलेले असते, आणि पाइंटाच्या शेंंवटास येऊन उभे रहाणाऱ्या जिज्ञासु प्रेक्षकांचा सृष्टिसौंदर्य अवलोकन करण्याच्या नादांत, तोल जाऊन कडेलोट होऊंं नये, ह्मणून पाइंटांच्या सभोवती बहुधा दगडी भिंत घातलेली असते. अशा या रम्य स्थळींं अनेक युवयुवती सकाळ संध्याकाळ आपली करमणूक करण्यासाठींं येत असतात. तथापि या ठिकाणी कोणांस जी कांंही करमणूक करून घ्यावयाची असेल ती त्यानेंं सकाळी सहा वाजण्याच्या पुढेंं व संध्याकाळींं सहा वाजण्याच्या अगोदर करून घेतली पाहिजे, तसेंं न केल्यास एखादे वेळी प्राणांतिक अवस्था होणेचा संभव आहे.  येथें जे पाइंट किंवा शैलबाहू पाहण्यासारखे आहेत, त्यांत बाबिंगटन, लाडवुइक, एलफिन्स्टन व आर्थर पाइंट हे प्रमुख आहेत. बॉम्बे, कारनॅक, सासून वगैरे दुय्यम प्रतीच्या शाखा आहेत. याशिवाय कनाट पीक मौंट मालकम, रे व्हिला (गव्हर्मेंंट हौस) वगैरे ठिकाणें पाहण्यासारखीं आहेत.

बाबिंगटन पाइंट.

 हा पाइंट दक्षिण दिशेला मालकम पेठेपासून दोन मैलांवर आहे. येथें येण्याचा रस्ता फार चांगला आहे. हा रस्ता बाजारांतून फाउंटन हाटेलवरून चालला आहे. सासून पाइंट उजवे बाजूला टाकून पुढे गेलें ह्मणजे अर्धमैलभर चढ उतार बराच आहे. येथून पुढें जेथें रस्ता थोडा पश्चिमेस वळतो, तेथून अगदीं पाइंटाला जाईपर्यंतचा अर्धा मैल जातां जातां तोंडाला साधारण फेस येऊन जातो व धापहीं लागते. हा चढ चढला ह्मणजे मनुष्य पाइंटावर येऊन पोहचतो.

 हा पाइंट सुमारें ४२०० फूट उंच आहे. ह्या ठिकाणाहून कोयना खोरें व सॅॅडलबॅगहिल हीं फार छानदार दिसतात. शिवाय; दुसरी वनशोभाही बरीच दिसते. बाबिंगटन पाइंट व सातारा रस्ता याचे दरम्यान एक खोरे आहे त्याला ब्लूव्हाली असें ह्मणतात. येयून सोळसी खोरें फार रमणीय देिसतें. बाबिंगटन पाईटवरून सातारा रस्त्यास येऊन तेथून इकडे येण्यास गाडीरस्ता चांगला आहे.

लाडवुइक पाइंट.

 सिडने बेकवुइथ साहेबांचें नांव प्रथम लाडवुइक पाइंटाला दिलें असल्यामुळे त्याला सिडने पाइंटही ह्मणतात. परंतु सन १८२७ मध्यें लाडवुइक साहेब अगदीं प्रथम येऊन सेिडने पाइंटचे टेंकडीवर उतरले होते. त्यांचें नांव या पाइंटाला ठेवावें ह्मणून पुढे सरकारचा हुकूम झाल्यावर लाडवुइक पाइंट असे लोक ह्मणूं लागले. महाड रस्त्यानें जाऊ लागलों ह्मणजे उजवे कडच्या बाजूला जे रस्ते फुटलेले आहेत त्यांतील दुसऱ्या रस्त्याला वळावें, पुढे आणखी एक फूटवाट लागते, तेथेंही उजव्या हातच्या रस्त्यानेंच येथें यावे. रस्त्याला जातांना उतार व येतांना चढण आहे या रस्त्यानें गाडया बेधडक जातात. या रस्त्याला दुतर्फा झाडी आहे. कित्येक जागीं वृक्षाची इतकी गर्दी आहे कीं, त्यांत सूर्यांचें किरणांचा प्रवेश बिलकूल होत नाही; व भर दोन प्रहरीं सायंकाळचा भास होतों. यामार्गानें सपाटी ह्मणून अगदीं नाहीं. दीड कोसपर्यंत जातांना एकसारखी खोल खोल व कित्येक ठिकाणींं अगदीं घसरती उतरण लागते. ही उतरण उतरून कोयनेच्या खोऱ्यांच्या किनाऱ्यावर गेलें ह्मणजे पुढें जाण्याचा गाडीमार्ग खुंटतो. ह्मणून इकडे पाहण्यास येणारे लोकांना येथेंच गाडया उभ्या कराव्या लागतात. या ठिकाणीं येण्यास याशिवाय आणखी एक “ डय़ांटु बिरशेबारोड” नांवाची पाऊलवाट मुंबई पाईंंटाजवळ महाड रस्त्यापासून फुटते, या वाटांनीं येथें, कोयनेच्या खोऱ्याचे किनाऱ्यावर दाखल झाल्यावर स्वतः पायीं किंवा घोडयावरून पुढें अगदींं पाईंंटावर जाण्यास तयार व्हावें लागतें. ज्याप्रमाणे लीलेनें हत्ती आपली सोंड समोर करितो त्याप्रमाणें या पाईटच्या पर्वताचीं पाव मैलपर्यत लांब बारीक टोंकदार भूशलाका एकदम खोऱ्यामध्यें घुसते. या सोंडेवरून जातांना मार्ग, कांहींसा नागमोडीसारखा, चिंचोळा असून दोन्ही बाजूनीं सुमारें तीन तीन हजार फूट खोलीचीं खोरीं आहेत. यास्तव जाणारा आपल्या जिवाला भीतभीत व चक्कर येण्याच्या धास्तीनें, बाजूला न पाहतां कित्येक ठिकाणींं काठी टेंकीत टेंकीत या सोंडेच्या अग्रभागीं गेला ह्मणजे तेथें फक्त १२ फूट रुंदीच्या टोंकावर येऊन पोहोचतो. या टोंकास आपले लोक डोमेश्वर व साहेबलोक नोज ( नाक ) असें ह्मणतात.

 या ठिकाणाहून जो कांहीं अद्भूत चमत्कार दृष्टीस पडतो, त्याचें वर्णन देतां येत नाहीं. पाहणाराच्या मनासच तें विचारलें पाहिजे. वृक्षवनस्पतींचा हिरवा गार अफाट समुद्र पुढे पसरलेला असतो. त्यांत शपथेला बोटभर देखील जागा हिरव्या रंगाखेरीज दिसत नाही. व हेंं हिरवें मैदान सभोंवतील पर्वताच्या कोंडमाऱ्यांंतून निघून मोठे होत होत अखेरीस क्षितिजास जाऊन भिडतें, या चमत्कारानें क्षुद्र जंतुवत् पाहणारे जे आपण त्यांची दृष्टि अगदीं फांकून जाते. पायाखालींं तीन हजार फुटीची भिंत उभी पाहून नजर ठरत नाहीं. झोंक गेला तर रसातळास जाण्याची भीति असते. डावेबाजूस मुंबई पाइंट व प्रतापगडचा सुळा उघडा बोडका उभा असतो. पुढें कांहीं अंतरांवर एकमेकाबरोबर युद्ध करण्यास महा राक्षस उठल्याप्रमाणेंं कोणी वांकडातिकडा, कोणी नीट, कोणी दुसऱ्याच्या अंगावर रेललेला, कोणी झोंंबी खेळण्यास चाललेला असे डोंगर दृष्टीस पडतात.

 उजवे बाजूस एलफिन्स्टन पाइंट व सावित्रीचा भयंकर खोल दरा आपल्याकडे टेहळून पाहत असतो. तो वरून एक मैल रुंद व दोन मैल लांब असावा असा दिसतो. या दऱ्याच्या दुसऱ्या बाजूला एलफिनस्टन पाइंट कड्याचा प्रेक्षणीय भाग आहे या अंगास नदीकिनाऱ्यानेंं गर्द झाडी, हिरवी गार पिकें अगदी आच्छादित होऊन गेलींं असतात. अशीच पलीकडे नजर फेंकिली ह्मणजे सावित्री नदी महाडावरून माहेराहून सासरी जात असल्याप्रमाणेंं सावकाश समुद्रकिनाऱ्यावरून वाहत चालली आहे असेंं दिसतेंं. येथून उत्तर कोंकण प्रदेशांतील लहानसान टेंंकड्या सोंगटया मांडल्याप्रमाणे दिसतात. तशा दुसरे कोणत्याही ठिकाणापासून दिसत नाहींंत. 

लाडवुईकचें स्मारक.

 सरकारचे हुकुमानें जनरल लाडवुईक साहेबांच्या मुलानें या ठिकाणी हा स्मारकाचा एक स्तंभ बांधून ठेविला आहे. हा त्यावरील घुमटासुद्धां जमिनीपासून सुमारें २५ फूट उंच आहे. या स्तंभाचे पश्चिमांगास संगमरवरी दगडाचा साहेबबहादुरांचा मुखवटा (bust) एका लोखंडी चौकटींत घालून गाडलेला आहे व चौकटीचे बाहेरून जस्ती तारेचीं वेष्टनें दिलीं आहेत. परंतु चौकटीलाच ताम्रा लागल्यामुळे तोंडावर डाग पडले होते, ते खरवडून काढलेले आहेत तरी यामुळे हा मुखवटा कुरूप झालेला दिसत नाहीं. या स्तंभाच्या दक्षिणेच्या बाजूस लेख लिहिला आहे तो:-

   "इसेक्समधील श्रॉबरी येथील राहणारा जान

  लाडवुइकसाहेब यांचा दुसरा मुलगा जन-

  रल पीटर लाडवुइकसाहेब यांचें स्मारक.”

 हा प्रथम सन १७९९ सालीं ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होऊन येथें आला. आणि ९० वर्षांची उमर होऊन हा सन १८७३ मध्यें फ्रान्समध्यें बाग्नेरिस येथें वारला. हिंदुस्थानांतील राणीसरकारच्या सैन्यावरील नोकरींत यानेंं बहुतेक आयुष्य खर्च केलेंं होतेंं

 पूर्वेच्या बाजूस लेख आहे तोः--

 " सन १८०३।४ साली सैन्यामध्ये जे फेरफार करण्यांत आले त्या वेळी याने आर्थर वेलस्लीसाहेबाच्या हाताखालींं सबालटर्नचे हुद्द्याची कामगिरी बजाविली होती. खडकीच्या लढाईत ता० २५ नोवेंबर सन १८१७ मध्ये हा कपतान फोर्डच्या सैन्यांत ब्रिगेड मेजर होता. या वेळी २८०० गोरे पायदळाच्या लोकांनींं पेशव्यांचा पराजय करून पुरंधर व दुसरे डोंगरी किल्ले घेतले, तेव्हां हा त्यांत होता. सन १८२४ मध्ये कितूर येथील पलटणीचाही हा नायक होता. पुढे हा मुंबईचा टाऊन मेजर झाला आणि शेंंवटी साताऱ्यास रेसिडेंटच्या जागी आल्यावर हिंदुस्थानांत येणाऱ्या गोरे अम्मलदारामध्येंं नोकरीत यानेंंच पहिला नंबर मारला होता. या हवेपासूनचे फायदे यानेंंच प्रथम लोकांच्या मनांत आणून दिले, आणि महाबळेश्वर हेंं हवा खाण्याचे ठिकाण करण्याचा योग आणिला. याप्रमाणे हेंं हवाशीर स्थान शोधण्याचे दीर्घ परिश्रम करून मुंबईइलाख्याचे डोक्यावर यानें परोपकाराचा मोठा बोजा करून ठेविला आहे.”

 उत्तरेच्या बाजूचा लेखः--

 " लाडवुइकसाहेबाचे अशा दीर्घश्रमाबद्दल सरकारच्याच हुकुमानें या टोंकाला लाडवुइकपाइंट असें नांव देिलें आहे. सन १८२७ सालीं निबिड अरण्यांतून हळू हळू आणि अविश्रांत श्रम घेऊन यानें या स्थळीं येण्याचें धाडस केलें होतें; ह्मणून त्याचे स्मारकास हेंच योग्य स्थळ आहे असें समजून त्याच्या एकुलत्या एक मुलानें ही कबर येथें बांधिली आहे; हा मुलगा पहिल्यानें मुलकी खात्यांत शिरून पुढे १८७४ मध्यें मद्रास इलाख्याच्या अकौन्टंट जनरलच्या हुद्यावर गेला होता."

एलफिन्स्टन पाईट.

हें टोक मालकमपेठेपामून सहा मैल व क्षेत्र महाबळेश्वरापासून एक दीड मैल आहे. या टोंंकाचेंं नाव नामदार माउंट स्टुअर्ट एलफिनस्टनसाहेब यांच्यावरून पडलें आहे. सॅनिटेरियमकरितां जागा प्रथमत: या ठिकाणीं कायम करण्याचा बेत होता. परंतु येथें पाण्याची कमताई असल्याकारणानें पुढें मालकमपेठची जागा ठरली गेली, तेव्हां या ठिकाणींं त्यांनीं एक आपला बंगला बांधला.

 हा पाईट एका अजस्त्र कडयाचे टोंकावर असून, खालीं कोयनेच्या खोऱ्याची तीन हजार फूट खोल अशी एक भयंकर घळ आहे. या टोकावरून डोकावणे फार धैर्याचें काम आहे. कारण, खालीं जो भव्य भयानक प्रकार दिसतो, ते पाहिल्यावर डोळे फिरून जाऊन अगदींं अंधारी येते; व पाइंटाचा खडक अगदींं घसरतां असल्यामुळे उभ्यानें पाहण्याची तर सोयच नाही. या घळीचे समोर प्रतापगडचा किल्ला उभा आहे. तसेंच सावित्रीनें महाबळेश्वराच्या मस्तकांतून निघून ज्या चिंचोळ्या खोऱ्यामध्यें चार हजार फुटीचे उंचीवरून धाडकन् उडी टाकिली आहे त्या खोऱ्याचा प्राग्् भाग एलफिनस्टन पाईंंटाच्या उत्तरेस आला आहे; व पश्चिमेस समुद्रसुशोभित कोंकणपट्टी सरधोपट पसरली असून त्यावरील लहान लहान डोंगर व टेंकडया कित्येक काळ्या, बहुतेक भुऱ्या व मधून मधून हिरव्या दिसतात. हा किंचित् उंच सखल प्रदेश उत्तरोत्तर अफाट पसरत जाऊन क्षितिजाशीं मिळाला ह्मणजे आकाशाचे भिंतीला अपरिपार गलथा मारल्याप्रमाणें दिसतो. व नभस्थलापासून ह्या गलथ्याचा फुगीरभाग किंचित् पुढे येऊन त्याचा रंग नीलवर्ण, पांडुर व कोठे कोठे गुलाली झाकीचा असतो. हा गलथा समुद्राच्या पाण्याचा होय. समुद्र व घाटमाथा यांजमध्ये तीस पस्तीस मैलांचें अंतर असल्यामुळे समुद्राचें पाणी नलिकायंत्रानें पाहिल्याखेरीज ओळखतां येत नाहीं. शिवाय ऊन असल्यास रवेिकिरणें मध्यें आल्यानें, परावर्तनादि व्यापार मेघमिश्रित वातावरणांत होऊन समुद्राच्या पाण्याचा विस्तीर्ण ढीग कांहीं एक विलक्षण रंगाचा दिसतो व या उदकाची लंबायमान रेखा पश्चिमेचे आभाळामध्यें ढळढळीत दिसत असते.

एलफेिनस्टन पाइंट आणि आर्थरसीट पाहण्याला नेहमीं बराच वेळ लागतो. या पाइंटाच्या वरील बाजूस मजेखातर बाहेर भटकणारे किंवा वनभोजनाचे भोक्ते अशा लोकांकरितां मुनेिसिपालिटीनें एक लहानसा बंगला बांधिला आहे. त्यांत फर्निचर (सामान) कांहीं ठिकाणीं ठेविलें आहे. यांत जेवणाच्या टेबलावरील सामान नसून जेवण करण्यास आचारीही नाही, यांचा उपभोग घेणारांस रोजची फी ३ रूपये द्यावी लागते. या बंगल्याला नेहमीं कुलूप असून त्याची किल्ली सुपरिंटेंडंटसाहेबांच्या आफिसांतील ओव्हरसीयरजवळ असते. ती सुपरिंटेंडंट साहेबांकडे मिळण्याबद्दल अर्ज केला ह्मणजे कोणासही मिळते. तेथील सुखोपभोग घेण्याचें मनांत आल्यास प्रथम तेथें शिधासामुग्री पाठवावी आणि नंतर सकाळीं निघून तेथें जावें, हा उत्तम पक्ष होय, त्या बंगल्याला जाण्याचा रस्ता केवळ उन्हाळ्यांत माणसें जाण्यासारखा आहे. महाबळेश्वर गांव किंवा देवळापावेतों मालकमपेठेहून चौचाकी गाडी नेण्यात कांही हरकत नाहीँ. परतु तेथून पूढे मात्र टांगे किंवा घोडीं जाण्यासारखाच रस्ता आहे. त्या बंगल्यांत वनभोजनास जाण्यासंबंधी दुसरी एक अवश्य तजवीज करावी लागते ती ही कीं त्या बंगल्याच्या मागील बाजूस बंगल्याला लागुनच असलेल्या खडकांतून जो एक वाहता झरा आहेंं त्याचें पाणी या गांवच्या गुरामाणसांनी खराब करूं नये म्हणून बंदोबस्ताकरितां आदले दिवशी किंवा आपण तेथे जाऊन पोचण्याचे पूर्वी काहींं वेळ एखादा माणूस पाठवावा लागतो. त्याचप्रमाणे थंडीचे दिवसांत तेथेंं कोणी जाईल तर त्यानेंं आपल्या स्वयंपाक्याला बंगल्यांत कोठेंं मधाची पोळी लागली आहे की काय ह्मणून पाहण्यास ताकीद द्यावी; नाही तर यांनींं स्वयंपाकाच्या चुलीचा धूर केल्याबरोबर जर बंगल्यांत एखादें मधाचेंं पोळेंं लागलेंं असलेंं तर त्या पोळीतल्या माशा एकदम येऊन सर्वांवर धाड घालतील, आणि सर्वांना " ऊठ की पळ " करून सोडतील. असा दोनदां अनुभव आल्यामुळे ही सूचना दिली आहे.

 एलफिन्स्टन पाइंटवरून आर्थर सीटला जाण्याची जी गाडीवाट आहे तिचे पहिले मैलांत बह्मारण्यांतील भस्माचे जागी जाण्यास डावे हातास एक पाऊलवाट आहे. तिला रहदारी नसल्यामुळेंं ती चांगली मळलेली दिसत नाही. यामुळेंं ती नवीन गैर माहीत लोकांना एकदम लक्षात येत नाहींं. या फूटवाटेला एक बोर्ड लाविला ह्मणजे जिज्ञासु लोकांना तेथे गेल्यावर बुचक ळ्यांत पडल्यासारखे होणार नाही. ही जागा औरस चौरस सुमारें २० फूट असून एक पुरुषापेक्षां जास्त खोल आहे. याचा असा चमत्कार आहे कीं यांतील माती ( भस्म) पांढरी असून लोण्यासारखी नरम आहे. यावर गवतसुद्धा उगवत नाहीं. यावरून ब्रह्मारण्याचे वर्णनांत सांगितल्याप्रमाणें ही यज्ञाचे स्थंडिला (altar) ची जागा असावी असें वाटतें. कारण, नुसत्या राखेंंत ( ashes) झाड किंवा गवत कधीही यावयाचें नाही असा नियम आहे. त्यास अनुसरूनच येथील वस्तु स्थितेि आहे. भस्माचे जागेला लागून सावित्रीच्या उगमाचा प्रवाह अस्मान कड्यावरून खाली पडून दरींतून चालला आहे तेही पाहण्याची मोठी मौज आहे. एल्फिन्स्टन पाईंटापासून आर्थर सीटपर्यंतचा गाडी रस्ता कडयाच्या किनाऱ्याने असल्यामुळे कड्याच्या बाजूला पारापेट (कठडेवजा ) भिंत घातलेली आहे.. तथापैि येथें गाडी बेतानेंच हांकावी. 

आर्थरसीट.

 हा पाइंट मालकमपेठेपासून आठ मैल व महाबळेश्वरक्षेत्रापासून पांच मैल आहे. हा पाइंट ब्रम्हारण्याकडे आहे. या पाइंटला जाण्यास महाबळेश्वरक्षेत्राला जाऊन, तेथून पुढें बोर्ड लाविला आहे तिकडील रस्त्याला वळून, ब्रम्हारण्यांतून जावें लागतें. समुद्राचे पृष्ठभागापासून याची उंची ४४२१ फूट आहे. यावरून इकडील बाजूच्या शैलशिखरांचा हाच मेरुमणी आहे असें ह्मणण्यास हरकत नाहीं. या पाईंंटानजीकच्या खुल्या जागेंत आर्थर मॅलेट साहेब झोंपडी बांधून राहिले होते. म्हणून यास आर्थरसीट असें नांव पडलें आहे.

या झोंपडीच्या खुल्या जागेपलीकडील उतरणीच्या घट्ट जमिनीवर मातींत खोंदून केलेल्या पाय-यांवरून उतरून जातांना अंग तोलून धरून नेटाने पावलें टाकीत टाकीत गेलें ह्मणजे, मनुष्य या पाईंंटाचे प्रचंड कडयाच्या अगदीं काठांवर येऊन पोहोंचतें. येथें आल्यावरही या तरवारीच्या धारेसारख्या उभ्या काळ्या ठिक्कर पाषाणाच्या कड्याचे कांठांवरील पुढेंं झुकलेल्या खडकाच्या बैठकीवर जो कोणी छाती करून जाऊन बसेल व तेथून पुढल्या व खालच्या पांच हजार फूट खोलीच्या प्रदेशावर नजर फेंकून नीट न्याहाळन काही वेळ पाहील, त्याच्या अंतःकरणांत भीति व आश्चर्य यांचा अननुभूत संकर झाल्यावांचून राहणार नाही. तसेच एक वेळ मागे वळून पाहिल्यावर डोंगराच्या मुख्य भागास सोडून अंतराळी असलेल्या कड्यावर आपण आहोंं, असे त्यास दिसतांच, त्यास चक्कर येऊन डोळे मिटून स्वस्थ बसावें, आणि बसल्याजागींंच पालथेंं पडून खालच्या खडकास घट्ट धरावेंं असे वाटेल.

 थोडा वेळ दम खाऊन भीति थोडी कमी झाली आणि आजुबाजूस नजर टाकतांं येऊ लागली ह्मणजे विचार आणि विकार यांची त्याचे मनांत एकच गर्दी होऊन जाईल.

 या बसलेल्या जाग्यावरून पुढील अंगास तो वांकून पाहील तर इतका कांहीं खोल खड्डा दिसेल की, कड्याच्या अगदी पायथ्याला जर एखादेंं खेडेगांव असतें तर त्यांतील माणसें वारुळावर मुंग्या फिरल्याप्रमाणें दिसलीं असतीं. त्याचप्रमाणें सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह अगदीं जवळच्या अस्मान उंचीच्या कडयावरून खालीं पडून ठिकऱ्या ठिकऱ्या झालेला असा दृष्टीस पडून लागलीच दिसेनासा होतो तो पुनः फार दूरच्या अंतरावर पर्जन्यकाळअखेर दृष्टीस पडेल.

 समोरचे बाजूस कोंकण पट्टीकडे खालीं सावित्रीच्या खोऱ्यामध्यें व पलीकडे अजमासें पन्नास पाऊणशे पर्वतांची पंक्ती उभी आहे तिच्या भयंकर व अक्राळ विक्राळ स्वरूपाकडे पाहिलें ह्मणजे काय होते व काय दिसतें त्याचें वर्णनच करवत नाहीं. दहा दहा पर्वतांची एक एक ओळ याप्रमाणें कित्येक ओळी बसल्या आहेत. त्यांतील प्रत्येक डोंगर एकमेकांपासून भिन्न असून, त्याच्या मस्तकाचा नीट अणकुचीदार सुळा वर गेलेला आहे. शिवाय दोन्ही बाजवा करवताच्या धारेसारख्या खालपावेतों पोचल्या आहेत. या ठिकाणीं वनस्पतीचा लेश देखील नाहीं. या पर्वतपंक्तीचीं शिखरें एखाद्या किल्याच्या कपाटावर चोचीदार लंगरी खिळ्याच्या रांगा असतात त्याप्रमाणें दिसतात. तेव्हां नागवे, बोडके, व मस्तकसहित सर्वांग भादरलेले, जळके, काळे कुळकुळीत, व मधून मधून किंचित् भोरे, अशा प्रकारचे जे हे शैलसमूह दिसतात त्यांचें उग्र व रौद्र रूप पाहून पाहणाराचें हृदय खरोखर भयाभीत व चंचल होऊन दृष्टि स्थिरपणे ठरत नाहीं, व मनांत कल्पना येते कीं, पर्जन्यवृष्टिच्या वेळेस अवज्ञा करून वृष्टि न करणार जे मेघ त्यांना सुळी देण्याकरितां हें एक भयंकर यंत्र तयार केलें आहे कीं काय ? अथवा इंद्रानें पर्वताचे पक्ष कापण्याकरितां या ठिकाणी बर्च्या जमवून ठेविल्या आहेत कीं काय !

या सीटच्या दगडाला लागूनच एक खिडकीच्या कठडयासारखा लहानसा खडपा आहे. याच्या दोन्ही आंगास उंच खडक असून मध्ये हा पातळ पाषाणाचा खडपा लांकडी फळीप्रमाणें पाहून येथें अगदी खिडकीचे कठड्याचा भास होतो. यावर एकदा जाऊन पाहोंंचले ह्मणजे खालच्या खोऱ्याच्या विलक्षण खोलीचा व आसमंतांतील प्रदेशाचा मोठा आचंबा वाटतो. हा कठडेवजा खडपा सुमारें तीन फूट उंच असल्यामुळे पाहणाऱ्यास त्याजवर खुशाल टेंकून खाली निर्धास्तपणें पाहतां येतें. आणि फार पुढें होऊन वांकून पाहिलं तर तोल जाऊन कोसळून पडण्याची धास्ती वाटत नाहीं, या ठिकाणींं उभे राहून खालील खोऱ्यामध्यें काहीं हलका पदार्थ सोडला तर तो खालचे खोऱ्यातील तुफान वाऱ्याचे योगानें पुनः माघारा येतो, ही प्रत्यक्ष करून पाहण्याजोगी मोठी मजा आहे.

 आर्थरसीटच्या पाइंटचा दगड आणि झोंपडीची खुली जागा यांच्या मध्यावर एक जिवंत पाण्याचें डबकें आहे, त्यास वाघाचें पाणी असें ह्मणतात. त्यांतील पाणी या अरण्यांतील हिंसक श्वापदे व विषारी जनावरें पीत असल्यामुळे त्याची चव घेण्याचें धाडस करणें चांगलें नाहीं. नाइलाज झाल्यास यांतील पाणी उपसून काढून पुन्हांं नवीन आलेले पाणी पिण्यास अगदींं प्रशस्त असतेंं.   या खडप्यावर येण्यास दुसरी एक लांबणीची परंतु सुलभ अशी पाऊलवाट आहे. ही वाट तशीच नीट कोंकणांतही गेली आहे. तिला ढवळाघांट असें ह्मणतात. या कठडेवजा खडप्याजवळ या वाटेला खडकांत एक सुमारें २० फूट खोलीचा खडुा आहे. त्याचे पलीकडे जाण्यांस जंगली दाणगट सोट उभे व आडवे बांधून शिडीसारखी सोय केली आहे. त्या वाटेनें कोंकणेलोक सडे व ओझी घेऊन जातां येतां पुष्कळ दृष्टीस पडतात. जोरखो-याच्या बाजूस असलेल्या खेड्यापाड्यांतील लोकांना प्रसंगोपात्् महाबळेश्वरीं पावसाळ्यांत येण्याचें प्रयोजन पडल्यास ते वेदगंगेच्या उगमाचे वरील बाजूनें एका खिडीतून येऊन त्या पाऊलवाटेला लागतात, आणि पुढे आर्थरसीटवर रस्त्याला मिळतात. या खिडीचे नांव बहिरवदरी असें आहे. या बहिरवदरीजवळ वेदगंगेला एक ओढा मिळतेी त्याचें नांव यतिरा असें आहे. यास उन्हाळयांंत सात वेळांं जास्त पाणी येतेंं असेंं येथील लोक सांगतात.   ही वर सांगितलेली शिडी उतरून गेलें ह्मणजे उजवे हातास फार घोर अरण्य दिसतें. हें जोरखोऱ्याचे हद्दीत आहे. यांस माणिकचैोक असें ह्मणतात. हा चौक पूर्वी जावलीचा राजा चंद्रराव मोरे यानें बांधून तयार केलेला होता. तो पुढें शिवाजीमहाराजांच्या हातीं आला तेव्हां ह्या जंगलांत गुप्त फौज व शिबंदी ठेवण्यास त्यांनीं ही जागा केली होती. आतां या वाटेनें या जंगलामुळे दिवसाही एकटें दुकटें येतांना मुठींत जीव धरून यावें लागतें. या जंगलांत हाताच्या वेंगेंत न मावणारे अशा मोठमोठया वृक्षांची झाडी इतकी दाट आहे कीं त्यातून लंबायमान सूर्यकिरणांचा ऐन दोनप्रहरीसुद्धां प्रवेश होऊं शकत नाहीं. येथील खळ्या खणणारे पावसास या जंगलांत जमिनीवर थाराही मिळत नाहीं. वाघ, चित्ते, गवे वगैरे क्रूर हिंसक पशू यांतील गारव्याचे ठिकाणीं खुशाल भ्रमण करीत असतात. अशा शांत, निर्जन, आणि हिंसक श्वापदांनीं गजबजलेल्या अरण्याचे जवळूनसुद्धां जाणाऱ्या एकट्या दुकट्या मनुष्यास जनावरें येऊन आलिंगन देण्यास निःशंक बाहेर आलेलीं कधी कधी दृष्टी पडतात, तेव्हां अगदी पांचावर धारण बसून जाते कारण अशा भयंकर चिंचोळ्या वाटेने जाणाऱ्यास जीव घेऊन पोबारा करीन असे वाटल्यास तेंंही अशक्य ! कारण, दोहीकडे अस्मान कडे ! वाघोबाचीही स्वारी भक्ष्य मिळविण्याकरितां रानांतून हवी तिकडे भटकत असल्यामुळे त्याचीही केव्हां केव्हां मुलाखत होते. परंतु या रानचे सराईत कोंकणेलोक वाघास वाघरूं ह्मणून तेव्हांच धुडकाऊन देतात.

 या गृहस्थास दिवसास रानांतील प्राण्याचे खाद्य सांपडले नाही ह्मणजे रात्रीस महाबळेश्वर गांवांत शिरून तो बाहेर उघड्यावर बांधिलेल्या गुरांचा फन्ना उडवितो. चोहोकडे अशा निर्जन वनांत अगदी निःसीम शांतता असतांही खालील नदी काठच्या मेंढरांच्या कळपांचे बेंंबेंं ओरडणेंं, व गुरांच्या कळपांचे हंबरणेंं वर असलेल्या इसमास ऐकूसुद्धां येत नाही. अशा खोल दरीत डोकावून पाहिलेंं तर भोंड येईल असे वाटतेंं.  सारांश, सर्व महाबळेश्वरांतील रमणीय स्थलापेक्षा या ठिकाणींं जो विशेष चमत्कार दृष्टीस पडतो तो खरोखर अवर्णनीय आहे. येथें मेघमंडळास भिडणारे उंच पर्वत, व त्यांच्या पायथ्यासभोंवतीं, कित्येक अगदीं नळीप्रमाणें चिचोळीं असून वरून कड्यानें आच्छादित असल्यामुळे आंत सूर्याचा प्रवेश न होतां, अंधकार व तशांत निबिड छायेनें भरलेलीं अशींं, आणि कित्येक मगराप्रमाणें भयंकर तोंडें वांशीत जाऊन पुढें अफाट मैदानाला मिळतात अशीं, हजारों फूट खोलींचीं खोरीं आहेत. या निरनिराळ्या खोऱ्यांमध्ये पर्वतांतून उत्पन्न होऊन, व अजस्र कड्यांवरून हजारों फूट खाली उडया घालून ज्या नद्या विलक्षण विस्तार पावून देशसमृद्धीस कारण होतात, त्यांचीं पात्रं सर्पाकृति व उन्हाळ्यांत शुष्क आणि जलशून्य दिसत असतात. ज्या कडयांवरून त्यT नद्या उडया टाकितात, त्या कडयांला हजारो वर्षांपासून पडलेले विस्तीर्ण घट्टे दिसतात, तसेच समुद्रतीर व त्यावर असलेले बाळडोंगर सोंगटया प्रमाणें दिसतात. पर्वतावरील ब्रह्मारण्यांत तपोवनामधील वृक्षसंमर्द, पुरातन तपश्चर्येचीं स्थानें, दऱ्या, व गुहा, इत्यादि यांचा एकत्र समुच्चय एकसमयावच्छेदेकरून दृष्टिगोचर झाला म्हणजे जो लोकोत्तर निरतिशय, व अमानुष चमत्कार दृष्टीस पडतो आणि जी सृष्टीची नैसर्गेिक स्थिति साक्षात् नेत्रांसमोर येते, त्याकडे लक्ष दिलें ह्मणजे पाहणारांच्या अंतःकरणाची वृत्ति काय होते हें त्यांसच विचारलें पाहिजे. कितीही मोठा पाषाणहृदयी नास्तिक असला तथापि या ठिकाणींं आणून त्यास उभे केलें तर निमिषमात्राचा अवकाश न लागतां त्याच्या सर्व पाखंडमताचा भंग होऊन तो ईश्वरपरायण होईल यांत किंचिंतंही संदेह नाहीं. आपल्या सारख्याचा तर ऊर दडपून गेल्याप्रमाणे होतो, आणि गर्व असल्यास सर्व हरण होऊन वृति अगदीं लीन व नम्र होते. जिकडे पहावें तिकडे ईश्वर दिसू लागतों. व अंतर्यामीची गडबड होऊन विचारास अवसर सांपडला ह्मणजे वाटतें की जगदीश, जगन्नियंता, जगत्प्रतिपालक, सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वशक्ति, अनादि, अनंत, निराकार, नि विकार असा जो प्रभु त्याचा महिमा अपार व लीला अगाध आहे. आपण क्षुद्र व अकिंचन आहोंं. आपलेंं काय ! पण महान् महान् राजे व योद्धे ज्यांनींं शेकडोंं वर्षेंं राज्य करून दिगंतरी कीर्ति पसरविली त्यांचीही दुर्दशा आपल्याप्रमाणेंंच आहे!

 या गोष्टीचेंं प्रत्यंतर या ठिकाणी तत्काल दिसून येते. तेंं असेंं कींं, कमळगड, प्रतापगड, व पुरंदर हे तीन किल्ले येथून दिसत असतात. मुसलमानांचे राज्य असतां या प्रांतींं विजापुरकराचेंं ठाणेंं कमळगडावर असे. पुढेंं मराठ्यांनींं यवनांचा पराभव करून प्रतापगडी आपलेंं ठाणे केलेंं. नंतर पेशव्यांनी राज्यश्री भोगिली, परंतु ते यवन, मराठे व पेशवे आज कोठेंं गेले त्यांचा पत्ता नाही! त्यांनींं या ठिकाणी राजविलास भोगले, शूर कृत्येंं केलींं, आणि यावच्चंद्रदिवाकर आपली सत्ता चालावी म्हणून मजबूत व दुर्गम किल्ले बांधिले. पण हल्लींं ते किल्ले धूळीस मिळत चालले आहेत! हल्लींं सर्व राजसत्ता प्रस्तुतच्या राज्यकर्त्यांस प्राप्त होऊन त्यांनींंही या शैलशिखरावर मालकमपेठ हेंं विलासाचे स्थान का यम केलें आहे, तेवढें मात्र शोभायमान दिसतें. बाकीच्यांचा लय झाला. तस्मात् हे ईश्वरा ! आह्मीं मर्त्य, अकिंचन, अनभिज्ञ मानव आहेत. आमचें तुझ्या अमानुष शक्तीपुढे सामर्थ्यं किती ? तुझा परम मित्र व भक्त जो अर्जुन त्यानें सुद्धां विश्वरूप पाहिल्यानंतर तुझा स्तव केला आहे. तेव्हां आम्ही या आर्थरसीटवरून ज्या जड वस्तु पाहून कुंठित होऊन गेलों आहों, त्या निर्माण करणाऱ्या जगच्चालका, तुझी मात्रा व शक्ति अगाध आहे त्यांची आह्मी पामर कल्पनाही करू शकत नाहीं. याकरितां आमच्या कोते विचारानें झालेल्या प्रमादांची क्षमा कर.

---------------
मुंबईपाईंट.

 मुंबइला जळमार्गानेंं जाण्याच्या जुन्या रस्त्यावर हा पाईंंट असल्यामुळे याला मुंबईपाईंट असें नांव पडलें आहे. मालकमपेठेपासून दोन मैलांवर रडतोंडीच्या घांटाच्या ऐन माथ्यावर हा पाईंंट आहे. या रडतोंडीच्या घाटाला हल्ली फिट्झर्ल्ड घांट असें ह्मणतात. येथील सर्व पाइंटांत ह्या पाईंंटाला येणारे लोक फार अस तात. या पाइंटावर गाड्या उभ्या करण्यास जागा चांगली प्रशस्त आहे. येथे बाँड वाजविण्याकरितां उंच चबुतरा केलेला आहे. याला येण्यास दोन वाटा आहेत. एक रस्ता महाड रस्त्यानेंं जाऊन गव्हरमेंट हौसकडे जाण्याचा रस्ता उजवे हातास सोडून गेलेला आहे. दुसरा रस्ता महाड रस्त्यानेंं सुमारे पाऊण मैल गेलेंं, ह्मणजे डावे बाजूला फुटतो. अशा रीतीनेंं ह्या टोकांवर जाऊन उभेंं राहिलेंं ह्मणजे खाली कोयना नदीचेंं खोरे तीन हजार फूट खोल आहे, तेंं पाहून डोळे फिरूं लागतात. समोर इतिहासप्रसिद्ध व आपल्या शिवाजीराजाच्या चरित्रानेंं परिपूत झालेला प्रतापगडचा किल्ला जमिनीवरून नीट सुळ्यासारखा जात आहे, तो नजरेस येतो. किल्लयाच्या उजव्या बाजूस गर्द झाडीमध्ये लहानसेंं टुमदार पारगांव व पुढे पारघाटहीं दिसतात. नंतर पारघाटाच्या माथ्यावरून नवीन बांधलेली महाडची सडक नागिणीप्रमाणेंं नागमोडीनेंं उतरत येऊन कोयनेच्या खोऱ्यामध्ये अल्पकाळ गडप झाल्याप्रमाणे होऊन नंतर मोठ्या डौलानेंं घाटमाथा चढत चढत महाबळेश्वरीं श्रोशंकराच्या गळ्यांत माळेप्रमाणें वेष्टण घालण्यास जात आहे कीं काय असें वाटतें ! आपल्या डाव्या आंगांस लहानमोठ्या पर्वतांची अस्ताव्यस्त गर्दी पसरलेली असते. हें पर्वतमंडळ व तसेच आपण उभे राहतों त्या बाजूस व उजवे बाजूस पर्वतराज आहेत ते डोकीं उंच करून वीरश्रीने लढण्यास अर्धरथी एकरथी व महारथी असे उभे ठाकलेले असतात. परंतु सर्वात ठेंगणा तथापि पुराणविख्यात अभिमन्युप्रमाणे वक्राकृति, दुर्धर, अतिरथा जो प्रतापगडचा शैल तो सगळ्या गिरिवीरांस आपल्यापुढें अर्धचंद्राकार व्यूहरचनेनें उभे ठेवून त्यांच्यावर पाहरा करीत आहे कीं काय असा भास होतो. आणि प्राकाररूप वीरभूषणें मस्तकीं परिधान करून, व सुळ्याचे खड्ग हातीं घेऊन, प्रतापगड या नांवानुरूप साक्षात् कृति करण्यास आवेशानें सिद्ध आहे कीं काय असें वाटतें. परंतु महावीरांचीं मनें जितकीं कठोर तितकीच मृदुही असतात. या वचनाप्रमाणे प्रातःकाळीं प्रतापगड किल्ला पाहण्यास गेलें म्हणजे त्या गिरिवीराची शोकावस्था दृष्टीस पडू लागते. जणूं काय हा मागील गत गोष्टी मनांत येऊन ज्या पुण्यश्लोक, ईश्वरपरायण आणि गोब्राह्मण प्रतिपालकाच्या निवासानें श्रीजगदंबेचे पाय आपल्या मस्तकीं लागून राजगुरू व साधुश्रेष्ट रामदासस्वामी यांच्या आगमनाचा लाभ होत होतां, तो छत्रपति, तो राजश्रेष्ठ, तो स्वदेशाभिमानी, तो आर्यधर्मप्रतिपालक, तो गुणग्राही, उदार, पुण्यश्लोक शिवराजा आतां आपणास नाहीं, त्याअर्थी आपलें जिणें व्यर्थ आहे अशा विचारानें पोटांत भडभडून आल्यामुळेच दुःखांत निमग्न झालेला असतो आणि दिनमणीचा प्रकाशपडेपर्यंत मेघपटलरूप वस्त्रानें आपलें तोंड झाकून घेतों असें दिसतें. सारांश, प्रतापगड पाहून विचारवंताच्या मनांत हे सर्व तरंग उठणें साहजिकच आहे.

कारनाक व फॉक््लंड पाईंंट.

कारनाक व फॉक््लंड हीं दोन गव्हरनरांचीं नांवें या दोन पाईंंटांस दिलीं आहेत. - मुंबई पाईंंटपासून कारनाक पाईंंट पाव मैल आहे; व फॉकलंड पाईंंट अर्धा मैल आहे. ह्या दोन्ही ठिकाणचे देखावे सारखेच दिसतात, मुंबई पाइंटापेक्षां या दोन ठिकाणांपासून सॅॅडलबॅॅगटेकडी समग्र दिसते. परंतु मुंबई पाइंट आड आल्यामुळे सूर्यास्ताच्या समयींचा चमत्कार तेवढा यांवरून दिसत नाहीं. फाकलंड पाईंंटावर गाडया क्षणभर उभ्या करण्यास जागेची वाण नाहीं. येथून वाबिंगटन पाइंटाचे कडे अगदीं साफ दिसतात. या दोन पाइंटाच्या आसपास डोंगरांची रांग नसल्यामुळे हे जमीनींतून उगवल्यासारखे दिसतात. या दोन पाइंटावर चौफेर दाट झाडी आहे. आक्टोबर महिन्यांत इकडील रस्त्यावरून शेवाळाची मजा दिसते.

फाकलंड पाईटच्या जवळच्या वनांतील रस्ता.

या झाडींत तयार केलेल्या जागीं स्वच्छ उजेड वगैरे आला ह्मणजे मोठी मासलेवाईक शोभा दिसते. वनभोजनाकरितां येण्यालायक ही जागा आहे. येथें साहेब लोकांचा गोल्फचा खेळ चालतो. त्या खेळाला जशी पाहिजे तशी येथें झाडी आहे. वेस्टवुड व फर्न बंगल्यानजीक महाड रस्याला जे अनेक रस्त फुटले आहेत, त्यांतील डावे हातचा रस्ता थेट फाकलंड पाईंंटावर जातो. तसाच डावीकडे टायगरपाथ टाकून उजवीकडे नीट डोंगराच्या कडेनें जाण्यास एक लहान घोडे रस्ता आहे. तो जेथपर्यंत जाऊन पोहोंचला आहे त्या ठिकाणाला एको पाईंंट अशी संज्ञा आहे. त्या रस्त्यानें खालील खोऱ्याची वनशोभा चांगली दिसते. म्हणून पायीं फिरण्यास जाणारांस हा चांगला मार्ग आहे.

सासून पाईंंट.

बाजाराकडून बाबिंगटन पाईंंटला जाण्याचा रस्ता आहे, त्या रस्त्यानें निम्यावर गेलें म्हणजे हा पाईंंट येतो. याचे समोर लांबीचे अंतरावर फाकलंड पाइंट दिसतो. याचे पुढील सखल प्रदेशांत वुडलॉंन बंगल्याजवळ टायगरपाथला एक रस्ता मिळालेला दिसतो.या रस्त्याचे उजवे बाजूस चिनी लोकांच्या बागा असून डावे बाजूस धबधबे आहेत, ते फारच मजेदार दिसतात. या रस्त्याने हवा खाण्याकरितां पायीं व घोडयावरून पुष्कळ लोक जात येत असतात.

क्यानॉट शिखर

 यांचे मूळ नांव "तंदूळनदी " असें आहे. याची उंची ४६४४ फूट आहे. याचा रस्ता लिलीकाटेज बंगल्यानजीक महाबळेश्वर रस्त्यापासून पेटिटरोडनेंं सुमारे ८०० पावले गेलेवर फुटतो व नागमोडीनेंं वर जाऊन भिडतो, तसेच दुसरा रस्ता महाबळेश्वर रस्त्यानेंंही वर जातो. या पाइंटावरून चोहोकडील प्रदेश फार रमणीय दिसतो. या पाइंंटावर साफ जागा आहे त्याचे मध्यावर उच्चस्थानी हल्ली एक चबुतरामात्र आहे, व त्या लगत एक लहान झाड आहे. या शिखरावरून सूर्योदय आणि सूर्यास्त पहाण्याची फार मजा असते. याचा रस्ता गाड्या येण्यासारखा आहे. परंतु काही ठिकाणी चढ बराच असल्यामुळेंं गाड्यांतून हिंडणारे लोक इकडे फार कमी येतात. मुंबईच्या सैन्याचा नायक आणि राजकुलोत्पन्न ड्युक आफ क्यानाटसाहेबसुद्धांं येथे आल्याची निरंतरची स्मृति देण्याकरितां त्यांचेंं नांव या पाइंटाला देऊन डिमॉक सुपरिंटेंडंटसाहेब यांनी या पाइंटास चिरंजीव करून ठेविले आहे. पूर्वी कामावर असलेवेळींं ह्यांनींं आपल्या आगमनानेंं हे ठिकाण मंडित केले असलेमुळे त्यांचेंं नांव निघण्याची ही करामत करून ठेविली आहे. यास ड्यूक पाइंट किंवा क्यानाट शिखर म्हणतात.

गव्हमेंट हौस किंवा प्रास्पेक्ट पाइंट.

 गव्हरमेंट हौसचे दुसरें नांव बेलाव्हिस्टा आहे. ही इमारत पश्चिम बाजूस अगदीं डोंगराच्या शुंडेवर आहे. येथून थोडीं कदमें गेलें ह्मणजे एक छोटेखानीं पाइंट लागतो त्याच नांव " प्रास्पेक्ट ” असें ठेविलें आहे. ही इमारत उंच जोतें देऊन भरपूर दोन मजली उठविली आहे. ही अष्टपैलु आकाराची मुंबईधरतीच्या इमारतीप्रमाणें बांधलेली असलेमुळे मालकमपेठेला एक मोठे प्रेक्षणीय ठिकाण आहे. दुसऱ्या मजल्याला बहुतेक बाजूंना ग्यालरी केली असल्यामुळे तर ही सुरेख दिसते. येथे स्वस्थ बसून लांबलांबचे देखावे पाहण्याची फारच मजा आहे. कंपौंंडांत आणखी लहान लहान सोईस्कर इमारती आहेत, व आराम घेण्याकरितां जागा केली आहे. येथे पियानोचे दालन आहे, बिलियर्ड हाल आहे व येथील विहिरीला पाणी काढण्याकरितां एक हातपंप लावून सर्व ठिकाणीं पाणी खेळविलें आहे. येथें नामदार साहेबांची स्वारी असतांना पाहणेस जाण्याची मनाई असते.

 या बंगल्यासभोंवार नानाकृति व नानातऱ्हेच्या फुलांनीं सुशोभित असा नवीन व्यवस्थेशीर बगीच्या केलेला असलेमुळे तो फार रमणीय दिसतो. येथील कंपौंडांतच एक विस्तीर्ण लॉन् टेनिस कोर्ट केलेलें आहे. त्याचे आसपास दाट झाडी असून तें अगदीं पाईंंटाचे माथ्यावर असलेमुळे दिवसा केव्हांही तेथें खेळण्यांत गुंग झालें तरी मुळींच श्रम वाटण्याचें कारण नाहीं. या इमारतीचे खालचे टप्प्यांत मुंबई पाईंंटाचे वाटेवर औरस चौरस सुमारें १२०० फूट जागेंतील झाडी तोडून पोलोच्या खेळाकरितां जागा तयार करण्यांत आली आहे. तेथें चालणारा सर्व खेळ येथील बागेंतून छानदार दिसतो, प्रास्पेक्ट पाईटवर उभे राहिलें असतां, उजवे हातास एलफिन्स्टन व डावे हातास मुंबई पाइंट हे मूर्तिमंत उभे राहिलेले दिसतात. मागें वळून पाहिलें ह्मणजे एकसारखा हिरवागार विस्तीर्ण प्रदेश दिसतो. त्याची शोभा लिहिण्यापेक्षांं पाहून चांगली समजेल. 

केटसपाइंट

 याला येथील गांवचे लोक नाकेखिड असें म्हणतात. हा येथून जुने पांचगणी रस्त्यावर फक्त चार मैल आहे. येथें पाहण्यासारखा एक विलक्षण मोठा खडक आहे. याची दर्शनी बाजू कृष्णानदीचे खोऱ्याकडे खांबाप्रमाणें उभी आहे व मागील बाजू दादर केल्याप्रमाणें आहे, तीवरून चढून जातात. जवळच सुमारें १०० फूट उंचीचा खडपा आहे. तो जणुं या मोठ्या खडकाचें पिल्लूूंच बाहेर पडलेलें आहे कीं काय असा दिसतो. ह्या खडप्यापासून सहा फुटावर याचा जनक खडक उभा आहे. या दोघांची ताटातूट झाली होती परंतु आतां त्यांच्याच जातभाईंनीं मध्यें पडून दोघांचा संबंध जोडला आहे. हे मध्यस्थ गृहस्थ फार कृश व किरकोळ घराण्यांतील असल्यामुळे थोरांप्रमाणें याजवर एकदम पुष्कळांची धाड घालण्याची गोष्ट तर एकीकडेच राहिली परंतु जो कोणी एखादा त्यास भेटण्याची इच्छा करील त्याला नम्रतेने खालीं मान घालूनच गेलें पाहिजे. तो जर इकडे तिकडे पाहील तर त्याची या मध्य स्थांस फार चीड आहे. अशा रीतीनें जपून मोठया कडयाचे मस्तकावर जाऊन बसलें ह्मणजे देशाकडील बाजू लांबपर्यंत दृष्टीस पडते. परंतु इकड़े देखावे वगैरे कांहीं मिळावयाचे नाहींत. तथापि खालील कृष्णानदीच्या प्रवाहाचीं वेडवांकडीं वळणें व लहान लहान पिकाचीं असंख्य भातखाचरें यांची मात्र फार शोभा दिसते. कमलगड, पांडवगड व मांढरदेव हे डोंगर फार भव्य दिसतात. तायघाट मध्यंतरीं आड असल्यामुळे वांई मात्र येथून दिसत नाहीं. डोंगर अगदीं जवळ दिसलेमुळे पावसाच्या पाण्यानें खणून खणून पडलेल्या त्यांवरील पनाळी फार भयंकर दिसतात. रबरी धावेच्या गाडया इकडे येण्यासारखा अलीकडे रस्ता केला आहे. पुणें रस्त्यानें वेण्णा तलावाच्या पुढें सुमारें दीड मैल गेलें ह्मणजे या पाइंंटाचा रस्ता फुटतो. ही फुटवाट जुन्या मालकमपेठचे रस्त्यांत मोडत होती, तेव्हां हिला फेरीसाहेबाचा रस्ता असें ह्मणत असत. ही अगदीं पाउलवाट असून दह्याट गांवांकडून आली आहे. 

बेकवुइथसाहेवांचें थडगे.

येथील चर्चाचे मागील बाजूस चर्चाला लागूनच उच्च ठिकाणीं बेकवुइथसाहेबांचें फारच उंच थडगें बांधिलें आहे, तें इतकें की पांचगणीकड़न येथें येणारे लोकांना हें बऱ्याच अंतरावरून दिसत असतें. समुद्राच्या पृष्ठभागापेक्षां याची उंची ४५५८ फूट आहे.

यावर चढण्याची वाट हल्ली फार खराब झालेली आहे. थडग्यावर ३० फूट उंचीचा साधा चौकोनी मनोरा आहे. हें सर्व काम या साहेबांच्या मित्रमंडळीनी वर्गणी करून केले आहे. यास एकंदर ३००० रुपये खर्च आला आहे. बेकवुइथसाहेब १८३१ मध्ये या ठिकाणीं परलोकवासी झाले. त्या वेळी हे सर्व हिंदुस्थानच्या सैन्याचे सेनापति होते. हिंदुस्थानांत लढाया सुरू झाल्यापासून वाटर्लूूच्या लढाईपर्यंत नांवाजलेले लोकांच्या मंडळींत यांची गणना होत होती, आणि अद्यापिही होत आहे. येथें वरील स्नेही मंडळींनीं एक शिलालेख करून बसविला आहे. दुसरा त्यांच्या अनाथपत्नी कडून संगमरवरी शिलालेख आलेला होता तोही आणखी येथें ठेविला आहे. परंतु येथील हवेनें हा दुसरा लेख १८४३ तच खराब होऊन लागेनासा झाला आहे. पहिला लेख तरी काळा झाल्यामुळे वाचण्याची पंचाईत पडतेच, तथापि दुसऱ्या इतकी याची दुर्दशा उडालेली नाहीं. यांतील गृहस्थ पिशाच होऊन लोकांना पीडा करूं लागल्यामुळे येथील लोक या थडग्यापुढें नारळ फोडतात, देणें देतात व कित्येक कौलही लावितात.

 पहिला लेख पश्चिम बाजूस लाविला आहे त्यांतील मजकूर येणेंप्रमाणें:-

  "लेफ्टेनेंट जनरल थामस सिडणे बेकवुइथ
  K.C.B. मुंबईचे गव्हरनर आणि सेनापति
  व राणीसरकारच्या तोफखान्यावरील कर्नल
  यांचे स्मारक"

पुष्कळ दिवस अप्रतिम नोकरी बजावून शेवटींं तारीख १५ माहे जानेवारी १८३१ रोजी महाबळेश्वर पर्णकुटिकेंत यांस देवाज्ञा झाली. वय ६० वर्षे. "यांच्या दिलदार स्वभावाची व मनमिळाऊ पणाची शिकस्त वाटून त्यांच्या मित्र मंडळींनी हे स्मारक केले आहे."

 पूर्वेच्या बाजूस दुसरा लेख आहे तो असाः--

 " किलहेडच्या परलोकवाशी वुल्यम डगलस साहेब बार्ट याची मुलगी व बेकवुइथसाहेब यांची पत्नी मेरी हिनेंं आपल्या नष्ट भ्रताराच्या अपार प्रेमाचेंं सूचक ह्मणून हा शिलालेख करून बसविला आहे. यांच्या आकस्मित मृत्यूनेंं माझा सखा, सहचारी आणि उपदेशक मला जगांत राहिला नाहींं. ख्रिस्ती धर्माला साजणाऱ्या त्यांच्या आंगच्या मनमिळाऊपणाचा लाभ व संसारसुखदुःखरहस्य यांला मी आतां अंतरले. हा जो घाला पडला त्याचेंं शांतवन केवळ त्यांच्या आत्म्यास शांति मिळाली असे मनांत आणूनच केलेंं पाहिजे. दुःखानेंं होरपळून गेलेल्या माझ्यासारख्या अनाथ विधवेच्या अंतःकरणांतील दोन शब्दांस त्यांच्या कळकळीच्या मित्रांनींं बांधलेल्या या थडग्यांत जागा दिली ही त्यांची मजवर मोठी दया आहे." 

देि लेडी नॉर्थकोट राइड
देि नार्थकोट पाईंंट.

बॉबिंगटन पाइंटावरून खालच्या रस्त्यानें सुमारें सवा मैल व्ल्यूहॅलीकडे जाण्याच्या रस्त्यानें गेलें असता, उजव्या हातास फक्त स्वत:च्या किंवा घोडयाच्या पायीं फिरण्यासारखा एक बोळवजा नुकतांच (सन १९०० सालीं ) मार्ग केला आहे, तो लागतो. त्यास आमच्या हल्लींंच्या उदार व लोकप्रिय मुंबई सरकारच्याच पत्नीचें नांव देण्यांत आलें आहे. हा सुमारें दोन मैल लांब आहे. या रस्त्याचें काम करण्यास नार्थकोट साहेब आणि इतर युरोपिअन लोक यांनीं आपली खासगी वर्गणी करून पांचशे रुपयांची रकम घातली आणि या ठिकाणी लेडी नार्थकोटसाहेबांची चिरकालची आठवण राहील असें करून ठेविलें आहे. तसेंच हा रस्ता जात जात ज्या विशाल कडयावर जाऊन पोहोंचून पुढें जाण्यास वाव नसल्यामुळे पसरून जणु काय खालीं उतरून जाण्यास मिळेल कीं नाहीं अशा स्थितींत वाटा

धुंडीत आहे असा दिसतो, त्या कड्याच्या ठिकाणाला खुद्द आपले हल्लींचे इलाखाधिपति नामदार नार्थकोट साहेब यांच नांव दिले आहे. याप्रमाणेंं अलीकडच्या मुंबईचे गव्हरनरांपैकीं यांचेच नांव कायतें जुन्या बड्या साहेब लोकांच्याप्रमाणेंं महाबळेश्वरी लोकांकडून अमर करण्यांत आलेंं आहे.

 या मार्गाने गाडी तर मुळीच जाऊ शकत नाहींं. कारण हा मार्ग जमीन खोदून काढून केला आहे, यामुळे फारच अरुंद झाला आहे. परंतु गाडींंतून जाणारे लोक या मार्गाने जरी पायींं किंवा घोडयावरून गेले, तरी त्यांस सूर्यकिरणापासून त्रास होण्याची बिलकूल भीति नाही, अशी गर्द झाडी या मार्गाच्या दोहों अंगांस राखून हा मार्ग काढला आहे. शिवाय या झाडीमुळेंं वाटेचे चढउतार पार टाकून गेल्यानेंं श्रम होऊन आंगाची जी तलखी होणार तिचेंंही काही अंशी निरसन होते. याप्रमाणेंं या वृक्षमंडपांतून (Glen) अगदी पाइंटावर आल्यानंतर पुढील खोऱ्यांत डोकावून पाहिले असतां कोयना कांठचा (Koyana valley ) लांबवरचा प्रदेश दृष्टीस पडतो. तो इतर न द्यांच्या कांठच्या प्रदेशाप्रमाणें उगीच सामान्य तऱ्हेचा नाहीं. ह्मणजे त्यांतील झाडी उंच आणि दाट वृक्षांची असल्यामुळे फारच भेसूर झाली आहे. कारण, मोठमोठाल्या तक्तपोशीच्या कडया, गवत व शेवाळ हीं कोयना कांठाला जितकीं विपुल सांपडतात तितकीं दुसऱ्या ठिकाणीं सांपडत नाहींत. तसेच रानटी श्वापदेंंही येथें फार आहेत. यामुळे हा कोयनाकांठ वरून पाहणारांस एकसारखा हिरवा पट्टा काढल्यासारखा दिसत असल्यामुळे फार छान दिसतो. हा कोयनाकांठच्या प्रदेशाचा देखावा महाबळेश्वरच्या आणखी कोणत्या तरी गाडी रस्त्यानें जाऊन गाडीतून हिंडण्याचे पूर्ण शोकी गृहस्थ पाहूंं म्हणतील, तर मात्र तो त्यांना कोठेंंच दुसरीकडे दिसणार नाहीँ. पुढील बाजूस सॅॅडलबॅगचा डोंगर फार स्पष्टपणें दिसत असतो. या लेडी नार्थकोट रस्त्यानें एक मैल गेल्यावर डाव्या हातच्या बाजूस ६ फूट रुंदीचा एक घोडेरस्ता दृष्टीस पडते. तो या रस्त्याच्या खर्चाच्या रकमेंतून शिनशिन घळी (Robber's cave) पर्यंत दुरुस्त करून घेतला आहे. या रस्त्याने रोज सकाळी हजारों लोक डोंकीवरून गवत वगैरे घेऊन मालकमपेठच्या बाजारांत विकण्यासाठी कोयना खोऱ्यांतील आठ दहा कोसाच्या प्रदेशावरून लगबगीने येतांना भेटतात. त्यांस तिकडील लोकस्थितीची व जंगलाची वरील माहिती विचारली असतां सहज मिळणारी आहे.

मालकम टेंंकडी.

 बाजारांतून पूर्वेकडे तोंड करून चाललेंं ह्मणजे समोर हिरवा कोट व पांढरी टोपी घालून प्रमुखपणाने उंच बसलेली जी वामनमूर्ति दिसते तिलाच हेंं नांव आहे. हिच्यावर जो बंगला दिसतो, तो कार व हार्डिंग साहेबांच्या मालकीचा होता. परंतु आतां तो बोमनजी दिनशा पेटिट यांनी खरेदी घेतला आहे. या बंगल्यावरून मालकमपेठ गांव व इतर टेंंकड्या पाहण्याची फार मजा वाटते. हा बंगला प्रथम या ठिकाणी जान मालकमसाहेबाने बांधून आपल्या लाडक्या मुलीचेंं चार्लट असें नांव या बंगल्याला ठेविल्यामुळेंं याला "मौंट चार्लट " असे ह्मणण्याचा पाठ होता. परंतु १८५२ मध्यें बिशपसाहेबांस असें दिसून आलें कीं गांवचे लोक मालकमचे घर असें ह्मणतात. तेव्हां लागलींच त्यांनीं त्याप्रमाणें नांव दिलें, याचे पायथ्याशीं सार्वजनिक उपयोगाकरितां बिशपसाहेबांनीं एक तलाव बांधला आहे त्यास बिशपतलाव ह्मणतात. या टेंकडीवरून प्रतापगडच्या पश्चिमेकडील बराच प्रदेश दिसतो, ही सांगण्यासारखी विशेष गोष्ट आहे.

पाण्याचे धबधबे.

 येथें तीन धबधबे आहेत, त्यांला हिंवाळ्यांत पाणी बरेंच असल्यामुळे ते प्रेक्षणीय असतात.

चिनी धबधबा.

 सासून पाइंट व फॉकलंड पाइंट यांच्या दरम्यानचे सखल जागेंत जे ओढे आहेत त्यांना मालकमगांव रस्त्याच्या दक्षणेस चिनी लोकांच्या बागेजवळ धबधबा आहे ह्मणून यास चिनी धबधबा म्हणतात,

धोबी धबधबा (फॉल).

 हा धबधबा फार उंचावरून पडत नाहीं, यामुळे ह्या धबधब्याची मजा कमी वाटते असें नाहीं. हा फार कोंडलेल्या जागेंत पडत असल्यामुळे त्या स्थळाला जी शोभा दिसते, तिचें सौंदर्य पाहण्यासारखे आहे. सिडने व एल्फिन्स्टन पाइंटाच्या मधल्या घोडेवाटेवर हा आहे. महाबळेश्वर वाटेनें थोडे लांब गेलें ह्मणजे डावे हातास धोबी फॉल अशी पाटी लावलेली दृष्टीस पडते, तेथून या धबधब्याची वाट फुटते. फक्त पायीं किंवा घोडयावरून जाण्याच्या उपयोगाची ही वाट आहे. धबधब्याचे ठिकाणीं आलें ह्यणजे दोन लंबायमान खडप्याच्या चिचोळ्या जागेंंतून पाणी खालीं आदळत असलेलें दिसतें. भोंवतालीं हिरवीगार रंगाची घनदाट झाडी लागून गेलेली आहे. येथें चोहीकडे सर्व शांतता असून फक्त पाण्याचा मात्र आवाज होत असतो, हें पाहून पुस्तकांतून वाचलेल्या अरण्याच्या देखाव्याचे वर्णनाचा बरोबर मोकबला आहे असें वाटून आनंद होतो. आजूबाजूच्या दाट झाडीतून या धबधब्याला जातांना व तेथें पोंचल्यावर एखादें श्वापद हळूच पुढे येऊन आलिंगन देईल किंवा काय, अशी फार भीति वाटते. वाटेनें फार रहदारी नसल्यामुळे व आजू बाजूला वस्तीच्या मुळींच अभावामुळे वाऱ्यानें झाडांचीं पानें हालून जो आवाज होत असतो तो ऐकून अगदी पांचावर धारण बसून जाते आणि एखादें हिंसक जनावर आपली चाहूल झाल्यामुळे उठून खुजबुजलें असें वाटून अगदीं जिवांत जीव रहात नाहीं. याकरितां बरोबर मंडळीचा समुदाय असला ह्मणजे भीति न वाटतां चांगला दम येतो, याकरितां एकटया दुकट्याने येथें जाणें चांगलें नाहीं

वेण्णा धबधबा.

 मालकमपेठ गांवानजीक पाचगणी रस्त्याचे बाजूस एक मोठं सरोवर आहे त्याच्याकडे या धबधब्याचें जनकत्व आहे. पावसाळ्यांत अति पर्जन्यानें हें सरोवर जेव्हां उचंबळत आणि गुळण्या टाकीत असतें, तेव्हां वेण्णानदी या सरोवरांतून बाहेर पडल्याबरोबर मंदगति जात आहेसें पाहून मनांत असा तर्क येतों की माहेराहून सासरी जाणें हिला अगदीं नकोसें असल्यामुळे ही अशी रेंगाळत आहे की काय कोण जाणें ! पण तिचें तें रेंगाळणें फार वेळ टिकत नाहीं. मंद स्थितांत सुमारें ३ मैल प्रवास केल्यावर पतिसमागमाच्या आनंदलहरी तिच्या हृदयांत येऊ लागून तिचें पाऊल वेगानें पुढें पडू लागतें, व प्रत्येक पावलास पुढें जाण्याची तिची उत्कंठा अधिकच तीव्र होते. अशा प्रेमलहरींनीं ती अगदीं बावरी होऊन जाऊन गर्जना करीत करीत ५०० फूट उंचीच्या कड्याखालीं उडी घेते तेव्हां तिला जे रागाचे कल्होळ येतात त्यामुळे दशदिशा भरून जाऊन आसमंतांतील इतर ध्वनि पंचत्वाप्रत पावल्यासारखे भासतात, आणि धबधब्याच्या आघातानें तळांत असह्य वारा उत्पन्न होतो. अशी बेफाम झाल्यामुळे सर्व उदकसंचय अत्यंत तप्त होऊन त्यास उसळ्या येत आहेत व त्यांतून स्फटिका सारख्या शुभ्र व हिऱ्यासारख्या तेजोमय, अंबुकणांच्या बाश्पांचे अनंत लोळ निघत आहेत कीं काय असा भास होतो ! यावेळीं हिच्या मैत्रिणी लांबलांब ठिकाणांहून येऊन हिला भेटत असतात. अशा झपाटयानें चाललेल्या स्त्रीस जर कोणी अडथळा केला तर तिचा क्षोभ होऊन ती ज्याप्रमाणे अडथळा करणाराला झिडकारून देतें त्याप्र माणें पाण्यांतून सोडलेले हलके पदार्थ धबधब्याच्या माथ्यावर परत उडून येतात.

 कित्येक विचित्र जिज्ञासूस या धबधब्याची शोभा तळाशीं कशी दिसत असेल हें जाणण्याची उत्कंठा असेल त्यांनीं ज्या ठिकाणीं धबधबा पडत असतो त्याचें समोर येऊन बसावें, या ठिकाणीं उभें राहून वर पाहणाऱ्याच्या अंगीं असामान्य धैर्य असेल तरच त्याचा निभाव लागतो. ज्यांचें धैर्य दगडासारखेंं असतें ते जिवावर उदार होऊन आपली उत्कट जिज्ञासा परिपूर्ण करण्यासाठीं आपले जीव आपल्या वाटाड्याच्या हवालीं करितात. हे वाटाडे येथील खेड्यांतील लोक असतात. यांना सहवासामुळे कसलीच भीति वाटत नाहीं. हे त्यास धबधब्याचे मागें घेऊन जातात. अशा ठिकाणीं उभे राहून पुढें पडणाऱ्या प्रचंड वारिप्रपाताकडे पहात, व रंध्रास भेदून जाणारा वारिनिर्घोष ऐकत, असतां मनाची जी स्थिति होत असेल तिची वाचकांनींच कल्पना करावी. अशा ठिकाणाहून जे सुरक्षितपणे परत येत असतील, त्यांस मृत्युमुखांतून बाहेर पड ल्यासारखें होऊन, आपला पुनर्जन्म झाला असें वाटेल यांत शंका नाहीं.

 आक्टोबर महिन्यानंतर या नदीचे पाणी कमी होऊन धबधब्याचा पाऊण हिस्सा खडक पुढे झुकल्यासारखा असल्यानें प्रवाह टप्याटप्यानें जातो आणि मग खालीं आपटतो; यामुळे जे स्फटिकासारखे वारिबिंदु उडत असतात त्यांवर सूर्याचे किरण तिरकस पडून सभोंवार इंद्रधनुष्याचें कडे दिसतें तें फारच शोभा देतें. ज्या कड्यावरून धबधबा पडतो त्याच कडयांवर खालून वर मेटाकुटीने जातां येतें. परंतु अंगावरचीं पांघरुणें मात्र बहुतेक तुषारांनीं ओलीं होतात.

 याला जाण्यास दोन वाटा आहेत. एक सातारा रस्त्याला अडीच मैल गेल्यावर डावे बाजूनें लिंगमळा बंगल्याजवळून वाट फुटते ती पाऊल वाट, व दुसरी केट पाइंटानजिक पुणें रस्त्यापासून निघते ती. या दोन्ही वाटांनीं मनुष्य धबधब्याच्या माथ्यावर येऊन पोहोंचतों.

---------------