Jump to content

महाबळेश्वर/साहेबलोकांची व्यवस्था.

विकिस्रोत कडून
साहेब लोकांची व्यवस्था.
----------------

 ख्रिस्ती देवळाच्या उत्तरेस खुल्या जागेवर फ्रिअर हालची इमारत आहे. ही इमारत गॉथिक घाटाची (ह्मणजे कमानी कमानीची ) अशी बांधलेली आहे. इला सर्व तांबडा दगड घडून बांधकामास लावला आहे. ही बांधण्यास पहिल्यानें मुंबईचे शेट कावसजी  माणिकजी लिमजी यांनी उचल केली होती. अशी गोष्ट झाली कीं, १८६४ मध्यें हे गृहस्थ येथें होते त्या वेळीं त्यांस सार्वजनिक सभा भरविण्यास येथें जागा नाहीं असें दिसून आल्यावरून ते ही इमारत बांधण्याच्या नादास लागले. पहिल्यानें एक वर्गणीची यादी करून त्यांत त्यांनी स्वतः २०००हजार रुपयांचा आंकडा घातला, आणि नंतर पुष्कळ श्रीमान् पारशी लोक, माथ्युसाहेब, श्रीमंत फलटणकर साहेब, आणि दुसरे बडे हिंदु लोक यांनीही त्या फंडास उदार आश्रय दिला. पुढे काम सुरूं झाले. परंतु पैशाची तूट पडल्यामुळे वर्षानें येथील सुपरींटेंडंट साहेबांनीं वर्गणीने पैसे काढण्याची खटपट केली तेिचा कांहीं उपयोग झाला नाहीं. तेव्हां त्यानीं सरकाराचे कानावरही ती गोष्ट घातली. आणि मग सरकारानें हें काम पुरें करण्याचें यश घेतलं.

 या इमारतींत मोठमोठीं तीन दालनें आहेत. पश्चिम बाजूस दालन आहे, त्यांत निवडक निवडक वाचनीय इंग्रजी पुस्तकें कपाटांतून भरून ठेविलीं आहेत. याच भागाला लागून साहेब व मडम लो कांची दरेस साफ करण्याची खोली वगैरे आहे. मध्य भागाच्या दालनांत इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य वर्तमानपत्र, मासिक पुस्तकें, त्रैमासिकें व सचित्र वर्तमानपत्रे ठेवलेली असतात. तीं वांचीत बसण्याकरितां उत्तम रेशमी गादीच्या खुर्च्या व मेजें मांडलेली आहेत. या दालनाच्या मागील अंगास व्हरांडयांत पुष्कळ आरामखुर्च्या मांडल्या आहेत. त्यांवर बसून पुष्कळ लोक कोणी हवा घेत, कोणी गप्पा मारीत, कोणी उजव्या बाजूचा झाडी व धुके यांचा देखावा पहात व कोणी वर्तमानपत्रं वांचीत पडलेले असतात. याच दालनाला फ्रिअर हाल अशी संज्ञा आहे. कधीं कधीं रात्रीचे वेळीं यांत नाच, नाटके, वगैरेही होतात.

 या फ्रिअर हालमध्यें सात साडेसात वाजेपर्यंत येण्यास सर्व वर्गणीदारांस मुभा आहे. आणि पुढे मात्र फक्त क्लबाची मेंबर मंडळी बसतात. सरकारच्या हुकुमानें फ्रिअर हाल कमीटीच्या तांब्यांत दिला आहे. परंतु या कमीटीस सरकारचा असा हुकूम आहे कीं, दरमहा अगाऊ वर्गणी ५ रुपये किंवा १५ दिवसापेक्षां कमी  दिवसाचे महिन्यास अगाऊ वर्गणी ३ रुपये देणारास कुटुंबसह लायब्ररीचा उपयोग करण्याची हरकत करूं नये. कुटुंबाची मंडळी तिहींहून जास्त असल्यास प्रत्येक जास्त मनुष्यास दरमहा १ रुपया जास्त दिला पाहिजे. महाबळेश्वर क्लबच्या वर्गणीदारांना लायब्ररीची वर्गणी निराळी द्यावी लागत नाहीं.

 फ्रिअर हालला लागूनच १८८२ सालीं महाबळेश्वर क्लबाची इमारत बांधण्यांत आली. या इमारतींत आराम घेण्याचा हाल, जेवणाचा हाल आणि बिलियर्ड खेळ याचा हाल इतकीं निरनिराळीं दालनें आहेत. क्लबाचे मेंबर निवडतांना गुप्त रीतीनें किंवा उघडपणें मतें घेऊन ज्यास बहुमत पडेल त्यास मेंबर निवडतात. कायमचा मेंबर होण्यास प्रवेश फी ७५ रु; सीजन पुरता मेंबर होण्यास प्रवेश फी २५ रू० आणि १० दिवस मेंबर होण्यास प्रवेश फी १० रुपये द्यावी लागते. शिवाय दरमहा वर्गणी रीतीप्रमाणें १० रुपये ही दिलीच पाहिजे. जवळ सानिटेरियमची जुनी सरकारी इमारत आहे तीही क्लबाला उपयोग करण्यास मिळाली आहे. या इमारतीत दुजोडी आठ खोल्या आहेत, त्यांत मेंबर लोक  रहात असतात. याही पुरत नसल्यामुळे फ्रिअरहाल आणि पोष्ट आफेिस यांच्या दरम्यानच्या उच्चस्थानीं आणखी सहा खोल्या बांधिल्या आहेत.

 ह्या सहा खोल्यांचे मागील बाजूस चार लॉन््टेनिस कोर्टेंं व बुडहौस नजिक बॅॅडमिंटनकोर्ट अशींं केलेलीं आहेत, तीं क्लबच्याच मंडळींकरितां आहेत. फ्रिअर हालच्या मागील दरवाज्यापासून जी उतरण आहे तिचे तळांतील सपाटीच्या ठिकाणीं जिमखान्याचे मैदान आहे. यांत बायकांचा गोळीबार, गोल्फ, पोलो, शर्यती, घोडयाची दौड व इतर खेळ चालतात.

 महाबळेश्वरास एक दोन मोठीं हाटेलें आहेत; मोठे पुस्तकालय व पत्रकालय आहे; उघडया हवेंत खेळण्याचीं कोर्टेंं आहेत. टांग्यांत बसून हिंडण्यासारखे, घोडयावर स्वार होऊन दौड करण्यासारखे, किंवा सकाळ संध्याकाळ हवा तितका व्यायाम करण्यासारखे लहान मोठे, निर्भय, व एकांत असे रस्ते आहेत; प्रार्थना करावयाची झाल्यास ख्रिस्ती देऊळ आहे; एक कबरस्तान आहे; जिमखाना आहे; नाटकगृह आहे; शर्यतीचे राउंड आहे; होडया फिरविण्यासारखे तळे  आहे; गव्हर्मेंट हौस ह्मणजे सरकारी बंगला आहे. लॉंनटेनिसकरितां कांहीं जागा कमी पडत होती ती लार्ड हारिस यांनीं सरकारी बंगल्याच्या हद्दींतील कांहीं झाडी तोडवून लागलींच तयार करून दिली. तसेंच बंगल्याच्या जवळ पोलोची जागा पाहिजे असें वाटल्या बरोबर झाडी तोडवून जागा तयार करून दिली गेली.

 येथें येणारे आमचे जहागिरदार, राजेरजवाडे व बडे लोक यांनाही चैन करण्यास कांहीं कमी साधने आहेत असें नाहीं. हे ज्या बंगल्यांतून राहिलेले असतात ते बहुतेक त्यांच्या मालकीचेच असल्यामुळे त्यांचे कंपौन्डांत सर्व सोयी करून घेऊन ते आपल्या इष्ट मित्रांबरोबर वाटेल तशी मौज करीत असतात; यामुळे यांचाही वेळ निष्काळजीपणांत व आनंदांत गेल्यानें यांच्या प्रकृतीसही फायदा होतो. परंतु साहेब लोकांप्रमाणें समाज करून खेळण्याच्या यांच्या येथे कोठेही जागा नाहीत; तथापि एकमेकांच्या बंगल्यावर जाऊन मेजवान्या घेणें, मनोल्हादक गाणे ऐकणें वगैरे मजा मारण्यानें येथें जमलेल्या मंडळीचे प्रेम जास्त वाढून चांगले स्नेह जमत असतात.