महाबळेश्वर/लोकसंख्या.

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
लोकसंख्या.

 सन १९०१ सालाचे खानेसुमारीप्रमाणें खुद्द मालकमपेठेत कायमचे राहणाऱ्या लोकांची संख्या ५३४७ आहे. याशिवाय जंगलांत चार ठिकाणी धावड लोकांची वस्ती आहे, ती मालकमपेठ गांवांतच मोडली जाते. येथील मूळ रहिवाशी लोकांच्या चार जाती आहेत. त्या कोळी, कुळवाडी, धनगर आणि धावड ह्या होत. परंतु ह्या ठिकाणाची रानटीपणाची स्थिति जाऊन त्यास मैदानांतील शहराप्रमाणें व्यवस्थितपणाचें स्वरूप आल्याबरोबर व्यापारी वर्गाला लोभ उत्पन्न होऊन ते येथें येऊन दुकानें थाटून राहिले. यामुळे आतां सर्व जातीचे व सर्व धंद्याचे लोक निरंतरचे येयें राहणारे बनून गेले आहेत. जेथें जीवितास व वित्तास धक्का पोचण्याचें भय नाहीं त्या ठिकाणों हवापाणी वगैरेविषयीं कोणत्याही प्रतिकूळ व अनुकूल गोष्टी मनांत न आणतां पोटाकरितां मनुष्य गेल्यावांचून राहत नाहीं. याच तत्वावर हल्ली येथें ब्राह्मण, गुजर, मारवाडी, मुसलमान वगरे जाती बरकतीचे धंदे करीत आहेत. सर्वांत खरे व्यापारी वाणी, गुजर आणि मारवाडी लोक आहेत; आणि त्यांचें साधारण वस्ती असेल तेथें दुकान नाहीं असें कालत्रयींसुद्धां होणार नाहीं. त्याप्रमाणें त्यांची या जंगली मुलखांतही बरींच दुकानें आहेत.

 सर्वांत जास्त भरणा धावड जातीचा आहे. त्याचे खालोखाल कुळवाडी लोकांची वस्ती येथें व डोंगराखाली आहे. धनगर व कोळी लोकांची वस्ती ह्मणण्यासारखी येथें नाहीं, डोंगराखालीं आहे. ह्या चार जातींच्या चर्येत व बोलण्यांत पुष्कळ तफावत आहे. कोळीलोक सर्वांत हुशार आहेत. ते लोक बांधेसूद असून त्यांची छाती रुंद व शरीर गोलदार असतें. त्यांची ठेवण रांठ असून दिसण्यांत ते आडमुठे दिसतात. मध काढणे, शेतकी, मजूरी व पारध करणें हे त्यांचे नेहमीचे धंदे आहेत. कुळवाडी लोकही शरीरप्रकृतीनें सदृढ आहेत व कोळी लोकांपेक्षा त्यांची सुरतही बरी दिसते. हे लोक सदांसर्वदां शेतांत खपत असतात. धनगर लोक पूर्वी फार भोळसर होते. त्यांचा त्यावेळीं दूध, व लोणी विकण्याचा धंदा होता. त्यांस वजन मापाची कांहींच माहिती नसे, त्यामुळे लोक त्यांस फार नाडीत असत. कोणी आपला पाय तागडींत ठेऊन माझा पाय दोन शेराचा आहे असें सांगून त्याच्या दडपण्यानें वाटेल तितका माल लाटित असत. कोणी तागडीला बोट लावून त्यानें पारडें दाबून धरून माझे बोट पावशेराचे आहे असें सांगून त्यांस अशा रीतीनें सपशेल फसवीत असत, असें सांगतात. परंतु अलीकडे ते फार हुषार झाले आहेत, तथापि त्यांचा स्वभाव तामसी नाहीं. हे लोक शरीरानें कृश असून कामाला कणखर नाहींत. हे लोक गुरें राखून आपल्या कुंटुंबाचें पोषण करितात. देशावरील धनगर लोकांप्रमाणे यांच्या जवळ बकरी किंवा मेंढरें नसतात. परंतु गुरें कांहीं तरी जवळ पाहिजेत, तीं नसल्यास त्यांचें लग्न व्हावयाचें नाहीं. या जातीची अशी समजूत आहे कीं ह्मशींना जेव्हां वाघ किंवा चित्ते यांचा वास येतो तेव्हां त्या आपल्या पालकाच्या सभोंंवार फेर धरून उभ्या राहतात आणि ज्या बाजूनें वास येत असेल त्या बाजूला शिंगेंं रोंंखून शत्रूचा चुराडा करण्याकरितां पवित्र्यांत उभ्या रहातात.

 धावड किंवा लोखंडओतारी लोक हे मूळ कऱ्हाड गांवाकडून पाऊणशें वर्षांपूर्वी येथें आले. यांची जात मोठी कष्टाळू आहे. इतर जातींतील लोकांपेक्षां यांचीं गालाचीं हाडे उंच, डोळे बारीक, ओठ जाड व वर्ण काळा असतो. यांचा लोखंड काढण्याचा धंदा बुडाल्यामुळे जमिनी घेऊन शेतकी करण्याची यांना गोडी लागली आहे. परंतु मजूरीच्या दांडगट कामांत यांच्या बायकांचा किंवा पुरुषांचा कोणीही हात धरूं शकणार नाहीं. यांची वस्ती येथें फार आहे, तरी सर्व लोक मजूरीच्या धंद्यावर कमाई चांगली करून आनंदांत असतात.

चरितार्थ.

 मांस, दूध, आणि धान्य ही मनुष्याच्या उपजीविकेचीं मुख्य साधनें होत. यांपैकीं कोणत्याही एकावर, दोहींवर किंवा साऱ्या तिहींंवर मनुष्यास आपला चरितार्थ करतां येतो. शिकार करणें; मेंढरें, गाई, म्हशी, वगैरे जनावरें पाळून दूधदुभतें करणें; आणि जमीन तयार करून तींत धान्य भाजीपाला, फळफळावळ उत्पन्न करणें - या तीन गोष्टीपैकीं पहिलीपेक्षां दुसरीस, व दुसरीपेक्षां तिसरीस अधिक श्रम, अधिक आत्मसंयमन व अधिक दूरदृष्टी लागते, हें सहज समजण्यासारखे आहे. तेव्हां ज्या लोकांत उपजीविकेचीं हीं तिन्हीं साधनें अस्तित्वांत आलीं असून त्यांची अवश्यकता पडू लागली असेल, ते लोक पहिल्या किंवा दुसऱ्या साधनांनीं उपजीविका करणारे लोकांपेक्षां अधिक उद्योगी असले पाहिजेत हें उघड आहे!

 फक्त मनुष्यमात्र या तीन प्रकारच्या आहारांपैकीं पाहिजे तों आहार करून राहूं शकतो. पण जसजशी त्याला उन्नतावस्था येत जाते, तसतसा त्याचा मांसाहार कमी होत जाऊन उद्भिज्जाहार वाढूं लागतो, असें कित्येकांचें मत आहे. पण येथें विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं, मनुष्याशिवाय इतर प्राण्यांचे जे तीन वर्ग ( १) केवळ मांसाहारी (२) केवळ धान्याहारी व (३) मांसधान्याहारी त्यांच्या निरनिराळ्या आहारांवरून केले आहेत,त्यांपैकीं कोणत्याही वर्गातील प्राण्यांस आपलें भक्ष्य “गोपाल" वृत्तीचें, किंवा कृषीवलवृत्तीचें अवलंबन करून संपादितां येत नाहीं. अशा रीतीनें आपला चरितार्थ करण्याची बुद्धि व सामर्थ्य फक्त मनुष्यांतच आहे. मनुष्याशिवाय इतर प्राणिसंख्येची बुद्धि नैसर्गिक प्राण्युत्पत्तीवर व भूमिगत उद्धिज्जोत्पत्तीवर अवलंबून असते. ती कमी झाली कीं, त्यांची संख्या कमी होते, व अधिक झाली कीं, अधिक होते. मनुष्याची तशी गोष्ट नाहीं. त्याच्या शरीराच्या व मनाच्या विशिष्ट रचनेमुळे त्याला उपजीविकेस लागणा-या पाहिजे त्या वस्तु हव्या तितक्या उत्पन्न करतां येतात. यामुळे मनुष्यांची संख्या आणि त्यांस लागणारें अन्न हीं एकसारखीं वाढत आहेत.

 हल्लींं या ठिकाणच्या लोकांच्या स्थितीला हें वरील तत्व सर्वथैव लागू पडतें. अशा येथील भयंकर जंगलांत महाबळेश्वर क्षेत्रानजिक नहर म्हणून गांव होतें, तें हल्लींं मालकमपेठच्या गांवांत सामील झालें आहे. त्या गावांत शुद्ध धनगर लोकांची वस्ती असे. ते नेहमीं पुष्कळ गुरें बाळगून दुधदुभत्यावर आपल्या निर्वाहाची तरतूद करीत. सदरहूप्रमाणेंच जवळच्या खेड्यांतील स्थिति होती. कारण, मुलूख डोंगराळ असल्यामुळे शेतकीस जमीन फार बेताचीच. या डोंगरांत झाडी फारच गर्द असल्यामुळे मांसाहारी व उद्भिज्जाहारी जनावरांना मग काय तोटा ! हीं मांसाहारीं जनावरें कोठे कांहीं भक्ष्य मिळेनासें झालें ह्यणजे मनुष्यवस्तीजवळ येऊन गुरांढोरांना फार त्रास देत. परंतु पुढें सुधारणा होऊन १८५३ सालीं येथील सरकारी जंगलाची हद्द ०५ मैल ठरून मर्यादित झाल्यामुळे येथील लोकांच्या सवयींत पुष्कळ फरक पडला, जंगलांतील गवत मोफत मिळेनासें झाल्यावर धनगर लोकांच्या " गोपालवृत्ती " चा पसारा त्यांना गुंडाळून ठेवावा लागला. त्यावेळीं पुष्कळ व्यापारी येथून व्यापाराकरितां लोणी घेऊन जात, ते अगदीं बंद पडले. तेव्हां उद्धिज्जाहारी जनावरें नैसर्गिक भूमिगत उद्धिज्जोत्पत्तीची मनाई झाल्याबरोबर कमी झालीं त्यामुळे मांसाहारी जनावरांनाही नैसर्गिक प्राण्युत्पत्तीची वाण पडली. ह्या धनगरी जनावरांचीं अर्भकें केव्हां तरी मांसाहारींच्या भक्ष्यस्थानीं पडत, ती पडेनाशीं झाल्यामुळे त्यांनाही उतरती कळा लागली. याच पुरातन प्रचारांवरून धनगर लोकांत अशी चाल पडली आहे कीं, ज्या जवळ निदान दोनसुद्धां गुरें नाहींत त्यांचें लग्न होण्याची मुष्कील असते.

 नंतर त्यांनीं कृषीवलवृत्तीचा स्वकिार केला. ते कुणबी लोकांप्रमाणें पांच मैलांतील खोऱ्याच्या तळभागांत शेतकी करूं लागले. डोंगराळ प्रदेशांत सर्व जंगल राखून ठेविलें, या व्यवस्थेंत शेतकऱ्यांंचीच नुकसान झाली, आणि शेतकीला एकंदर जमिनींतून एक तृतीयांश जमीन मिळून तीही अगदीं संपुष्टांत आली. म्हणजे माणशी सरासरी अडीच एकर जमीन राहिली. पैकीं सातवा हिस्सा जमीन मात्र पाण्या खालचा ऊस, भात, खपली वगैरे पिके होण्यास लायख अशी राहिली. इतक्या जमिनीवरच्या शेतकीवरच जर बहुतेक लोकांनीं निर्वाह करण्याचें पूर्वींंप्रमाणें अवसान घातलें असतें, तर त्यांना नुसती जगण्याचीसुध्दांं पंचाईत पडली असती. आणखी या शेतकीची-शेतकीच्या उत्पन्नाची अगदीं अनास्था झाली आहे, त्यामुळे कृषीवलांतही कांहीं त्राण नाहींसा झाला आहे.

 तथापि वर सांगितल्याप्रमाणें मनुष्यांची वाढ कमी झाली नाहीं. शेतकीची अशी आबाळ झाल्यामुळे महाबळेश्वरच्या भोंवतालच्या खेडयांतील लोकांची स्थिति घांटावरील खेडगळ लोकांपेक्षां निकृष्ठतेस आली आहे, या कारणास्तव सडकेच्या कामावर किंवा मालकमपेठ येथें मोलमजूरी करून त्यास गुजारा करावा लागत आहे. मालकमपेठेस बाहेरून हवा खाण्यास पुष्कळ चैनी लोक येतात; त्यांच्याकडून यांना बरेंच काम मिळतें. तसेच जंगलांत होणाऱ्या फुकटच्या व उपयुक्त जिनसांचा बराच खप असल्यामुळे त्यांत तर यांस याहून जास्त फायदा होतो. गुरांस खाण्यास व घराचीं छपरें करण्यास गवताची पुष्कळ चणचण असल्यामुळे, तें आणून विकण्यांतही त्यांना किफायत होते. त्याचप्रमाणें सर्पण, काठया, फणस, आंबे, करवंदे, मधाचीं पोळीं, नेचे, आर्चिड, शेवाळ वगैरे किरकोळ जिनसाही ते लोक आणून विकतात. ह्या जिनसा काढून आणण्यास जितके श्रम होतात व दिवस मोडतात त्या मानानें पाहिलें असतां घेणारांस जरी त्या जिनसास पुष्कळ पैसे दिलेसें वाटतें, तरी ते त्यांच्या मोडलेल्या दिवसाच्या मजूरीइतकेच पडतात. बांबूशिवाय बाकीचे जिन्नस फुकट आणतां येतात. आणि बांबूबद्दलसुद्धां ह्मणण्यासारखी फी द्यावी लागत नाहीं. एकंदरींत लागवडीची तूट जंगलांतील जिनसांनीं भरून काढावी लागत आहे.

 सन १८५३ सालच्या फेरफारामुळे त्यावेळच्या कृषीवलवृत्तीच्या वर्गास जें नष्टचर्य प्राप्त झालें होतें ते हें मालकमपेठ गांव अशा रेघारूपाला येईपर्यत पुरलेंं. अंगमेहनत करून पैसा मिळण्याचा क्रम १२ महिने चालत नसल्यामुळे शेतकीसारखे यांत सतत राबावें लागत नसे. असो. असा कामाठीपणाचा धंदा करणारे लोकांस त्यांचे जातभाई प्रथम हलके मानूं लागले व ते कमजातीचे लोक बनून गेले. पुढ़ें सर्वांनांच दिवस वाईट आल्यामुळे कालगतीनें त्यांच्या वरचा कलंक नाहींसा झाला आहे. मुक्रार जंगलाच्या हद्दीचें क्षेत्र ४,३३९ चौरस फूट ठरविलें आहे आणि त्यांत लोकांचे पूर्वीचे हक्कांत फेरफार केला नाहीं.

 मनुष्याच्या आहारवस्तु कष्टसाध्य आहेत, व त्यांची उपभोगेच्छा अमर्याद आहे, येवढ्या दोन गोष्टी स्पष्टपणें ध्यानांत घेतल्या ह्मणजे, त्यास इतर प्राण्यापेक्षां शेंकडोंपट अधिक उद्योग कां केला पाहिजे, हे सहज समजणार आहे. हें ज्यांस पक्केंं समजेल तो सहसा निरुद्योगी होणार नाहीं. याशिवाय निरुद्योगी लोकांस उद्योगी लोकांच्या वश होऊन किती त्रास सोसावा लागतो, हें ज्यांस कळले असेल तों तर स्वतः उद्योगी होईल इतकेच नाहीं तर इतरांसही उद्योग करण्यास प्रवृत्त करील. विशेष उद्योगी मनुष्याचें सान्निध्य नसल्यास सामान्य उद्योग करून आयुष्य घालविणें शक्य आहे. पण कोणत्याही कारणानें उद्योगी मनुष्याशीं गांठ पडल्यास, एक तर त्यांच्या प्रमाणें उद्योग करण्यास, किंवा त्यांच्या आधीन होऊन ते ठेवील त्या स्थितींत राहण्यास तयार झालें पाहिजे. उद्योगाचे दोन भेद आहेत. एक नियामक व दुसरा उत्पादक. पहिल्या वर्गात, राजे, मंत्री, शिपाई पोलिस वगैरे फक्त समाजयंत्राचे चालक किंवा व्यवस्थापक येतात. दुसरे वर्गात शेतकरी, कोष्टी, सुतार वगैरे सर्व प्रकारचे धंदेवाले येतात. येथील बाजारांत व आजुबाजूला सर्व दुसरे वर्गात येणारे लोकांची गदीं आहे. त्यांचा उद्योगही दीर्घ आहे. घाण्याचे दुकानांत वाण जिन्नस असून आणखी भुसारमालही मिळतो; गंधी असून तो पटवेकऱ्याचेंही काम करितो; असा यांना उत्पादक उद्योगाचा कंटाळा नसल्यामुळे जंगलांत बसले तरी सर्व, व्यापारी लोक कसे टुमटुमीत आहेत.

धावड कोळी वगैरेंच्या चालीरीती.

 येथें सर्व लोकांना मराठी भाषा समजतें. फक्त धावड व मुसलमान लोक खेरीज करून सर्वांची घरांतील बोलीही मराठीच आहे. धावड लोकांची भाषा मराठीच आहे, परंतु त्यांत हिंदुस्थानी शब्दांची बरीच भेसळ आहे. मुसलमान लोकांची मुसलमानी भाषा आहे. येथील सर्व लोकांच्या घरां वर व बंगल्यांवर कारोगेटेड पत्रे असून भिंती व लांकूड काम चांगलें मजबूत केलेलें असतें. प्रत्येक घराला किंवा बंगल्याला पुढें किंवा मागें जी खुली जागा असते, तिचे सभोंवार तांबड़े लहान मोठे माणसाच्या डोक्यासारखे गुंडगुळे दगड गोळा करून आणून गडगडा घातलेला असतो. अशी दुसरीकडे कोठेही पद्धत नसल्यामुळे परकीय मनुष्यास याची मौज वाटते. पेठेत प्रत्येक घरामध्यें सुमारें तीन फुटाचा बोळ टाकून घरें बांधलेलीं आहेत; व घरांपुढें रस्त्यानजिक दाट छायेचा एकेक वृक्ष राखिला आहे; त्या झाडापासून उपद्रव झाला तरी म्युनिसिपालिटीच्या हुकुमावांचून त्याला धक्का लावण्याची मनाई आहे.

 पेठेशिवाय आजुबाजूला झोंपडीवजा जंगलभर बंगले पसरलेले दिसतात. त्यांजबद्दलचे पद्धतशीर कांहीं नियम नसावे असें वाटतें. सर्व बंगल्यांना कपौंंड असून त्यांत सर्वत्र जंगली झाडांची छाया होऊन गेलेली असते. यामुळे बंगल्यांत बसलें ह्मणजे नेहमीं गार वारा येत असतो. बंगल्याच्या कंपौडांत नवीन इमारत करणे करितां झाडेंं तोडण्याची आवश्यकता पडल्यास त्याजबद्दल सुपरिटेंडेंट साहेबांची परवानगी घ्यावी लागते. कोळी व कुणबी नेहमी पाणी नजिक असेल तेथें झोंपडे बांधून राहतात.

 धावड व धनगर लोक येथील कायमचे रहिवासी झाले आहेत. धनगरलोक नेहमी गाई, ह्मशी बाळगून, दिवसभर त्यांस चरणाला नेऊन त्यांचे मागेंं फिरत असतात. त्यांना शेतवाडी क्वचित् असते. यांजवळ देशाप्रमाणे, मेंढया, बकरींं वगैरे नसतात धावड लोकांना दाढी असते, व त्यांचा पेहेराव मुसलमानी धरतीचा असतो. बाकीच्या सर्व जातींचा पोषाख पुष्कळ अंशी सारखाच असतो. कोळी लोकांचा धर्म हिंदु आहे. धनगर, कोळी व कुणबी यांची एक ग्रामदेवता व दुसरी पालण करणारी देवता असते, त्याप्रमाणे येथील ग्रामदेव अनेक असून जन्नी ह्मणून एक रक्षक देवता आहे. तिला काही सार्वजनिक संकटनिवारणार्थ देणे घेऊन जाण्याची येथेंं पूर्वापार चाल आहे, त्याप्रमाणे हल्लींं ब्राह्मण, वाणी उदमीसुद्धां वागू लागले आहेत. येथें वनदेवता, चेडे व भिंतर यांची आराधना करून आपल्या कार्याला त्यांची अनुकूलता संपादण्याची फार चाल आहे. या देवतांची पूजा वगैरे करणारे गुरव देवळांतच असतात. त्यांना देवापुढे येईल तें घेऊन राहण्यानें चांगलीच प्राप्ति होते. याशिवाय देवळांत आणखी दोन मनुष्येंं असतात त्यांस देवर्षी किंवा देवाचे भक्त म्हणतात. त्यांच्या भाकणीला देव भाक देतो अशी येथील मराठे, कोळी वगैरे लोकांची समजूत असल्यामुळे त्यांजकडून हे गांवढळ लोक कौल लावितात, आणि कौलांचा जबाब मागवितात. ह्यावर येथील बहुतेक लोकांची फार श्रद्धा असते. इकडील लोकांचा पिशाच्चयोनीवर फार भरंसा आहे. आणि त्या येानीपैकीं चेडे, पितर, मनुष्याचें बरें वाईट करणारी दैवतें आहेत असें मानून हे लोक त्यांस फार भजत असतात. यामुळे त्यांच्या भगत लोकांची चलती चांगली चालते. हे लोक आपल्यापैकीं ज्यानें कोणी आपलें नुकसान, घातपात, चोरी वगैरे करून उपद्रव दिला असेल त्या इसमाचें कांही अनिष्ट करण्या बद्दल त्या भक्तांकडून देवाला गाऱ्हाणें घालितात व त्याचा सूड घेण्याचा यत्न करितात. यामुळे सर्व लोक एकमेकाला वचकून असतात. या निरनिराळ्या जातीचा सोयरसंबंध होत नाहीं. हा फक्त जातींतल्या जातींतच होतो. तथापि या सर्व जातींपैकीं उंच जातीच्या मनुष्यानें स्वयंपाक केला असला तर त्यापेक्षां कमी व त्याच्या जातीचे सर्व लोक तों घेऊन जेवण करितात. कोळी, कुणबी, धनगर या सर्व जातींचे लोक चांगले धट्टेकट्टे असतात. त्यांची कुटुंबेही फार वाढतात. ह्या जातींचीं माणसें लौकर थकून मरत नाहींत.

 हिंदु धर्म व मुसलमानी धर्म यांचें मिश्रण होऊन धावड लोकांचा धर्म बनला आहे. हे सर्व मांसाहारी असून सांपडेल तेव्हां पारध करितात. यांचें नेहमींचें खाणें धान्याचें आहे. तें ते अस्सल प्रतीचें आणून चैनीनें खातात. ही जात फार कष्टाळु आहे, आणि नेहमीं मोलमजूरी करून उपजीविका चालविते. या लोकांचे घरीं हिंदूचे देवही असतात. व त्या देवांचे ते हिंदू धर्माप्रमाणें पूजन करितात. हिंदूंचे सर्व सणाला हिंदूंप्रमाणें खाणें ठेऊन पोशाख नेहमींपेक्षां ते चांगला करितात. ही जात फार दारुबाज आहे.

------------