महाबळेश्वर/नेटिव जनरल लायब्ररी.
हल्लींची लायब्ररीची नवीन इमारत ज्या जागीं बांधण्यांत आलेली दिसते, त्याच ठिकाणीं मालकमपेठ नेटिव लायब्ररी नांवाची अगदीं नादुरस्त झालेली एक जुनी इमारत होती. सन १८७२ सालीं सरकाराकडून वर्षाचे ७१२ रुपये प्रमाणें जुजबी भुईभाडे कायमचें देऊन ही जुनी इमारत लायब्ररीच्या त्या वेळच्या म्यानेजिंग कमिटीनें बांधली होती. ती इमारत साधारण रीतीची असून पुष्कळ दिवसांची जीर्ण असल्यामुळे अगदी निरूपयेागी झाली होती. यामुळे येथें वर्तमानपत्रे वाचीत बसणाऱ्या पुष्कळ एतद्देशीय थोर गृहस्थांच्या मनांची सुप्रसन्नता नसे. म्हणून ही नवी करण्यासाठीं दानशूर शेट बोमनजी दिनशा पेटिट यांजकडे या सार्वजनिक कामास मदत मागितली. तेव्हां त्यांनीं इमारत नवीन बांधण्याचा सर्व खर्च आपण देतों असें मनापासून कबूल केलें, आणि आपलें नांव इमारतीस द्यावें अशी अट घातली. तेव्हां पुढारी मंडळींनीं असें करण्याबद्दल सरकारची मंजुरी आणवून त्यांचे ह्मणण्याप्रमाणें व्यवस्था केली, आणि त्यांजकडून ही इमारत तयार करून घेतली. यास नुसत्या इमारतीच्या कामास सुमारें १५,००० रुपये लागून कपौंडचें लोखंडी रेलिंग व गेटच्या सुशोभित झडपा यांस आणखी २००० रुपये लागले. याप्रमाणें सर्वांत मोठी मदत यांजकडून झाल्यामुळे प्रवेशविधीच्या वेळीं नाम० गव्हरनर साहेबांनीं सुद्धां यांच्या दातृत्वाची फारच प्रशंसा केली. असा आमच्या लोकांवर त्यांनीं चिरकाळचा उपकार करून ठेविला. पुढेंहीं संस्था चालविण्यासंबंधानें लागणाऱ्या खर्चाची तरतूद ज्या रकमेच्या व्याजांतून व्हावयाची असे ठराविलें आहे, त्या रकमेच्या भरतीसही या उदार पेटिट घराण्यांतून १००० रुपयांची रकम कबूल करण्यांत आली आहे, बाकी कायम देणग्या व वर्गणी मिळून सुमारें ९५०० रुपयांच्या व्याजाचें उत्पन्न लायब्ररीचे खर्चाकरितां केलें आहे. या इमारतीचें काम महाबळेश्वरच्या इतर प्रेक्षणीय इमारतीच्या तोडीचें झाल्यामुळे, हिनें या स्थलास जास्त शोभा येऊन ही फार लोकोपयोगी झाली आहे. हिची रचना ( design) अलीकडच्या पद्धतीची असून चांगली साधली आहे. हिचे बांधकाम मजबूत, टुमदार व शोभिवंत झालें आहे. ही इमारत सखल जागेमध्यें असल्यामुळे कंबरे इतकें उंच जोतें बांधून वर इमारत केली आहे. इमारतींत दोन अंगास दोन लहान दालने करून दरम्यान एक मोठा लांबलचक हाल केला आहे. यामुळे वर्गणीदारांस स्वस्थ बसून वाचण्यास फार पैस जागा झाली आहे. शिवाय कांहीं सार्वजनिक कारणानें सभा करणें इष्ट असल्यासही यानें मोठीं सोय झाली आहे. इमारतीच्या रूफास आंतून छताप्रमाणें जस्ती पत्रा मारलेला फार मजेदार दिसतो खरा परंतु आवाज झाले बरोबर लागलींच प्रतिध्वनी होऊन थोडा गोंगाट होतो. या इमारतीच्या आंतील व्हरांड्याच्या जमिनी मिंटन टाइलसच्या रंगीबेरंगी केलेल्या फार छान दिसून वरून चालणारास आनं दित करितात. त्यावर उत्तम प्रकारचें मुंबईहन आणलेलें लांकडी फरनिचर मांडलें आहे.
या इमारतीचे पुढील अंगास टेनिस खेळण्याचे एक मोठे पटांगण ठेविलें आहे. या पटांगणांचे व मुख्य इमारतीचे सभोंवार लाल दगडाची पारापेट भित घालून त्यावर नकशीदार ओतीव लोखंडी रेलिंग बसविलें आहे. त्यांचें ओतकाम करितांना त्याच्या प्रत्येक तुकडयांत बोमनजी दिनशा पेटिट नांवाचीं आद्य अक्षरें (मोनोग्राम ) इंग्रजीत ओतवून घेतलेलीं आहेत. त्यांनीं करून ठेविलेलें हें रेलिंग ह्मणजे येथील आबालवृद्धांच्या मनांत बोमनजींच्या उपकाराबद्दलच्या कृतज्ञपणाची सतत जागति राहण्यासारखे रोज डोळ्यापुढें दिसण्याजोगें स्मारकच झालें आहे, असें ह्मटलें तरी चालेल, सभोंवार कुंडया वगैरे मांडून व फुलझाडें लावून बगीच्या बनविला आहे तोही फार शोभादायक झाला आहे.
ही नवी लायब्ररी सुरू करण्याचा प्रवेशाविधी नामदार गव्हरनर लार्ड नार्थकोटसाहेब यांचेकडून तारीख : २२ मे १९०२ इ. रोजीं मोठया समारंभानें झाला. त्यावेळीं गव्हर्नरसाहेबांचें नांव घालून हुद्द्याचे मोर्तब (Coat of arms ) कोरेलेली अशी एक मोठी रुपेरी चावी त्यांच्या स्वाधीन करून त्यांजकडून इमारत उघडविली. या समारंभाचे वेळीं परम उदार शेट बोमनजी पेटिट एकाएकीं आजारी पडल्यामुळे त्यांचे चिरंजीव सर जहानगीरजी पेटिट यांनीं आपल्या वडिलांचे आकस्मिक अस्वास्थ्यामुळे येणें अशक्य असल्याचें सांगून दुःख प्रदर्शित केलें आणि त्यांनीं नामदारसाहेबांस निमंत्रण करण्याचें काम आपल्यावर सोंपविलें आहे असा प्रस्ताव करून, गव्हरनरसाहेब आले त्याबद्दल आनंदाचे उद्रार काढले. शिवाय आणखी आभारदर्शक बरीच भाषणे झालीं.
या संस्थेच्या उत्पादक कमिटीचे पुढारी सालिसिटर भाईशंकर नानाभाई, व श्रीयुत नारायण विश्वनाथ मंडलिक, बी. ए. वैगैरे मंडळींनीं फार खटपट करून ही लायब्ररी स्थापन करण्यांत यश संपादन करून महाब ळेश्वर येथें आरामासाठीं येणाऱ्या एतद्देशीय लोकांवर उपकार करून ठेविला आहे.
या शिवाय येथे फ्रियरहालची लायब्ररी आहे तींत सभ्य नेटिव लोकांससुद्धां जाण्यास हरकत नसते. पूर्वी आनरेबल विश्वनाथ नारायण मंडलिक हायकोर्ट वकील यांनीं सार्वजनिक कामास मदत करण्याच्या आपल्या नैसर्गिक स्वभावाला अनुसरूनच या दोन्ही लायब्रऱ्यांचे उत्पादकपणाचें यश मिळविलें आहे. याप्रमाणें सार्वजनिक कामास यांनीं मुंबई इलाख्यांत फार मदत केली आहे.
नवीन बांधलेल्या बोमनजी पेटिट लायब्ररीच्या इमारतीला लागूनच निरनिराळ्या प्रकारच्या फुलझाडांनीं सुशोभित केलेला एक बगीच्या आहे त्यास “ रे गार्डन " असें ह्यणतात. यांत कुंड्यांतून, जमिनीवरील विलक्षण प्रकारच्या रेखून काढलेल्या आकृत्यांतून, व भोंवतालच्या किनाऱ्यावरून असलेल्या विलायती व एतद्देशीय अनेक रंगांच्या फुलापानांचा समूह पाहून चित्तास आनंद देणारें हें स्थळ आहे. यामुळे येथें येऊन केव्हां तरी बसावें असें पुष्कळ लोकांस वाटतें व ते स्वस्थ बसलेलेही बरेच वेळां नजरेस येते. या उपवनांत ठिकठिकाणीं हौसी मंडळींना बसण्यास बाकेंही टाकिलेलीं आहेत. कुटुंबवत्सल मंडळींच्या मुलांचें येथें आल्यावर मनरंजन होण्याकरितां लोखंडी चार पाळणे व वर्तुळाकार फिरणारें घोडयाचें चक्र कायमचें ठेविलेले आहे. परंतु यांची मजा पाहण्याबद्दल दर एक कुटुंबवत्सल मनुष्यास म्युनिसिपाल कमिटींत थंड ऋतूबदल दीड रूपया व उष्ण ऋतू बद्दल दोन रुपये फी द्यावी लागते. ह्या बागेची व्यवस्था पाहण्याचें काम खुद्द सुपरिंटेंडंट साहेव व दुसरे कमिटीचे मेंबर लोक यांजकडे आहे. बागेची उत्तम प्रकारची स्थिति पाहून यांचें यावर चांगलें लक्ष्य आहे असें वाटते.