Jump to content

महाबळेश्वर/चावडी व फौजदारी कचेरी.

विकिस्रोत कडून
चावडी व फौजदार कचेरी.

 या हिल्लस्टेशनवर सर्व प्रकारची व्यवस्था पाहण्यास दर दोन वर्षांनीं एक गोरा मुख्य अमलदार सरकारांतून नेमण्यांत येतों, त्यास “ सुपरिंटेंडेंट " असा हुद्दा दिलेला असतो. हे येथें आक्टोबरच्या सुरवातीपासून तों जून १५ पावेतों राहून चोहींकडे देखरेख करीत असतात. हे नेहमीं सिव्हिल सर्जनच्या परीक्षेत पसार झालेले असले पाहिजेत असा नियम आहें. यांस येण्याबरोबर दुसरावर्ग माजिस्त्रेटचा अधिकार मिळतो; व पुढे यांस केव्हां केव्हां पहिला वर्ग माजिस्त्रेटचाही अधिकार देतात. या माजिस्त्रेटखेरीज येथें एक दुसरा अमलदार तिसरा वर्ग माजिस्त्रेटचा अधिकार असलेला बारा महिने राहतो त्यास " महालकरी " असा हुद्दा असतो. याजकडे मुलकी व माजिस्त्रेटी काम चालतें. हे मेढें तालुक्याचे मामलेदाराच्या हाताखालील ठाणेदार या नात्यानें  काम करीत असतात. याशिवाय यास सुपरिंटेंडंट साहेबांसही येथील व्यवस्थेसंबंधानें मदत करण्यास झटावें लागतें. जिल्ह्याचे मुख्य मालक कलेक्टर साहेब हे या सुपरिंटेंडंटचेही वरिष्ट आहेत. कोणी संस्थानिक येथे येणार असल्यास किति लोकानिशीं येणार हे त्यास आगाऊ सुपरिंटेंडंटसाहेब यास कळवावें लागते.

 या महालकऱ्याची कचेरी किंवा ज्यास चावडी असें ह्मणतात ती मालकमपेठेच्या ऐन मध्य वस्तींत बांधलेल्या एका सरकारी इमारतींत आहे. या इमारतींतच सरकारी तिजोरी असते. सीजनच्या दिवसांत येथें येणाऱ्या मोठमोठया अमलदारांच्या पगारवांटणीची खोटी होऊं नये म्हणून नेहमीं लाख रुपयेपर्यंत या तिजोरींत शिलकी राखावी लागते. त्यासंबंधी देवघेवीचे व्यवहार करण्याचें काम खुद्द सुपरिंटेंडंट साहेबांकडे आक्टोबर ते जूनपर्यंत असतें. पुढें पावसाळ्यापुरतें महालकऱ्याकडे येतें. हुजूर डे० कलेक्टर यांचेकडे या तिजोरीचे हिशोब तपासणी होऊन रकमेचा तोटा आल्यास जिल्ह्याचे खजिन्यांतून पैसा  येतो. या करितां हे साहेबबहादूर आपल्या हेडक्लार्काची योजना करून त्यास प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा, व पुढें प्रत्येक मंगळवार, गुरुवार, आणि शनिवार या दिवशीं दुपारीं १ पासून ४ वाजेपर्यंत हें काम करण्यास पाठवितात. मध्यंतरी स्टांप तिकिटें वगैरे घेण्याची किंवा नोटी मोडण्याची आवश्यकता पडल्यास सुपरिंटेंडंटसाहेब यांजकडे लेखी अर्ज केल्यावर ते त्याकरितां तिजोरी उघडतात. या अडचणीमुळे येथें बाजारांत सामान घेण्याकरिंता येणारे साहेबलोकांच्या बटलरांस वगैरे नोटी मोडण्यास सराफ लोकांकडे बटणावळ देण्याचा हमेषा प्रसंग येतो. मुंबईसरकारच्याच नोटा मात्र या खजिन्यांत घेतात, इतर ठिकाणच्या घेत नाहींत. तसेच या फार फाटक्या, चिताड किंवा दोन वेगळाले तुकडे जोडून केलेल्या नोटा केव्हांही तिजेारीत घेत नाहींत. १०० रु. रकमेवरील किंमतीच्या नोटा मोडण्याचें असेल तेव्हां त्याबरोबर नोटांचे नंबर व त्या आणणारा मालक हें एका कागदांत दाखल करून तो कागद त्या नोटांलगत पाठवावा  लागतो. या तिजोरींत बँकेचे चेकचा पैसा मिळत नाहीं. कारण येथे ही तिजोरी बँकेचें काम करीत नाहीं.

 या इमारतीत याशिवाय पोलीस कामगाराचीं कचेरी असते. त्याचा मुख्य कामगार फौजदार किंवा चीफ कान्स्टेबल नेमलेला असतो. त्याचे हाताखालीं फार तर पोलीसशिपाई व नाईक मिळून २५|३० पर्यंत लोक असतात. त्यांवर जमादार वगैरे वरिष्ट लोक सीजनच्या वेळीं जास्त नेमितात. अलीकडे हिंदुस्थानांत प्लेगचा प्रादुर्भाव झाल्यापासून या महाबळेश्वर सानिटेरियमवर दूषित भागाकडून येणारे कमी दर्जाचे लोकांस आबझरव्हेशन कॅम्पमध्यें ठेविण्याची फार कडक व्यवस्था आहे. त्याकरितां प्लेग फौजदार व त्याचे सोईसाठीं लागणारे पोलीस कामगारही येथें सीजनभर ठेविलेले असतात. येथील पोलीस कान्स्टेबल दिवसा पेठेतील रस्त्यावर उभे राहून गाड्या घोडयांच्या तडाक्यांत कोणी सांपडू नये ह्मणून चांगली दक्षता ठेवीत असतात. गवताचे किंवा जळाऊ लाकडाचे भारे विक्री क रितां घेऊन येणारे लोकांस पेठेतून अगदीं उभे राहूं देत नाहींत. हे रात्रींस बरोबर भाले घेऊन रवणीस या पेठेच्या आसपास मात्र फिरत असतात. येथें रात्रींच्या प्रसंगीं कधीं कधीं जंगली हिंसक जनावरें दृष्टीस पडतात म्हणून ही भाल्याची कल्पना काढली आहे. येथील चावडीवर एक तास टांगलेला आहे, तोही पाहऱ्यावर असणारे शिपायाकडून वाजविण्यांत येतो. आणखी कोठें येथें आग किंवा रात्रीची मोठी चोरी वगैरे सार्वजनिक संकट आलें असतां हा तास एकसारखा घणघण असा बराच वेळ वाजवितात. तेणेंकरून गांवचे सर्व लोक संकट निवारणार्थ पोलिसच्या मदतीस एकदम गोळा होतात. सातार जिल्ह्याच पोलीस सुपरिंटेंडेंट हे पोलीस खात्याचे मुख्य आहेत.

 मेढें तालुक्यांत या पेटयाचा समावेश होत असल्यामुळे मेढयाचा तालुका सबरजिष्टर मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत पहिले सोमवारी येथें येऊन दस्त नोंदण्याचें काम करून जातो. तसेंच १०० रुपयाचे आंतील शेतक-यांचे दस्त नोंदण्या करितां येथें कायमचा एक गांवरजिस्टर आहे. तो महिन्यांतील १५ दिवस तेथें काम करून १५ दिवस तालुक्यात दुसरे ठिकाणींं जातो. या शिवाय देवीडाक्तरही येथें येऊन देवी काढण्याचे काम करीत असतो.--------------