महाबळेश्वर/म्युनिसिपालिटी.

विकिस्रोत कडून



म्युनिसिपालिटी.
----------------------

 मालकमपेठची वसाहत इ० स० १८२७ पासून सुरू झाली, हें पूर्वी मालकम पेठ ऊर्फ नहर या प्रकरणांत सांगितलेंच आहे. तेव्हांपासून इ० स० १८६६ पर्यंत या हिल्लस्टेशनची स्वच्छतेसंबंधी व्यवस्था पाहण्याचें काम सरकारतर्फे नेमलेल्या कांहीं मंडळीकडे होतें. यास हे काम करून घेण्यास जो खर्च करावा लागे, तो सरकारी खजिन्यांतून कांहीं एक ठराविक रकम घेऊन त्यांतून करण्याची या मंडळीस परवानगी होती. या रकमेस " स्टेशनफंड ” अशी संज्ञा असे. पुढे इ० स० १८६५ मध्यें या स्टेशनची सुधारणा करण्याचें सरकारचे मनांत आल्यावर त्यांनीं या साठीं ज्यास्त लागणाच्या पैशाची जुळणी करण्याकरितां ही म्युनिसिपालिटी स्थापन करण्याची कल्पना काढली. त्याप्रमाणे इ० स० १८६७ तारीख १ माहे मे इसवी रोजी ही मंडळी कमी करून सरकारानें गांवम्युनिसिपालिटीची स्था पना केली. इ° स० १८८६ मध्ये या गांवम्युनिसिपालिटीच्या ताब्यांत या हिल्लस्टेशनकरितां घेतलेली सर्व जमीन देण्यांत आली. इतकें झालें तरी म्युनिसिपालिटीस सरकारी मदत म्हणून जी रकम मिळत होती; ती होतीच आणि अद्यापिही ५२१६ रुपये दरसाल मिळत आहेत. परंतु सरकारानें प्रथम बंगल्याकरितां घेतलेल्या जागेबद्दल एका एकरास एक रुपयापासून १० रुपये पावेतों प्रमाणें कर घेण्याची शिस्त ठेविलीच आहे. या जागेबद्दल सरकारानें कित्येकांस २१, ५०, व ९९ वर्षांचीं लीजें (कौल) दिले आहेत. सन १८८८ पासून पुढें ज्याचे जुनें लीज संपून गेलेमुळे त्यास नवीन करून देण्याची पाळी येईल, त्यानीं सरसकट एकरी १० रुपये प्रमाण कर सरकारास देण्याचे ठरविलें आहे. या शिवाय प्रत्येक बंगल्याच्या किंवा घराच्या मालकास वार्षिक भाडयाच्या मगदुरावर शेकडा २|| रुपयेप्रमाणें म्युनिसिपालिटीस घरपट्टी द्यावी लागत आहे ती निराळीच, याही गोष्टी बंगल्यास किंवा घरास भाडे  ज्यास्त पडण्याचीं जीं कारणे बंगले या प्रकरणांत दिलीं आहेत, तीं वाचतांना लक्षांत ठेविल्या पाहिजेत.

 ही म्युनिसिपालिटी निघाल्यावर निरनिराळ्या बाबीच्या उत्पन्नाची भर पडून आतां दरसाल म्युनिसिपल तिजोरींत सुमारें २०,४०० रुपये रकमेची जमा होत आहे. त्यांतून सुमारें १७,५०० रुपयांची रकम खर्ची पडून बाकीची दरसाल शिलक राहत आहे. या बाबी -फारेस्टकडे गेलेल्या म्युनिसिपालिटीच्पा जमिनींचे उत्पन्न; म्युनिसिपालिटीच्या बंगल्यांचें उत्पन्न; हौसटॅक्स, कान्सरव्हन्सी टॅक्स, व्हील व हॉर्स टॅक्स वैगरेचें उत्पन्न फार लौकर पैसा जमविण्यास कारण झाल्या आहेत.

 या हिलस्टेशनवर कायमचे रहिवाशी व हवापाण्याच्या सुखाची प्राप्ति करून घेण्याकरितां आलेली मंडळी यांजकडून पुढे दिल्याप्रमाणें गाडी व घोडयाबद्दल कर वसूल करून घेण्यांत येतात. येथें येणारे लोक एक पुरा महिनासुद्धां येथें राहणारे नसले तरी त्यांस महिन्याचाच कर द्यावा लागतो. सीझनचे केवळ तीन महिने जरी त्यांनीं येथें काढले  तरी त्यांस वर्षांचा कर भरणें भाग पडतें. गाडया घोडयांचें रजिस्टर ठेऊन त्यावरून कराची आकारणी करितात. गाडी किंवा घोडा स्वतःचा किंवा भाडयानें आणलेला असो, ती वापरणारांसच त्याबद्दल कर द्यावा लागतो, त्याचे प्रमाण:-

दरमाह. दरसाल
चारचाकी गाडी•••••••••• १२
दोनचाकी••••••••••
सारवट गाडी••••••••••
रबरी धावास ( जास्त ) १ ••••••••••
बसण्याचे - घोडे••••••••••
बसण्याचे तट्टास•••••••••• १॥

 हा कर लष्करी खात्याच्या व मुंबई सरकारच्या तैनातीस असणारे नोकरांस पडत नाहीं.

जंगली पक्षांस त्यांच्या वाढीच्या दिवसांत मारणारे लोकांस मारूं न देण्याबद्दल नजर ठेवण्याविषयीं येथें येणाऱ्या सर्व गृहस्थांस म्युनिसिपालिटीची सूचना आहे. कारण यासंबंधाचा कायदा महाबळेश्वरासही लागू केला आहे. तथापि त्यांच्या कांहीं  मुदती आहेत. त्यांत मात्र या सूचनेप्रमाणें व्यवस्था राहणेची आहे. त्या मुदती-पक्षी मारणेची बंदी तारीख १ माहे मार्चपासून तारीख १ माहे आक्टोबर पावेतों; सांबर मारणेची बंदी तारीख ३१ माहे मेपासून तारिख १ नोवेंबर पावेतों; भेकर मारण्याची बंदी तारीख ३१ माहे डिसेंबरपासून तारीख १ माहे मार्च पावेतों; हरीण मारण्याची बंदी तारीख ३० माहे एप्रिलपासून तारिख १ माहे डिसेंबरपावेतों; ससे मारण्याची बंदी तारिख ३० माहे सपटेंबरपासून तारिख १ माहे मार्च पावेतों. या निर्दिष्ट केलेल्या मुदतींत ज्या कोणाजवळ नुकतेंच मारलेलें किंवा धरलेलें तें तें जंगली पांखरू किंवा ते तो प्राणी असल्याचें दिसून येईल, किंवा जो कोणी म्युनिसिपालिटीच्या हद्दींत त्या त्या जंगली पांखरांचा किंवा प्राण्यांचा पिसारा अगर कातडी काढून घेऊन येईल तो, ही पहिलीच वेळ असल्यास, १० रू० दंडास पात्र होईल. या परस्थलोकांकडे जी कोणी अशीं पांखरें किंवा प्राणी विक्रीकरितां घेऊन आलेला आढळेल यास  सुपरिंटेंडंटचे आफिसांत किंवा फौजदार कचेरींत अडकावून टाकून असले गुन्हे न होऊं देणेंबद्दल दक्षता ठेवील. त्यास हे अल्पवयी जीव रक्षण केल्याचें श्रेय मिळेल.

 येथील म्युनिसिपालिटीचा मुख्य अंमलदार सातारा जिल्ह्याचा कलेक्टर आहे. परंतु तो नेहमीं साताऱ्यासच राहत असल्यामुळे बहुतेक सर्व अधिकार येथील सुपरिंटेंडंटाकडेच सोपविलेले असतात. येथील वस्ती फार लहान असल्यामुळे मेंबरांची निवडणूक सरकार तर्फेच होत असते. या मेंबरांपैकीं कांहीं मेंबरलोक सरकारी नौकर असतात, व कांहीं गांवचे मोठमोठे ठळक व्यापारी असतात. या म्युनिसिपालिटीचें सर्व आफिस पावसाळ्यांत साताऱ्यास जातें. या हिल्लस्टेशनावर फिरण्यासारखे गाडीरस्ते सुमारें ६४ मैलपर्यत भरण्याजोगें चोहोंकडे पसरले आहेत. हे तयार करण्यास पूर्वी येथें असलेले चिनीबंदिवान लावून करून घेतलेले आहेत. याच कामावर त्यांस नेहमीं राबवून घेत असत. हलीं हे सर्व रस्ते पावसाळ्यांत खडी घालून दुरस्त ठेविण्याचे काम  म्युनिसिपालिटीकडूनच होत असतें. तसेंच उन्हाळ्यांत येथील सडकांच्या बाजूस असणारे झाडांचा वाळलेला पाला पडून रस्ते कोठे अव्यवस्थित दिसल्यास ते झाडून साफ करण्याकरितां जागजागीं हातांत डाहाळ्याची झाडणी घेऊन बायकामाणसाची फरेट चोहोंकडे लागून गेलेली असते. यामुळे येथें केव्हांही व कोठेंही गलिच्छपणा दृष्टीस पडत नाहीं. अशी उत्तम प्रकारची म्युनिासिपालिटीची व्यवस्था असते, ती पाहून फार आनंद होतो.

कानसरव्हन्सी टॅॅक्स.

 येथें येऊन बंगल्यांतून राहणारे थोर लोकांनीं त्या बंगल्याच्या कंपौंडांत कागदाचे कपटयांचा आणि इतर हरतऱ्हेचा कचरा पडून गलिच्छपणा न दिसेल अशी तजवीज मेहरबानी करून ठेवावी; तो झाल्यास आपले नोकरांकडून एका जागीं गोळा करवावा ह्मणजे म्युनिसिपाल कमिटीच्या कचऱ्याच्या गाडयांतून भरून टाकण्यास फार सोईचें पडतें. बंगल्याच्या सभोवारचें जंगल स्वच्छ ठेवून  हवा न बिघडू देण्याचे कामीं फार त्रास पडू लागल्यामुळे आणखी या लोकांस अशी मुद्दाम सूचना देण्यांत येते कीं यांनीं आपले कंपॅौंडांत नोकर लोकांचे पायखाने तात्काळ तयार करून घ्यावे आणि त्यांतील मैला भंगीलोक लांब नेऊन डिपोंत टाकितात किंवा कोठं तरी जंगलांत फेकून देतात यावर त्यांनीं करडी नजर ठेवावी अशी त्यांस विनंती आहे. कारण, त्यांच्या कामावर दुर्लक्ष्य केले तर हे भंगीलोक जवळच्या झाडीत मैला टाकून हात हालवीत जाण्यास कधीं कमी करणार नाहींत. मागून मग तो कोणी टाकला व केव्हां टाकला ही चांभारचौकशी करण्यांत कांहींच उपयोग होत नाहीं॰ मैला टाकण्याची जागा कोणीकडे केली आहे ती समजून घेण्याकरितां आपल्या बरोबरच्या भंग्याला येथील कॉनसरव्हन्सी इनस्पेक्टरकडे पाठवून द्यावें. भंग्याची कामगीरीं बरोबर न झाल्याचें सुपरिंटेडटसाहबाच्या कानावर आलें, तर त्याबद्दल सक्त तजवीज केली जाईल.

 भंग्याचे दर-बंगल्यांतील मुख्य मालकास दर.  महा २ रु० व १६ वर्षांवरील वयाच्या त्याच्या कुटुंबांतील प्रत्येक इसमास दरमहा १ रु० प्रमाणें भंग्यास पैसा दिला पाहिजे. १६ वर्षांच्या आंतील वयाच्या मुलांस भंगीपट्टी माफ आहे. आपले हिंदु नोकरांना दरमहा माणशीं चार आणे पडतात. एकंदरींत बंगल्यामागें ६ रुपयांपेक्षां जास्त मुशाहिरा मात्र भंग्याला देण्याचा नाहीं.

 बंगल्याच्या मालकानें कंपौंडाची बाडी ( सुक्या दगडाचा गडगडा) व पिलर चांगले दुरस्त राखले पाहिजेत; आणि पावसाळा खलास होतांच पावसाच्या निवारणार्थ केलेल्या झडया किंवा तत्संबंधी कांहीं गदळा असेल ते काढून सर्व जागीं स्वच्छता ठेविली पाहिजे.

 कपौंडांत गवती छपराचे पायाखाने, तबेले किंवा झोंपडया तूर्तातुर्तीकरितां बांधण्याचें अवश्य पडल्यास त्याबद्दल सुपरिंटेंडंट साहेबांकडून आगाऊ परवानगी मागितली पाहिजे.

 कानसरव्हन्सीटॅक्स शेकडा १॥ प्रमाणें (अ) तारिख १ मार्च पासून तारीख १५ माहे जून  तागाइतचे ऊष्ण काळाबद्दल बंगल्याच्या या किंमतीवर असतो- व (ब) तारीख : १० आक्टोबर पासून २८ फेब्रुवारीपर्यंतच्या थंड काळाबद्दल म्युनिसिपालिटीच्या हद्दींतील खासगी ज्ञागेत कोठेहीं जनावरांकरितां किंवा गाडया वगैरेकरितां छपरें किंवा आडोशाची जागा हीं केल्यास त्यावद्दल दरएक सीजनला १०० चौ० फुटास दोन आणे प्रमाणे कर भरला पाहिजे.

 कानसरव्हन्सीटॅक्स ज्या इमारतीस द्यावा लागत असेल त्या इमारतीचे कंपौंडांत तंबु लावला असेल किंवा झोंपडी केली असेल तर त्यांजबद्दल मात्र इतर ठिकाणीं लावलेल्या तंबूच्या किंवा केलेल्या झोंपडयांच्या कराचा तिसरा हिस्सा कर दिला ह्मणजे झालें. पुढील इमारतीस कराची आकारणी होत नाहीं :- ज्या घराचे किंवा इमारतीचें वर्षास १५ रुपयांच्या आंत भाडे येतें त्या. ज्या म्युनिसिपालीटीच्या इमारतीस भाडें घेण्यांत येत नाहीं त्या आणि धर्मखात्यानें बांधून ठेवलेल्या धर्मार्थ इमारतीं

लेडी रे स्कूल.

 मालकमपठेची वस्ती वाढत वाढत इतकी वाढली कीं, ती पेठ वसविल्यापासून सुमारें ३० वर्षानीं ह्मणजे सन १८६४ सालीं येथें मुलांची शाळा असावी अशी अवश्यकता वाटून ही शाळा स्थापन झाली. या वेळीं या शाळेला सरकारी इमारत होती, परंतु ती लहान असलेमुळे त्या इमारतीची विक्री करून पुढें सन १८८६ सालीं म्युनिसिपाल खर्चातून शाळेकरितां ही नवीन इमारत बांधण्यांत आली. या संधीस मुंबईचे गव्हरनर नामदार लार्ड रे साहेब यांची स्वारी येथें आलेली असल्यामुळे, या नव्या इमारतीचा प्रवेशविधि त्यांच्याकडून करवून या इमारतीस त्यांच्या प्रियपत्नीचें नांव "लेडी रे स्कूल" असें देण्यांत आलें, त्या नांवानें ही शाळा अद्यापेि प्रसिद्ध आहे.

 या शाळेत मराठी पांच इयत्तांपर्यंत अभ्यास चालतो. या शाळेत पाऊस काळांत, जरी या वेळीं येथें कोणी बाहेरील गृहस्थ राहत नाहीत, तरी मुलांची संख्या १५० पर्यंत असते. ही संख्या, हिंवाळ्यांत  व उन्हाळ्यांत येथें बाहेरील लोक येऊं लागले ह्मणजे सुमारें २०० पर्यंत वाढते. या या मुलांपैकीं बहुतेक मुलें मराठे व मुसलमान जातींचीं असतात. शाळेत शिक्षक पांच आहेत. एक हेडमास्तर असून त्यांचे हाताखाली आणखी चार असिस्टंट मास्तर असतात. ही शाळा येथील म्युनिसिपल कमिटीच्या ताब्यांत असून तिच्या संबंधाच्या सर्व प्रकारच्या खर्चाची व्यवस्था म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नांतूनच होतें.

हॉस्पिटल.

 फ्रियर हालच्या नजिक म्युनिसिपालिटीच्या आश्रयानें चालणारी स्टेशन हॉस्पिटल आणि धर्मार्थ दवाखान्याची संस्था आहे. तीवर येथील सुपरिंटेंडंटसाहेबांची तपासणी असते. येथें या साहेबबहादुरांचें हुकुमाप्रमाणें दवाखान्याचें काम करण्याकरितां एक हॉस्पिटल आसिस्टंट व एक कन्पौंंडर असे नोकर ठेविलेले असतात. ते दररोज सकाळीं ७ पासून १० पर्यंत व दुपारीं ५ पासून ७ पर्यंत  दवाखाना उघडा ठेवून औषधपाणी देण्याकरितां हजर असतात॰

 सर्व सरकारी नोकरांना व लष्करी खात्याच्या नोकरांच्या कुटुंबांतील माणसांना कांहीं सल्लामसलत किंवा औषध घेण्यास कांहीं एक छदाम द्यावा लागत नाहीं. सरकारी नोकर नसून इनकम-टैंक्स भरणारें लोकांस दवाखान्यात येऊन प्रकृती दाखविण्याबद्दल आठ आणे व औषध घेण्याबद्दल तीन आणे मिळून आकरा आणे द्यावे लागतात. पुन्हा त्यांस दुसरे दिवशीं प्रकृति पाहण्यास चार आणे व औषधाबद्दल तीन आणे आकार पडतो. हॉस्पिटल असिस्टंंटला दिवसा घरीं आणण्याचें कारण पडल्यास फी एक रुपया देऊन औषधाचे तीन आणे भरावे लागतात. रात्रीं आणण्याबद्दल औषधाशिवाय दोन रूपये फी पडते.

 कोणास सिव्हिल सर्जनची सकाळीं अवश्यकता आहे असें वाटल्यास त्यानें त्यांस सकाळीं नऊ वाजण्याचें आंत चिठी पाठविली पाहिजे किंवा रात्रींची बोलाविण्याचीं जरूर वाटल्यास सायंकाळचे पांचापूर्वी त्यांस सूचना देऊन ठेवावी लागते. त्यांची फी दिवसास रुपये १० व रात्रीस रुपये २० आहे. या संस्थेचा खर्च म्युनिसिपालिटीकडून होत असतो.