भूमी आणि स्त्री/सुफलीकरण विधी आणि लोकदेवता

विकिस्रोत कडून


 अन्न : आदिमानवाची समस्या आणि प्रेरणा , आदिमानवाची यातुश्रद्धा समूह जीवनातून, शेतीशी जोडलेल्या आदिम श्रद्धा आजही मनातून जाग्या , सुफलीकरणाशी निगडित दैवते,सुफलीकरणाशी निगडित स्त्री देवता, सुफलीकरणाशी संबंधित पुरुष देवता, आदिमानवाने भूदेवी मातृस्वरूपात पाहिली, भूमीची पूजा, कुंभ : पृथ्वीचे प्रतीक , जिवती : सर्जनशक्ती : जगन्माता, भारतातील देवी उपासनेचे आद्यकेंद्र सिंधू संस्कृती, स्त्री आणि भूमी - (जागतिक अनुबंध), कृषियातुविज्ञान आणि स्त्रीमाहात्म्य , गौरीपूजाः सर्जनाची पूजा, थरणीच्या तीन रूपांची पूजा : नवरात्र, कानबाई, आसरा, धुरपता, काही देवता रानातच राहणान्या, सूर्य आणि पृथ्वी आदिम युगल, सर्जनप्रक्रियेत बीजाचे महत्त्व, भुलोबा : भांगलोबा : शिराळशेठ, गणपती : सुफलतेचे दैवत, गणपती : एक प्रवास : विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता, गणसमाज : समूह जीवनाचा पाठ, गणसमाज आणि लोकसत्तेचा अंत: राजसत्तेस प्रारंभ, गणसमाज: मातृसत्ताक,संघर्ष, समन्वय आणि स्वीकार यातून, एकात्म संस्कृती , मुंजा : शेतीचे रक्षण करणारा जागल्या, सुफलनशक्तीशी जोडलेली दैवते ही ग्रामदैवते.


 ग्रामदेवतांच्या संदर्भात मार्शल याने केलेले विवेचन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते.
 She is 'the mother' or 'Great mother' and prototype of power (Prakriti) which developed in to that of shakti. Her representatives are the Gramadevatas, the village goddesses whose names are legion and whose local attributes may vary, but who one and all are personifications of the same power... Who is the mother of fertility.... There can be no question that they held a pre-eminent position among the national deities, of non Aryan population'.
 भूमीच्या सुफलीकरणाशी निगडित व्रते, सण, उत्सव, विधी यांचा अभ्यास करताना वरील विधानाची यथार्थता प्रत्ययाला येते. या संदर्भात भारतीय लोकसंस्कृतीचे मान्यवर अभ्यासक देवीप्रसाद चटर्जी म्हणतात -
 More significant is the fact that among the vast masses of the Indian peasantry - that is among those that are no longer living in the tribal society male deities have only secondary position. The deities that have only real grip on the lives of the masses are mostly females... Survival of the tribal past has indeed been an important characteristics of the traditional Indian society.
 लोक परंपरांच्या वरील दोन्ही ही अभ्यासकांची मते अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची आहेत. सुफलीकरणाशी संबंधित विधीव्रतांचा अभ्यास करताना वरील विधानांची यथार्थता सतत जाणवते.
 अन्न : आदिमानवाची समस्या आणि प्रेरणा -
 धान्यबीज पेरल्यापासून ते कणसातील बीज पक्व होईपर्यंत त्या बीजावर कोणकोणत्या प्रक्रिया होतात याचे कुतूहल आदिम मानवी मनाला जरूर होते. परंतु त्यातील कार्यकारणभाव उलगडून पाहण्याची झेप मानवी बुद्धीने घेतलेली नव्हती. जमीन, पाणी, सूर्य, बीज यांच्यातील अनुक्रमात्मक अनुबंध त्याच्या मनासमोर उलगडलेला नव्हता. अशा काळात मानवी मनाचा भरवसा मंत्र तंत्र सामर्थ्यावर विशेष करून होता. भोवतालच्या वास्तवावर पकड मिळविण्यासाठी समूहमनाची शक्ती, माध्यम म्हणून आदिमानवाने स्वीकारली. समूहमनाची शक्ती, विश्वात्मक यातुशक्ती आपल्या देह माध्यमातून कृतिशील करणे आणि इष्ट सिद्धी घडवून आणणे यावर आदिमानवाची श्रद्धा होती. यातूनच सर्व यातुविधी निर्माण झाले. अन्न ही आदिमानवाची महत्त्वाची समस्या व प्रेरणा असल्यामुळे आदिम काळातील यातुविधी कृषी विधानाशी जोडलेले आहेत.
 'सुफलीकरण' संकल्पनेशी निगडित लोकदेवतांचा शोध घेण्यापूर्वी ही लोकदैवते ज्या कथांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात त्यामागील परंपरेचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरेल. भाषेचा शोध लागल्यानंतर माणूस स्वतःला अभिव्यक्त करू लागला. त्यातूनच त्याला ज्या नैसर्गिक घडामोडींबद्दल विलक्षण आणि अपार कुतुहल होते, त्यांचे वर्णन.... व्याख्या करण्यास समर्थ झाला आणि हे वर्णन आणि व्याख्या 'दैवतकथां' च्या रूपात व्यक्त झाल्या. ऐण्ड्रयूलँग च्या मते दैवतकथांमधून मानवी विकासाच्या इतिहासाचा आलेख कळतो. किंबहुना तो मानवी विकासाचा इतिहासच आहे.
 जेव्हा प्राचीन जीवनव्यवस्था वा धर्म जीर्णशीर्ण होऊन, नवीन नियमांवर आधारित धर्म त्याची जागा घेऊ लागतो तेव्हा आदिम दैवतकथा या परिकथा आणि दन्तकथा बनतात. सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या दैवतकथा सृष्टिउत्पत्ती, नक्षत्रे यांच्याशी संबंधित आहेत.
 अन्न ही मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची समस्या आणि गरज होती. अन्नाची निर्मिती सृष्टीतून...धरणीतून होते. तर त्या निर्मितीसाठी पाऊस आवश्यक. तसेच सूर्याची ऊर्जा जीवनावश्यक. त्यामुळे या तीन निसर्ग शक्तींवरील दैवतकथा आधिक्याने आहेत. या संदर्भात भारतीय लोकसाहित्याच्या मान्यवर अभ्यासक दुर्गा भागवत म्हणतात, अतिप्राचीन नक्षत्रकथांचा शोध घेताना असे लक्षात येते की जगात 'कृत्तिका' या वर्षाऋतुशी निगडित नक्षत्राच्या कथाच उपलब्ध आहेत. वर्षनाशिवाय सर्जन संभवत नाही याची खात्री आदिमलोकसमूहाला झाली होती. हे यातून लक्षात येते.
 आदिमानवाची यातुश्रद्धा समूह जीवनातून -
 जीवननिर्वाहासाठी सातत्याने झगडणारा माणूस बदलत्या परिस्थितीशी जुळवून , घेत होता. विविध तऱ्हेचे शोध लावून त्याने निसर्गातील शक्तींवर मात करण्याचा सतत प्रयत्न केला. शत्रूवर मात करण्यासाठी अधिकाधिक वेगवान आणि तीक्ष्ण हत्यारे, रोगांवर मात करणारी औषधे इत्यादी नवनवीन शोध त्याने लावले. मात्र निसर्गावर पूर्ण ताबा मिळविणे त्याला शक्य झाले नाही. अनपेक्षित अशा संकटांनी तो चक्रावून जाई. या सर्वांचे निरीक्षण करून त्याची दृढ श्रद्धा झाली की, मानवी जीवनात आणि निसर्गात ज्या अनपेक्षित, अनाकलनीय, संहारक वा सुखकर घटना घडतात, त्याचा कर्ता करविता कोणी तरी असला पाहिजे. मानवाच्या संपूर्ण व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी, चराचरावर स्वामित्त्व गाजविणारी एक अद्भुत आणि विराट अशी शक्ती असली पाहिजे अशी प्रगाढ श्रद्धा त्याच्या मनात आकारली. मुळात मानवी प्रवृत्ती समन्वय साधण्याची. त्यामुळे या दिव्य शक्तीशी तडजोड साधली पाहिजे असे त्याला वाटू लागले आणि त्यातूनच धर्म ही संकल्पना उदयाला आली.
 प्रोफेसर बॅलार्ड म्हणतात -
 Religion is a process of adjustment to the intangible, unseen, unknown and uncontrolled forces believed to be present in social situation.
 अशी ही धर्मसंकल्पना निर्माण होण्यापूर्वीची अवस्था ही यातुश्रद्धेची (Magical faith) होती. यातुश्रद्धा ही मानवी संस्कृतीच्या आदिपर्वातील समूहश्रद्धा आहे. या समग्र सृष्टीत एक यातु (जादू).... एक अनाकलनीय शक्ती व्यापून राहिली आहे. समूहाने विशिष्ट पद्धतीने या शक्तीस आव्हान केले तर, ती शक्ती, ते द्रव्य शरीराश्रयी होऊन इष्ट कार्य घडवून आणते, अशी आदिकालीन समूहमनाची ठाम श्रद्धा होती. तो काळ असा होता की ज्यात 'मी' जन्माला आलेला नव्हता.
  संगच्छध्वं, संवदध्वं, सं वो मनांसि जानताम्
  देवा भागं यथापूर्वे संजनाना उपासते॥
  समानी व आकूती समाना हृदयानिव
  समानमस्तु वो मनो यथा वा सुसहासती....! (१०.१९१.२-४)
ही समूह भावना व्यक्ती मनातून होती. समूह कर्मातून निर्माण होणारा भावनात्मक आवेग यात्वात्मक विधीच्या यशस्वितेचे कारण असावा असे आदिमानवास वाटत असावे.
 शेतीशी जोडलेल्या आदिम श्रद्धा आजही मनातून जाग्या -
 शेतीच्या विकासाबरोबर शेतीतून अधिकाधिक पीक काढण्यासाठी त्याने तंत्र विकसित केले. पाण्याचा योग्य वापर व विविध प्रकारची खते वापरल्यास शेतात भरपूर पीक येते हे त्यांच्या लक्षात आले होते. तरीही वेळेवर पडणारा पाऊस, सूर्याचे तेज आणि भूमीतील उर्वराशक्ती यांच्यावर आपण ताबा मिळवू शकत नाही हे त्याने अनुभवातून जाणले होते. कौटिल्याने त्याच्या ग्रंथात खतांचे विविध प्रकार वर्णिले आहेत. तरीही पेरणी समंत्रक करावी असे तो ठासून सांगतो.शेती हा व्यवसाय अन्नाशी, उपजीविकेशी जोडलेला आहे. आदिमानवाने अन्नाला अपार महत्त्व दिले. कारण ते त्यांचे जगणे होते. त्यामुळे हा व्यवसाय लोक संस्कृतीचा अंगभूत घटक आहे. आदिम काळात निर्माण झालेल्या श्रद्धा बदलत्या काळातही पूर्णपणे नाहीशा झाल्या नाहीत. आज २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतीय कृषिसमाजात या श्रद्धेचे अस्तित्त्व विविध सण उत्सव विधी, व्रते तत्संबंधी गाणी यात दडले असल्याचे सतत जाणवत राहते.
 महाराष्ट्रातील भिल्ल, ठाकूर, पावरा आदिवासी जमाती पेरणीपूर्वी विधी करतात. शेतकरी समाजातही पेरणी, काढणीपूर्वी म्हसोबाला वा आसरांना मद्यमांसांचा नैवेद्य दिला जातो. किमान नारळ फोडला जातो. मंत्रतंत्रात्मक आचरण केले जाते. भारतातील नागर आणि ग्रामीण,उच्चवर्गीय समजल्या जाणाऱ्या समाजात श्रद्धापूर्वक साजऱ्या केल्या जाणाऱ्या गौरीगणपती, चैत्रगौर, हरितालिका, लक्ष्म्या, शाकंभरी नवरात्र, ऋषिपंचमी, चंपाषष्ठी आदी व्रतांचा संबंध वनस्पतीसृष्टीच्या सुफलीकरणाशी आहे. प्राचीन वाङ्मयात याला भरपूर आधार सापडतात.
 सुफलीकरणाशी निगडित दैवते -
 सुफलीकरणाशी संबंधित विधीव्रते सण उत्सव यांचे शोधन करताना त्यांच्याशी निगडित दैवतांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते. ही दैवते का, कशी व केव्हा निर्माण झाली, त्यांच्यात काळानुरूप कसे बदल घडत गेले ते का घडत गेले, या बाबींचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
 भारतात दास, दस्यु, पणिन्, द्रविड, आर्य, असुर आदी अनेक टोळ्या स्थिरावल्या. भारतात स्थिर झालेल्या सर्वच समाजांना रानटी अवस्थेचा भूतकाळ होता. त्यांचे स्वतःचे असे आचार विचार होते. दैवतकल्पना होत्या. अर्थात हे सर्व प्राथमिक स्वरूपात होते. त्यातून पुढे वैदिक आणि लोक या संस्कृती निर्माण झाल्या. सर्वांच्या संयोगातून एक वैविध्यपूर्ण, आगळीवेगळी परंतु एकसंध अशी भारतीय संस्कृती निर्माण झाली. सुफलीकरणाशी निगडित अशी व्रते, विधी, आचार, दैवते, उत्सव यांचे दर्शन आजही या संस्कृतीतून आपल्याला दृगोचर होते. भारतीय समाज कृषिजीवी होता आजही आहे. आजही मराठवाड्यातील ८०% टक्के समाज शेतीवर अवलंबून असलेला आहे. ही टक्केवारी उर्वरित महाराष्ट्रापेक्षा आधिक आहे. मराठवाड्यात कृषिजीवनाशी एकरूप झालेले, सुफलीकरण करण्याच्या भूमिकेतून निर्माण झालेले विधी, व्रते, सण, अधिक श्रद्धेने पाळले जातात.
 अ) सुफलीकरणाशी निगडित स्त्री देवता -
 गौरी, पृथ्वी, लक्ष्मी, इला, इनाई, भुलाबाई, धुरपा, जिवंतिका, सप्तमातृका, आसरा, कानबाई आदी अनेक. ही सर्व मूलतः भूदेवीची रूपे आहेत.
 ब) सुफलीकरणाशी संबंधित पुरुष देवता -
 म्हसोबा, भुलोबा, भांगलोबा, नागोबा, शिराळशेठ, गणपती, शिव, मुंजा, सविता उर्फ सूर्य.
 आदिमानवाने भूदेवी मातृस्वरूपात पाहिली -
 प्राचीन मानवाने विश्वजननीची विविध रूपे कल्पिली. ती निसर्गाच्या निरीक्षणांतूनच. जी शक्ती अर्भकाला जन्म देते तीच शक्ती भूमीतून नवा अंकुर निर्माण करते हे त्याने निरीक्षिले. या निरीक्षणातून त्याने भूमी व स्त्री यांना वंद्य आणि एकरूप मानले. भूदेवीची विविध रूपातून, विविध प्रसंगाने जी पूजा केली जाते, त्या मागे तिच्यातील सर्जन क्षमता वाढावी ही कामना असते. आदिमानवाने भूदेवीचे रूपमातृस्वरूपात पाहिले. मात्र हे मातृस्वरूप त्याने तीन रूपात कल्पिले.
 १. जगाला जन्म देणारी जगन्माता,
 २. अन्नौषधी निर्माण करून संपूर्ण जगावर ममत्वाचा हात फिरवणारी गौरी उर्फ लक्ष्मी,
 ३. दुष्ट शक्तींचा संहार करणारी परंतु प्रसंगी विविध रोग, दुष्काळ पसरवून प्रजेचा संहार करणारी उग्रचंडिका वा काली.
 भूदेवीची विविध रूपे सुफलीकरणाशी निगडित अशा व्रतांतून येतात. उदा. - गौरी, लक्ष्मी, जिवती, कानबाई,शीतलादेवी, धुरपा,यल्लम्मा, इला आसरा इत्यादी अनेक. ही दैवते शेतीनिष्ठ समाजात..... (महाराष्ट्रातील ६५% समाज शेतीशी जोडलेला आहे, आज विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठवाड्यात हे प्रमाण ८०% आहे) विशेष श्रद्धेने पूजिली जातात.
 भूमीची पूजा -
 मानवी जीवनाचा विकास शेतीच्या जोडीने झाला. अन्न ही जीवनाची महत्त्वाची प्रेरणा होती. अन्न निर्माण करणाऱ्या भूमीची उपासना आणि पूजा प्राचीन कृषिजीवी समाजाने विविध रूपांतून केली. मृदुमुलायम रेणूंनी बनलेले वारूळ हे भूमीची योनी मानले जाते. रेणू म्हणजे मातीचा कण. मातीच्या कणांतून साकारलेली 'रेणुका' म्हणजे भूमी वा पृथ्वी. वारूळाच्या मातीला कोरी-भूमी म्हणजे कुमारी भूमी असे म्हटले जाते. वारूळाची माती अत्यंत सुफल असते अशी श्रद्धा आजही शेतकरी समाजात आहे.
 नवरात्रात वारूळाची माती दुसऱ्या मातीत मिसळून त्यात बीज पेरले जाते. पेरणीपूर्वी वारूळाची माती आणून ती शेतात शिंपडण्याचा रिवाज आहे. शेतातील वारूळे सहसा मोडीत नाहीत. वारूळात नाग राहतात. नाग हा भूमीचा रक्षक मानला जातो. नागपंचमीला वारूळाची म्हणजेच भूमीची पूजा केली जाते. भूमीची गर्भधारणेची आणि जीवनसर्जनाची अपार क्षमता ध्यानी घेऊन तिला 'उत्तानामही' या शब्दांनी गौरविले आहे. सर्जनाच्या सोहळ्यात साथीदार म्हणून पृथ्वीने पुरुषतत्त्वाला कधी सूर्य म्हणून, कधी अश्व म्हणून, कधी नाग म्हणून, कधी वृषभ म्हणून तर कधी गजाकार मेघ म्हणून स्वीकारले. भारतीय संस्कृतीने या क्षमेला आदिकालापासून वंदनीय मानले आहे. सकाळी उठल्यावर धरणीला पदस्पर्श करताना भारतीय मन सहजपणे म्हणते -
  समुद्रवसने पृथ्वी पर्वतःस्तन मंडले।
  विष्णुपत्नी नमःस्तुभ्यं पाद स्पर्श क्षमस्व में।
 भारतात, महाराष्ट्रात पृथ्वीची..... अनेक स्थाने आहे. माहूर झरी हे वाकाटक राजांच्या काळात मातृपूर आणि पृथ्वीपूर या नावाने प्रसिद्ध असून ते पृथ्वी मातेच्या अथवा रेणुकेच्या उपासनेचे जागते केंद्र होते. भारतभर नागपंचमीला नागपूजा केली जाते. मात्र महाराष्ट्रात नागपंचमीस शेतात जाऊन स्त्रिया वारूळाची सामूहिक पूजा करतात. नाग हा पुरुषतत्त्वाचा प्रतिनिधी आहे. मूळ पूजा भूमीचीच. गोव्यातील सांतेरी ही भूमिका या पर्यायी नावाने ओळखली जाते. वारूळाची माती सर्वात सुफल.... कोरीभूमी..... कुमारी भूमी मानतात. कुमारिका, जिच्यात बीज अद्याप पेरलेले नाही, ती सुफल होण्याच्या शक्तीने ओतप्रोत भारलेली असते ही श्रद्धा मानवी विकासक्रमात दृढ झाली. आज सुफलीकरणाशी जोडलेल्या व्रतांत कुमारिकांना विशेष महत्त्व असते. नवरात्रात कुमारिकांची पूजा केली जाते. सवाष्णीबरोबर एक कुमारिका सन्मानित करण्याची परंपरा अनेक व्रतांतून असते.
 कुंभ : पृथ्वीचे प्रतीक -
 भूमीच्या सुफलन शक्तीच्या वृद्धीसाठी केल्या जाणाऱ्या व्रतांत, दैवतांच्या पूजेत कुंभाला विशेष स्थान असते. भारतीय संस्कारात कुंभाचे स्थान महत्त्वाचे आहे. जन्म, विवाह, मृत्यू यांचेशी जोडलेल्या संस्कारात कुंभ महत्त्वाचा असतो. कुंभ ही संज्ञा पृथ्वीशी संबंधित आहे. कुं म्हणजे पृथ्वी. पृथ्वी द्रव्याने युक्त तो कुंभ. इळा आवसेला खास करून केली जाणारी आंबील विधिपूर्वक रंगवलेल्या मडक्यातून शेतात नेतात. भारतीय परंपरेत पूर्णकुंभ वा पूर्णघट या प्रतीकाला सर्जकता, समृद्धी आणि शुभता यांचा कारक असल्याची प्रतिष्ठा लाभली आहे. कुंभ हा मातृरूप.... भूमीरूप मानला जातो.
 जिवती : सर्जनशक्ती : जगन्माता-
 जगाची निर्मिती करणारी शक्ती. साक्षात सर्जनशक्ती ती जगन्माता. श्रावणात दर शुक्रवारी जिवंतिकेची पूजा केली जाते. जिवती हे भूमीचे सर्जक रूप आहे. अन्नधान्य, पशुसमृद्धी देणारी देवता गौरी आणि लक्ष्मी. दोघी एकरूपच आहेत. त्या अन्नसमृद्धी निर्माण करतात. त्या भूमातेचे रूप आहेत. विश्वाचा संहार करणारी ती रोग देवता. काली वा चंडिका. अर्थात् ही विश्वाचा संहार करणाऱ्या दृढ शक्तींचाही संहार करते. काली ही तिचे उन्नयन झालेले रूप आहे. मुळात महामाता निर्ऋती ही सर्जन आणि मरण दोहोंची देवता आहे. वैदिकांची धारणा होती की, या दोनहीं अदभुत घटनांचा तिच्या उदराशी संबंध आहे. त्यावर तिची अधिसत्ता आहे.
  'इयं पृथ्वी वै निर्ऋतीः'
 'पुनरषि जननं पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्।' ही सृष्टी मातृरूप आणि मृत्युरूप पृथ्वीच्या गर्भाशयात येरझारा घालीत राहते. तिचे सर्जक रूप गौरीच्या रूपात पूजिले जाते, तर संहारकरूप कालीच्या रूपात पूजिले जाते. या विविध रूपातील मातृपूजा जगाच्या पाठीवर प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे.
 भारतातील देवी उपासनेचे आद्य केंद्र सिंधू संस्कृती -
 भारतातील देवी उपासनेचे आद्य केन्द्र सिंधू संस्कृती हे होते. हा समाज देवी उपासक होता. तो लिंगयोनी रूपाने देवतांची पूजा करी. तेथील उत्खननात सापडलेली एक महत्त्वाची मुद्रा अशी, खाली डोके, वर फाकलेले पाय, अशा स्त्रीच्या योनीतून एक वनस्पती उगवली आहे. विश्वातील जिवांचे भरणपोषण करणारी वनस्पतीसृष्टी भूमातेच्या....जगन्मातेच्या देहातूनच संभवते हे या प्रतिमेतून सूचित होते. मार्कंडेय पुराणातील देवीमाहात्म्यात देवी पुढील उद्गार काढते- 'हे देव हो जीवनावश्यक अशा वनस्पतीसृष्टीच्या साहाय्याने मी सर्व विश्वाचे धारण-पोषण करीन, पर्जन्यकालात ही वनस्पतीसृष्टी माझ्या देहातून उत्पन्न होईल 'आत्मदेह समुद्भव' त्यामुळे मला शाकांबरी हे नाव प्राप्त होईल या उद्गारातून भूमाता आणि जगन्माता यांच्यातील साम्य नेमकेपणाने व्यक्त होते.
 प्राचीन काळी जेव्हा भौतिक ज्ञानाचा पूर्णपणे अभाव होता तेव्हा निसर्ग आणि स्त्री यांच्या सुफलीकरण प्रक्रियेचे प्राथमिक मानवाने जे मंत्रतंत्रात्मक शास्त्र तयार केले, ते त्याच्या प्राथमिक अवस्थेतील अप्रगल्भ अशा विचार शक्तीशी सुसंगत असे आहे. स्त्री आणि भूमी यांच्या साधर्म्यातून कृषि यातुविज्ञान निर्माण झाले. या यातुविज्ञानाने मानवी संस्कृतीच्या इतिहासातील फारमोठा कालखंडव्यापून टाकला आहे. भारतातील मातृदेवतांचा, तसेच आजच्या कृषिधर्मातील विविध व्रते, सण, उत्सव आदींचा विचार करताना यातुविज्ञानाचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. कारण जगभरच्या मानवी कल्पनासृष्टीत, श्रद्धाविश्वात स्त्री आणि भूमी यांचे साम्य सुनिश्चित आहे. स्त्रीला 'क्षेत्र' ही संज्ञा दिली जाते.
  क्षेत्रभूता स्मृता नारी बीजभूतः स्मृतः पुंमान्।
 स्त्री आणि भूमी - (जागतिक अनुबंध)
 निरनिराळ्या धार्मिक विधींत, विशेषतः सुफलीकरण विधींत भूमी आणि भूमीतून उगवणाऱ्या वनस्पतीयांचा स्त्रीशी संबंध येऊ दिला जातो. विविध धान्ये तऱ्हेतऱ्हेच्या पत्री, फुले, दुर्वांकुर हरितवस्त्र हे सुफलीकरण विधीचे घटक आहेत. भूमीच्या सर्जनक्षमतेचे स्त्रीवर केलेले प्रोक्षेपणया विधीतून जाणवते. उदा. - मंगळागौरीसाठी २१ प्रकारची पाने तऱ्हेतऱ्हेची फुले लागतात, लक्ष्म्यांसाठी धान्याच्या राशी मांडतात. हादग्यात रोज धान्यानी हत्ती रेखाटला जातो. श्रावण सोमवारी शिवामूठ दरवेळी वेगळ्या धान्याची वाहतात. नवरात्र, चैत्रात भूमीत मिश्रित धान्य पेरून अंकुरांची पूजा केली जाते. यातून असे लक्षात येते की विविध विधींच्या माध्यमातून आदिमानवाने स्त्रीरूपी-भूरूपी विश्वजननीची पूजा केली. अन्नधान्याची विपुलता, भरपूर धनधान्य निर्मिती, भरपूर व सदृढ संतती, हेच सर्वधर्मातील देवी उपासनेचे प्रमुख प्रयोजन होते. जगातील सामान्यपणे सर्व समाजात भूमी देवता महामातेच्या, जगन्मातेच्या रूपात अवतरतांना दिसते. इंग्लंडमधील समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. परंतु एकेकाळी तेथेही दैवतविकल्पनात महामातेला महत्त्व होते. गॅलिक लोक, सर्व देवता 'दानु' नामक भूमातेपासून निर्माण झाल्या असे मानतात. हिचाच दुसरा अवतार म्हणजे ब्रिटिश लोकांची महान भूमाता डॉन ही होय. एस्टोनियन धर्मानुसार भूमाता ही जन्म आणि मृत्यूवर सत्ता चालविते. चीन मध्ये भूमातेचा संप्रदाय वृक्षदेवतांशी संबंधित आहे. सी वॅंगमू ही त्यांची प्राचीन काळातील भूमाता. टाओ संप्रदायातील येन हे स्त्रीतत्त्व भूमीचे रूप म्हणून होते. ग्रीस व क्रीटमध्येही भूमातेची पूजा होई. भारतातील नवरात्र पूजा ही भूमातेची पूजाच आहे.
 फिनिश दैवतकथांत अक्का (Akka) ही भूमाता मानली जाते. मेक्सिकोमध्ये सेंटिऑटल आणि पेरु मध्ये ममा, पाचा या भूदेवता मानल्या गेल्या.
 देवीच्या नवरात्र महोत्सवात करावयाच्या धान्याच्या पुर्ननिर्मितीसाठीचा हा विधी जगभर याच स्वरूपात आढळतो. मातीच्या थाळीत पेरलेल्या धान्याला फ्रेजर 'गार्डन ऑफ ॲडोनिस' असे नाव देतो. नवरात्रातील 'घटस्थापना' ही भूमी आणि स्त्री यांची जननक्षमता-सुफलन शक्ती वाढविण्यासाठी केलेला यातुविधी आहे. या बाबतची चर्चा विस्तृतपणे पुढे केली आहे.
 कृषियातुविज्ञान आणि स्त्रीमाहात्म्य -
 सुफलीकरणाशी निगडित स्त्रीदेवतांचा शोध घेताना कृषियातुविज्ञान आणि स्त्री माहात्म्य यांचा अन्योन्य संबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. कृषिजीवी अवस्थेचे दोन कालखंड कल्पावे लागतात. १. नांगराचा शोध लागण्यापूर्वीची प्राथमिक शेती, २. बैल, घोडा यांच्या साहाय्याने ओढल्या जाणाऱ्या नांगराची शेती. आज भारतात असलेल्या तोडा आणि खासी या जमातींच्या अवलोकनावरून लक्षात येते, तोडा ही जमात पशुपालनाचा व्यवसाय करणारी असून ती पुरुषप्रधान आहे तर खासी जमातीत शेती व्यवसाय प्राथमिक अवस्थेत आहे. ती जमात पूर्णपणे मातृसत्ताक आहे. बिफ्रॉ, बॅकोफेन या सारख्या संशोधकांनी असंख्य पुरावे देऊन सिद्ध केले आहे की, भटके व पशुपालन अवस्थेतील लोकांची समाज रचना पुरुषसत्ताक असते तर प्राथमिक कृषिजीवी समाजाची रचना मातृसत्ताक, स्त्रीप्रधान असते. नांगराचा शोध लागून शेती प्रगतावस्थेत गेली, त्याला पशुव्यवसायाची जोड मिळाली आणि स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था लुप्त होऊन पुन्हा पुरुषप्रधान व्यवस्था निर्माण झाली. अगदी प्राथमिक अवस्थेत पुरुषांकडे विशिष्ट काम नव्हते. पण स्त्रीकडे मात्र मुलांच्या संगोपनाची जबाबदारी नैसर्गिकपणे आली होती. या श्रमविभागपूर्व अवस्थेत, सामाजिक संघटनेत स्त्रीचे स्थान अधिक महत्त्वाचे होते. कारण रति (Sex) आणि वात्सल्य या दोन नैसर्गिक नात्यांत वात्सल्याला अधिक महत्त्व होते. जनन प्रक्रियेतील पुरुषाचे स्थान समाजाला अज्ञात होते आणि माता मात्र प्रत्यक्ष दिसे. साक्षात असे. स्त्रीच्यात भूमीप्रमाणे यात्वात्मक सामर्थ्य आहे असे आदिमानवाने कल्पिले. त्यातून स्त्रीमाहात्म्याचा काळ सुरू झाला. नांगराने शेती सुरू झाल्यावर ते लुप्त होत गेले. या संदर्भात डॉ. कोसंबी१० ऐतिहासिक सत्य मांडतात.
 'Matriarchal institutions still survive in these parts of the country that took last to the plough economy.'
 प्राथमिक अवस्थेतील कृषिव्यवसाय स्त्रीनेच, तिच्या ठिकाणी असलेल्या 'यात्वात्मक सामर्थ्याच्या साहाय्याने' विकसित केला. त्यामुळे कृषिप्रधान समाजव्यवस्थेत मातृसत्ता रूढ झाली. नांगराचा शोध लागल्यानंतरही कृषिदेवता स्त्रीरूप-भूमीस्वरूप राहिल्या. आजही ज्या ज्या ठिकाणी भूमीच्या सुफलीकरणाची व्रते आणि यातुविधी आचरले जातात. त्या ठिकाणी त्या व्रताचरणांत स्त्रीलाच प्राधान्य असते. आजही ही श्रद्धा कृषिजीवी समाजात आहे. या संदर्भात ब्रिफॉ लिहितो -
 ११'The fecundity of the earth and the fecundity of women are viewed as one and the same quality.'
 या संदर्भातील विस्तृत चर्चा 'भूमीच्या सुफलीकरणाशी निगडित विधी उत्सवातील स्त्री प्रधानता' या प्रकरणात केली आहे.
 गौरीपूजा : सर्जनाची पूजा -
 महाराष्ट्रात पूजिले जाणारे गौरी हे दैवत भूमीच्या सर्जनक्षमतेचे प्रतीक आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे तर राजस्थान, उत्तर भारत, मध्य प्रदेशातही गौरीची पूजा भाद्रपदात आणि चैत्रात होते. हे स्त्रियांनी करावयाचे व्रत आहे. भाद्रपदात येणाऱ्या गौरींना मराठवाड्यात लक्ष्म्या असे म्हणतात. गणेशचतुर्थीनंतर ४ दिवसांनी लक्ष्म्या सायंकाळी घरी येतात. अष्टमीला मिष्टान्नाचा पाहुणचार घेऊन नवमीस परततात. कनिष्ठा आणि जेष्ठा अशा दोघींची पूजा केली जाते. काही घरात उभ्या लक्ष्म्या असतात. लक्ष्म्यांचे मुखवटे त्या त्या कुळातील परंपरेनुसार असतात. लक्ष्म्या मांडणे शक्य नसेल तर धान्याच्या राशी मांडाव्याच लागतात. कोकणात याच काळात गौरी घरी येतात. कोकण, कोल्हापूर परिसरात गौरी खड्यांच्या व तेरड्याच्या झाडांच्या असतात. अष्टमीस पुरणावरणाचा नैवेद्य मराठवाड्यात असतो. कोकणात घावन घाटले असते. या पूजाविधीत फुलापानांना आणि नैवेद्यात शाकभाज्यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी उरलेले अन्न आणि खरकटे शेतात पुरले जाते. दोन लक्ष्म्यांपैकी अलक्ष्मी ज्येष्ठा असते. कनिष्ठा - लक्ष्मी असते. भारतीय संस्कृतीत अशुभाला शुभकारक बरून त्याला समाजमनात सन्मानाने सामावून घेण्याची ही प्रक्रिया सुरुवातीपासून आढळते. अशिवाचा शिव होतो. अलक्ष्मीची लक्ष्मी होते. विघ्नकर्त्यांचा विघ्नहर्ता होतो. प्रारंभी भयानक वाटणारी शक्ती अशुभाचे निवारण होऊन शुभ होते. या भूमिकेची विस्तृत चर्चा, त्या त्या व्रतांच्या निमित्ताने येईलच.
 चैत्रात वसन्तगौर घरी येते. अक्षय्यतृतीयेपर्यंत गौर माहेरी असते. चैत्रात झाडे मोहरतात. उन्हे तापू लागतात. धरती.... भूमाता याकाळात निवान्त असते. राने मोकळी असतात. सूर्याच्या ऊर्जेने जमिनीतील सुफलन शक्ती वाढत असते.
 धरणीच्या तीन रूपांची पूजा : नवरात्र -
 नवरात्रात धरणीच्या तीनही रूपांची पूजा होते. पहिल्या दिवशी घटस्थापना होते. पत्रावळीवर माती पसरुन त्यात नऊ, सात वा पाच प्रकारची धान्ये पेरुन त्यावर घट बसवतात. कुमारिकांची पूजा केली जाते. अष्टमीला सुवासिनींची पूजा करतात. नवमीला कालिमातेची पूजा होते. नऊ दिवस अखंडदीप तेवतात. दिवा हे सूर्याचे प्रतीक, घटात पंचनद्यांचे पाणी असते. घट हे पृथ्वीचे प्रतीक असते. नवरात्र व्रताची सविस्तर चर्चा पुढे केली आहे.
 कानबाई -
 हे दैवत नाशिकचा काही भाग आणि खानदेशात विशेष करून पूजिले जाते. तपती उर्फ तापी नदी ही सूर्यकन्या मानली जाते. तिचा उगम मध्य प्रदेशातील निमाड भागात झाला असून ती सातपुडा, अजिंठ्याच्या डोंगरांतून वाहत गुजरातमध्ये प्रवेशते. तिच्या परिसरात कानबाई या लोकदेवतेचे विशेष प्रचलन आहे. मराठवाड्यात कानबाई पूजिली जात नाही. हिला कानबाई रानबाई असे म्हणतात. कानबाई ही वेदोत्तरकालीन देवता असली तरी ती मूलतः पृथ्वीचे आदिमायेचे रूप आहे. कानबाई ही सूर्यपत्नी मानली जाते. वेदोत्तर काळात पृथ्वी सूर्यपत्नी म्हणून मान्यता पावली. गुजरात सौराष्ट्रात राणलदे - रन्नादेवी - रांदल या नावाने सूर्यपत्नी म्हणून ती पूजिली जाते. महाराष्ट्र भारताच्या दक्षिण उत्तरेच्या मध्यावर आहे. भारतात स्थिर झालेल्या द्रविड आणि वैदिक आर्य या दोनही टोळ्यांचे संस्कार महाराष्ट्रातील उत्तर व दक्षिणेतील सांस्कृतिक जीवनावर आढळतात. महाराष्ट्रातील उत्तर भागात म्हणजेच खानदेशाने आर्यांचे संस्कार तर दक्षिण भागाने द्रविडांचे संस्कार स्वाभाविकपणे आपलेसे करून घेतले आहेत.
 नागपंचमीनंतर येणाऱ्या रविवारी कानबाईची प्रतिष्ठा केली जाते. तिला रोटाचा नैवेद्य दाखवतात. कानबाईचे रोट असे म्हटले जाते. काही घरांतून पुरणाचे रोट करतात. सव्वाच्या मापाने रोट केले जातात. उदा. - सव्वा पावशेर, सव्वाशेर, सवामण. भारतीय विधीविधानात सव्वा या आकड्याला विशेष महत्त्व आहे. सव्वा हे सतत वाढणाऱ्या.... निरंतर वाढणाऱ्या समृद्धीचे प्रतीक आहे. हे रोट कुळातील व्यक्तींनीच खायचे असतात. कानबाईच्या जोडीने रानबाईची पूजा होते. दोघींचा जोडीने उल्लेख असतो. धुळ्याचे इतिहास संशोधक १२भा. रं. कुळकर्णी यांच्या मते या दोघी वेदात उल्लेखिलेल्या रण्णा-सण्णा देवता होत. कानबाईच्या स्थापनेसाठी १०८ वनस्पतींची पाने, पाच ते सात नद्यांचे पाणी, शिवेची वा नदीकाठची माती जिला ते कस्तुरी म्हणतात लागते. ही माती पत्रावळीवर पसरून त्यांत सात प्रकारची धान्ये पेरतात. कानबाईसमोरील नैवेद्य घरच्यांनीच खावयाचा असतो. तो संपला नाही तर त्याला बरकत असे म्हणतात. ते बरकत अन्न घरात खड्डा खणून त्यात टाकतात. स्वयंपाकात उरलेले पाणी त्या खड्ड्यात टाकतात. त्या खड्ड्याला 'संमिंदर' म्हणतात. या पद्धतीत आणि मराठवाड्यात लक्ष्म्याच्या वेळेस अन्न शेतात पुरण्याच्या पद्धतीत खूप साम्य आहे, ही बरकत समृद्धी भूमीत पुरायची म्हणजेच भूमीची सुफळ होण्याची शक्ती वाढविण्याचाच एक विधी. हे व्रत मराठवाड्यात पाळले जात नसले तरी ते भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित आहे.
 आसरा -
 मराठवाड्यातील ग्रामीण भागात आसरा हे दैवतही महत्त्वाचे मानले जाते. विहीर, डोह किंवा हिरवे विशाल वृक्ष यांच्या आश्रयाने आसरा राहतात अशी ग्रामीणांची श्रद्धा आहे. अप्सरा पासून आसरा हा शब्द तयार झाला असावा. या कुमारिका असतात. तसेच विघ्नकर्त्या असतात. त्यांना संतुष्ट ठेवले तर त्या विघ्ने हरण करतात आणि धनधान्य पशु आदींची समृद्धी देतात असा समज आहे. शंकराच्या वराने सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या व त्या सिद्धीने मातलेल्या, आंधकासुरला ठार मारण्यासाठी १९० मातृका निर्माण केल्या. पण तरीही त्याचा नाश झाला नाही. म्हणून विष्णूने शुष्क देवता नावाची मातृका निर्माण केली. तिने अंधकाच्या शरीरात घुसून त्याचे रक्त प्राशन करून त्याला ठार मारले. नंतर या मातृका दिसेल त्या माणसाचे रक्त पिऊ लागल्या. नंतर शिव आणि विष्णु यांनी दुसऱ्या अघोर मातृका पाठवून त्यांचा नाश केला. तेंव्हापासून त्या मातृका रानावनात शेता भातात राहतात अशी आख्यायिका आहे. ग्रामीण भागात भरघोस पीक यावे, विहिरीचे पाणी आटू नये, पिकावर रोगपडू नये म्हणून त्यांची पूजा करतात. अमावास्येला नारळ फोडतात.
 आसरा या पाण्याजवळ राहतात. त्यांना 'सात आसरा' वा 'सात माऊल्या' असेही म्हणतात. सर्वसाधारणपणे असा समज आहे की त्या पिशाच्च योनीतील असून ते स्त्रियांचे अतृप्त आत्मे असतात. अजूनही मराठवाड्यातील ग्रामीण भागात असा समज आहे की नदीत, विहिरीत वा डोहात आसरा राहतात. त्या ठिकाणी जीव दिलेल्या स्त्रियांचे ते पिशाच्च असते. त्यांना 'पऱ्या' असेही म्हणले जाते. या तीन नावांतून त्यांच्यातील 'यातुसामर्थ्य' व्यक्त होते. त्या त्या भागात, त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या आसरांची पूजा केली जाते. फार मोठ्या यात्रा भरविल्या जात नाहीत. अर्थात काही अपवाद असतात. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील नेरखेड खेड्याजवळच्या जीवराखी नदीत असलेल्या सकल डोहातील आसरांची यात्रा भरते. औरंगाबादजवळील कचनेर येथे विहिरीतील आसरांची यात्रा भरते. प्रत्येक नदीच्या नावाने एक देवी मानली जाते. जणू नदी हीच देवी मग ती चन्द्रभागा असो, कृष्णा असो वा गोदावरी असो. या देवींच्या नावाने यात्रा भरतात. महाराष्ट्रातील नद्यांचे धार्मिक माहात्म्य या विषयाच्या अभ्यासक १३ॲने फेल्डहाऊस, नोंदवतात, 'Rivers in India are commonly associated with certain worldly religious values - wealth, beauty, long life, good health, food, love and the birth of children. Represented by such goddesses as श्री, लक्ष्मी and जया, these values often find expression in feminine immagery. However, such 'domestic' ideals have been relatively neglected by Indologists, who have tented to view India and Hinduism through the prism of asceticism and themes of purity or pollution.'
 धुरपता -
 भूमातेच्या संहारक रूपाला आंध्रात वा महाराष्ट्राच्या काही भागांत धुरपता असे म्हणतात. ही देवी ग्रमादेवतेच्या स्वरूपात पूजली जाते. दक्षिण भारतात ज्या अष्टशक्ती मानल्या जातात त्यापैकी ही एक आहे. या देवीचे रूप विक्राळ असते. तिला मद्य मांसांचा नैवेद्य लागतो. या धुरपतेचा सबंध महाभारतातील द्रौपदीशी जोडला जातो. मराठवाड्यात इळा आवस शेतकरी समाजात विधिपूर्वक पाळली जाते. इळा आवसेच्या विधीत तुरांट्या वा धान्याच्या कडब्याची कोप करतात. त्यांत पाच दगडांना चुना लावून पांडव म्हणून स्थापन करतात. कोपीबाहेर दोन दगडमांडतात. त्यांना धुरपता उर्फ द्रौपदी आणि कुंती असे म्हणतात. पांड हे जमीन मोजण्याचे एक माप आहे. या अवसेला अंबिलीचा नैवेद्य लागतो. इळा आवसेच्या विधीचा विचार करताना त्या बाबत खोलात जाऊन विचार करता येईल. इळा म्हणजे पृथ्वी भूमाता भूमातेची सर्जन क्षमता वाढावी, तिच्या सुफल होण्याच्या प्रक्रियेस मारक असणारे घटक नष्ट व्हावेत यासाठी ही पूजा. घातक घटकांचा संहार करणारी दैवी धुरापदा. मराठी ओव्यांत धुरपदा भेटते. मराठवाडा, महाराष्ट्रात श्रद्धेने ठेवले जाणारे हे स्त्रीचे नाव आहे.
 काही देवता रानातच राहणाऱ्या -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी या हेतूने केल्या जाणाऱ्या सण व्रतवैकल्ये, उत्सव यांच्याशी संबंधित देवतांचा विचार करताना एक बाब लक्षात येते की, काही देवता गावात येत नाहीत. त्यांचे स्थान रानात, झाडाखालीच असते. त्या अनघड देवता असतात. त्यांचे मूर्तिरूप सहसा सापडत नाही. त्या दगड, वारूळ, झाड या रूपांत असतात. त्यांचे रूपवर्णन करता येत नाही. त्या स्वयंभू असतात. मानवनिर्मित नसतात. पारधी कैकाडी जमातीतील सात देवता रानात राहणाऱ्या असतात. त्या गावात येत नाहीत. लोककथांतून क्षेत्रदेवता, वनदेवता, पाण्याच्या जवळ राहणाऱ्या आसरा यांचे संदर्भ येतात. मरी आई, यल्लमा या मातृका लहान मुलांच्या संरक्षणासाठी पूजिल्या जातात. त्यांच्या नावे दगड असतात. त्यांची वस्ती वृक्षाखाली असते. तेलंगणात चिंचेच्या, तामिळनाडूत आंब्याच्या, तर महाराष्ट्रात बाभळीखाली त्यांचा निवास असतो.या देवता लावलेल्या झाडाखाली राहत नाहीत तर आपोआप उगवलेल्या झाडाखाली राहतात. या देवता संहारकर्त्या असल्या तरी त्यांचे रूप संरक्षक बनविण्याची परंपरा भारतीय दैवतशास्त्रात सुरुवातीपासून आहे. सटवाई बाळाच्या कपाळावर त्याचे भविष्य लिहिते अशी कल्पना आहे.
 सटवाई माये। बाभुळवनी नांद।
 आउखाचा नाडा बांध । बाळ माझ्या राजसाला ।।
 महाराष्ट्रात आषाढात बाभळी पूजण्याची प्रथा सर्व जातिजमातीत पाळली जाते. आषाढ तळण्याचाही रिवाज आहे.
 सर्वसाधारणपणे भूमातेचे रूप म्हणून पूजिल्या जाणाऱ्या देवतांची पूजा निमित्ताने होते. तात्पुरत्या केलेल्या मातीच्या मूर्ती वा खडे वा वनस्पती यांच्या रूपात ती होते. त्यांचे विसर्जन जलाशयात होते.
 सूर्य आणि पृथ्वी : आदिम युगल -
 ऋग्वेदात भूमीला महानग्नी म्हटले आहे. आणि पृथ्वीच्या सदैव वर असणारा देव म्हणजे सूर्य. 'अश्व' या शब्दाचा मूळ अर्थ व्यापनशील. व्यापनशील सूर्याचे प्रतीक म्हणजे अश्व. सूर्य आणि पृथ्वी हे आदिम सांकेतिक युगल आहे. अश्वमेघ यज्ञात अग्निमंथन करताना खालील आरणीत लाकडी दंडगोल ठेवून तो जोरजोरात हलवितात व अग्निरूपी शिशु निर्माण करतात. स्त्री पुरुष घर्षणातून नवनिर्मिती, शिशु वा फळ निर्मिती ही संकल्पना वैदिकांनीही महत्त्वाची मानली.१४सूर्य पृथ्वी यांचा हा उघडपणे पवित्र संबंध रोजच येत असतो. तो वर्षातून एकदा तरी अश्वमेध यज्ञाच्या रूपाने साजरा होत असावा. परंतु पुढे समाजाचे स्वरूप पालटले. राज्य आणि राजा ही शासनयंत्रणा आली आणि अश्वमेधाचे रूप पालटले.अश्वमेध यज्ञात स्त्री आणि अश्व यांच्या समागमाचे विधिनाट्य केले जाते. अश्व म्हणजे सूर्य आणि स्त्री वा राणी म्हणजे भूमी. सूर्य आणि भूमी संबंध आल्याने जमीन उत्तम रीतीने खणली जाते व सुपे भरभरुन फळे देते. मुळात जमिनीची पीक उत्पन्न करण्याची शक्ती वाढून तिला सफळ करण्यासाठी व गाईना भरपूर वेत येण्यासाठी हा सांकेतिक विधी असावा. विवाहापूर्वी वधूचे शुद्धीकरण करताना, महानग्नीचे जघन जसे शुद्ध केले तसे हिचेही करा असे अथर्ववेदात म्हटले आहे. महानग्नी ही खोदल्या जाणाऱ्या जमिनीची आणि सफळ होऊ घातलेल्या स्त्रीजातीचे प्रतीक आहे.
 सर्जनप्रक्रियेत बीजाचे महत्त्व -
 सर्जन प्रक्रियेत बीज आणि पाण्याची भूमिका अत्यन्त महत्त्वाची असते याची जाणीव झाल्यावर स्त्रीदेवतांच्या जोडीला पुरुषदेवतांची पूजा होऊ लागली. मात्र सर्जनातील पुरुषाची भूमिका तटस्थ असते याचे भान आदिम कृषिजीवी समाजाला असल्याने पुरुषदेवता क्षेत्रपालाच्या रूपात पुढे आल्या. योनिपूजेप्रमाणेच लिंगपूजा होऊ लागली. मोहंजोदारो, हरप्पाच्या उत्खननात लिंगाच्या आकाराचे अनेक दगड सापडले आहेत. सैधव संस्कृतीतील मातृसत्ताक समाज लिंगपूजक होता. वैदिक आर्य लिंगपूजेस हीन मानीत ते आपल्या शत्रूना 'शिश्नदेवाः'१५ या अत्यन्त हीनत्वदर्शक नावाने संबोधत. लिंगपूजेच्या अनुशंगाने वृषभ आणि बोकड वीर्यसिंचनाने श्रेष्ठ प्रतीक म्हणून पूजिले जात. आजही शेतीतील धान्य घरी नेण्यापूर्वी शेतात ढवारा केला जातो. मराठवाड्यात ही प्रथा श्रद्धेने पाळली जाते. त्यावेळी म्हसोबा या क्षेत्रपाळाला बोकडाचा बळी चढवितात. त्याचे रक्त सर्वत्र शिंपडतात. पोळ्याला बैलाचा सन्मान करतात. त्याला न्हाऊमाखू घालताना त्याचे मूत्र, शेण, शेतात पडावे ही भावना शेतकऱ्याची असते. कृषिव्यवसायाशी निगडित लोकदैवते, म्हसोबा, भुलोबा, भांगलोबा, शिराळशेठ, नागोबा आदी क्षेत्रपाळाच्या रूपात आणि दगडाच्या वा मातीच्या मूर्तीच्या रूपांत पूजिली जातात.
 लिंगयोनिपूजा,नदीला महामाता मानून दिलेले पूज्यत्व, बैलांबद्दलचा आदर, वृक्षांचे पावित्र्य या बाबी सिंधू संस्कृतीत प्रामुख्याने आढळून येतात. वैदिकांनी या सर्वांचा स्वीकार केला. याचे प्रत्यन्तर ऋचांतून डोकावताना दिसते. असे मत म.म.पां.वा. काणे यांनी मांडले आहे. सुफलीकरणाशी संबंधित पुरुषदैवतांचे शोधन करताना हे मत लक्षात घेणे आवश्यक ठरते.
 भुलोबा : भांगलोबा : शिराळशेठ -
 नाग हा क्षेत्रपाळ मानला जातो. नागपंचमीस केली जाणारी नागपूजा सुफलीकरण विधीचाच एक भाग आहे. नागपंचमीची कथा शेतीशी निगडित आहे. नागपंचमी हा स्त्रियांचा सण आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यात चौरस्त्यावर भुलोबा मांडला जातो. पुणे भागात त्याला शिराळशेट म्हणतात. चिखलाच्या चकत्या एकावर एक ठेवून लिंगाकार रूप देऊन त्याची पूजा केली जाते. त्या दिवशी अनेक ठिकाणी जत्रा भरते. तरुण सुवासिनी आणि कुमारिकांचा हा उत्सव असतो. आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन या चारही महिन्यांत जमिनीच्या सुफलीकरणाशी जोडलेली व्रते केली जातात. खरिपाची - पावसाच्या पाण्यावरची पिके आश्विनात भराला येतात आणि रब्बीच्या पेरणीचीही त्याच काळात घाई असते. सर्जन आणि वर्षनाशी संबंधित उत्सव - विशेष करून कुमारिकांचे उत्सव या काळात साजरे होतात. विदर्भ खानदेशात भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेस बाळंतपणासाठी माहेरी येते. तिच्यासोबत भुलोबाची मातीची जोडमूर्ती मांडतात. तिच्या मांडीवर गणेश बाळ असते. हा भुलोबा म्हणजे शिवाचे रूप. विदर्भात दसऱ्याच्या आदल्या दिवशी इनाई या देवतेची स्थापना होते. शेतातील चिक्कण माती आणून तिची मूर्ती करतात. तिच्याबरोबर पती शंकर आणि दीर भांगलोबा असे दोघेही असतात. तसेच चिलया बाळ बरोबर असते. तिचे वाहन हत्ती असते. दीर भांगलोबा हा फार खोड्याळ आहे. तो मिरच्यांची, दवन्याची रोपे तुडवतो. फुलवंता माळीण गौरा उर्फ इनाईकडे तक्रार करते.
 भांगुलजी देर चाले रप रप
 मोडयलं रोप दवन्याचं
 फुलवंता माळीण आली घरावरी
 किती अर्जी करी भांगुलबाची
 दसऱ्याला सोने प्रथम इनाईला देतात. नंतर सर्वांना. सायंकाळी इनाईला कोतवालाच्या डोक्यावर ठेवून मिरवत जोंधळ्याच्या शेतात खड्डा करून त्यात ठेवले जाते. बरोबर शंकर असतो. विदर्भात श्रावणात भराडीगौर मांडतात. गौर मांडल्यावर दुसऱ्या दिवशी नदीवर जाऊन वाळूचा महादेव करतात.
 'खडक फोडू, माती काढू, निघा निघा गौराई' असे पाच वेळा वाळू काढताना म्हणतात. भुलाबाई, भराडी गौर, इनाई यांचेसोबत असणारे भुलोबा हे शिवाचे रूप असते. मूळ गौरव गौराईचा असतो. सर्जनात शिवाची भूमिका तटस्थ तरीही महत्त्वाची असते.
 प्रत्येक शेताच्या बांधावर म्हसोबा असतो, अर्थात दगडाच्या स्वरूपात. नांगरणी, पेरणी आदी महत्त्वाच्या कृषिप्रक्रिया सुरू करताना, तसेच अमावास्या पौर्णिमेस म्हसोबाला नारळ फोडला जातो. ढवारा म्हसोबासमोर केला जातो. म्हसोबा हा 'कुमार' असतो. मराठीत एक म्हण आहे - 'म्हसोबाला नाही बायको आसरांना नाही घो'. 'घो' म्हणजे नवरा.
 गणपती : सुफलतेचे दैवत -
 गणपती हे शिवाप्रमाणेच सुफलन प्रक्रियेशी संबंधित दैवत आहे. गणपती भाद्रपदात येतो. आषाढाच्या सुरुवातीस वा ज्येष्ठाच्या अखेरीस पेरलेले धान्य पणात येत असते. गणपतीपाठोपाठ गौरी येतात. १६गणपती या लोकदैवताचा प्रवास पाहणे महत्त्वाचे आहे. गण+ पती या दोन शब्दांचा मिळून हा शब्द तयार होतो.गण म्हणजे लोकसमूह त्याचा पालनकर्ता वा प्रमुख म्हणजे गणपती. गणपती या देवतेला तंत्रवाङ्मयात विषेश स्थान आहे. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात बृहस्पतीला उद्देशून गणपती असे म्हटले आहे. ऐतरेय ब्राह्मणांत 'गणानाम् त्वा गणपते' हा मंत्र बृहस्पतीस उद्देशून म्हटला आहे. लोकायताचा प्रणेता बृहस्पती होता म्हणून त्यास 'बार्हस्पत्यमत' असेही म्हणत. या वरून गणपती हा शब्द लोकायताशी निगडित आहे असे अनुमान काढता येते. गणपती म्हणजे लोकांचा नायक हा अर्थ मान्य करण्यास प्रत्यवाय नसावा या डॉ. देवीप्रसादांच्या मतास डॉ. स. रा. गाडगीळ आग्रहपूर्वक अनुमोदन देतात.
 आजही कर्नाटकात गणेशचतुर्थीचे आदले दिवशी तृतीयेला घुगऱ्या करतात. त्या उंदरांसाठी शेतात जाऊन टाकतात.
 गणपती : एक प्रवास : विघ्नकर्ता ते विघ्नहर्ता -
 गणपती या दैवतास आपण विघ्नहर्ता, सुखकर्ता, सिद्धिदाता, बुद्धिदाता मानतो. प्रत्येक धर्मकार्यात त्याला प्रथम वंदन केले जाते. वगनाट्यातही पहिले नमन गणरायाला असते. गणेश हा शिवपार्वतीचा पुत्र मानला जातो. गौरी आणि शिव या अतिप्राचीन देवता असून दोहोंचे नाते सुफलीकरणाशी आहे. त्या दृष्टीने त्यांचा पुत्र मानलेल्या गणपतीचा प्रवास पाहणे महत्त्वाचे ठरते.
 इ.स. पूर्वी लिहिल्या गेलेल्या मनुस्मृती, याज्ञवल्क्यस्मृती, मानवगृह्यसूत्र या ग्रंथांचा गणपती बद्दलचा अभिप्राय वेगळा आहे. त्या काळातील गणपती एक नसून तो समूह आहे. गणपतींनी पछाडलेल्या माणसांना भयानक स्वप्ने पडतात, ती वेडी होतात, स्त्रियांना संतती होत नाही, झाल्यास मृत्युमुखी पडते असे मानले जाई.ते रूप विघ्नकर्त्यांचे होते. हे तपशील मानवगृह्य सूत्रात दिले आहेत. गणपतीचे एक नाव विनायक. याज्ञवल्क्य स्मृती म्हणते की विनायकाची योजना महारूद्राने संकटनिर्मितीसाठीच केली आहे. मनूनेही गणरायाची निंदा केली होती. स्मृतिकारांनी केलेल्या निंदेवरून देवी प्रशाद चटोपाध्याय आदी विद्वान असे अनुमान काढतात की, गणपतीचा संबंध लोकायतिकांशी असावा. कात्यायनाने असे म्हटले आहे की, गणेशयाग हा समाजातील स्त्री व पुरुषांनी एकत्र येऊन करावयाचा विधी आहे. सर्व वैदिक स्मृतिकारांची भूमिका पाहता गणपतीला विघ्नेश, विघ्नराज ही नावे मिळाली हे लक्षात येते. गणपती 'एक दंत' आहे. ब्रह्मवैवर्तक पुराणात परशुरामाने गणपतीवर परशू फेकून त्याचा दात तोडल्याचा उल्लेख केला आहे. परशुराम हा वैदिकमताचा कडवा पुरस्कर्ता होता. क्षत्रियांचा त्याने अनेकदा संहार केला होता. बौद्ध, हिंदूशिल्पातही गणेशाचे स्थान खूप खालचे होते. मात्र इसवीसनाच्या पाचव्या शतकात.... ..गुप्तकाळात त्याच्या स्थानाचे उन्नयन झाले. विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता तसेच सिद्धीविनायक झाला. तो गजमुख आणि मूषक हे वाहन असलेला झाला.
 गणसमाज : समूह जीवनाचा पाठ -
 पूर्वीचा समाज गणसत्ताक होता. प्रत्येक गणाचे एक कुललक्षण चिन्ह असे. ही कुललक्षण चिन्हे गज, नाग, वृषभ, मूषक, श्वान अशी असत. तसे पुरावे शिलालेखांतून मिळतात. स्मृतिकारांनी गणविरोधी भूमिका घेतली असली तरी वैदिक ऋषी स्वतः गणप्रधान समाजातले होते. त्यांनी गणपतीला विघ्नकर्ता वा विघ्नहर्ता मानले नाही. त्यांच्या दृष्टीने तो गणसमाजाचा नायक म्हणून वंदनीय आहे. मात्र त्यांना गजमुखी गणपती अज्ञात आहे.
 गणसमाज सामूहिक जीवन जगत असे. अन्नाचे उत्पादन, विभाजन सामूहिक रूपात केले जाई. समता आणि सामूहिक जीवन ही गणसमाजाची वैशिष्ट्ये होती. श्री. भांडारकर यांच्या मते गणकल्पना आर्यपूर्वांकडून आली आहे. हेच मत श्री. सेन, श्री. मित्र यांनी मांडले. डॉ. स. रा. गाडगीळ लिहितात की, 'ऋग्वेदाप्रमाणे अन्य ग्रंथातही गणसमाजाची स्मृती आढळते. प्राचीन वैदिक ऋषी ज्या समाजव्यवस्थेत राहत, ज्या समाजव्यवस्थेतील समता आणि सामूहिकतेमुळे त्यांच्या जीवनाला संपन्नता लाभली होती. त्या गणसमाजव्यवस्थेचा त्यांनी गौरव केला तर त्यात नवल नाही.'
 वैदिक वाङ्मयात व्रात म्हणजे गण. विशिष्ट सामाजिक संबंधांनी घटित असा समूह म्हणजे व्रात किंवा गण. गणसमाज हा अत्यंत संघटित आणि एकात्मतेने सामूहिक जीवन जगणारा होता. त्या काळात व्यक्तिगत मालकीची प्रथा नव्हती. स्मृतिकाळात या दोन शब्दांना चुकीचे अर्थ जोडले गेले. लोकपरंपरांचे पालन करणारा, उपनयन न झालेला तो व्रात असा अर्थ घेतला जाऊ लागला. आजही व्रात्य या शब्दाच्या अर्थावरून तसा संकेत मिळतो.
 गणसमाज आणि लोकसत्तेचा अंत : राजसत्तेस प्रारंभ -
 गुप्तकाळापासून लोकसत्ता हळूहळू नाहीशी होऊ लागली. परकीय आक्रमण थोपवण्यासाठी कौटिल्याने लहान लहान गणराज्यांना एकत्र आणून एक महासत्ता निर्माण केली. त्या महासत्तेचा शासक म्हणून चंद्रगुप्तास घडविले. या काळापासून गणसत्तेतील संघबळ उत्तरोत्तर लयाला गेले. गणजीवी समाज शेती आणि सैनिक या व्यवसायात गुंतला. स्वयंपूर्ण गाव हे 'एकक' झाले. कृषिनिर्भर व्यवसायात समाजाचा काही भाग गुंतला. गणाचे अधिपत्य त्या त्या कुलात, वंशातच ठेवले जाऊ लागले. नेतृत्व आनुवंशिक बनल्याने गणराज्य आणि राजेशाही यांच्यातील भेद वा वेगळेपण लोपले असावे. गणराज्यातील सद्गुणांचा ऱ्हास होऊन तेथील जीवन असुरक्षित बनले. रुढीप्रियता, दंभ, अनुवांशिकता आदींची वाढ झाली. त्यातून गणराज्यांचा ऱ्हास झाला असावा.
 एकूण समाजच या प्रक्रियेद्वारे दुबळा आणि विखुरलेला होत गेला. अशा सोशिक समाजाला देशाच्या मध्यवर्ती सत्तेवर कोण आरूढ आहे हे जाणण्याची गरज भासली नाही.
 गणसमाज मातृसत्ताक -
 गणसमाजाचा मातृसत्ताकहा विशेष होता. व्यक्तीचे अधिकार, व्यक्तीची कुटुंब व समाजविषयक कर्तव्ये, त्यावरील सामाजिक बंधने या सर्वांचे नियमन स्त्रीकडून येणाऱ्या वारसापद्धतीने केले जाई. आजही स्त्रीव्रतांचे प्राबल्य, रेणुका, जगदंबा आदी स्त्री देवतांचे माहात्म्य यातून आजच्या समाजाचा प्राचीन काळाच्या मातृसत्ताक जीवनपद्धतीशी असलेला अनुबंध लक्षात येतो. शक्तीशिवाय शिव हा शवासमान असतो असे सांख्य तत्त्वज्ञान सांगते. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीतत्त्वाचे एवढे महत्त्व कसे याचा शोध घेताना अभ्यासकांना वैदिक संस्कृतीच्या कक्षेबाहेर जाण्याची गरज भासली आणि सिंधूसंस्कृतीच्या उत्खननामुळे या प्रश्नाचा मागोवा घेणे व निर्णय घेणे सुकर झाले. सिंधू नदीच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीपर्यंत प्राचीन स्त्री देवतांचे अवशेष उत्खननातून उपलब्ध झाले आहेत.
 संघर्ष, समन्वय आणि स्वीकार यातून एकात्म संस्कृती -
 संघर्ष, समन्वय आणि स्वीकार या तीन प्रक्रिया भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत सातत्याने आहेत. ६व्या शतकानंतर गणपतीच्या स्वरूपात बदल झाला. तरीही आज म्हणताना आपण 'गौरी गणपती' हा वाक्प्रचार वापरतो. गौरी ही गणपतीची माता आहे. गणपती खरे तर दीड वा अडीच दिवसांचा असतो. गणपती बोळवतात आणि गौरी घरी आणतात. गौरी, ज्यांना मराठवाड्यात लक्ष्म्या म्हणतात त्यांचे महत्त्व अधिक असते. श्रावण, भाद्रपद, आश्विन या काळात आचरावयाच्या स्त्रीव्रतांचा सूक्ष्म अभ्यास केल्यास असे लक्षात येते की स्त्रीमाहात्म्य आणि कृषिविषयक समृद्धी यांचा अन्योन्य संबंध आहे. ऋषिपंचमी, हरितालिका, गौरी वा लक्ष्म्या, नवरात्र आदी व्रते वनस्पती समृद्धीशी जोडलेली आहेत. या व्रतांमधील शिव वा गणपती या पुरुषदेवता अध्याहृत असतात, गौण असतात. म्हसोबा, भुलोबा, साकरोबा आदी क्षेत्रपाळांची रूपे मुळात शिवाची, शंकराची आहेत. या सर्वांचा अधिपती असा महादेव आहे.
 मुंजा : शेतीचे रक्षण करणारा जागल्या -
 सुफलीकरणाशी संबंधित असे आणखीन एक महत्त्वाचे कृषिदैवत म्हणजे मुंजा. मुंजा हा क्षेत्रपाळापेक्षा विघ्नहर्त्यांची भूमिका पार पाडत असतो. त्याचा निवास वड, पिंपळ अशा झाडांवर असतो. मुंजा हा मौंज झालेल्या ब्रह्मचारी मृताचा आत्मा असतो. तो अत्यंत शक्तिशाली आणि ज्याच्यात अपरंपार यातुशक्ती आहे असा मृतात्मा असतो. अशी लोकसामान्यांची श्रद्धा असते. शेताचे, पिकाचे, शेतातील जनावरांचे तो रोगराई आणि दुष्ट शक्तींपासून रक्षण करतो असा समज रुढ आहे. यालाच वीरोबा असेही म्हणतात. गावाच्या शिवेवर या वीरोबाचे ठाणे असते. ग्रामदैवतांच्या आणि वीरोबाच्या रूपात एकप्रकारे ही यक्षपूजाच प्रचलित आहे असे लोकसाहित्याच्या अभ्यासकांना वाटते. द. ग. गोडसे यांच्या मते यक्षपूजा ही आर्यपूर्व असून तेथील समाजजीवनात ओतप्रोत रुजली आहे. ही उपासना शैव उपासनेच्या पूर्वीपासून रुढ असावी. कालौघात नंतर त्यावर शैवउपासनेचे संस्कार झाले. या संदर्भात द. ग. गोडसे लिहितात 'कोणत्याही संकटापासून गावाचे रक्षण करणाऱ्या ग्रामस्थांचे प्राकृतिक स्वास्थ्य सांभाळणाऱ्या गावातील नैतिक आणि नैष्ठिक व्यवहारांचे नियंत्रण करणाऱ्या गावकीचे एकमेव श्रद्धास्थान व निष्ठास्थान असलेल्या स्थळीय जनपद देवतांची उपासना सर्वस्वी ऐहिक स्वरूपाची आहे. ही पूजा वैदिकांना प्रारंभी अप्रिय वाटली तरी त्यांनी त्याचा कालौघात स्वीकार केला.' या प्रकारच्या दैवतांची उत्पत्ती कशी झाली या विषयी विवेचन करताना ते लिहितात, 'निसर्गातील प्रबळ, सुष्ट, दुष्ट शक्तींची प्रचीती व या शक्तींच्या सावटाने झाकोळलेल्या जीवनाची अनिश्चितता यांच्या द्वंद्वातून यक्षदेवदेवतांची कल्पना निर्माण झाली.' वीरमरण प्राप्त झालेले, मौंजीबंधन झालेले परंतु बालवयात मृत झालेले ब्रह्मचारी हे मृत्यूनंतर यक्षरूप होतात असा समज सर्वत्र रुढ आहे. या ठिकाणी एक स्मरण होते -
 १९८७ च्या मे महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या निमित्ताने जर्मनीस भेट देण्याचा योग आला. परिषद फ्रैंकफुर्टपासून २५/३० किलोमीटर्स दूर असलेल्या मौलोफ नावाच्या खेड्यातील वृद्धाश्रम केंद्रात होती. गावात घरे ४२ आणि गावात राहणारी माणसे जोमतेम वीस पंचवीस. प्रत्येक घरासमोरच्या अंगणात चिमुकली बाग, एखादा छोटासा किल्ला असायचा आणि त्यात दाढीवाल्या, बुटक्या, डोक्याला विदूषकी लांबटोपी घातलेल्या हसऱ्या वयस्क यक्षाचा चिमुकला रंगीत पुतळा उभा असायचा. मी उत्सुकतेने चौकशी केली असता कळले की त्या देशातही ते पुतळे रक्षणकर्ते, मदतकर्ते आणि दुष्टांना त्रास देणारे असे असतात अशी श्रद्धा आहे. यक्ष ही संकल्पना जगभर रुढ असावी का? नव्हे आहेच.
 आपल्या घरात पिंपळ असू नये अशी समजूत आहे. कारण मुंजा पिंपळावर असतो. महाराष्ट्रात डहाकाची गाणी गायिली जातात, त्यात मुंजोबाचे गाणे असते. त्यात लहान बाळाच्या अंताची कहाणी आहे.
 आदिवासींच्या पाड्यावरील एखादी प्रतिष्ठित व्यक्ती मरण पावली तर त्याच्या नावाने एखाद्या दगडाला वा खांबाला शेंदूर लावून ठेवतात. त्याला वीर म्हणतात. काही आदिवासी जमातीत खंबदेव असतात ते याच प्रकारचे असतात.
 सुफलनशक्तीशी जोडलेली दैवते ही ग्रामदैवते -
 जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी केल्या जाणाऱ्या विधी, सण, उत्सव यांच्याशी संबंधित दैवते ही ग्रामदैवते आहेत. या दैवतांशी संबंधित मूळ स्वरूपातील गाणी पूर्वी सामाजिकदृष्ट्या तळागाळातील स्तरावरचे मानल्या जाणाऱ्या समाजात अत्यंत श्रद्धेने गायिली जातात. धनगर, कुंभार, वसुदेव, महार, मांग आदी समाजात आजही ही गाणी प्रचलित आहेत. महाराष्ट्रातील गोंधळी, पांगुळ, वासुदेव, डहाक, पोतराज, धनगर, नागमंत्री, सहदेवभाडळी, आदींची गाणी पाहिल्यास असे लक्षात येते की ही गाणी वृक्ष, जमीन, पाऊस, वारे आदी निसर्ग आणि या निसर्गाचे मानवी जीवनाशी असलेले नाते यावर आधारलेली असतात. आजही कोकणात फळे देणाऱ्या झाडांचा स्त्रीलिंगी उल्लेख होतो. उदा. - फणशिणीला फळे आली किंवा पेरवीण म्हणजे फळे येणारे पेरुचे झाड.याला अपवाद आंबा. नांदेड जिल्ह्यात आंबा आणि जांभूळ यांचा विवाह साजरा करण्याची प्रथा होती. (डॉ. प्रभाकर देव - कंधारचा इतिहास). या लोकदैवतांचे कालौघात उन्नयन झाले तर काहींचे रूपांतर झाले. वैदिकांनी या दैवतांचा स्वीकार करताना त्यांना नवे अनुबंध दिले. आज उच्चभ्रू मध्यमवर्गीय समाजात महाराष्ट्रातील बहुजन समाजात, ज्यात मराठा, माळी, कुणबी, वंजारी, वाणी, ब्राह्मण आदी अनेकविध पुढारलेल्या जातिजमाती येतात. त्यांच्यात गौरीगणपती, लक्ष्म्या, नवरात्र, शाकंभरी, चंपाषष्ठी, ऋषिपंचमी, नागपंचमी, कानबाई आदी अनेक व्रते व सण साजरे केले जातात. परंतु मूलतः हे सण, व्रते, उत्सव आणि तत्संबंधी दैवते कृषिपरंपरेशी, कृषिसमृद्धीशी जोडलेली आहेत.