भूमी आणि स्त्री/लोकपरंपरा आणि सुफलीकरण विधी
वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृती, संघर्ष-समन्वय यातून नवस्वीकृती प्रक्रिया, अन्नप्राप्ती : आदिम समाजाची मूलभूत समस्या : त्यातून सर्जन शक्तीची आराधाना, भारतीय लोकपरंपरांतील प्राणभूत एकात्मता, चैत्रगौर : प्रकाशवृक्ष सूर्याशी असलेल्या धरतीच्या नात्याचा सत्कार, भाद्रपद आश्विन : सर्जन वर्षन शक्तीची आराधना , अन्ननिर्मिती : आदिजीवनाची प्रेरणा, व्रतांमधील यात्वात्मक सामर्थ्य : त्यांतील स्त्रीप्रधानता , आदिवासींच्या देवता: धरती आणि कणसरी, गोपालकवैदिकांनी कृषिजीवनाचा स्वीकार केला,भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे, संघर्ष स्वीकार आणि समन्वय, दैवी दाम्पत्ये : वैशिष्ट्ये, प्राचीन देवतांचे उन्नयन, भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास, भारताची भौगोलिक रचना एकात्मतेसाठी अनुकूल, ऋतुचक्र आणि भारतीय सण, उत्सव, आदिपर्वातील यातुश्रद्धा आणि समूहश्रद्धा, लोकपरंपरा आणि समूहमन, लोकपरंपरा आणि लोकसाहित्याचा अभ्यासः प्रेरणा, कृषिलक्ष्मीशी जोडलेले रीतिरिवाज आजही हरवलेले नाहीत, अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न, या शोधामागील भूमिका.
"केलो के पेडमें जैसे एक के एक उपर एक चढे हुए परतों के भीतर उसका गाभा रहता है, जिसमें अनेक धर्मो के खोल एक दुसरे के उपर चढते चले गये है। वे एक दुसरे के साथ अत्यन्त शीतलभाव से इस प्रकार मिल बैठे है, जैसे गंगाकी धारा में पडे हुऐ गंगलोढे आपस में टकराकर गोलमटोल बनते हुए एक साथ पडे रहते है और रात दिन अधिकाधिक अभेद की स्थिती प्राप्त करते हुए अंत गंगा की बालुका बन जाते है जिससे इिस भूमी के मिट्टी का निर्माण हो रहा है।'
(वासुदेव शरण अग्रवाल)१
वैविध्यपूर्ण भारतीय संस्कृती -
भारतीय संस्कृती म्हणजे आर्यांची वा द्रविडांची संस्कृती असे आज कोणीही मानत नाही. भारतीय लोकसंस्कृतीत इतके वैविध्य आहे, इतके वैचित्र्य आहे, इतक्या जटिल गुंतागुंती आहेत की त्यांचे चिकित्सक विश्लेषण करून त्याचा मूळ गाभा शोधणे कठीण व्हावे.
आज जे विधी अर्थहीन वाटतात, ज्या गाण्यातील शब्द परस्परांशी असंबद्ध वाटतात त्यात एकेकाळी जीवनाचे चैतन्य एकवटलेले होते. परंतु कालौघात विधींमागील मूळ संदर्भ तुटून जातात. कालानुरूप नवे संदर्भ चिकटवले जातात आणि त्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र बनत जाते. त्यामुळेच भारतीय समाजातील विधींच्या आणि आचार विचारांच्या अभ्यासात खूप अडचणी निर्माण होतात.
द्रविड, आर्य, दास, दस्यु, असुर पणिन् अशा अनेकविध टोळ्यांच्या संघर्ष - समन्वयातून..... त्या नंतरच्या समरसतेतून आगळ्यावेगळ्या पोताची भारतीय संस्कृती निर्माण झाली आहे.
संघर्ष-समन्वय यातून नवस्वीकृती प्रक्रिया -
अँग्लोसॅक्सन वा इंडोयुरोपीय भूमिका घेणाऱ्या विचारवंतानी सुरुवाती पासून अशी मांडणी केली की द्रविड हे भारतातील एतद्देशीय तर आर्य बाहेरुन आलेले. मोहंजोदारो, हरप्पा उत्खननानंतर भारतीय लोकसंस्कृतीतील अनेक हरवलेले दुवे हाती आले. आज इंडो युरोपियन भूमिकेचा स्वीकार गृहीततत्त्व म्हणून स्वीकारण्याची गरज नाही. वर उल्लेखिलेल्या सर्व समाजांत संघर्ष झाला. संघर्षासोबत परस्परांच्या जीवन विशेषांचा त्यांनी स्वीकारही केला. रोटीबेटी व्यवहारातून सहजीवन व समन्वय घडत गेला. ही प्रक्रिया गेल्या हजारो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. 'वैदिक' आणि 'लोक' या दोन्हीही परंपरांचे प्रवाह या लोकसंस्कृतीत मिसळलेले आहेत. नंतर आलेल्या प्रवाहांनी आधीच्या परंपरांना नष्ट न करता मिळते घेतले. तर आधीच्या प्रवाहांनी नंतरच्या प्रवाहांचा स्वीकार केला. संघर्ष आणि समन्वय यातून त्यांनी एकमेकांच्या परंपरा, जीवन श्रद्धा, देवता आदींचा स्वीकार केला. या प्रक्रियांच्या संदर्भात इरावती कर्वे लिहितात-२ "ही ऐतिहासिक घटना म्हणजे सतत स्वीकाराची प्रक्रिया आहे. कोणत्याच वेळी दोन पर्यायी गोष्टिंमध्ये एकीचा स्वीकार व दुसरीचा कायमचा त्याग असा प्रकार दिसून येत नाही." या प्रक्रियेला त्यांनी 'नवस्वीकृती' (Aglomeration) असे म्हटले आहे.
नवस्वीकृतीची ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीची अभिजातता अधिकाधिक समृद्ध झाली आहे. आज जग २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे असताना या सांस्कृतिक एकात्मतेचा प्रत्यय कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून ते द्वारकेपर्यंतच्या लोकपरंपरांतून सातत्याने येत असतो.या विविधरंगी विशाल देशात वीसहून अधिक प्रमुख भाषा आणि शेकडो बोली बोलल्या जातात. त्या सलोख्याने नांदतात. ही सांस्कृतिक अंगाची एकता भाषांमधूनही जाणवते. भाषाकुळाची प्रस्थापित कुंपणे ओलांडून भाषा एकमेकींच्या शब्दवैभवात सहजपणे स्थिरावल्या आहेत केवळ भाषा नव्हे तर मिथक कथा, सण, व्रते, विधी, उत्सव, तत्संबंधी गाणी आदी लोकपरंपराही.
अन्नप्राप्ती : आदिम समाजाची मूलभूत समस्या : त्यातून सर्जन शक्तीची आराधाना-
जगातील सर्व आदिम, अर्धसंस्कृत व सुसंस्कृत धर्मांमध्ये प्रजा, पशू, धान्य यांच्या समृद्धीसाठी सुफलीकरण विधी करणे आवश्यक मानले जात असे. अन्नप्राप्ती ही आदिम समाजाची अत्यंत मूलभूत समस्या होती. विश्वात मृत्यूचे म्हणजे भुकेचे साम्राज्य होते. अन्नप्राप्तीसाठी आदिम समाजाने सामूहिक प्रार्थना केल्या, उपासना केली. अन्न ही समस्या केवळ मानवाचीच नव्हे तर मानवाने स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानलेल्या देवांसमोरही होती. ही समस्या देवांनी छंद, वाणी, समूहगान याद्वारे दूर केली व मृत्यूचे भय नाहीसे केले.छंदवाणी, सामगानात यात्वात्मक सामर्थ्य असते व त्यातून विपुल प्रमाणात अन्नप्राप्ती होते अशी श्रद्धा मानवात निर्माण झाली. सर्जनाच्या, अन्ननिर्मितीच्या समस्येतून त्यांच्या दैवत कल्पना, श्रद्धा साकारत गेल्या. आदिम संस्कृतीच्या अध्ययनातून सिद्ध झाले आहे की, त्या काळात योनी, लिंग, स्तन हे मानवी अवयव सुफलताविधीची प्रतीके मानली जात. आजच्या अर्थाने धर्म ही संकल्पना मानवी मनात रूजली नव्हती. साकारलेली नव्हती. त्याकाळात लोक समूहांच्या मनांत सर्जनाशी जोडलेल्या या मानवी अवयवांबद्दल भीतीयुक्त श्रद्धा होत्या. मानव जन्मास पुरुषही कारण असतो या बाबत आदिम लोक समूहांच्या मनात जोपर्यंत सांशकता होती, अज्ञान होते, तोपर्यंत विश्वांच्या आणि जगातील जीवन उपयोगी पदार्थांच्या उत्पतीचे कारण मातृत्वात पाहिले गेले. मातृत्वातील सर्जनशक्तीचे उन्नयन होऊन 'आदिमातेची' संकल्पना निर्माण झाली. मातृसत्ताक जीवनव्यवस्थेचे केंद्र सर्जन करणारे 'मातृत्व' हे होते. आदिम मानवाची मातृत्वावर अपार श्रद्धा होती. ज्यावेळेस समाजाची बांधणी झाली, समाजाचे नियमन सुरू झाले त्यावेळी सर्जन करणारी स्त्री ही समाजाचा प्रमुख घटक बनली. तिची सत्ता समाजाने स्वीकारली. त्यातून मातृसत्ताक जीवनव्यवस्था निर्माण झाली. संपूर्ण जगात प्रारंभीच्या काळात ईश्वाराचे पूजन आदिमातेच्या रूपात केलेले आढळते. इजिप्तमधील इसिस, ग्रीकमधील डिमिटर, रोममधील व्हिनस या स्त्रीदेवतांची पूजा त्या त्या देशात ख्रिस्तपूर्व काळांत प्रचलित होती. या देवता समृद्धीचे प्रतीक होत्या. त्यांच्या पूजेशी संबंधित असलेले विधी प्रामुख्याने धान्य, पशु, प्रजा यांच्या विपुलतेसाठी असत.
भारतीय लोक परंपरांतील प्राणभूत एकात्मता -
भारतीय संस्कृती जगातील अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक. येथेही मातृसत्ताक जीवनव्यवस्था आणि योनिपूजेचे प्रचलन होते. सर्जनाच्या प्रक्रियेत 'स्त्री तत्त्व' प्रत्यक्षपणे क्रियाशील असले तरी अप्रत्यक्षरीत्या 'पुरुष तत्त्व' बीज व सलिल रूपाने सर्जनात सहभागी असते,याची जाणीव झाल्यावर पुरुष तत्त्वांचे पूजन लिंग स्वरूपात होऊ लागले. दैवी दाम्पत्यांची निर्मिती झाली, उदा. - गौरी आणि शंकर. लक्ष्मी आणि विष्णु, इजिप्तमधील 'इसिस आणि होरस' इत्यादी. अतिविशाल आणि प्राचीन अशा या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारतीय लोकजीवन विविध उत्सव, सण, व्रते, यात्रा, विधी, तत्संबंधी गाणी यांनी समृद्ध झालेले आहे. हजारो वर्षांपूर्वीपासूनच्या सांस्कृतिक हालचाली व प्रवासाच्या नोंदी आणि खुणा त्यातून प्रतिबिंबित होतात. प्रत्येक प्रान्तातील भाषा, वेषभूषा, रीतीरिवाज जरी भिन्न असले तरी त्यात प्राणभूत एकात्मता आहे.
चैत्रगौर : प्रकाशवृक्ष सूर्याशी असलेल्या धरतीच्या नात्याचा सत्कार -
लोकपरंपरांशी जोडलेले उत्सव, सण, व्रते, विधी, तत्संबंधी गाणी, लोककथा, लोकनाट्य आदीतून परस्परांतील साधर्म्य सतत जाणवते. उदा. - रबीची पिके माघ, फाल्गुनात हाती येऊ लागतात. सर्जनाच्या वेदनांनी श्रमलेली धरती विसाव्यासाठी माहेरी येते ती चैत्रात, चैत्र गौरीचे पूजन थोड्या फार फरकाने सर्वत्र साजरे होतो. महाराष्ट्रात चैत्रगौर वद्य तृतीयेला विराजते ती अक्षय्य तृतीयेपर्यंत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशांत गणगौर अत्यन्त थाटात पूजिली जाते. मातीच्या सुगड्याला रंगवून त्यात माती घालतात. विहिरीचे पाणी समूहाने गाणी म्हणत आणतात आणि त्या सुगड्यात बीज पेरून त्यात ते पाणी विधिपूर्वक शिंपडतात. या कुंड्यांची रोज पूजा केली जाते. समूहाने गाणी गातात. यात विशेषत्वाने सहभाग कुमारिकांचा, नवविवाहित तरुणींचा असतो. उगवत्या धान्याची ही पूजा मातीची सुफलनशक्ती वाढावी यासाठीच असली पाहिजे. ही पूजा महिला एकत्र येऊन करतात. महाराष्ट्रात गौर पाळण्यात बसते. सुगड वा पसरट वेळणीत माती पसरून त्यात बीज पेरतात. अक्षय्यतृतीयेला अंकुरलेल्या धान्याची पाण्यात विधिपूर्वक बोळवण करतात. या काळात स्त्रिया हळदीकुंकवाचा समारंभ करून कैरीचे पन्हे, हरभऱ्याची ओली डाळ प्रसाद म्हणून देतात. चैत्रात उन्हे प्रखर होऊ लागतात. नंतर येणाऱ्या ग्रीष्म वैशाखाच्या कहारात धरती भाजून निघते. पिकांना त्रासदायक असणारे जीवजंतू नष्ट होतात. जमीन भाजल्यामुळे तिची पाणी साठवण्याची क्षमता वाढते. सूर्याला वैश्विक अश्व मानले जाते. सूर्य हा प्रकाशवृक्ष आहे. संसारवृक्षाची निर्मिती त्याच्यामुळेच होते. सूर्यकिरणांतून जणु चैतन्याचे बीज भूमीत पेरले जाते.३ विश्वातील सर्व रस सूर्य शोषून घेतो. हे रस सूर्यस्थ झाल्यावर तेथील उष्णतेने त्यांचा मधु-पाक होतो. तो वृष्टीच्या रूपाने पृथ्वीवर येतो आणि सर्व धान्य पोसतो,जीवसृष्टीला जीवन देतो. गौरीच्या प्रतीकाद्वारे जणु भूमी, जलतत्त्व आणि सूर्यरूपी बीज तत्त्व या तिहींचा पूजा केली जाते.
भाद्रपद आश्विन : सर्जनवर्षन शक्तीची आराधना -
भाद्रपद आश्विनात खरिपाची पिके.... पावसावर पोसली जाणारी पिके तरारून वर आलेली असतात. तर रबीच्या पिकांच्या पेरणीची तयारी सुरू असते. आश्विनात खरिपाचे पीक दुधात येते आणि याच काळात हादगा भुलाबाई, सांझी, नवरात्र, बदकम्मा आदी कुमारिकांचे उत्सव भारतभर साजरे होतात. हे उत्सवही सर्जनशक्तीची आराधना करण्याच्या भूमिकेतून साजरे होत असावेत. जमिनीची उर्वराशक्ती वाढून धान्यलक्ष्मीची वृद्धी व्हावी यासाठी हे उत्सव साजरे केले जातात.
अन्ननिर्मिती आदिजीवनाची प्रेरणा -
भारतातील मूळ आदिकालीन संस्कृती शिकार आणि शेतीशी निगडित होती. प्राथमिक अवस्थेतील कृषिजीवी समाजाला भूमी आणि यांच्यातील निर्मिती करणाऱ्या सर्जनशक्तीविषयी, या सामर्थ्याविषयी अपार आकर्षण होते. स्त्री हे विश्वनिर्मितीचे, सृजनाचे केंद्र आहे. उगम स्थान आहे. तिच्यात अलौकिक आणि विलक्षण यातुशक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा होती.या विश्वात प्रथम मृत्यूचे साम्राज्य होते. म्हणजे भुकेचे साम्राज्य होते. देवांनाही भुकेचे भय असे. अन्न निर्मिती ही महत्त्वाची प्रेरणा आणि समस्या होती. देवांनी त्रयीविद्येच्या छंद, लय व तालबद्ध साममंत्रांच्या आश्रयाने अन्न प्राप्त करून घेतले. ऐतरेय ब्राह्मणात याची विस्तृत माहिती मिळते. भूक म्हणजेच मृत्यू.
"न एव इह किचिनाग्र आसीत् मृत्यूना एव इदं
आवृतं आसीत् । अशनायया अशनाया हि मृत्युः"
व्रतांमधील यात्वात्मक सामर्थ्य : त्यांतील स्त्रीप्रधानता -
येथील लोकसंस्कृतीचे वैशिष्ट्य हे आहे की, ईहलोकपर कामनांच्या पूर्तीसाठी व्रताचरण करणे. चैत्र, श्रावण, भाद्रपद, आश्विन, पौष आदी महिन्यांतील व्रतांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास असे लक्षात येते की वरील विधान यथार्थ आहे. रवीन्द्रनाथांचे बंधू अवनीन्द्रनाथ ठाकूर४ यांनी बंगालमधील व्रतांचे सूक्ष्म निरीक्षण करून अभ्यास केला होता. व्रतांचे वैशिष्ट्य ते पुढील शब्दांत सांगतात.
A Vrata is a just desire. We see it represented in the pictures, listen to its echo in the songs and rhymes, witness it's reactions in the dramas and dances, in short, the Vratas are but desires as sung, the painted desires, desires as among and living.
यात्वात्मक सामर्थ्याने कामनापूर्ती करण्याचे माध्यम म्हणजे व्रत. त्यातील प्रार्थनांत ईश्वरीकृपेचा संबंध नसतो. व्रताचरण हे सामूहिक कर्म असते. प्रार्थनेचे सामर्थ्य ईश्वर कल्पनेवर अधिष्ठित असते तर व्रतांचे सामर्थ्य हे यात्वात्मक असते. या संदर्भात ५अवनीन्द्रनाथ नोंदवितात -
The desires of male and desires of female - the vedic Rituals of male and Vratas of the women - that is all the difference of the two.
वैदिक आर्यांचे सामगानयुक्त विधी पुरुषप्रधान आहेत. तर बहुतेक व्रते स्त्रियांनी आचारावयाची असतात. व्रते वेदकालाइतकी प्राचीन असली तरी त्यांचा उगम वैदिक वाङ्मयात आढळत नाही. वैदिक संस्कृतीहून भिन्न अशा लोकसंस्कृतीचे अंतरंग व्रताचरणात प्रतिबिंबित झालेले दिसते.
भारतातील आदिकालीन संस्कृती शिकारीशी आणि शेतीशी निगडित असल्याने प्राथमिक अवस्थेतील कृषिजीवी समाजात भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जन करण्याच्या सामर्थ्याविषयी विलक्षण आकर्षण होते आणि या गूढाबद्दल सुप्त भयही होते. स्त्री हे विश्वनिर्मितीचे केन्द्र असून सर्जन करण्याची अलौकिक यातुशक्ती तिच्यातच असते अशी त्यांची धारणा होती. भूमीतून निर्माण होणाऱ्या धान्य व वनस्पतींच्या सर्जनाची प्रक्रिया मंत्रतंत्राच्या आणि सामूहिक विधीच्या सामर्थ्यावर अवलंबून असते असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यातूनच भूमीच्या सुफलीकरणाचे विविध तांत्रिक विधी निर्माण झाले.
शहरी आणि यांत्रिक जीवनापासून दूर असलेल्या आदिवासींच्या उत्सवांचा शोध घेतल्यास वरील विधानातील सत्यता आजमावता येईल.
आदिवासींच्या देवता : धरती आणि कणसरी -
आजही आदिवासींच्या उत्सवांचा शोध घेतला असता लक्षात येते की, ते मूलतः सुफलीकरणाशी जोडलेले असतात. कंदमुळे, धान्य देऊन आपली उपजीविका करण्यास मदत करणाऱ्या भूमीबद्दल आणि धान्याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची पवित्र भावना असते. धरित्री आणि कणसरी म्हणजे धान्य देवता यांची उपासना बहुतेक आदिवासी जमातीत करतात. नारनदेव म्हणजे पाऊस देव त्याची प्रार्थना करतात. त्यावेळी म्हटले जाणारे नृत्यमय गीत -
६
घेना गायल्यारे आप धरातरी देवा ऽऽ
घेना गायल्यारे आप धरातरे ऽऽ
घेना गायल्यारे आप कणसरी देवा ऽऽ
घेना गायल्यारे आप कणसरे ss
७
"Enacting in fantacy the fulfillment of the desired reality"
इष्ट कामनेचे कल्पना सृष्टीत साक्षातीकरण करून, फळ मिळविण्याच्या दृष्टीने वातावरण निर्मिती करणे हे यातुविधींमागील तत्त्व होते. 'सामूहिक कर्म' हे दुसरे तत्त्व. सामूहिक कर्मातून निर्माण होणारा भावनात्मक आवेग यात्वात्मक विधीच्या यशस्वितेमागे असावा. आजही आदिवासी समाजात 'सामूहिक कर्मा' चे अस्तित्त्व आहे. यातुविधींना सुफलीकरण विधींचे रूप प्राप्त झाले ते याच काळात. कुमारिका वा पुत्रवती स्त्रीकडून पेरणी करून घेणे वा झाडे लावून घेणे. पाऊस पडावा यासाठी रात्री शेतात जाऊन नग्न होऊन नृत्य करणे आदी रिवाजांतून अनेक बाबी लक्षात येतात. प्रथमावस्थेतील मानवाने स्त्री आणि भूमी यांच्यातील साधर्म्य आणि साहचर्य याबाबत केलेल्या निरीक्षणाचा अंदाज यावर्षानुवर्षे चालत आलेल्या लोकपरंपरांतून आपल्याला येतो.
गोपालक वैदिकांनी कृषिजीवनाचा स्वीकार केला -
वैदिकांनी त्यांच्या रीतिरिवाजांचे रोपण भारतात स्थिरावताना केले. मुळात ते गोपालक असले तरी त्यांनीही कृषिजीवनाचा स्वीकार केला. त्यांना कृषिविद्या अवगत होती. ऋग्वेद, अथर्ववेद, यांत कृषिविषयक उल्लेख मोठ्या प्रमाणावर आढळतात. पावसाच्या पाण्यावरची शेती आणि नद्यांना पाट, कालवे काढून केली जाणारी शेती त्यांना माहीत होती. शेती प्रामुख्याने पाण्यावर, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते याची जाण त्यांना होती. या वास्तवाचे त्यांना भान होते. ऋग्वेद, अर्थर्ववेदात कृषिविषयक उल्लेख आहेत. नांगरलेल्या जमिनीस उर्वरा म्हणत. (मराठी लोकभाषेत भाजीपाला ज्या जमिनीच्या तुकड्यात केला जोतो त्याला 'वावर' म्हणतात.) खणणे, शिंपणे या कर्मांनीयुक्त अशा सुपीक जमिनीस अप्नस्वती म्हणत. सीता, शुनासीर, क्षेत्रपती या शेतीच्या देवतांना उद्देशून ऋग्वेदात सूत्र आहे. तसेच जुगाऱ्यास सल्ला दिला आहे, की फाशांनी द्यूत खेळू नकोस शेती कर.
८ अक्षर्मा दीव्यःकृषिमित् कृशस्व । (ऋ.१०.३४.१३)
अश्वमेधाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या वेदगीतातून पुढील आकांक्षा व्यक्त केली आहे.
कृषिवृष्टिर्यजमानाय कल्पताम्। (तै.बा.३.१.२)
(अर्थ : यजमानाची शेती सुफल होवो. शेतीस आवश्यक असा पाऊस पडो)
ऋग्वेदात 'यव'याध्यान्याचा उल्लेख आहे. पुढील संहितातून मात्र व्रीही (तांदूळ), माष (उडिद), मुदग (मूग), तिल (तीळ), गोधूम (गहू), नीवर (तृणधान्ये) यांचा उल्लेख आहे. वैदिक आर्यांची शेती मुख्यत्वे पावसावर अवलंबून होती. ऋग्वेदात पावसाच्या प्रार्थना आहेत. वसिष्ठांचे पर्जन्यसूक्त -
पर्जन्याय प्रगायत दिवस्पुत्राय मिळहुषे ।
स नो यवसन्निच्छितु । (७.१०२.१)
(अर्थ : आकाशपुत्रांनो जलवर्षक पर्जन्याची प्रर्थना करा. त्याची स्तुती करा. आम्हाला विपुल धान्य देण्याची त्याला इच्छा होवो.)
भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे -
भारतातील आदिम समाजाचाही शेती हा प्रमुख उद्योग वा जीवनवृत्ती होती. मात्र जीवनाच्या प्रथमावस्थेत असलेल्या माणसाला निसर्गक्रियांमागचा कार्यकारण भाव उमजलेला नव्हता. निसर्गशक्तींच्या मुळाशी ईश्वरी प्रेरणा असल्याची कल्पना त्याच्या मनात स्फुरलेली नव्हती. मात्र पाऊस पडल्यावर मातीतून हिरवाई बहरते तसेच स्त्रीलाच मूल होते हे त्याला निरीक्षणातून उमजले होते. निश्चित रूपाने लक्षात आले होते. प्राचीन काळी सर्वच देशांतील संस्कृतीत शेतीविषयक विधिविधानात स्त्रीला विशेष महत्त्व होते. 'वेदांतील स्त्रिया' या ग्रंथात डॉ. मधुकर आष्टीकर नमूद करतात की अगस्ती ऋषी हे आळशी होते. त्यांची पत्नी लोपामुद्रा हिने पतीच्या हातात फावडे देऊन त्यांना शेतातील कामात गुंतवले. मुदगलानी ही उत्तम नांगर चालवीत असे. बैलाच्या जागी स्वतःला गुंतवून ती नांगर चालवी. ऋग्वेदातील कृषीशी निगडित देवता 'स्त्री देवता' आहेत. पूर्व वैदिक काळात भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे होते. ज्या स्त्रीत संतती निर्माण करण्याची क्षमता आधिक तिला शेतीच्या कामात विशेष महत्त्व असे. समाजातही ती महत्त्वाची मानली जाई. श्रावण शुक्रवारी पूजिली जाणारी जीवंतिका उर्फ जिवती हे त्याचेच प्रतीक. प्रख्यात मानववंशशास्त्रज्ञ फ्रेझरने अशी अनेक उदाहरणे दिली आहेत उदा. - स्त्रियांनी नग्नावस्थेत नांगरणी, पेरणी करण्याची प्रथा अनेक देशांत होती. पावसाने भूमी सुफलित होते तशी स्त्रीही सुफलित होते अशी श्रद्धा होती. वंध्या स्त्री उघड्यावर पावसात न्हायली तर तिला गर्भधारणा होते असा समज आजही रुढ आहे. प्राथमिक कृषिसमाजात भूमी सुफलित करण्याचे विधी प्रायः स्त्रीकडेच असत. आजही काही ग्रामदेवतांचे पुजारीपण स्त्रीकडे असते. पुरुषाकडे असल्यास त्याला स्त्रीवेश धारण करावा लागतो. आर्यांच्या कृषिदेवता स्त्रीरूपीच आहेत. उदा. - उर्वरा, सीता, यजा, अनघा, अरदा, भूती, समा इत्यादी. या कृषिदेवता गोभिल व पारस्कर सूत्रात सांगितल्या आहेत. वास्तविक पाहता वैदिक आर्यांची जीवन पद्धती पुरुषप्रधान होती. त्यांच्या जीवनपद्धतीत पुरुष या संकल्पनेला विशेष महत्त्व होते. वैदिकांच्या कृषिदेवता स्त्रीरूपी असल्या तरी उषस् चा अपवाद वगळता महत्त्वाच्या सर्व देवता पुरुषरूपी होत्या. मात्र कृषिदेवता स्त्रीरूपी होत्या. आजही काही शेतकरी शेताचा एक तुकडा कापणी न करता ठेवतात. त्याचा उपयोग वाटेचा वाटसरू,गुरे यांच्यासाठी केला जातो. त्या तुकड्यात कोकणात सीतादेवी किंवा शीतलादेवी म्हणतात. कापणी करताना शेवटच्या पेंढीस लक्ष्मी मानले जाते. शेतकरी समाजाची श्रद्धा आहे की शेवटच्या मुठीत धान्यलक्ष्मीचे सार असते.खळे केल्यावर खाली उरलेल्या धान्यास 'मातर' म्हणतात. ते फेकत नाहीत त्यातही लक्ष्मी असते. शेवटच्या पेंढीला सीतादेवी म्हणतात.
ऋग्वेदात भूमीरूपी देवता सीता हिची प्रार्थना केली आहे.
अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे
यथा नः सुभगाससि यथा नः सुफलाससि॥
(अर्थ : भाग्यशालिनी सीते इकडे आगमन कर. आम्ही तुला वंदन करतो. कारण तेणे करून तू आम्हाला भाग्यदायिनी होतेस.)
संघर्ष स्वीकार आणि समन्वय -
बीजाचे महत्त्व कळल्यानंतर पितृपूजेला सुरूवात झाली असावी. एका विशिष्ट काळानंतर जगभरच्या प्राचीन संस्कृतीत दैवी दाम्पत्ये निर्माण झालेली दिसतात. इजिप्तमधील इसिस आणि होरस, ग्रीसमधील ही आणि इयुस, आशिया मायनरमधील सिबिली आणि अँटिस भारतातील शिव आणि गौरी तसेच विष्णु आणि लक्ष्मी. आर्यांपूर्वीचे एतद्देशीय लिंग व योनिपूजक होते. आर्यांना लिंगपूजा मान्य नव्हती. ते त्यांची 'शिश्नपूजक' म्हणून हेटाळणी करीत. लिंग हे सर्जनाचे व सुफलीकरणाचे महत्त्वाचे प्रतीक मानले जाई. विष्णु ही देवतासुद्धा लिंगस्वरूपी असावी असे मानले जाते. विष्णु हे वृषाणिन् चे रूप असावे असे रा.द.रानडे 'वैदिक देवतांचे अभिनव दर्शन' यात मांडतात. लिंग आणि योनी संभोगाशिवाय सर्जन अशक्य आहे. हे लक्षात घेऊन वैदिकांनी शिवलिंग पूजेचा स्वीकार केला. भारताची सांस्कृतिक वाटचाल पाहता असे लक्षात येते की, संघर्ष, स्वीकार आणि समन्वय या तीन प्रक्रियांच्या अव्याहत चलनातून येथील संस्कृतीची जडणघडण झालेली आहे. काही देवातांचे रूपान्तर झाले. तर काहीचे उन्नयन झाले व त्या जनमानसात स्थिरावल्या. वृषाणिन् या लिंगरूप असलेल्या विष्णूचे आजच्या विष्णूत रूपान्तर झाले. लोकसंस्कृतीतील रूद्र देवता जी गुप्तपणे चोरी करणारी, वाटसरूंना लुटणारी, शत्रूवर बाण टाकणारी अशी, तर कधी 'दिशांचा अधिपती', पशूंचे पालन करणारी, यज्ञोपवित धारण करून गुणसंपन्न लोकांचे प्रतिपालन करणारी. अशी परस्परविरोधी सूक्ते यजुर्वेदात आहेत. या रुद्राचे पुढे उन्नयन होउन तो शिवात परिवर्तीत झाला असे मानले जाते. या बदलाचे मुख्य कारण हे आहे की, यजुर्वेदकाळातील समाजरचना कृषिव्यवसायाच्या वृद्धीबरोबर टोळीसंघ (ट्रायबल) व्यवस्थेपासून स्थायिक समाजपद्धतीकडे (सेडेंटरी) वेगाने वाटचाल करीत होती. आर्य,आर्येतर लौकिक समूहांचे संकर वाढत होते. संघर्षाबरोबर स्वीकार आणि समन्वयाची प्रक्रिया सुरू होती. या समन्वयातून एकात्म भारतीयत्वाची जडणघडण होत गेली. आजही ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असून यातूनच भारतीयांची 'एकात्मता' आधिकाधिक दृढ होत जाते.
दैवी दाम्पत्ये: वैशिष्ट्ये -
वैदिक धर्म पुरुषप्रधान असल्याने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचे महत्त्व वाढत गेले. आज या धर्मात देवीची उपासना पुरुषदैवताची पत्नी म्हणून केली जाते. भारतीय संस्कृतीत शिव आणि गौरी, विष्णू आणि लक्ष्मी ही दोन मान्यवर मिथुने आहेत. मात्र सूक्ष्म निरीक्षणांती असे लक्षात येते की, शिव आणि गौरी यांचा दर्जा समान आहे. ते एकमेकांचे सहकारी आणि सहयोगी आहेत . न पटणाऱ्या बाबीबद्दल निषेध नोंदविण्याचे सामर्थ्य गौरीत आहे. तसेच निर्णयप्रक्रियेत ती सहभागी असल्याचे अनेक मिथक् कथातूंन जाणवते. म्हणूनच पुढे सांख्य तत्त्वज्ञान सांगते 'शक्तीशिवाय शिव हा शवासमान आहे' तर 'शिवाशिवायचीशक्ती अघोरी बनते' अर्थात् नंतरच्या पुराणकाळात उमा किंवा गौरीला दुय्यम स्थान देणाऱ्या कथा रचल्या गेल्या.विष्णुपत्नी लक्ष्मीची मूर्ती कायम त्याचे पाय चुरत असते. दिवाळी दसऱ्यास पूजिल्या जाणाऱ्या श्री किंवा जया यांच्यातील परिपूर्ण सामर्थ्य, पाय चुरणाऱ्या लक्ष्मीत नसते. गणेश वा गणपतीची पत्नी म्हणून सरस्वतीची निश्चिती कालौघात झाली. मात्र समाजाने या संकल्पनेला फारसे स्वीकारले नाही. या दोघांना स्वतंत्र महत्त्व आहे. गणेशोत्सवात सरस्वतीचे पूजन करण्याचा संकेत निर्माण झाला नाही. सरस्वतीला समाजात विद्येची, कलेची देवता म्हणून मान्यता आहे. गणेश हा नर्तक आहे तर सरस्वती ही वादक आहे. या दोन्ही देवता विद्या आणि कलेच्या मानल्या जातात.
प्राचीन देवतांचे उन्नयन -
मातृसत्ताक जीवनपद्धतीकडून पितृसत्ताक जीवनपद्धतीकडे समाजाची वाटचाल होत असताना आजच्या पूजनीय देवतांचा जन्म झाला. प्राचीन देवतांचे उन्नयन झाले. काही देवतांचे एकत्रीकरण होऊन त्यांचे नवे स्वरूप समाजात स्थिर झाले. पूजनीय झाले. आर्यपूर्वांची देवता रूद्र, सिंधु- संस्कृतीत पूजनीय असलेला लिंगस्वरूपी शिश्नदेव, यांच्यातून आजची शिव ऊर्फ शंकर देवता साकारली. मात्र या पूजनीय देवतांचा जन्म स्वयंभू, अयोनिज मानला गेला. सीता नांगराच्या फाळातून तर द्रौपदी यज्ञाच्या वेदीतून निर्माण झाल्या. जी योनी सर्जनाचे उगमस्थान म्हणून सन्माननीय मानली गेली ती पाळीच्या काळात, रजोदर्शनाच्या काळात अपवित्र होते असे मानले जाऊ लागले. जिच्यात यातुशक्ती असते अशी श्रद्धा होती, विश्व सर्जनाची देवता म्हणून पुरातन काळापासून जिची उपासना केली जाई, जिच्यातील सुफलनशक्ती जीवनाला चैतन्य देते, जीवनाचे चक्र प्रवाहित ठेवते अशी धारणा होती त्या योनीरूप देवतेची प्रतिष्ठा समाजातून हळूहळू कमी होत गेली.
विश्वाचा विस्तार, त्यात सातत्याने होणारे परिवर्तन हा कुतुहलाचा प्रश्न मानवी मनासमोर आदिम काळापासून होता, आहे आणि पुढेही राहील. आपल्या बुद्धीनुसार आणि अनुभवानुसार या विश्वाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न तो सातत्याने करीत आहे. कधी कधी ही उत्तरे आपल्याला सापडली असे त्यास वाटते. लिंगपूजा हे जगाच्या प्राथमिक अवस्थेतील माणसाने जगाचे कोडे सोडविण्याच्या प्रयत्नात शोधलेले एक उत्तर आहे. ज्या क्रियेतून यच्चयावत् प्राणिमात्रांची उत्पत्ती होते त्या मैथुनक्रियेला आदिममाणसाने गर्ह्य मानले नाही.जननेंद्रियाला घृणास्पद वा वासनेने लडबडलेले इन्द्रिय मानले नाही. जगत् निर्माण करणाऱ्या सृजनाची प्रेरणा असणाऱ्या जगत्-पितरांची९ लिंग व योनीच्या स्वरूपात त्याने पूजा केली. महाशाक्त कवी कालिदासाच्या शब्दात सांगायचे तर असे -
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये।
जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ ॥
शिवलिंग हे योनी व लिंग यांच्या संपृक्ततेचे..... एकात्मतेचे प्रतीक आहे. ते आजही सन्मानपूर्वक पूजिले जाते. शिवलिंग हे सुफलतेचे प्रतीक आहे. हा मूलबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास -
भारतीय संस्कृतीचा इतिहास हा समाजनिर्मितीचा इतिहास आहे. दास, दस्यू, पणीन्, आर्य, द्रविड, नाग आदी अनेक टोळ्यांच्या संघर्ष-समन्वयातून येथील समाज सुसंघटित होत गेला.ज्यांचे जवळ आधिक चांगली शस्त्रे होती ते जेते बनले. शस्त्र, शास्त्र, धर्म, तराजू यांच्या बळावर भारतात स्थिर झालेली ही सारी माणसेच होती. भारताच्या भौगोलिक रचनेने त्यांच्यातील माणुसकी सतत जपली. वैदिक आणि लौकिक या दोन धारा समान्तरपणे समाजाला कवेत घेऊन वाहत राहिल्या. वैदिकांचे देव निसर्गातील श्रेष्ठ शक्तींची प्रतीके आहेत. उदा. - वरुण, अग्नी, उषस् इत्यादी निसर्गातील श्रेष्ठ शक्ती पाहून त्यांच्याबद्दल भीती आश्चर्य, आदर, कृतज्ञता इत्यादी भावना त्यांच्या मनात निर्माण झाल्या असाव्यात. त्यातून त्या श्रेष्ठ शक्तीला 'हवी' देऊन प्रसन्न करता येते ही कल्पना स्फुरली. तीच वैदिकांच्या देवता आणि पूजा पद्धतीच्या मुळाशी आहे. लौकिकांची दैवतकल्पना अधिक आदिम आणि निसर्गात आढळून येणाऱ्या प्रजनन वा सर्जन प्रक्रियेशी जोडलेली आहे. कारण त्यातून 'वृद्धी' होते. या दोन्ही धारांनी एकमेकांच्या दैवतांचा, विधींचा कालौघात स्वीकार केला. या धारांच्या दोनही अनुबंधातून एक नवी संस्कृती निर्माण झाली. काही देवता समाजातून लोप पावल्या, काहीचे रूपान्तर झाले, काहीचे उन्नयन होऊन नव्या स्वरूपात स्थिरावल्या. एकाहून अधिक देवतांचे एकत्रीकरण होऊन काही दैवते स्थिरावली. उदा. दत्तात्रय. या दोनही धारांतले अनुबंधात्मक नाते लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
भारताची भौगोलिक रचना एकात्मतेसाठी अनुकूल -
भारताची भौगोलिक रचना एकात्मतेच्या वाढील नेहमीच अनुकूल राहिली. पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेला सागारांची सीमा तर उत्तरेला पूर्व पश्चिम पसरलेला महाकाय हिमालय, अशा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित अशा सीमा भारताला लाभलेल्या आहेत. निसर्गाच्या विविधतेने आणि समृद्धीने नटलेल्या या महाकाय देशाबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण वाटले. येथील समृद्धीच्या आकर्षणाने आलेल्या टोळ्या इथेच स्थिरावल्या. या भौगौलिक विशिष्ट वास्तवामुळे या भूभागात राहणारा मानवसमूह सांस्कृतिकदृष्ट्या एकात्म राहू शकला. आजही भारताच्या विविध प्रान्तांतून साजरे होणारे लोकोत्सव मग ते आदिवासी, नागर, ग्रामीण समाजातील लोकसमूहांचे असोत, त्यांचे स्वरूप वरपांगी आणि तपशिलांबाबत काहीसे वेगळे असले तरी त्यात अंगभूत साम्य आहे. विलक्षण एकात्मता आहे. चारही दिशांनी नैसर्गिक सीमा रेषांनी बंदिस्त असलेल्या या देशातील महाकाय भूभागातील एकात्मता अभूतपूर्व आहे. चकित करणारी आहे. तसेच 'राष्ट्र' या संकल्पनेला चैतन्य देणारी आहे.
ऋतुचक्र आणि भारतीय सण, उत्सव -
ऋतुचक्र, त्यानुसार नक्षत्रांची बदलती स्थाने, निसर्गाच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या स्वरूपाचे सूक्ष्म आणि सर्वांगीण निरीक्षण करून , तसेच ऋतुचक्राचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव लक्षात घेऊन विकसित झालेले सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गीते त्याचे स्वरूप समानधर्मी राहिले आहे. उदा. - चैत्रातील पाडवा भारतभर साजरा होतो. 'गौरी' चे व्रत सर्वत्र पाळले जाते.बंगालात घर नव्या कोवळ्या पानाफुलांनी सजवितात. सुंदर रांगोळ्या काढतात. देवीचा पाठ वाचला जातो. नवीन तांदळाचे पदार्थ केले जातात. आंध्रात याला 'उगादी' म्हणतात. हा सण जणु नव्याने बहरणाऱ्या निसर्गाच्या स्वागताचाच ! चैत्रात बहरणारा निंबाचा मोहोर, चिंचा आंब्याचा मोहोर वगैरेत गूळ घालून केलेली चटणी, त्यादिवशी सर्व जण खातातच. मध्य प्रदेशातील ठाकूर समाजात चैत्रातही नवरात्र बसविले जाते. पाटावर नऊ धान्याचे नऊ ढीग मांडतात. कलशाची पूजा करतात. नऊ दिवस अखंड ज्योत असते. नव ज्योतींनी देवीची आरती होते. प्रसाद म्हणून साजूक तुपातला शिरा करतात. त्यात काळी मिरी टाकतात. सायंकाळी कुमारिकांची त्यांचे पाय धुऊन पूजा करतात. सिंधी मंडळी या दिवसाला 'चेट्टीचांद' म्हणतात. महाराष्ट्रात गुढी उभारली जाते. कर्नाटकात लिंबाची पाने गरम पाण्यात घालून स्नान करतात. या दिवशी भारद्वाज पक्षी पाहणे शुभ मानले जाते. राजस्थानात कुमारिका गणगौर मांडतात. विवाहानंतर या व्रताचे उद्यापन पाडव्यानंतर केले जाते. गणगौरीतही लिंमडीच्या फांदीला विशेष महत्त्व. चैत्रानंतर सहा महिन्यांनी आश्विन अंगणात येतो. तो थंडीची दुलईघेऊन. आश्विनातले नवरात्र भारतभर साजरे होते. चैत्रात देवीच्या पूजेला महत्त्व तसेच आश्विनातही देवीपूजेला महत्त्व. आश्विन महिन्याला 'क्वार का महिना' म्हणतात. भाद्रपद, आश्विनातील सारे उत्सव आणि व्रते जमिनीची सुफलता वाढावी यासाठी असतात, जमिनीला आकंठ भिजवून टाकणारा, तिला आर्द्रा करणारा पाऊस पडावा, जमिनीत पेरलेले बीज रुजून तरारलेल्या कणसांच्या दाण्यांमधून मधुर अन्नरस पूर्णत्वाने भरावेत ही कामना या सणांच्या व व्रतांच्या मुळाशी असते. अन्न ही जीवनाची प्रेरणा आहे, मूलभूत गरज आहे. म्हणून कालप्रवाहाच्या ओघात जमिनीच्या सुफलतेशी जोडलेले उत्सव, विधी, व्रते यांचे अवशेष विविध रूपांत अस्तित्त्वात आहेत.
आदिपर्वातील यातुश्रद्धा आणि समूहश्रद्धा -
यातुश्रद्धा ही मानवी संस्कृतीची आदिपर्वातीलसमूह श्रद्धा आहे. जगणे ही सर्वच प्राणिमात्रांची आद्य आणि महत्त्वाची प्रेरणा असते. शरीरधारणेसाठी, जगण्यासाठी अन्न हे आवश्यकच असते. आदिमानवाला अन्नप्राप्तीसाठी, जगण्यासाठी निसर्गाशी सातत्याने झगडावे लागले. स्वतःचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्या गरजेतून संघर्षमय वृत्ती तयार झाली. टोळीअवस्थेत राहणाऱ्या माणसांचे प्रश्न समूहाचे होते. व्यक्तीचे नव्हते. सभोवतालच्या परिस्थितीशी संघर्ष करून तर कधी विविध मार्गांनी त्याला काबूत ठेवून त्याने भौतिक प्रश्नांशी संवाद साधला. वास्सवावर पकड ठेवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे यातुविधी. जे घडणे वा घडविणे आपल्या हाती नसते. जे घडल्याचे व घडण्यातून झालेल्या आनंदाचे आपण फक्त स्वप्नच पाहू शकतो. त्याहीपेक्षा ते कसे घडेल याचे नाट्यीकरण करून त्यातून होणाऱ्या आनंदाचे प्रत्यक्ष समाधान घेऊ शकतो. अशा कृतीतून ते घडण्याची शक्यता वाढते, अशी श्रद्धा आदिमानवात निर्माण झाली. त्यातूनच यातुविधींचा जन्म झाला. जीवनाकडे सकारात्कम दृष्टिकोनातून पाहण्याची भूमिका आदिम लोकसमूहाने सुरुवातीपासूनच घेतली. प्राथमिक अवस्थेतील कृषिसमाजात निसर्गातील घडामोडीमागील कार्यकारणभाव समजण्याची बौद्धिक झेप नव्हती. त्याकाळात या यातुविधींनाच अपार महत्त्व होते यातुविधींचा समूहमनांवर अपार पगडा होता. समूहजीवनात त्यांचे महत्त्व होते. ते यातुविधी नेमके कसे होते. त्यांचे स्वरूप कसे होते याचे निश्चित ज्ञान होणे आज हजारो वर्षांनंतर अवघड आहे. परंतु जगभराच्या आदीवासींच्या जीवनाचा सूक्ष्म अभ्यास आज केला जातो. त्यातून स्वरूप थोडे फार लक्षात येते. काही निष्कर्ष काढता येतात.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाचे मन ! मानवी मन हे एक चमत्कारिक प्रकरण आहे. एकीकडे भविष्यात धाव घेताना ते कुठे तरी मनाच्या तळाशी भूताचे भूत जपत असते आणि वर्तमानावर ते छाया धरून असते. आजही मानवाची प्राथमिक गरज असलेल्या अन्नसमृद्धीशी वर्षनसर्जनाशी जोडलेल्या व्रतोत्सवात यातुविधींच्या खुणा आढळतात. या खुणांच्या साहाय्याने भारतातील लोकधर्मी संस्कृतीतील प्राणभूत एकात्मतेचा शोध घ्यायचा असेल तर, लोकपंरपरांचे चिकित्सक दृष्टीने निरीक्षण करणे आवश्यक ठरते.
लोकपरंपरा आणि समूहमन -
लोकपरंपरेच्या अभ्यासातून प्राचीन काळातील जनसामान्यांच्या जीवनरीतीचा, समूहमनाचा, त्यांच्या मूलभूत भूमिकेचा शोध घेता येतो. लोककथा, लोकगीते आदी लोकसाहित्याची निर्मिती करणारी एक व्यक्ती नसते, विशिष्ट काळ नसतो. ही निर्मिती समष्टीने केलेली असते. त्यात असंख्य अनामिकांनी वेळोवेळी भर घातलेली असते. या वाङ्मयात त्या त्या काळचा ठसा नकळत उमटलेला असतो. लोकसमूहाच्या जगण्याच्या रीतीचा इतिहासच जणु त्यांत नोंदविलेला-गोंदविलेला असतो.
लोकपरंपरा आणि लोकसाहित्याचा अभ्यास : प्रेरणा-
लोकपरंपरा आणि लोकसाहित्याच्या अभ्यासाची प्रेरणा गेल्या दीडशे वर्षांपासूनची आहे. कवी रविन्द्रनाथ टागोरांनी जनसामान्यांच्या ओठात आणि हृदयांत परंपरेने गोंदविलेल्या लोकगीतांचा, लोकनाट्याचा, तसेच लोकसंगीतांचा जाणीवपूर्वक अभ्यास करण्याचा पायंडा घातला. जात्रा, कविगान, कीर्तन, पांचाली, कथाकली यांसारख्या लोककलांतून सरलपणे व्यक्त होणाऱ्या आविष्कारांचा शोधक दृष्टीतून सन्मान केला. त्यातील स्वयंभू सौंदर्य समाजासमोर ठेवले. लोककलांतील समूह मनाची शक्ती त्यांना जाणवली होती. रविबाबूंच्या काव्याचा आत्मा लोकसंस्कृतीच्या अभिजातरंगाने रंगला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.
महाराष्ट्रात वि.का. राजवाडे यांनी शंभर वर्षांपूर्वी लोकगीते व लोकपरंपरांचा चिकित्सक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची परंपरा निर्माण केली. भाद्रपद, आश्विनात, हस्त नक्षत्राच्या काळात खेळल्या जाणाऱ्या भोंडला वा हादगा या कुमारिकांच्या उत्सवाचा आणि त्या निमित्ताने गायल्या जाणाऱ्या पारंपरिक लोकगीतांचा शोधक अभ्यास केला. त्यानंतर लोकसाहित्याच्या अभ्यासाची परंपरा निर्माण झाली. अनंत आबाजी देवधरांनी वऱ्हाड...खानदेशात भाद्रपद पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत.... कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मांडल्या जाणान्या भुलाबाईवर आणि पश्चिम महाराष्ट्रात हस्तनक्षत्राचे सोळा दिवस खेळल्याव मांडल्या जाणाऱ्या हादगा, या कुमारिकांच्या खेळोत्सवावर टिपण लिहिले. गाणी संकलित करून गाण्यांतील शब्दांचा शोध घेतला. मराठी लोकसाहित्याचा आणि लोकपरंपरांचा चिकित्सक आणि मूलभूत दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची, विश्वात्मक आणि तुलनात्मक दृष्टीने या परंपरेचा शोध घेण्याची दिशामहाराष्ट्रातील विदुषी मा.दुर्गाताई भागवत यांनी दिली. पुण्याचे डॉ. रा. चिं. ढेरे, मराठवाड्यातील डॉ. प्रभाकर मांडे, खानदेशातील दा. गो. बोरसे, विदर्भातील भाऊ मांडवकर, डॉ. मधुकर वाकोडे, सांगलीच्या डॉ.तारा भवाळकर, नांदेडच्या डॉ.तारा परांजपे, अहमदनगरचे डॉ. गंगाधर मोरजे यांनी ही परंपरा परिपुष्ट केली. लोकसंचिताच्या अभ्यासाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. लोकसाहित्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सरोजिनी बाबर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक लोकसाहित्य गोळा करून, अस्सल रूपात संग्रहित करून लोकसाहित्य मंडळामार्फत प्रकाशित केले. अभ्यासासाठी संदर्भ साहित्याचा फार मोठा ठेवा उपलब्ध करून दिला. अनुताई लिमये यांनी लोकगीतांचे संकलन खेड्यापाड्यांत हिंडून केले. सानेगुरूजींनी लोकसाहित्याचे मोल ओळखले होते. आज विधी, विधिगीते, ग्रामपरंपरा, ग्रामदेवता, लोककथांचे, लोकगीतांचे विविध प्रकार, विधी-नाट्य, अभिजात वाङ्मयातून घडणारे लोकसाहित्याचे दर्शन आदी अनेकविध विषयांवर सापेक्ष पद्धतीने विचार करण्याची वृत्ती विकसित होत आहे.
कृषिलक्ष्मीशी जोडलेले रीतिरिवाज आजही हरवलेले नाहीत -
मानवी संस्कृतीच्या प्रथमावस्थेत कृषिजीवी समाजाने जमिनीची सुफलन शक्ती वाढावी, धनधान्य समृद्धी विपुल प्रमाणात निर्माण व्हावी यासाठी जे विधी, उत्सव, व्रते, सण, रीतीरिवाज निर्माण केले. ते आज २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारतीयांच्या कृषिजीवनातून हरवलेले नाहीत. भूमीची सृजनशक्ती, आकाशातून बरसणारी वर्षनशक्ती, सूर्यापासून मिळणारे तेजोमय चैतन्य या तिन्हीच्या सहयोगातून निर्माण होणारी कृषिलक्ष्मी या सर्वांबद्दलची जवळीक आणि कृतज्ञता, त्या त्या ऋतूंचे संदर्भ, आकाशातील ताऱ्यांची नक्षत्रांची बदलती स्थाने त्यांच्या गणितावर आधारलेल्या लोकपरंपरांतून जाणवते. त्यातील एकात्मतेचा चिकित्सक नजरेने शोध घेण्याची भूमिका या अभ्यासामागे आहे. या लोकपरंपरा केवळ महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नसून त्या सर्व भारतभर आढळतात. त्यांची तुलनात्मक पाहणी, तसेच मराठवाड्यातील पाहणीशी उर्वरित महाराष्ट्रातील समानधर्मी लोकपरंपरांचा शोध घेणे महत्त्वाचे ठरते.
अनुबंधाचा शोध घेण्याचा प्रयत्न -
जमिनीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात साजरे होणारे विधी, सण, व्रते, उत्सव, तत्संबंधी गाणी आदींचे शोधन करून भारतातील उर्वरित प्रांतांतून याच भूमिकेतून साजऱ्या होणारे विधी, सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गाणी यांच्यातील अनुबंध शोधण्याचा प्रयत्न या प्रबंधाद्वारे केला जात आहे.
या शोधामागील भूमिका -
लोकसाहित्य ही एक स्वतंत्र अभ्यास शाखा आहे. ती समन्वित (Interdisciplinary) आहे. लोकसंस्कृतीशी जोडलेल्या विषयांचा अभ्यास करताना लोकपरंपरेतील सर्व मौखिक वाङ्मय (कथा,गीते, म्हणी, उखाणे इत्यादी) धर्मश्रद्धा, विधी विधाने, लोकभ्रम, रूढी, चालीरीती आदी सर्व घटकांचा त्यात समावेश करावा लागतो. आणि या अभ्यासाला प्रसंगपरत्वे मानववंशशास्त्र, इतिहास, पुरातत्वशास्त्र, भूगोल, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र आदी शास्त्रांची मदत घ्यावी लागते. लोकसाहित्याबद्दलची - Folklore संबंधीची ही व्यापक भूमिका घेऊन हा शोधनिबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
२१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारताला विघटित करणाऱ्या विविध शक्ती बळावत आहेत. अशा वेळी भारतातील अन्नधान्य समृद्धीशी जोडलेल्या विधी व्रतादींमधून जाणवणाऱ्या प्राणभूत एकात्मतेचा शोधघेणे अपरंपार महत्त्वाचे ठरते. भाषा हे एक आत्मप्रगटीकरणाचे प्रभावी माध्यम आहे. परस्पर संवादाचे माध्यम आहे. विविध भाषा बोलता येणे, त्यांचे ज्ञान असणे हे विद्वत्तेचे गमक मानले जाते.
साहित्य, मग ते कोणत्याही भाषेतील असो, समकालीन असो वा लोकसाहित्य असो. साहित्याचा आत्मा एकच. मानवी मनाचे परस्पर भावबंधाचे ते प्रकटन असते. या भाषेविषयींच्या मूलबंधातून आजवर विविध भाषांमधील सामंजस्य जपले गेले. आज मात्र भाषेच्या आधाराने देशाच्या विघटनाचे खेळ मांडले जात आहेत. या भूमीत वाढलेल्या रूजलेल्या विविध धर्मानी, पंथांनी एकमेकांचा सामंजस्याने स्वीकार केला. 'समन्वय आणि स्वीकारातून समरसत्व',याचे अद्वितीय उदाहरण म्हणजे भारतीय संस्कृती. विविध टोळ्यांचा संघर्ष जरूर झाला, रक्ताचे पाट वाहिले पण त्यातून समन्वय झाला. पस्परांनी एकमेकांना स्वीकारले, रोटी बेटी व्यवहार झाले आणि एक समिश्र इंद्रधनुषी संस्कृती सतत आकारत गेली. आज मात्र धर्म पंथाच्या नावाने माणसामाणसांत दुही माजवली जात आहे. धर्माच्या, पंथाच्या, नावाने रक्ताचे पाट वाहत आहेत. अशा वेळी भारतातील सांस्कृतिक एकात्मतेमागील विविध कारणांचा शोध घ्यावा. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरांमागची कृतिशील भूमिका शोधावी हा एक हेतू शोधनाच्या मागे आहेच. ही एकात्मता विधी, व्रते, उत्सवांशी संबंधित गीतांतून, प्रतिमांतून, कृतीतून, त्यामागील धारणांतून व्यक्त होते. या शोधनाला त्यांचा आधार आहे.