भूमी आणि स्त्री/पारंपारिक लोकोत्सव आणि कुमारिका

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

  स्त्री आणि भूमी यांच्यातील सर्जनक्षमतेबद्दल आदिमानवाला कुतूहल, मानवाचे प्राथमिक विज्ञान, विश्वातील 'असु' शक्ती आणि कृषिविधी, विधी : प्रतीकरूपात आराधना, श्रद्धांतील सारखेपणा, भूमी आणि स्त्रीची विविध रूपे, कुमारिकेची तीन रूपे, उत्सव न्हाणुलीचा, ऋतु प्राप्त झाला, न्हाणुली विवाहिता असे, नहाण, गोरी मालन, ऋतुशांती, धर्म, विज्ञान यांचे मूळ 'जादू', अंबुवाची उत्सवः पृथ्वीची रजस्वला अवस्था, कौमार्य अनाघ्रात असते, कन्या शब्दाची व्याप्ती, स्त्रियः पवित्रमतुलम्, कन्याराशी : एका हातात धान्याचा अंकुर दुसऱ्या अग्नी, हिंदुस्तानचे बदलते रूप आणि स्त्री, लिंग- निसर्गनिर्मित तर, लिंगभाव-समाजनिर्मित, स्त्रीच्या स्थानातील परिवर्तन : त्याचा व्रत, विधी, उत्सव यांवर परिणाम, भारतीय व्रतोत्सवांत कुमारिकांना विशेष स्थान, आठव्या वर्षीच विवाह का?, गौरी : अष्टवर्षा कन्या, कोकणस्थ ब्राह्मण समाजातील 'बोडण', कुवांरभूमीची पूजा: कुमारीपूजा, अन्नसमृद्धीशी जोडलेल्या यातुविर्षीचे कालौघात उन्नय, भाद्रपद, आश्विन सर्जन वर्षनाचे महिने, भोंडला वा हादगा, इंद्रपूजेचा संकेत : हादगा, कुमारिकांचे उत्सव भारतभर, वृक्षपूजा : भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य,भुलाबाई, भराडी गौरः कुमारिकांचा कलात्मक उत्सव, इनाई : सरस्वती, बीज : शंकरः क्षेत्रपाळ, खेळणे, मांडणे आणि गाणे, साँझी : मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशातील देखणा, कुमारिकोत्सव, देखणे अंगण दूर चाललेय का?, कुमारिकांच्या उत्सवातील मूलबंध,समाजव्यवस्थेच्या मुळाशी अर्थव्यवस्था, कन्येचा कृषियातुविधीत महत्त्वाचा सहभाग,


  अष्टवर्षा भवेत् गौरी दशवर्षाच कन्यका।
  सम्प्राप्ते द्वादशेवर्षे कुमारीत्यभिधीयते॥
 (कन्या आठ वर्षांची झाली की ती 'गौरी' होते. दहाव्या वर्षी कन्यका होते आणि बाराव्या वर्षी ती कुमारिका होते.)
 स्त्री आणि भूमी यांच्यातील सर्जनक्षमतेबद्दल आदिमानवाला कुतूहल -
 स्त्रीत असणाऱ्या सर्जनशक्तीबद्दल आदिमानवाला नेहमीच उत्सुकता, आकर्षण, भय आणि विलक्षण आदर वाटला आहे. आदिकाळापासून जगण्याचा केंद्रबिंदू जमिनीतून निर्माण होणारे धान्य, कंदमुळे, फळे, पशुधन हा होता. भूमीची सर्जनक्षमता म्हणजेच सुफलनशक्ती वाढली तर धनधान्य समृद्धी निर्माण होते आणि माणसाचे जगणे सुखकर होते. ही समृद्धी निर्माण करण्यासाठी मानवी श्रमाची, हातांची गरज असते याची जाण आदिमानवाला होती आणि मानवी धन निर्माण करण्याची क्षमता, शक्ती स्त्रीत असते. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेत असणारे साम्य हा मानवाच्या कुतुहलाचा आणि निरीक्षणाचा विषय होता. त्याने या दोहोंच्यातील सर्जनक्षमता वाढवण्यासाठी विविध प्रयोग केले. त्यातूनच मानवाचा प्राथमिक यातुप्रधान धर्म निर्माण झाला.
 मानवाचे प्राथमिक विज्ञान -
 आदिम मानवाचा धर्म केवळ भ्रांतीने भारलेला आहे असे अनेकांना वाटते. पण ते खरे नव्हे. वन्य लोकांच्या धर्मात भ्रांती जरूर आहे पण तिला वास्तवाचा आधार असतो. प्रतीकाचा वापर करून ते सामाजिक गरजा व सामुदायिक हितसंबंध व्यक्त करतात. यातुविद्येचे शास्त्र बुद्धिवादाला पटण्यासारखे नसले तरी ते बिनतोड असते. त्यात संभवनीय गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. दुर्गा भागवत या संदर्भात लिहितात, 'संभवनीयता हे जादूविद्येचे प्रमुख उद्दिष्ट. जादूविद्येचे मुख्य प्रकार दोन. या दोनही प्रकारात क्रिया व क्रियेमागचे तत्व यांना प्राधान्य असते.' पहिल्या प्रकाराला Sympathetic - सहानुभावात्मक जादूविद्या म्हणता येईल. दुसरा प्रकार Homeopathic जादूविद्या, या शब्दाचे भाषांतर करणे कठीण आहे असे सांगून दुर्गाबाई त्यासाठी 'समानोत्पत्तिक' जादूविद्या हा शब्द वापरतात. जादू हे मानवाचे प्राथमिक विज्ञान होते असे म्हटल्यास वावगे होणार नाही.
 विश्वातील 'असु' शक्ती आणि कृषिविधी -
 स्त्री आणि भूमी यांच्यातील नवनिर्मिती करण्याचे सामर्थ्य जाणून यांच्यातील साधर्म्य आणि सहचर्य यावर निश्चित स्वरूपाचे ठोकताळे त्याने बांधले. यालाच फ्रेझर स्युडोसायन्स (Psudoscience) म्हणतो. या दोनही प्रकारच्या जादूविद्येवर आधारित असे विधी भूमीची सुफलनशक्ती वाढावी यासाठी कृषिकर्मात निर्माण केले. उदा. पावसाळ्यातले नाच, वाढून डोलणाऱ्या पिकांची नक्कल असते. दुर्गाताई नोंदवतात की झिम्मा, फुगडी ह्या खेळांचे मूळ असेच असले पाहिजे. विश्वातील सर्व वस्तूंमध्ये 'असु' शक्ती असते. ती भूमी व स्त्रीत विशेष करून असते. हे सामर्थ्य विशिष्ट वा विशिष्ट सामूहिक कृतीतून, सामूहिक मंत्रगानातून वाढविता येते वा कमीही करता येते अशी श्रद्धा प्राथमिक कृषिजीवन जगणान्या मानवसमूहात होती. 'भारतीय संस्कृती' चे विवेचन करताना विल ड्युरांट,येथील लोकजीवनाबद्दल नोंदवतात, 'छोटा नागपूरमध्ये कापणीचा हंगाम सार्वत्रिक उच्छृखल वर्तनाद्वारे एक प्रकारे इशारतच असे. पुरुष सारी सभ्यता व स्त्रिया सारी लज्जा गुंडाळून ठेवीत. आणि तरूण मुलींना स्वाभाविक संपूर्ण मोकळीक असे. राजमहल टेकड्यात परगणाईत नावाची एक शेतकरी जमात असून से दरसाल शेतकी उत्सव साजरा करीत. या उत्सवात अविवाहितांना संपूर्ण संभोग स्वातंत्र्य मिळे'. शेत आणि कुटुंब सुपीक व्हावे या हेतूने हे उत्सव साजरे केले जात. हे नोंदवताना विल ड्युरांट लिहितात, 'ते प्राचीन जादूटोण्याचे अवशेष होते'.
 विधी : प्रतीकरूपात आराधना -
 पाऊस पडावा म्हणून विवस्त्र स्त्रीच्या देहाभोवती लतावेली गुंडाळून, तिच्या माथ्यावर सच्छिद्र जलकुंभ देऊन तिची मिरवणूक काढतात. या विधीत स्त्रीला भूमीस्वरूप दिले आहे आणि कुंभरूप नभातून तिच्या अंगावर पाऊस पडून वनस्पतीसृष्टी उगवते असे कल्पिले आहे. अशाच एका यात्वात्मक सुफलीकरण विधीचे वर्णन बाणभट्टाच्या हर्षचरित्रात आहे. राणी विलासवती पुत्रप्राप्तीसाठी विविधप्रकारे साधना करीत असते. त्यात कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी रात्री सार्वजनीक चौकात यंत्रपूजा करून नग्न स्नान केल्याचा उल्लेख आहे. स्नान चौरस्त्यावर आणि नग्न होऊन करणे म्हणजे पर्जन्यदेवाने भूमीप्रमाणेच स्त्रीचेही सुफलीकरण करावे ही श्रद्धा या विधीमागे असावी. जलवर्षाव, सूर्यकिरणांचा स्पर्श यामुळे स्त्रिया सुफलित होतात अशी श्रद्धा आजही वन्य समाजातून आढळते. सर्वसाधारण लोकांना लिंग आणि योनी यात अश्लील असे काही वाटत नाही. मॅडोना आपल्या बालकाला स्तनपान देत आहे या चित्राचे चिंतन करताना ख्रिस्ती माणसाच्या मनात आश्लील विचार येत नाहीत तसेच हे आहे. एखादी गोष्ट रुढ झाली की ती उचित मानली जाऊ लागते. तिला कालौघात पावित्र्यही लाभते.
 श्रद्धांतील सारखेपणा -
 अशा तऱ्हेचे समज ऑस्ट्रेलिया, मंगोलिया आदी देशांतही होते. एकूण मानवी संस्कृतीच्या इतिहासातील फार मोठा कालखंड कृषिविषयक यातुविज्ञानाने भारलेला आहे. ऋग्वेद, अथर्ववेद यात वर्णिलेले यातुविधी आजही वन्य समाजात, आदिवासी जीवनात जिवंत स्वरूपात आढळतात. धर्म,जात,वंश, राष्ट्र यात माणूस विभागला गेला असला तरी, प्राथमिक कृषिजीवनात निर्माण झालेल्या भूमीशी निगडित श्रद्धा, आजही सर्वांच्या अंतरंगात सारख्याच आहेत.
 भूमी आणि स्त्रीची विविध रूपे -
 भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेचे साधर्म्यलक्षात घेऊन कृषिविधानाशी संबंधित यातुविधी निर्माण झाले. कालौघात त्यांचे रूपांतर सण, व्रते, उत्सव यात झालेले दिसते. भूमी आणि स्त्री यांची विविध रूपे मानवाने निरीक्षिली. पेरणीसाठी उत्सुक असलेली ग्रीष्माच्या उन्हात.......सूर्यकिरणांत आकंठ न्हाताना सुखावणारी संगमोत्सुक धरणी, पावसाच्या धारात चिंब भिजताना हिरवाईची स्वप्ने रेखाटणारी धरणी, वेली वनस्पती, फुलेफळे यांनी बहारून गेलेली सुफलाम् तृप्त धरणी. अशीच स्त्रीचीही विविध रूपे आहेत.
 कुमारिकेची तीन रूपे -
 कुमारी स्त्रीच्या तीन अवस्था महत्वाच्या मानल्या जातात. आठ वर्षांची कन्या 'गौरी' होते. दहाव्या वर्षी ती 'कन्यका' होते. तर बाराव्या वर्षी तिचे 'कुमारिकेत' रूपांतर होते. जन्मापासून ते आठ वर्षापर्यन्त मुलगा आणि मुलगी यांच्यातील नैसर्गिक वेगळेपण दर्शविणारे बदल सुरू झालेले नसतात. आठव्या वर्षापासून सर्वसाधारणपणेते होऊ लागतात. हे बदल एकूण शरीरात होतात. परंतु विशेषकरून ते सर्जनेन्द्रियात होतात. हे बदल, त्यांना निसर्गाने दिलेले पुरुषत्व वा स्त्रीत्व पूर्णत्वाने सिद्ध करण्यासाठीचे असतात. आठव्या वर्षी दुधाचे दात पडण्यास सुरुवात होते. कुंभार मातीला कुंडीचा आकार देतो. परंतु जोवर ती कुंडी भाजून सर्वांगाने पक्व आणि परिपूर्ण होत नाही तोवर तिच्यात बीज, पाणी, माती यांना धारण करून त्यातून नवनिर्मिती करण्याची क्षमता येत नाही. गौरी, कन्यका या भूमिकातून ती कुमारिका या परिपूर्ण भूमिकेत जाते, तेव्हा तिची सर्जन करण्याची क्षमता पूर्णत्वाला पोहोचते.
 उत्सव न्हाणुलीचा -
 गौरी, कन्या या अवस्थेतून कन्या 'कुमारिका' या अवस्थेपर्यन्त पोहोचताच. ती ऋतुमती होते. रजस्वला होते. महाराष्ट्रात विशेष करून मराठवाड्यात या अवस्थेला 'मुलगी शहाणी झाली' हा वाक्प्रचार वापरतात. या साठी 'वयात येणे', बाजूला बसणे, 'न्हाण येणे' 'पाळी येणे' हे शब्दप्रयोगही केले जातात. 'मुका नातू' झाला हा वाक्प्रयोगही केला जातो. मुलीला पहिल्यांदा न्हाण येते तेव्हा घरात आनंदोत्सव साजरा केला जातो. तिला सन्मानाने मखरात बसविले जाते. तिची फळांनी ओटी भरतात. घरात पक्वान्न करतात. आसपासच्या महिला, नातलग नववयसा मुलीसाठी गोडाधोडाची शिदोरी पाठवितात. घरात 'कानोले' तळतात. ही पद्धत खास मराठवाड्यातील आहे. कानोले म्हणजे करंजीमध्ये गोडाचे सारण भरून तिला, दोन्ही पदर एकत्र करून मुरड घालून बंद केलेली असते. स्त्रियांच्या व्रतांत कानोल्यांना महत्त्व आहे. या संदर्भात मिळालेले उत्तर असे. मुलीने सतत मागे वळून पाहावे माहेरी मुरडून... वळून पाहावे यासाठी कानोले करतात.
 पाचव्या दिवशी तिच्या डोक्यावर पाणी घालून मगच तिला स्पर्श करतात आणि सुगंधी तेल उटणे लावून तिला न्हाऊ घालतात. ऋतुमती झाल्यानंतरचे चार दिवस तिला बाजूला बसवले जाते. तिला कोणीही स्पर्श करीत नाहीत. काही कारणांनी स्पर्श करावा लागला वा चुकून स्पर्श झाला तरी स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला डोक्यावरून आंघोळ करावी लागते. कर्नाटकात, मराठवाड्यात महाराष्ट्रात पूर्वी वाजंत्री लावून, घरोघर साखर वाटून 'मुका नातू' झाल्याचे सांगितले जाई. पाचव्या दिवशी सवाष्णी व कुमारिकांना जेवणास बोलावून सन्मान केला जाई. हळदीकुंकू समारंभ करीत. शिदोरी घेऊन येणाऱ्या महिला तिची खण व पाच फळांनी ओटी भरतात. पूर्वी मुलीचा विवाह न्हाण येण्यापूर्वी होत असे. त्यामुळे नहाण आल्यावर पाचव्या दिवशी तिच्या माहेराहून पलंग, गादी, जोड आहेर, चांदीचा ग्लास अशा वस्तूंचा साग्रसंगीत आहेर केला जाई. या दिवशी मुलीची पतीबरोबर पहिली भेट होत असे.
 कन्या साधरणतः वयाच्या १२ व्या वर्षी ऋतुमती होते. 'संप्राप्तेद्वादशेवर्षे कुमारित्यभिधीयते' ते यामुळेच म्हटले आहे. हा आनंद ती 'पूर्ण स्त्री' झाल्याचा असतो. तिच्यातील सुफलित होण्याची क्षमता पूर्णत्वाला पोहोचते. बीज धारण करून त्याला अंकुरित करण्यासाठी लागणारी चेतस् शक्ती म्हणजेच सुफलित करण्याची शक्ती तिला प्राप्त झालेली असते.
 कन्या रजस्वला झाली तरच ती 'फळ' धारण करू शकते. म्हणूनच कन्येच्या 'रजस्वला' होण्याचा सन्मान केला जातो. महाराष्ट्रात देवी चे रूप कुमारिकेचे आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरीने तर विवाह आवर्जून टाळलेला आहे. कुमारिका ही परिपूर्ण तेजाचे प्रतीक मानली आहे. देवीच्या उत्सवांत, श्रावणात सवाष्णीबरोबर कुमारिकेचा सन्मानजेवण, दक्षिणा देऊन केला जातो. राजस्थानी समाजातही ऋतुमती झाली की गोड जेवण करतात. गाणी म्हणतात.
 स्त्रियांच्या उत्सवात गाण्यांना महत्त्व असतेच. काही ओव्या या ठिकाणी दिल्या आहेत.
 ऋतु प्राप्त झाला -
 आज सुदिन उगवला तिला ऋतु प्राप्त झाला
      ऋतू प्राप्त झाला ॥
 लाजूनी उभी एकीकडे, शिंपी केशराचे सडे
 पाट रांगोळ्या तबकी विडे, तिला बसविले॥
 मखरी सोनियाचे खांब आरसे लाविले रुंद रुंद
 काचेचे जडित भिंग, वरती राघू कोकिळा॥
 पाची पक्वान्नांचा थाट, अडणीवरी शोभे ताट
 भाज्या, चटण्या , कोशिंबिरी, खावे ना तिला ॥
 पिवळे पातळ केशरी, चोळी जरी बुट्टेदारी
 शोभे दागिने नानापरी, बिंदी बिजवरा ॥
 न्हाऊ घातले चतुरदिनी बहुत सुवासिनी
 फळांनी ओटी भरूनी, ऋतू प्राप्त झाला।
 न्हाणुली विवाहिता असे -
 पूर्वीपासून मुलीचा विवाह आठव्या वर्षी होत असे. आजही ग्रामीण भागात पहिल्यांदा नहाण येताच मुलीच्या लग्नाची घाई केली जाते. न्हाणुलीला गायिली जाणारी गाणी परंपरेने चालत आलेली आहेत. यापूर्वी नमूद केले आहे की, पूर्वी 'न्हाणुली' विवाहिता असे व पहिल्या न्हाणानंतर काही दिवसांतच पती पत्नींची पहिली भेट घडविण्याचा विधी केला जाई. या विधीशी संबंधित गाण्यातही तसे संदर्भ आहेत.
 नहाण -
  वेणीमधे हिरवाची मरवा
  की आणू केवडा सांग सखे
  तू बनलीस मृगनयनी॥
  हिरवा करूनिया साज
  नेसलीस पैठणी
  अंगी तंग चोळी
  तू माझी मृगनयनी॥
  पाचूची अंगठी,
  हिरव्या जडिताची चिंचपेटी
  गोठ पाटल्यांची दाटी
  असे तू मृगनयनी॥
  हिरवे पानदान
  पानपुडा चुना बरवा
  अडकित्त्याचा रंग हिरवा ।।
  हिरव्या जडिताचा पलंग करवा
  हिरव्याच गाद्या हिरव्याच उशा
  छतावरी रंग हिरवा ।।
 गोरी मालन -
  गोरी मालन : अशी कौतुकाची वेळ
  पहिल्या दिवशी पुसावी चौकट
  दुसऱ्या दिवशी गोऱ्या मालनीला मांडावा चौरंगपाट   तिसऱ्या दिशी सोनाराला गेली चिठ्ठी
  गोऱ्या मालनीला चांदीची ताट वाटी
  चौथ्या दिशी सासू करते चौरंगपाणी
  गोऱ्या मालनीची माता तिची वंटी आणी
  पाचव्या दिशी कासाराला गेल पत्र
  गोऱ्या मालनीच्या चुड्याला झाली रात्र
  सहाव्या दिवशी अंगणी उभे माळी
  मालनीच्या मखराला कंबळ सरश्या केळी
  सातव्या दिशी होमाचा होतो धूर
  देवकृष्ण नाथ कोमेजला चंद्र नूर
  आठव्या दिशी आठ आठ गोळा करा
  गोऱ्या मालनीच्या गोताला मूळ धाडा
  नवव्या दिवशी सई माडीवर जाते
  गोरी मालन गोताची वाट पाहती
  दहाव्या दिशी सरी कंठ लेप लेयीली
  गोऱ्या मालनीला कुणाची ग दृष्ट झाली
  गोरी मालन कृष्णाला देते विडा
  अशी कौतुकाची वेळ कृष्णनाथ वंटी घालतो नारळ
      वंटी घालतो नारळ ॥
 ऋतुशांती -
 अलीकडे ग्रामीण भागातील मुलींचे विवाह ऋतुमती झाल्यावर दोनतीन वर्षांनी होतात. ऋतुमती झालेल्या मुलीच्या विवाहानंतर सासरी गेल्यावर तिची ऋतुशांती केली जाते आणि त्यानंतर पती पत्नीच्या मिलनास संमती मिळे.
 धर्म, विज्ञान यांचे मूळ 'जादू' -
 डॉक्टर रा.ना. दांडेकर म्हणतात "देव, मानव, पशु आणि विश्वातील इतर वस्तू या सर्वात यात्वात्मक रज जेवढे जास्त तेवढे त्या वस्तूत बदल अधिक. असु ही शक्ती सर्वव्यापी मानली जात असे. याच शक्तीला वैदिक 'माया' म्हणतात. फ्रेझर हा लोकविद्या, मानवविकाससंबंधीत शास्त्रांचा थोर अभ्यासक म्हणतो की 'जादू ही धर्माची प्राथमिक अवस्था आहे.' तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, 'जादू धर्म, विज्ञान यांचे पौर्वापर्य वा साम्य वैषम्य याबाबत पंडीतांत मतभेद असले तरी त्यांची मुळे एकत्रित आढळतात."
 स्त्री ऋतुस्नात झाल्याशिवाय गर्भधारण करण्यास योग्य होऊ शकत नाही तद्वत ग्रीष्म ऋतूत शुष्क झालेली धरणी अंतर्यामी ओलावल्याशिवाय,आर्द्रा झाल्याशिवाय नवसृष्टीचा गर्भ वाहण्यास सक्षम बनत नाही. अशी श्रद्धा आदिमानव समूहात होती. गर्भधारणेपूर्वी स्त्री रजस्वला होते तशीच धरणीही रजस्वला होते अशी आदिमानवाची धारणा होती.
 अंबुवाची उत्सवः पृथ्वीची रजस्वला अवस्था -
 कृषिपराशर या कृषिशास्त्रीय ग्रंथात (रचनाकार सुमारे इ.स. ६ ते ८ वे शतक) पृथ्वीच्या रजस्वला अवस्थेचा काळ आणि त्या काळात वर्ज्य क्रिया यांचा उल्लेख आहे. स्त्रीच्या रजस्वला अवस्थेत पुरुष समागम वर्ज्य मानला आहे. तसेच पृथ्वीच्या रजस्वला अवस्थेत नांगर चालविणे वर्ज्य मानले आहे. नांगर हे पुरुष जननेंद्रियाचे प्रतीक मानलेले आहे. आसामात आषाढ महिन्यात अमती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. सामान्यतः प्रतिवर्षी मृगशीर्ष नक्षत्राचा चतुर्थ चरण आणि आर्द्रा नक्षत्राचा प्रथण चरण या तुफान वृष्टीच्या काळात कामाख्या ही रजस्वला आहे असे मानले जाते. कामाख्या पीठ भारतातील महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. येथे सतीची योनी गळून पडली अशी कथा आहे. ही देवी योनीरूप आहे. प्रतिवर्षी आषाढ शुक्ल ६ अथवा ७ पासून १० अथवा ११ पर्यंत अंबुवाचीचा काळ मानला जातो. या काळात आसामातील काही ठिकाणी मातीच्या घटात धान्यबीज आणि पाणी घालून ठेवतात. अंबुवाचीचा काळ संपताच बीजांकुरानी भरलेला घट नदीच्या प्रवाहात सोडून देतात. काश्मिरात हा काळ फाल्गुन पंचमी ते अष्टमी मानला जातो. यास राज्ञीस्नापन म्हणतात. माळवा गुजरातेत तसेच महाराष्ट्रातील काही भागांत राणूबाई रांदल देवी या सूर्यपत्नीची पूजा केली जाते. चैत्रकृष्ण अष्टमी ते पंचमी हा काळ या व्रताचा असतो. महाराष्ट्रात जेथे भातशेती होते तेथे लावणीपूर्वी 'सात' नावाचा विधी केला जातो. नागपंचमीच्या काळातील तीन दिवस शेत नांगरीत वा उकरीत नाहीत असा रिवाज आहे. केरळात उछारल या उत्सवाची माहिती श्री पद्मनाभ मेनन यांनी केरळच्या इतिहासावरील ग्रंथात दिली आहे.
 केरळात हा उत्सव शेतीचा हंगाम संपल्यावर मकरम महिन्याच्या अखेरीस (जानेवारी - फेब्रुवारी) साजरा करतात. पहिल्या दिवशी धान्यागारांच्या दारांना काटे व केरसुणीचे फड लावून ती बंद करतात. तीन दिवस ती उघडत नाहीत. या काळात धान्य विकत नाहीत. घर, अंगण, बागा यांची झाडझूड करीत नाही. सारवण वा शिंपण करीत नाहीत. शेतीच्या अवजारांना स्पर्श करीत नाहीत. चौथ्या दिवशी दारे उघडतात. त्यानंतर टोपलीभर पाने शेतात नेऊन खतात मिसळतात. शेताची भाजणी करतात.
 बंगालात हा उत्सव आषाढ शुक्ल सप्तमी ते दशमी करतात. या काळात दूधात आमरस मिसळून ते पितात. असे केल्यास वर्षभर सर्पदंशाचे भय राहत नाही अशी श्रद्धा आहे. सर्प हे पुरुषंद्रियाचे प्रतीक आहे. रजस्वला अवस्थेत पुरुष समागम करीत नाहीत. नाग स्वतः पुरुषाचे प्रतीक असल्यामुळे तो रजोद्रव्य पिणाऱ्यांना स्पर्श करणारा नाही अशी यातूश्रद्धा या दुग्ध आमरस मिश्रित पेयामागे असावी.
 ओरिसातील रजउत्सव ज्येष्ठाचा अखेरचा दिवस आणि आषाढातील दोन दिवस अशा तीन दिवसांचा मानला आहे. या काळात नांगर धरणे, पेरणी करणे, खोदणे कुटणेया क्रिया बंद ठेवतात विशेषतः कुमारी मुली आणि नववधू अनवाणी पायांनी भूमीला स्पर्श करीत नाहीत. केवळ फळे खाऊन राहतात. हिंदोळ्यावर झुलत गाणी म्हणतात. महाराष्ट्रातही नागपंचमीच्या काळात झुला अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून तीन दिवस जमिनीला दुखवीत नाहीत याची चर्चा नागपंचमी उत्सवाच्या वेळी विस्ताराने केली आहे.
 कौमार्य अनाघ्रात असते -
 कौमार्याची कल्पना अतिशय मधुर आणि सुंदर आहे. कौमार्य हे अनाघ्रात असते. स्त्रीजातीची सुकुमारता आणि सर्जन क्षमता त्यातून व्यक्त होते. कौमार्य हे विकासोन्मुख असते. तुळस, जाईची वेल, केळी-कर्दळी, रुई यांची तुलना कुमारिकेशी केली जाते. कवि कालिदासाच्या 'शाकुन्तलम्' मध्ये शकुन्तला जेव्हा दुष्यन्ताकडे जाण्यास निघते तेव्हा जाईच्या वेलीत तिच्या उत्तरीयाचे.... ओढणीचे टोक अडकते. जणु जाईची वेल तिला प्रेमाने अडवीत असते. छिंदवाड्यातील भारिया आदिवासी कुमारिकेला रुईच्या झाडाची उपमा देतात. व्यवहारात सर्वसाधारणपणे ज्या स्त्रीशी पुरुषाचा शारीरिक संबंध आलेला नसतो अशा स्त्रीस कुमारिका म्हटले जाते. स्त्रीचा पुरुषाशी समागम होऊन ती सुफलित होते व तिच्या गर्भात नवा जीव वाढू लागतो तेव्हा ती गर्भवती होते. तिची कुमारिका अवस्था संपून ती मातृत्वाच्या दिशेने विकसू लागते. बालक जन्माला घातल्यावर ती माता होते.
 कन्या शब्दाची व्याप्ती -
 महाभारतातील वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य कुंतीला म्हणतो, ' हे कुंती कन्या शब्दाची उत्पत्ती 'कम्' धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा असणे ही लोकांची स्वाभाविक स्थिती नसून विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत.यास्तव तू माझ्याशी समागम कर, समागम केल्यावरही तू पुनरपि कुमारिकाच म्हणजे अक्षतयोनी राहशील आणि हा प्राचीन सनातन धर्म आहे. आदिपर्वाच्या ११२ व्या अध्यायात कुंतीचे व पंडूचे संभाषण दिले आहे. त्यात प्राचीनकालीन स्त्रीधर्माचे निरुपण करताना पंडू म्हणतो, 'अतिप्राचीनकाळी कन्या कौमार्यावस्थेपासून पतिमर्यादेचा अतिक्रम करीत व तो अतिक्रम अधर्म समजला जात नसे. हे सारे तत्कालीन समाजाला संमत होते. पुढे तो सांगतो की, हे सनातन धर्मतत्त्व स्त्रियांना सुखप्रद असल्यामुळे उत्तर कुरु क्षेत्रात हा व्यवहार आजही (महाभारत काळात) आहे.'
 यु म्हणजे जुडणे. युवक म्हणजे जुडणारा वा समागम करणारा. अतिप्राचीन आर्षसमाजात समागम करण्यास योग्य अशा युवक, युवतीना संभोग करू देत.
 स्त्रियः पवित्रमतुलम् -
 यावरून असे लक्षात येते की, 'कुमारिका ही सुफलित होण्यासाठी सर्वांगाने उत्सुक आणि उत्फुल्ल अशी, जिच्यातील उर्वरा शक्ती वा सर्जनक्षमता पूर्णत्वाला पोहोचलेली आहे, यातुशक्तीने अपरंपार भारलेली जणु भूमीच, अशी श्रद्धा अतिप्राचीन काळी असावी. वराहमिहीर बृहत्संहितेमध्ये लिहितो -
  स्त्रियः पवित्रमतुलं नैना दुष्यन्ति कहिंचित्।
  मासि मासि रजोहयासां दुष्कृतान्यपकर्षति ।।
     (वराहमिहिर इ.स. पूर्व ३३)
 अतुलनीय शुद्ध स्त्री जीवन कशामुळेही डागाळले जात नाही. कोणत्याही कलंकांचा निरास दर महिन्याला करणारी शक्ती निसर्गतःच त्यांच्या ठायी आहे.
 कन्याराशी : एका हातात धान्याचा अंकुर दुसन्या अग्नी -
 अतिप्राचीन समाजात 'स्त्री' ही सर्जनाचा केन्द्रबिंदू मानल्याने त्यांच्या सर्व रुपांना समाजात सन्मान होता. निर्णयाचे स्वातंत्र्य होते. त्या करारी, शेतीउत्पादन करणाऱ्या, उत्पादनाचे कुलातयोग्यरीतीने वाटप करणाऱ्या, वस्त्र विणणाऱ्या, कुलवा त्या वसाहतीचे व्यवस्थापन करणाऱ्या असत. त्यामुळे आजही प्राचीन देवींची रूपे पाहिली तर त्यांच्या एका हातात धान्याचे कणीस तर दुसऱ्यात परशु वा शस्त्र दिसते. कन्या रास ही बारा राशीपैकी सहावी. दीपिका या ग्रंथात तिचे वर्णन, 'तिच्या एका हातात धान्याचा अंकुर व दुसऱ्या हातात अग्री असून, तिचे नौकेत उभी असलेली स्त्री' असे केले आहे. ती अग्नीसमान तेजस्वी आणि पृथ्वीसमान नवनिर्मिती करणारी असते असा समज समाजात होता. जिथे संवेदना असते तिथेच निर्मितीची शक्ती असते. व्यास महर्षिनी द्रौपदीचे व्यक्तिचित्र रंगवताना भाविनी, मनस्विनी, अग्निकन्या ही तीन विशेषणे वापरली त्या मागे हीच भूमिका असावी.
 सातपुड्यातील देवीमोगऱ्याची याहामोगी देवता समृद्धीची देवता आहे. तिला नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ते नवे धान्य घरात आणत नाहीत. असाच रिवाज महाबळेश्वर परिसरातील ठाकर समाजात आहे. योगेश्वरीच्या हातातही धान्याचे कणीस आहे आणि ती कुमारिका आहे.
 हिंदुस्तानचे बदलते रूप आणि स्त्री -
 सर्वसाधारणपणे महाभारत काळापासून, अतिप्राचीन काळात स्त्रीचे समाजात असलेले स्थान आणि रूप बदलत गेले. पूर्ववैदिककाळात स्त्रीला नंतरच्या मानाने अधिक स्वातंत्र्य होते. ती वेदान्तचर्चेत गार्गीप्रमाणे भाग घेऊ शके. कुटुंबसंस्था उत्तरोत्तर पुरुषकेन्द्री झाली. तरीही पुनर्विवाह करण्यास तिला कसलीही आडकाठी नसे. मात्र शौर्ययुगात स्त्रीचे स्वातंत्र्य काहीसे हिरावले गेले. 'स्त्रीने वेदाध्ययन करणे हे देशात बजबजपुरी माजल्याचे लक्षण आहे' असे सांगून तिला अध्ययनापासून परावृत्त केले गेले.
 १०विल ड्युरांटच्या मते वैदिक हिंदुस्तानने (ख्रि.पू. २००० ते १०००) शौर्ययुगात (खि.पू. १००० ते ५००) प्रवेश केला. वेदांत वर्णिलेल्या परिस्थितीतून रामायण, महाभारत या महाकाव्यात चित्रित केलेल्या परिस्थितीत प्रवेश केला. व्यावसायिक चौकटी कठोर होत गेल्या. आनुवंशिकता आणि जातिभेद कडक होत गेले. स्त्रियांभोवतीची बंधने अधिक कठोर होत गेली आणि पुढे मध्ययुगात त्याची परिसीमा झाली. कारण भारतावरील परकियांची आक्रमणे वाढली.
 लिंग-निसर्गनिर्मित तर, लिंगभाव-समाजनिर्मित -
 या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. अतिप्राचीन काळात स्त्रीच्या सर्जनक्षमतेबद्दल मानवसमूहात गूढतामिश्रित कुतुहल आणि भययुक्त आदर असल्याने, स्त्री आणि पुरुष या दोनही लिंगांना - ही लिंगे धारण करणाऱ्यांना समान मानले होते. किंबहुना स्त्री बद्दल विषेश आदराची भावना होती. 'मदर गॉडेस' - आदिमाता - आदिशक्तीची संकल्पना त्यातून आली. ही दोनही लिंगे समर्पित भावनेने एकत्र आल्याशिवाय सर्जन होत नाही याची जाणीव त्यांना झाली. योनिपूजा आणि लिंगपूजा अतिप्राचीन काळापासून भारतात रुढ आहे. 'बीजा' चे महत्व जाणल्यावर दैवी दाम्पत्याची संकल्पना निर्माण झाली. सुरुवातीस या दांपत्यातील उभयतांचे स्थान बरोबरीचे...समान होते. उत्तरोत्तर त्यात परिवर्तन होत गेले. शिव आणि पार्वती हे आदिदाम्पत्य सोडल्यास इतर दाम्पत्यांत 'स्त्री'ला दुय्यमत्व येत गेले. ज्या देशात.....मानव समूहांत कृषिजीवींचे स्थान मध्यवर्ती वा महत्त्वाचे होते तेथे मातृसत्ताक समाजव्यवस्था होती. भारतातील अतिप्राचीन समाज कृषिजीवी होता. मातृसत्तेचे अंधुक अवशेष केरळातील नायर, हिमालयातील खासी जमातीत सापडतात. भारताचा इतिहास द्रविड, आर्य, दस्यु, नाग, असुर, पणिन्, दास अशा अनेकविध टोळ्यांच्या आगमनातून, त्यांच्यातील संघर्ष, समन्वय आणि स्वीकार प्रक्रियांतून घडत गेला आहे. मात्र आजही अतिप्राचीन काळापासून भारतीय लोकजीवनाचे कृषिजीवनाशी असलेले.....जडलेले अतूट नाते, भारतभरच्या विविध सणांतून, व्रतांतून, वीधीतून आणि त्यांच्याशी जोडलेल्या गीतांतून दृगोचर होते आणि त्यातून प्रथमावस्थेतील कृषिजीवनात स्त्रीच्या विविध रूपांना समाजात असलेले महत्त्वाचे स्थान आणि त्यांची समाजातील तसेच कुटुंबातील सन्माननीयत्व जाणवते. जोवर कृषि आणि कृषिनिर्भर (वस्त्र इ. व्यवसाय) व्यवसायातून स्त्रियांचा उत्पादक म्हणून सहभाग होता तोवर त्यांना निर्णयात सहभागी होता येत होते. चाक, नांगर आदीयंत्रांचा शोध, तसेच टोळ्यांत सातत्याने होणारे संघर्ष, गणसत्ताक व्यवस्थेतून राजसत्ताक व्यवस्थेत होत जाणारे परिवर्तन त्यातून निर्माण हाणारी अस्थिरता यामुळे मानवी विकासाच्या एका टप्प्यावर स्त्रियांचे समाजातील व कुटुंबातील स्थान दुय्यम होत गेले. घराच्या चौकटीत त्यांचे व्यक्तिमत्त्व बंदिस्त झाले. त्यांनी अध्ययन करू नये, प्रश्न विचारू नयेत, वाट्याला आलेले जिणे जगावे असे संकेत निर्माण झाले.
 स्त्रीच्या स्थानातील परिवर्तन : त्याचा व्रत, विधी, उत्सव यांवर परिणाम -
 पुरुष आणि स्त्री यांना निसर्गाने समान बुद्धी दिली, स्वरयंत्र दिले, विचार करण्याची शक्ती दिली, परंतु समाजाने त्यांच्यात हीनभाव निर्माण केला. सामाजिक न्यायापासून त्यांना वंचित ठेवण्याचा पायंडा पडला. त्यांचा समाजातील वावर बंदिस्त झाला. भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेचे सामर्थ्य लक्षात घेऊन निर्माण झालेल्या प्राथमिक कृषिजीवनात निर्माण झालेल्या विधींमध्ये, उत्सवांमध्ये बदल होत गेले. या उत्सवात गायले जाणारे मूळ मंत्र, वा गाणी यांच्या आशयात व अभिव्यक्तीत बदल होत गेले. उदा. भोंडला भुलाबाई सारख्या वर्षनसर्जनशी जोडलेल्या कुमारिकाच्या उत्सवातील मूळ गाणी लोप पावून, त्यात सासरी होणाऱ्या छळाचे वा गुदमरलेल्या श्वासाचे चित्र रेखाटले जाऊ लागले. मानवी विकासाच्या प्रवासात कुमारिकेला विवाहाच्या संदर्भात असलेले स्वातंत्र्य वा मोकळीक संपली. १५-१६ वर्षांच्या युवतीला सद्योतवधू..... गृहिणी व्हायचे की साधना करणारी ब्रह्मवादिनी व्हायचे याचा निर्णय घेण्याची सुविधा नष्ट झाली. आठ वर्षांच्या कन्येचा विवाह झालाच पाहिजे. ही प्रथा रुढ झाली. अर्थातच त्याचा परिणाम, या विधी, उत्सव, व्रतांवर झाला. श्रावणातील विविध व्रते व सण, भाद्रपदातील गौरीगणपती, भुलाबाई, आश्विनातील नवरात्र, इनाई, हादगा वा भोंडला, भराडी गौर, मार्गशीर्ष, पौषातील सटीचे नवरात्र, शाकंभरी, संक्रान्त, फाल्गुनातील वसंतोत्सव, चैत्रातील गौर, वैशाखातील अक्षय्यतृतीया, कानबाई इत्यादी सणव्रतोत्सवांच्या खोलात शिरल्यास आदिमकाळातील प्राथमिक कृषिप्रधान संस्कृतीत निर्माण झालेल्या या. व्रत,सण, विधी व उत्सवांमागील, कृषिउत्पादनांच्या समृद्धीसाठी, जमिनीची सुफलन शक्ती वाढावी यासाठीची श्रद्धा स्पष्टपणे जाणवते. त्या संकेतातून एकात्म भारतीय संस्कृतीच्या विकासातील काही महत्वाची पाने हाती लागतात त्यातून भिन्न भाषा,भिन्न वेश, भिन्न रीतीरिवाज यांनी नटलेल्या भारतीय जीवन पद्धतीतील सर्वांगीण एकात्मतेचे, कृषिविकासातील स्त्रियांच्या कृतिशील सहभागाचे आणि समाजातील स्त्रियांबद्दलच्या विश्वासार्हतेचे काही मुद्दे हाती येतात.
 भारतीय व्रतोत्सवांत कुमारिकांना विशेष स्थान -
 विवाह न झालेल्या, पुरुषांशी संबंध न आलेल्या, अनाघ्रात स्त्रीस कुमारिका म्हणतात. प्राचीन काळी स्त्रिया आजन्म अविवाहित राहत, त्यांना वृद्धकुमारी, जरत्कुमारी, ब्रह्मकुमारी असे म्हणत. असे अष्टाध्याईवरून कळते (अष्टा. २.२५) तुळस ही कुमारिकेचे प्रतीक असून कार्तिकात तिचा बाळकृष्णाशी विवाह झाल्यानंतरच विवाहमुहूर्त काढण्याची प्रथा आहे. मध्य प्रदेशातील एका ब्राह्मण जातीत वयात येणाऱ्या कुमारिकेच्या चोळीवर तुळसमंजिरी, रुईफुले यांचा कशिदा काढण्याची प्रथा आहे. भारतीय व्रतोत्सवांत कुमारिकांना विषेश महत्त्व असते. भारतातील वस्त्र विणण्याची कला स्त्रियांनी विकसित केली. 'वयन्ति' या शब्दाला पुल्लिंग नाही. पूर्वी विणण्याचा व्यवसाय स्त्रियाच करीत असाव्यात. भरतकाम आणि विणकामात रुईचे फुल, तुळसमंजिरी, वृंदावन, मोर यांना विषेश महत्त्व आहे. धनधान्य समृद्धीशी संबंधित व्रते कुमारिकांच्या सहभागाशिवाय पूर्णत्वाला जात नाहीत. कुमारिकांमधील सुफलनशक्ती पूर्णत्वाला पोहोचलेली असते ही श्रद्धा जगभरच्या संस्कृतींमध्ये होती. म्हणूनच त्या कृषिसंबंधित विधींमध्ये-सणांमध्ये अत्यन्त महत्त्वाच्या पूजनीय अशा मानल्या जातात. अंबाजागाईची योगेश्वरी-जोगाई, कन्याकुमारी या कुमारीमाता आहेत. 'कुमारी पुत्र' या संकल्पनेलाही समाजात विषेश स्थान मिळाले. दैवीप्रसादामुळे कुमारिकांना झालेले पुत्र दैवी शक्तीने भारलेले असतात, असा कथाबंध सर्वत्र आढळतो. एखाद्या वस्तूच्या स्पर्शाने, सूर्यकिरण स्पर्शाने वा एखाद्या सरोवरात स्नान केल्याने गर्भधारणा झाल्याच्या कथा लोकसाहित्यात आढळतात. कुंतीला कौमार्यभंग न होता 'कर्णा' सारखा तेजस्वी पुत्र झाला. महात्मा येशु ख्रिस्त हे 'कुमारीपुत्र' होते.
 आठव्या वर्षीच विवाह का? -
 आठ वर्षे, दहा वर्षे आणि बारा वर्षे हे कुमारी अवस्थेचे तीन महत्त्वाचे टप्पे. सोम, गंधर्व आणि अग्री हे कन्येचे दैवीपालक मानले आहेत. सोम तिचा प्रथम उपभोग घेतो, १०व्या वर्षी तिचे स्तन पुष्ट होऊ लागल्यावर गंधर्व तिचा उपभोग घेतो आणि रजोदर्शन झाल्यावर अग्नी तिचा उपभोग घेतो. म्हणून तिघांनी उपभोग घेण्यापूर्वीच वयाच्या ८ व्या वर्षी तिचा विवाह करण्याची रुढी पडली असावी. 'भारतीय विवाह संस्थेचा इतिहास' या शोधग्रंथात इतिहासाचार्य ११कै. वि. का. राजवाडे नोंदवितात की, अग्नी आणि प्रजोत्पादन यांचा नित्य संबंध दाखवणारी अनेक वाक्ये ऋग्वेद आणि यजुर्वेदात आहेत. 'प्रजनन ज्योतिः' (तै.सं. कांड ७, प्रपाठक, अनुवाद) या वाक्यात पुरुष जननेन्द्रियाला अग्नीची ज्योत म्हटले आहे. सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी मनुस्मृती लिहिली गेली. त्यावेळीही ८ व्या वर्षी मुलीचा विवाह करावाच हा सामाजिक संकेत होता. 'न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' म्हणणारा मनुही, गर्भवती स्त्रिया, वधू आणि युवती यांना पाहुण्यांच्या अगोदर जेवण द्यावे' असे म्हणतो. राजस्थानी समाजात, विवाहप्रसंगी देवक मांडताना जेथे अग्नी पेटविला जातो तेथेच पहिली रात्र नववधूवरांना काढावी लागते. अतिप्राचीन समाजात अग्निकुंडाजवळ, अग्नीच्या साक्षीने समागम केल्यास प्रजावृद्धी होऊन मनुष्यबळ वाढते अशी समजूत होती.
 गौरी : अष्टवर्षा कन्या -
 काळाच्या ओघात, स्त्री ही भूमीस्वरूप असून तिच्यावर विशिष्ट पुरुषाची मालकी असली पाहिजे, त्याने बीज पेरावे आणि उगवलेले पीकहीं घ्यावे ही रूढी निर्माण झाली. त्यातूनच तिच्यात स्त्रीत्वाची वैशिष्ट्ये निर्माण होण्यापूर्वी, सोम गंधर्व अग्नी यांनी तिचा उपभोग घेण्यापूर्वीच तिचा नियंता, मालक ठरविला जाऊ लागला.
 वा. शि. आपट्यांच्या संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची, अनाघ्रात - Virgin अशी पवित्र कन्या तसेच गौरी म्हणजे पृथ्वी (The Earth) वरुण पत्नी (Wife of Varuna), तुळशीचे झाड, माल्लिका उर्फ जाईची वेल हे होत.
 महाराष्ट्रात गौरीचे व्रत भाद्रपदात विविध प्रकारे पाळले जाते. गौरी म्हणजे अनाघ्रात अष्टवर्षा कन्या. कोकणातील चान्द्रसेनीय कायस्थ प्रभूच्या समाजात अष्टवर्षा अनाघ्रात कुमारिका तेरड्याची झाडे एका नव्या कापडात गोळा करून आणते. त्यालाच 'गौरी' म्हणतात. ही झाडे एखाद्या तांब्यात एकत्र ठेवून त्यांना 'गौर' म्हणून वस्त्रे दागिने घालून मांडतात. अष्टवर्षा कन्या ती झाडे घेऊन संपूर्ण घरातून फिरते. प्रत्येक खोलीत प्रवेश करताना तिला विचारतात -

  गौराई गौराई काय दिसतय?
  हिरामाणक्यांनी भरलेल घर दिसतय,
  गौराई गौराई काय पाहतेस?
  घरभर भरलेली समृद्धी पाहतेय.

 गौर आणतानाची गाणीही अशीच असतात.

  "गवराय आली गवराय आली'
  "कोणत्या पावलान?"
  "हळदी कुंकवाच्या"
  "हिऱ्या माणकांच्या..."

 गौर ही समृद्धी देणाऱ्या भूमीचे, सुफलनशक्तीने परिपूर्ण असलेल्या पवित्र अशा भूमीचे रूप असावे. 'गौर' म्हणजे तुळस. गौरीच्या काळात गायल्या जाणाऱ्या गीतात तुळशीचे संदर्भ विपुल प्रमाणात येतात.

  रानामागली तुळस पानाफुलांनी भरली
  जोडव्याच्या नादी गौर माझी लावली.....
  बरवे रान कशाचे?
  बरवे रान तुळशीचे
  तुळस गुंफा जाळी लंका
  जाळी जळो काजळ पडो
  ते बाई काजळ आम्ही दोघी लावू
  गौराईच्या माहेरी तांब्याच्या चुली.....

 गौरी म्हणजे पृथ्वी. आठ वर्षांच्या मुलीत, स्त्रीत्वदर्शक बदल होण्यास सुरुवात होत असावी असा समज प्राचीन कृषिसमाजात असावा. हे व्रत भाद्रपदात येते. तेव्हा पिके बाळरूप असतात परंतु निसवण्याअगोदरची झळाळी त्यावर पसरलेली असते. पिके आणि समृद्धी, 'गौरी' रूपात असतात. तिची केली जाणारी ही पूजा असेल का? लक्ष्म्या वा गौरी व्रतात 'कुमारिके'स सन्मानपूर्वक भोजन दिले जाते. सवाष्णीही अर्थात असतातच.
 कोकणस्थ ब्राह्मण समाजातील 'बोडण' -
 सुमारे ऐंशी टक्के कोकणस्थ ब्राह्मण समाजाची कुलदेवता अंबाजोगाईची योगेश्वरीदेवी आहे. ही देवी कुमारी आहे. या समाजात विवाह, मौंज, वास्तुशांत या सारखे महत्त्वाचे विधी घरात संपन्न झाल्यानंतर, तसेच नवस बोलल्यास बोडण भरण्याचा विधी केला जातो. त्यात 'कुमारिका' महत्त्वाची असते. बोडण शुक्रवारी वा मंगळवारी-देवीच्या वारी भरतात.ज्या घरी बोडण भरायचे त्या घरी तीन सवाष्णी

बाहेरच्या, एक सवाष्ण घरची आणि एक कुमारिका बाहेरची म्हणजे दुसऱ्या घरची बोलावतात. त्या घरी आल्यावर तुळशीला पाणी घालून, तुळशीजवळ त्यांचे पाय धुतात. हळदीकुंकू देऊन ओटी भरतात. प्रथम पाय धुऊन ओटी भरतात ती कुमारिकेची. त्यानंतर सवाष्णींची. त्या घरात आल्यानंतर बोडण भरण्यास सुरुवात होते. परातीत अन्नपूर्णा मधोमध ठेवतात. त्यावर कणकेचे पाच दिवे लावतात. कुमारिका महत्त्वाची असते. या परातीत एकेक वाटी दूध, दही, तूप, साखर आणि मध ओततात. घरची प्रमुख सुवासिनी अत्यन्त नम्रतेने कुमारिकेस विचारते 'देवी, आणखीन काय पाहिजे?' ती या पाच पदार्थांपैकी मागेल तो पदार्थ त्यात-परातीत टाकायचा. मग सगळ्या जणी पदार्थ एकत्र करून कालवायला लागतात. मायलेक, सासूसून सवाष्णी म्हणून एकत्र बसत नाहीत. तसेच कुमारिका दुसऱ्या घरचीच बोलावतात. बोडण भरताना एखादीच्या अंगात संचार होतो. तिला मग प्रश्न विचारतात. शकुन विचारतात.बोडणातील अन्नपूर्णेला वाहण्यासाठी कणकेचे दागिने करतात. त्यात बांगड्या, मंगळसूत्र, कुंकवाचा करंडा असतोच. तसेच कणकेची घागर लहानशी वा कुंभ करून त्यात थेंबभर दूध घालून तो कुंभ कणकेच्या झाकणाने बंद करतात. हे दागिने कुंभ देवीसमोर ठेवतात. आधी गणपतीची पूजा होते. नंतर अन्नपूर्णेची पूजा करतात. आरती केल्यानंतर बोडण कालवण्यास सुरुवात होते.
 मराठवाड्यात कोकणस्थ समाज मोठ्या प्रमाणावर स्थिरावला आहे. विवाहात मुलीला अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देण्याची परंपरा आहे.
 बोडणाचे ताम्हण वा परात ठेवतात, त्या खाली विशिष्ट रांगोळी काढतात. ती बोडणाचे वेळी काढावीच लागते.
 कुवांरभूमीची पूजा : कुमारीपूजा -
 श्रावण शुक्रवारी जिवतीची पूजा केली जाते. घरातील मुले निरोगी राहावीत, घर मुलाबाळांनी भरलेले राहावे यासाठी शुक्रवारी पुरणाचा नैवेद्य करतात. लेकुरवाळ्या स्त्रीस जेवण्यास बोलावून तिचा सन्मान करतात. त्या दिवशी सवाष्णीबरोबर कुमारिकेस बोलविले जाते. कुमारीपूजेचे विशेष महत्त्व नवरात्रात असते. नऊ दिवस कुमारिकेस जेवण्यास बोलवतात. हे शक्य नसेल तर तिला दूधसाखर तरी देतात. काही घरांतून पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन अशा चढत्या क्रमांनी नवमीस नऊ कुमारिकांची सन्मानपूर्वक पूजा करतात. त्यांचे पाय धुतात. त्यावर हळदकुंकू चढवतात. दूध वा खिरीचा प्रसाद देतात. काही घरी रोज एक नवा पदार्थ वाढवतात. त्यात फळांचाही समावेश असतो. गणेश ही प्राचीन लोक देवता असून तिच्या हातात विविध फळे आणि तांदळाच्या ओंब्या आहेत. लक्ष्मी, गणेशाच्या हातात कमळ आणि डाळिंब आहे. ग्रीक स्त्री देवतांच्या हातात डाळिंब असते. डाळिंबाचा रंग लाल, मासिक पाळीचा रजस्वल रंग लाल. म्हणून या रंगाचा संबंध सुपीकतेशी जोडला असावा. नर्मदेत सापडणाऱ्या लाल गोट्यांना गणेश दगड म्हणतात. गणेशफुलांचा रंगही लाल. सरस्वती ही कौमार्याचे प्रतीक मानली जाते. तिच्या संदर्भातला एक श्लोक असा-

 १२तव करकमलस्था स्फाटिकिंमक्षमाला
 नरवकिरणविभिन्ना दाडिमीबीजबुद्धया
 प्रतिखलुमनुकर्षन् येन कीरो निशिद्धः
 सभवतु मम भुत्यै वाणी ते मंदहासा।।

 गणेश आणि सरस्वती याज्ञानदायक देवता मानल्या जातात. चान्द्रसेनी कायस्थ प्रभूंमध्ये नवसत्रात कुमारिकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादात डाळिंबाच्या दाण्यांचा आवर्जून समावेश असतो.
 १३ही कुमारिका निरोगी, अव्यंग, निर्दोष, परिपूर्णा असावी असा संकेत असतो. ती साधारणपणे दोन ते दहा वर्षांची असावी असा प्रघात आहे. कुमारी पूजा करताना पुढील मंत्राने तिचे आवाहन करतात -
 मंत्राक्षरमयी लक्ष्मी मातृणाम् रूपधारिणीम्।
 नवदुर्गात्मिका साक्षात् कन्यामावाहयाम्यहम्।।
 (मंत्रक्षरमय, लक्ष्मीस्वरूप, मातृकांचे रूप धारण करणारी व साक्षात नवदुर्गात्मिका अशा कन्येचे मी आवाहन करतो.)
 लक्ष्मी वा समृद्धीची सर्व रूपे मूलतः कुमारिका असणाऱ्या कन्येने धारण केली आहेत. आदिमाया वा प्रकृती ही कुमारिकाआहे. नवरात्रीची पूजाही सुफलनशक्तीची पूजा आहे. धनधान्य समृद्धीचे कारण असणाऱ्या उर्वरा वा सर्जनशक्तीने परिपूर्ण असलेल्या अनंत, अक्षय, अभंग असणाऱ्या 'कुमारिका' भूमीची ती पूजा आहे.
 अन्नसमृद्धीशी जोडलेल्या यातुविधींचे कालौघात उन्नयन -
 प्राथमिक अवस्थेतील कृषिप्रधान मानवसमूहाने, सुफलीकरणासाठी यातुविधी करण्याची परंपरा निर्माण केली असावी. सर्जन आणि वर्षन या दोन्ही क्रिया सर्वसाधारणपणे आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि आश्विन या महिन्यांत कृतिशील असतात. पाऊस पडला तर धरणीच्या गर्भात बियाणे रुजून धान्य हाती येणार. भारतातील सुमारे ७० टक्के समाज आजही शेतीवर अवलंबून आहे. प्राचीन काळी अन्न हेच जीवन असल्याने आदिमानवाचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक व्यवहार 'शेती' वर केंद्रित झालेले असत. एकूणच लोकधर्म कृषिप्रधान होता. कृषिकर्माशी संबंधित यातुविधींची परंपरा अत्यन्त प्राचीन आहे. निसर्गात सातत्याने घडणारे बदल-ऊन, पाऊस, जनन, मरण, वनस्पती जीवन, बदलणारे ऋतू - आदिमानवाला अद्भुत वाटत.या क्रियांवर नियंत्रण करण्याची शक्ती मिळविणाच्या दुर्दम्य आकांक्षेतून सामूहिक यातुविधींची निर्मिती झाली असावी. जमिनीची सुफलनशक्ती वाढून अपरंपार धान्य निर्माण व्हावे, वेळवर पाऊस पडावा इत्यादी कृषीशी जोडलेल्या घटनांसाठी सामूहिक यातुविधी केले जात. आदिम मानवसमूहाची एकूण जीवनपद्धती 'यातु' विधींनी नियंत्रित होती असे मानले जाते. या यातुविधींचे सामर्थ्य समूहाच्या, मानसिकेत होते. वेद काळतही अन्नसमृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना म्हटल्या जात. छांदोग्य उपनिषदात १४'उद्गीथ' आहे 'उद्गीथ' म्हणजे अन्नसमृद्धीसाठी गायलेली गाणी. उद् म्हणजे श्वसन, गी म्हणजे वाणी आणि थ म्हणजे अन्न. संपूर्ण जगाचे जीवन अन्नावर निर्भर आहे याची जाणीव प्राचीन मानवाला होती, श्रम सुकर व्हावेत यासाठीही सामूहिक गीते गायिली जात असावीत. सामूहिक स्वरांमध्ये एक झपाटलेली लय असते. त्या लयीचा परिणाम परिसरावर, वातावरणावर होत असतो. या सामूहिक मंत्रात्मक गीतांचे कालौघात उन्नयन झाले असावे. हे यातुविधी सणांच्या, व्रतांच्या, उत्सवांच्या माध्यमातून तत्संबंधी गीतांतून जतन केले गेले.
 भाद्रपद, आधिन सर्जन वर्षनाचे महिने -
 पाऊस यावा,-सुफलनशक्ती वाढावी, भूमीचे रक्षण करणाऱ्यांची आराधना करावी या उद्देशाने केले जाणारे यातुविधी सामूहिक रूपात आणि प्रत्यक्ष नाट्याच्या स्वरूपात भूमीवर, उघड्यावर केले जात असावेत.आजही चांदण्या रात्री आदिवासी स्त्री पुरुष...तरूण म्हातारे, सारेच एकत्र येऊन मध्यात भाताची रास ठेवून, जवळ दिवा लावून 'धेना'...नमन गातात.
  घेना गायल्या रे आप धरतारी देवा
  घेना गायल्या रे आप घरतरे
  घेना गायल्या रे आप कणसरी देवा
  घेना गायल्या रे आप कणसरे....
 हा 'नारन' देवाचा धावा पिकाच्या समृद्धीशी असून भाद्रपदात नवे धान्य खाण्यापूर्वी केला जातो. महाराष्ट्रात भाद्रपद, आश्विनात कुमारिकांचे खेळोत्सव सामूहिक रीतीने साजरे होतात.
 विदर्भ खानदेशात भुलाबाई हा कुमारिकांचा खेळोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. तर कोकण पश्चिम महाराष्ट्रात हादगा व भोंडला मांडला जातो. भुलाबाई भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत बसवली जाते. हादगा हस्तनक्षत्रात मांडतात तर भोंडला नवरात्राचे १० दिवस खेळला जातो. विदर्भात याच काळात भराडी गौर आणि इनाई हे उत्सव कुमारिका साजरे करतात. आश्विन महिन्याला उत्तरेत 'क्वारका महिना' असे म्हटले जाते. खरिपाची...पाऊस काळात पेरलेली पिके या काळात निसवून त्यात अन्नरस भरले जातात. बीजाचे बाळपण जाऊन पुनर्निर्मिती करण्याची क्षमता, शक्ती त्यांच्यात येते. धरणीच जणु या काळात भराला येते. धरणीची सुफलनशक्ती पूर्णत्वाला पोहोचण्याचे हे दिवस. जणु या काळात ज्यांच्यातील असुशक्ती पूर्णत्वला पोहोचलेली आहे अशा कुमारिकांनी धरतीवर फेर धरावेत, मंत्रात्मक स्वर समूहाने गावेत, त्यामुळे भूमीची सुफलन शक्ती वाढून अन्नसमृद्धी आसंडून निर्माण होईल अशी धारणा या उत्सवांमागे असेल का ?
 या विश्वाचे व्यवहार सुरळीतपणे चालविणारी एक अद्भुत शक्ती आहे, ती सृजन करते, संवर्धन करते, तशीच ती संहारक आहे. ही शक्ती कल्पनारूप, अमूर्त आहे. तसेच ती रसमय आहे. विश्वातील सर्व वस्तूंमध्ये १५'असु' नामक यात्वात्मक शक्ती असते. ती निरनिराळ्या वस्तू वा व्यक्तीच्या ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असते. ही शक्ती विशिष्ट मंत्र वा विधींच्या साहाय्याने वाढविता वा कमी करता येते. वरुण ही पर्जन्य देवता तिला 'असुर' म्हणत.'असु' शक्तीने भारलेला तो असुर. भाद्रपद, आश्विन हे दोन महिने वर्षनसर्जनाच्या कळा पूर्णत्वाला पोहोचण्याचे महिने. त्या काळात भोंडला, हादगा, भुलाबाई हे कुमारिकांचे खेळोत्सव साजरे होतात ही बाब महत्त्वाची आहे.
 भोंडला वा हादगा -
 वर्षाकाळाचे चारही महिने भूमीची सुफलनशक्ती वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे. भारतीय सण, व्रते, उत्सव आदींचा आढावा घेतल्यास लक्षात येते की, या काळात पूजली जाणारी दैवते, पाऊस आणि भूमी यांच्याशी निगडित आहेत.
 भोंडला या शब्दाची व्युत्पत्ती लोकवाङ्मयाच्या अभ्यासक दुर्गाबाई भागवत१६ यांनी चार प्रकारे मांडली. ती खालीलप्रमाणे -
 १. भूमंडल - भोवंडल - भोंडला
 २. कोकणात उंडणीची फुले, ज्याला पुन्नागाची फुले म्हणतात. ती विपुल असतात. ही झाडे अतिशय शोभिवंत असतात. या फुलापानांचा हा उत्सव असावा.
 बहू + उंडल - भोंडल -भोंडला
 ३. कोकण हा भात शेतीचा भाग तेच महत्त्वाचे अन्न
 बहू + तेंडूल - तेंडूल - भोंडला
 ४. भोवंडल हा प्राकृत शब्द आहे. भोवंड म्हणजे गरगर फिरणे. फेर धरून नाचण्याशी या शब्दाचा संबंध असावा. ही गाणी फेराची असतात. हादगा कोकण व पश्चिम महाराष्ट्रात खेळला जातो.
 १७कै. वि. का. राजवाडे यांनी शतकापूर्वी हादगा उर्फ भोंडल्याच्या एकोणवीस गाण्यांचे संकलन केले. भोंडल्याच्या गाण्यांची ती पहिली संहिता होय. या लोकोत्सवामागचा ते केवळ हेतू शोधत नाही तर, या गाण्यातील शब्दाची व्युत्पत्ती शोधून, ते शब्द गाण्यात का आले असतील याचाही मागोवा घेतला आहे. कै. राजवाडे यांनी या खेळोत्सवांचा संबंध हस्तनक्षत्राशी जोडला आहे. मात्र घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळतांदुळाचा हत्ती मांडून, त्याभोवती फेर धरून गाणी म्हणून पूजा करतात हे त्यांना माहीत नसावे. त्यांनी मुली खडे वेचून आणून ते मांडतात. त्यांची पानाफुलांनी पूजा करतात व गाणी म्हणतात. असे नोंदवून ठेवले आहे. राजवाडे हे कोकणातले. चितपावन ब्राह्मणांत अनेक कुटुंबांतून खड्यांच्या गौरी मांडण्याची प्रथा आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी गौरीचे खडे आणतात. त्यावरून असे लक्षात येते की, कोकणातील मुली हादगा म्हणून खडे मांडत असाव्यात. 'भोंडला या शब्दाचा अर्थ माझ्या ध्यानात येत नाही, हातग्यालाच भोंडले म्हणत असावेत. परंतु निश्चित काही सांगतायेत नाही.' असे ते प्रांजलपणे कबूल करतात. १८श्री. अनंत आबाजी देवधर यांनीही भोंडल्याच्या गाण्यांचा व उत्सव करण्याच्या रीतीचा शोध घेतला आहे. मात्र त्यांनी वर्णिलेली हादगा मांडण्याची रीत कै. राजवाडे यांनी वर्णिलेल्या रीतीपेक्षा वेगळी आहे. कागदावर हत्ती काढून तो भिंतीला चिटकवतात. असे त्यांनी नमूद केले आहे.या कागदासमोर फळफळावळ मांडतात. जिच्या घरी भोंडला मांडतात, तिच्याकडे इतर कुमारिका-मुली डाळतांदूळ घेऊन जातात. ते एकत्र करून जमिनीवर, त्याच्यातून एका पुरुषाचे व बाईचे चित्र काढले जाते. काढलेल्या चित्रास बहिलोबा आणि बहिलोबाई असे म्हणतात. रोज एक प्रकारच्या फुलांची वा धान्याच्या कणसांची माळ त्यावर बांधली जाते. 'बहिलोबा' या शब्दाची व्युत्पत्ती लावाताना ते नमूद करतात की, 'बहुलता' या समृद्धीवाचक

शब्दापासून 'बहिलोबा वा बहिलोबाबाई ही अपभ्रंश रूपे झाली असावीत. मुली फेर धरून गाणी म्हणत असताना, पुढे मागे झुकून, डुलत आणि लयीत फिरतात असे त्यांनी नोंदवून ठेवले आहे.या लोकोत्सवामागील कृषिसमृद्धीसाठीच्या पूजनाची दखल त्यांनी घेतली आहे. भोंडल्याची अनेक गाणी असतात हे नोंदवून त्यातील सात लोकप्रिय गाण्यांचे त्यांनी संकलन केले आहे. कै. राजवाडे आणि श्री. देवधर यांच्या गाण्यात साम्य असले तरी पाठभेद आहेत.
 इंद्रपूजेचा संकेतः हादगा -
 महाराष्ट्र लोकसाहित्य मंडळाच्या अध्यक्षा आणि लोकसाहित्याच्या जाणकार डॉ. सरोजिनी बाबर यांनी लोकसाहित्याच्या २२ व्या खंडात - 'भोंडलाभुलाबाई' या ग्रंथात, महाराष्ट्राच्या विविध भागांत परंपरेने म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचे, जनसामान्यांपर्यन्त जाऊन संकलन करविले. तसेच या लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक १९श्री. मधुकर वाकोडे या संदर्भात नोंदवतात की 'हादगा' ही केवळ नक्षत्रपूजा नसून ती पावसाची, पर्यायाने इंद्राची पूजा असावी.
 'हस्त आणि शेतकरी झाला मस्त' अशी एक म्हण आहे. शेतीच्या दृष्टीने हस्त नक्षत्र अत्यन्त महत्त्वाचे मानले जाते. ते पहिल्या १४ देव नक्षत्रांपैकी एक आहे. खरिपाची पिके हाताशी आलेली असतात. त्या काळात पेरलेल्या धान्याची कणसे पक्व होत असतात. तर, रबीच्या पेरणीची तयारी सुरू झालेली असते. हस्ताचा पाऊस आणि ऊन भूमीला सुफलित करीत असतात. 'हादगा' ही सांकेतिक पूजा असून, ती हत्ती या मेघाचे प्रतीक असलेल्या चिन्हाभोवती गुंफलेली असावी. महाराष्ट्रात मेघपूजेची परंपरा फार जुनी आहे. 'ढगोमेघो' हा पाणदेवाची पूजा करणारा संप्रदाय महाराष्ट्रात आहे. पुरुषाच्या ठिकाणी असणारे वीर्य हे जलतत्त्व मानले जाते. हादग्यातील 'गज' हे जलतत्त्वाचे प्रतीक आहे. लक्ष्मी वा गौरी ही धरणीचे प्रतीक असून पावसाशिवाय मातीची कूस उजवत नाही. मेघाला हत्ती कल्पून केलेली ही पूजा 'पुरुषतत्त्वाची' असून भविष्यात फलित होणाऱ्या कुमारिका ही पूजा करतात असे श्री. वाकोडे नोंदवितात. त्यांच्या मते हादगा हा सुफलीकरणाची विधी आहे. गज-हत्ती हे जलतत्त्वाचे प्रतीक आहे. हत्तीच्या नावासाठी अमरकोशात चार पर्यायी नावाने जलतत्त्वाचा संकेत आहे. इरा म्हणजे जल. इराचा भरपूर साठा असलेला 'इरावान्'. 'इरावान्' मध्ये जन्मतो तो ऐरावत - हत्ती. अभ्रतांग, अभ्रवल्लभ ही दोन्ही नामे मेघसूचक आहेत. मेघाला मातंग, ऐरावत, हत्ती या संज्ञा दिलेल्या आढळतात. हादगा ही जलतत्त्वाची हत्तीच्या प्रतीकाद्वारे केलेली पूजा असून तो वीर्योत्पादक मेघ वा जलतत्त्वाचा सन्मान आहे. 'मेघदूत' या महाकाव्यात कालिदासने मेघाला 'कामतत्त्वा'चे प्रतीक मानले आहे. पुरुषाच्या ठिकाणी असलेले 'वीर्य' हे जलतत्त्व पौरुषाची खूण मानली जाते. हत्ती इंद्राला प्रिय असतो. हत्तीला जलक्रीडा अत्यन्त आवडते.
 गणपती, शिव आणि पार्वती या तीनही देवता अतिप्राचीन असून कालौघात वैदिकांनी त्यांचा नव्या स्वरूपात स्वीकार केला. गणपतीचे तोंड हत्तीसारखे असते. हस्ताच्या कृपेने लक्ष्मी.... धनसमृद्धी प्राप्त होते. म्हणजेच लक्ष्मी प्राप्त होते या जाणीवेतून 'गजलक्ष्मी' ची कल्पना निर्माण झाली असावी उदा. वेरूळच्या गजलक्ष्मीच्या चित्रशिल्पात हत्ती सोंडने पाण्याचा वर्षाव करीत आहे.
 भुलाबाई ही धरणीची, 'सर्जना'ची पूजा आहे. ती 'वर्षनाचे' प्रतीक असलेल्या हादगा उर्फ भोंडल्याच्या पूजेच्याही प्राचीन असावी. डॉ. मधुकर वाकोडे या संदर्भात नोंदवितात 'हादगा हा लौकिक स्वरूपाचा पर्जन्यविधी आहेतर भुलाबाईहा सुफलन विधी आहे. हादगा वर्षनशील तर भुलाबाई सर्जनशील आहे. अर्थातच नवनिर्मितीच्या क्षमता दोन्ही विधीत दिसून येतात.'
 वऱ्हाड, खानदेश, नासिक-मालेगावचा भाग, हिंगोलीजवळचा परिसर- या भागात भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यन्त भुलाबाई मांडली जाते. भुलाबाई म्हणजे पार्वतीबरोबर भुलोबा म्हणजे 'शिव' असतो. ही शिवशक्तीची पूजा आहे. सर्जनाचे प्रतीक पार्वती तर, शिव म्हणजे 'बीज'. ही पूजाही सुफलीकरणाचाच एक विधी आहे. या कुमारिकाच्या लोकोत्सवांचा चिकित्सक शोध 'हणमंताची निळी घोडी' या टिपणात डॉ. मधुकर वाकोडेंनी घेतला आहे. त्यांच्या मते, वरवर पाहता निरर्थक वाटणाऱ्या भुलाबाई वा भोंडल्याच्या गाण्यांत अप्रगत अवस्थेतील मानवी मनाचा आविष्कार आहे.
 स्त्री ही सर्जनाचे प्रतीक आहे. तारुण्यात प्रवेश करण्यास उत्सुक अशा मुलींत सर्जनशक्तीचा विकास व्हावा हा हेतू या उत्सवामागे असावा. स्कंद हा शंकाराच्या परिवारातला आणि आश्विन महिना हा स्कंदाचा. १६ वर्षांच्या खालील मुलामुलींना पीडा देण्याचा अधिकार स्कंदाने आपल्या अनुयायांना दिला आहे अशी कल्पना आहे.
 कुमारिकांचे उत्सव भारतभर -
 हस्त हे १३ वे नक्षत्र असून, ते कन्या राशीत येते. हे स्त्री नक्षत्र आहे. हा सहा तारकांचा पुंज असतो.आश्विन हा स्कंदपूजेचा महिना असून स्कंद ऊर्फ कार्तिकेयाची शक्ती 'कौमारी' ही मानली जाते. म्हणूनच या महिन्याला 'क्वारका महिना' म्हटले जाते. भोंडला, भुलाबाई, हादगा हे महाराष्ट्रातले आणि सांझी, मामुलिया हे मध्य प्रदेशातले कुमारिकांचे उत्सव याच काळात का येतात याचे रहस्य कळते. रसपूर्णतेला पोहोचणाऱ्या आणि उद्याची निर्मिती करण्यास सक्षम बनवणाऱ्या कुमारिकांना असुशक्ती प्राप्त व्हावी यासाठी केले जाणारे हे कुमारिकांचे उत्सव भारतभर साजरे केले जातात.
 उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशात सांझी उर्फ सांजाबाई याच काळात मांडली जाते. गुजरातेत कुमारिका गरबा खेळतात. उत्तर प्रदेशात नवरात्रात कुमारीपूजा करतात. तामिळनाडूत कोलवू हा उत्सव नववधू आणि कुमारिकांचा. धातूच्या वा मातीच्या बाहुल्यांची आरास मांडून मध्यभागी कलश ठेवून त्यावर सरस्वतीची स्थापना करतात. सरस्वती ही कुमारिकेचे प्रतीक आहे. हा उत्सव नवरात्रातील नऊ दिवस असतो. हा उत्सव आंध्रातही होतो. बंगालमध्येही नवरात्रात कुमारीपूजा केली जाते. उत्तर प्रदेशात नऊ दिवस कुमारिकांनी..... ज्यांना कंचिकांअे म्हणतात, त्यांची आणि एका लौंगड्याची.... लौंगडा म्हणजे कुमार, यांची पूजा करतात. अष्टमीला मोठी पूजा असते. जेवणात चण्याची उसळ, हलवा आणि पुरी असा प्रसाद असतो. तो नऊ दिवस करतात. शेवटच्या दिवशी कुमारिकांना कपडे करतात. किमान चुन्नी.... ओढणी तरी दिलीच जाते. ज्या परिसरात भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते किंवा जेथे आघाताचे (आषाढाचे....) म्हणजेच खरिपाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते तेथे सर्जन आणि वर्षन शक्तीची पूजा होते.
 वृक्षपूजा : भारतीय जीवन पद्धतीचे वैशिष्ट्य -
 झाडांची पूजा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून भारतात आहे. हादगा हे झाड कोकणात फार उपयोगाचे मानले जाते. पाऊस काळात त्याला बहर येतो. या फुलांची भाजी व पिठात फुले घालून भाकरीही करतात. कोवळ्या शेंगाची भाजीही करतात. झाडाच्या उपयुक्ततेतून त्याची पूजा केली जात असावी असे दुर्गाताई भागवताना वाटते. भारतीय जीवनपद्धतीत वड, पिंपळ, आवळी, तुळस आदींची पूजा होते. छत्तीसगढ भागातील कर्मानृत्य,ज्याला करमराही म्हणतात, झाडाभोवती फेर धरून केले जाते. आदिमानवाने निसर्गाशी आपेल नाते जीवन जगण्याच्या रीतीतून जडवले होते. देणारा आणि घेणारा तो. त्यामुळे निसर्गाच्या लीलांबद्दल कुतुहल होते तसेच भयही होते. या जाणीवेतून निसर्गाचे रक्षण करण्याची त्यांच्या लीलांचा सत्कार करण्याची, निसर्गसंकेतांना जपण्याची परंपरा मानवाने निर्माण केली. त्याचे दर्शन सण, उत्सव, व्रते, तत्संबंधी गीतांतून होते.
 भुलाबाई -
  भाद्रपदाचा महिना आला
  आम्हा मुलींना आनंद झाला
  पार्वती बोले शंकराला
  चला हो माझ्या माहेरा, माहेरा....
  गेल्याबरोबर पाट बसायला
  विनंती करू यशोदेला
  टिपऱ्या खेळू, गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी
  जाऊ, घरी जाऊ
 विदर्भ, खानदेशात भाद्रपदातील सायंकाळी घराघरातून टिपऱ्यांचे गाण्यांचे आवाज घुमू लागत. तरुणाईत प्रवेश करणाऱ्या किशोरींचे घोळके गल्लीबोळांतून उत्साहाने एकमेकींच्या घरांतून भुलाबाईची गाणी म्हणण्यासाठी रात्र होईपर्यन्त फिरतात. भुलाबाई आणि भुलोबाची मातीची जोडमूर्ती, भुलाबाईच्या मांडीवर गणेशबाळ. ही मूर्ती बाहेरच्या खोलीत वा ओसरीत, कोनाड्यात मांडली जाई. त्याला मखराने सजवले जाई. शेजारी तांब्यात नारळ ठेवला जात असे. भुलाबाईची अनेक गाणी आहेत. त्यापैकी किमान ३/४ गाणी प्रत्येक घरी गायिली जात. भोंडला वा हादग्यातही हीच प्रथा आहे. गाणी झाल्यावर प्रसाद ओळखण्याचा विधी असतो. प्रसाद तऱ्हेतऱ्हेच्या पदार्थांपासून करतात. तो गोडच असला पाहिजे असा संकेत नाही. भोंडला वा हादग्यात मात्र रोज एक खाऊचा प्रसाद वाढत जातो. हादगा हस्तनक्षत्रात खेळतात. अलीकडे भोंडला वा हादगा नवरात्रात खेळण्याचा प्रघात पडला आहे. भुलाबाईत मात्र एकच प्रसाद असतो. कोजागिरीच्या रात्री मुली एकत्र जमून जागरण करतात. रात्रभर खेळ, गाणी चालतात. प्रत्येक जण सर्वांसाठी वेगवेगळा खाऊ वा प्रसाद आणतात.
 भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता. भूमीसारखी सर्जनशील. हा खेळोत्सव म्हणजे भूमीचा पार्वतीचा सर्जनोत्सवच. शिवशक्तीची पूजा. एक प्रकारचा सुफलन विधी, शिव म्हणजे बीज तर शक्ती म्हणजे भूमी. भुलोबा हे शंकराचे प्रतीक या पूजेत खेळोत्सवात शंकराची फक्त हजेरी असते. या संदर्भात एक महत्त्वाचा संकेत लक्षात येतो तो असा की, स्त्री-माहात्म्य आणि कृषिविषयक समृद्धी यांचा अन्योन्य संबंध आहे. भूमीची उर्वराशक्ती, सुफलन शक्ती ज्या काळात वाढते त्या काळात स्त्रीप्रधान व्रते येतात. त्यात 'बीज' अध्याहृत असते. भुलाबाईच्या पूजनात श्री. वाकोडे यांना यक्ष संप्रदाय, शक्तिसंप्रदाय यांच्या खुणा दिसतात.
 भराडी गौर : कुमारिकांचा कलात्मक उत्सव -
 वऱ्हाडात भराडीगौर मांडली जाते. ती श्रावणात. सर्वसाधारणपणे हा उत्सव श्रावण पौर्णिमेपर्यन्त असतो. तो कुमारिकांचा असतो. जिच्या घरी गौर बसविली जाते तिला मुखरिण म्हणतात. नदी वा तलावावर जाऊन वाळूचा महादेव करतात. नदीतून वाळू काढताना,
  'खडक फोडू माती काढू
  निघा निघा गवराई'
असे पाच वेळा म्हणतात. वाळूचा महादेव पार्वतीचा जोडा परडीवर बसवून मुखरिणीच्या घरी थाटामाटाने मिरवत आणून प्रतिष्ठा करतात.
  खणखण कुदळी मण मण माती
  देऊळ खचलं चांदण्याराती
  चांदण्यारातीचे माणिकमोती
  घाल घाल गौराई आपुल्या नाकी ...
  अंगणी दूध तापे
  त्यावरी पिवळी साय
  गवराई लेकी
  आज राहून जाय
या सारखी अनेक गाणी मुली म्हणतात. गौरीचे विसर्जन पाण्यात करतात. विसर्जनाच्या दिवशी मुलींना जेवण दिले जाते. निमंत्रित मुली मुखरिणीला आहेर करतात. परड्या, पानांनी सुरेख सजवतात.
 इनाई : सरस्वती -
 हादगा, भुलाबाई, भोंडला, भराडी गौर आणि विदर्भातील महार समाजात दसऱ्याच्या वेळी इनाई बसवतात. दसऱ्याच्या आदल्या दिवशी दुपारी बारा वाजता जोड्याने रानात जातात. पाटीभर काळी माती पूजा करून वाजत गाजत घरी आणतात. दसरा सण चित्रा नक्षत्रात असेल तर मातीचा घोडा बनवून त्यावर इनाई सरस्वतीची मूर्ती घडवतात. हस्त नक्षत्र असेल तर हत्ती बनवून त्यावर इनाईची मूर्ती घडवतात. शेजारी तिचा सुकदेव आणि बाळ असते. मातीच्या मूर्तीची मांडणी झाली की समोर कणकेचे पाच गोळे ठेवतात. त्याला फळ म्हणतात. पाचदहा लिंबे, मातीच्या पणत्या, फुले असा आरतीचा थाट असतो. त्याला फुलोरा म्हणतात. भराडी गौरवतातही परडीवर फुलांची सजावट असते. रात्री इनाईच्या पुढे हल्या मारण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. दुसऱ्या दिवशी इनाईला पाटीत बसवून शेतात वाजत गाजत नेतात. तिथे तिला जिरवून टाकतात. मातीत माती मिसळवून टाकतात. गेल्या काही वर्षांत ही प्रथा नष्ट झाली आहे.
  वाजतगाजत गेले वरल्या राना
  वरल्या रानाची आणली माती
  चिकण माती थेंब थेंब पाणी
  आधी घडवा पुढचा हत्ती
  मंग घडवा पुढचा हत्ती
  मंग घडवा सकुपती
  मंग घडवा इनाई सरोसती
  मंग घडवा अडचं बाय...
अशा तऱ्हेची अनेक गीते स्त्रिया गातात. इनाईत सकु बाबा म्हणजे शंकर आणि इनाई ही सरस्वती आहे. सरस्वती कुमारिकेचे प्रतीक आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याठिकाणी सरस्वती आणि पार्वती यांना एकरूप मानले दिसते. यांचे बरोबर बाळ असते. भुलाबाईतही भुलोबा आणि चिलया वा गणेश बाळ असते.
 बीज : शंकर : क्षेत्रपाळ -
 श्रावण, भाद्रपदातील बहुतेक व्रते, उत्सव स्त्रीप्रधान आहेत. शंकर आणि पार्वती या देवता अतिप्राचीन काळातील असून काळाच्या ओघात वैदिक आर्यांनी त्यांचा स्वीकार केला. स्वीकारताना त्यांच्यावर आर्यकल्पनांची संस्करणेही झाली. गणसत्ताक समाज स्त्रीप्रधान - मातृसत्ताक होता. बीजाचे महत्त्व जाणल्यावर बीजाला.... शंकराच्या, क्षेत्रपाळाच्या रूपात स्वीकारले गेले. शंकराच्या पिंडीचा आकार पाहता असे लक्षात येते की, योनी आणि लिंग यांच्या समागमाचे, ज्यातून सर्जन होते, नवनिर्मिती होते, याचे ते प्रतीक आहे. आज त्यांची मंदिरे झाली तरी खरी मंदिरे सामान्य माणसांच्या जीवनातील विधी, उत्सव, सण, व्रते आणि तत्संबंधी गीते यांत आहेत. यातुशक्तीच्या संदर्भातील श्रद्धा आणि संकल्पना थेट मातीशी, तिच्यातील सर्जनतेशी जोडलेल्या आहेत.
 खेळणे, मांडणे आणि गाणे -
 कुमारिकांच्या उत्सवात 'मांडणे' आणि 'खेळणे' या शब्दांना विशेष महत्त्व आहे. हे उत्सव सामूहिकपणे 'खेळले जातात आणि आराध्य दैवतांची 'मांडणी' केली जाते. ही देवते मातीत पाण्यात बोळविली जातात. या उत्सवांत कर्मकांडांची कठोरता नाही. ते क्रीडा स्वरूपी असतात. आणि ते मोकळ्या रानात, अंगणात खेळले जातात. उत्सवात कृषिकर्म, बीरपूजा, गणदेवता यासंबंधीचे संदर्भ असतात.
 उदा. भुलाबाईच्या गाण्यात,
  हणमंताची निळी घोडी
  येता जाता कंबळ तोडी
अशी ओळ आहे. यातील हनुमंत हा क्षेत्रपाळ आहे. सात चिरंजीवांपैकी एक आहे. या वीरदेवतेचा दगड प्रत्येक गावांत शिवारात असतो. तो भूमीची उर्वराशक्ती सतत जागती ठेवतो. हा हनुमंत शिवाच्या परिवारीतील, भैरव स्वरूप आहे. त्यातून तो भुलाबाईच्या गाण्यात शिरला असावा. 'यक्ष' हे सकाम आराधनेत महत्त्वाचे मानले जातात. 'निळी घोडी' यातील निळा रंग भारतीय परंपरेनुसार कामतत्त्वाचे प्रतीक मानला जातो. भारतीय परंपरा बैल, नाग आणि घोडा यांना पुरुषतत्त्वाच्या शक्तीची प्रतीके मानते. अश्वशक्तीप्रमाणेच 'अश्विनी' शक्तिरूप सर्जनतेचे प्रतीक आहे. अश्विनात करावयाची पूजा कातमतत्त्वातून निर्माण होणाऱ्या सर्जनशक्तीची आहे. 'कंबळ' हा 'कमल' या शब्दाचा अपभ्रंश, ते स्त्रीत्त्वाचे प्रतीक असून, भूमी, योनी व स्त्री सूचक असते.
  माळी गेला शेताभाता
  पाऊस पडीला येताजाता
  पडपड पावसा थेंबोथेंबी
  थेंबोथेंबी आलव्या लोंबी
  आलव्या लोंबती अंकणा
  अंकणा तुझी सात कणसं
  भोंडला तुझी सोळा वर्स....
 भोंडल्याच्या "ऐलमा पैलमा गणेशदेवा' या नमन गीतातून पाऊस, विश्वाला फुलविणारा माळी, भातांच्या ओंब्या यांचे अंधुक संदर्भ सापडतात. तीळ, तांदळाचे उल्लेख येतात. भारतीय संस्कृतीमधील अनेक सणव्रते यांत तिळाला विशेष महत्त्व असते. तीळ हे मांगल्यदर्शक आहेत. समर्पणाचे प्रतीक म्हणून तिळाची अंजुली वाहण्याचा प्रघात आहे. तांदूळ हे 'अक्षत' तेचे-Virgin- प्रतीक आहेत. विवाहात अक्षदा म्हणून तांदळाचा उपयोग करतात. तीळ हे गळीत धान्य आणि तांदुळ प्राचीन काळापासून ज्ञात आहेत. एखाद्या उपवर मुलीस आई म्हणते, 'कुण्या घरचे तीळ तांदूळ तुझ्या नशिबात आहेत?' वरील ओळीतून धान्यलक्ष्मीचे ध्वनिचित्र प्रतीत होते. अन्नोत्पादनासाठी गायल्या जाणाऱ्या सामूहिक गीतांत.... स्वरसमूहांत एक मंत्रात्मकता असते आणि भोवंडून टाकणारी लय असते.
 भोंडला वा हादगा, भुलाबाई, भराडीगौर या मुलींच्या.... कुमारिकांच्या उत्सवांतील गाणी शिवेच्या आत नव्हे तर शिवेच्या पैल, मोकळ्या शेतात गायिली जात असावीत. ही गाणी समूहात गायिली जात असल्याने त्यातील स्वर अतिशय सुलभ आणि शुद्ध असतात. त्यांत हजारो वर्षांपासून पिढ्यानपिढ्या वाहत आलेली एकसुरात्मक अशी लय असते. त्या लयीतून त्यांचे पुरातणत्व जाणवते.
 कुमारिकांच्या व्रतात मांडणीला खूप महत्त्व असते. भुलाबाईचे मखर फुलांनी, रंगीत कागदांनी सजवले जाते. त्यांत कोवळी कणसे, धान्याची ताटे, फळे, उसाचे तुरे यांचा उपयोग केला जातो. विदर्भातील भराडी गौर मांडताना विविधरंगी फुलांनी झेले मांडले जातात. हादगा व भोंडल्यात पाटावर डाळ तांदूळ वा रांगोळीचा हत्ती काढला जातो. भोवताली फुलापानांची सजावट केली जाते. हत्तीच्या खाली पहिल्या दिवशी एक ठिपका काढला जातो. रोज एक एक ठिपका वाढवितात.
 साॅंझी : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील देखणा कुमारिकोत्सव -
 मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात 'साँझी' २० मांडताना विविध रंगी सजावट केली जाते. हिरवेगार शेण घेऊन ते मातीत कालवून त्याचे विविध लोकप्रिय आकार भिंतीवर चितारले जातात. या सजावटीला 'सांझीका खिल जाना' असे म्हणतात. डॉ. श्याम परमार त्यांच्या 'मालवी लोकसाहित्य का अध्ययन' या ग्रंथात ते लिहितात, 'सांझी कुंवारी कन्याओंका एक अनुष्ठानिका व्रत है। राजस्थान, पंजाब और व्रजके व्रतमें किंचित हेरफेर के साथ वही रूप लक्षित होता है, जो मालवजन पदमें विद्यमान है। महाराष्ट्र में 'भुलाबाई' और बुंदेलखंडमें 'मामुलिया का स्वरूप इसके अनुरूप है।'

 देखणे अंगण दूर चाललेय का ? -
 'सांझी' आदिवासी भागातही सजवली जाते. आदिमानवाच्या जीवनाची बैठक बव्हंशी समुदायानिष्ठ होती. त्यांच्या सणउत्सवांतून ती प्रतिबिबिंत होत असे. मध्य प्रदेशात आजही सांझीचे सौंदर्य जपलेले दिसते. कर्नाटक वा तेलंगणातील रंगावलीचे सौंदर्य आजही मनाला थक्क करते. राजस्थानातली गणगौरीची सजावट वा आंध्रातील बदकम्माची सजावट पारंपरिक सौंदर्याचा अनमोल ठेवा जपून केलेली दिसते. मात्र महाराष्ट्रातील या कुमारिकांच्या खेळोत्सवांतून ही सौंदर्य दृष्टी कमी होतेय की काय असा संभ्रम पडतो. रीत म्हणून चार रेषा ओढल्या जातात पण नाजूक रेषांनी नटूनथटून बसणारे देखणे अंगण दूरदूर चालले आहे.
 वात्स्यायनाच्या 'कामसूत्रात' उल्लेखिलेल्या ६४ कलांमध्ये रांगोळीचा उल्लेख आहे. रांगोळीसाठी सुरुवातीस धान्याचा उपयोग करीत. ते सुफलनशक्तीचे, कृषिसमृद्धीचे प्रतीक मानीत. आजही विशिष्टप्रसंगी, पूजेच्या वेळी तांदळाचा वा धान्याचा चौक मांडण्याची प्रथा आहे. सरस्वती, शिवलिंग, कामदेव यांच्या पूजनासाठी फुलांच्या आकृती काढीत.७ व्या शतकातील 'वरांग चरित्रात' पंचरंगी चूर्ण, धान्य, फुले यांच्या रांगोळ्यांचे उल्लेख आहेत. १० व्या शतकातील 'नलचंपू' या ग्रंथात उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळ्या काढल्याचे लिहिले आहे. १२ व्या शतकातील सोमेश्वराने लिहिलेल्या 'मानसोल्लासात' धूलिचित्र या नावाने रांगोळी आली आहे. श्रीकुमाराने "शिल्परत्नात' क्षणिकचित्र असा उल्लेख केला आहे. भारतीय संस्कृतीत रांगोळी अशुभनिवारक मानली जाते.
 आदिमानवाने अन्नसमृद्धीसाठी यातुविधी केले. त्यावेळीही मांडणी, विशिष्ट क्रिया यांना विशेष महत्त्व असावे. त्यातून ही कला विकसित झाली असावी. ज्यांच्यावर गर्भधारणा, मातृत्व या नैसर्गिक जबाबदाऱ्या पडलेल्या नाहीत, अशा कुमारिकांनी या कलेलायोगदान दिले असावे, समृद्ध केले असावे.आजही अंगणातसडा घालून रांगोळी काढण्याचे मंगलागौर, हरतालका आदिपूजेच्या वेळी चौरंग पानाफुलांनी सजवण्याचे काम मुलीच करतात. श्रावणाच्या सदाप्रसन्नवातावणाचे वर्णन करताना बालकवी लिहितात -
  सुंदरबाला या फुलमाला
  रम्य फुले पत्री खुडती....
 हीअभिव्यक्ती भारतीय जीवनपद्धती मधील कुमारिकांचे प्रसन्न आणि महत्त्वाचे स्थान सहजपणे व्यक्त करते. कवीच्या प्रतिमांतून लोकमनाच्या अंतरंगातील आदिबंध सहजपणे व्यक्त होतात. हे खरेच.
 कुमारिकांच्या उत्सवांतील मूलबंध -
 गणगौर, तीज, भोंडला, भुलाबाई, भराडी गौर, सांझी, मामुलिया बदकम्मा, कोलवू ही सर्व भारतीय व्रते कुमारिकांची आहेत. व्रते म्हणण्यापेक्षा कुमारिका उत्सव म्हणणे अधिक योग्य होईल. व्रत कल्पना ऋग्वेदात आढळते. वृ म्हणजे निवडणे या धातूपासून व्रत शब्द तयार झाला. व्रत म्हणजे विशिष्ट काळासाठी वा आमरण आचारावयाचा नेमधर्म. अमरकोशात व्रत आणि नियम हे शब्द समानार्थी आहेत तर 'मिताक्षरा' नुसार व्रत म्हणजे काही आचरण्याचा व काही न आचरण्याचा निश्चय. व्रतात आरंभ, संकल्प, पूजा, उपास, दान, जागरण यांना महत्त्व असते. राजस्थानात तीज, गणगौर या कुमारिकाउत्सवाचे उद्यापन केले जाते. त्यानंतर त्याची सांगता होते. तसे भोंडलाभुलाबाईच्या बाबतीत आज तरी सांगता समारंभ अस्तित्वात नाही. परंतु
  अंकणा तुझी सात वर्षे
  भोंडल्या तुझी सोळा वर्षे
या ओळीवरून या उत्सवाचे पूर्वी व्रतस्वरूप असावे असे वाटते. भोंडलाभुलाबाईची आजतरी साचेबंद चौकट नाही. किंबहुना कुमारिकाउत्सवात ती जाणवत नाही. वेदकाळात अन्नसमृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना गायिल्या जात. उपनिषदातच 'उदगीथ' अन्नसमृद्धीची गाणी आहेत. या प्रार्थना प्राथमिक अवस्थेतील मानवाने यातुविधींच्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या स्वरसमूहांचे उन्नयन झालेले रूप असावे असे मानले जाते.
 समाजव्यवस्थेच्या मुळाशी अर्थव्यवस्था -
 धर्मानंद कोसंबींच्या मते शेतीचा शोध आणि मातृसत्ताक समाजव्यवस्था यांची निर्मिती प्रथम भारतात आली. प्रो. ऱ्हेनेफेल यांच्या मते मातृसत्ताक जीवनपद्धती भारतात होती. मातृसत्ताक वा पितृसत्ताक समाजव्यवस्थेच्या मुळाशी त्या समाजाची अर्थव्यवस्था असते. मातृसत्ताक जीवनपद्धती अस्तित्त्वात असताना स्त्री ही अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग होती. जीवनव्यवस्था कृषिप्रधान होती. 'दुहिता' या शब्दाचा दोहन करणारी ती. या शब्दाला पुल्लिंग नाही. असाच आणखीन एक शब्द म्हणजे 'वयन्ति' म्हणजे विणणारी. महाभारतात धर्मराजाने राजसूय यज्ञ केला तेव्हा गावातील लोकांनी यज्ञात सहभागी व्हावे यासाठी फतवा काढला. सैनिक पाठविले. त्यावेळी जरद्गवा नावाची स्त्री यज्ञात सहभागी होण्यास नकार देताना सांगते की, 'माझी गव्हाची शेते भरात आली आहेत. घरात लोणी साठले आहे. ते मला विकण्यास जावयाचे आहे. ते अधिक महत्त्वाचे आहे'. यावरून असे लक्षात येते की स्त्रियांचा उत्पादनात, अर्थव्यवस्थेत जोवर सहभाग होता तोवर समाजातही त्यांना महत्त्व होते. नांगर, चाक आदी यंत्रांचा शोधा लागला, भारतावर होणारी आक्रमणे वाढली, पितृसत्ताक जीवनपद्धती दृढ होऊ लागली आणि आमूलाग्र बदल झाले. स्त्रीचे मौंजीबंधन होऊन त्यांनतर दिले जाणारे शिक्षण थांबले. उत्पादनातील तिचा प्रत्यक्ष सहभाग थांबला. पैतृक वारशाचे नियम स्थिर झाले. जातीय व्यवस्था दृढ होताना मातृसत्तेची पाळेमुळे निघृणपणे खणून काढली गेली असावीत. ती नष्ट करण्यासाठी ठोस प्रयत्न केले असावेत. त्यातूनच बालविवाह बहुपत्नित्व सतीची चाल यासारख्या दृष्ट रूढी आल्या असाव्यात. प्रो. ऱ्हेनफेल यांच्या मते हा संघर्ष एकूण जगातील मानवी संस्कृतीत आढळून येतो.
 पूर्ववैदिकांच्या काळातील स्त्रियांबद्दल असलेली सन्माननीयता नाहीशी झाली. स्त्रीला सर्वाधिकारांपासून वंचित करण्याचे काम नियमबद्धपणे केले गेले असावे. कारण
  'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता।
 असे म्हणणारा मनू
  'न स्त्री स्वांतत्र्यमर्हति।' असे म्हणतो.
 मैत्रायणी संहिता म्हणते, 'स्त्री ही असत्य आहे.' तैत्तरीय संहिता म्हणते 'हीन पुरुषापेक्षा चांगली स्त्रीही वाईट असते. कठ संहिता म्हणते, 'रात्री खुशामत करून नवऱ्याकडून मागण्या पूर्ण करून घेण्याची पात्रता स्त्रीत असते.'
 वरील विधाने स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याच्या प्रेरणाच कशा नष्ट केल्या गेल्या, होत गेल्या याची साक्ष देतात. मोहंजोदारो, हरप्पाची अत्यन्त प्रगत संस्कृती मातृसत्ताक होती असे प्रो. मार्शल म्हणतात. नायर, खासी समाजात आजही मातृसत्ता आहे. आजही शेतीव्यवसायात स्त्रियांचे योगदान अत्यन्त महत्त्वाचे असते. कालौघात अनेक आघात होऊनहीं, पुरुषसत्ताक जीवनव्यवथा स्वीकारूनही, भूमीशी निगडित अशा लोकाचारातून, विधीतून स्त्रीचे.... कुमारिकेचे महत्त्व कमी झालेले नाही. समृद्धी, पीकपाणी सुपीकता यांच्या देवता स्त्रीरूपीच आहेत.
 कन्येचा कृषियातुविधीत महत्त्वाचा सहभाग -
 वैदिक परंपरेपूर्वी स्त्री, कुमारिका आणि कृषिसमृद्धी, त्यासाठी आवश्यक वर्षावृष्टी, सूर्यप्रकाश यांच्यातील अनुबंधाबाबत काही 'आदिबंध' लोकमनात स्थिर झाले. आज ते आपल्याला काहीसे अव्यवहार्य किंवा चमत्कारिक वाटतात. उदा. प्रजापती आपल्या मुलीच्या मागे कामेच्छेने धावतो. या संबंधात नैसर्गिक घटनांचे विवरण केले तरी या चमत्कारिक समागमाची उपपत्ती लागत नाही. या संदर्भात 'अश्वत्थाची पाने' या ग्रंथात प्रा.सदाशिव अंबादास डांगे मांडतात. मुळात प्रजापती नसून प्रजापिता आणि दुहिता हे शब्द आहेत. ही दुहिता म्हणजे साक्षात मुलगी नसून धर्मदोग्ध्री म्हणजे जलवृष्टी करण्यास साहाय्य करणारी विधी कन्यका (Ritual-Girl) आहे. हे ध्यानात घेतल्याशिवाय या चमत्कारिक वाटणाऱ्या दन्तकथेचा अर्थ उलगडत नाही. सूर्य किंवा अंतरीक्ष हे धर्म होय. त्यातून स्त्राव करायचाम्हणजे जलवृष्टी करावयाची त्यासाठी समागमाचे हे विधीकृत्यं करावयाचे. आणि अशा प्राचीन वैदिक आणि अवैदिक परंपरांना उद्देशून 'इति-ह-आस', अशी वहिवाट होती असे म्हणत. अशा तऱ्हेच्या अतर्क्य कथांचे संदर्भ महाभारतातही सापडतात. कन्या अर्पण करून जलवृष्टी विधी संपन्न करण्याची ही परंपरा भोंडला भुलाबाई या कुमारिका उत्सवांचा, त्यांतील सर्जन वर्षनाबद्दलच्या संदर्भाचा, त्यातील फेर धरून गाण्यांचा उलगडा करण्यास मदत करू शकते. कन्याही अत्यन्त महत्त्वाची. तिच्यातील सुफलन शक्ती परमपदाला पोहोचलेली असते. तिचा कृषिविषयक यातुविधीत अत्यन्त महत्त्वाचा सहभाग होता. तिला समाजव्यवस्थेत जीवन जगण्याच्या परंपरेत अत्यंत महत्त्वाचे स्थान होते हे या कुमारिकांच्या उत्सवांचा शोध घेताना जाणवते.
 मूलतः कृषिसंलग्न यातुविधींच्या स्वरूपात निर्माण झालेल्या खेळोत्सवांचे स्वरूप कालौघात बदलत गेले. काही भागातील त्यांचे अस्तित्व नष्ट झाले. मराठवाड्यातील सात जिल्हे वर्षानुवर्षे निझामाच्या अमलाखाली होते. या भागात भोंडला व भुलाबाई मांडण्याचा वा खेळण्याचा रिवाज लुप्त झाला आहे. हिंगोली परिसरातला जो भाग विदर्भाच्या सीमेला लागटून आहे तेथे मात्र भुलाबाई काही घरांतून मांडली जाते. मराठवाड्यातील नामवंत चित्रकार भ.मा. पसरवाळे यांनी ही माहिती दिली. भुलाबाईत पूर्ववैदिक काळातील लोकधर्मी संस्कृतीच्या खुणा अधिक स्पष्ट रूपात दृगोचार होतात. खानदेशात वा विदर्भात भुलाबाई सर्व जातिजमातीत मांडली जाते. दलित समाजातही ती खेळली जाई. भोंडला वा हादगा मात्र उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जातींत खेळला जाई. मात्र दोन्ही खेळोत्सवांतील गाणी सारखी आहेत. एवढेच नाही तर भराडी गौर, इनाई यांची गाणीही त्याच प्रकारची आहेत.
 भोंडला, मुलाबाई, इनाई; भराडी गौर, यांच्या गाण्यांसबंधीचा विशेष शोध पुढील प्रकरणात घेतला आहे.