भूमी आणि स्त्री/भूमिका

विकिस्रोत कडून

 लोकसंस्कृतीची क्षितिजे दिगंतालाही व्यापून उरली आहेत. पाताळाच्याही पल्याड तिची मुळे पोहोचली आहेत. लोकसाहित्य ही प्रवाही घटना आहे. अबोध समूहमनाच्या (Collective Unconscious) प्रेरणेतून लोकसाहित्य आकाराला येत असते. आदिम काळापासून समूहमनाचे संचित व्यक्त करणाऱ्या काही संकल्पना त्यातून दृगोचर होत असतात. त्यांनाच आपण आदिबंध (Archytype) म्हणतो. या आदिबंधाचे आविष्करण, कालप्रवाहाचे झोत सातत्याने अंगावर घेत सतेज राहणाऱ्या, शेकडो...हजारो वर्षांपासून चालत आलेल्या लोकपरंपरांतून, शिल्प, चित्र, संगीत आदिकलांतून, लोकसाहित्यातून होत असते.
 सर्वसामान्य माणसाच्या भावविश्वाला सतत चेतना देणाऱ्या अनेक गोष्टी संकल्पना, श्रद्धा, परंपरा, रूढी, दैवतकल्पना, विधी, भाषा, उपासना पद्धती आदी माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्यालाच आपण लोकसंस्कृती म्हणतो. ती सांगता येत नाही. दाखविता येत नाही. अशरीरिणी संस्कृती, विधी, उत्सव, व्रते, सण, तत्संबंधी गीते, शिल्प, चित्र, नृत्य, संगीतादी कला यांच्या आविष्करणातून साक्षात् होत असते.
 खेड्यातील सामान्य माणसाच्या भावविश्वाचे दर्शन तसेच त्याची मातीवरील श्रद्धा पाहून लक्षात आले की, भाषा बदलली, प्रान्त बदलला, पोषाख बदलला, पदार्थांची चव बदलली तरी भारतीय माणसाच्या भूमीवरील श्रद्धा सारख्याच असतात. ज्या विधी, उत्सवांमधून त्या व्यक्त होतात, त्यांच्या भावाविष्कारातही साम्य आहे. राजस्थानातील गणगौर, कर्नाटक, महाराष्ट्रातील चैत्रगौर यांच्या विधीत 'तृतीये' ला महत्त्व असते. राजस्थानातील तीज, महाराष्ट्रातील हरतालिका किंवा आंध्रातील अटलतद्दी ही कुमारिकाव्रते भाद्रपद तृतीयेस साजरी होतात. महाराष्ट्र, कर्नाटकातला पाडवा वा आंध्रातला 'उगादी' असो, साजरा करण्याचा दिवस चैत्रप्रतिपदेचा. नव्या वर्षाची सुरुवात शेतीच्या संदर्भातील नवे निर्णय...त्यांची सुरुवात याच दिवशी सुरू होते.
 एम.फिल.साठीच्या शोधनिबंधाचा अभ्यास करताना लक्षात आले. महाराष्ट्रातील विविध खेळल्या जाणाऱ्या हादगा, भोंडला, भुलाबाई, भराडीगौर, इनाई या कुमारिकांच्या खेळोत्सवात आणि त्यांच्या गाण्यात मूलभूत साम्य आहे. अशा प्रकारचे कुमारिकांचे खेळोत्सव आषाढ ते आश्विन या काळात इतर प्रांतांत खेळले जातात. आषाढ - गुल्लवा - कर्नाटक, भाद्रपद, आश्विन - सांझी, मामुलिया - मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, भाद्रपद : आश्विन-बदकम्मा-आंध्र ,आश्विन-गरबारास-गुजरात. या आणि महाराष्ट्रातील खेळोत्सवांत, त्यांच्या मांडणीत साम्य आहे. हे खेळोत्सव कुमारिकांचे असून त्यात गाणे आणि प्रसाद यांना महत्त्व असते. या सर्वांगीण एकात्मतेमागचे मूलतत्त्व शोधण्याची भूमिका या शोध प्रबंधामागे आहे.
 अशा प्रकारचा अभ्यास विस्तारपूर्वक आणि सखोलपणे करण्यासाठी 'लोकांच्यात' जाणे, त्यांच्यातील होऊन राहणे; त्यांच्या मनात विश्वास निर्माण करीत त्याच्याजवळ जे 'लोकधन' आहे ते गोळा करणे, आवश्यक होते ते केले. त्यासाठी मानवलोक, मनस्विनी, जनार्थ आदी ग्रामीण भागात काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांची मदत झाली. नागपंचमीची माहिती गोळा करीत असताना भावठाणा परिसरातील डोंगरात राहणाऱ्या मोरफळीच्या राणूबाई, सुमनबाई कापसे यांनी सांगितले की नागपंचमीचा आदला दिवस, नागपंचमी आणि नंतरचा दिवस ज्याला पंचमीची कर म्हणतात, या तीन दिवशी जमीन नांगरायची, वखरायची नसते. जमिनीला कुदळ लावीत नाहीत. पेरीत नाहीत. स्त्रीप्रमाणे भूमी रजस्वला होते आणि त्यानंतरच तिच्यात सर्जनशक्ती येते. ती सुफल होऊ सकते. हा कल्पनाबंध भारतभर प्रस्तुत आहे. आसाम बंगालातील 'अंबुवाची', केरळातील 'उछारल', काश्मीरमधील 'राज्ञीस्नापन' हे विधिउत्सव या 'कल्पनाबंधा'तून आकारले आहेत. नागपंचमीचे तीन दिवस या 'कल्पनाबंधा'शी जोडले असावेत असे लक्षात आले. अंबाजोगाईतील या संदर्भातील माहितीकोश असलेले कै. आबा ऊर्फ शिवाजीराव लोमटेंशी संपर्क साधला. त्यांनी ठामपणे सांगितले, 'या काळात जमिनीला दुखवायचे नसते.'
 पारधे वाडीतील पेरणी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महिलेने पेरणी करण्याचे 'कसब' स्त्रियांच्यातच असते असे ठामपणे सांगितले. भोंडला भुलाबाईच्या विधी आणि गाण्यांचा शोध घेताना स्त्री आणि भूमी, स्त्री आणि शेती यांच्यातील.अतूट नात्याचा प्रत्यय आला होता. तसेच ही व्रते भूमीच्या सुफलीकरणाशी जोडली गेली आहेत हे लक्षात आले. मोकळ्या आभाळाखाली रानात, स्त्रियांची विशेष करून कुमारिकांची लयबद्ध पावले फिरली आणि त्यांना स्वरांची साथ असेल तर पीक उत्तम येते. या खेळोत्सवांत 'मांडणी'ला महत्त्व असते. स्त्री आणि कुमारिका व्रतात झोका असतो. द्यावापृथ्वी-आकाशभूमी यांच्या मिलनातून भूमी सुफल होते. या दोहोंच्या 'एक' होण्याचा सुभग संकेत 'दोलोत्सवातून' व झोका या कृतीतून मिळतो. डॉ. प्रभाकर मांडे यांच्याशी चर्चा करून शोधप्रबंधासाठी प्रस्तुत विषय निश्चित केला.
 शोधनिबंधाच्या विषयाकडे तटस्थ नजरेने पाहण्याची वृत्ती, चिकित्सक भूमिकेतून निरीक्षण करण्याची भूमिका आवश्यक असते. ही भूमिका नकळत ठसली,डॉ. राममनोहर लोहियांच्या 'ललितलेणी'च्या वाचनातून. डॉ. राम मनोहर लोहियांची प्रतिमा, एक ओबडधोबड राजकारणी म्हणून निश्चित झाली आहे. 'भलत्या वेळी बोलायची खोड असलेला हा माणूस.' 'न ब्रुयात् सत्यमप्रियम्' चा संभावित गुळमुळीतपणा न जाणणारा रसिक आणि रांगडा माणूस म्हणजे डॉ. राम मनोहर लोहिया. १९६६ च्या जानेवारीत त्यांची काही काळ भेट घेण्याचा योग आला. मी मराठी या विषयाचा अभ्यास करते आहे हे कळताच त्यांनी विचारले,"महाराष्ट्रात येताना मला नेहमीच चक्रधर आठवतो. माझे जेवण संपेपर्यंत मला महानुभाव संप्रदाय आणि चक्रधर यांच्या तत्त्वज्ञान व जीवनाशी संदर्भित, काही क्रान्तिकारी मुद्दे व घटना सांग'. या शोधनिबंधातून मला जे मांडायचे आहे. त्याला भलेभक्कम नैतिक आधार वरील उद्गार आणि ललित लेणी यातून मिळाला. डॉ. राम मनोहर लोहियांची मानसिक बैठक पूर्णपणे भारतीय होती. सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून राजकारणाकडे पाहणारा हा माणूस म्हणे, 'देव आणि दैव हे दोन्ही दुर्बळांचे घातक असतात.' त्यांना 'रामकृष्णशिवांत' जीवनविषयक दृष्टिकोनातील विश्वात्मकता दिसली होती. भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्राणभूत तत्त्व त्यांना त्यात दिसले होते. ते स्पष्ट शब्दात लिहितात, "रामकृष्णशिव ही भारतीयांना पडलेली परिपूर्णतेची स्वप्ने आहेत. भारतनाते आम्हाला शिवाची मती दे. कृष्णाचे अंतःकरण दे. रामाची कृती दे. अपरिमित मन देऊन आमची घडण कर. उन्मेषशाली हृदय दे, पण, जीवन मात्र संयमी कर."
 गेल्या काही वर्षांत धर्म, पंथ, जात, लिंग, भाषा यांच्या नावाने होणारी भांडणे अधिकाधिक तीव्र, छुपी आणि अनेकदा सशस्त्र होत आहेत. हजारो वर्षांपासून संघर्ष - स्वीकार - समन्वय - समरसता यांच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले एकात्म संस्कृतीचे वस्त्र चिंधाटले जात आहे. त्यातील 'लोक' हा चिवट व रेशमी धागा 'कच्चा' केला जात आहे. भारतीय संस्कृती, एकात्मता हे शब्द गुळगुळीत नाण्याप्रमाणे अर्थहीन व निःस्पंद झाले आहेत. मतांच्या राजकारणासाठी भारतीय संस्कृतीला वेठीला धरले जाईल की काय असे भय संवेदनशील अभ्यासकांना अस्वस्थ करून जाते.
 दुर्दैवाची गोष्ट अशी, 'हिंदू' हा जीवनप्रणाली जीवनरीती व्यक्त करणारा शब्द, धर्म, राजकारण, समाजकारण यांची समीकरणे मांडण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे जीवनरहाटी... जीवनसरणी दर्शविणाऱ्या या शब्दावर दूषित आवरणे चढली. प्रस्तुत शोधनिबंधाद्वारे भारतातील सांस्कृतिक एकात्मता हाच भारतीय राष्ट्रीयत्वाचा आधार आहे, ही भूमिका मला मांडायाची आहे. त्यासाठी 'ललितलेणी' आणि पू. सानेगुरूजींचे भारतीय संस्कृती' या दोन ग्रंथांनी भक्कम जमीन... भूमी दिली.
 १३व्या शतकानंतर भारतावर झालेल्या आक्रमणात 'धर्म' ही एक महत्त्वाची प्रेरणा होती. लाखोंचे जबरदस्तीने धर्मान्तर केले गेले. काहींना नाईलाजाने स्वीकारावे लागले. काहींनी मनःपूर्वक केले. त्याकाळात धर्माबाबतची तर्कशुद्ध भूमिका घेणारे राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व लाभले असते तर आज ज्या विद्वेषाला, दुहीला. तोंड द्यावे लागते ते द्यावे लागले नसते. असे असले तरी एक बाब लक्षात येते. धर्म बदलला तरी 'लोकधारणा' एक आहेत. गोव्यातील ख्रिस्ती समाज देवीला फुलांची छत्री श्रद्धापूर्वक अर्पण करतो. त्या संदर्भात मिळालेले उत्तर असे. 'आमच्या पिढ्या याच मातीतून उगवल्या. इथेच मातीत मिळाल्या. कुणा पूर्वजाने पाव टाकलेल्या विहिरीतले पाणी प्याले म्हणून तो किरिस्ताव झाला. पुढच्या पिढ्या किरिस्ताव म्हणून जगल्या. त्यावेळी त्याच्या पाठीवर हात ठेवून, पावाचा स्पर्श झालेले पाणी धर्म बदलू शकत नाही असे 'पोथी' वाचून धर्म सांगणाऱ्यांना खडसावून सांगणारा, सहृदय धर्मपंडित भेटला असता तर आज आम्ही हिंदू असतो. मूळ धर्म कोणताही चांगलाच. माणूसपण देणारा. शेवटी या मातीतून आमच्या मनात गोंदलेल्या श्रद्धा नाहीशा कशा होणार ? आम्ही दरवर्षी ही छत्री आमच्या गावदेवीला श्रद्धेने अर्पण करतो. तीच आमची आई.
 जोगाईला अनेक मुस्लिम स्त्रिया श्रद्धेने नमस्कार करतात. हळदीवाले, तडवी ही जमात अशी आहे की त्यांच्या स्त्रियांची नावे हिंदू असतात. त्यांचा पेहेराव भारतीय पद्धतीचा असतो. ज्यांचे धर्मांतर जबरदस्तीने झाले अशांच्या 'लोकधारणा' पूर्णपणे भारतीय आहेत. भूमीची पूजा करणारी 'येळा आवस' मुस्लिम शेतकरीही साजरी करतो.
 या सर्व गोष्टींचा विस्ताराने अभ्यास करताना लक्षात आले की भारतातील विधिउत्सव, व्रते, तत्संबंधी गाणी यांच्यातील एकात्मतेचा मूलभूत आधार 'भारतीय राष्ट्रीयत्व' हा आहे. डॉ. लोहियांनी स्पष्ट बजावले होते. 'जे मन भयहीन, वासनाहीन आणि नैराश्यहीन असते तेच योग्य विचार करू शकते.' हा वारसा व भूमिका घेऊन प्रस्तुत शोधनिबंधाची मांडणी केली आहे.

  'जमिनीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधी, उत्सव आणि गाणी' -
 या विषयाच्या शोधनास प्रारंभ करताना, विधी आणि उत्सव यांची मराठवाडा पातळीवर निश्चिती केली. सुरुवातीला बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील गावांना भेटी दिल्या. या भागात पेरणीपूर्वी तिफणीची पूजा करतात. सुताराचा सन्मान करतात. अकोला, खामगाव भागातही ही पूजा प्रचलित आहे. तिफणीची आरती ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रंथालयातून मिळाली. मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून मार्गशीर्ष अमावास्येस 'इळाआवस' शेतात जाऊन साजरी करतात. परंतु ही पूजा औरंगाबाद, परभणी, जालना, नांदेड या परिसरात होत नाही. परभणी परिसरात तिला 'इरवण आवस' म्हणतात. या दिवशी शेतीच्या अवजारांना धार लावतात. उमरगा परिसरात 'पोळा' आषाढ अमावास्येस करतात. उर्वरित मराठवाड्यात श्रावण अमावास्येस पोळा, बैलांच्या सन्मानाचा सण साजरा होतो. परभणी, जालना, नांदेड, औरंगाबाद परिसरास भेटी दिल्या. औरंगाबादहून फुलंब्री, सोयगावकडे जाताना आणि कन्नडच्या भागात अहिराणी भाषेचा गंध मराठवाडी भाषेस येऊ लागतो. हेल बदलतात. कन्नडमधील काही घरांतून भुलाबाई मांडली जाते. ही घरे सुमारे ५० ते ६० वर्षांपूर्वी या भागात स्थलांतरित झाली आहेत. हिंगोली, सेलू भाग विदर्भाच्या जवळचा. त्या परिसरात भुलाबाई मांडली व खेळली जाते. उदगीर, उमरगा, औरादशाहजानी, निलंगा या भागांतील मराठवाडी भाषेवर कन्नड, तेलगूचा परिणाम झालेला आहे. तीनही भाषांचे हेल एकमेकांत मिसळले आहेत. जमिनीच्या सुफलीकरणाशी जोडलेले महत्त्वाचे उत्सव म्हणजे लक्ष्म्या, नवरात्र,दिवाळी, संक्रान्त, गुढीपाडवा, होळी इत्यादी. ते सर्वच मराठवाड्यात साजरे होतात. या व्यतिरिक्त योगेश्वरी, तुळजाभवानीचे नवरात्र, खंडोबाचा षड् रात्रोत्सव, शाकंभरीचे नवरात्र अनेक घरांतून कुळाचार म्हणून मांडले जाते.
 लक्ष्म्यांचा सण 'कुळाचार' म्हणून सर्व जातिजमातींतून श्रद्धापूर्वक मांडला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्म्या मांडतात. महार समाज गेल्या काही वर्षांपासून लक्ष्म्या मांडीत नाही. शेती हा प्रमुख व्यवसाय असणान्या घरातून मात्र, स्त्रिया धान्याच्या राशी मांडून पूजा करतात. कोल्हापूर, रत्नागिरी परिसरात खड्यांच्या किंवा तेरड्याच्या झाडांच्या लक्ष्म्या मांडतात. मात्र त्यांना 'गौरी' म्हणतात. लक्ष्म्या वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे. ओव्या, गाणी खूप मिळाली. विदर्भात खानदेशात लक्ष्म्या मांडतात. परंतु खानदेशात लक्ष्म्यांपेक्षा 'कानबाई' फार मोठ्या प्रमाणात, अत्यन्त थाटात बसवली जाते. मराठवाड्यात लक्ष्म्या विधिपूर्वक काटेकोरपणे बसविल्या जातात. तीच विधिपूर्वकता आणि काटेकोरपणा कानबाईच्या मांडणीत असतो.
 भूमीच्या सुफलनशक्तीशी जोडलेल्या सणांचे प्राचीनत्व शोधण्याच्या दृष्टीने आदिवासींमधील या संबंधीचे आचार, गाणी यांची पाहणी केली. मराठवाड्यातील किनवट परिसरात गोंड आदिवासी राहतात. नाशिक परिसरातील ठाकर, धुळे भागातील पावरा व भिल्ल, डहाणू ठाणे भागातील वारली यांना भेटून माहिती गोळा केली. सेमाडोह, गडचिरोली भागातील आदिवासींना भेटून माहिती गोळा केली. गाणी गोळा केली. मराठवाड्यातील सामुग्री उर्वरित महाराष्ट्र आणि परप्रांतांतील तत्संबंधी लोकपरपंरा यांच्यातील साम्य पडताळून पाहणे महत्त्वाचे आहे. तद्नुसार कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या प्रांतांतील तत्संबंधी लोकपरंपरांची माहिती त्या समाजातील व्यक्तीकडून व प्रत्यक्ष भेटीतून घेतली. हैदराबाद, विशाखापट्टणम् भेटीत आंध्रातील बदकम्माची अत्यन्त देखणी सजावट आणि अंगण भरून टाकणारी रांगोळीची सजावट पाहिली. जयपूर मुक्कामात गणगौरीची मांडणी, मिरवणूक यांचा अनुभव घेतला. अहमदाबादेत नवरात्रातील गरब्याचे सौंदर्य, मांडणी यांची माहिती मिळाली. कर्नाटकातील माहिती त्या परिसरातील व्यक्तींकडून मिळाली.
 भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित विधी, उत्सव यांचा शोध घेताना लक्षात आले की, ज्येष्ठ ते कार्तिक या सहा महिन्यांत येणारे विधिउत्सव, भूमी, वर्षन आणि सर्जन यांच्या अनुबंधातून निर्माण झाले आहेत. मार्गशीर्ष ते फाल्गुन या काळात साजरे होणारे विधिउत्सव भूमी, सूर्य आणि सर्जन यांच्या अनुबंधातून निर्माण झाले आहेत.
 प्रत्यक्ष व्यक्तींकडून, परिसरास भेट देऊन माहिती गोळा करीत असतानाच या विषयातील नामवंत आणि चिकित्सक अभ्यासक दुर्गा भागवत, देवीप्रसाद चटोपाध्याय, पं. वासुदेवशरण अग्रवाल, वि. का. राजवाडे, इरावती कर्वे, डॉ. डी. डी. कोसंबी यांच्या ग्रंथांचे वाचन केले. तसेच महाराष्ट्रातील पूर्वसुरींच्या शोधनाचा अभ्यास व ग्रंथांचे वाचन केले. त्यामुळे या शोधनाचा पाया चोख करण्यास मदत झाली.
 भूमीच्या सर्जनाशी जोडलेल्या विधिउत्सवांचा शोध घेताना जाणवले की, या व्रतात स्त्रीप्रधानता आहे. त्याकाळातील स्त्रियांच्या जगण्याशी, त्यांच्या आर्थिक सामाजिक कौटुंबिक महत्त्वाशी ती जोडलेली आहे. मानवी जीवनाच्या प्रवासात, विकास प्रक्रियेत त्यांचे महत्त्व दुय्यम होत गेले. या प्रवासाचे निखळ प्रतिबिंब या विधीउत्सवांतून व तत्संबंधी गाण्यांतून दिसते. गेल्या दोन हजार वर्षांत तिच्या 'माणूस' म्हणून जगण्याकडे दुर्लक्ष झाले. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या दडपणाखाली तिला जगावे लागले. राजघराण्यांतील स्त्रियांना कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. पण ती पतीच्या अनुपस्थितीत. या शोधनातून असे लक्षात आले की या विधिउत्सवांतील स्त्रीप्रधानतेची मुळे, पूर्व वैदिक काळातील स्त्रीप्रधान जीवन पद्धतीत आहेत. आज भारतीय स्त्रीजीवनास शक्ती द्यावयाची असेल, त्यांना मध्यवर्ती जीवन प्रवाहात सहभागी करून, भारताच्या राष्ट्रीयत्वाला बळकट करायचे असेल तर सर्वसामान्य स्त्रीच्या जगण्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. स्त्री-प्रधान जीवन व्यवस्था वा पुरुषप्रधान जीवन व्यवस्थेपेक्षा प्रगतिशील भविष्याची दिशा, स्त्रीपुरुष समानतेवर, उभयतांच्या परस्पर समानधर्मी पूरकतेवर आधारलेला समाजच देऊ शकेल. त्या दृष्टीने या लोकधारणांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यातूनच एकात्म भारतीय संस्कृती हीच 'भारतीय राष्ट्रीयत्वाचा' मूलभूत आधार आहे हे सत्य समाजासमोर येईल.
 डॉ. राम मनोहर लोहिया लिहितात, 'स्त्रीपुरुषांना समान न्याय असावा. स्त्रीने भारभूत बनू नये. प्रसंगवश पुरुषाचा भार संभाळून तिने स्वतंत्रपणे मार्ग काढावा'.
 स्त्रीच्या समर्थ भूमिकेला ऐतिहासिक संदर्भ देणारे, तिच्यातील आत्मविश्वास जागवणारे, तिने प्राचीन काळी बजावलेल्या रचनात्मक भूमिकेचे समाजाला भान देणारे हे विधिउत्सव या शोधप्रबंधाद्वारे विस्ताराने व विश्लेषण करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.