भूमी आणि स्त्री/मी कृतज्ञ आहे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
मी कृतज्ञ आहे


 माझे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य प्रा. डॉ. प्रभाकर मांडे, सौ. मंगला वहिनी आणि परिवार, वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान संचालित महिला महाविद्यालयाचा परिवार, 'मानवलोक' परिवार, श्री. प्रमोद जोशी (ग्रंथपाल).
 श्रीमती गंगाबाई लोहिया आणि लोहिया परिवार, तसेच या प्रबंधासाठी ज्यांनी मला सहकार्य केले ते स्नेही, या प्रबंधाच्या अक्षर जुळणीचे काम करणारे सौ. अनिता व श्री. विनायक भालेराव. मुखपृष्ठ सजवणारे श्री. संतुक गोळेगावकर
 आणि
 माझे जीवनसाथी डॉ. द्वारकादास लोहिया
 या सर्वांची मी कृतज्ञ आहे.
निवेदन

 लोकसाहित्याबद्दलची उत्सुकता मनात उमलत्या वयापासून होती. भुलाबाई, खानदेशात मोठ्या प्रमाणावर मांडली जाई. आमच्या घरात आजोबा असेपर्यंत सणवार नियमितपणे होत असत. पण त्या सणावारांचा भर त्या निमित्ताने करावयाच्या पदार्थांवर अधिक असे. पूजा, विधी, मांडणी यांवर नसे. धुंदुर्मासात पहाटे उठून आई साग्रसंगीत स्वयंपाक करी. वांगी, उसावरच्या शेंगा, मेथी, गाजर आदी अनेक भाज्यांची मिसळीची भाजी, तीळ लावून केलेल्या बाजरीच्या गरम भाकरी, लोणी, तुरीचा डाळ, मुगाची डाळ घालून केलेली मसालेदार खिचडी, कढी असा बेत असे. सूर्य उगवण्यापूर्वी जेवणे होत. नागपंचमीला तांदळाच्या रव्याच्या, शिऱ्याच्या वड्या-खांडवी होत. गणेश चतुर्थीला उकडीचे मोदक, संक्रान्त दहा जानेवारीलाच करावी लागे. कारण टिळक पंचांगानुसार संक्रान्त दहाला असते. त्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या महिलेची परीक्षा घेणाऱ्या गुळाच्या पोळ्या कराव्या लागत. मराठवाड्यात केल्या जाणाऱ्या तेलच्या वेगळ्या. ही सगळी मजा ते असेपर्यंत होती.
 आई-पपांचे घर सर्वांसाठी खुले होते. ते नेहमीच भरलेले असे, पपांचा 'देव' या संकल्पनेवर विश्वास नव्हता. आईने त्यांचे विचार समजून घेऊन त्यांना एकरूपतेने साथ दिली. पण संध्याकाळ झाली की ती शुभंकरोती म्हणायला लावी. आजोबांनी देवघराचा आग्रह कधीच धरला नाही. मी दहावीत होते. कंठ फुटायला लागला होता. मी आजोबांना एकदा विचारलेच.
 "बापूसाहेब , तुम्ही एकादशी करता, सणावाराला सर्व पदार्थांनी साग्रसंगीत भरलेले ताट समोर लागते. सर्वांच्या घरात असलेले देवघर का नाही आपल्या घरात?"
 आजोबा मिनिटभर नुसते बघत राहिले नि त्यांच्या 'शैल्लमा'ला त्यांनी जवळ बसवून घेतले आणि सांगितले, 'अम्मा देवघर, देव पूजा हे सगळे मनाचे खेळ आहेत. शेजारचे आजोबा परदेशी जाऊन आले, मडमेला घेऊन आले. तरीही भटजीबुवा त्यांच्या घरी जाऊन साग्रसंगीत श्राद्ध करतात. का? तर ते भरपूर दक्षिणा देतात. आणि तुझा बाप कॉलेजात असताना माणसांबरोबर जेवला, समाजाच्या चौकटीत ती माणसे भलेही महार, मांग असतील पण ती माणेसच ना? तर त्याने सहभोजन केले म्हणून आपल्या घरी तुझ्या आजीचे श्राद्ध करण्याचे भटजींनी नाकारले.आणि त्या क्षणापासून माझा देव ब्राह्मण, कर्मकांड या सर्वांवरचा विश्वास पूर्णपणे उडाला. आधी फारसा नव्हताच, अम्मा , खरे शिक्षण मनात प्रश्न निर्माण करते. ते प्रश्न मनाला खरवडतात. पण सर्व सोडून देण्याचे धाडस त्या दिवशी आले. आपल्या घरातील श्राद्ध त्या दिवसापासून मी बंद करून टाकले. "सणाच्या निमित्ताने चवदार खाण्याची संधी ती का सोडायची ? तुझ्या आईनेही कधी देवघराविषयी विचारले नाही. घरचे देव तुझी मोठी काकू सांभाळते. तुला मांडायचे का देवघर ? आता बाजारात जाऊन चार देव आणून देतो ! जाऊ?"
 माझ्या मनातले सारे प्रश्न संपले होते. भाद्रपदातील माझी भुलाबाई मांडायला ते मदत करीत. त्यांच्या खोलीतच ती मांडली जाई. रोज सकाळी प्रश्न विचारीत 'हं मग आज खाऊ कोणता ? काय आणू बाजारातून ? कणसं आणू की लाल भोपळा ?' आई काय ते समजे आणि कुणालाही ओळखता येणार नाही असा खाऊ, प्रसाद करी.
 मुलाबाळांना दीर्घायुष्य देणारी जिवतीची पूजा, सद्बुद्धी देणाऱ्या बुध बृहस्पतीची पूजा, शेताचे रक्षण करणान्या आणि बहिणीच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नागोबाची पूजा श्रावणात आई आठवणीने करी. देवघर नसलेल्या घरात जिवतीचा कागद भिंतीला आदराने,श्रद्धेने चिटकवला जाई. श्रावणातल्या शुक्रवारो पुरणावरणाचा नैवेद्य दाखवून घरात धुणीभांडी करणाऱ्या विठामावशीला रांगोळी घालून ताट सजवून सवाष्ण म्हणून जेवायला घातले जाई. अशा या संगमेश्वरी घरात मी वाढले. तेव्हापासून मनात 'लोक' या शब्दाबद्दलची आत्मीय श्रद्धा रुजली. 'लोक' म्हणजे बाहेरचे असे कधी वाटलेच नाही. घरी येणाऱ्यांत पू. साने गुरूजी, एकेकदाच..... पण घरी आलेले, जवळून न्याहाळता आलेले लोकनायक जयप्रकाशजी, डॉ. राम मनोहर लोहियाजी. एसेम आणि ना.ग. गोरे जणु आमच्याच घरातले. कळू लागले तेव्हापासून या सर्वांचे साहित्य हाती आले. भारतीय संस्कृती, ललितलेणी आणि श्रवणबेळगोळच्या उभ्या डोंगरात बाहुबली स्वप्न कोरून काढणारा ना. ग. गोऱ्यांचा आरिशिनेमी यांनी मनाला संपृक्त केले. नवी दिशा दिली.
 १९८७ साली एम.फिल. च्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पंचेचाळिशी ओलांडल्यावर पुन्हा एकदा 'प्रत्यक्ष विद्यार्थी' होण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळी मनाचा बंद कप्पा उघडला गेला. 'लोकसाहित्य या विषयाचा विशेष अभ्यास करण्याचे ठरवले स्वयंभू संशोधक आणि मनाने शिक्षक असलेल्या प्रा. डॉ. प्रभाकर मांडेंसारखे गुरू लाभले. 'भोंडला भुलाबाई' च्या गाण्यांवर एम.फिल. केले. त्यावेळी असे लक्षात आले की भूमीच्या सर्जनाशी जोडलेल्या उत्सवांत स्त्री-प्रधानता आहे. या सणात कुमारिकांना विशेष स्थान आहे. ही व्रते, हे उत्सव, तत्संबंधी विधी, लौकिक 'धर्म' संकल्पनेशी जोडलेले नाहीत. लोकधारणांशी त्यांचे नाते आहे. या बाबींचा शोध घ्यावा या हेतूने प्रस्तुत विषयाची निवड केली. या शोधनासाठी प्रा. डॉ. प्रभाकर मांडे सरांकडेच नाव नोंदविले. एकूण विषयाचा फलक खूपच विस्तृत होता. विषयाचे सर्वांगीण रूप समजून घेण्याची जिज्ञासा असल्याने आणि कॉलेज घर वगैरेचा व्याप यांमुळे हा शोधप्रबंध पूर्ण करण्यास परिश्रम घ्यावे लागले.
 प्रत्येक क्षणी साथ देणारा साथी, त्याचा शेकडो खेड्यांशी - ग्रामीण जनतेशी असलेला संपर्क त्यातून सतत मिळत राहिलेले लोकज्ञान आणि शिष्याला सतत चेतना आणि प्रेरणा देणारे गुरू , या सर्वांच्या सहयोगातून हे स्वप्न जमिनीवर पाय टेकू शकले. गेल्या सात आठ वर्षांपासून केलेला प्रयत्न या ग्रंथाच्या रूपाने सर्वांसमोर ठेवीत आह.

- शैला लोहिया

 'किनारा'
 ३२, विद्याकुंज वसाहत,
 अंबेजोगाई - ४३१५१७.
 दूरभाष : (०२४४६) ४७०१६
 फॅक्स : ०२४४६-४७४९७