भूमी आणि स्त्री/काही खेळ-गाण्यांचा शोध- भोंडला, भुलाबाई

विकिस्रोत कडून


 भोंडला भुलाबाई मांडतात आणि खेळतात, स्त्रिया परंपरेने शिकतात, हे कुमारिकांचे लोकोत्सव, भोंडला भुलाबाईत जातीची चौकट नसते, व्रताभोवती एक चौकट असते, मूळ गाणी सोळा, गाण्यांचे पर्याय: कारणांचा मागोवा, लोकगीतांत समूहमनाचे प्रतिबिंब, गाण्यांचाशोथ, ऐलमा पैलमा : ऐल-पैल, हा संदर्भ शिवकाळातील असावा, उंडे आणि तीळ - तांदूळ, हा माळी कोण?, गीतातील नादमयता : ध्वनिचित्रे, गाणे - आला चेंडू गेलाचेंडू, गाण्यातील राम आणि सीतेचा संदर्भ, कृषिजीवनाशी निगडित, गीतातील राम डोंगरांत लपणारा का?, पुरुषप्रधान आर्य संस्कृतीचा संस्कार, मुंजक बाळ : ग्रामरक्षक वीरदेवता, एक मोहक प्रतिमा, गाणे ३ - अतूला मातूला चरणी चतूला, मावल्या : सात मातृका : सात घरच्या पाहुण्या, लोक लक्ष्मीचे रूप, भुलाबाई : गुलाबाई : संजाबाई, उमेचे माहेरपण आणि बाळंतपण, भुलाबाईचे नमन-गीत, खेळ खेळणारा खंडोबा, हनुमंत बाळ : वीरदेवता, गीतातील सीता : भूमीस्वरूपात, लोकगीत प्रक्रियांद्वारे बदलत राहते, राणूबाई : रण्णा सण्णा, भुलाबाईचे माहेर सोनारवाड्यात कसे?, खडतर नाती, माहूर गडाचा संदर्भ, नथीचा नखरा, येराल तसे उगवते, बाज आणि पाळणा, आम्हा मुलींना आनंद झाला, एक लिंबू झेलू बाई, लिंबू : जारण-मारण विधीतील महत्त्वाचे फळ, वीर हनुमान आणि दास हनुमान, पाण्याच्या शोधात वणवणणारी राणी, गाणे २ - काळा कोळसा झिक झिक वाणा, स्वरसमूहांचे आणि त्यांच्याशी जोडलेल्या, विधीस्वरूपाचे प्राचीनत्व, भाद्रपद आश्विनातील कुमारिकांचे उत्सव आणि त्यांतील कलात्मक अविष्कार, सांझी उर्फ संजाबाईची सजावट, रंगवल्ली : एककला, रांगोळीचे दोन प्रकार , रांगोळी : ऐतिहासिक उल्लेख, सांस्कृतिक देवाणयेवाण, सांजीची आरती, भुलाबाईच्या गाण्यांतील काही विधीसंबद्ध कृती, गीतांचा ठेका आणि पावली, भोंडल्याच्या गाण्यांची: झिम्म्याची लय,भोंडल्याची गाणी: शिवकाळातील आश्वासक, वातावरण, भारतीय संगीत परंपरा, या गाण्यांची छंदोरचना.


 हादगा उर्फ भोंडला आणि भुलाबाई या कुमारिकांच्या लोकोत्सवांविषयी इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, श्री. अनंत बाबाजी देवधर, महाराष्ट्रातील मान्यवर समाजशास्त्रज्ञ दुर्गा भागवत, विदर्भातील लोकसाहित्याचे मान्यवर संशोधक डॉ. मधुकर वाकोडे, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या अध्यक्षा डॉ. सरोजिनी बाबर इत्यादी लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी लिहिलेल्या शोधटिपणांचा आढावा यापूर्वी घेतला आहेच.
 भोंडला भुलाबाई मांडतात आणि खेळतात -
 हादगाव भोंडला अनुक्रमे सोळा व दहा दिवस खेळतात. भुलाबाई एक महिनाभर बसवतात. मुळातला हादगा हा उत्सव हस्तनक्षत्रात सोळा दिवस खेळला जात असावा. परंतु काळाच्या ओघात कदाचित सोय म्हणून त्याचे रूपांतर नवरात्रात दहा दिवस खेळावयाच्या भोंडला या उत्सवात झाले असावे. या संदर्भात पुणे, पंढरपूर, अहमदनगर, नाशिक येथील काही मुली व स्त्रियांकडून माहिती घेतली असता वरील विधानास पुष्टी मिळते. पंढरपूरच्या कै. श्रीमती घळसाची या ऐंशी वर्षांच्या आजींचे माहेर तासगावकडचे. त्यांच्या आठवणीनुसार हस्तातील सोळा दिवस त्या आठ नऊ वर्षांच्या असताना हादगा मांडीत असत. अहमदनगरची अजया पंचपोर सोळा वर्षांपर्यंत भोंडला खेळली. आश्विनप्रतिपदा ते दसऱ्यापर्यंत ती भोंडला खेळत असे. पुण्याच्या श्रीमती महाजन या साठीच्या भगिनींना भोंडल्याची गाणी फार आवडतात. त्यांची चार वर्षांची चिमुरडी नात सायली हिला भोंडल्याची सर्व गाणी पाठ आहेत. त्यांचे बालपण पुण्यात गेले. त्यांनी, नवरात्रातील दहा दिवस भोंडला खेळतात असे सांगितले व कोकणातील 'हादगा' हस्ताच्या काळांत सोळा दिवस चालतो असे सांगितले. हस्त नक्षत्र आश्विनात येते. हस्त नक्षत्राचा काळ आणि नवरात्राचे दिवस हे एकाच सुमारास असतात. गुजरातेत नवरात्रात 'गरबा' खेळला जातो तर आंध्रात 'बदकम्मा' नवरात्रातच मांडली जाते. वर्षनाचा सत्कार करणारा हा उत्सव हस्ताच्या मुहूर्तावर साजरा होणे स्वाभाविकच आहे.
 स्त्रिया परंपरेने शिकतात -
 राजस्थानात रांगोळीला 'मांडणा' असे म्हणतात. दिवाळीच्या निमित्ताने सारवलेल्या जमिनीवर अंगणात आणि घरातही काव आणि चुनखडीच्या साहाय्याने लालपांढऱ्या रंगात विशिष्ट आकृती पारंपरिक शैलीने काढल्या जातात. चौपट, पगल्या लक्ष्मीची पावले, चोपड़ा (हळद कुंकवाचा चौफुला) इत्यादी आकार काढतात. बंगालात अल्पना मांडली जाते. कर्नाटक, आंध्र, तामिळनाडूतही रांगोळीचे प्रस्थ आहे. सुने अंगण क्वचितच आढळणार. या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळ्या ठराविक पद्धतीने काढण्याचे ज्ञान आणि कसब स्त्रिया परंपरेने आत्मसात करतात.
 भोंडला वा हादगा मांडतात. पाटावर रांगोळीचा हत्ती काढतात. पाट मधोमध ठेवून भोवताली रांगोळी व फुलांची सजावट करतात. भुलाबाई मांडताना कोनाड्याच्या मखराच्या सजावटीला विशेष महत्त्व दिले जाते. श्री.अनंत देवधरांच्या शोधटिपणात डाळ तांदूळ एकत्र करून त्याच्या बहिलोबा व बहिलोबाईच्या आकृती काढतात असा उल्लेख आहे. मध्य प्रदेशात संजाबाई नावाचा उत्सव भाद्रपद पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंत मुली खेळतात. ही संजाबाई, हिरव्यागार शेणाच्या आकृती भिंतीवर लिंपून त्यावर बेगड आणि फुलांच्या पाकळ्या चिटकवून मांडली जाते.
 आश्विन भाद्रपदातील वर्षनसर्जनाच्या उत्सवात मांडणी व नंतर खेळ या दोन्ही क्रिया महत्त्वाच्या असाव्यात. गौरी, ज्याला घाटावर लक्ष्म्या किंवा महालक्ष्मी असे संबोधिले जाते, त्याची सजावटही अतिशय काटेकोरपणे आणि विधिपूर्वक केली जाते. घाटावर लक्ष्म्यांची गाणी ऐकिवात नाहीत. परंतु कोकणात गौरीची गाणी आणि भोंडला भुलाबाईची गाणी यांत एक आंतरिक साम्य आहे. विदर्भातील भराडी गौर वा इनाईची गाणीही त्याच वाणाची असतात. ही गाणीही स्त्रिया परंपरेने शिकतात.
 उदा. आचे दूध तापे
   त्यावर पिवळी साय
   लेकी भुलाबाई साखळ्या लेऊन जाय  (भुलाबाई)
   अंगणी तापतंय दूध
   दूधा पिवळी साय
   ये ग गवरी बाई
   एवढं पिऊनी जाय

(गौरी : संकलक - डॉ. चारुशीला गुप्ते)

   आंगनी दुदुलं तपते महया लाडाचे गवरा
   दूध घेऊनी जाय

(इनाई :संकलक - वसंत गिरटकर)

 'मांडणे आणि खेळणे' या संकेतांतून कुमारिकांच्या किंवा नवतरुणींच्या उत्सवांपाठच्या मूळ हेतूपर्यंत आणि त्या उत्सवाच्या प्राचीन परंपरेपर्यंत जाण्यास मदत होते. या खेळसंगीताचे विध्यंगरूप पाहताना या बाबतीत अधिक सखोल विचार करता येईल.
 हे कुमारिकांचे लोकोत्सव -
 भोंडला, हादगा आणि भुलाबाई हे लोकोत्सव आहेत. उत्सव सामान्यतः वीरपूजा, नांगरणी-पेरणी आदी कृषिकर्मे, गणदेवता ऋतू इत्यादीसंबंधी असतात. ऋग्वेदात अशा उत्सवांना 'समन' असे म्हणत. उत्सवात नृत्यनाट्य, भोजन असे. उत्सव आमजनतेचे असत. हे साधे सरळ उत्सव कृषिकर्माशी आणि ऋतूंशी निगडित होते. ज्या उत्सवांचा आणि त्या प्रसंगी गायल्या जाणाऱ्या काही गाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला आहे, ते उत्सव मूलतः कृषिकर्माशी संबंधित आहेत. त्यात सामूहिक गीतगायन, नृत्य, प्रसाद यांना महत्त्व आहे. त्यातून आनंदाची निर्मिती होते. त्यांचे स्वरूप क्रीडेचे आहे. त्यात कर्मकांडांची कठोरता नाही.
 भोंडला भुलाबाईत जातीची चौकट नसते -
 हे खेळ सर्व जातिजमातीत खेळले जातात. कै. श्रीमती घळसासी, आळीतील ब्राह्मण मुलींबरोबर हादगा खेळल्या आहेत. परंतु आज भोंडल्यासाठी सर्व जातीच्या मुली येतात. या उत्सवात जातीची चौकट कठोर नसते. खानदेशात दलित समाजातील मुलीही भुलाबाई खेळायला जात असत. त्या भुलाबाई मांडत असत. असे श्रीमती ज्योत्स्ना खैरनार यांनी सांगितले. भोंडला वा भुलाबाई मांडण्याची जागा बहुधा अंगण वा ओसरीवर असते. ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. भारतीय संस्कृतिकोशात उत्सवाची व्याख्या पुढीलप्रमाणे संकलित केली आहे. 'नियताल्हादजनक व्यापार'. निश्चितपणे आल्हाद निर्माण करण्याचा उद्योग म्हणजे उत्सव.
 व्रताभोवती एक चौकट असते -
 'व्रत' म्हणजे विशिष्ट काळासाठी वा आमरण केला जाणारा विशिष्ट नेमधर्म, व्रत कल्पना ऋग्वेदात आढळते. व्रत हा शब्द 'वृ' म्हणजे निवडणे या धातूपासून तयार झाला. अमरकोशात व्रत आणि नियम हे शब्द समानार्थी धरले आहेत. 'मिताक्षरा' नुसार व्रत म्हणजे काही करण्याचा व काही न करण्याचा निश्चय. कोणत्याही व्रतात आरंभ, संकल्प, पूजा, होम, उपवास, दान, अन्नदान, पारणे, जागरण व उद्यापन या गोष्टी येतात. भोंडला-भुलाबाई उत्सवात नियमांची साचेबंद चौकट नाही. होमहवन, पारणे, उपवास, दान आदी त्यात नसते. ते कुमारिकांचे लोकोत्सव आहेत, हे म्हणण्यामागची भूमिका वरील विवेचनात मांडली आहे.
 मूळ गाणी सोळा -
 या उत्सवप्रसंगी गायल्या जाणाऱ्या गाण्यांची मूळ संख्या किती हे सांगणे कठीण आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडेंनी अठरा गाणी संकलित केली आहेत. तर अनंत देवधरांनी सात महत्त्वाची गाणी लेखात समाविष्ट केली आहेत. डॉ सरोजिनी बाबरांनी संपादित केलेल्या 'भोंडला-मुलाबाई' या लोकसाहित्यमालेच्या बाविसाव्या भागांत विविध विभागात गायिली जाणारी भोंडला-हादग्याची ९६ गाणी आणि भुलाबाईंची ५६ गाणी संकलित केली आहेत.
 आज या गाण्यांची सरमिसळ सर्व विभागांतील गाण्यांतून आढळते. पुष्कळदा दोन गाण्यांचे तुकडे जोडून एक गाणे बनलेले दिसते. या तुकडेजोडीतून अनेक गाणी तयार झालेली असली तरी दोनही उत्सवांची मूळ गाणी सोळाच असावीत. हादगा मांडल्यावर पहिल्या दिवशी एक गाणे व एक खाऊ असे समीकरण असे. सोळाव्या दिवशी सोळा खिरापती वाटीत आणि सोळा गाणी म्हणली जात. भारतीय जीवनपद्धतीत सोळा हा अंक शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. गौरीसाठी सोळा भाज्या जेवणात लागतात तर मंगळा गौरीसाठी सोळा प्रकारच्या पत्री गोळा केल्या जातात. दुर्गाताई भागवतांच्या मते मूळ गाणी सोळाच असावीत. त्यात गौरी वा तत्सम उत्सवांतून काही गाणी दाखल झाली असावीत.
 महाराष्ट्रातील सर्व भागांत प्रचलित असलेली सर्व गाणी लोकसाहित्यमालेच्या २२ व्या भागात संकलित केलेली आहेत. या शोधनिबंधासाठी वऱ्हाड, खानदेश, पंढरपूर, पुणे, शहादा, हिंगोली,रत्नागिरी, नाशिक, नगर इत्यादी परिसरातून गाणी गोळा करताना सतत जाणावले की उपलब्ध होणारे प्रत्येक गाणे पर्याप्तभेदासह वरील ग्रंथात आहे. आणि म्हणूनच या शोधनिबंधासाठी शोधनार्थ निवडलेली गाणी प्रामुख्याने 'भोंडला-भुलाबाई' या ग्रंथातून निवडली आहेत. भोंडला आणि भुलाबाईचे नमन गीत आणि प्रत्येकी इतर दोन गीते अशा एकूण सहा गाण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 गाण्यांचे पर्याय : कारणांचा मागोवा -
 ही सारीच गाणी मुळात मौखिक स्वरूपाची असून ती पिढ्यानपिढ्या विविध काळातून वाहत आली आहेत. ही गाणी कुमारिकांच्या - नवतरुणींच्या म्हणजेच स्त्रियांच्या उत्सवांची आहेत. स्त्रियांना धर्माने ज्ञानसाधनेचा अधिकार दिलेला नव्हता. त्या शिक्षणापासून वंचित होत्या. मोठ्या घराण्यांतील आणि उच्चवर्णातील स्त्रियांना व्यवहारापुरते शिक्षण दिले जाई. संस्कृत नाटकातील दास आणि स्त्रिया यांची भाषा 'प्राकृत' असे. ते संस्कृतमधून बोलत नसत. स्त्रिया अडाणी असल्याने अशुद्ध बोलतात, हे समाज गृहीत धरीत असतो. निरक्षरतेमुळे त्यांना शब्दांचे उच्चार नेमके करता येत नाहीत हेही गृहीत धरलेले असते. भाषाशास्त्राच्या अभ्यासात उच्चारप्रक्रियेत होणाऱ्या बदलाची कारणमीमांसा करताना स्त्रियांमुळे उच्चारात बदल होतात असे मानले जाते. स्त्रीजीवनाशी संबंधित गाणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाताना, एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे प्रवाहित होताना त्यात बदल होणे स्वाभाविकच आहे. शब्दात आणि त्यामुळे आशयात बदल झाले असावेत.
 ही लोकगीते शेकडो वर्षांपासून विविध काळातून प्रवाहित होत असताना त्या त्या काळाचे संदर्भ त्यांना जोडले जातात. ज्या श्रद्धा वा संकल्पना, समाजाला फारशा महत्त्वाच्या वाटेनाशा होतात. त्या गीतातून गळून नामशेष होतात. काळानुरूप नव्या संकल्पना त्यात दाखल होतात. अशा रीतीने लोकगीत सतत बदलत राहते.
 स्त्रियांचे जीवन दोन अंगणातून फुलते. घरातल्या लेकी-सुना लोकगीतांचे अनमोल धन गावोगाव पसरवतात. बारा गावच्या बारा जणी एका जागी जमतात तेव्हा एकमेकींची गाणीच नव्हे तर उत्सवांतील विविध कृतींचे तपशील, आराध्यदैवते यांचीही देवाणघेवाण होते. या प्रक्रियेतून गाण्यांची सरमिसळ होते. पर्याय निर्माण होतात.
 लोकगीतांत समूहमनाचे प्रतिबिंब -
 भोंडला भुलाबाईची गाणी परंपरेने चालत आलेली लोकगीते आहेत. त्यांचे मर्म उकलताना, त्यातील अर्थसंदर्भाचा वा कालसंदर्भाचा मागोवा घेताना, कवितेच्या आस्वादनाची रीत वापरता येत नाही. या गीतांत समूहमनाचे प्रतिबिंब असते. या गीतांचा कर्ता केवळ 'अनाम' असतो. असे नाही तर या गीतांत अनेक अनामिकांनी आपापल्या काळाचे आणि मनाचे रंग मिसळवलेले असतात. मानवी मनाच्या एकात्मतेचे अनोखे दर्शन त्यातून घडते.
 हादगा भोंडल्याच्या प्रातिनिधिक गाण्यांचा अर्थान्वयी शोध घेण्याचा प्रयत्न इतिहासाचार्य राजवाड्यांनी केला होता. परंतु त्यातून गाण्याचे एकसंध चित्र स्वरूप उलगडत नाही. त्यातील तुटकपणा सांधता येत नाही. शब्दांच्या पाठी असलेले काळाचे संदर्भ, सांस्कृतिक परंपरा, संकेत, घटनांचे संदर्भ इत्यादींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तरच गाण्याचे अंधुकसे रूप एकसंधपणे डोळ्यांसमोर उभे राहू शकते.
 गाण्यांचा शोध -
 भोंडला वा हादग्याचे नमन गीत : ऐलमा पैलमा गणेश देवा

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशिच्या दारी
पारवळ घुमते गिरिजा कपारी
पारवणी बाळाचे गुंजावणी डोळे
गुंजावणी डोळ्यांच्या सारविल्या टिक्का
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एविन गा तेविन गा .... (चाल बदल)
कांडा तिळ बाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी... (चाल बदल)
आयुष्य दे रे बा माळी
माळी गेला शेता भाता.... (चाल बदल)
पाऊस पडला येताजाता
पडपड पावसा थेंबाथेंबी
थेंबाथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा (चाल बदल)
अंकणा तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्ष

 भोंडला वा हादगा मांडल्यावर पहिल्या दिवशीचे पहिले गाणे म्हणून ऐलमा पैलमा या गाण्याला मान दिला जातो, 'ऐलमा पैलमा' या नमनगीताला. हे गीत रोजच म्हटले जाते.
 भारतात विशेषकरून महाराष्ट्रात कोणतेही शुभकार्य गणेशपूजनाने सुरू होते. त्यामुळे सुरुवातीचे हे नमन गणेशदेवाला गायले आहे. हे परंपरेला धरून आहे.
 ऐलमा पैलमा : ऐल-पैल -
 ऐलमा पैलमा या शब्दांची व्युत्पत्ती इतिहासाचार्य राजवाडेंनी;
 ऐलमा = अथलम् → अहलम् → अअलम् → अयलम्
 पैलमा = प्रथलम् → प्रहलम् → प्रअलम् → पयलम्
अशी मांडली आहे.
 ऐल पैल या दोन शब्दांना मराठी भाषेत विशिष्ट अर्थ आहे. त्यातून विशिष्ट संकेत मिळतो. ऐल म्हणजे अलीकडचे, पैल म्हणजे पलीकडचे. परंतु ऐल म्हणजे ईहलोक तर पैल म्हणजे परलोक असा संकेत त्यातून दर्शविला जातो. माणसाला ईहलोकीचे जीवन जगत असताना परलोकाविषयी नेहमीच आकर्षण असते. ऐल आणि पैल यांच्यामध्ये वेस असते. या वेशीच्या दारांतला खेळ प्रपंचाचा तर नसेल ना ? या गीतातला खेळ लुटुपुटुचा असला तरी तो प्रतीकात्मक असावा. तो जगरहाटीचा असावा. आपल्याकडे दिवाळीत वसुबारसेला शेणामातीचे गोकुळ मांडून खेळण्याची प्रथा आहे.
 हे उत्सव वर्षनसर्जनाचे आहेत. कृषिजीवनाशी निगडित विधी मुळातून वेशीच्या आत होत नसावेत. उदा. नागपंचमीची पूजा रानात जाऊन वारूळ पुजून केली जायची. काळाच्या ओघात बदलत्या जीवनपद्धतीमुळे ही पूजा पाटावर नागकुळे काढून केली जाऊ लागली. कृषिजीवनाशी संबंधित अशा या उत्सवांचे मूळ रूप वेशीच्या दारात, मोकळ्या आभाळाखाली, साजरे होत असले पाहिजे.
 या गाण्यात पारव्याच्या घुमण्याचा उल्लेख आहे. हे 'पारव' कबुतर की आणखी काही? पारवं या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक अर्थ 'जंगली कबुतर' असा तर दुसरा 'रंगदर्शक' आहे. 'काळे पांढरे मेळविता, पारवे होते तत्त्वता', असे म्हटले आहेच. एक पाठमेद पारवळ असाही आहे 'पारवळ' म्हणजे लुगड-पातळ. परंतु पुढच्या ओळीत 'पारवणी बाळाचे गुंजावणीडोळे' असे शब्द आहेत. त्यावरून 'पारवं' म्हणजे कबुतर असा अर्थ घेणेच योग्य ठरते.
 हा संदर्भ शिवकाळातील असावा -
 या जंगली कबुतराचे गुंजांसारखे लालभेदक, विखारी डोळे नायकाने नष्ट केल्याचा संदर्भ इतिहासाचार्य राजवाडे यांना शिवकाळातील वाटतो. दुर्गा भागवतही त्याला दुजोरा देतात. इतिहासाचार्य विवेचन करतात. वेशीच्या बुरूजावर पारवा घुमत होता. तो फकिरासारखा एकटाच होता. त्याचे डोळे गुंजेप्रमाणे लालमडक... विखारी होते. त्याच्या दृष्ट डोळ्यांच्या टिका गावच्या भुलोजी नायकाने काढून टाकल्यानंतर, वेशीच्या दारात मुली पुन्हा खेळ खेळू लागल्या. त्यांच्या मते गाण्यातील हा संदर्भ शिवकाळातील असावा. मुस्लिम फकिरांचा लेकीबाळींना, स्त्रियांना होणारा त्रास भुलोजी नायकाने... पाटलाने दूर केला असावा. मुसलमानी अम्मलं ढिला होण्याच्या काळातील हा संदर्भ असावा. या गाण्यातील 'भुलोजी' चा शोध घेताना दुर्गाताई भागवतांना तो अग्निदेवाचे प्रतीक वाटतो. 'हादगा किंवा भोंडला' या पुल्लिंगीनामावरूनही सर्वच गाणी पुरुषदेवाला उद्देशूनम्हटली असावीत असे त्यांना वाटते. आदिम लोकजीवनात अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व होते. 'अग्नी' चोरण्याच्या कथा जगभर प्रसृत आहेत. भुलाबाई हे पार्वतीचे रूप तर भुलोजी हा शंकराचे रूप. शिव, रूद्र या देवता 'अग्नी'ची रूपे आहेत असे मानले जाते.
 उंडे आणि तीळ - तांदूळ -
 या गाण्यात 'दूधोंडे' या तत्कालीन पक्वान्नाचा उल्लेख येतो. 'उंडे' हे महाराष्ट्रातले लोकप्रियपक्वान्न असावे. महानुभावकालीन वाङ्मयात उंड्यांचा उल्लेख येतो. तसेच लोकप्रिय गाण्यांतूनही येतो.
 उदा. - मला करून दे साखर उंडा
   पिठी साखर आणिक मांडा, मला जेवू घाल
   यश्वदे धरासी चाल, मला जेऊ घाल -
 या गीतात तीळ आणि तांदळाचाही उल्लेख आहे. धार्मिक संस्कारांततीळ-तांदळाचे महत्त्व असते. सणातही तीळ तांदळाला शुभ म्हणून मान असतो. तांदळाचा उपयोग 'अक्षत' म्हणून विशेष सन्मानपूर्वकपणे धार्मिक कार्यात आणि सणात केला जातो. 'तंडुल' हे तृणधान्य आणि तीळ हे गळीत धान्य प्राचीन काळापासून माणसाच्या उपयोगात आहे. ही धान्ये समृद्धीचे प्रतीक आहेत.
 तीळ मांगल्यदर्शक आहेत. नारळ हे आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे. नारळ फोडणे म्हणजे सर्वस्व अर्पण करण्याची भावना व्यक्त करणे. समर्पणाचे प्रतीक म्हणून तिळाची अंजुली टाकण्याची पद्धत रूढ आहे. तीळ हे चरबीचे (फॅटस् चे) प्रतीक आहे. 'देवाल तेल वाहणे' या प्रवृत्तीमागेही जीवनातील जे जे स्निग्ध आहे ते परमेश्वराला देण्याची भावना असते. भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे सण आणि उत्सव आहेत त्यांचा धर्मभावनेशी संबंध नाही. 'हिंदू' ही एक जीवनपद्धती आहे. संस्कृती आहे. ती भारतात राहणाऱ्या माणसांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे. तीळ हे औषधीही आहेत. तिळाचे त्रिविध महत्त्व प्राचीन काळापासून येथील समाजाला जाणवले होते. त्यामुळेच या लोकोत्सव गीतांतून तीळ आणि तांदळाचा उल्लेख आवर्जून येतो.
 हा माळी कोण?
 या गाण्यात माळ्याचा संदर्भ आहे. हा माळी कोण ? इतिहासाचार्यांनी संकलित केलेल्या हादग्याच्या नमनगीतात 'औषध दे रे बा माळी' अशी ओळ आहे. परंतु दुसरा, अधिक प्रचलित पर्याय 'आयुष्य दे रे बा माळी' हा आहे आणि तो अधिक अर्थगर्भ वाटतो. या ओळीतील 'माळी' ही संकल्पना संकुचित अर्थाने वापरली नसावी. हे आयुष्य केवळ स्वतःला वाघरादाराला मागितले नसावे. ते शेताभाताला मागितले असले पाहिजे.

माळी गेला शेतामाता
पाऊस पडला येताजाता

या ओळींमधून विश्वाला फुलविणाऱ्या विश्वातील पंचमहाभुतांना नियंत्रित करणान्या 'परमेश्वर रूपी' माळ्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत जगंनियंत्यास 'माळी' म्हटले आहे.
  माळिये जेऊ ते नेले । तेउते निवांत चि गेले|
  तेया पणिया ऐसे जाले। नाठवे हे ।। १२०॥

(अध्याय १२ वा ज्ञानेश्वरी)

 (माळी ज्या पाटाला पाणी लावतो त्या पाटाने ते पाणी निवांत वाहत जाते. त्या पाटाविषयी ते पाणी काहीच चिंता करीत नाही).  या गाण्यातील विविध संकेतांवरून ही गाणी कृषिधर्मी जीवनाशी निगडित असावीत असे वाटते. शेतातील धनधान्य पीक भराला आल्यावर, राखणीसाठी जे बाहुले तयार केले जाते त्यास 'भुलोबा' म्हणतात. तो शेताचा संरक्षक असतो. या कृषिसंबंधित गाण्यात मारूती, यक्ष, भुलोबा इत्यादी 'ग्रामरक्षक' देवतांचे उल्लेख वारंवार येतात असे दिसते. भुलोबा वीरशैव शंकराचे प्रतीक तर भुलाबाईहे पार्वतीचे रूप. भूदेवी ही गाव आणि शेतकऱ्याची संरक्षक देवता मानली जाते.
 गीतातील नादमयता : ध्वनिचित्रे -

पडपड पावसा थेंबो थेंबी
थेंबोथेंबी आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा
अंकणा तुझी सात कणसं
भोंडल्या तुझी सोळा वर्षे

या ओळीमधुन धनलक्ष्मीचे ध्वनिचित्र चित्रित झाले आहे. लोकगीतांत मंत्रात्मकता असते. लोकगीत म्हणजे आदिकालीन स्वयंस्फूर्त संगीत: त्यांत शब्दापेक्षा स्वर आणि लय यांच्या अदभुत मिश्रणातून तयार झालेल्या मंत्रात्मकतेवर भर आधिक असतो.
 मणिपूर, त्रिपुरा, मध्य प्रदेश येथील काही आदिम जमातीमध्ये काही लोकगीते अशी आहेत ज्यात शब्द नाहीत. केवळ लयप्रधान स्वररचना आहे. लोकगीतांचा संभव स्वरांपासूनच होतो. मनुष्य काही भावनापूर्ण क्षणांमध्ये स्वरांची एक सृष्टी निर्माण करतो आणि त्यालाच गुणगुणतो. काही काळानंतर याच स्वरसृष्टीमध्ये उपयुक्त शब्द योजिले जातात. अशी अनेक गाणी रचनाकारच्या व्यक्तिकतेच्या बाहेर येऊन सामाजिक बनतात आणि व्यक्तिकत्वाला त्यात जिरवून टाकतात. या प्रचलित गीतांतील शब्द काळानुरूप दुबळे होऊन विस्मृतीत जातात. त्या जागी नवे शब्द येतात. समूहजीवनाच्या संदर्भात त्या शब्दांची अन्वर्थकता नाहीशी होते आणि मग या शब्दांना अनाकलनीय असे स्वरूप प्राप्त होते. मूळ शब्द कोणते ते ओळखणेही अशक्य होते. गाणी निरर्थक वाटू लागतात. तरीही त्या गीतांतील मूळ स्वरसमूह आणि लय तालतत्त्व यामुळे ही वरवर निरर्थक वाटणारीगीते लोकसमूहात शतकानुशतके टिकून राहतात.  पैंजणातून ओघळणाऱ्या धुंगराप्रमाणे बरसणाऱ्या पाऊसधारा, तोरड्यांच्या धुंगराप्रमाणे झिळमिळणाऱ्या परिपुष्ट भातपिकाच्या ओंब्या याचे ध्वनिचित्र वरील ओळीतून प्रतीत होते.
 सात, सोळा हे आकडे लोकसाहित्यात वारंवार येतात. त्या आकड्यातून मांगल्य, समृद्धी, शुभ इ.चे सूचन होते. या गाण्यातून सलग असा अर्थ काढण्याचा प्रयास अप्रस्तुत ठरतो. लोकगीतांत स्वरमाध्यम आणि लय महत्त्वाची असल्याने केवळ शब्दरचनेचा विचार अपुरा ठरतो. या गाण्यांतून प्राथमिक, कृषिधर्मी जीवन जगणाऱ्या लोकसमूहांनी कृषिसमृद्धीसाठी सुफलीकरण यातुविधींच्या वेळी गायलेल्या मंत्रात्मक प्रार्थनांचे अंधुक संकेत मिळतात.
 गाणे - २ : आला चेंडू गेला चेंडू

आला चेंडू गेला चेंडू
राया चेंडू झुगारिला
आपण चाले हत्ती घोडे
राम चाले पायी
एवढा डोंगर शोधिला
रामाचा पत्ता कुठं नाही
राम ग वेचितो कळ्या
सीता ग गुंफिते जाळ्या
आली ग लगिन वेळा
जरतारी घातिलं बोहल
नवरा नवरी बसली पाटी
पाटी पाटी तिरु तिरू राळा
तिरु बाई राळा मुंजक वाळा
मुंजक बाळाची मुंज दोरी
तीच दोरी सावध करी
सावध सावध सर्वत काळ
सर्वत काळचा उत्तम दोर

दोर बांधला झाडासी
झाड झबका फुल टपका
ते बाई फुल तोंडावं
बहिणीमाथा खोवावं
बहिणी तुझा भांग ग
मोतियाचा चांद ग
बहिणी तुझी वेणी ग
मोतियाची फणी ग
बहिणी तुझा खोपा ग
चंद्रफुल घेते झोपा ग

 या गाण्यातील राम आणि सीतेचा संदर्भ कृषिजीवनाशी निगडित -
 या गाण्याचेही विविध पर्याय सापडतात. भोंडला वा भुलाबाईच्या एकूणच गाण्यातून सीतेचा आणि रामाचा संदर्भ येतो. डोंगरात शोधूनही न सापडणारा आणि पायी चालणारा, कळ्या वेचणारा, राम या गाण्यातआहे. रामाने वेचलेल्या कळ्यांच्या फुलजाळ्या विणणारी सीता आहे. ही गीते कृषि संबंधित विधींचे अंग असलेल्या स्वरसमूहांशी, निगडित असावीत हे लक्षात घेतल्यावर त्यातील शब्दांचे संदर्भही अधिक खोलवर जाऊन पाहावे लागतात. सीता या शब्दाचा अर्थ कृषिधर्मी आदी जीवन व्यवस्थेत कोणता होता? जमीन उकरण्याच्या एका उपकरणास सीता म्हणतात. सीतेची व्याख्या कौटिल्य खालीलप्रमाणे करतो (२.३१)-सीताध्यक्षाने शेतातून राजकोठागारात आणलेले धान्य म्हणजे सीता होय. सीता ही येथे केवळ राजाच्या शेतीचीच संज्ञा नसून तिच्यातून पिकणाऱ्या धान्याची असावी. 'सीता' या शब्दाचा अर्थ राजाची खाजगी जमीन असा होतो. भारतीय इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते की या संस्कृतीने अनेकविध वळणे घेतली आहेत. विविध रूपे बदललेली आहेत. दशरथ जातकातील राम आणि सीता यांच्यातील नाते रामायणातील रामसीतेच्या नात्यापेक्षा वेगळे आहे. जगातील सर्व संस्कृतींचा इतिहास पाहता असे लक्षात येते की मातृसत्ताक राज्य पद्धतीच्या उत्तर काळात सपिंड विवाह ही जागतिक स्वरूपाची घटना होती. भाऊ आणि बहीण यांचा विवाह होऊन भाऊ राज्याचा प्रमुख होत असे. आज सपिंड-विवाह कालबाह्य आणि दुराचारात जमा झाला असला तरी यम आणि यमीची वेदकालीन कथा काय सांगते? यमी यमाशी समागम करण्यास उत्सुक होती. परंतु यम हा तिचा सहोदर असल्याने त्याने तिला झिडकारले. त्यावेळी यमी त्याला दाखला देते की आकाश व पृथ्वी सहोदर बंधुभगिनी आहेत, तरी ते पतिपत्नी झालेले आहेत.
 रामायणातील राम आणि सीता यांचे नाते सपिंडविवाहाचे नसून पुरुषप्रधान संस्कृतीतील भिन्नगोत्रिय विवाहांतून निर्माण झालेले आहे. ते पितृसत्ताक जीवनपद्धती स्थिरावल्यानंतरचे आहे.
 या गीतातील राम डोंगरात लपणारा का ? -
 या गीतातील राम पायी चालणारा आणि डोंगरात नाहीसा होणारा असा का आहे? डोंगर शोधूनही रामाचा पत्ता लागला नाही असा उल्लेख का येतो? या ठिकाणी विवाहास पूर्वरूढीनुसार उत्सुक असणारी यमी आणि तिला झिडकारून बहीणभावाच्या नात्याचे आज अस्तित्वात असलेले रूप प्रस्थापित करू पाहणारा यम यांची आठवण येते.
 सीता ही भूमिकन्या असून धरतीचे रूप मानली जाते. तर सावळा राम निळ्या आकाशाचे प्रतीक मानला जातो. आकाशातून कोसळणारा पाऊस आणि माती यांच्या संयोगातून बीज रुजते. कृषिसंपत्ती निर्माण होते. या गीतातील रामसीतेचा संदर्भ कृषिजीवनाच्या दृष्टीतून येतात. या गीतात विवाहाचा उल्लेख आहे. जरतारी बोहोलं आहे आणि नवरानवरी पाटावर बसले आहेत. हे नवरा नवरी कोण ? आकाश आणि भूमी ? म्हणजेच राम आणि सीता का ?
 पुरुषप्रधान आर्य संस्कृतीचा संस्कार -
 भोंडला आणि हादगा हे 'वर्षना'चा सत्कार करणारे उत्सव आहेत. वर्षनातून सर्जन घडत असते. वर्षा हे समृद्धीचे मूळ आहे असे मानणाऱ्या बीजप्रधान अथवा पुरुषप्रधान संस्कृतीचे संस्कार या उत्सवातून अधिक्याने जाणवतात.या गाण्यातील प्रत्येक ओळ जणु वेगवेगळ्या काळाचा रंग धारण करणारी असते. या गीतातील पुढील ओळी वेगळीच कलाटणी घेतात.

पाटी पाटी तिरूबाई राळा
तिरू तिरू राळा मुंजक बाळा

मुंजक बाळाची मुंजदोरी
तीच दोरी सावध करी
सावध सावध सर्वत काळ
सर्वत काळचा उत्तम दोर....

 राळ्याचा भात किंवा राळ्याची भाकरी हे पूर्वीच्या काळी समान्यजनांचे पूर्णान्न होते. राळा हे कृषिजीवनाच्या आरंभकाळातील प्रमुख धान्य होते. राळ्याचे उल्लेख भोंडल्याच्या अनेक गाण्यांतून येतात. मानवजीवनाच्या सुरुवातीच्या काळात, ज्या वनस्पती माणसास अधिक उपयोगी असत, अशांचे उत्सव वा पूजन करण्याची प्रथा होती. भारतीय संस्कृतीत झाडापानांची पूजा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. (उदा. पिंपळाची पूजा, वटवृक्षपूजा, आवळीखाली भोजन करण्याची प्रथा, आषाढात हिरव्या झाडांची पूजा इ.)
 मुंजक बाळ : ग्रामरक्षक वीरदेवता -
 'तिरूबाई' या शब्दाचा संदर्भ शोधण्यासाठी दाक्षिणात्य भाषांचा शोध घ्यावा लागतो. तिरू म्हणजे शिव किंवा श्री...समृद्धी, तिरू हा शब्द येथे समृद्धी या अर्थाने आला असावा. 'मुंजक बाळ' म्हणजे मुंजा. मुंजा हे ब्रह्मचाऱ्याचे कडक भूत असते असे मानले जाते. 'मुंजा' हा ग्रामरक्षक तसेच क्षेत्र रक्षक असतो. कृषिविधींशी संबंधित गीतांतून मारूती, यक्ष, मुंजा या क्षेत्ररक्षक वीरांचे उल्लेख वारंवार येतात. मुंजक बाळाची दोरी म्हणजे त्याच्या जवळचे सामर्थ्य. मुंजा जानवे घालतो आणि जानव्यात संरक्षक शक्ती असते असे मानले जाते. भीती वाटली की जानव्याची गाठ हातात धरून रामनाम घेतले तर भय नाहीसे होते असा समज रूढ आहेच. दोरीमुळे मुंजकबाळाला जादू प्राप्त झाली आहे असा संकेत या ओळीतून मिळतो. तिच्यायोगाने तो सर्वकाळ क्षेत्राचे, क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या धनधान्याचे रक्षण करतो.
 एक मोहक प्रतिमा -
 या गीताचा शेवटचा भाग अलीकडच्या काळात जोडला असावा असे. त्या ओळींच्या सुसंगत रचनेवरून आणि अर्थावरून लक्षात येते. ही गीते नववयसा म्हणजेच तरुणाईच्या उंबरठ्यावर वा थोडे अल्याड असलेल्या मुली म्हणतात. त्या मुलींच्या भावजीवनांतील कोमल धागे या गीतांना सहजपणे जोडले गेले आहेत. बहिणीविषयींची अपार प्रीती त्या ओळीतून दृगोचर होते. बहिणीचा भांग 'मोतियाचा चांद' वाटतो. तर तिची वेणी मोत्याची फणी वाटते. ही दोन्ही चित्रे सर्वसामान्य असली तरी

बहिणी तुझा खोपा गs
चंद्रफूल घेते झोपा गs

या ओळीतून नाचून खेळून दमताना सैलावलेला खोपा आणि त्यात खोचलेला आकडा ढिला होऊन सैल पडलेले सोन्याचे चंद्रफूल नाचताना वरखाली होणाऱ्या चंद्रफुलाला पाहून तेजणू डुलक्या घेतेय असे वाटणे. हे चित्र विलक्षण मोहक वाटते.
 गाणे -३: अतूला मातूला चरणी चतूला -

अतूला मातूला चरणी चतूला (हातूका मातृका चरणी चतूका)
चरणीचे सोंडे हातपाय सणसणित गोंडे (चरणीच्या सोंडेवरी खुळखुळ बाळा सोंडेवरी)
एक एक गोंडा विसाचा
नागर साडे नेसायचा
नेसा नेसा ग भावल्यांनो (मावल्यांनी)
सात घरच्या पावण्यांनो
पावण्या गेल्या खोली
चितांग टाकलं डोली
चिटक्या मिटक्या करडंफूल
ते बाई फूल मी तोडील
हादगा देवा वाहिल
हादग्या तुझा तुरारा
मोतीयाचा भरारा
बाईच्या परसांत लिंबारा
लिंबारा खाल्ला गाईनं
गाई गाई दूध ग
दूध दिलं बापाला
बाप्पा बाप्पा अंगारा

अंगारा दिला आईला
आई आई लुगड ग
लुगड दिलं बहिणीला
बहिणी बहिणी धोतर ग
धोतर दिलं भावाला
भावा भावा गोंडे दे
माळावरचे धोंडे घे

 'अतुला मातुला चरणी चतुला' या ओळीचा एक पर्याय 'हातुका मातुका चरणी चतूका' असाही आहे. तसेच दुसऱ्या ओळीचा पर्याय 'चरणीच्या सोंडेवरी बाळा खुळखुळ गोंडेवरी' असाही आहे. गीतातील शब्दप्रतिमा यातून मिळणान्या संकेतांची संगती लावणे अतिशय कठीण काम आहे.
 'आतुला मातुला' या ओळीवरून आणि त्या ओळींच्या लयीच्या वजनावरून मराठी कहाण्यांमधील शेवटची ओळ आठवते. 'उतु नकोस मातु नकोस घेतला वसा टाकू नकोस'. व्रत पाळताना वा त्या व्रताचे फळ मिळाल्यावर उत्तान होऊ नकोस किंवा ते व्रत अर्ध्यावर सोडू नकोस अशी सज्जड समज त्यातून दिलेली असे. तसेच उतण्यामातण्यापासून दूर राहिलास तर समृद्धी प्राप्त होईल अशी ग्वाही त्यातून ध्वनित होत असते.
 भोंडला-भुलाबाईच्या गाण्यातून 'बाळा' चे उल्लेख वारंवार येत असतात. भुलाबाईच्या मातीच्या मूर्तीच्या मांडीवर वा समोर पाळण्यात बाळ असतेच. भुलाबाईच्या गाण्यात तिच्या बाळंतपणाच्या सोहळ्याचा उल्लेख असतो. भुलाबाईच्या उत्सवाच्या गाण्यातून हा संदर्भ या गाण्यात दाखल झाला असावा. भुलाबाईचे बाळ हे गणेश बाळच असते. आणि गणेशबाळाचे तोंड हत्तीसारखे असते हे सर्वज्ञात आहे. हत्तीने सोंडेने बाळ उचलून वाचविण्याच्या अनेक गोष्टी लोककथांतून विपुल प्रमाणात सापडतात.
 'गोंड्या' चा उल्लेखही या गीतातून अनेकदा येतो. आपल्या बंधुरायाकडे गोंडे मागणाऱ्या बहिणी लोकगीतातून भेटत असतात. गोंडे हे थाटाचे, समृद्धीचे दर्शक असतात. म्हणूनच लोकजीवनात गोंड्याची गाडी, शिंगांना गोंडेफूल बांधलेले बैल, वेणीला बांधलेले गोंडे यांना समृद्धीदर्शक महत्त्व असते.  सात, सोळा, वीस हे संख्यावाचक शब्दही लोकसाहित्यातून मांगल्याचे धनसंपन्नतेचे प्रतीक म्हणून येतात. 'वीस' हा आकडा गणनपद्धतीत अत्यन्त महत्त्वाचा आहे. खेड्यातील अडाणी महिला'दोन विसा' ४० तीन विसा ६० असा वापर करते. अशा रीतीने गणन करण्याची ही पद्धत पुरातन आहे.
 मावल्या : सात मातृका : सात घरच्या पाहुण्या -
 पौर अथवा नागर आणि जनपद असे दोन भाग राज्यांचे असत. नगरांत उच्चभ्रू, सरदार, व्यापारी, अधिकारी यांची वसाहत असे.तर जनपदांत लहानलहान ग्रामांचा अंतर्भाव असे. त्यात मुख्यतः शेतकरी, शेतीचे जोड व्यवसाय करणारे कारागीर राहत असत. ग्रामीण भागात राहणाऱ्यांना नगराबद्दल नेहमीच उत्सुकता आणि आकर्षण असते. विशेषतः नगरातील आधुनिक, चमकदार वस्तूंबद्दल विलक्षण आकर्षण असते. 'नागर साड्यां' चा उल्लेख त्याच भावनेतून आलेला आहे. साडी नेसविणे हे सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. ही गाणी लेकीबाळींच्या ओठी असतात. त्यांतील साडे,गोंडे यांचे उल्लेख माहेरपणातून माहेरवशिणीस मिळणाऱ्या हक्काच्या आहेराचे आहेत. माहेरची श्रीमंती वा समृद्धी हा स्त्रीच्या मनातील नाजूक भावबंध आहे.

नेसा नेसा ग मावल्यांनो (भावल्यांनो)
सात घरच्या पावण्यांनो
पावण्या गेल्या खोली
चितांग टाकलं डोली

या ओळीतील सात घरच्या पाहुण्या कोणत्या ? त्या मावल्या की भावल्या ? कृषिप्रधान संस्कृती मातृपूजक होती. भारतात सप्तमातृकांची पूजा सर्वच प्रांतांतून होत असे. त्यांना सात बहिणी असेही म्हणतात. या सातमाता धनधान्याची समृद्धी देतात, संकटे आणतात, रोगराई दूर करतात अशी समजूत आहे. प्राचीन वाङ्मयातून, लेण्यांतून, सप्तमातृकांचे उल्लेख वा मूर्ती आढळतात. आंध्र- कर्नाटकतामिळनाडूत आजही सप्तमातृकांची पूजा होते.
 लोक लक्ष्मीचे रूप -
 आपल्याकडे लेकीलाही 'लक्ष्मी' मानले जाते. विवाहानंतर घरी येणारी लेक 'सवाष्ण' म्हणून सन्मानित केली जाते. सवाष्ण ही मांगल्य, समृद्धी, निरंतर सौभाग्याचे प्रतीक असते. आजही शुक्रवारचे बोडण, गौरी यासाठी सवाष्ण म्हणून माहेरवाशिणीचा मान केला जातो. कुमारिकांची, सप्तमातृकांची पूजा करण्याचा आचार मातृसत्ताक कृषिसंस्कृतीतून आजच्या प्रचलित व्रतवैकल्यांत समाविष्ट झाला असावा. या सातमातृका म्हणजेच सातघरच्या पाहुण्या. त्या माहेरपणाला आल्या आहेत. त्यांना नागरसाडे नेसवून ओटी भरून सन्मानित केले. त्यानंतर त्या सात जणी घराच्या खोल्यांतून गेल्या. खोलीत 'चितांग' टाकले. चितांग हा सोन्याचा दागिना आहे. खोलीत चितांग टाकतात म्हणजेच घर धनधान्य दुभत्याने भरून टाकतात. असा संकेत या ओळीतून मिळतो. या ओळी वाचताना गौरीगणपती विसर्जनानंतरची प्रथा आठवते. गौरी गणपती विसर्जनानंतर ताम्हणातून नदीतील वाळूखडे आणतात आणि ते घरातील प्रत्येक खोलीतून टाकतात. विशेषतः कोठीच्या खोलीत टाकतात. असे केल्याने घराला नेहमीच भरभराट लाभते अशी कल्पना आहे.
 स्त्रीगीतात निरर्थक शब्द पादपूरके म्हणून वारंवार येतात. त्यातून प्रासही साधला जातो. 'चिटक्या मिटक्या' हा शब्द गीतात असाच आलेला आहे. करडफूल म्हणजे करडईचे फूल. हे फूल लाल पिवळे असते. शुभता आणि मांगल्याचे प्रतीक हळदीकुंकू. निरंतर समृद्धी सौभाग्याचे प्रतीक हळदीकुंकू तेही लाल पिवळे. ते फूल हादगा देवास वाहिल्याचा उल्लेख येतो. काही भागांत हे गाणे इथेच समाप्त होते. तर काही ठिकाणी त्याच्या पुढे आधुनिक काळात जोडलेला तुकडा आढळतो. लोककथांतील एक लोकप्रिय कथाबंध आहे. एक वस्तू देऊन दुसरी घेणे ती देऊन तिसरी घेणे. या गाण्यातील शेवटचा तुकडा अशाच आशयाचा आहे. बाईच्या परसातला लिंबारा खाऊन गाय भरपूर दूध देईल. ते दूध बापाला देऊन त्याच्याकडला अंगारा घेऊन आईला दिला जाईल. तिच्याकडचं लुगडं बहिणीला. लुगड्याबदली धोतर घेऊन ते भावाला आणि त्या बदली गोंडे घेण्याचे एक स्वप्न इथे रेखाटले आहे. या गीतातील सामाजिक व्यवस्थेचा अतिशय तरल धागा उकलायचा झाला तर

दूध दिलं बापाला
बाप्पा बाप्पा अंगारा
अंगारा दिला आईला....

या ओळीतील मिळणारा संकेत अभ्यासण्याजोगा आहे. 'अंगारा' हे जादुमयशक्तीचे प्रतीक आहे आणि तो अंगारा आईला देण्याची मनीषा लेकीने केली आहे. समाज आणि कुटुंब यातील नातेसंबंधांच्या अतिशय तरल भावछटा या गीतातून आढळतात. ही गीते कृषिप्रधान जीवनव्यवस्थेच्या काळात निर्माण झाली असली तरी कालप्रवाहात त्यांचे जतन करताना महाराष्ट्राच्या लेकीसुनांनी आपल्या कुचंबलेल्या मनाचा हळवेपणा, त्या मनानी रंगवलेली स्वप्ने... त्यांचे रंग या गीतात भरून दिले आहेत. स्त्री सासरी लडिवाळ हट्ट करू शकत नाही, हक्काने काही मागायचे ते भावाकडेच. ही मनोवृत्ती या ओळीतून व्यक्त होते. अर्थात स्वतः माळावरचे धोंडे वेचून कष्टणारा भाऊ आपल्या बहिणीसाठी रेशमाचे गोंडे मायेने आणतो म्हणूनच बहीणही आपला हक्क सांगते. ही सामाजिक बाब नजरेआड करून चालणार नाही.
 भुलाबाई : गुलाबाई : संजाबाई -
 भुलाबाई ऊर्फ गुलाबाई या विदर्भ-खानदेशात अत्यन्त लोकप्रिय असलेल्या कुमारिका-उत्सवाचा प्रारंभ भाद्रपद पौर्णिमेस होतो. उत्तरेकडे महिना पौर्णिमेपासून बदलतो. त्यानुसार आश्विन महिन्याच्या प्रारंभापासून भुलाबाई सुरू होते. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, पंजाब, हरयाणा या भागात याच काळात सांझी नावाचा कुमारिकांचा उत्सव साजरा केला जातो. भुलाबाईची गाणी गोळा करीत असताना धुळे येथील पुनम परदेशी यांनी भुलाबाईची पारंपरिक आरती सांगितली. ही आरती खूप काही सुचवून जाणारी आहे. ती आरती अशी:

सांजी अे आरती
बे सांजी पार्वती
पहिला मुलगा न्हाऊन धुऊन
गुलाल नाही तो छडी लागाऊ
कैसरियामाँ भांग पाडऊ (५ वेळा आरती म्हणतात)

वरील आरती पाच वेळा म्हणण्याची पद्धत आहे. पूनमताईना मध्य प्रदेशांत सांजाबाईच्या चालणाऱ्या प्रथेबाबत माहिती नव्हती. सांझी या व्रताच्या मूळ कल्पनेबद्दल डॉ. कुलदीप लिहितात, 'ब्रज की सांझी एक प्रसिद्ध कला है। जिसका प्रारंभ पौराणिक दृष्टीसे राधारानीको प्रसन्न करने के लिओ श्रीकृष्ण ने किया था। सबसे पहिले शरद ऋतु की संध्या को यह फुलों से बनाई गई थी. इसीलिए इसका नाम साँझी पडा।'
 सातत्य राखून बदल स्वीकारणे, तो अंतरात एकरूप करून घेणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सार्वत्रिक होणे (प्रिव्हेलेन्स) प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहणे (सर्वाव्हयल) अवशेष रूपाने राहणे आणि लुप्त होणे (ॲबसोलेट) या प्रक्रियांद्वारे (प्रोसेस) बदल घडत असतात. ही गाणी कोणे एके काळी सार्वत्रिकपणे प्रचलित असतील. त्यामुळेच काळाच्या ओघात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरीही ती चिवटपणे टिकून राहिली. मात्र त्यातील कालबाह्य, काळास महत्त्वपूर्ण न वाटणारा भाग लुप्त झाला आणि त्यांचे अवशेष पूर्वेतिहासाची साक्ष देत जिवंत राहिले. आज गाण्यांमध्ये वरवर पाहता वाटणारी निरर्थकता या चारही प्रक्रियांनी नीट समजून घेतल्यास सहजपणे लक्षात येते. निरर्थकतेतील 'अर्थ' उलगडण्यास मदत होते.
 'सांझी' मध्य प्रदेश, राजस्थान, व्रजभूमी, बंगालचा काही भाग इ. भागांत विविध रूपातूंन साजरी केली जाते. भुलाबाईच्या गाण्यात शिरलेली ही 'आरती' बाहेरून भुलाबाई या व्रतात दाखल झाली असावी की 'सांझी' चे मराठी रूप 'भुलाबाई' उत्सव हे असावे ? भुलाबाईच्या गाण्यांचा शोध घेत असताना 'सांझी'च्या गाण्यांचा आशय पडताळून पाहणेही महत्त्वाचे ठरणारे होईल. परंतु प्रस्तुत अभ्यासाच्या कक्षेत हा विषय येत नसल्याने इथे केवळ दिशासूचन केले आहे. भुलाबाईचे नमनगीत 'पहिली ग भुलाबाई' हे आहे. ते रोज म्हटलेच जाते. भोंडला आणि भुलाबाईची नमनगीते सोडल्यास, इतर गाणी दोनही उत्सवांत म्हटली जातात. भुलाबाईचे नमनगीत तीन तुकड्यांचे असून येथे त्याचा सलगपणे शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 उमेचे माहेरपण आणि बाळंतपण -
 भुलाबाई उत्सवांत उमेचे ऊर्फ पार्वतीचे केवळ माहेरपण अभिप्रेत नसून हे दिवस तिच्या बाळंतपणाचे आहेत. भुलाबाई हा 'सृजना' च्या सत्काराचा उत्सव आहे. पहिले अकरा दिवस भुलाबाईच्या बाळाची बाज, टिपऱ्यांच्या साहाय्याने अभिनित केली जाते. त्यावर बाळ झोपवले जाते. अखंड सुपारीस कुंकवाचा ठिपका देऊन त्यालाच बाळ केले जाते. बाराव्या दिवशी बाळाचे नाव ठेवण्याचा विधी केला जातो. त्या दिवशी टिपऱ्यांची बाज न करता टिपऱ्यांचा चौफुला मांडून पाळणा केला जातो.

आकाश बाई आकाश अस्स कस्स आकाश
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा प्रकाश ॥

अशा रीतीने यमक जुळवून बरीच नावे घेतली जातात व शेवटी गणेश, विनायक असे गणपतीचे नाव ठेवले जाते. नाव ठेवण्याचा विधी रोजच केला जातो. भोंडला वा हादगा फेरात टाळ्यांच्या तालावर खेळतात. तर भुलाबाई मात्र टिपऱ्यांचा तालावर फेरात खेळली जाते.
 भुलाबाईचे नमन-गीत -

पहिली ग भुलाबाई
घातिली मंडपा
खंडोबाच्या नारीबाई
आवष्णीचं पाणी जसं
गंगेच्या पाण्याला
ठोकिला राळा
हनुमंत बाळाचे
सीताबाई शोभे
भाऊ भाऊ पिकती
 
झळकतीचं एकच पान
एवढीशिशी गंगा
तांब्या पितळी
तांब्या पितळी
हिरवी टोपी
हिरवी टोपी हरपली
सरपदादा एकला

देव देव सादेव
खेळखेळे खंडोबा
वसावसा आवष्णी
गंगेच पाणी
वेळीला भात
हनुमंत बाळा
लांब लांब झोके
अस्तुरी पुढे
माता पुढे झळकती
(मातापूर झयकती)
दुरून भुलाबाई नमस्कार
झुळझुळ व्हाय
झळकत जाय
नायगो
बायको
सर्पाआड लपली
जाई आंबा पिकला

जाईनाही जुई नाही
चिंचा तोडित जाय ग
पालखीतली भुलाबाई
शोपा शोपा पेटोरा
जाते तशी जाऊद्या
तांब्याभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर मेण लावू या
निळ्या घोड्यावर बसू द्या
निळ्या घोड्याचे उलटे पाय
धुळेगावचे ठसेतुसे
माझे माहेर सोनारवाडा
आचे दूध तापे

चिंचेखालची राणूबाई
 
शोपा मिरवीत जाय ग
भुलाबाई जाते माहेरा
 
 
बोटभर कुंकू लावूया
 
आऊल पाऊल धुळे गाव
भुलाबाई म्हणते माहेर जसे
भुलाबाई म्हणते बिंदी तोडा
त्यावर पिवळी साय

(चाल बदल)
लेकी गुलाबाई
कशी लेऊ दादा
करतील माझा हेवा
पार्वती चाले पायी
आडवी गंगाजमुना

 
साखळ्या लेऊन जाय
घरी नंदा जावा
हेवा परोपरी-नंदा घरोघरी
शंकर घोड्यावरी
कशी उतरू बाई

(चाल बदल)
गडावर गड बाई माहुर गड
तिथला सोनार कारागीर
त्याने आणला साखळ्यांचा जोड
घ्या घ्या भुलाबाई साखळ्यांचा जोड
घेता घेता सजशी पती गेले वंजोशी
एवढा शृंगार कोणाशी ? भुलोजीच्या राणीशी

(चाल बदल)
डोला बाई डोला
भोळा शंकर

 
डोल्याची काडी
बांधितो माडी

  माडी बांधुनी
  चला चला भुलाबाई

श्रीमंती केली
मंदिरी जाऊ

नथ नाही तर कशी येऊ?
नथीसाठी वंजिस गेले
सोन्याचं कारलं फेकीत आले
एक गेला जिरिया एक गेला मिरिया
एक गेला खारीका एक गेला खोबरा
खारीक खोबऱ्याचं आलं, जियामिन्याच काही नाही आलं
पड पड पापडी
चलग सई, जागरणाला
सीतेच्या माहेरी तांब्याची चूल
मखर घातलं जाई फूल
झाल झाली देवापाशी
सुनमुख झालं तुळशीपाशी
हंडा घंगाळ पाणी तापलं
बाळ न्हाऊन पाळण्यात निजलं
भुलाबाई भुलाबाई आपल्या मुलाची बाज/पाळणा पाहा
बाज/पाळणा पाहा
साखरेच्या गोणीबाई लोटविल्या अंगणी
आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस, पहिला दिवस
परहिल्या दिवसी बाळाला टोपी, मोत्यानं गुंफली,
जो जो रे जो जो रे

 खेळ खेळणारा खंडोबा -
 हे नमनगीत मुळातच खूप लांबलचक आहे. त्यामुळे तुकडे करून म्हटले जाते. या गीतांत मंडप घातल्याचा उल्लेख असून खंडोबा तेथे खेळ खेळत असल्याचे सांगितले आहे. 'खेळ खेळे खंडोबा' या ओळीतून काय ध्वनित होते ? मराठी भाषेत 'खेळ खंडोबा होणे' या म्हणीचा अर्थ वेगळ्या अर्थाने वापरला जातो. खंडोबा हे महाराष्ट्राचे लोकदैवत आहे. खंडोबाची पत्नी म्हाळसा. धनगरकन्या बाणाई हिच्या अलौकिक सौंदर्याने मोहित होऊन त्याने बाणाईशी विवाह केल्याची कथा सर्वश्रुत आहे. त्यामुळेच धनगर समाज खंडोबास जावई मानतो. तो त्यांचे दैवत आहे. खंडोबाची अनेकविध गीते महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रचलित आहेत. म्हाळसा आणि बाणाई यांच्या सवती मत्सराची कथा आणि त्यात खंडोबाची होणारी ओढाताण हा कथाबंध मराठी लोकजीवनात रुजलेला आहे. खेळ खंडोबा होणे म्हणजे संसाराची वासलात लागणे असा अर्थ का लावला जातो याचे इंगित वरील कथाबंधाशी निगडित आहे. भोंडला वा हादग्याच्या नमनगीतात खेळाचा उल्लेख आहे. भुलाबाईच्या नमनगीतातही 'खेळ खेळणारा खंडोबा येतो' हा खेळ संसाराचा असावा आणि हा खेळ अखंडपणे खेळला जाणार आहे. ही क्रीडा जगरहाटीची आहे. सृजनाची आहे. मराठवाड्यात, ग्रामीण भागात जुन्या स्त्रियांच्या बोलण्यात स्त्रीपुरुष समागमासाठी 'खेळणे' हा शब्द वापरला जातो.
 या गीतांत खंडोबाच्या नारी बाई वसा वसा आवष्णी
    आवष्णींच पाणी जसं गंगेच पाणी।।
अशा ओळी आहेत. खंडोबाच्या नारींचा येथे आवर्जून उल्लेख का आला असावा?
 खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजापासून ते कोळी, सुतार भटके समाजातील विविध जातींचे लोक या दैवताची श्रद्धेने पूजा करतात. महाराष्ट्रातील लोकसाहित्याचे आणि लोकसंस्कृतीचे सन्माननीय अभ्यासक श्री.डॉ. रा. चिं. ढेरे खंडोबाला लोकदेव म्हणतात. खंडोबाला शिवाचा अवतार मानतात. मणिमल्लासुरांचा वध करण्यासाठी शिवाने शक्ती निर्माण केली आणि स्वतः मार्तण्डभैरवाचे रूप धारण केले. ही शक्ती म्हणजेच म्हाळसा .... महालया. खंडोबाच्या म्हाळसा, बाणाई या नारीव्यतिरिक्त पालाई ही पाली गावची गवळण त्याची भक्त होती. तिच्यासाठी तो पालीस प्रकटला अशी आख्यायिका आहे. खंडोबाला नवस बोलून मुली वाहण्याची प्रथा महाराष्ट्र कर्नाटकात अलीकडच्या काळापर्यंत चालू होती. खंडोबाला अर्पण केलेल्या या मुरळ्यांचा खंडोबाशी विवाह लावून देत.
 गंगा आणि उमा यांच्यात सवतीमत्सर उत्पन्न झाल्याने शंकराने त्यांना एकत्व दिल्याची कथा सर्वश्रुत आहे. कर्नाटकात म्हाळसेला माळव्व नावाने ओळखतात. तिला गंगी माळव्व आणि तुप्पद माळव्व अशी नावे आहेत. गंगा उमेच्या भांडणाची व नंतरच्या एकत्वाची लोककथा बीजभूत मानून तशीच कथा म्हाळसा व गंगेच्या एकत्वाची सांगितली जाते.
 आवष्णीचं पाणी जसं गंगेचे पाणी या ओळीतील गंगेच्या पाण्याचा संदर्भ खंडोबाच्या कथेतून तर आला नसेल ?
 राळ्याचा उल्लेख या गीतात आहे. राळा हे प्राचीन काळातले महत्त्वाचे अन्न होते. राळा हे अग्नितत्त्व आहे. राळ उडविणे हा वाक्प्रचार मराठीत रूढ आहेच. राळ्याचा भात आजही कोकणातल्या गरिबाचे महत्त्वाचे अन्न आहे. वसुबारसेस राळ्याचा भात करून खाण्याची रूढी महाराष्ट्रात प्रचलित आहे.
 हनुमंत बाळ : वीरदेवता -
 हा गाण्यातील 'हनुमंत बाळ' ही वीरदेवता आहे. महाराष्ट्रात दोन प्रकारच्या हनुमंताच्या प्रतिमा आहेत. भक्त हनुमान हा रामाच्या सेवकाच्या रूपात असतो. त्यालाच दास हनुमान वा दास मारूती म्हणतात. वीर मारूती वा वीर हनुमान ही क्षेत्रपालक देवता आहे. आर्यपूर्व संस्कृती, आर्येतर समाज यक्षपूजक होते. वैदिकांच्या मते यक्षासारख्या अद्भुत देवांवर विश्वास ठेवणारे लोक अविकसित बुद्धीचे होते. यक्ष ही लोक-देवता मानली जाते. एकेकाळी यक्षपूजा सर्वत्र प्रचलित असावी. कारण वेदोत्तर साहित्यात, बौद्ध, जैन साहित्यात यक्षांचे उल्लेख विपुल प्रमाणात येतात. वैदिक देवदेवतांचे महत्त्वसमाजात वाढू लागले तरी 'यक्ष' कल्पनेचे समूळ उच्चाटन झाले नाही. 'वीरपूजा' ही प्राचीन यक्षपूजेचाच अवशेष आहे. आपण मारूतीला 'महावीर' म्हणतो. तो यक्षनियंत्रक आहे असे मानले जाते. आश्विनात होणाऱ्या वर्षन सर्जनाच्या उत्सवांच्या विधिगीतांतून येणारे हनुमान, खंडोबा, मुंजा, भुलोबा यांचे उल्लेख क्षेत्रपाळ यक्षपूजेचे अवशेष आहेत. भुलाबाईचे हे नमनगीत अतिशय जुने असले पाहिजे. कारण त्यातील शब्दांशब्दांत संगती लावताना त्यात पडलेले अंतर जाणवते.
 या गीतातील सीता : भूमिस्वरूपात -
 खंडोबा त्यांच्या नारी, हनुमंतबाळ यांच्या पाठोपाठ सीतेचा संदर्भ येतो. अर्थात या गीतांतील सीता केवळ सती आणि रामपत्नी म्हणून या गीतांत येत नाही. सीतेचा रामपत्नी म्हणून लोकगीतांतून स्वतंत्रपणे उल्लेख येतो, तेव्हा तिच्या वनवासाचे किंवा वनवासी मातृत्वाचे संदर्भ येतात. उदा. ---
 १. सीतेच्या हाती फुलाच्या गजरा
  रामाच्या हाती बाण

धाडु नको वनी राम, कैकयी बाई ....
सीता निघाली वनवासाला
म्होरं लागलं अशुकवन
धाडु नको, वनी राम, कैकयी बाई ....

 २.

अंगणी खेळी सीता
जनकाला पडली चिंता
सीता--- माईला, रामाला द्यावी आता ......
चांदीच्या ताटामंदी
ठेविले मंगळसूत्र
सीतामाईचा पती ओवीतो रामचंद्र ....

 मात्र भुलाबाईच्या गीतातून येणारे उल्लेख भूमिस्वरूप, भूदेवी सीतेचे आहेत. तसेच 'माता वा माऊल्या' यांचे उल्लेखही सप्तमातृकांचे असावेत.

भाऊ भाऊ पिकती (टिकती) मातापुढे झळकती
झळकतीचं एकच पान दुरून गुलाबाई नमस्कार

या ओळीतील शब्दांतून कोणते संकेत मिळतात ? पिकणे ही अवस्था तेजाचा एक भाग आहे. परिपक्वता ही नेहमीच तेजस्वी असते.
 लोकगीत प्रक्रियांद्वारे बदलत राहते-
 वरील ओळ म्हणताना मुली भुलाबाईच्या मूर्तीकडे पाहून नमस्कार करतात. नमनगीताचा पहिला भाग इथे संपतो. या गीतांत संगती नाही हे सतत जाणवत राहते. सार्वत्रिकता, लागून राहण्याची चिवट प्रकृती, अवशेषरूपाने राहणे आणि लुप्त होणे या प्रक्रियांतून टिकलेल्या गाण्यांतून येणारे शब्द, मौखिक गाण्याच्या स्वरूपात जेव्हा आपल्यासमोर येतात, तेव्हा त्यातील असंबद्धता आपल्याला जाणवते. पण तरीही त्या शब्दापाठचा क्षीण आणि सूक्ष्म असा संदर्भ मनाला जाणवतो, तो शब्दात पकडणे शक्य होत नाही.
 या गाण्यात 'टोपी' हा शब्द अतिशय मजेशीरपणे येतो. उदा.:

  तांब्यापितळी नाय गो
  हिरवी टोपी हरपली

हिरवी टोपी बायको
सर्पाआडे लपली

  सरपदादा एकला जाई आंबा पिकला

  जाई नाही जुई नाही
  चिंचा तोडित जाय गो ...
  पालखीतली भुलाबाई

चिंचाखालची राणूबाई
 
शोपा मिरवीत जाय गो..

 'टोपी ' हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आजही शुभगोष्टींसाठी, विधीसाठी डोक्यावर टोपी आवश्यक मानतात. वरील ओळीत सर्प आणि आंबा यांचा उल्लेख एकत्र येतो. सर्प आणि आंबा यांचे साहचर्य कोठून आले असावे? सर्प आणि भूमी व सर्प आणि रजोद्रव्य यांचा अन्योन्य संबंध पुरातन काळापासून कल्पिलेला आहे. सर्पहा भूमिरक्षक आहे, तो पिकाचे रक्षण करतो, सर्पाच्या फणीवर पृथ्वी तोललेली आहे असे परंपरेने मानले जाते. सार्पा मुळे उंदीर घुशी या धान्य नष्ट करणाऱ्या प्राण्यांचा नायनाट होतो. त्यामुळे त्याला कृषिजीवनात सन्मानाचे स्थान आहे. नागपूजा आजही नागपंचमीच्या सणाद्वारे केली जाते. नागपूजा, विविध दैवतांसोबत नागाचे साहचर्य इ. संकल्पना सार्वत्रिकपणे आस्तित्वात होत्या आणि त्यांचे अवशेष आजही भारतीय संस्कृतीत आढळतात.
 सर्प हे पुरुषयोनीचे प्रतीक मानले जाते. सर्प स्वप्नात येणे हे'कामेच्छे'चे प्रतीक मानतात. जगातील अनेक मानवसमूहांत सर्पाचा आणि स्त्रीच्या रजस्त्रावाचा संबंध कल्पिलेला आहे. स्त्री वयात आल्यावरच मातृत्व धारण करू शकते. तद्वत् धरणीही रजस्वला झाल्यावरच धनधान्याची विपुल निर्मिती करू शकते. अशी कल्पना भारतातील सर्व भागांत अस्तित्वात आहे. 'अंबूवाची' हा उत्सव सर्वत्र साजरा होतो. रा. चिं. ढेरे यांनी 'लज्जागौरी' या संशोधनापर ग्रंथात 'अंबुवाची' उत्सवाचे विस्तृत विवेचन केले आहे. त्यात ते नमूद करतात की सर्प हा स्त्रीच्या रजःस्त्रावाला कारणीभूत असल्याची समजूत जगातील अनेक समाजात आहे.
 'बंगालमधील अंबुवाची'१० उत्सवातील एका यात्वात्म क्रियेत रजःस्त्राव आणि सर्प यांचा संबंध अगदी वेगळ्या स्वरूपात प्रतीत होतो. बंगलामधील लोक अंबुवाची त्या काळात (आषाढ शुक्ल सप्तमी ते दशमी) दूधात आंबरस मिसळून ते पेय पितात. हे पेय प्यायल्या मुळे वर्षभर सर्पदंशाचे भय उरत नाही असा तेथील लोकांचा विश्वास आहे. अंबरसयुक्त दूधाचे पान आणि सर्पदंश भयातून मुक्ती यातील संबंधाचे रहस्य शोधताना ते नमूद करतात की स्त्री रजस्वला असताना वा ती गर्भिणी असताना तिच्याशी पुरुषसंबंध निषिद्ध मानला आहे. गर्भिणी स्त्री व नाग यांची नुसती दृष्टादृष्ट झाली तरी निषेधभंगाच्या अपराधामुळे त्याची दृष्टी जाते व ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या न्हाणीतल्या पाण्याच्या स्पर्शाने त्याला पुनःदृष्टी प्राप्त होते. हा कल्पनाबंध सर्वत्र प्रचलित आहे. नागसर्प व पुरुष यांची एकरूपता आणि पृथ्वी व स्त्री यांची एकरूपता ध्यानी घेता स्त्रीरूप पृथ्वीच्या रजोद्रव्यात पुरुषरूप नागाचा संपर्क टाळण्याचे सामर्थ्य आहे, ही यातुगर्भ धारणा दृढावणे अगदी स्वाभाविक ठरते. दूधात अंबरस मिसळून ते रक्तवर्णी पेय पिण्याची कल्पना ही प्रतीकात्मक रजोद्रव्याचे पान करण्याची कल्पना आहे. त्यामुळे सर्प दंशाचे भय उरणार नाही अशी या क्रियेमागील मानसिक बैठक आहे. सर्प आणि आंबा यांच्या साहचार्याचा अनुबंध वरीलयातुकल्पनेतून या गीतात दाखल झाला असावा.
 राणूबाई : रण्णा सण्णा -
 'चिंचेखालची राणूबाई'११ असा उल्लेख येतो. राणूबाई ही अग्निदेवता, सूर्यदेवता आहे. ऋग्वेदात रण्णा सण्णा देवीचे वर्णन आले आहे. कहाणी वाङ्मयातही आदित्यराणूबाईची कथा येते. भुलाबाई खानदेशांतही मांडली जाते. खानदेश, बागलाणात कानबाई या देवतेची पूजा केली जाते. 'कानबाई' देवता खानदेशातील सुप्रसिद्ध संशोधक श्री. भा. रं. कुलकर्णी यांना वैदिक देवता रण्णा सण्णा देवी असावी असे वाटते. खानदेशांतील लोकप्रिय देवतेचे रूप भुलाबाईच्या गाण्यांत दाखल झाले असावे.
 'शोपा' या जिरे बडिशेप सदृश पदार्थाचा उल्लेख भुलाबाईच्या गाण्यातून बऱ्याचदा येतो. 'शेपा' बाळंतिणीस खोबऱ्याबरोबर खाण्यास देतात.त्या दुग्धवर्धक असतात असे मानले जाते. या उत्सवात भुलाबाई ही बाळंतपणासाठी माहेरी आलेली असल्याने 'शोपा'चा उल्लेख त्यात आला असावा.
 या गीतात भुलाबाई माहेरी निघाल्याचे चित्र रेखाटलेले आहे. ती निळ्या किंवा जांभळ्या क्वचित हिरव्या घोड्यावर आरूढ आहे. खानदेशात ती निळ्या घोड्यावर बसल्याचा उल्लेख येतो. तसेच लोककथांमधील वेगवान घोड्याचे पाय उलटे असतात. तांब्याभर पाण्याने न्हाऊन, बोटभर मेण आणि बोटभर कुंकू लेवून भुलाबाई माहेरी निघाली आहे. तिचे माहेर 'सोनारवाडा' आहे.
 भुलाबाईचे माहेर सोनारवाड्यात कसे? -
 या ठिकाणी एक बाब मनात येते, शंकर हा सर्वसामान्यांचा देव आहे. खंडोबा, भैरोबा, भुलोबा ही शंकराचीच रूपे. त्यांच्या कृपेचा कळवळा सर्व स्तरांत पोहोचलेला असतो. खंडोबाची म्हाळसा 'वाणीण' आहे, तर बाणाई 'धनगरीण' आहे. 'पालाई' ही गवळण आहे. शंकर आणि भिल्लीणरूपी उमेच्या प्रेमाची कथा सर्वश्रुत आहेच. भुलाबाईच्या गाण्यातून येणारे दागिन्यांचे संदर्भ, सोनारवाड्याचे उल्लेख, भुलाबाईचे माहेर सोनारवाडा यातून काही नवा संकेत मिळू शकतो.
 खडतर नाती -
 माहेरी आलेल्या भुलाबाईच्या चित्रानंतर आंचेवर तापणाऱ्या दूधाचे आणि पिवळ्या सायीचे चित्र गाण्यातूनयेते. दूधावरची पिवळी साय, सुखसमृद्धी ओतप्रोत भरल्याचे सुचवते. भुलाबाई लेकीला साखळ्या लेवून जाण्याचा आग्रह होतो. पण ती म्हणते -

कशी लेऊ दादा?
घरी नंदा जावा
करतील माझा हेवा
नंदा घरोघरी

 नणंद-भावजय, सासूसून, जावाजावा ही नाती 'खडतर' म्हणून ओळखली जातात. भावाबहिणीच्या निर्मळ प्रेमाचे प्रतिबिंब लोकसाहित्यात पाहावयास मिळते तसेच सासू नणंद यांच्या बद्दलच्या भावनांचे चित्र अत्यंत संयमाने रेखाटलेले दिसते.
 उदा.-

१. सासरी वस वस नका करू सासूबाई
  दारीच्या चाफ्यापाई दूर देशाची आली जाई
२. सासू हाय रागीट भारी
  परपंचाची करती वडी
  इथून करी लई तातडी
  पल्याड मूळ धाडा..मी जाती बगा म्हायाराला
  नंदा दुष्ट आठजनी

 काय सांगू मी त्येंची करनी
 वडून माझी वेनी बालंट घाली - मी जाती आपल्या म्हायाराला
३.  नाकातली नथ कशी हालं कशी ड्रलं
 सावळे भावजायी जरा बेतानेच बोल

 माहूर गडाचा संदर्भ -
 भुलाबाईच्या या गीतांत १२माहूरगडाचा उल्लेख येतो. 'गडावर गड बाई माहूर गड.तिथला सोनार कारागीर या ओळीच्या वेळी मुली टिपरीवर टिपरी उभी करून गड उभा करतात. माहूरगडाबाबत डॉ. रा.चिं. ढेरे यांनी लज्जागौरी या संशोधनपर ग्रंथात विस्तृत विवेचन केले आहे. आर्यपूर्व भारतात योनिपूजा आस्तित्वात होती. माहूरची देवी रेणुका आहे. ही भूमिस्वरूप आहे. रेणुका म्हणजे कुमारी भूमी-कोरी भूमी. वारूळातील माती कोरी असते असे मानतात. वारुळ, भूमीच्या उपासनेत महत्त्वाचे मानले जाते. ब्राह्मण काळापासून वारूळाची माती सुफलनकारक म्हणून वापरली जाई. रेणुकेला अखंडकुमारीमानले जाते.ती पुरुषतत्त्वाला अनेक रूपांत सांभाळते, परंतु तिचे कौमार्य भंग पावत नाही अशी समजूत आहे. भूमीचे रक्षण करणारे क्षेत्रपाळ नागस्वरूपात मानले गेले आहेत. भुलाबाईच्या नमनंगीतातील साँचेसंदर्भतसेच माहूरगडाचे संदर्भ, हालोकोत्सव भूमीच्या सृजनाशी जोडलेला आहे याची जाणीव करून देतात.
 नथीचा नखरा -
 भुलाबाईच्या गाण्यांतून येणारे दागिन्यांचे संदर्भ अलीकडचे असावेत. स्त्रियांना विशेषकरून तरुण नववयसा मुलींना दागिन्यांची हौस असतेच. त्यामुळे खालील ओळीतील वनिताभाव अतिशय मनोरम वाटतो.

चला चला भुलाबाई मंदिरी जाऊ
नथ नाही तर कशी येऊ

 मंगळसूत्राप्रमाणेच नथ हे सौभाग्याचे प्रतीक मानली जाते. नथीत नाजूक शृंगाराची, समृद्धीची अभिव्यक्ती असते. स्त्रीत्वाचा नखरा नथीत गुंफलेला असतो. जुन्या स्त्रिया म्हणतात की सतरा दागिन्यांपरीस एक गरक्याची नथ नाकात घातली की बाई सजते.

नथीसाठी वंजिस गेले
सोन्याचं कारलं फेकीत आले

या ओळीतील सोन्याच कारल हा संकेतसूचक आहे. सोन्याच असल तरी ते कारल आहे. मानापानाची बुजुर्ग माणस हात हलवीत परत येतात, अशा वेळी दुसरे काय म्हणणार?
 पेराल तसे उगवते -
 जिरे, मिरे, खारीक, खोबरेया मसाल्यांच्या जिनसांचा उल्लेख कायदर्शवितो? जिरेमिरे फेकणाऱ्यांच्या हाती काही येत नाही तर खारीकखोबर फेकीत जाणाऱ्यांना मात्र फळ मिळत.

खारीक खोबऱ्याचं आलं
जिन्यामिन्याचं काही नाही आलं

 जिरेमिरे हे खारे... तिखट चवीचे प्रतीक तर खारीक खोबरे हे मधुर स्वादाचे आणि चवींचे प्रतीक. पेरावे तसे उगवते हे तर या ओळीतून सुचवायचे नसेल?
 बाज आणि पाळणा -
 या गाण्याच्या अखेरच्या तुकड्यात भुलाबाईच्या बाळाचा संदर्भ येतो. भुलाबाईच बाळ पहिले अकरा दिवस बाजेवर झोपवलं जाते. टिपरीशेजारी टिपरी जोडून बाज केली जाते. त्यावर सुपारी ठेवतात. सर्वजणी उजवा हात त्या टिपऱ्यांना लावतात आणि म्हणतात -

साखरेच्या गोणीबाई लोटविल्या अंगणी
आज आमच्या भुलाबाईला पहिला दिवस.... पहिला दिवस
पहिल्या दिवशी बाळाला टोपी मोत्यानं गुंफली
जो जो रे जो जो रे...

 बाराव्या दिवसापासून बाळाच नाव ठेवण्याचा विधी केला जातो. नाव ठेवताना गाणे म्हणतात.

अळकीत जाऊ की खिळकीत जाऊ
खिळकीत ठेवली माती
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा गणपती

 आम्हा मुलींना आनंद झाला -
 भुलाबाईची गाणी म्हणून झाल्यावर शेवटचा मुखडा प्रत्येक धरी म्हटला जातो.

भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला
चला हो माझ्या माहेरा, माहेरा
गेल्याबरोबर पाट बसायला
विनंती करू यशोदेला
टिपऱ्या खेळू गाणी गाऊ प्रसाद घेऊन घरी जाऊ
घरी जाऊ.....

या गाण्यात पार्वती यशोदेची माहेरवाशीण झालेली दिसते. भुलाबाई खानदेशात .. घरोघरी खेळली जाते. खानदेश, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरचा भाग आहे. गुजरातेत नवरात्रात गरबा खेळतात. गरब्यातून यशोदा भुलाबाईच्या या गाण्यात दाखल झाली असावी.
 एक लिंबू झेलू बाई -
 भोंडला आणि भुलाबाई या दोनही लोकव्रतांत सर्वत्र गायले जाणारे एक गाणे म्हणजे 'एक लिंबू झेलू बाई'
 गाणे - एक लिंबू झेलू बाई -

  एक लिंबू झेलू बाई
  दोन लिंब झेलू बाई
  तीन लिंब झेलू बाई
  चार लिंब झेलू बाई
  पाचाचा पानोडा
  हनमंताची निळी घोडी
  कमळाच्या पाठीमागे लागली राणी
  अग अग राणी इथे काय पाणी
  पाणी नव्हे जमनागिरी

दोन लिंब झेलू
तीन लिंब झेलू
चार लिंब झेलू
पाच लिंब झेलू
माळ घाली हनमंता
येता जाता कंबळ तोडी
 
 
जमनागिरीची बारीक वाळू

  तेथे होते चिलार बाळ
  चांदीच्या चमच्याने
  मोत्याच्या गादीवर
  निजरे निजरे तान्ह्या बाळा
  मी तर जाते
  सोनारवाड्याचे
  लेकराची

चिलार बाळाला भूक लागली
दूध पाजीयले
बाळ निजविले
(तान्हन बाळा)
सोनारवाडा
दिवे जळे
हसळी गळे...

 लिंबू :जारण-मारण विधीतील एक महत्त्वाचे फळ -
 या गाण्यातून लिंब झेलण्याचा संकेत मिळतो. १३लिंबू हे फळ जारणमारण वगैरे काळ्या जादूच्या विधीत विशेष महत्त्वाचे मानले जाते. त्याचा औषधी उपयोगही प्राचीन काळापासून केला जातो. लिंब आणि निंब या दोनही झाडांना लोकगीतांत मानाचे स्थान आहे. वसंतात कोवळ्या पानांनी आणि तवराने फुलून येणारे निंबाचे झाड गारवा देणारे असते. सावली देणारे असते. या गीतात लिंबू या फळाचा उल्लेख आहे. दृष्ट लागू नये म्हणून लिंबलोण उतरवून टाकण्याची लोकप्रथा आजही खेड्यातून दैनंदिन जीवनात पाळली जाते. परंतु लिंब आणि कुंवारकन्या यांच्या साहचर्याचा कल्पनाबंध अस्तित्वात आहे. लिंबविधी हा एक खास विधी आहे. कुमारिकेस नहाण आल्यावर करावयाचा विधी आहे. ही चाल पूर्वी कोकणपट्टीतील काही जातीत रुढ होती. त्याला १४'कुवाराचा लिंब' असेही म्हणत. मुलगी रजस्वला झाली की तिची लिंबांनी ओटी भरीत. हातात निंबाच्या डहाळ्या देऊन मामा तिला खांद्यावर बसवून नदीवर नेई. मामा तोरणीची काठी हातात घेऊन नग्न होऊन भाचीला मांडीवर घेई.नंतर त्या दोघांना घोंगडीने झाकत. नंतर त्या लिंबाचे आणि तोरणीच्या काठीचे नदीत विसर्जन करीत. कर्नाटकात आजही मामाभाचीचा विवाह धर्मसंमत मानला जातो. लोकसाहित्याच्या अभ्यासक दुर्गा भागवत यांच्या मते या प्रथेतून मामाने कुमारिकेचा कौमार्यभंग करायचा असतो असे सुचवायचे असावे. भारताच्या इतर भागांत ही प्रथा आढळत नाही. मात्र ग्रीक परंपरेत भूमध्यसंस्कृतीत आणि आफ्रिकन जमातीत लिंबविधी आढळतो. कुंवारलिंबाची प्रथा लुप्त झाली तरी त्या विषयीची गाणी कोकणात सापडतात. भारतीय संस्कृतिकोशात लिंबविधीची विस्तृत माहिती देताना काही गाण्यांच्या ओळी उद्धृत केल्या आहेत. या गीतात आर्तवाला मृगसरींची उपमा दिली आहे. मृगनक्षत्र लागल्यावर मूमीतून लाल इन्द्रगोप किडे बाहेर पडतात. ते फिरू लागले की पृथ्वी ऋतुस्नात होते अशी शेतकन्यांची समजूत आहे.
 या लिंबविधीचा संबंध सुफलीकरणाच्या विधीशी आहे. भुलाबाईच्या गाण्यातून येणाऱ्या विविध संदर्भावरून या गाण्यांचे मूळ आर्यपूर्व काळातील भूमीच्या सुफलीकरणासाठी केल्या जाणाऱ्या यातुविधींच्या गाण्यात असावे असे वाटते. लिंब झेलण्याचे हे गाणे सुफलीकरण विधीतून, लिंबविधीतून मुलाबाई आणि हादग्याच्या गाण्यात समाविष्ट झाले असावे.
 वीर हनुमान आणि दास हनुमान -
 याच गाण्यात हनुमंताचा संदर्भ आहे. भोंडला मुलाबाईच्या गाण्यातील हनुमंतांच्या संदर्भाचे विवेचन यापूर्वी केले आहेत. दास मारूती आणि वीर मारूती असे दोन प्रकारचे मारूती वा हनुमानअसतात. आर्यपूर्वकाळापासून क्षेत्रपाळ देवतांचे महत्त्वसकाम साधनेत होते. गाण्यातील हनुमान 'वीर' आहे. हनुमंताची निळी घोडी या टिपणात अनेक मारूतीभक्त मुस्लिमांचा दाखला डॉ. वाकोडे१५ देतात. अनेक मुस्लिमांना हनुमानाबद्दल पूजाभाव होता. असे आढळते.डॉ.वाकोडे यांना निळ्या घोड्याचा संकेत कामदर्शक वाटतो. निळा जांभळा हे रंग कामतत्त्वाचे प्रतीक मानले जातात. इंद्र मोरपंखी निळ्या रंगाचा आहे असे मानले आहे. भारतीय परंपरेने बैल, नांग आणि घोडा यांना शक्तीसामर्थ्याची पुरुषतत्त्वे मानली आहेत.
 कंबळ म्हणजे कमळ. कमळ हे स्त्रीतत्त्व असून ते जीवनोत्पादक आहे. पं. महादेवशास्त्री जोशींच्या मते कमळ म्हणजे भूमी, योनी आणि चित्शक्ती. स्त्रियांच्या पोटावरील परवंटाला केळ किंवा कमळ म्हणतात. या गाण्यातील कमळ, भूमिपूजा आणि योनिपूजेचा संकेत देते. कमळ तोडणारी, कमळांच्या पाठी लागणारी राणी, भूदेवीचे रूप आहे.
 पाण्याच्या शोधात वणवणणारी राणी -
 मराठवाडा, विदर्भ-खानदेशात पाण्याच्या दुष्काळाच्या अनेक क्षेत्रकथा प्रसृत आहेत. या गीतातील राणी पाणी शोधते आहे. परंतु नदीचे पात्र कोरड्या वाळूने भरले आहे. या कोरड्या पात्रातील वाळूत चिलार बाळ खेळते आहे. लोकमानसात काही दृढ संकेत कालौघात तयार होतात. उदा. आई कशी तर यशोदेसारखी, कौसल्येसारखी. बाळ कसे तर कृष्णासारखे किंवा चिलया बाळासारखे.चिलया चांगुणाच्या कथेतील कर्तव्यपरायणता, वात्सल्यावर मात करते असा संकेत देणारी आहे. या तान्हुल्या बाळाला सोन्याच्या चमच्याने दूध पाजवून मोत्याच्या गादीवर निजवून ही राणी बाळाला अंगाई गाते.

निजरे निजरे तान्हन बाळा
मी तर जाते सोनारवाडा
सोनारवाड्याचे दिवे जळे
लेकराची हसली गळे

 बाळ हसळी गळेपर्यंत रडते आहे. पाण्याच्या शोधात हिंडणारी राणी सोनारवाड्यात का जाते ? सोनारवाड्याचे दिवे रात्रभर का जळत आहेत ? तळ्याला पाणी लागावे, नदीला झरे फुटावेत म्हणून महाराष्ट्रातील अनेक आयांनी आपली तान्हुली तळ्यात, डोहात, विहिरीत अर्पण केली आहेत. काही कथांतून बाळबाळंतीण पाण्यासाठी बळी दिल्याच्या दंतकथा सापडतात.
 गाणे ४ -

काळा कोळसा झिक झिक वाणा
आंत बसला गुलोजी राणा
घाल घाल भुलाबाई विंझण वारा
घालता घालता लागला वेळ
आम्हाला द्या मांडुन खेळ
खेळात सापडली अधेली
अधेली देऊ वाण्याला
वाण्या वाण्या शोभा दे
शोभा माझ्या गाईला
गाई गाई दूध दे
दूध माझ्या बगळ्याला
बगळ्या बगळ्या पंख दे
पंख माझ्या राजाला
राजा राजा घोडा दे
घोडे माझ्या बापाला
बापा बापा साडी दे

साडी माझ्या आईला
आई आई चोळ्या शिव
चोळ्या माझ्या बहिणीला
बहिणी बहिणी भातकुल दे
भातकुल माझ्या भावाला
भावा भावा गोंडे दे
ते गोंडे घेऊ सासरी जाऊ
सासराच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलालबुक्का दाटे

 फुललेला निखारा त्यात भुलोजी राणा बसला आहे आणि वारा घालून भुलाबाईला तो निखारा फुलविण्याची आज्ञा दिली जात आहे. गाण्याच्या पहिल्या तीन ओळी वाचताना दुर्गाताई भागवतांनी भुलोजीबाबत केलेले विवेचन सार्थ वाटते. अग्नीसाठी प्रागइतिहासात काळात साहस करावे लागे. अशा साहसी वीरांविषयी समाजाला विशेषतः स्त्रीसमाजाला वाटणारी कृतज्ञता 'झिग झिगवाणा' या शब्दातून फुललेल्या निखाऱ्याचे चित्र रंगरूपासह समोर येते. मात्र या तीन ओळीनंतर या गाण्याचे रूपांतर मालागीतात होते.या मालागीतात हे देऊन ते मग ते देऊन आणखी काही अशी मालिका असते. या गीतामागील मानसिकताही खास स्त्रीमनाचे चित्र रेखाटणारी असते. सर्वसामान्य स्त्रीवर्गहा भारतीय जीवनपद्धतीत शोषित म्हणूनच आजवर जगत आला. छोट्या छोट्या सुखांसाठी इच्छापूर्तीसाठी खूप मोठी तडजोड करावी लागे. ते सुख हाती येण्यासाठी दहा ठिकाणी होणारी वणवण त्यातून व्यक्त होते. अधेली कोणाकडे हक्काने मागता येत नाही. तीही खेळातच सापडते.
 या गीतातही 'शोभा' गाईला देऊ नि मग गाय भरपूर दूध देईल असा उल्लेख आहे. भुलाबाईची गाणी सर्जनाच्या सत्काराची गाणी असल्याने दुधासाठी शोभा या पदार्थाचे उल्लेख अनेकदा येतात. शोभा म्हणजे जे सर्वात चांगले शुभ आहे ते. लोकसाहित्य आणि संत साहित्य यांचे आपल्याला जे सहज दर्शन घडते त्यातून मनाला सतत जाणवत राहते की त्या साहित्यातून येणारे माहेर हे लौकिक माहेर या संकल्पनेपेक्षा आधिक आगळेवेगळे आहे. त्या माहेराला परातत्त्वाचा स्पर्श झालेला आहे. तसेच आमच्या लोकसाहित्यातील माहेर, स्त्री मनातील सुखाचे, तृप्तीचे, मुक्तीचे प्रतीक आहे. ते जणु 'स्वप्नभूमी' आहे. आमच्या महाराष्ट्र संतांनीही म्हटले आहे.
 उदा. कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे
  तैसे झाले माझ्या जिवा, केव्हा भेटसी केशवा - तुकाराम
  माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी - जनाबाई
 या गीतातील स्त्री बगळ्याला दूध देते. त्याचेकडून पंख घेते. पंख राजाला देते आणि त्याच्या कडून घोडे घेते. दूध हे गाईचे सत्त्व. तर पंख हे बगळ्याचे सत्त्व आणि उत्तम घोडे हे राजाच्या मर्मस्थानापैकी एक. हे घोडे ती बापाला देते त्याच्याकडून साडी घेऊन ती आईला देते. तिच्याकडून चोळ्या शिवून घेते नि त्या बहिणीला देते, त्या बदल्यात भातकुल घेऊन ते भातकुल भावाला देते आणि त्याच्याकडून गोंडे घेते. हे गोंडे घेऊन ती सासरी जाऊ असे म्हणते. इतक्या परिश्रमाने गोंडे घेऊनसासरी जातानाही सासरबद्दल विश्वास नाही. सासर आणि माहेर या विषयीची तिची प्रतिक्रिया अशी,

सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलालाबुक्का वाटे

या ओळी म्हणजे हजारो वर्षांच्या संसारयात्रेबद्दल स्त्री मनाने तटस्थपणे नोंदवलेली प्रतिक्रिया आहे.
 स्त्री जणू एक गोंडा. गोंडा कशाचे प्रतीक ? समृद्धीचे की शृंगारकेंद्री जीवनाचे ? एक म्हण या ठिकाणी आठवते.

लेक गेली तर नाकाचा शेंडा गेला
बायको गेली तर पायताणाचा गोंडा गेला

 भोंडलाभुलाबाईची अनेक गाणी आहेत. त्यातील काही गाण्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. भोंडला भुलाबाईच्या गाण्यांतून सासरबद्दल नवविवाहित आणि कुमारी मुलींच्या मनात असलेल्या भावना विपुल प्रमाणात व्यक्त होताना दिसतात.
 स्वरसमूहांचे आणि त्यांच्याशी जोडलेल्या विधिस्वरूपाचे प्राचीनत्व -
 वेदपूर्वकाळांत निसर्गातील निर्मितीतत्त्वांची पूजा करताना किंवा धनधान्य निर्मितीसाठी त्या तत्त्वांची कृपा व्हावी यासाठी विधियुक्त आराधना करताना म्हटल्या जाणाऱ्या स्वरसंघाचे बदलत आलेले रूप आजच्या भोंडला भुलाबाईचा गाण्यांतून अवशेष स्वरूपात सापडते. विविध कालखंडातून प्रवास करताना त्या स्वरसमूहात शब्दांची वीण जुळवली गेली. शब्दांच्या माध्यमातून काळानुरूप अर्थ त्या स्वरांत भरले गेले. काळाच्या ओघात ते शब्द अर्थ उसवले गेले वा विस्कटले गेले तरीही त्या स्वरसंघाचा मूळ सांगाडा विशेष करून, त्यातील समूहमनाची आणि समूह गानाची मंत्रात्मकता प्राचीनत्वाची साक्ष देत आजही मागे उरली आहे. त्या स्वरसमूहांशी संबंधित असलेले विधिस्वरूप बदलत गेले तरी, त्यांच्याशी जोडलेले आस्तित्त्व दाखवीत क्षीणपणे टिकून आहे.
 भाद्रपद-आश्विनातील कुमारिकांचे उत्सव आणि त्यांतील कलात्मक आविष्कार -
 भोंडला मुलाबाईशी समान्तर असणारे मध्य प्रदेशातील सांझी, गुजरातेतील नवरात्र, कर्नाटक - आंध्रातील कोलवू आणि बदकम्मा या कुमारिकांच्या उत्सवांत फुलापानांची सजावट आणि फेरातील नृत्यगाणी हेस्वरूप असते. विदर्भातील भराडी - गौरमांडताना फुलांचे विविध आकाराचे झेले कलात्मक रीतीने सजवतात.श्रावणांत जिवतीच्या दुसऱ्या दिवशी या गौरीची स्थापना होते तर ललितापंचमीस विसर्जन केले जाते. या उत्सवाची गाणी भुलाबाईच्या गाण्यांशी खूप साम्य असणारी आहेत.
 उदा.-

 भराडी गौर
 

अंगणी दूध तापे त्यावर पिवळी साय
गवराई बाई लेकी .... राहून जाय....

 भुलाबाई
 

आंचे दूध तापे त्यावर पिवळी साय
लेकी भुलाबाई साखळ्या लेऊन जाय

 भराडी गौर
 
 
 

अरडी परडी घसरडा
परडीएवढ फूल वो
तेही फुल तोडाना
गौराबाई गुंफाना

 भुलाबाई
 
 
 

अरडीएवढी परडी ग
दारी मूल कोण ग
दारी मूल सासरा ग
सासऱ्यान काय आणलन् ग...

 भोंडला वा हादगा मांडताना पाटावर रांगोळीचा हत्ती काढून त्याभोवती रांगोळीची सजावट करतात. फुलापानांचीही सजावट केली जाते. हत्तीच्या खाली पहिल्या दिवशी रांगोळीचा एक ठिपका देतात. रोज एक ठिपका वाढवतात.मी लहान असताना पुण्याहून बदली झालेल्या मैत्रिणीकडे आम्हाला भोंडला खेळायला बोलवीत. त्यांच्याकडे मूगडाळ व तांदळाचा हत्ती मांडीत असत असे मला स्मरते. भुलाबाई घरी येण्यापूर्वी कोनाडा मखराने सजवीत. पुठ्याचे वळणदार मखर कापून त्यावर गुलाबी कागदाची फुले आणि हिरव्या कागदाची पाने चिटकवीत. भुलाबाईची मांडणी करताना कोवळी कणसे, धान्याची ताटे, फळे यांच्या माळांचा उपयोग केला जाई. मखराला फुलवरा बांधत.
 सांझी उर्फ संजाबाईची सजावट -

 मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात सांझी मांडताना अशीच विविधरंगी सजावट केली जाते. हिरवेगार शेण घेऊन ते मातीत कालवून त्यापासून विविध लोकप्रिय आकार भिंतीवर चितारले जातात. त्यावर फुलांच्या पाकळ्या, बेगडाचे झगमगीत कागद चिटकवून सजावट केली जाते. सांझी उर्फ संजाबाई (संध्या हा मूळ शब्द - आसावा) हा कुमारिकांचा उत्सव आश्विन प्रतिपदेस सजावई म्हणजेच महाराष्ट्रातील कालगणनेनुसार भाद्रपद कृष्ण प्रतिपदेस सुरू होतो. महाराष्ट्रात भुलाबाई याच दिवशी मांडतात.
 सांझी विविध पारंपरिक आकृत्यांनी सजविली जाते. या सजावटीला साझी का खिल जाना असे म्हटले जाते. रोज नवनवी आकृती मांडली जाते.
 त्यामुळे लहान लहान मुलींना रंगसंगती तसेच रंगरेखांचे ज्ञान होऊन त्यांतील सौंदर्याची जाणीव होते. मुली आपापल्या प्रतिभेनुसार रोज सांझीला नवनवीन रीतीने सजवतात. त्यांच्यात चढाओढ लागते.
 भुलाबाईचे मखर सुंदर रीतीने सजवण्यातही अशीच चढाओढ लागते. परंतु सांझीच्या सजावटीतील जिवंतपणा भुलाबाईच्या सजावटीतून हरवलेला दिसतो. एकदा का मखर मढवले की संपले. भोंडल्याभोवती रांगोळ्या काढतात पण त्यात पारंपरिकता असते. नवीनता किंवा अुन्मेष नसतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातली सौंदर्यदृष्टी गेल्या काही दशकांत हरवत चालली आहे का? राजस्थानात गणगौरीची सजावट वा आंध्रातील बदकम्माची सजावट पारंपरिक अंगाने केली जाते. परंतु तिच्यातील ताजेपणा आजही टिकून आहे. आम्ही दारापुढे रोज जी रांगोळी काढतो, ती केवळ रीत म्हणून. दोन रेषा देवांच्या नावाने ओढायच्या इतकेच. परंतु आंध्र कर्नाटक वा तामिळनाडूत सकाळी अंगण अक्षरशः नाजूकपणे नटूनथटून बसते. अंगणाचे देखणेपण डोळ्यात मावत नाही. त्यामुळेच आजही या प्रदेशातील रांगोळ्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवले आहे. त्यात नावीन्य सहजपणे भरले आहे. दिवाळी दसरा आदी सणांना महाराष्ट्रात नवनवीन रांगोळ्या काढतात. पण सकाळी सजणारे अंगण हरवत चाललेय असे भासते.
 रंगवल्ली : एककला -
 भोंडला मुलाबाई या उत्सवातं रांगोळीला असलेले महत्त्व लक्षात घेता रंगवल्ली या पुरातन कलेबाबत थोडा विचार केल्यास वावगे होणार नाही.
 रंगवल्ली ही एक चौसष्ट कलांपैकी महत्त्वाची कला आहे. ती केव्हा अस्तित्वात आली हे सांगणे कठीण असले तरी तिचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला असावा. ती मूर्तिकला वा चित्रकलेच्याही आधीची आहे असे मानले जाते. कोणत्याही धार्मिक वा मांगलिक कृत्यात रंगवल्ली ही आवश्यक आणि प्राथमिक गोष्ट आहे आणि ही प्रथा भारतभर आहे. दैनंदिन जीवनातसडा संमार्जनानंतर अंगणात रांगोळी शुभंकर लक्षण म्हणून रेखली जाते. आजकाल मूलतः भोजनाची तृप्ती वाढावी म्हणून वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून रांगोळी काढली जात असली तरी रांगोळीमागची भूमिका वेगळी होती. अतिथीला देव मानून त्याची देवासमान यथोचित पूजा करण्याचा अवशेषरूप भाग समाजाने कायम टिकविला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रंगवल्लीचे महत्त्वाचे उद्देश आहेत. प्रतीके हा रांगोळ्यांचा आधार आहे. रांगोळी ही जणू सांकेतिक भाषाच होती. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, नागयुग्म अशा आकृती विविध भावबंध भाग दर्शविणाऱ्या असतात. रंगवल्लीसाठी तांदळाचे पीठ, गारगोटीचे पीठ यांचा वापर केला जातो. मात्र रांगोळी केवळ पांढऱ्या रंगाने काढणे अशुभ मानले जाते. त्यात गुलाल वा कुंकवाचा वापर आवश्यक असतो.  रांगोळीचे दोन प्रकार -
 रांगोळीचे आकृतिप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन महत्त्वाचे भेद आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात आकृतिप्रधान रांगोळ्यांचे प्रकार आढळतात तर भारताच्या पूर्व भागात - आसाम बंगालात वल्लरीप्रधान रांगोळ्या लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रांतात रांगोळीला विशिष्ट नाव आहे. तिच्या आकारचाही विशिष्ट प्रकार आहे.

 राजस्थान - मांडना  गुजरात - साथिया  बंगाल - अलिपना
 महाराष्ट्र - रांगोळी  मध्य प्रदेश - चौक पूरना  आंध्र - मुग्गू
 केरळ - पुडिवाल  तामिळनाडू- कोलम  कर्नाटक - रंगोली
 रांगोळी : ऐतिहासिक उल्लेख -
 १०व्या शतकातील नलचंपू या ग्रंथात उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळ्या काढीत असा उल्लेख आहे. १२ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या हेमचंद्राच्या 'देशीनाम माले'त तांदळाच्या पिठाची रांगोळी काढल्याचा उल्लेख आहे. १२ व्या शतकातील 'मानसोल्लासा'त सोमेश्वराने धुलिचित्र या नावाने आणि श्रीकुमाराने 'शील्परत्ना'त क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा उल्लेख केला आहे. भास्करभट्टाच्या शिशुपाल वधात रांगोळीचा उल्लेख आढळतो. ही कला किमान २००० वर्षांपूर्वीची असावी. जैनपारशी धर्मातही रांगोळी अशुभनिवारक मानली जाते.
 भुलाबाई हादग्याप्रमाणे सांझीभोवती आकृत्या काढल्या जातात. मात्र सांझीच्या आकृत्यांची विशिष्ट परंपरा आहे. उदा. पहिल्या दिवशी पाच बिंदिया आणि चन्द्रसूर्य रेखाटतात.स्वस्तिक (सांत्या) सप्तऋषी, अष्टपाकळ्यांचे कमळ,म्हातारा म्हातारी, केळीचे झाड वगैरे आकृती पारंपरिक शैलीत काढल्या जातात.
 सांस्कृतिक देवाणघेवाण -
 अशा प्रकारची सजावटीतील वैशिष्ट्ये भुलाबाईच्या सजावटीतवा भोंडल्याच्या वेळी काढल्या जाणाऱ्या हत्तीच्या आकृतीत जोपासलेली आढळत नाही. कदाचित ती काळाच्या ओघात लुप्त झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुलाबाई उर्फ गुलाबाई खानदेश, विदर्भात मांडली जाते. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असून त्याला लागूनच मध्य प्रदेश आहे. अर्थातच सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असणारच. त्यामुळेच डॉ. श्याम परमारांना सांझी आणि गुलाबई या कुमारिकांच्या उत्सवांत साम्य जाणवले आहे.
 पुनम परदेशी-शहा यांना सांगितलेल्या आरतीचा उल्लेख यापूर्वी आला आहे. त्या जन्माने गुर्जर. ६ व्या वर्षापासून भुलाबाई खेळल्या. या आरतीत गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांचा अपूर्व सांस्कृतिक संगम आढळतो.
 आरती -

सांजी ये आरती
बे सांजी पारबती
पहिला मुलगा न्हाऊन धुऊन
गुलाल नाही तो छडी लागाऊ
केसरियामां भांग पड़ाऊ (असे पाच वेळा म्हणायचे)

 ही पार्वती म्हणजे मऱ्हाटी गौराई तर मध्य प्रदेशाची सांजी. बे, केसरियामा भांग पडाऊ हे शब्द गुजरातीतले. या आरतीतून अर्थबोध काहीच होत नाही. पण तरीही काही प्रश्न मनात उभे राहतात. पहिला मुलगा न्हाऊन धुऊन ही ओळ काय दर्शविते? जमनागिरीच्या वाळूत एकाकीपणे रडणारे 'चिलयाबाळ' आणि 'न्हाऊन धुऊन तयार झालेला पहिला मुलगा' हे 'संकेत' एकाच वळणाने जाणारे आहेत. शिवाय गुलाल नाही तो छडी लगाऊ ही जबरदस्ती का? राजस्थान, गुजरातेत समर्पणाच्या वेळी केशरी वस्त्र परिधान करीत असत. पाण्यासाठी पहिले मूल बळी दिल्याचा कथाबंध लोकसाहित्यात क्षेत्रकथांमध्ये बाहुल्याने आढळतो. या आरतीतही असाच काही संकेत असेल का?
 भोंडला भुलाबाई संग्रहातील भुलाबाईच्या गाण्यांमध्ये प्रा. गजमल माळी यांनी संकलित केलेल्या गाण्यांपैकी एक गाणे सांझीच्या भुलाबाईवर झालेल्या संस्काराचे स्वरूप स्पष्टपणे दाखविते. ते गाणे असे -

सांजी सांजी दिवा लगाव
दिवा लगाव
दिवा नेला चोरानं
बत्ती लावली मोरानं
मोरानं
मोरानं दिल्या पाच कवड्या
पाच कवड्या
त्याच्या आणु रेवड्या
रेवड्या देऊ भाचीला
भाचीला
आपण जाऊ काशीला
काशीला
काशीहून आणली वायकं
वायकं
फोडा सांजीच टायकं
टायकं

 भुलाबाईच्या गाण्यातील काही विधिसंबद्ध कृती -
 काही नमनगीतात, काही सामूहिक कृती मुली करतात, 'दुरून भुलाबाई नमस्कार' या ओळीला सर्व जणी भुलाबाईकडे तोंड करून नमस्कार करतात. तर पुढील ओळींच्या वेळी टिपरीवर टिपरी चढवून माहूरगड अभिनित केला जातो.

एका टिपरीवर उभे राहू
अस्मानीचा गड पाहू
गडावर गड बाई माहूर गड
तिथला सोनार कारागीर

 या काही जागा सोडल्यास या गाण्यांतील विधिरूप शिल्लक राहिलेले दिसत नाही. भोंडला टिपऱ्यांवर खेळला जात नाही. भुलाबाई टिपऱ्यांवरच खेळली जाते. अक्षय्यतृतीयेला खानदेशात मुली टिपऱ्या खेळतात. टिपऱ्या गुजरातेतून इकडे आल्या असाव्यात. भिल्लनृत्यातही टिपरीनृत्य असते. भिल्ल ही आदिवासी जमात सातपुड्यात विशेषकरून आहे. भिल्ल आणि आहिराणी बोलीवर गुजरातीचा मोठाच प्रभाव आहे, हे सर्वज्ञात आहे.
 गीतांचा ठेका आणि पावली -
 भोंडला भुलाबाईची रचना, त्यातील आवर्तने म्हणण्याची विशिष्ट लय या बाबी वैशिष्ट्यपूर्ण असतात. या गीतांतील केवळ आशय महत्त्वाचा नसतो तर त्याचे आविष्कृत रूपदेखील लक्षणीय असते. त्याच्या आकलनासाठी ज्या नृत्याच्या अंगाने ही गाणी म्हटली जातात त्या संबंधीचा ऊहापोह करणे आवश्यक ठरते. त्याशिवाय भोंडला भुलाबाईच्या गाण्याच्या स्वरूपाने आकलन होऊ शकणार नाही. ही गाणी फेरात गायिली जातात. फेरात फिरताना मुली ठेक्याने पावली घेतात. ही पावली ४ मात्रांची असून २ ठेके येतात, १ आणि ३ मात्रांना ठेका येतो. १ ल्या मात्रेला उजव्या पायाच्या पंजाने ठेका देतात. हा पंजा डाव्या पावलाजवळ नेत ठेका दिला जातो. पायाचा ठेका आणि टिपरीचा ठेका एकाच वेळी दिला जातो.
 या गीतातील ठेका आणि गीतातील आवर्तने जुळणारी आहेत. नृत्य आणि गीत यांच्या एकरूपतेचे हे निदर्शक आहे.
 मात्र गुजराती गरब्यात टिपऱ्यांच्या ठेक्यांची जी विलक्षण धुंद लय आहे किंवा हालचालींमध्ये खटके घेण्याची जी पारंपरिक पद्धत आहे ती भुलाबाईच्या गाण्यात आढळत नाही. भुलाबाईच्या गाण्यांचा ठेका अतिशय संथ आणि ठाय आहे.
 भोंडल्याच्या गाण्यांची : झिम्म्याची लय -
 भोंडला वा हादग्याची गाणी टाळ्यांच्या तालावर झिम्म्याच्या अंगानी खेळली जातात. टिपऱ्यांचा वापर केला जात नाही. तसेच चालीमध्ये विविधता आणि वेग आहे. ती भुलाबाईच्या गाण्यांसारखी संथ नाहीत. ही गाणी झिम्म्याच्या पद्धतीने गायिली जातात. एकमेकींकडे तोंड करून व दुहेरी फेरातही गाणी गायिली जातात. ही गाणी केरव्याच्या लयीत आहेत.
 संगीताच्या भाषेत बोलायचे तर भुलाबाईची गाणी ठाय लयीत असून त्यांची मूळ प्रकृतीच अत्यंत संथ आणि गंभीर आहे.
 भुलाबाईची गाणी ज्या प्रदेशांत गायिली जातात तो प्रदेश पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने मागास राहिला. या भागावर सतत आक्रमणे होत. खानदेश हे महाराष्ट्राचे उत्तरद्वारच होते. सततच्या लढाया, परकीय राजवटींचा अंमल यामुळे हे उत्सव साजरे करताना गेल्या ३-४ शतकांत फारसा मोकळेपणा मिळाला नाही आणि त्यामुळे मोकळेपणातून निर्माण होणारी विविधता, मुक्त चंचलतेचा स्पर्श यापासून ही गाणी दूर राहिली. ग्रामीण भागातील स्त्रियांनी ही गाणी मूळ लयी सुरांसह जपली. नमनगीतातील अतिशय संथ आणि गंभीर लय, सुरांमधील एकसुरीपणा त्यांच्या प्राचीनतत्वाचे गमक आहेत.
 भोंडल्याची गाणी : शिवकाळातील आश्वासक वातावरण -
 हादगा हा भोंडला उत्सव सांगली, सातारा, पुणे, कोकण या भागात साजरा केला जातो. कोकणात गौरीचा सण अत्यंत थाटात आणि घराघरांतून साजरा होतो. गौरी गणपती पाठोपाठ येतात. स्त्री, पुरुष या दोन्ही ऊत्सवांत पूर्णपणे सहभागी होतात.या सणांना सामूहिक उत्सवाचे रूप आहे. गौरीच्या सणांची गाणी घाटावरच्या हादगा भोंडल्यात शिरली असावीत. श्रीमती दुर्गा भागवत हे मत व्यक्त करतात. झिम्मा हा नृत्यखेळ, जो महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, तोही कोकणांतून देशावर आला असावा. झिम्मा खेळताना जे पूर्वसूत्र गायले जाते. त्यातील संदर्भ बोलका आहे.

आंबा पिकतो रस गळतो
कोकणाचा राजा माझा , झिम्मा खेळतो..

 झिम्म्याच्या उडत्या तालावर म्हटली जाणारी अनेक गाणी भोंडल्यात आणि तिथून काही गाणी भुलाबाईत दाखल झाली असावीत.
 पुणे - सातारा परिसरात शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमुळे सामान्य माणसांना नवी प्रेरणा मिळीली. घरातल्या पुरुषांचा मुलुखगिरी हा महत्त्वाचा व्यवसाय बनल्याने घरातील जबाबदाऱ्या स्त्रियांना सांभाळण्याची जिम्मेदारी घ्यावी लागली. पारंपरिक सण वा उत्सव मोकळपणाने साजरे करण्याचे धैर्य वा हिंमत समाजात निर्माण झाली. भोंडल्याच्या गाण्यांतील उत्साहाची नवी लय याच काळात गुंफली गेली असावी असे वाटते. मात्र तसा गेय पुरावा देता येत नाही. ह्या गाण्यात या वेगवेगळ्या लयी कशा दाखल झाल्या हे पुरावा देऊन सांगणे शक्य नाही. तरीही या गाण्यांची वेगवान लय झिम्म्याच्या ठेक्यातून उचलली गेली असे वाटते. तसेच सासरमाहेरच्या नात्यांचा नाजूक तरीही धीट अशा अभिव्यक्तीचा धागाया गाण्यात गुंफला गेला असावा.
 भारतीय संगीत परंपरा -
 या गीतांतील स्वर प्राथमिक अवस्थेतील आणिखर्जातील आहेत.आज प्रचलित असलेल्या शास्त्रीय संगीताचे मूळ लोकसंगीतात आहे, हे संगीत शास्त्रज्ञांना आणि कलावंत गायकांना मान्य असलेले तथ्य आहे. सुप्रसिद्ध गायक कलावंत श्री. कुमार गंधर्व यांनी लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा अनुबंध समर्पक रीतीने सोदाहरण स्पष्ट केला आहे. प्राचीन परंपरा असलेल्या भारतीय संगीतातून तो स्पष्ट होतो. पितामह ब्रह्मदेवाने सामवेदापासून संगीत निर्माण केले असे मानतात. सामवेदात ऋग्वेदाच्या ऋचा स्वरालापात गायल्या जात.यज्ञसमारंभांतून देवांना अर्पण करताना त्यांच्या मनोरंजनार्थ ऋचा मधुरस्वरात म्हणत. या ऋचांच्या क्रियेतून सुबद्ध संगीताची उत्पत्ती आली असावी असे मानले जाते. साम म्हणजे गायन, यज्ञाच्या निमित्ताने संगीत शास्त्राचा पाया घातला जात असतानाच लौकिक संगीतही अस्तित्वात असले पाहिजे. कारण श्रम हलके करण्यासाठी स्वरसमूहांचा आधार घेण्याची प्रथा आदिम असून, आदिवासी समाजात आजही देवतांची आराधना, तसेच विवाहगीते इ. गाणी परंपरेने चालत आलेली दिसतात. श्रमपरिहार करणारी भलरी, ओव्यांसारखी गीते ग्रामीणजनांत परंपरेने चालत आली आहे. ती आजही आवडीने गायिली जातात. या स्वररचनांचा स्वतंत्रपणे शोध घेण्याच्या प्रेरणेतून संगीत शास्त्राचा आरंभ झाला असावा.
 भोंडला भुलाबाईची गाणी समूहाने गायिली जातात. त्यातील स्वर तारसप्तकातील नसून मध्यसप्तक आणि खर्जातले आहेत. षड्ज, रिषभ, गंधार, मध्यम, क्वचित् कोमल गंधार अशा पाच - सहा शुद्धस्वरांचे प्राबल्य या गाण्यांतून जाणवते.
 आज जे भारतीय संगीत आहे ते मुस्लिम गायकीचा प्रभाव पडून विकसित झालेले संगीत आहे. परंतु प्राचीन भारतीय संगीत दोन स्वरांमधील अंतर मोजण्याचे परिमाण श्रुती याला केन्द्रस्थानी मानून विकसित झालेले आहे. श्रुतींच्या ध्वन्यन्तरावरून भारतीय संगीतशास्त्रांत मतमतान्तरे आहेत. त्यात खोल शिरण्याचे काही कारण नाही.
 भोंडला भुलाबाईची गाणी या परिभाषेत बसविणे अवघड आहे. तरीही एवढे म्हणता येईल की ही गाणी मंद्र आणि मध्य सप्तकात आहेत. त्यातील स्वरांवरून ती प्राचीनतम असावीत. भुलाबाईच्या गाण्यांची ठाय, गंभीर लय आणि भोंडल्याच्या गाण्यांतील मंत्रात्मक लय पाहता, त्या लयींचे नाते प्राचीन उदगीथा पूर्वीच्या अन्नासाठीच्या समूह प्रार्थनांशी असावे असे वाटते, असे जे प्रारंभी म्हटले आहे त्याचे कारण हेच होय. ही गाणी समूहाने गायिली असल्याने त्यात अनवट स्वर नाहीत. स्वर अतिशय सुलभ आणि शुद्ध स्वरूपातील आहेत.
 या गाण्यांची छंदोरचना -
 ऋग्वेद ही जगातील सर्वात जुनी छंदोमय रचना मानली जाते. ज्या रचनांच्या गायनाने मनास आल्हाद होतो, चितवृत्ती उल्हसित होतात त्या रचना छंद या नावाने उल्लेखिल्या जात. 'छंदयति आल्हदयति इति छंदः' प्रसिद्ध गुर्जर पंडित केशव हर्षद् धृव यांनी असे प्रतिपादिले आहे की ऋग्वेद रचने पूर्वीही छंदोमय रचना, यज्ञाव्यतिरिक्त, दैनंदिन जीवनातील भावप्रकटनाच्या निमित्ताने होत होती. या रचनांसाठी त्यांनी युजुस् ही संज्ञा वापरली आहे. देवतांच्या स्तुतीसाठी, आनंदासाठी काव्यमय ऋचांची निर्मिती झाली. वैदिक छंदोरचनेत संवादिता आणि मेघगंभीर माधुर्य आहे.
 भोंडला भुलाबाईच्या गीतांच्या छंदोरचनेच्या दृष्टीने शोध घेताना मराठी छंदोरचना या ग्रंथाचे लेखक श्री. ना. ग. जोशी यांनी काही गीताच्या छंदाबाबत चर्चा केली आहे. प्राकृत अपभ्रंश रचनेत परिलीना जातीवृत महत्त्वाचे आहे. परिलीना जातीच्या प्रत्यक्ष उपयोगात शेवटची २ अक्षरे गुरु असलात.
 ऐलमा पैलमा या हादग्याच्या नमनगीतावर परिलीनाची छांदस छाया आहे असे ते म्हणतात. तर पहिलीग भुलाबाई या छंदोरचनेत छांदस वैकुंठ आहे, श्री. ना.ग. जोशींना ही पद्मावर्तनी रचना वाटते.
 भोंडला भुलाबाईच्या गाण्यांचे विधी, स्वर लय आणि छंद अंगांनी शोधन करणे अतिशय कठीण असले तरी तसा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कारण त्यावरून या गाण्यांच्या प्राचीनत्वाची साक्ष मिळते.