भूमी आणि स्त्री/वर्षन, भूमी आणि सर्जन

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search


 पाऊस आणि भूमी : सूर्य आणि भूमी : यांच्यातील नाते, मानवी संस्कृतीच्या विकासाची दिशा, सण व्रतोत्सव आणि आजचा धर्म, वर्षाकाळाशी जोडलेले व्रतोत्सव : ज्येष्ठ ते कार्तिक मासांत, सूर्यऊर्जेशी जोडलेले व्रतोत्सव : मार्गशीर्ष ते वैशाख मासांत, वर्षन - भूमी- सर्जन, वृक्षपूजा : समृद्धीसाठीचा यातुविधी, तिफण ऊर्फ पाभरीची पूजा, तिफणीची पूजा, तिफणीला नवरी बनवून शेतात नेले जाते, निर्जीव वस्तूंचे मानुषीकरण : भारतीय मानसिकता, पाच पांडव : शेतीच्या सुफलीकरणाचे प्रतीक, करी नव्हे तर काशीच, जयजय गणपती, तिफण उतरविताना, सौभागीण शेती, स्त्रिया आणि पेरणी, नागपंचमी : नागपूजेचे प्राचीनत्व, भारतभर नागपूजा प्रचलित, महाराष्ट्रातील नागपूजा, नागपंचमी : सुफलीकरणाशी जोडलेला सण, सर्प आणि कामवासना : भारत आणि भारताबाहेरील संकल्पना, महाराष्ट्रात नाग 'बंधू' च्या रूपात, वारूळाची पूजा सामूहिक : अठरापगड जातींच्या स्त्रियांचे एकात्म मन, नागपंचमीची कथा, नागपंचमी की नागरपंचमी ?, कालियामर्दनाची आठवण करून देणारा दिवस, 'सर्पबंध' अनेक संदभ, भूकंपाचे कारण सर्प, महाराष्ट्रातील नागपंचमी सण आणि अंबुवाची, ज्या काळात पृथ्वी रजस्वला होते त्याकाळात भूमी उकरीत नाहीत वा नांगरीतही नाहीत, इतर प्रांतांतील अंबुवाची उत्सव, महाराष्ट्रातही नाग संस्कृती होती, नागबंधाचा सांस्कृतिक प्रवास, कासईचे गाणे : मराठी आणि तेलगू, कुटुंबसंस्था स्थिर होताना, नागचौथीचा उपास भावासाठी, भावाच्या कृषिसमृद्धीसाठी, केरावरच्या गाण्यातील आगळा कथाबंध, फेराची गाणी : पावसासाठीच्या समूहप्रार्थनांचा अवशेष, उत्तरेकडे नाग, पती, प्रियकर पुत्राच्या रूपातून येतो. महाराष्ट्रात मात्र नाग बंधूंच्या रूपातच येतो, पोळा : बैलांच्या श्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण, पोळ्याचा सण आला, आदले दिवशी खांदे मळणी, पोळ्याच्या दिवशी सालदार कष्टकऱ्यांना मिष्टान्न, नवरदेव बैल, चौर चौर चांग भला ... पाऊस आला घरात चला, पंचपल्लवांनी पूजा, श्रमाची प्रतिष्ठा, आदिवासींचा पोळा, सातपुड्यातील निळीचारीची पूजा, ऋषिपंचमी, मातृहक्क : नैसर्गिक जीवन व्यवस्था, वृषीपंचमी की ऋषिपंचमी, परिवर्तनाच्या काळातील संघर्षः तरीही 'आदिबंध' बोलके, गौरी लक्ष्यांचा सण, स्त्री सुपीकतेचे प्रतीक, गौरी वा लक्ष्यांचा सण शेतीच्या समृद्धीसाठी, लक्ष्मीचे आगमन आणि मांडणीतील विविधता, लक्ष्मी आली सोन्यांच्या पावलांनी, लक्ष्म्या जेवतात त्या दिवशी, पोवते ऊर्फ दोरे घेणे, जेवणाच्या दिवशी घरच्या लक्ष्यांना सन्मान, सुगड्याचे मुखवटे तयार करण्याची रीत, अमराठी घरांतूनही लक्ष्म्या उभ्या करतात, लक्ष्या मांडल्या जातात, मातंग-चर्मकार समाजातही लक्ष्म्या, राणी सावरगावचे आश्चर्य, असेही वेगळेपण, तेरड्याच्या.... गौरीफुलांच्या लक्ष्म्यां, गौर कुठे आली?, कोकणातील गौराई, स्त्रियांना पर्यावरणाची जाण मुळात असते, वन्हाडातल्या महालक्ष्म्यांचे वेगळेपण, गौरी वा महालक्ष्यांच्या सणात.सोळा या आकड्याचे महत्व, खानदेशातली कानबाई, दिवा सुफलीकरणाचे प्रतीक, स्त्रीची विविध रूपे : महालक्ष्मीत.... देवीरूपात, सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता : शिवशक्तीच्या स्वतंत्र अस्तित्वात आणि एकरूपतेत, कुलस्वामिनींच्या मंदिरांचे वेगळेपण, ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा का आली?, आद्यपूजेचा मान ज्येष्ठेला का?, ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा दोन दिवसांची पाहणी, लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी, भादव्यातील समृद्धी, जमीन आणि पाणी यांच्या एकरूपतेतून, ज्येष्ठाकल्पातील ज्येष्ठेचे रूप, प्राचीन भारतातील लोकजीवनाचे वैशिष्ट्य... मातृसत्ता, मातृसत्तेचा लोप, नवरात्र, मराठवाड्यातील व्रतांवर दक्षिणेचा प्रभाव, मराठवाड्यात चार नवरात्रे, आईचा जोगवा मागीन, कोजागिरी : कोण आहे जागे ?, दिवाळी - धनतेरस, नर्कचतुर्दशी, दिवाळीची अमावास्या ऊर्फ लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज ऊर्फ यमद्वितीया, माती आणि माहेर यांच्याशी दृढ नाते, भारतीय सण : ऋतुचक्राशी जोडलेल आणि ऋतुचक्र कृषीशी, इतर प्रांतांतील सणांवर ओझरता दृष्टिक्षेप : मूलभूत साम्य.
 पाऊस आणि भूमी : सूर्य आणि भूमी यांच्यातील नाते -
 भारतातील बहुतेक सण व्रते, विधी, उत्सव हे कृषिजीवनाशी जोडलेले आहेत. आणि ते मूलतः जमिनीची सुफलनशक्ती वाढावी, जीवन सर्वार्थाने सुखकर व समृद्ध व्हावे या मूलभूत मानवी जाणीवेतून निर्माण झाले आहेत. एकूण जीवनचक्र सुरळीतपणे प्रवाही राहावे यासाठी अन्नवपाणी यांची प्राण्यांना गरज असते. त्यानंतर वस्त्र आणि निवारा यांचे महत्त्व. अन्न निर्माण करते भूमी. पाणी देते आभाळ. या दोहोंच्या जोडीला निर्मितीसाठी वा सर्जनासाठी आवश्यक असते ऊर्जा. ती सूर्यापासून मिळते. निसर्गाचे चक्र सतत फिरत असते. त्याचे निरीक्षण मानवाने हजारो..लाखो वर्षांपासून केले. त्या निरीक्षणातून त्याने निसर्गातील घडामोडीबद्दल काही ठोकताळे बांधले.या निरीक्षणातून त्याला वर्षन- भूमी- सर्जन तसेच सूर्यभूमी - सर्जन यांच्यातील अनुबंध उलगडला गेला.
 भूमी ही जणू विश्वाचा..जगाचा गर्भाशय आहे. बीज पेरणारा सूर्य असतो. वर्षन झाले नाही तर बीज कोरडे राहते. भूमीचा गर्भाशय वांझ राहतो. वर्षन, भूमी आणि सूर्य यांच्या समागमातून वनस्पतीसृष्टी निर्माण होते. या तिहींतील कार्यकारणभाव समजून घेण्याचा प्रयत्न आदिकाळापासून मानवाने केला. कोणत्या काळात विशिष्ट वनस्पतींची वाढ जोमाने होते, वनस्पतींचे रूप, रंग, स्पर्श,गंध, चव यांच्यात बदल कसे घडतात. इत्यादीबाबतचे बारकावे, निरीक्षणांतून त्याने नोंदवून घेतले. जमिनीची सुफलता कोणत्या काळात भराला पोहोचलेली असते. कोणत्या काळात वाढते या बाबतचे आडाखे त्याने बांधले. अवघे जीवन अन्नावर आधारित असल्याने जमिनीच्या सुफलन शक्तीशी जोडलेले विविध प्रकारचे यातु विधी त्याने रचले. त्या यातुविधींचे परिणाम अजमावून ते विधी निश्चित केले. त्यातून जमिनीच्या सुफलनतेशी निगडित परंपरा निर्माण झाल्या.
 मानवी संस्कृतीच्या विकासाची दिशा -
 सुरुवातीच्या काळात सर्जन ही विश्वातील एक अनाकलनीय, गूढ पण जगण्यासाठी आवश्यक आणि निसर्गनियमानुसार घडणारी घटना होती. वर्षानुवर्षांच्या अव्याहत निरीक्षणांतून मानवाने भूमी आणि स्त्री यांच्यातील सर्जनक्षमतेचे सारखेपण बुद्धीत नोंदवले. भौतिक विश्वातील घटना आणि मानवाचा आत्मिक आणि बौद्धिक विकासयांचा परस्परांवर सतत परिणाम होत असतो त्यातून मानवी संस्कृतीचा विकास होत गेला. मानवाच्या कल्पनासृष्टीत त्या कल्पनांतून निर्माण झालेल्या दैवतविषयक कल्पनात, सृष्टीचे प्रतिबिंब उमटले आहे. या निरीक्षणातून त्याने विधी, उत्सव, सण, व्रते, यांची रचना केली, परंपरा निर्माण केल्या. तत्संबंधी गीतांतून आपले, निसर्गाचे आणि जीवनातील सुखःदुखांचे भौतिक व भावनिक नाते प्रगट केले.
 प्रारंभीच्या काळातील मानवी जीवन अन्नम्हणजेच जगणे या कृतीशी बांधलेले होते. प्राथमिक कृषिपद्धतीतून मानवाची यातुप्रधानजीवनपद्धती विकसित झाली. त्या त्या लोकसमूहाचे दैवत विकल्पन आणि तत्त्वचिंतन यांचा, त्या त्या लोक समूहाच्या सामाजिक आर्थिक जीवनाशी आंतारिक व अतूट अनुबंध असतो.
 सण व्रतोत्सव आणि आजचा धर्म -
 नागपंचमी, नारळी पौर्णिमा, पोळा, घटस्थापना , गौरीगणपती, हरितालिका, चंपाषष्ठी, सटीचे नवरात्र, चैत्रगौर, पौषातील रविवारचे व्रत इत्यादी व्रतोत्सवांचे - विशेषकरून स्त्रिया करीत असलेल्या व्रतोत्सवांचे निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की, आज ज्या धर्माशी त्यांचे नाते जोडले जाते त्या धर्माशी त्यांचा काहीही संबंध नाही. आज अस्तित्वात असलेला धर्म सुघटित होण्यापूर्वीच्या प्राथमिक कृषिप्रधान जीवनपद्धतीशी तेजोडलेले आहेत. त्या काळच्या यातुप्रधान विधियुक्त जीवनपद्धतीतून ते कालौघात निर्माण झाले. तत्कालीन बहुजनांच्या जीवन जगण्याचा एक भाग बनले. ज्यांना आदिबंध म्हणता येईल अशा स्वरूपात ते भारतीयांच्या जीवन पद्धतीत गोंदले गेले. काळानुरूप सामाजिक, राजकीय धार्मिक बदलांबरोबर त्यांचे उन्नयन झाले. तेव्हाचेस्वरूपबदलून आजच्या रूपात परिवर्तन झाले.
 वर्षाकाळाशी जोडलेले व्रतोत्सव : ज्येष्ठ ते कार्तिक मासांत -
 या कृषिसंबंद्ध विधिउत्सव सण व्रतांचा शोध घेताना असे लक्षात येते की, वर्षन आणि भूमी यांच्या संयोगातून बहराला येणाऱ्या सर्जनाशी जोडलेले विधी, उत्सव, सण, व्रते ही ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन कार्तिक या महिन्यांतून विशेषत्वाने येतात. सूर्य, भूमी यांच्या संयोगातून सर्जनाला चेतना मिळते. याची जाण आदिमानवाला निरीक्षणातून झाली होती. सूर्याची ऊर्जा भूमी आपल्या उदरात साठवून घेते. त्यामुळे मातीची फलित होण्याची शक्ती तर आधिक वाढतेच परंतु पावसाचे पाणी उदरात आकंठ साठवून घेण्याची क्षमता पुनः पुन्हा वाढत राहते. त्या पाण्याचे बळ वर्षाऋतू संपल्यानंतरही भूमी सर्जनासाठी पुरवते.
 सूर्यऊर्जेशी जोडलेले व्रतोत्सव : मार्गशीर्ष ते वैशाख मासांत -
 सूर्याची उष्णता मार्गशीर्ष, पौष महिन्यापासून वाढत जाते.थंडीचाही जोर वाढतो. सूर्याच्या शक्तीची जगण्यासाठी असणारी गरज जाणवत जाते. त्याची नोंद आदिमानवाने घेतली. सूर्य, भूमी यांच्या संयोगातून सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेले सण, विधी, व्रते, उत्सव, हे मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाखात येतात. उदा. चंपाषष्ठी, धुंदुर्मास, शाकंभरी नवरात्र, देवदिवाळी, पौर्णिमा, मकरसंक्रांत, भोगी, होळी, रंगपंचमी, धुळवड, वसंतपंचमी, गुढीपाडवा, चैत्र नवरात्र, बैसाखी, अक्षय्य तृतीया, इत्यादी.
 वर्षन - भूमी - सर्जन -
 या प्रकरणात वर्षन आणि भूमीच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या सर्जनाशी जोडलेल्या महत्त्वाच्या व्रतोत्सवसण विधींचा वतत्सबंधी लोकगीतांचा शोधघेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्येष्ठात दक्षिणेतून येणाऱ्या मृदगंधी वाऱ्याचे भोवरे आसमंतात भरारू लागतात. वावटळींचे फेरे धावू लागतात. जणु येणाऱ्या पावसाची चाहूल भूमीला लागते. उन्हाने शुष्क झालेल्या झाडांच्या मनात आशा पालवतात. अशा काळात वृक्षांची पूजा सामूहिकपणे बांधण्याची चाल पुरातन असावी. आजही वटवृक्षाची पूजा सामूहिकपणे केलीजाते. काळाच्या ओघात त्या कथेला काळानुरूप कथांची पुटे चढविली गेली असतील. मुळात ती वर्षनाच्या स्वागताची पूजा आहे.
 वृक्षपूजा : समृद्धीसाठीचा यातुविधी -
 वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीत घुसतात, तेथून नवे झाड उगवते. झाडांची मुळे पावसाचे पाणी साठवून ठेवतात. पारंब्या अत्यन्त उपयुक्त असतात. त्या आमच्या लोकजीवनात घट्ट रूजून गेल्या आहेत. सूरपारंब्यांचा खेळ अजून खेड्यांत लोकप्रिय आहे. वटवृक्ष पुरातनतेचे, विशालतेचे , सुरक्षिततेचे प्रतीक आहे. वावटळींना अडविण्याचे काम हा घेरदार वृक्ष करीत असतो. या वटवृक्षाची पूजा ज्येष्ठात तर, बाभळींची वा रानातल्या झाडांची पूजा आषाढात करतात. आषाढ तळण्याची खास प्रथा मराठवाड्यात आहे. कोंडोळी, गोड भजी... गुलगुले तळून 'आषाढ तळला आहे, खायला या' असे निमंत्रण दिले जाते. आषाढातील झाडांची पूजा लेकरंबाळं नेऊन केली जाते. झाडाखालील दगडांना लक्ष्मी मानून पूजा करतात. कणकेत गूळ घालून त्यांचे लहानलहान मुटके करून शिजवतात. त्यांना फळ म्हणतात. ही फळे झाडाखालील लक्ष्मीला वाहतात. वृक्षवल्ली वनस्पती, आणि कुळातील मुले हे समाजाचे घन आहे. याची जाण आदिमानवाला होती. त्या घनाची वृद्धी व्हावी, ही वृद्धी ज्या पर्जन्यामुळे होते तो पाऊस वेळेवर व योग्या प्रमाणात व्हावा, ज्या पर्जन्यामुळे वनस्पतीसृष्टी पुनश्च नव्याने बहरते, त्या पर्जन्याचे वनस्पतीसृष्टीचे तसेच कुलातील नव्या पिढीचे त्या ऋतूचे स्वागत करण्याची भूमिका या पूजेमागे असावी. तसेच भविष्यातील समृद्धीसाठी हा यातुविधी केला जात असावा.
 ज्येष्ठ आषाढात पेरणीपूर्वी पेरणीचे साधन, तिफण उर्फ पाभर हिची विधिपूर्वक पूजा केली जाते. तिफणीची आरती प्रसिद्ध आहे. तिफण आणि शेतकरी शेतकरणीचे रक्ताचे भावबंध, वऱ्हाडातील कवी विठ्ठल वाघ यांनी हळुवारपणे उलगडून दाखवल्याने ही शेतातील 'तिफण' शहरातल्या घराघरातूनही पोहोचली आहे.
 तिफण उर्फ पांभरीची पूजा -
 पेरणीची तयारी ज्येष्ठापासूनच सुरू होते. वैशाखाच्या उन्हात जमीन भाजून निघते. त्यानंतर जमिनीची मशागत करण्यास शेतकरी सुरुवात करतो. वळीवाच्या सरींनी जमीन भिजते. पुन्हा ज्येष्ठाच्या धगीने भाजून निघते. या सरींमुळे आणि उन्हाच्या धगीमुळे जमिनीतील ऊर्जा वाढते. शेतात पाणी घालून शेतकरी शेत पेरणीसाठी सज्ज करतो. मृगाचा पाऊस पडताच शेतकऱ्याची पेरणीची धांदल उडते.
 तिफणीची पूजा - मराठवाड्यात पेरणीपूर्वी तिफण ऊर्फ पाभर या पेरणीच्या पारंपरिक यंत्राची पूजा केली जाते. तिफण ऊर्फ पाभर म्हणजे पेरणी करतांना ज्यातून दाणे पेरले जातात ते साधन. तिफणीला तीन पोकळ नळे असतात. ते चाडाला म्हणजेच कुरीला जोडलेले असतात. पेरणीच्या वेळी तिफण औताला जोडतात.
 तिफणीचे तीन दाते नांगरलेल्या जमिनीत घुसतात. त्यातून बियाण्याची बोळवण केली जाते. चाड ऊर्फ कुरीतून दाणे टाकले जातात.
 शेतकरी समाजाच्या मनात हजारो वर्षांपासन रुजलेल्या श्रद्धा यंत्रयुगातही कमी झालेल्या नाहीत. पेरणीपूर्वी जमिनीच्या संदर्भात काहीना काही विधी केल्याशिवाय पेरणी करीत नाहीत. पाऊस झाल्यावर पेरणी करण्यापूर्वी शेतकरी सुताराचे घरी तिफण घेऊन जातो. तिफणीची डागडुजी करून तिला उत्तम रीतीने पेरणी करण्यास योग्य करण्याचे काम सुताराचे. सुतारही या कामात गर्क असतात. पेरणीपूर्वी सुताराला गंधाक्षता लावून त्याचा सन्मान केला जातो. सुताराचे घर म्हणजे जणु तिफणीचे.... कुरीचे माहेरच असते.
 पेरणीचे दिवसांत सुताराला रात्रंदिवस काम असते. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना शेतात राबणारी शेतकरीण म्हणते,

सुतार मेटावरी दिवा लावूनी काय केले ?
ताईता बंधूजींनी चाड सोन्याचे घडविले

 सुतार हा पांढरीतला महत्त्वाचा बलुतेदार. बलुतेदारापैकी अनेक जण कलाकारही आहेत. त्या कलेची कदर शेतकरी समाजाला होती.

सुतारीणबाई कुठे गेला तुझा दीर
भाऊच्या चाड्यावरी काढीले कीर मोर
सुतारीण बाई कुठे गेला तुझा पती ?
भाऊच्या चाड्यावर कुणी काढीला गणपती ?

 तिफणीच्या चाडातून बियाणे व्यवस्थित खाली पडते की नाही याची चाचणी सुतार करतो. अवघ्या मानवसमूहाचे जगणे धनधान्याच्या निर्मितीवर अवलंबून असते. कृषि समृद्धीवर अवलंबून असते. धान्यनिर्मितीत सुताराचा महत्त्वाचा सहभाग असो.
 तिफणीला नवरी बनवून शेतात नेले जाते -
 सुताराचे घर तिफणीचे माहेर. तिथून तिफणीला नवरी बनवून शेतात नेले जाते. पाऊस पडताच कुरीबाईला... तिफणीला चिठ्ठी पाठवून, मुऱ्हाळी पाठवून सन्मानाने बोलावले जाते. शेतकरणीचा बंधू वा पुत्र मुऱ्हाळी म्हणून पाठविला जातो.

पडतो पाऊस चिमणीबाईचा गलबला
धरतीबाईचा कंथ आला
सुताराच्या भेटावरी टिपणीबाईचे माहेर
राजसबाळ माझा मुऱ्हाळी झाला स्वार

पाऊस लागलाया कुरीबाईला धाडा चिठ्ठी
सोन्याचा चाबूक दीर दाजीच्या पाठी

 सुताराच्या घरी गोल लाकडाचा मेट असतो. त्यावर तिफण ठेवून धान्याचे दाणे तिफणीतून नीट पडतात की नाही ते सुतार पाहतो. पेरणीचे धान्य सुताराला सुपाने भरभरून देण्याची प्रथा होती. सव्वा रूपया, नारळही दिला जाई.
 निर्जीव वस्तूंचे मानुषीकरण : भारतीय मानसिकता -
 जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे मानुषीकरण करून त्यांच्या विषयीच्या सद्भावना व्यक्त करण्याची मानसिकता भारतीयांची आहे. मग ते मुसळ असो वा तिफण असो. जणु त्यातून भारतीय मनाची मानवतावादी भूमिकाच व्यक्त होत असते. तिफणीला नवरी बनवून सन्मानाने शेतात घेऊन जाण्यामागे हीच भावना आहे. पतिपत्नीचे नाते भारतीय संस्कृतीने केवळ शरीराचे मानले नाही. ते आत्मबंधन आहे. शतपथ ब्राह्मणात पतिपत्नीला द्विदल डाळीप्रमाणे समान मानले आहे. तैत्तिरीय ब्राह्मणात (३.३.३.५) म्हटले आहे.
  "अर्धो वा एष आत्मनो यत् पत्नी'
 पाणिग्रहणामुळे कर्माच्या ठिकाणी सहभाव येतो व कर्म उत्तम घेते. 'पाणिग्रहणाद्धि सहत्वं कर्मसु।'
 पतिपत्नी या नात्याविषयी भारतीय भूमिका पाहता तिफण वा पाभर हीस नवरी बनवून शेतात पेरणीसाठी नेण्यामागचे कारण लक्षात येते.

ज्येष्ठाच्या महिन्यात ईज झालिया कावरी
बंधू राजाच्या हातात कुरी झालिया नवरी...
माळ्याच्या मळ्यामंदी येसबंदाची काकयिरी
ताईता बंधूजीची कुरी झालिया नवरी...
मेघराजा की नवरा वीजबाई करवली
माझ्या बंधूच्या शेतात राती वरात मिरवली...

 पाच पांडव : शेतीच्या सुफलीकरणाचे प्रतीक -
 मंगळवारी आणि शनिवारी पेरणी करीत नाहीत. हे दोनही वार शनी आणि मंगळ या तापग्रहांचे आहेत. त्यांची पीडा होऊ नये म्हणून हे वार टाळतात. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पेरणीच्या वेळी पाच दगडांना चुना लावून, लिंबाची वा तुरांट्याची छोटीशी कोपी करून त्यात ते मांडतात. त्यांना पाच पांडव म्हणतात. पांडवांबरोबर कुंती आणि द्रौपदीचा असे दोन दगडही मांडतात. शेतीच्या एकूणच विधींमध्ये या पांडवांना महत्त्व असते. दिवाळीत बलिप्रतिपदेसही शेणाचे पाच पांडव, द्रौपदी, कुंतीसह अंगणात मांडतात. इळा आवसेसही पाच पांडवांची पूजा असते. हे पाच पांडव शेतीला ऊर्जा देणारे, शेती सुफलित करणारे, शेतीचे अनिष्टापासून रक्षण करणारे असावेत. पाच पांडव, कृषिविधानातील त्यांच्या महत्त्व हे दैवतशास्त्रा समोरचे एक आव्हान आहे असे म्हटल्यास वावगे होऊ नये.
 नाशिक भागात, आदिवासी समाजात पेरणीपूर्वी कोंबडे म्हसोबापुढे मारून त्याच्या रक्तात पेरावयाचे बीज भिजवून मग पेरणी करतात. तर कोल्हापूर, कोकण भागात पेरणीपूर्वी 'सात' नावाचा विधी केला जातो. हा विधी म्हणजे भूमीची शांती करणे होय.
 कुरी नव्हे तर काशीच -
 शेतकरी स्त्री कुरीला 'काशी'ची उपमा देते. मातेला जशी तिच्या मुलांच्या संगोपनाची काळजी असते, तशी पेरणी करणाऱ्या कुरीलाही आपल्या लेकरांच्या पोटाची काळजी असते. भरपूर अन्नधान्य निर्माण करणारा पेरा व्हावा ही तिची सदिच्छा असते. कुरी वा तिफणीच्या संदर्भातील ओव्यांतून असे लक्षात येते की बहिणीने भावाच्या शेतात पेरा करणाऱ्या कुरीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

चुड्याचे हात माझे कुरीबाई चाड्यावरी
बंधूंची नजर भैणाबाईच्या पेयावरी....
वळीव पाऊस लागून गेला राती।
बंधूजीचा शाळू पेराया दिली घाती.....
चाड्यावरी मूठ घेतो बहिणीच नाव
बंधवाला माझ्या दुनीनं दैव द्याव.....

 माहेरवाशीण ही सर्वश्रेष्ठ सवाष्ण मानली जाते. सवाष्णीने केलेला पेरा भरपूर पीक देतो अशी लोकमनातील श्रद्धा आहे. ती वरील ओव्यांतून व्यक्त होते. आजही मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातही स्त्रियांकडून पेरणी करवून घेण्याची परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. उत्तम पेरा करणाऱ्या स्त्रियांना पेरणीसाठी सन्मानाने बोलावले जाते. लातूर जिल्ह्यातील पारधेवाडी या गावच्या कडाबाई कवे या उत्तम पेरा करणाऱ्या म्हणून त्या परिसरात ख्यातनाम आहेत.
 जयजय गणपती -
 तिफण नवी असेल तर मात्र सुतार स्वतः शेतात जाऊन तिफण भरतो. शेतातच सुताराला गंधाक्षता लावून ज्या धान्याचा पेरा करायचा ते धान्य त्याला सुपाने दिले जाते. सूप हे सुबत्तेचे, लक्ष्मीचे प्रतीक आहे. तिफणीच्या चाडाला जो दोर बांधला जातो त्याची विशिष्ट प्रकारची गाठ असते. ती काही जणांनाच घालता येते. या

पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळणी करताना त्यांची वाळव काढली जातात. ते कैस पिंजून त्याचा दोर तयार करतात. ही गाठ अशा खुबीने मारली जाते की, तिफण फिरत असताना जमिनीच्या पातळीनुसार ती गाठ मागे वा पुढे व्हावी, तसेच घट्ट वा सैल व्हावी. या गाठीनुसार पेरा नीट होतो. तिफण पुढे झुकली तर 'शाव' आली म्हणतात आणि थोडी मागे झुकली तर 'करळ' आली म्हणतात. ती मधोमध राहावी ही अपेक्षा.या गाठीमुळे तीमधोमध राहते व चाड नळ्यावर व्यवस्थित बसते. तिफणीत धान्य भरताना सुतार मंत्र म्हणतो -

जय जय गणपती काम लागू दे सुती
जयजय माते लक्ष्मी जय दे
पिकू दे पिकू दे उदंड पिकू दे

या मंत्रातील आधुनिकता कोणाच्याही लक्षात येण्यासारखी आहे. मंत्रातील अक्षरे कालानुरूप बदलत असतात. परंतु ती विशिष्ट लयीत विशिष्ट पद्धतीने तीनदा वा सातदा उच्चारली जातात. गणपती आणि लक्ष्मी कृषिसमृद्धीच्या देवता आहेत.
 तिफण उतरविताना -
 खरिपाची पेरणी झाल्यावर तिफण खाली उतरवीत नाहीत. ती वरचेवर ठेवतात. रबीची पेरणी झाल्यानंतर तिफण खाली उतरवतात. तिफण उतरविण्यापूर्वी तिची ओटी भरून चाडे उतरवितात. ओटी भरल्याशिवाय तिफण जमिनीवर टेकवीत नाहीत. वर्षातील सर्व पेरण्या झाल्यानंतर चाड उतरवून म्हसोबा वा मारूतीला नारळ फोडतात. नैवैद्य दाखवितात. गड्यांना जेवण करतात. काही जण खारा नैवेद्य.. मटनाचा वा कोंबड्याचा दाखवितात. मात्र शेतातल्या जेवणात आंबिल असतेच.
 पूर्वी पेरणीच्या वेळी गाणी म्हटली जात. आजकाल ही प्रथा कमी होत चालली आहे. स्त्रिया मुक्याने काम करीत नाहीत. त्यामुळे पेरणीच्या संदर्भात ओव्या खूप मिळतात. या गाण्यांतून धरणी सुफलित व्हावी, घर धान्याने भरून जावे ही भावना ओतप्रोत भरलेली असते.
 सौभागीण शेती -
 तिफणीच्या संदर्भात विविध भागांत सुताराच्या पूजेच्या विविध रीती जोपासलेल्या दिसतात. हिरकणबाई तोडकर या वयस्कर शेतकरणीने सांगितली तूर, उडीद, तीळ, साळ, भुईमूग अशी धान्ये एक एक माप घेतात. या वस्तू हव्यातच. पानसुपारी, हळदकुंकू घेऊन सुताराचे घरी जातात. बरोबर चाड, नळे, नेतात. सुताराच्या तिफणीचे लग्न चाड्याबरोबर लागते. तिफण, चाड, नळे यांची एकत्र पूजा करतात सुताराला सर्व धान्य वस्तू गंध लावून देतात. त्याचा सन्मान करून तिफण शेतात नेतात.

सुताराच्या न्हयावरी, तिफण झाली नवरी
दिली सख्याच्या वावरी...
नांगरिल शेत, घेतिला उभा माळ,
रासन्याची तारांबळ...
नांगरिल शेत, तिफणीनं निगा केली
सौभागिण शेता गेली...

तिफणीनं पेरा केला, बांधावरी डेरा दिला....
पड पड मेघराजा, माझं माहेर धरुनी
गवळी निघाले पेरूनी....
पडपड पावसा, पड तू आतीरीती
कुणबी आले काकुळती...
पड़ पड पावसा, होऊदे वली माती
गाईच्या चाऱ्यासाठी, कुणबी आले काकुळती...

 मानवाच्या सांस्कृतिक प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी शिकारी अवस्था, प्राथमिक स्वरूपाची शेती आणि पशुपालन हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. या अवस्था एकाच वेळी कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात होत्या, त्यात कालक्रमानुसार संगती लावणे कठीण आहे. एक अंदाज मात्र बांधता येतो तो असा. शेती आणि पशुपालन या दोन्हीची जुळणी होऊन ते परस्परपूरक व्यवसाय झाले. भारतीय संस्कृतीच्या विकासाचा मागोवा घेताना दोन मूलभूत प्रवाहांकडे वैदिक, अवैदिक वा लौकिक प्रवाहांकडे सखोल आणि पारदर्शी नजरेने पाहणे गरजेचे ठरते. शिकारी अवस्थेतून माणूस शेती आणि पशुपालन या दोन व्यवसायांकडे वळला. या दोहोंची समान्तरपणे प्रगती होताना दिसते. या दोहोंचा जीवनवृत्ती म्हणून स्वीकार करणाऱ्या समाजांनी परस्परांचे आचार विचार स्वीकारत एकमेकांचे व्यवसाय स्वीकारले. हे दोनही परस्परपूरक व्यवसाय बनले. त्याचे भावचित्र वरील ओव्यांतून प्रतिबिंबित झाले आहे.
 स्त्रिया आणि पेरणी -
 धरणी समान सर्जन क्षमता असणाऱ्या स्त्रीला पूर्ववैदिक काळापर्यन्त अनन्यसाधारण महत्त्व होते. तिला येणारी मासिक पाळी सौभाग्याचे लक्षण मानले जाई. माहेरवशिणीने पहिला पेरा पेरावा अशी रीत होती. या आशयाच्या अनेक ओव्या आहेत. तसेच पेरणीशी संबंधित ओव्यांतून भावाचे शेतात पाऊस पडावा, त्याचे शेतात भरपूर धान्य व्हावे अशा शुभेच्छा बहिणीने मनापासून भावाला दिल्या आहेत. 

काया वावरमा धवया नंदीनं आऊत
भाऊना सारिखा कुनबी नही शे गावात ....

 ती भावाला रीतीभाती शिकविते. नागपंचमीला औत जुंपू नकोस सांगताना म्हणते -

पंचमीच्या दिशी देती नागाला पऊतं
दादा माझ्या सोयऱ्या सोड कुणब्या आऊत...

 संस्कृतीच्या, कुटुंब बांधणीच्या प्रवासात मातृसत्ताक जीवनव्यवस्थेतील, जमिनीची मालकीण 'स्त्री' चा मोहरा, पितृसत्ताक कुटुंबसंस्थेचा स्वीकार करताना, पतीच्या घरात हलविला गेला. परंतु भावाची कन्या सून म्हणून स्वीकारून, तिने स्वतःचा अधिकार आईच्या घरात ठेवला. ती भावाला प्रेमाने नागाची आणि शेताची बांधीलकी सांगते. परंतु सोयऱ्याच्या नात्याने औत सोड अशी आज्ञाही देते.
 नागरणीनंतर पेरणीपूर्वी शेताच्या देवता सप्तमातृका सात दगड मांडून, प्रतीकाद्वारे पूजतात. तसेच पाच पांडव आणि कुंती आणि द्रौपदी दगडाच्या रूपाने पूजतात. त्यांचा संदर्भ ओव्यांतून येतो.

शेतीच्या मावल्या या कुणी पूजिल्या गंधवानी
ताईता बंधूजीची सीमा सांडली जुंधळ्यांनी...

 ज्वारी, बाजरी, सांडेस्तो, भरभरून पिकू दे, हे मनचे गुज सांगतांना बहीण म्हणते -

जवारी बाजरीची सोय मनी सांडायनी
खाल्ताना बांधले पांभेर भाऊ पांडवांनी...

 सात माऊल्या आणि पाच पांडव, दोघी सासूसुना- कुंती, द्रौपदी यांचे शेतीच्या विधींतील महत्त्व हा अभ्यासकांना चकित करणारा विचारांना चालना देणारा असा मुद्दा आहे. इळा आवसेच्या पूजेच्या संदर्भात त्याचा विशेष विचार केला आहे.
 शेतात पेरणी करायचा मान काही भागात मांगिणीला दिला जातो. विशेष करून शेतातले गडी मांग समाजाचे असावेत, त्यांनी केलेल्या कामात लक्ष्मी वसते अशी श्रद्धा जुन्या शेतकरी समाजाला होती. या संदर्भात श्रीमती माई पांडे यांनी सांगितले की पूर्वी सुईण- मांग समाजाची असे. त्या काळात तिचा विटाळ नसे. रेणुकेचा परशुरामाने शिरच्छेद केल्यावर तिला जिवंत करतांना चुकीने आईऐवजी मांग स्त्रीचे शिर आणले अशी मिथक कथा आहे.
 ज्या जोडप्याला जुळे आहे अशा स्त्रीकडून पेरणी करायाची चाल आफ्रिकेच्या मध्याभागात होती फ्रेझर म्हणतो - 'A fruitful women makes plants fruitful and a barren women makes them barren' अशी समूह श्रद्धा ऑस्ट्रिया, बव्हेरिया होती. धान्योत्पादनाचा शोध स्त्रीने लावला. 'स्त्रीला शेतात पुरा, त्यातून धान्य येईल' ही Myth जगभर आहे.
 नागपंचमी : नागपूजेचे प्राचीनत्व -
 श्रावण शुद्ध पंचमीस महाराष्ट्रभर नागपंचमीचा सण सामूहिक उत्साहाने साजरा होतो. नागपूजा ही अत्यंत प्राचीन आहे. तैत्तिरीय संहितेत नागपूजेचा निर्देश आहे. ऋग्वेदात मात्र नागपूजेचा उल्लेख नाही. पुराणात विष्णु व शिवाच्या बरोबर नागाचा उल्लेख आहे. विष्णु शेषशाई आहे. तर शिवाच्या गळ्यात नाग आहेत. बौद्ध धर्मातही नागांचा उल्लेख आहे. जैन धर्मातही नागाचा उल्लेख आहे. बुद्धाच्या जन्मानंतर नंदउपनंद या नागांनी त्याला स्नान घातले असा उल्लेख आहे. बौद्ध काळात ब्राह्मण नागपूजा करीत असे चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे.
 सिंधू नदीच्या परिसरातील प्रत्येक गावात नागाची मंदिरे वा मूर्ती असतात अशी नोंद ह्युएनत्संगने केली आहे. तक्षशीलेचे राजे नागपूजक होते. त्यांनी आपल्या चिन्हावर नागप्रतिमा मुद्रित केल्या होत्या. अश्वमेघ यज्ञप्रसंगी लोहितादी आणि बायस या नागांचे पूजन करावे असे सांगितले आहे.
 भारतभर नागपूजा प्रचलित -
 सौराष्ट्रात प्रत्येक गावात वेशीवर सर्पमंदिर आहे. उत्तर हिंदुस्थानात चंबा, कांगडा खोऱ्यात आणि काश्मीरमध्ये कैक ठिकाणी नागमंदिरे आहेत. काश्मीरमध्ये ७०० ठिकाणी नागाकृती कोरल्या असून त्यांची आजही पूजा केलीजाते. शेषनाग, इन्द्रनाग, संतनाग अशी अनेक देवळे प्रसिद्ध असून चिनाब नदीच्या तीरावर वासुकीचे मंदिर आहे. राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासाची प्रत्यक्ष नोंद असलेला ग्रंथ असे दाखवितो की काश्मीरचे राजे कर्कोटकाच्या वंशातले आहेत. केरळ प्रान्तातील प्रत्येक नायर हिंदूच्या घरी काऊस नावाचे छोटेस सर्प मंदिर असते. त्याची पूजा केल्यास घरात लक्ष्मी वास करते अशी श्रद्धा आहे. नाग हे त्यांचे कुलदैवत आहे. बंगालच्या काही भागांत नागमंडल हा नृत्य प्रकार प्रचलित आहे. तेथील वैद्य जातीचे लोक नागावतार शुभराय याच्या वंदनेसाठी हे नृत्य करतात. छत्तीसगडमध्ये श्रावण महिन्यात नागराजाची पूजा होते. कर्नाटकात नागपूजा करतात. पंजाबमध्ये सफदोन या गावी नागपूजा विशेष करून असते. जनमेजयाचे सर्पसत्र याच गावी झाले असे मानतात. महाराष्ट्रात नागपंचमी अत्यन्त उत्साहाने साजरी होते.
 महाराष्ट्रातील नागपूजा -
 महाराष्ट्रातील नागपंचमीचे नाते रोज रात्री गायिल्याजाणाऱ्या भुलईच्या गाण्यांशी, आकाशाला भिडणाऱ्या उंच झोक्यांशी, अठरापगड जातिजमातीच्या मैत्रिणीसह रानात जाऊन केलेल्या वारूळाच्या पूजेशी, ज्वारीच्या लाह्या आणि नागपूजेशी आहे.
 नागपंचमीचा भावबंध अतूटपणे जोडला आहे, माहेरपणाशी आणि भावाबहिणीतील प्रेमाशी. नागपंचमीसाठी माहेरचा मुऱ्हाळी न्यायला येतो. त्याची वाट पाहणारी बहीण म्हणते.

पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला पाठी भाऊ मागितला...
वेडा बागडा भाऊ बहिणीला असावा
चार आण्याची चोळी, एका रात्रीचा विसावा....

 नागपंचमीला माहेरवाशिणीस बांगड्या चढविण्याची पद्धत आहे. नागपंचमी .. येण्यापूर्वी दुपारी वा रात्री गल्लीतील, वाडीतील महिला भुलई खेळण्यास एकत्र येतात. फेरात भुलईची गाणी उंच किनाऱ्या आवाजात गातात. पंचमीच्या निमित्ताने अनेक फेरावरची कथागीते गायिली जातात. ही गीते स्त्रीजीवनातील विविध भावबंध उकलणारी असतात.
 नागपंचमी : सुफलीकरणाशी जोडलेला सण -
 नागाला क्षेत्ररक्षक मानले जाते. तो भूमीचा रक्षणकर्ता मानला जातो. शेतात वारूळ असणे हे शुभलक्षण मानले आहे. वारुळाची माती ही सर्वात सुफल माती मानली जाते. वारूळ हे भूमीच्या सर्जनेन्द्रियाचे प्रतीक मानले आहे. तर नाग हा पुरुष तत्त्वाचे.... पुरुषत्वाचे प्रतीक मानला जातो. नाग क्षेत्रपतीअसून त्याचे भूमीशी साहचर्य असते. त्याच्या अस्तित्वामुळे भूमी सुफलित होते. रेणुका, मातंगी, सांतेरी, दक्षिणेतील एल्लम्मा या समाजात मान्यता असलेल्या भूदेवींच्या उपासनेत नागचिन्हाला विशेष महत्त्व आहे. वारुळातील मातीला मूलमृत्तिका असे म्हणतात. नाग ही संतानदेवता असून ज्यांना मूलबाळ नाही अशा स्त्रिया नागपूजा करतात. नागबलीचे व्रत यासाठी प्रसिद्ध आहे. विजेची तेजाने सळसळणारी गती, नागाची नागमोडी चाल, विजेनंतर येणारा सहस्रधारांनी जमिनीला चिंब भिजवणारा पाऊस आणि त्यानंतर फुलणारी हिरवी किमया. म्हणून तो सुफलीकरणाचे प्रतीक मानला जातो. जणु धरतीला सुफलित करणारे ते पुरुषतत्त्व असते.
 सर्प आणि कामवासना : भारत आणि भारताबाहेरील संकल्पना -
 अनेक भारतीय लोककथांतून पुराणकथांतून नागलोक भूमी मानली आहे. पृथ्वीवरच्या सुंदर आणि पराक्रमी पुरुषांवर नागकन्या भाळतात व त्यांना नागलोकात नेतात असा कल्पनाबंध अनेक लोककथांतून येतो. अर्जुनाची एक पत्नी, उलूपी ही नागकन्या होती. भारतीय धारणेनुसार पृथ्वीला शेषनागाने मस्तकावर तोलले आहे. शेषनाग हे वासनेचे प्रतीक म्हणून संपूर्ण पृथ्वीच वासनामय आहे. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रकृती वासनामय असल्याचे सांगितले आहे.
 शेषनाग हा कामवासनेचा प्रतीक मानला जातो. या संदर्भात एक लोककथा अशी. द्रौपदी ही पाच भावांची पत्नी होती. तिला आळीपाळीने एकेका पतीजवळ जावे लागे. या गोष्टीचे दुःख स्त्री म्हणून तिच्या मनात असणारच. तिच्या या असहाय परिस्थितीवर नेमके बोट ठेवून दुर्योधन तिला आजूबाजूला कोणी नाही असे पाहून विचारी 'आज पाळी कुणाची ? आणि हसे. हे दुःख हा अपमान द्रौपदी सांगणार तरी कोणाजवळ ? द्रौपदीने आपले मन श्रीकृष्णाजवळ मोकळे केले. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की 'आज शेषाची नव्हती. एवढेच उत्तर दे. द्रौपदीने हे उत्तर दिले आणि तेव्हापासून दुर्योधनाने हा प्रश्न पुन्हा कधीही विचारला नाही. दुर्योधनाच्या पत्नीचा उपभोग घेण्यासाठी शेष येत असे. जांभूळ आख्यानासारखी ही कथासुद्धा लोकवाङ्मयातून मिळते.
 बाबिलोनियात अस्वार्ती नावाची एक कामदेवता असे. तिचे वाहन सर्प होते. कटनर नामक मानववंश शास्त्रज्ञाने सर्प हे सुफलीकरणाचे प्रतीक असल्याचे सांगितले आहे. सर्पदंश हा वासनादंशाचे प्रतिरूप म्हणून सर्व धर्म वाङ्मयातून येतो. बायबलमधील आद्य जोडपे ॲडम आणि इव्ह यांच्या कहाणीत सर्प कामविकाराचे प्रतीक म्हणून येतो असे दैवतविषयक प्रतिकांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांचे मत आहे असे डॉ. तारा भवाळकर 'लोकसंचित' या ग्रंथातील नागबंध या टिपणात नोंदवतात.
 महाराष्ट्रात नाग 'बंधू' च्या रूपात -
 वैशाख, जेष्ठ, आषाढात शेतीच्या मशागतीत आणि पेरणीच्या धांदलीत शेतकरी कुटुंब आकंठ बुडालेले असते. शेतकरी कुटुंबातील स्त्रियांना शेतात राबावे लागते. पेरण्या संपल्यानंतर त्यांना थोडी उसंत मिळते. अशा वेळी मन मोकळ करायला, थकवा घालवायला दोन दिवस तरी माहेरी जावे असे त्यांना वाटतेच. खेड्यातील प्रत्येक स्त्री मनापासून नागपंचमीची वाट पाहत असते. प्रत्येक आईचे मन लेकीला भेटायला आसुसलेले असते. आपला लेक बहिणीला आणायला जाण्याचे नाव काढीनासा झाला तर ती मनोमन दुखावते आणि लेकाला म्हणते-

आली बाई वर्साची पंचमी
आली वर्साची पंचमी
अरे सुभाना बाळा
जा रे बाळाई बोलावू
लोकाच्या लेकी माहेरात
आमची बाळाई सासऱ्यात

 नाग वा सर्पाबद्दल प्रत्येकाच्याच मनात भय असतं, विशेषतः शेतात काम करणाऱ्यांशी तर त्याची नेहमीच गाठ पडते. नागामुळे शेतकऱ्याचे बियाणे, धान्य उंदरापासून वाचते. अशा क्षेत्ररक्षक नागाला महाराष्ट्रातील स्त्रीने बंधू मानले आहे. आदल्या दिवशी म्हणजे चौथीला प्रत्येक बहीण भावाच्या उत्कर्षासाठी, सुफल भवितव्यासाठी उपवास करते. नागपंचमीस चुलीवर तवा ठेवणे, चिरणे, जमीन उकरणे या गोष्टी करणे निषिद्ध मानले जाते. पंचमीस देशावर पुरणाचे उकडलेले दिंड करतात तर कोकणात तांदळाच्या रव्याची खांडवी करतात. नागपंचमीच्या दुसरे दिवशी कर असते. या दिवशी भुलोबा मांडून त्याची पूजा करतात. काही भागांत शिराळशेठ मांडतात. मराठवाड्यातील गावांतून भुलोबा मांडण्याचा मान आळीपाळीने एकेका घराकडे असतो. भुलोबाची माहिती स्वतंत्रपणे दिली आहे.
 वारूळाची पूजा सामूहिक : अठरापगड जातींच्या स्त्रियांचे एकात्म मन -
 नागपंचमीच्या दिवशी पाटावर नागोबाच्या आणि त्यांच्या पिल्लांच्या आकृत्यांची पूजा घरात केली जाते. परंतु या दिवशी खेड्यातील महिला वारूळाला जाऊन वारूळाची पूजा करतात. ही पूजा आळीतील सर्व जातिजमातीच्या महिला एकत्र येऊन करतात. यंत्रयुगाच्या रेट्यात या सणातील सामूहिक अभिव्यक्ती वरचेवर कमी होत चालली आहे. तरीही मराठवाड्यातील खेड्यांतून स्त्रिया वारूळ पूजण्यासाठी एकत्र जमून जातात. त्या निमित्ताने ५/६ दिवस फेरावरची गाणी, फुगड्या, झिम्मा यांनी रात्र रंगून जाते. झाडाझाडांवर झोके बांधले जातातच. उंचउंच झोक्यांच्या तालावर गाणीही. त्या गाण्यांतून मोकळे होणारे स्त्रीसमूहाचे एकात्म मन जणु आभाळाला आपल्या जीवनाची गाथा सांगत असते.

आली वर्षाची पंचीम
आत्या मी जाऊ का वारुळाला?
वेडी झालीस भारजा
मणभर साळी सडायच्या...

 तरीही भारजाने मणभर साळीचा एकच घाणा केला. खाष्ट सासूने सणाच्या उत्साहात मणभर गव्हातांदळाचा धातलेला अडसर दूर करून ती न्हायली. शृंगार केला आणि गावात गेली. गावातील लेकीसुनांना साद घातली.

वाण्या बामणाच्या मुली
वारूळाला येता का कुणी?
साळ्या कोष्ट्याच्या मुली

वारूळाला येता का कुणी?
साऱ्या सयांत मिळवून आणल्या
आली आपल्या वाड्याला....

 मग सगळ्यांनी वारूळ पुजले. फेर धरला. पण चौथ्या पाचव्या फेराला भारजाचा हार तुटला. हाराचे मोती वेचता वेचता संध्याकाळ झाली. वाड्यावर आली तर कोणीही दार उघडेना. ज्याचे त्याचे एकच उत्तर. सासूचे, दीराचे, जावेचे आणि शेवटी पतीचेही उत्तर असे -

आमची कवाड सायाची (सागवानाची)
कुलपं निघना तांब्याची
एवढ्या रातच काय ग काज?
जा माहेरी कर जा राज!

 सासरचे काटेकुटे, त्यातही कधीमधी लाभणारी माया, पतीचे प्रेम या साऱ्याच अनुभवांचे आर्त स्वर ... समूहमनाचे आर्त स्वर पंचमीच्या सामूहिक उत्सवातून दरवळत असतात. ही कहाणी फक्त भारजाची नसते. तेल्यातांबोळ्यांच्या, ब्राह्मण, मराठा, दलित घरांतील सासुरवाशिणीची असते. तिच्या हृदयात रेंगाळणाऱ्या माहेरच्या ओढीबद्दलचा, सासरच्यांबद्दलचा, मनातला कांगावाही त्यात असतो, महाराष्ट्रातील नवविवाहित स्त्री मनोमन भावाला विनवीत असते.

बारा सणाला नेऊ नकोस
पंचमीला रे ठेवू नको....

 नागपंचमीची कथा -
 एक कथाबंध असा.एका घरात चार सुना असतात. तिघींना माहेर असते.एकीला मात्र माहेरची सावलीच नसते. या साय सावलीला आसावलेले तिचे मन पंचमी आली की खिन्न होई. शेषनागाच्या हे लक्षात आले. तो भाऊ होऊन या बहिणीकडे आला व तिला पंचमीस माहेरी चार दिवस आणले. तिचे माहरेपण केले. त्याकाळातच नागिणीला प्रसववेदना सुरू झाल्या. माहरेपणाला आलेल्या नणंदेने हातात दिवा धरला. परंतु त्या प्रसव वेदना आणि जन्म देतानाची तिची अवस्था पाहून नणंदेच्या हातातून दिवा पडला. तोही नेमका पिल्लांच्या शेपटावर. पिल्लं मोठी झाल्यावर त्याना शेपूट तुटले कसे ते कळले. जिच्या घाबरटपणामुळे आपली शेपटे तुटली तिचा वंश नष्ट करण्याच्या हेतूने नाग त्या मुलीच्या घरी आले. त्या दिवशी नागपंचमी होती. बहिणीने पाटावर नाग रेखाटले होते. त्यांना दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवून ती त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी, सुरक्षितेतेसाठी प्रार्थना करीत होती. "परमेश्वरा माझे लांड्यापुड्या नागबंधू जेथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव. त्यांचे जीवन सुरक्षित ठेव" तिची प्रार्थना ऐकून नागांना पश्चाताप होतो. ते बहिणीस शुभेच्छा देऊन परततात.
 दुसऱ्या कथाबंधात शेतात नांगराचा फाळ लागून वारुळातील नागाची पिल्लं दुखावली. संतापलेल्या नाग व नागिणीने शेतकऱ्याच्या घरातील सर्वांना दंश करून निर्वंश केले. मुलगी सासरी होती. तिला मारण्यासाठी तिथे पोहोचले. तो दिवस नागपंचमीचा होता. शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर नागकुटुंब रेखले होते. त्यांची ती पूजा करीत होती आणि ईश्वराजवळ नागवंशाला दीर्घायुष्य आणि समृद्धी मागत होती. तिची प्रार्थना ऐकून नागांना पश्चाताप झाला व त्यांनी तिचे माहेर जिवंत केले. बहिणीला शुभाशीर्वाद दिले.
 नागपंचमी की नागरपंचमी ? -
 श्री. गं. बा. ऊर्फ आबासाहेब मुजुमदारांच्या दृष्टीने ही नागाची पंचमी नसून नागरपंचमी आहे. आदिमायेच्या शक्तीस नाथपंथियांनी वेगवेगळी नागकुलदर्शक नावे दिली होती. उदा, नागिणी, सर्पिणी इत्यादी. ही सर्व नावे सांकेतिक असून योगपरिभाषेतील आहेत. नागर या शब्दाचा मूळ अर्थनगरात राहणारा. परंतु नाथपंथी संकेतानुसार विरुद्ध अर्थ करण्याची प्रथा मुळारंभी असल्याने नाग म्हणजे पर्वत त्यात राहणारे ते नागर. ही नाथपंथी योग्यांची नागरपंचमी आहे. ते नागरकुळ ज्या वारुळात अधिष्ठित झाले त्या वारुळाची म्हणजे आदिशंकराची ती पंचमी आहे. असे म्हणावे लागते. श्री. मुजुमदार म्हणतात, त्या वारुळाप्रीत्यर्थ जो सण सुरू झाला तो आजही घरोघर पाळण्यात येतो.
 कालियामर्दनाची आठवण करून देणारा दिवस -
 श्रीकृष्ण यमुनातीरी खेळत असताना चेंडू डोहात पडला. तो डोह कालिया नागाने विषारी करून टाकला होता. त्याच्याशी युद्ध खेळून त्याला नामोहरम करून कालियाला वठणीवर आणले. कालियाच्या फडेवर उभ्या राहिलेल्या कृष्णाला पाहून गोकुळातल्या लोकांना वाटले की डोहात बुडणाऱ्या कृष्णाला कालियाने वाचवले. त्यांनी कालियाला दूध पाजून त्याची पूजा केली. हा दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. म्हणून त्यास नागपंचमी म्हणू लागले व त्या दिवशी जिवंत नागाची हळद, कुंकू, केशर वाहून पूजा करण्याची पद्धत पडली.
 अशा विविध कथा नागपंचमीभोवती गुंफलेल्या असल्या तरी एकमात्र खरे की नागपूजा जगभर प्रचलित आहे. हजारो वर्षांपासून प्रचलित आहे.
  'सर्पबंध' अनेक संदर्भ' -
 नागमाता कद्रुही पृथ्वीचे प्रतीक असून तिची पूजा करावी असे शतपथ ब्राह्मण सांगते. केवळ नागाचीच पूजा का केली जाते याचा इतिहास सांगताना श्री. शरद जोगळेकर नोंदवितात की नऊ नागराजांची पूजा सायंकाळी व प्रातःकाळी अनेक हिंदू करतात. कारण त्यामुळे विषबाधा होत नाही व सर्व क्षेत्रांत विजय मिळतो. या व्रताची प्रार्थना पुढीलप्रमाणे आहे.

अनंत वासुकी शेषं पदमानभंच कंबलम,
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालिया, तथा
एतानि नवनामानि, नागानांच महात्मना
सायंकाले पठेत् नित्यं प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयंनास्ति, सर्वत्र विजयी भवेत्।

 महाभारतात बलराम हा शेषाचा अवतार मानला आहे. रामायणामध्ये सुखा नावाच्या राक्षसीचे वर्णन आहे. ती नागमाता होती. सुप्रसिद्ध वैय्याकरणी पाणिनी याचाही नागराजाशी संबंध जोडला जातो. सारनाथाच्या स्तंभावर भगवान बुद्धांना भेटण्यास आलेल्या प्राण्यांत नागाचे चित्र आहे. चीनच्या सेनानीच्या झेंड्यावर इगनेचे चित्र असते. तिबेटच्या सुनाग नावाच्या राजाचा निवास पाटली नावाच्या सरोवरात असे अशी श्रद्धा आहे. जपान, इंडोनेशिया, कोरिया, कंबोडिया या देशांत सर्पपूजा होती. सरपटणाऱ्या जातीच्या सर्वांचा उगम आणि निवासडोंगर कपारीतून किंवा जलाशयातून दिसून येतो. त्यामुळे त्यांचा संबंध पाणी, वीज, ढग यांच्याशी जोडला जातो. सर्पाचा आशीर्वाद लाभला तर सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा अनेक वर्षांपासून आहे. पुष्कळ ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली दगडात कोरलेल्या सर्पमूर्ती ठेवलेल्या आढळतात.
 भूकंपाचे कारण सर्प -
 भूकंपाचे कारण सर्पच आहे अशीही समजूत आहे. कारण सर्प हा पृथ्वीच्या चोहो बांजूनी विळखा घालून बसला आहे व तो हलला की भूकंप होतात अशी समजूत आहे. या संदर्भात १९९४ साली लातूर, उस्मानाबाद भूकंपाच्या वेळची आठवण. किल्लारी भागात भूकंपग्रस्तांच्या साहाय्यासाठी हिंडत असतानाचा अनुभव. या भागात द्राक्षांच्या बागा खूप असून मोठ्या प्रमाणावर कूपनलिका आहेत. भूकंपापूर्वी काही कूपनलिकांतून धूरही येत होता. त्याची फारशी दखल घेतली गेली नाही. किल्लारीच्या नीलकंठेश्वर मंदिराची पडझड पाहण्यास गेले असताना एक वयस्क बाई अत्यन्त त्राग्याने बोलल्या. "काय सांगावं ताई ? या धरणीमायन तरी किती सोसावं ? तिला भोकं पाडूपाडू पानी काढलं. ती एक सोशिक. तिनंतर तक्रार केली न्हाई. पन शेवटी तुमची मशिनं थेट शेषाच्या मस्तकाला भिडली. तो तर पुरुष. तो काय गप्प राहतो काय ? त्यान दाखवला इंगा. फणा हलवून सगळ्यांनाच मातीत गाडून टाकलं. पण वाईटांसोबत चांगलेही गाडले गेले हो!" साप हे पृथ्वीचे कारण मानले जाते. एक अशीही समजूत आहे की सापाने आकाशाला पृथ्वीपासून दूर केले. त्यात त्याचे तुकडे झाले. त्यातील एक भाग म्हणजे तारांगण. आकाशातील व्याधालाही सर्प मानतात. सर्प मरत नाहीत, म्हातारे होत नाहीत, ते कात टाकून तरूण होतात अशीही श्रद्धा आहे. सर्प संपत्तीचे रक्षण करतो जादूटोणा करतो अशीही समजूत आहे. नाग, सूर्य आणि अग्नीचे प्रतीक मानला जातो. युफरेट्समधल्या तोरोनियम लोकांच्यात सर्पपूजा प्रथम सुरू झाली व तेथून जगभर पसरली असे मत काही अभ्यासक मांडतात. प्राचीन काळी मध्य अमेरिकेत जिवंत सापांची पूजा केली जाई.
  महाराष्ट्रातील नागपंचमी सण आणि अंबुवाची -
 रसरंगगंधाच्या विविधतेने नटलेली अनेकविध वनस्पतींचा गर्भ वाहणारी पृथ्वी आणि नाना विचार-विकार संकल्प विकल्पांनी भारलेल्या मानवाचा गर्भ वाहणारी स्त्री यांच्यातील एकरूपत्व मानवाने आदिम काळापासून स्वीकारले आहे. स्त्रीचे देहधर्म, स्त्रीच्या सुफलन प्रक्रियेतील संज्ञा - रजोदर्शन, पुष्पितावस्था, फलशोभन, ऋतू इत्यादी आहेत. पृथ्वीही रजस्वला झाल्याशिवाय सुफलित होत नाही अशी धारणा भारतीय संस्कृतीने आदिम काळापासून जोपासलेली आहे.
 ज्या काळात पृथ्वी रजस्वला होते त्याकाळात भूमी उकरीत नाहीत वा नांगरीतही नाहीत -
 अन्नाचे मूळ पाणी म्हणूनच जलतत्त्वाला जीवन म्हणतात 'वृष्टिमूलं कृषिः सर्वा वृष्टिमूलंच जीवनम्' ही जाणीव कृषिशास्त्रीय ग्रंथातून सतत राखली आहे. पहिला पाऊस पडून गेल्यावर पृथ्वी रजस्वला होते. स्त्रीच्या रजस्वला असण्याच्या काळात पुरुष समागम निषिद्ध मानला जातो. तद्वत भूमीच्या रजस्वल काळात भूमीचा लांगलाशी म्हणजे नांगराशी संबंध येता कामा नये. तसेच त्या काळात बीजवपन करू नये असेही सांगितले आहे. कृषिपराशर या कृषिग्रंथात पृथ्वीच्या रजस्वलावस्थेचा काळ मगृनक्षत्राची अखेर आणि आर्द्रा नक्षत्राची सुरुवात हा सांगितला आहे. त्याकाळाला अंबुवाची असे म्हणतात.
 पृथ्वीच्या रजोदर्शनाचा काळ त्या त्या प्रान्तातील कृषिपद्धतीनुसार वेगवेगळा असला तरी पृथ्वी रजस्वला.. आर्द्रा होण्याची संकल्पना मात्र सर्वत्र प्रचलित आहे. महाराष्ट्रात नागचौथीला स्त्रिया उपवास करतात. चौथ, पंचमी आणि सटीची कर या तीनही दिवशी औत हाकीत नाहीत, जमीन उकरीत नाहीत. या काळात चिरणे, कापणे या क्रिया वर्ज्य मानल्या आहेत. तसेच स्त्रिया झोक्यावर बसतात. किमान पाच झोके तरी घ्यायचेच असा रिवाज आहे. ओरिसात रजउत्सवात स्त्रिया पायांनी भूमीला स्पर्श करीत नाहीत. झोक्यावरच बसतात. तीन दिवस फळे खातात. तसेच गल्लीतील स्त्रिया एकत्र येऊन दिवसभर गाणी म्हणतात. खेळ खेळतात. महाराष्ट्रात भुलईतली फेराची गाणी, झोके यांमागील कल्पनाबंध लक्षात येतो. मराठवाडा परिसरातील अनेक वयोवृद्ध शेतकरी कुटुंबांना भेटून माहिती गोळा केली. या तीन दिवसांत जमीन उकरणे अशुभ मानले जाते. तिसऱ्या दिवशी भुलोबाची पूजा करतात. त्या संदर्भात पुढे टिपण जोडले आहे.
 इतर प्रांतांतील अंबुवाची उत्सव -

 वरील माहितीवरून असे लक्षात येते की पंचमीचा काळ हा महाराष्ट्रात पाळला जाणारा भूमीचा रजउत्सव असावा. कारण तिसऱ्या दिवशी भुलोबा उभा करतात. त्याचा आकार पुरुष लिंगासारखा असतो. तो मातीचा करतात. त्याला धान्य लावून सजवतात व पूजा करतात. स्त्री रजस्वला झाल्यानंतर पुरुष समागमफलदायी असतो. काश्मीरमध्ये चैत्र कृष्णपंचमी ते अष्टमीपर्यंत पृथ्वी रजस्वला असते. अष्टमीला चौथ्या दिवशी ती शुद्ध होते. या व्रतास 'राज्ञीस्नापन' म्हणजेच 'राणीचे न्हाण' असे म्हणतात. केरळमध्ये या उत्सवास 'उछारल' असे म्हणतात. हा उत्सव जानेवारी-फेब्रुवारीत मकरम् महिन्यात पाळला जातो. शेतीचा हंगाम संपलेला असतो. धान्यागरांना केरसुणीचे फडे लावून बंद करतात. तीन दिवस दार उघडत नाहीत. धान्य विकणे, अंगण, बागांची झाडझूड करणे, सारवणे, झाडे शिंपणे आदी क्रियाबंद ठेवतात. केरसुणी हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. शेतीची अवजारेही धान्यगारांजवळ बंद करतात. त्यांना स्पर्श करीत नाहीत. चौथ्या दिवशी भूमीशुद्ध झाल्यावर टोपलीभर पाने शेतात नेऊन खतात मिसळतात व शेताची भाजणी करतात. कामरूप ऊर्फ आसामात हा उत्सव अत्यन्त थाटात साजरा होतो. मातीच्या घटात धान्यबीज आणि पाणी घालून ठेवतात. अंबुवाची काळ संपताच तो घट नदीत सोडतात. आज हा उत्सव कामाख्या देवीच्या उपासनेशी जोडलेला असला तरी, त्याचे मूळ रूप कृषिसंबद्ध आहे. ते आजही टिकून आहे. ओरिसात तर या सणाला सार्वत्रिक सुट्टी असते. पहिल्या दिवसाला पहलिरज म्हणतात. यादिवशी नववधू, कुमारिका पहाटे उठून स्नान करतात. पायात खडावा घालतात. तीन दिवस रजस्वला.. शिवायचे नसलेल्या धरणीला स्पर्श करीत नाही. गल्ली वाडीतील स्त्रिया एकत्र जमून हिंदोळ्यावर झुलत गाणी म्हणतात. तीन दिवस फलाहार करतात. या काळात नववधूंना माहेरचे लोक भेटवस्तू देतात. कुमारिकांना नवे कपडे आणतात. पाला नामक लोकनृत्याने गाव रुमझुमत असते. केरळ, आसाम, ओरिसा, बंगाल या प्रान्ताप्रमाणे हा उत्सव साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात मराठवाड्यात नसली तरी नागपंचमी सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून हा सण जमिनीच्या सुफलीकरणाशी अत्यंत जवळिकेने जोडला असल्याचे जाणवते. कोकण, कोल्हापूर भागात भाताच्या लावणीपूर्वी सात नावाचा विधी साजरा केला जातो. सात म्हणजे शांत जणु पृथ्वीची शान्ती केली जाते.
 महाराष्ट्रातही नाग संस्कृती होती -
 महाराष्ट्राच्या समाजमनातील नागप्रतिमेचा विचार करताना येथील सामाजिक- सांस्कृतिक संदर्भ लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. भारतात नागा हा मानवसमूह होता. आजही नागालँडमध्ये नागजमातीचे लोक राहतात. महाराष्ट्रातही नागांची वस्ती असावी. पैठण, नागपूर, नाशिक, कोल्हापूर परिसरात या जमातीच्या लोकांच्या वसाहतीच्या खुणा सापडतात. पन्हाळा- पन्नगालय, नागांचे वसतिस्थान होते. महाराष्ट्रात जी चार प्रमुख राजघराणी होती त्यातील एक सातवाहनांचे. ज्यांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) तर उपराजधानी कोल्हापूर होती. हे राजघराणे नागकुलीन होते. त्यांचा एक प्रमुख राजा शेष हा होता. हा नागराज होता. सातवाहन हा शेषाचा पुत्र होता अशी कथा लोककथेत शिरली. श्री. व्यं. केतकरांच्या 'प्राचीन महाराष्ट्र, सातवाहन पर्वः विभाग दोन' मध्ये ते नोंदवतात की सातवाहन घराण्याच्या संस्थापकाची आई भावाजवळ राहत असे. ती कुमारी असताना माता झाली. ती ब्राह्मण होती. नाग जमाती मातृसत्ताक असल्यामुळे तीत पुरुषाला गौणत्व असते. पुरुषाचा संबंध फक्त वंशसातत्यापुरता असे. नाथपंथाच्या तत्त्वज्ञानात कुंडलिनीला नागीण स्वरूप मानले आहे. कुंडलिनी शक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी, नुकतीच कात टाकलेली, साडेतीन वेटोळे असलेली, कुंकुमाने न्हालेली नागीण असे म्हटले आहे. इथे ती ऊर्जा म्हणून येते. तेजाचे, प्रकाशाचे प्रतिनिधित्व करते.
 नागबंधाचा सांस्कृतिक प्रवास -
 नागजमातींचे मातृसत्ताक रूप, नागाचे क्षेत्रपालकत्व, नागाचे संतान दायित्व, नागाचे ऊर्जा वा तेजाचे प्रतीकरूप यांतून नाग या कल्पनाबंधाचे रूप मातृसत्ताक जीवन व्यवस्थेकडून पुरुषसत्ताक व्यवस्थेकडे जाताना कसे बदलत गेले याचा अंधुक आलेख आपल्याला जाणवतो.
 या सांस्कृतिक उन्नयनाच्या काळात नाग महाराष्ट्रात बंधूचे प्रतीक म्हणून स्थिर झाला असेल का असा विचार मनात येत राहतो. दक्षिणेकडे मातृसत्ताक द्रविडसंस्कृती स्थिर होती. उत्तरेकडून पुरुषसत्ताक आर्य संस्कृती भारतात पसरली. महाराष्ट्र प्रान्त उत्तर दक्षिणेच्या मध्यावरचा आहे. मातृसत्ताक कुटुंबात प्रमुखत्व स्वीकडे असे. पुरुषाचा संबंध केवळ वंशसातत्यापुरताच असे. या अवस्थेपूर्वी जमिनीचे विभाजन होऊ नये या भूमिकेतून बहीण भावांनी संतती उत्पन्न करण्याची प्रथा असावी. यमयमीच्या कथेतून त्याचा संकेत आपल्याला मिळतो. पुरुषसत्ताक जीवन पद्धतीतून स्त्रीपुरुष नात्यांची निश्चिती झाली असावी. पुरुषसत्ताक आर्यांच्या संपर्कातून थरवाडमध्ये भावाचे महत्त्व वाढले असावे. दक्षिणेत मामाभाचीचा विवाह आजही समाज मान्य आहे. सख्ख्या भावाकडून वंश निर्मिती करण्याला निषिद्ध मानून आईच्या, मातेच्या भावाशी, मामाशी विवाह करून वंशसातत्य टिकविण्यास समाज मान्यता मिळाली. या प्रवासातून पुरुषाचे कुटुंबातील प्रमुखत्व स्थिर झाले असावे. या सांस्कृतिक परिवर्तनाच्या प्रवासात नाग महाराष्ट्रातील कृषिकन्यांचा बंधू झाला असावा.
 कासईचे गाणे : मराठी आणि तेलगू -
 नागपंचमीचे एक अत्यन्त भावार्ततेने आणि आवडीने गायले जाणारे गीत कासईचे. पंचमीसाठी माहेरी आलेली बहीण भावजयीची कासई.. साडी नेसते. वारूळाची पूजा करताना कासई कुंकवाने खराब होते. नणंदेने आपली साडी नेसावी हेच वहिनीला आवडलेले नाही. त्यातून ती खराब झाली. वहिनी नवऱ्याजवळ हट्ट धरते की साडी नणंदेच्या रक्तात रंगवून आणून द्यावी. पत्नीच्या हट्टाखातर भाऊ बहिणीला मारून तिच्या रक्ताने रंगवलेली साडी पत्नीला देतो. बहीण फुलाच्या रूपात आपल्या पतीला सारी कहाणी सांगते. दुसऱ्या गाण्यात सासू वारूळ पुजायला जाणाऱ्या सुनेला सापाची भाजी करून खाऊ घालते. सून मेल्यावर तिचे प्रेत धान्याच्या उतरंडीतील सर्वात खालच्या डेऱ्यात भरून ठेवते. मुलगा घरी आल्यावर पत्नीची चौकशी करतो. परंतु सासू ... मुलाची आई आपणास काहीच माहिती नसल्याची बतावणी करते. शेवटी मेलेली सून पतीच्या स्वप्नात जाऊन खरी गोष्ट सांगते. असाच कथाबंध तेलगू लोकगीतात आहे. मात्र मुलीची काही वार्ता नाही म्हणून माहेरची माणसे लेकीकडे जातात. तिच्या सासरच्या शिवारात मातीचा ढीग दिसतो. त्यावर अतिशय सुंदर फुलाचे झाडे दिसते. मुलीची धाकटी बहीण बैलगाडी थांबवून फूल तोडण्यासाठी जाते तर तिला ढिगाऱ्यातून गाणे ऐकू येते.

मुट्टकु मुट्टकु ओ येल्ले ।मुहिना चेत्रकु यलाले
पद्दीना चेतिकी पवडालू । पाकरी मा अत्ता
पामु ओंडी पेट्टिंदी

 या गाण्यातून आपल्याला सासूने कसे मारले ते बहिणीला बहीण सांगते.
 कुटुंबसंस्था स्थिर होताना -
 कन्नड गीतातील आणि मराठी गीतातील सासू नाग खाऊ घालून सुनेला धान्याच्या डेऱ्यात ठेवते. कासईच्या गाण्यातील भाऊ पत्नीच्या आग्रहाखातर बहिणीच्या रक्ताने पत्नीची कासई रंगवून देतो. कुटुंबसंस्था स्थिर होताना स्त्रीपुरुषांतील नात्यांचे बंध नियमित केले गेले. स्त्रीचे सासर आणि माहेरातील स्थान, कुटुंबातील व समाजातील स्त्रीचे स्थान, पतिपत्नींचे शारीरिक, भावनिक, धार्मिक, सामाजिक अनुबंध यांचीही निश्चिती झाली.
 जमिनीची मशागत करून धान्याचे उत्पादन घेणारी थरवाडमधील सत्ताधारी स्त्री कुटुंबसंस्थेच्या जडणीच्या काळात 'पत्नी' म्हणून पतीच्या कुटुंबात स्थलांतरित होऊ लागली. तिथे तिचे स्थान दुय्यम झाले. स्त्रीचे माहेरच्या भूमीशी असलेले 'जोडलेपण' कुटुंबसंस्था स्थिर होऊन हजारो वर्षे झाली तरी कमी होत नाही. या सांस्कृतिक परिवर्तनाचा प्रवास स्त्रीच्या मनावर उमटलेल्या लहरी, गाण्यांतून प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. या मन्वन्तराच्या काळात विधी , व्रते, उत्सव, तत्संबंधी गीते, कथा यांत बदल घडत गेले. भूमीच्या सुफलीकरणाशी जोडलेली व्रते, कृषिदेवता, उत्सव यांचा नव्या स्वरूपात स्वीकार केला गेला. मात्र भारतात झालेल्या सांस्कृतिक आक्रमणांना अन्न आणि पाणी या जीवनावश्यक गोष्टींशी जोडलेले विधी उत्सव, व्रते पुसून टाकता आली नाहीत.
 नागचौथीचा उपास भावासाठी.... भावाच्या कृषिसमृद्धीसाठी -
 जी जमीन कसताना स्त्रीने तनमनधनाने समर्पण केले, ती जमीन बंधूच्या स्वाधीन करताना तिचे मन त्या जमिनीच्या सुफलतेसाठी सदिच्छा करीत राहिले. त्यातूनच नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास आला असावा. कुरी, तिफण वा टिपणीच्या ओव्यांत, पेरणीच्या गाण्यांतून असे लक्षात येते की, या ओव्या भावाच्या शेतासाठी, जमिनीसाठी गायल्या आहेत.

कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जिवा ....

असे म्हणणाऱ्या तुकारामालाही परमेश्वराविषयीची निष्ठा सांगताना माहेरच्या अंगणात गुंतलेले स्त्रीचे मन आठवावे लागले.
 फेरावरच्या गाण्यांतील आगळा कथाबंध -
 महाराष्ट्रातील पंचमीच्या फेरावरील गीतांत सासूसून, नणंदभावजय, यांच्यातील भावसंघर्ष रेखाटलेला आढळतो. मात्र प्रा. मंदा धर्मापुरीकर यांच्या एम.फिल.च्या प्रबंधात बहीण भावाच्या विवाहाचा संकेत देणारे गीत आहे. हे गीत मराठवाडा आणि तेलंगणाच्या सरहद्दीवरील भागांत प्रचलित असून 'सीमाप्रदेशातील भावगंगा' या पुस्तकात ग्रंथित केले आहे. गोविंदा नावाचा भाऊ शेतात काकडीचा वेल लावतो. वेल मोठा होऊन काकड्या येतात. पहिली काकडी खाण्यासाठी, काकडी तोडून ती देवळीत-कोनाड्यात ठेवतो. त्याची बहीण सोमूती काकडी खाऊन टाकते. बहिणीने काकडी खाल्ल्याचे समजताच गोविंदा रागवतो आणि आईला म्हणतो- सोमूने खाल्लेले वाळूक तरी परत कर नाही तर तिने माझी नवरी तरी व्हावे. मुलाची ही विपरीत मागणी एकून आई रागवते आणि ती शाप देते. ऋषीचे झाड हो. ऋषीची झाड म्हणजे हादग्याचे झाड. हे झाड अगस्ती ऋषींनी दक्षिणेत आणले. अगस्तींच्या आगमनापूर्वी दक्षिणेत बहीण भावाचा विवाह रुढ असावा. आर्यांच्या आगमनानंतर ही रुढी लुप्त झाली. 'ऋषीचे झाड हो' म्हणजे बहीण भावाचा विवाह न होण्याची प्रथा वाढो.
 फेराची गाणी : पावसासाठीच्या समूहप्रार्थनांचा अवशेष -
 भुलई खेळताना एक फेर पूर्ण झाला की स्त्रिया एकात एक गुंफलेले हात क्षणभर जमिनीला टेकवतात आणि पुन्हा फेरात फिरू लागतात. झिम्म्याप्रमाणे या फेरगीतांची लय द्रुतगतीत नसते. अत्यन्त संथ लय असते. भूमी आणि स्त्री यांच्यातील एकरूपता आणि भूमीबद्दलची कृतज्ञता या कृतीतून व्यक्त होते. लोकगीतांचे प्राचीनत्व अपार असते. हजारो वर्षांचे, अनेक शतकांचे संदर्भ त्यात दडलेले असतात नागपंचमी हा श्रावणाच्या सुरुवातीचा सण. पेरण्या पूर्ण होऊन रोपे भुईतून वर आलेली असतात शेतीच्या कामात सुरुवातीपासूनच स्त्रियांचे योगदान मोठे असते. तृणधान्ये भाजीपाला, कंदमुळे पिकविण्याचे प्रयोग त्यांनीच केले. पाऊस येण्यासाठी भूमीची उर्वराशक्ती वाढण्यासाठी, स्त्रिया सामूहिक प्रार्थना, विधी, प्रत्यक्ष जाऊन करीत. त्याचे अवशेष नागपंचमीच्या फेराच्या गीतांतून जाणवतात.
 उत्तरेकडे नाग, पती, प्रियकर पुत्राच्या रूपातून येतो. महाराष्ट्रात मात्र नाग बंधूंच्या रूपातच येतो -
 आदिम काळात मानवाचे जीवन प्राणिमात्रांप्रमाणे होते. प्राणिमात्रांत वंश पोटात असेपर्यंत व नंतर ते पिल्लू मातेचे दूध पिऊन स्वतःचे खाद्य स्वतः मिळवेपर्यंत त्याचे आणि मातेचे नाते असते. ते पिल्लू वयात आल्यावर ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला तिच्याशीही रत होते. माणूसही सुरुवातीच्या काळात असेच पशुवत जीवन जगला. इडिपस कॉम्प्लेक्समधून आई मुलाचे शारीरिक संबंध असण्याचा संकेत मिळतो. तर यमयमीच्या गोष्टीतून बहीणभावाचे शारीरिक संबंध वैध असण्याचा संकेत मिळतो. जैन रामायणानुसार राम आणि सीता बहीणभाऊ होते. मातृसत्ताक समाजव्यवस्तेत कोणत्या पुरुषाकडून संतती मिळवायची हे स्त्री ठरवीत असे. नागकन्या उलुपीने अर्जुनासारखा बलदंड व देखणा पुत्र मिळावा म्हणून अर्जुनाशी संग केला. ती अर्जुनाबरोबर श्वसुरगृही गेली नाही. सत्यकाम जबालीला मातेचे नाव माहीत होते. परंतु पित्याचे नाव मात्र माहीत नव्हते. या सर्व बाबींचे निरीक्षण करता असे लक्षात येते की स्त्री आणि पुरुष यांच्यातील अत्यन्त पवित्र नात्याची निर्मिती 'बंधू.... भ्राता' या नावे निश्चित झाली. हे नाते केवळ रक्ताचेच नसते तर हृदयस्थ भावनेचेही असते याची साक्ष द्रौपदी आणि श्रीकृष्ण, नाग आणि मऱ्हाटी स्त्री यांच्या कथाबंधांतून मिळते. नागाला कृषिकन्येने भाऊ मानले आहे. भाऊबीजही महाराष्ट्रात अत्यन्त भावपूर्णतेने साजरी होते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या उत्तरेकडील प्रान्तात विवाहनांतर माहेरचा संबंध जवळजवळ तुटतो. लेकीच्या घरी वडीलबंधू, बहीण, आईवडील पाणीही पीत नसत. जेवले तरी ताटाखाली चांदीचे नाणे ठेवीत. 'कन्यादान' पुरुषप्रधान जीवन व्यवस्थेतून आले. महाराष्ट्रात मात्र मुलीकडे जेवायचे नाही, मुलीने आईला लुगडे नेसवायचे नाही अशा प्रथा नाहीत. उलट मंगळागौरीच्या ५ व्या वर्षी तांब्यात सोन्याचा नाग ठेवून त्याचे तोंड खणाने बांधून तो तांब्या आईला वायन म्हणून देतात. सुखाचा संसार झाल्यावर माहेर पूजण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. माहेरच्या सर्वांना स्त्री समाधानाने आहेर करते व माहेरबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. उत्तरेत धाकटी नणंद, धाकटी बहीण, लेक यांच्याकडचा आहेर स्वीकारणे निषिद्ध मानेले आहे. वरील बाबींचा विचार करता असे लक्षात येते की द्रविड आणि आर्य संस्कृती.... मातृसत्ताक आणि पितृसत्ताक संस्कृतीचा संगम मऱ्हाटी संस्कृतीत झाला आहे.
 पोळा : बैलांच्या श्रमांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण -
 शेतीच्या कामात बैलाला फार महत्त्व आहे. भर उन्हाळ्यात, पावसात, काकडणाऱ्या थंडीत शेतीची मशागत करण्यासाठी बैल सतत श्रमत असतात. बैलांशिवाय शेतीची मशागत होत नाही. आज यंत्रयुग आले आहे. ट्रॅक्टरच्या काळातही बैलांविषयीची कृतज्ञता सर्वसामान्य समाजात, विशेष करून कृषिसमाजात असतेच. जे आपल्या उपयोगी पडते, किंवा ज्यांचा आपल्यावर उपकार होतो, त्यांची मनोभावे पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे ही भारतीय लोकमनाची विशेषता आहे. उपयोगी पडणाऱ्या गोष्टी सजीव असोत वा निर्जीव त्यांचे ऋण भारतीय मन मानते. पूजा, कृतज्ञता, झाडांची असते, प्राणिमात्रांची असते, शस्त्रांची असते, साधनांची असते.
 विविध टोळ्या भारतात येण्यापूर्वीपासून भारतीयांना कृषिविद्या अवगत होती. ऋग्वेद आणि अथर्ववेदात कृषिविषयी अनेक उल्लेख आढळतात. शेतीसाठी बैल व नांगराचा उपयोग त्यांना माहीत असावा. क्षेत्रपती, सीता व शुनासीर यांना उद्देशून रचलेले एक सूक्त ऋग्वेदात आहे. त्यातून आर्यांचे कृषिविषयक विचार व्यक्त होतात.

 

शुनं वाहाः शुनं नरः शुनं कृषतु लाङगल् ।
शूनं वस्त्रा वध्यन्तां शुनमष्ट्रामुदिड:गय ॥
शुनासीराविमां वाचं जुषेथां यद्दिवी चक्रयुःपयः ।
तेनामुप सियतम ॥
अर्वाची सुभगे भव सीते वन्दामहे त्वा ।
यथा नः सुभगासासि यथा नः सुफलाससि ॥

 अर्थ -बैल आनंदाने, लोक मजेने आणि नांगर सहज रीतीने नांगरोत. त्यांच्या जुंपण्या घट्ट बांधा. पुढे सुखोत्पती व्हावी म्हणून आता आसूड चालवा. शुनासीर हो (शुनासीर कृषिकर्माला सफल करणाऱ्या विभूती) आम्ही केलेली स्तुती ग्रहण करा, आकाशमंडलात तुम्ही जे उदक उत्पन्न केलेत त्यानेच ही जमीन भिजवा. भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर. तुला आम्ही वंदन करतो.
 बैलांच्या श्रमातूनच धनधान्याची विपुल निर्मिती करता येते याची जाणीव प्राचीन समाजाला होती. ज्या हातांनी बैलाला आसूड मारायचा, मानेला जू घट्ट बांधायचा त्याच हातांनी त्या बैलांच्या खांद्याना लोणी हळद मळून त्यांच्यावर माया करायची ही परंपरा पूर्वजांनी निर्माण केली. बैलांच्या श्रमाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा.
 पोळ्याच सण आला -
 श्रावण अमावास्येस मराठवाडा परिसरात पोळ्याचा सण अत्यन्त श्रद्धेने साजरा केला जातो. काही भागात याला बैलपोळा असे म्हणतात. तर काही भागात बेंदूर असे म्हणतात. बैल नांगर ओढतात. रात्रंदिवस श्रम करतात.अन्ननिर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांनी केलेल्या श्रमांबद्दलची कृतज्ञता महाराष्ट्र आणि भारतातील इतर भागांतही सणाच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. सर्वसाधारणपणे श्रावण अमावास्येस पोळ्याचा सण साजरा केला जातो. विभागपरत्वे आषाढ, भाद्रपद अमावास्येसही पोळा साजरा करतात.
 आदले दिवशी खांदे मळणी -
 पोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी जोडीने, शेतकरणीसह बैलांजवळ येतो आणि त्याच्या खांद्यावर मायेची थाप मारतो. शेतकऱ्याच्या डोळ्यांत या मुक्या कष्टकऱ्या विषयीची अपार कृतज्ञता दाटलेली असते. त्या स्नेहल स्पर्शाने बैलही सुखावतात. वर्षभर जू वाहून पराणीचे फटके खाऊन, श्रमलेल्या खांद्यांना शेतकरी हळद आणि लोणी लावून मळतो, धान्याच्या धुगऱ्या त्याला प्रमाने खाऊ घालतो. तसेच बैलांना दुसरे दिवशी जेवायला येण्याचे आवतण देतो. मराठवाड्यात पूर्वी शेतकरी गाणी म्हणत, बैलांची खांदेमळणी करीत. आज मात्र ही गाणी हरवत चालली आहेत. तरीही

आज आवतण घ्या
उद्या जेवायला या

असे आवतण देऊन त्यांना मानाने जेवायला बोलावतात. पोळ्याच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. ज्वारीच्या पिठाची उकडून वा तळून कडोळी तयार करतात. ती बैलाच्या शिंगात अडकवतात. जू, फास, आळंद, टोपलं ही शेतीची अवजारे गेरू आणि चुन्याने कलात्मक रीतीने रंगवतात. बैलांची जिथे पूजा होते ती जागा शेणाने सारवून घेतात आणि रांगोळीचे झाड काढतात. जवळ भिंत असेल तर त्यावर झाड काढतात. घराला आंब्याच्या पानांचे धनदाट तोरण करून बांधण्याचा मान गावातील मांग समाजाच्या व्यक्तीस असे. तर काही ठिकाणी हा मान वारकाचा असे. त्या मोबदल्यात शेतकरी कुवतीनुसार धान्य देत असे. पोळ्याच्या दिवशी जेवणात पुरणपोळी असते. घरमालकीण बैलांच्या पायावर गरमपाणी दूध टाकून हळदकुंकू, अक्षता वाहून पूजा करते. मराठवाड्यात जेवणाचा कार्यक्रम काही ठिकाणी सायंकाळी असतो.
 पोळ्याच्या दिवशी सालदार कष्टकऱ्यांना मिष्टान्न -
 पुरणपोळीचा नैवेद्य कौतुकाने बैलांना भरवला जातो, तुपात बुडालेली पोळी बैलांच्या मुखात घालताना मालकीण जणु त्यांना सांगत असते, मनभरून, पोटभरून जेवा. तुमच्या मेहनतीतूनचं हे वैभव आम्हाला प्राप्त झाले आहे.

तूप दूध आणा ओता पोळ्यावरी
माझे राजे राबले लई सेतावरी
खारे माझ्या सोन्यांनो खारे माझ्या हिऱ्यांनो
प्वाट भरुदे तुमचं पुरनपोळ्यांनी......

 या दिवशी शेतात काम करणाऱ्या सालदारांना सन्मानाने जेवायला बोलावले जाते. सकाळी बैलांना नदीला घेऊन जातात. त्यांना भरपूर पाण्याने स्वच्छ धुतात. त्यांच्या अंगावर कावेने ठसे उमटवतात. गळ्यात घुंगरमाळा घालतात. अंगावर देखण्या झुली घालतात. या झुलींना इन्द्रधनुषी रंगांचे भिंगाचे भरतकाम करून सजवले जाते. या दिवशी बैलांचा विवाह होतो. बाशिंग बांधून नवरदेव सजवला जातो. या दिवशी खेड्यातून वेशीला तोरण बांधतात. गावातील सर्व बैल मिरवत मिरवत वेशीपाशी नेतात. वेशीतून बैल गावात येतात तेव्हा नारळ फोडला जातो.
 नवरदेव बैल -
 नवरदेव जसा मारुतीच्या पारापाशी आला की नारळ फोडतात. त्याप्रमाणे कोपऱ्याकोपऱ्यावर त्यांच्यावरून नारळ ओवाळून टाकतात. किमान सात आठ नारळ तरी बैलांवरून ओवाळून टाकतात.

पोळियाचे दिशी, येशीबाईला तोरण
नंदी चालले भारानं, बसू राजाचं लगीन
पोळियाचे दिशी

 या दिवशी बैलांना बाशिंग का बांधले जात असावे याचा एक संदर्भ सिंधूसंस्कृतीत सापडतो. 'श्रावणाच्या अमावास्येला भारताच्या काही भागांत पोळा नावाचा बैलाचा सण साजरा करतात. त्याचे महत्त्व द्रविडप्रचुर भागात जास्त आहे. हा सण प्राचीन लिंगपूजकांचा असावा असे दर्शविणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. वृषभपूजा ही आर्यांपूर्वीची आहे. ती आर्यांमध्ये नव्हती. आज हिंदूधर्मात वृषभपूजा शिवाच्या अनुषंगाने होते. प्राचीन सिंधू संस्कृतीत वृषभ ही स्वतंत्र देवता होती. त्या संस्कृतीतील वृषभाचे चित्र असलेल्या ज्या प्रतिमा उपलब्ध आहेत त्यात शिवाचे अथवा शिवलिंगाचे चित्र नाही. प्राचीन काळी लिंगपूजेचे प्रतीक म्हणून वृषभाची पूजा होई. डोक्यावर शिंगे असणे हे आर्यपूर्वीच्या देवाचे व्यवच्छेदक लक्षण होते. या दिवशी बैलाला देवत्व आणण्यासाठी बैलाला बाशिंग बांधतात. या बाशिंगामुळे हा सण आर्यापूर्वांशी संबंध दाखवतो. पोळा हा बहुजन समाजाचा मोठा सण आहे. या दिवशी सायंकाळी बैलांचे लग्न लागते. लग्न, मंगलाष्टका गाऊन, ब्राह्मण बोलावून लावले जाते.

पोळियाच्या दिशी गाई झाल्याती वरमाया
भाईराजाचे माझ्या नंदी गेले मिरवाया ....
पोळ्याच्या दिशी नंदी झाल्याती नवरं
हौश्या त्येला बांधावी चवरं ....

 या दिवशी सायंकाळी बैल वाजंत्री ताशांच्या तालात परणायला निघतात, दुसऱ्या घरची गाय बोलावून तिच्याशी लगीन लावले जाते. मराठवाड्यात सर्वसाधारणपणे लग्न तुळशी वृंदावनाजवळ लावले जाते. या दिवशी जेवताना बैल रुसतात असा समज आहे. पोळ्याचे दोन दिवस मालक बैलांची मन लावून खातिरदारी, सेवा, पाहुणचार करीत असतो.

माज्या रं मायबापा
तूले मारलं झोडलं
आभाळाचं मन तुझं
इसरं झालं गेलं ....

 बैलाच्या मानेवरून हाताने खाजवून पाठीवर थाप मारून प्रेमाने पुरणपोळी त्यांना चारतो. शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो साक्षात बळीराजाच असतो.
 चौर चौर चांग भला ... पाऊस आला घरात चला -
 पूजा करण्यापूर्वी एका रंगवलेल्या मोठ्या टोपल्यात पेरणीचे धान्य ठेवतात. सूप, फास, नाडा, आळंद ठेवतात. आळंद म्हणजे मध्यम आकाराचे मडके, तेही गेरू चुन्याने सुरेख रंगवतात. त्यांत गहू, ज्वारी, धणे, हळकुंड, सुपारी ठेवतात. बैलांसमोर जू ठेवतात. जूच्या दोन्ही टोकांच्या शिवळात आपटा रुचकी वा आंब्याच्या फांद्या खोचतात. दोन्ही टोके सुताने सुतवितात. आळंद्यात ५ तेलच्या, ५ कानवले, ५ पुरणाचे दिवे ठेवतात. पुरणाच्या मोठ्या दिव्यात तूप टाकून काळ्या कपड्याची जाड वात करून त्यात ती भिजवतात व तेववतात. शेताचा मालक व मालकीण बैलांची पूजा करतात. पूजा झाल्यावर मालक वा सालदार आळंद ठेवलेले मोठे टोपले डोक्यावर घेतो. चाडनळे गळ्यात अडकवतो. एक जण खांदे मळणीच्या वेळी ज्या मोळ वनस्पतीने खांदे मळलेले असतात तो मोळ काशाच्या वा पितळेच्या ताटावर बडवीत पुढे होतो आणि बैलाला पाच प्रदक्षिणा घालतात. मालकाच्या मागे घरातील सुवासिनी पाणी शिंपडीत जातात. प्रदक्षिणा घालताना ताट वाजविणारा ओरडून म्हणतो -
  चहूर चहूर चांऽऽग भला
मागील लोक म्हणतात,
  पाऊस आला घरात चला
 'चहूर चहूर चांग भला' म्हणजे चोहोकडून सर्व दिशांनी सर्वांचे चांगले व्हावे. पाऊस येतोय. धरणीला त्यात आकंठ भिजू द्या. धरणी आणि पावसाच्या मिलनातून उद्याची समृद्धी बहरणार आहे. त्यांच्या एक होण्याला आपला अडथळा नको. चला घरात चला. स्त्रीपुरुष समागमातून, निसर्गशक्तींच्या समागमातून नवनिर्मिती होते. समृद्धी येते. ही प्राचीन समाजात श्रद्धा होती. त्यामुळे स्त्रीपुरुष समागमाबाबत अनैतिक घृणास्पद अशी भावना त्यांच्यात नव्हती. विवाह ही कल्याणकारी संकल्पना होती.
 तुळसाबाई देवकाते या भावठाणा या ग्रामीण भागात शेती करणाऱ्या महिलेने सांगितले की बैलाला 'बसवराज' म्हणतात. त्याचा विवाह नवरी बरोबर न होता करवलीबरोबर झाला. त्या संदर्भातील त्यांनी सांगितलेल्या ओव्या अशा -
  दळण दळिते एका मांडिनं म्हनंऽऽ

 आला पोळ्याच सण
 बसवराजाच्या लगनाची
 नवरी ठिवली घरी
 पाचव्या सोमवारी
 बसव्याचं लगन लावी
 बैलामंदी ग बैल
 माज्या राघोबाची

सौराज्याचं लगीन...
ब्रह्मदेवानं केली चोरी
करवली नेली म्होरी
आला पोळा कारभारी
मारवती ब्रह्मचारी
बैल हिऱ्या ग चंचल
झाली पेरणी पातळ

नव्या नवऱ्याप्रमाणे बैलही रुसतात. तेलपीठाला शिवत नाहीत.

 बैलामंदी ग बैल
 शिवीना तेल मीठ

बैल बडुद्या रुसला
मांडी घालून बसला

  शेतकरीण पोळ्याला बैलांना ओवाळते. तिच्या बैलासंबंधीच्या भावना व्यक्त करताना ती म्हणते -

पोळ्याच्या दिशी बलाला तेलमीठ
दावन दावा त्याला सूर्व्या नीट

 बैलाला सूर्याच्या दिशेने, पूर्वेकडे तोंड करून बांधा, सूर्य, वृषभ हे पौरूषाचे प्रतीक आहेत.

हौस मला मोठी कमानी दरवाजाची
हाईत उंचउंच शिंग माज्या बडूद्याची
बैला माज्या बडूद्यानं, इळाचं काय केलं
शेल्याला तास नेल, काळ्या मातीच सोन झाल
बैला माज्या बडूद्यानं, डरकी फोडली पेवात
धनी सावध वाड्यात
पोळ्याच्या दिशी चिरा पाडिला पाराचा
माज्या राघूबाचा नंदा जहागीरदाराचा

 बैल जसे कष्ट करून मातीतून सोनं काढतात, तसाच धनीही त्याच्या बरोबरीने कष्ट करतो. याविषयीची कृतज्ञता, प्रेम व्यक्त करताना पोळ्याच्या ओव्यांतून ती सांगते -

 गाडीमंदी पोती
 किसन बाळाच्या
 पाऊस राजान
 माज्या राघूबाचे
 पाऊस पान्याच्या
 माज्या राघूबानं
 गाडीमंदी पोती
 ववाळिते नंदी चारी

नंदी आले अंबाराला
किल्ल्या गेल्या कंबराला
पडून बरे केले
नंदी तासाला पाणी पेले
अंगनी उतरल्या धारा
जिमिनी केल्या तारा
नंदी आले पेवादारी
माझा पाचवा गल्ला करी

 हा पाचवा म्हणजे शेतकरणीचा धनी. त्यातल्या 'माझा पाचवा' या शब्दाचे भावसौंदर्य शब्दातीत आहे.
 पंचपल्लवांनी पूजा -
 बैलांच्या पूजेत पंचपल्लव असतात. दुर्वा, आपटा, बेल, रुचकी, आंबा यांची पाने लागतातच. श्रावण, भाद्रपदातील सणांमधून माणसाचे निसर्गाशी असलेले नाते सतत जाणवते. पोळ्याच्या दिवशी मराठवाड्यात सालदारांना, शेतात राबणाऱ्या गड्यांना, त्यांच्या लेकरांना, घरधनीण आग्रहपूर्वक जेवू घालते.
 श्रमाची प्रतिष्ठा -
 पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने श्रमाची प्रतिष्ठा समाजमनात रुजवली जाते. श्रमाशिवाय शेती फुलत नाही. शेतात कष्ट करणाऱ्याचे जमिनीशी घामाचे नाते असते. जमीन जणु त्याच्याशी बोलते. जनावरांच्या डोळ्यांतील भाव, त्यांच्या हंबरण्यामागील सांगावा, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला समजतो. पाऊस पाणी चांगले असेल तर पोळ्याचा सण थाटात साजरा होतो. त्या निमित्ताने अनेक गावांत बैलगाडीच्या शर्यती असतात. मिरवणुकीत कोणाच्या बैलाचा मान पुढे राहायचा, यावरूनही भांडणे होतात. पाऊस पाणी फारसे बरे नसले तरी हा सण सुना जात नाही. कारण तो जमिनीच्या सुफलीकरणाशी, धनधान्य समृद्धीशी जोडलेला आहे. विवाह हा सुफलीकरणाचा पाया असल्याने गायबैलांचे लग्न लावले जाते. या दिवशी किमान पाच बैल पूजतात. लग्नासाठीची गाय एकच असते. ती घरोघर नेतात. विवाह ही संकल्पना केवळ सुफलीकरणाचे प्रतीक म्हणून येथे विधिरूपाने साजरी होते.
 या पूजेत पेरणीचे धान्य, पेरणी व शेतीची आवजारे, सूप, टोपली, विविध प्रकारची पाने, पानांची तोरणे, झाडांच्या फांद्या यांना महत्त्व असते. अंबाडीपासून निघणाऱ्या सेलम या धाग्याची सुतळी करून ती, जाते, मुसळ, दाराच्या कड्या, चूल, धान्याच्या कोठ्या आणि कणग्या यांना बांधतात. अबांडी वाढत जाणारी तिचा धागा लांबत जाणारा. जमीन, श्रम आणि पाणी यातून निर्माण होणारी सुफलता अशीच वाढत जावो असे यांतून सूचित होत असावे.
 मातीचे बैल कुंभार करतो. घरोघर देतो. त्यांचीही पूजा करतात. कुंभार हा गावगाड्यातील महत्त्वाचा बलुतेदार आहे. त्यालाही जेवणाचे आमंत्रण व वाढण असते. खेड्यांमध्ये हा विधी साजरा होतोच.
 आदिवासींचा पोळा -
 आदिवासी समाजातील अनेक सण आणि विधी पाऊस काळात आषाढ श्रावणात साजरे होतात. ते जमिनीतील सुफलनशक्तीशी जोडलेले असतात. महाराष्ट्रातील अनेक अदिवासींच्या देवता-प्रमुख देवता, धरित्री आणि कणसरी या आहेत. विदर्भाच्या उत्तरेकडील डोंगर पठारांवर राहणारे कोर्कू पोळा साजरा करतात. बैलांना या दिवशी भरपूर पाण्यात नेऊन स्वच्छ धुतात. त्यांच्या शिंगांना बाशिंगे बांधून सजवतात आणि त्यांना भरपूर पळायला लावतात. चरायला नेतात.
 सातपुड्यातील निळीचारीची पूजा -
 सातपुड्यात राहणारे वळवी, गवित, वडवी, वसावे या कुळातील भिल्ल निळीचारीची पूजा करतात. ती पोळ्यासारखीच असते. ही पूजा मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर रानभर गवताची दाट झूल बहरल्यावरच करतात. पूजेच्या आदल्या दिवशी बैलांना स्वच्छ धुतात. शेतात नेऊन चारतात. सायंकाळी गावातील सर्व पुरुष औत हाकायची काठी पराणी घेऊन एकत्र जमतात. सर्व पराण्या एकत्र करून त्यांची पूजा करतात. ही पूजा केल्याशिवाय जनावरे हिरव्या रानात गवतात चारीत नाहीत. तसे केल्यास अघटित घडते अशी त्यांची समजूत असते.
 पर्जन्य वर्तविणाऱ्या पक्षांपैकी एक भोजा. त्याने पोळ्याच्या आधी आठदहा दिवस मौन पाळले तर पिकांना अखेरच्या पावसाचे पाणी मिळणार नाही असा समज आहे. तर पोळ्याच्या सणानंतर हे मौन घडले तर मात्र भरपूर पाऊस पडेल असे मानतात.
 ऋषिपंचमी -
 मातृहक्क : नैसर्गिक जीवन व्यवस्था -
 सर्व मानववंशशास्त्रज्ञांचे एकमत आहे की 'मातृहक्क' ही सर्वात जुनी आणि मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या काळातली नैसर्गिक व्यवस्था होती. उत्पादन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर, नातेसंबंधाचे निश्चितीकरण त्यातून आकारास आलेली कुटुंबसंस्था यांच्याबरोबर मातृसत्तेचे रूपान्तर पितृसत्तेत झाले. वस्त्र विणण्याची, धागा तयार करण्याची कला, चिखलाचे मडके तयार करण्याची कला स्त्रीने निर्माण केली. परंपरेने पुढील पिढ्यांना दिली. धर्मानंद कोसंबी म्हणतात की शेतीचा शोध आणि मातृसत्ताक समाजव्यवस्था यांची निर्मिती भारतात प्रथम झाली. पूर्व वैदिक काळात पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या सुरुवातीच्या काळात स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते. पुरुरव्याशी विशिष्ट अटींवर विवाह केलेल्या उर्वशीने आपल्या सासऱ्यास १०'मी तुम्हाला अन्न आणि वस्त्र पुरवीन' असे आश्वासन दिले होते. शेती करणे, वस्त्र विणणे, घट तयार करणे यात ती कुशल होती. भूमी सर्जनशील तशीच स्त्रीही सर्जनशील, मानवास जन्म देणारी, तसेच विविध वस्तूंच्या संगमातून नवनिर्मिती करणारी. सर्व उद्योग - कृषि, पशूंवर आधारित गृहोद्योग होते. ते स्त्रीने विकसित केले. तिचे तत्कालीन अर्थव्यवस्थेला महत्त्वाचे योगदान होते म्हणूनच सर्व प्राचीन देवता स्त्रीरूपी आहेत. झाडांचा आत्मा स्त्रीला नेहमीच आशीर्वाद देतो अशी Myth आहे. स्त्रीचे अधिकार नदीच्या माध्यमातून सांगितले गेले आहेत. तिला लोकमाता म्हटले जाते. शेतीची अर्थव्यवस्था हाच 'स्त्रीतत्त्वा'चा भौतिक पाया होता. समृद्धी, पीकपाणी, सुपीकता, मुलाबाळांची समृद्धी यांचे प्रतीक स्त्रीदेवता होत्या. दुर्गा ही निसर्ग आणि नवजीवनाचे प्रतीक. तर काली (लक्ष्मी) विपुलता, समृद्धी आणि ऐहिकतेचे प्रतीक. शक्ती ऊर्फ उमा ऊर्फ गौरी ही सर्व निर्मितीचे मूळ. सरस्वती ही बुद्धी आणि कलेची देवता. चंडीचे व्यक्तिमत्त्व उग्र विक्राळ. तीसुद्धा प्रिय देवता होती.
 स्त्रिया शारीरिकदृष्ट्या पुरुषांइतक्याच विकसित होत्या. त्या युद्धातही सहभागी होत. विश्पला ही स्त्री-सेनापती होती. त्या अधिक क्रूरपणे वागत. पुरुषांचे युद्धावर जाणे केवळ शारीरिक सुदृढतेमुळे नसून त्याकाळच्या आर्थिक गरजा मुख्यत्त्वे करून स्त्रिया भागवीत असल्याने त्यांना लढाईवर जाणे शक्य झाले नसावे असे बिफॉ या मानववंशशास्त्रज्ञास वाटते.
 वृषीपंचमी की ऋषिपंचमी -
 मोहंजोदारो आणि हरप्पा येथील ५ ते ७ हजार वर्षांपूर्वीची संस्कृती मातृसत्ताक होती. आर्यांची पितृसत्ताक जीवनव्यवस्था भारतात स्थिरावण्यापूर्वीची होती. या संस्कृतीचा आधार शेतीव्यवसाय होता. हा समाज लिंगपूजक होता. बैलांना - वृषभांना हा समाज पूज्य मानीत असे. वृषभाला ठेचून प्रजननासाठी निरूपयोगी करणे, त्याला शेतीला जुंपणे, गाडी ओढण्यास लावणे हे लिंगपूजेच्या विरुद्ध आहे. असे असले तरी सिंधू संस्कृतीत शेतीसाठी व्यापारासाठी बैलांचा उपयोग केला जाई. 'वृषं लुनाति स वृषलः' बैल - वृष फोडण्याचे गर्ह्य काम करणारा तो वृषल. वृषल हा शब्द शूद्रांसाठी मन्वादिस्मृतींतून वापरला आहे. स्त्रिया सर तयार करून कुदळ फावड्याच्या साहाय्याने शेती करीत.
 वरील विवेचनावरून असे लक्षात येते की ऋषिपंचमीचा संबंध 'ऋषी' या शब्दाशी वा संकल्पनेशी नसून ११'वृषी' या संकल्पनेशी असावा 'वृष' ह्या शब्दाचा अर्थ कल्याणकारक गोष्टींचा वर्षाव करणारा असा धर्मवाचकही झाला. या व्रताचा मूलबंध लिंगपूजक, मातृसत्ताक समाजाशी असावा. या दिवशी स्त्रिया बैलांच्या श्रमाने निर्माण झालेले धान्य वा कंदमुळे खात नाहीत. 'मुळात वृषिपंचमी असून त्या मागील कल्पनेचा व त्यासंबंधीच्या माहितीचा कालांतराने लोप होऊन तिची जागा ऋषिपंचमीने घेतली असावी.'
 परिवर्तनाच्या काळातील संघर्ष : तरीही 'आदिबंध' बोलके -
 १२मार्शलच्या मते मातृसत्ताक संस्कृतीचे अवशेष आजच्या भारतीय जीवन पद्धतीतून दिसतात. १३स्टारबकला वाटते की 'स्त्री' ला मिळालेला सन्मान शेतीप्रधान अर्थ व समाजव्यवस्थेतून मिळाला आहे. पूर्व वैदिक काळात शेतीबद्दलचे, त्यातून मिळणाऱ्या शाकभाज्यांचे महत्त्व समाजास मान्य होते. शेतीशी निगडित देवतांना महत्त्व होते. बैलांचा नांगर वापरात येईपर्यंत स्त्री समाजाचे केन्द्रस्थानी होती. शेती आणि स्त्रिया यांच्या संदर्भात काही उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेदात सापडतात. मुदगलानी ही स्वतः नांगर चालवणारी, शेती करणारी स्त्री होती. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्या आळशी पतीच्या हातात फावडे देऊन शेतीकामाला लावले. वैदिकांची संस्कृती आणि पुरुषप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था दृढ होतांना, समाजाला स्मृतींच्या... नियामांच्या माध्यमातून नियंत्रित करताना मातृसत्ताक गणसमाज आणि पुरुषसत्ताक समाज यांत संघर्ष झाला असावा. त्यातून स्त्रियांना सर्वार्थाने दुय्यम करणाऱ्या तीन दुष्ट प्रथा आस्तित्वात आल्या. १.बहुपत्नित्व, २.बालविवाह, ३.सतीची प्रथा. ब्राह्मणी काळात स्त्रीला सर्वाधिकारांपासून वंचित करण्याचे काम नियमबद्धपणे केले गेले. रेनफेलच्या मते हे काम ब्राह्मण काळात झाले. ऋग्वेद, अथर्ववेदात पुरुषमेध, अनुमरण या बाबी प्रतीकात्मक होत्या. पूर्व वैदिकांत सती प्रथा नव्हती. उत्तरोत्तर स्त्रीविषयीचे हीनत्वाचे उल्लेख वाढत गेले.
 या परिवर्तनाच्या काळात 'ऋषिपंचमी' चे आजचे रूप स्थिर झाले असावे. नांगराचा शोध लागण्यापूर्वीचे स्त्री आणि शेती यांचे मूलभूत नाते या व्रतातून दृगोचर होते. आदिमकाळापासून स्त्री आणि निसर्ग यांच्यात निर्माण झालेला 'आदिबंध' किती मूलभूत आहे हे या व्रतातून लक्षात येते.
 गौरी लक्ष्म्यांचा सण -
 स्त्री सुपीकतेचे प्रतीक -
 मानव शेती करू लागल्यावर त्याला जमिनीतील उत्पादन शक्ती आणि स्त्रीतील जननक्षमता यांत विलक्षण साम्य जाणवले. त्यामुळे स्त्रीत यातुशक्ती... एक गूढ शक्ती आहे असे त्याला वाटे. त्यातूनच स्त्रीविषयी भययुक्त आदराची भावना त्यांच्या मनांत... लोकसमूहाच्या मनात निर्माण झाली. स्त्रिया उत्पादनाचे काम करीत असत. शेतीचा, तृणधान्ये, कंदमुळे यांचा शोध त्यांनीच लावला. यांतून ती सुपीकतेचे प्रतीक बनली. धनधान्याची समृद्धी व्हावी म्हणून करावयाच्या कृतींमध्ये स्त्रियांना महत्त्वाचे स्थान असते. मराठवाड्यात बाजरीवर रोग पडला तर रजस्वला स्त्रीकडून शेताची पूजा करून घेण्याची प्रथा होती.
 गौरी वा लक्ष्म्यांचा सण शेतीच्या समृद्धीसाठी -
 महाराष्ट्रात हा सण अत्यन्त महत्त्वाचा मानतात. मराठवाड्यातील घराघरातून हा सण अत्यन्त श्रद्धेने साजरा होतो. मराठवाड्यातील सातही जिल्ह्यांतून सर्व जातिजमातींत हा सण पाळला जातो. मराठवाड्यात गौरींनाच लक्ष्म्या म्हणतात. भाद्रपद शुद्ध अष्टमीला त्या जेवतात, त्या दिवशी अनेक जिल्ह्यांतून जिल्हाधिकारी सार्वजनिक सुट्टी देतात. हा एक महत्त्वाचा कुळाचार आहे. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ मुलाकाडे वा कर्त्या मुलाकडे लक्ष्म्या बसविण्याचा मान जातो. घरातील सर्व मुले व सुना या सणासाठी एकत्र जमतात. लक्ष्म्यांच्या सणाला सुना माहेरी जात नाहीत. एखाद्या मुलास लक्ष्म्यांना मूळ घरी येणे शक्य नसेल तर त्यांच्या घरी धान्याच्या राशींची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. एखाद्या मधल्या वा धाकट्या सुनेस लक्ष्म्या मांडण्याची इच्छा झाली तर तिच्या आईने लक्ष्म्या घेऊन मुलीकडे यायचे असते. आई नसेल तर वडील बहीण वा इतर कोणी मैत्रीण लक्ष्म्या देते.जी व्यक्ती लक्ष्म्या देते तिला आहेर केला जातो.
 मृगाच्या पावसात पेरलेले धान्य भाद्रपदात भराला येते. मूग, उडदाचे दाणे भरले जातात. परसबाग हिरव्या पालेभाज्यांनी, फुलांनी बहारून जाते. मातीची सुफलनशक्ती वाढून, उद्या घरा घरात येणाऱ्या धान्याचे पीक भरभरून यावे अशी शुभकामना व्यक्त करणारा हा सण. ही पूजा हरित लक्ष्मीची असते. म्हणूनच लक्ष्म्यांच्या समोर धान्याच्या राशी घालून त्यांची पूजा करतात. पूजणारी स्त्री आपले मन ओवीतून व्यक्त करते.

लक्ष्मी आई आली शेताच्या बांधासडी
सावळा बाळराजा हाती गोफण पाया पड़ी
माझ्या हे ग शेतात
हाल्या बैलाचं आऊत
माझ्या हे ग घरी
लक्ष्मी येती ग धावत

 लक्ष्मीचे आगमन आणि मांडणीतील विविधता -
 भाद्रपद सप्तमीला लक्ष्म्या बसवतात, अष्टमीला त्या जेवतात आणि नवमीला परततात. मराठवाड्यातील बहुतेक घरांतून मुखवटे असलेल्या उभ्या लक्ष्म्या मांडतात. मुखवटे घरांतील परंपरेनुसार वेगळे असतात. पण सर्वसाधारणपणे शाडूचे तयार मुखवटे असतात. काहींच्या घरी सुगडी रंगवून त्याचे मुखवटे तयार करतात. काही घरांत पितळेचे मुखवटे असतात. धडाची रचना कुलरीतीनुसार वा सोयीनुसार करतात. १. मडक्यांची उतरंड मांडून सर्वात वरच्या मडक्यावर मुखवटा मांडतात. २. घरातील डबे, घागरीचा वापर करून त्यावर मुखवटा ठेवतात. ३. अलीकडे पत्र्याचे साचे विकत मिळतात.
 या धडाला कापडात कापूस भरलेले वा शाडूचे हात जोडतात. या धडाला साड्या नेसवून दागिन्यांनी सजवतात. सर्वात शेवटी मुहूर्तावर मुखवट्याची धडावर प्रतिष्ठा करतात. उभ्या लक्ष्म्या अत्यन्त काळजीपूर्वक रीतीने नियमानुसार, प्रत्येक कृती नेटकेपणाने करून उभ्या करतात. जराशी जरी त्रुटी राहिली वा पडझड झाली तर लक्ष्म्या रुसून निघून जातात. घरात अनिष्ट घडते वा घरातील सुबत्ता लयाला जाते असे भय लक्ष्म्या मांडताना मनात असते.
 लक्ष्म्या मांडण्यासाठी साड्यांची मंडपी तयार करतात. समोर साड्यांचे, शोभेच्या वस्तू वापरून मखर तयार करतात. उजवीकडे ज्येष्ठा आणि डावीकडे कनिष्ठा उभ्या करतात. समोर धान्याच्या राशी घालतात. काहींकड़े ज्येष्ठेसमोर तांदळाची तर कनिष्ठेसमोर गव्हाची रास घालतात. ब्राह्मणेत्तर समाजात पाच धान्य डाळींच्या राशी मांडतात. लक्ष्म्यांसमोर पिलावळ असते. त्यात एक मुलगी व एक मुलगा असतो. सुरूवातीस मोठी सून मुलाचा मुखवटा घेऊन येते. नवसानंतर मुले वाढवतात. मुलींचेही मुखवटे असतात. गौरी वा लक्ष्क्ष्या ज्या डब्यांवर वा सुगड्यांवर बसवतात त्यांत करंज्या, अनारसे, लाडू असे फराळाचे भरतात. समोर चौक असतो. काहींच्या कडे तो अनारशांचा तर काहींकडे नागवेलीच्या पानांचा अशी विविधता असते. त्यातच धान्याच्या राशी मांडतात. मंडपीच्यावर पापड्यांचा वा फराळाचा फुलवरा करून बांधतात. काही घरांतून धान्याच्या भरलेल्या कोठ्यांवर लक्ष्म्याचे मुखवटे बसवतात. यातून धान्य आणि लक्ष्मी यांतील अनुबंध लक्षात येतो.
 लक्ष्मी आली सोन्यांच्या पावलांनी -
 सर्व सजावट झाल्यावर लक्ष्म्यांचे मुखवटे सुपात ठेवतात. त्यावर रेशमी कोरे वस्त्र ठेवतात. तुळशीसमोर सूप ठेवतात. तिथून पुढील दाराने त्या घरात येतात. एक जण घंटा वाजवीत पुढे असते. लक्ष्मीची पावले पुढील दरवाज्यापासून घरापर्यंत, घराच्या मध्ये जिथे लक्ष्मी जाते तेथे रेखतात. त्यावर हळदकुंकू भरतात. ती प्रथम देवघरात जाते. तिथून दोघी मंडपीत येतात. तिथे त्यांची प्रतिष्ठा झाल्यावर घरात येताना मंत्र म्हटला जातो तो असा -

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली

 सर्वाना आनंदाचे प्रतीक म्हणून साखर वाटली जाते. लक्ष्म्यांच्या डोक्यावर पडवळ, भोपळा वा केवडा ठेवतात. देशमुख समाजात काही घरांतून त्यांना मूळ पाठविले जाते. मूळ पाठविताना गोड दशम्या, गुळाचा खडा तुळशीसमोर बांधून ठेवतात. तिथून लक्ष्म्या घरात येतात. सूप हे समृद्धीचे आणि शुद्धीचे प्रतीक आहेच. मूळ पाठविताना हळदकुंकवाच्या पुड्या, खोबऱ्याची वाटी शिदोरीत ठेवतात.
 लक्ष्मी घरभर हिंडते, अंगण, ओसरी,माडी, गुरांचा गोठा सगळीकडे जाते.

लक्ष्मीबाई आली आली
वसरी चढून माडी गेली
भक्ताला हाक दिली
लक्ष्मीबाई आली आली

 लक्ष्म्या जेवतात त्या दिवशी -
 लक्ष्मी सायंकाळी येते. त्या रात्री तिला भाजीभाकरी आणि ठेच्याचा नैवेद्य असतो. अनेक शेतकरी घरांतून ज्वारी बाजरीच्या मिसळ पिठाची भाकरी व ठेचा करतात.

सरीला सरावन भादवा आनंदाचा
आशा पाठमोरी मुऱ्हाळी सुखाचा...
पाऊस पडला चिकूल झाला
वहात आली गंगा...
पेरिला मका धान्य लाल तूरी
पावनीला वाढा भाजी ठेचा भाकरी....

 दुसरा दिवस सर्वात महत्त्वाचा. लक्ष्म्या जेऊघालणे महत्त्वाचे. सर्वसाधारणपणे लक्ष्म्यांचे जेवण सायंकाळी वा दुपारनंतर असते. या दिवशी सकाळी काहींच्या घरी खिचडी, सार, भाजी व लाडू, करंज्या आदी फराळाचा एक नैवेद्य असतो. सायंकाळी पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांचे जेवण असते. पुरणावरणाचे महत्त्व असतेच. जेवणात सोळा भाज्या, सोळा चटण्या, कोशिंबिरी, कढी, भात असतो. साखरभातही करतात. ही लक्ष्मी अन्नदा, अन्नाची विपुलता देणारी म्हणून भरपूर पदार्थ करतात.

आली आली लक्ष्मी
आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते
धरला हात सोडू नको
मला आहे हौस
चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला
मूद साखरभाताची

 लक्ष्म्यांसमोर दिवे असतात. ज्वारीची उकड काढून दिवे करतात. काहींकडे कणकेचे वा पुरणाचे करतात. बहुतेक घरांतून ज्येष्ठेपुढे सोळा दिव्यांची तर कनिष्ठेपुढे आठ दिव्यांची आरती असते. ब्राह्मणेतर घरांतून दोघीपुढे सारख्याच पोळ्यांचा, ५ वा ८ पोळ्यांचा नैवेद्य असतो. कुसुमताई देशमुख, औरंगाबाद यांच्या घरी ज्येष्ठेपुढे दोन आणि कनिष्ठेपुढे १ पोळीचा नैवेद्य असतो. काही घरांतून आंबिल करतातच. ज्वारी हे मराठवाड्यातील महत्त्वाचे धान्य. त्याचे पीठ शिजवून ते ताकाला लावतात. मीठ लसूण वाटून त्यात घालतात. शेतीशी संबंधित विधींत आंबिल करण्याची प्रथा आहे. आंबिल अतिशय चविष्ट असते.
 पोवते ऊर्फ दोरे घेणे -
 लक्ष्म्यांची आरती करताना दुसऱ्या दिवशी दोरा हळदीच्या पाण्यात भिजवून त्याचे १६ पदरी व ८ पदरी पोवते तयार करतात. ते लक्ष्म्यांना वाहतात. १६ पदरी पोवते लक्ष्म्यांना व ८ पदरी पुढील मुलांना वाहतात. घरात जेवढी माणसे तेवढे पोवते तयार करतात. त्याला गाठी देतात. ते तिसऱ्या दिवशी गळ्यात घालतात. मराठा समाजात दोरे गळ्यात धालीत नाहीत. दुसरे दिवशी हळदकुंकवाच्या पाण्यात हात उमटवून ते घरभर उमटवतात. त्या पाण्यात १६, ११, ९, ७, ५ पदरी दोरे बुडवून पोवते तयार करतात. दोघींच्या नावे करतात. पैकी एक समोरील पिलाच्या डोक्यावर, तर उरलेले चार लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवतात. दुसऱ्या दिवशी या पोवत्यांना गाठी मारतात. त्या गाठीत पुढील वस्तूंचा तुकडा बांधतात. खारीक, लवंग, हळदकुंकू, धोतऱ्याचे फूल, नागवेलीचे पान, हरळी, आखाडा, झेंडूचे पान, रेशीम धागा, घोंगडीचा धागा, ते दोरे लक्ष्म्यांपुढील धान्याच्या राशीत पुरतात. तिसरे दिवशी सकाळी हळदीकुंकू वाहताना तेदोरे बाहेर काढतात. लक्ष्म्यांची ओटी भरतात. ते दोरे, निर्माल्य आदी शेतात नेऊन पुरतात. उरलेले अन्न दुसऱ्यास देत नाहीत. ते शेतात नेऊन पुरतात. भूमीची सुफलनशक्ती वाढावी या साठीचा हा विधी (Ritual) असावा. हा रिवाज काटेकोरपणे पाळला जातो.
 जेवणाच्या दिवशी घरच्या लक्ष्म्यांना सन्मान -
 जेवणाच्या दिवशी ब्राह्मण समाजात सवाष्णीला जेवणाचे निमंत्रण असते. तिला सन्मानाने जेवू घातले जाते. खणानारळाने ओटी भरतात. दक्षिणा देतात. अनेक ब्राह्मण घरांतून दोन सवाष्णी जेवणास आमंत्रित करतात. पैकी एक ब्राह्मण तर दुसरी मराठा वा माळी समाजातील असते. ती शेतकरी समाजातील म्हणून सन्मानित केली जाते. मराठा समाजातील स्त्री या सणासाठी सवाष्ण म्हणून जाण्यात सन्मान मानीत असे.
 मात्र ब्राह्मणेतर समाजात (सोनार, मराठा आदी) या दिवशी घरातील स्त्रिया प्रथम जेवतात. नंतर पुरुष जेवतात. कामाच्या रेट्यामुळे सर्व महिला आधी जेवू शकल्या नाहीत तर घरातील एक सून आधी जेवते. मग मुलेबाळे पुरुष जेवतात. लक्ष्म्या घरात आणताना अक्षत टाकीत आणतात. सवाष्णीला अक्षत टाकून कुंकू लावतात.
 सुगड्याचे मुखवटे तयार करण्याची रीत -
 खास काळी सुगडी आणून त्यावर बेलाची पाने घासून मऊ करतात. शिरगोळ्याच्या सहाणेवर हळकुंड उगाळून रंग तयार करतात. हिंगुळाचा लाल रंग घेतात. सुगड्यावर नाक डोळे काढून मुखवटा तयार करतात. त्याला सजवतात. एकावर एक चारपाच घागरी वा मडकी मांडून त्यावर मुखवटा बसवतात.
 अमराठी घरांतूनही लक्ष्म्या उभ्या करतात -
 श्री. श्रीनिवास लोहिया , मुक्काम पाटोदा, जि. बीड यांचे शेत नांगरते वेळी लक्ष्मीचा मुखवटा सापडला. तेव्हापासून त्यांच्या घरी लक्ष्म्या बसवितात. काही घरांतून नवसाद्वारे मागून घेतात. रेड्डी समाज तेलंगणातला. अनेक कुटुंबे मराठवाड्यात स्थिर झाली. हा समाज विशेष करून स्त्रिया शेतात अपार कष्ट करतात. अनेक धरी धान्यराशींची पूजा होते. रेड्डी समाजाचे श्री. प्रशांत बडगिरे यांची आई धुणे धुण्यास नदीवर गेली असता मुखवटा सापडला. त्यांच्या घरीही लक्ष्म्या उभ्या मांडतात. कोमटी, मारवाडी, रेड्डी, वडार या समाजातही लक्ष्म्या मांडतात. महाराष्ट्रात स्थायिक झालेले लिंगायत, गुरव समाज लक्ष्म्या बसवतात.
 याकाळात जर घरच्या कर्त्या स्त्रीची मासिक पाळी असेल तर नवरात्राच्या सप्तमीस त्यांची मांडणी केली जाते. हा सण सुना ठेवीत नाहीत. घरात अघटित घडले तर त्या हिवाळून टाकतात. त्या शेतात पुरून टाकतात. १९९३ साली लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत भूकंप झाला तो याच काळात. अनंत चतुर्दशी होती. घरातील कर्ते पुरुष भूकंपात गाडले गेले. अशा घरात नवी सून येईपर्यंत लक्ष्म्या मांडीत नाहीत. पत्नी मरण पावली तर नवी लक्ष्मी.... नवी पत्नी घरात आणून लक्ष्म्या मांडल्या जातात.
 लक्ष्म्या मांडल्या जातात -
 नवमीला सकाळी शेवायाची खीर आणि मुरुड कानोल्याचा नैवेद्य असतो. पूजा करून गाठी घेतात. संध्याकाळी हळदीकुंकू असते. लक्ष्म्यांसमोरची आरास देखणी असते. ती पाहण्यासाठी रात्री नऊपर्यंत महिला घरोघर हळदीकुंकवाला जातात. पाठवणीसाठी मुरुड कानोले करतात. कारण तिने मागे मुरडून नेहमीच घरावर लक्ष द्यावे. घरात शेताभातात समृद्धी नांदावी.

आली आली लक्ष्मीबाई
आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते
धरला हात सोडू नको....

 शेतकरी कुटुंबात तिला निरोप देताना ओटी भरतात. दशम्यांची शिदोरी बांधून देतात. घंटा वाजवीत तिला तुळशीपर्यंत पोहोचवतात. रात्री मुखवटे उतरवून नीट ठेवतात. सजावट, मांडणी आवरून ठेवतात.
 मातंग चर्मकार समाजातही लक्ष्म्या -
 हा सण महाराष्ट्रातील अठरापगड जातिजमातीत एकाच उत्साहाने आणि श्रद्धेने पाळला जातो. लक्ष्म्या उभ्या करणे, राशींची पूजा, पुरणावरणाचा व १६ भाज्या चटण्यांचा नैवेद्य, फराळाचे जिन्नस आदी सर्व बाबी समान पद्धतीने पाळल्या जातात. मांग समाजात लक्ष्म्या श्रद्धापूर्वक आणि विधिपूर्वक मांडल्या जातात. महार समाजातही लक्ष्म्या मांडल्या जात. मात्र नवबौद्ध धर्म स्वीकारल्यावर अनेकांनी हिंदू सण त्यागले. त्यात लक्ष्म्याही आल्या. मात्र ज्यांचा उदरनिर्वाह स्वतःच्या शेतीवर आहे. अशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी धान्याच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. लक्ष्म्यांची मांडणी धनधान्याच्या समृद्धीसाठी, जमिनीची सुफलनशक्ती भरारून वाढावी यासाठी असतो. हा कल्पनाबंध शेतकरी समाजाच्या मनात रुजल्यामुळे हा सण त्यागणे मनाला डाचते. प्रतीकात्मक पद्धतीने श्रद्धा व्यक्त केल्या जातातच.
 राणी सावरगावचे आश्चर्य -
 राणी सावरंगावच्या रेणुकेचे पुजारी श्री. सावरगावकर यांच्याकडील लक्ष्भ्यांपुढे पिलावळीत दोनही मुली आहेत. पिलावळीत मुलगे वा एक मुलगा व एक मुलगी असते. दोनही मुलीच असणे व मुलगा नसणे हे एक आश्चर्यच आहे. हे मंदिर रेणुकेचे आहे.
 दैवतशास्त्र असे सांगते की ग्रामदेवता सर्वात प्राचीन असतात. त्या कृषिदेवतांतून निर्माण झाल्या. त्यांच्या घडीव मूर्ती नसतात. तर तांदळे असतात. दगड असतात. त्यांच्या सहचराचे ठाणे त्यांच्यापासून दूर असते. त्या स्वयंभू, स्वप्रतिष्ठित असतात. काळाच्या प्रवाहात त्यांचे उन्नयन करण्याच्या मानसिकतेतून देवळे बांधली वा मूर्ती बसविल्या. जुन्या परंपरांचे अवशेष वा संकेत अशा वेगळेपणातून व्यक्त होत असतील का?
 असेही वेगळेपण -
 कमलताई तांबे (१९९२ साली वय ८१) यांचे माहेर धारवाड तर सासर सांगली. यांच्याकडे श्रावणातील पहिल्या शुक्रवारी तांब्याच्या लोट्यावर हळदकुंकवाने चन्द्रसूर्य, जिवतीचा पाळणा अशी चित्रे काढतात. तांब्यात तांदूळ, हळकुंड, सुपारी हळदकुंकवाच्या पुड्या, बांगड्या पैसा या वस्तू ठेवतात. गंध उगाळण्याची सहाण त्यावर ठेवून त्यावर गौरीचा चेहरा रेखतात. काजळकुंकू लावतात. पुरणावरणाचा नैवेद्य करून सवाष्णीस जेवू घालतात. देवीची आरती केल्यावर घरातील लेकरांना ओवाळतात, दर शुक्रवारी सवाष्ण जेवू घालतात.
 श्रावणात शुक्रवारी मांडलेली गौर म्हणजे ज्येष्ठा, जिवती-विघ्नहारी देवी असावी. महाराष्ट्रात श्रावण शुक्रवारी मुलाबाळांच्या आरोग्यासाठी जिवतीचा पूजा केली जातेच. भाद्रपद शुद्ध सप्तमीस येणाऱ्या गौरीबरोबर नवमीस हिचेही विसर्जन होते. कोकण, कोल्हापूर भागात खड्याच्या वा तेरड्याच्या झाडांच्या गौरी मांडतात. कोकणात वा सांगली कोल्हापूर भागात या विविधरंगी फुलांना गौरीची फुले असेच नाव आहे. सप्तमीच्या दिवशी नदी वा पाणवठ्यावर एखाद्या कुमारिकेला घेऊन जातात. तिथून सातखडे पाण्यात धुऊन ताम्हणात ठेवून ते पुढील दाराने घराजवळ आणतात. त्या कुमारिकेचे दूध, पाण्याने पाय धुतात. तिला ओवाळतात. घराच्या दिशेने, घरात हळदीकुंकवाची पावले रेखतात. त्या पावलांवर पाऊल ठेवून कुमारिका घरभर हिंडते. घरातील प्रमुख स्त्री त्या कुमारिकेला विचारते 'इथे काय आहे?' ती उत्तरते 'इथे उदंड आहे' शेवटी मुलगी देवघरात जाते. या खड्यांच्या गौरीची प्रतिष्ठा, तांब्याच्या गौरीजवळ केली जाते.
 तेरड्याच्या.... गौरीफुलांच्या लक्ष्म्या -
 कोल्हापूर भागात तेरड्याच्या झाडांच्या लक्ष्म्या मांडतात. महालक्ष्मी उभी करतात. तिच्या शेजारी गणपती ठेवतात, अष्टमीला दुसरे दिवशी अनेक जणींच्या अंगात येते. अंगात आलेली बाई जिच्या ओटीत गणपती टाकील तिला मूल होते अशी श्रद्धा आहे. या परिसरात नवमीला सकाळीच लक्ष्मी उठते. जमलेल्या महिला एकमेकींची गहू आणि काकडीने ओटी भरतात.
 चान्द्रसेनीय कायस्थ प्रभू समाजात दुर्वा वा तेरड्याच्या झाडांच्या गौरी असतात. परसातली तेरड्याची झाडे काढून ती सुपात ठेवतात. त्यावर खण वा रेशमी सोवळे पांघरतात. पुढील दाराने गौरी म्हणून घरात आणतात. प्रवेश दारात पाट मांडून त्यावर गौरीचे सूप ठेवतात. तिथे तिची पूजा होते. नथ, एकसरी, बांगड्या वगैरे दागिने त्यावर ठेवतात. घरातील प्रमुख स्त्री गौरीचे सूप हातात घेऊन घराच्या प्रत्येक खोलीत जाते. तिला एक जण विचारते.
  'गौर कुठे आली?'
 त्या खोलीचे वर्णन करून 'गौर अमक्या खोलीत आली' असे उत्तर स्त्री देते. गौर ओसरीत मांडतात. रात्री तिला दूधभात, माठाच्या भाजीचा नैवेद्य असतो. दुसरे दिवशी मोठी पूजा असते. सुपात नारळ, सुपारी, हळकुंड आदी ठेवून सूप गौरीला वाहतात. या दिवशी गौरीला घावन घाटल्याचा नैवेद्य असतो. सीकेपी लोकांकडे मटनवडे करतात. गौरींच्या सणाला माहेरवाशीण घरी येते. तिला देवीला वाहिलेले सूप खणासकट देतात. गौरी घरी येतात त्या रात्री तेरड्याची झाडे मोडून त्यांची देवी तयार करून तिला साडी, दागिन्यांनी सजवतात. कागदाचा मुखवटा करून वर बसवतात. नवमीला सायंकाळी गौर नदीला नेऊन सोडतात. महाराष्ट्र मराठवाड्यात लक्ष्म्यांना मुलीस माहेरी आणत नाहीत.
 कोकणांतील गौराई -
 कोकणवासीयांचा लाडका सण म्हणजे गौरीगणपतीचा. मुंबईत आलेले कोकणवासी गौरीगणपतीला कोकणात जाणारच. कोकणाचा शेतकरी कवळकाळी, पालापाचोळा वगैरे जाळून राब करतो. गुडघाभर चिखलात नांगरणी करून भात नागलीची लावणी व पेरणी करतो. श्रावणापर्यंत ही कामे संपतात आणि गौरी गणपतीची तयारी सुरू होते. गणपती आल्यापासून रोज रात्री गाणी, नृत्य, फुगड्या, लेझीम यांची सामूहिक धमाल असते. कोकणातील अनेक घरी खड्यांच्या गौरी असतात. गौरीच्या जेवणाला 'गौरी हसवणे' असे म्हणतात. गौरीची विपुल गाणी खेड्या खेड्यांतून वस्तीवस्तीतून मुली, स्त्रिया गातात. झिम्मा, फुगड्या, उखाणे यांना ऊत येतो. माहेर दुबळे असले तरी स्त्रीला तिथली ममतेची, मायेची श्रीमंती अधिक प्रिय असते. गौरीचे माहेरही दुबळे आहे. ती शंकराला विनवते.

चिव्याच्या हंसा देतो माझा बंधु
जाईन मी दुबळ्या माहेरा
श्रावण संपला भादवा आला
शिवशंकरा जाऊ द्या मला माहेरा

शंकर म्हणतो -

सोन्याचा नारळ देतो
नको तू जाऊ दुबळ्या माहेरा
नारळीचा नारळ देतो माझा बंधु
जाईन मी दुबळ्या माहेरा

 सोन्याच्या नारळापेक्षा नारळीच्या झाडाचा, ममतेचा पाण्याने भरलेला, आपुलकीच्या गोड गराने रुचकर असा नारळ अधिक अस्सल असतो ना ?
 स्त्रियांना पर्यावरणाची जाण मुळात असते -
 गौरी वा लक्ष्म्यांच्या गाण्यांतून स्त्रियांच्यात निसर्गाबद्दल विशेष करून पर्यावरणाबद्दल असलेली स्वयंभू जाणीव व्यक्त होते. जीव जन्माला घालताना सोसाव्या लागणाऱ्या वेदना आणि तो जीव बीजापासून परिपक्व होऊन पूर्णावस्थेत येण्यासाठी लागणारा काळ, त्यासाठी त्याचे स्वतःचे रक्त, श्वास, अन्न यातून करावे लागणारे पोषण या गोष्टींचा तिला प्रत्यक्ष अनुभव असतो. म्हणूनच ती सोन्याच्या नारळावर वा पोफळीवर भाळत नाही. शेताच्या बांधाने फिरताना तिला पिकांची जिवंत सळसळ जमिनीशी बांधून ठेवते. जणु तिचे या विश्वाशी अतूट आणि जिवंत नाते असते. ते गाण्यांतून जाणवते.

आज गौरी जाशील ती कधी गौरी येशील?
पाऊस पडे, गंगा भरे येईन मी भादव्यात ....
पडवळीच्या फुलावरनं येईन मी तळपत
पाच पडवळं काढा माझ्या हौशाकरवी ....

 वऱ्हाडातल्या महालक्ष्म्यांचे वेगळेपण -
 वऱ्हाडातही महालक्ष्म्या बसवणे हा वाक्प्रचार आहे. महालक्ष्म्यांच्या डोक्यावर १६ पदरी पोवती आणि मुलांसाठी ८ पदरी पोवती हळदीमध्ये भिजवून ठेवतात. दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्या सुतवतात. सुतवणे म्हणजे एकत्र बांधणे. महालक्ष्म्या आठआठ पदरांनी तर मुले चारचार पदरांनी सुतवतात. डाळीचे वडे, कचोरी, बोंडे असे तळणाचे सोळा प्रकार करतात. कथली म्हणजे पडवळ टाकून कढी करतात. आंबिल आणि पुरणपोळी हे मुख्य पदार्थ असतात.
 वऱ्हाडात भाद्रपद, आश्विनात गौरीची पूजा विविध प्रकारांनी होते. इनाई, भराडी गौर, भुलाबाई हे कुमारिकांचे वा नवविवाहितांचे खेळोत्सव वऱ्हाडात उत्साहाने साजरे होतात. भुलाबाईशी सारखेपणा असलेला हादगा भोंडला पश्चिम महाराष्ट्रात खेळला जातो. तर खानदेशात भुलाबाई मांडली जाते. या चारही खेळोत्सवाचा विचार स्वतंत्रपणे मांडला आहे.
 वऱ्हाडातही लक्ष्म्यांची तयारी साग्रसंगीत होते. कनिष्ठा पूर्वेकडील दारातून येते. ती विचारते मी आत येऊ? दारातील सुवासिनी तिला 'यावे यावे' असे म्हणत घरात नेतात. जणु साक्षात् लक्ष्मी म्हणते मी येऊ का ? लक्ष्मीच्या रूपाने चैतन्यच विचारते की मी येऊ का ? जणु हा चैतन्याच्या स्वागताचा सोहळा असतो. दोन्ही महालक्ष्म्या माप ओलांडून त्यांच्या जागी विराजमान होतात, रात्री या दोन्ही जगन्मातांना सुतवतात. प्रा. वामन चोरघडे यासंदर्भात नोंदवितात की पूर्वी हाताने काढलेल्या सुताने सुतवणे होई.
 स्त्रिया महालक्ष्मीसाठी सूतबिंडा करून ठेवत. कापूस पिंजून सुरेख सूत काढण्याची, त्याच्या तऱ्हेतऱ्हेने वाती करण्याची कला त्यांच्याजवळ होती. वऱ्हाडातही १६ भाज्या, १६ पक्वान्ने जेवणात नैवेद्य म्हणून करतात. पूजेसाठी १६ प्रकारची पत्री लागतात.
 गौरी वा महालक्ष्म्यांच्या सणात सोळा या आकड्याचे महत्त्व -
 या सणात १६ आकड्याला विशेष महत्त्व आहे.ज्यांच्याकडे हा सण साजरा होतो त्यांना या संदर्भात विचारले असता वडिलोपर्जित चालत आलेली परंपरा हे उत्तर मिळते. भारतीय संस्कृति कोशातील या शब्दाला आधार देणारे विवेचन असे ज्यांची व्रतपूर्वक पूजा केली जाते. त्या चन्द्राच्या सोळा कळा या प्रमाणे आहेत.
१. शंखिनी २. पद्मिनी ३. लक्ष्मी ४. कामिनी
५.व्यपिनी ६.ऐश्वर्यवर्धिनी ७.मोंदा ८. आश्चर्यदा
९. आल्हादिनी १०.व्यापिनी ११. मोहिनी १२. प्रभाप्रदा
१३. क्षीरवर्धिनी १४.वेगवर्धिनी १५.विकासिनी १६. सौमिनी

 आपण लक्ष्मी पार्वतीला बोलावतो त्या आपल्या परिवारासह येतात म्हणून १६ चा महिमा असावा. २७ नक्षत्रांपैकी १६ नक्षत्रे संपूर्ण १७ वे नक्षत्र अनुराधा. या मोसमात पिके घराला येतात. शेतातील धान्यलक्ष्मी घरी येऊ लागते. भाज्या फळभाज्यांची रेलचेल असते. जणु १६ नक्षत्रांचे फलित म्हणजे धान्यलक्ष्मी. म्हणून 'सोळा' या आकड्याला महत्त्व.
 १६ पक्वान्ने, १६ भाज्या, १६ पत्री या कुलाचारासाठी असतात. मात्र महत्त्वाचे पदार्थ वऱ्हाडात आंबिल व कथली असतात. प्रा. वामनराव चोरघडे म्हणतात. हा सण बहुजन समाजाचा असल्यामुळे आंबिल आणि कथलीशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. आंबिल ज्वारीचे पीठ शिजवून करतात तर कथली म्हणजे पडवळ घालून केलेली कढी. जे सहज उपलब्ध होते ते मनोभावे रांधून घातले तर ही महालक्ष्मी गरिबाला पावते. मनोमन तृप्त होते.
 तिसऱ्या दिवशी रात्री उत्तरपूजा करून दहीभाताचा आणि लक्ष्म्यांनी मुरडून यावे म्हणून कानोल्याचा नैवेद्य पुढे ठेवायचा. आता घर सुने होणार म्हणून भरल्या डोळ्यांनी लक्ष्म्यांच्या डोक्यावर अक्षत टाकून 'पुनरागमनायच' असे म्हणत मुखवटे उतरवायचे.
 खानदेशातली कानबाई -
 वऱ्हाड कोकण, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर या भागात गौरी महालक्ष्मीचा थाट तसा खानदेशात कानबाईचा डौल असतो. कानबाई श्रावणातच दीड दिवसाच्या माहेरपणाला येते. ती महादेवी पार्वतीचे रूप मानले जाते. श्रावण महिन्यात नागपंचमीनंतरच्या रविवारी १४कानबाईची स्थापना करतात. कानबाईचेही धातूचे वा लाकडी मुखवटे असतात. धुळ्याचे जुने जाणते अभ्यासक श्री. भा. रं, कुळकर्णीच्या मते कानबाई म्हणजे वेदात उल्लेख असलेली रण्णासण्णा देवता असावी. कानबाईची गाणी म्हणणारे शाहीर वा भाट असतात. कानबाईची गाणी हिंदोळ्यावर बसून स्त्रिया गातात. कानबाई ही साक्षात लक्ष्मी आहे मानले जाते. या काळात सुनेला घरी आणतात. कानबाईचे रोट शेतातील हिरव्या पोकळ्याची हिरवी पालेभाजी व इतर पालेभाज्या आणून त्याचा तेल तूप न घालता करतात. हे रोट कानबाईची स्थापना करण्यापूर्वी करतात. हा रोट सव्वापाव सव्वा किलो अशा मापाने असतो. असा हा रोट दुपार पर्यन्त घरातील सर्वांनी संपवायचा असतो. हा कोरडा रोट व भाजी संपल्यावर कानबाईची स्थापना होते. नंतर पुरणाचे रोट करतात. पुरणपोळ्या करून दोन मोठे दिवे एक कानबाईसाठी व एक घरातील सर्वांना प्रसादासाठी करतात. घरातील सर्व स्वयंपाक सायंकाळी कानबाईसमोर ठेवतात. नैवेद्य दाखवून घरातील सर्व मंडळी एकाच वेळी जेवायला बसतात. पाहुण्यांसाठी वेगळा स्वयंपाक करावा लागतो. पुरणाचा रोट फक्त घरच्यांनीच खायचा असतो. कानबाई समोरचा दिवा वाढवू नये म्हणून सतत काळजी घेतली जाते. कानबाईचा हा सण देशावरील महालक्ष्म्या व कोकण कोल्हापुराकडील गौरींसारखा आहे. कानबाई ही लक्ष्मीचे रूप असते.
 दिवा सुफलीकरणाचे प्रतीक -
 महालक्ष्मी, कानबाई, गौरी, नवरात्र या कुलाचारात सतत तेवत्या दिव्याला अपार महत्त्व असते. दिवा हे सुफलीकरणाचे प्रतीक मानले जाते. घरातील प्रमुख स्त्री हा दिवा सतत तेवत राहावा यासाठी सतत जागरूक असते. दिवा जणु साक्षात चैतन्य आणि जमिनीतील उर्वराशक्ती उत्तम पिकांच्या रूपाने तिच्यातील चैतन्याची साक्ष देत असते. कानबाईची प्रतिष्ठा रविवारी होते. या देवीचे साम्य वेदकालीन रण्णासण्णाशी जाणवते. आदितवारी पौष महिन्यात आदित्यराणूबाईची पूजा केली जाते. त्यावरून या व्रताचा संबंध सूर्याशी असावा असे मानले जाते.
 श्रावण भाद्रपदातील देवीव्रते धान्यसमृद्धीसाठी असतात. त्यात स्त्रीच्या मातृत्वाची, सुफलनशक्तीची उपासना असते. अपत्यसंभव, अपत्याचे पोषण, पर्यायाने मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाची सुरक्षितता देण्याची हमी मातृत्वात असल्याने, जगातील सर्व प्राचीन संस्कृतीतील आद्य देवता या स्त्री देवता आहेत. भूमी अन्नधान्याची निर्मिती करून, वनस्पतींची निर्मिती करून सृष्टीतील मानव समूहाच्या शारीरिक, मानसिक बौद्धिक विकासाची आणि सुरक्षिततेची हमी देते. भूमीचे रूप स्त्री देवतांत आद्य मानवाने पाहिले.
 स्त्रीची विविध रूपे : महालक्ष्मीत.... देवीरूपात -
 अशी श्रद्धा आहे की महालक्ष्मीचे रूप सकाळी कुमारिकेचे दुपारी सुवासिनीचे तर सायंकाळी प्रौढेचे होते. कर्नाटकातील १५यल्लम्मा चैत्री पौर्णिमेला सुवासिनी होते, तर मार्गशीर्ष अमावास्येला विधवा होते.
 चैत्रात वसंतऋतूची चाहूल लागते. फुलांना बहार येतो. झाडांना कोवळी पाने फुटू लागतात. चैत्र पाडव्याला शेतीत काम करणाऱ्या सालदारांचे वर्ष सुरू होते. वैशाख ज्येष्ठात जमीन भाजली जाते. या भाजण्यातून तिची उर्वराशक्ती वाढते. पेरणीसाठी जमिनीची मशागत याच काळात शेतकरी करतो. मृगाचा, वळिवाचा पाऊस पडला की पेरणी करतो. भाद्रपद, आश्विनात पीक परिपक्व होते. कार्तिक मार्गशीर्षात ते हाती येते. मार्गशीर्षात पानगळ सुरू होते. थंडीने जणु अवधी सृष्टी काकडून जाते. तीन महिन्यांचा काळ पौष, माघ व फाल्गुन हा काळ सृष्टीच्या भूमीच्या दृष्टीने वैधव्याचा, भाग्यहीनतेचा वाटला असेल का?
 आपले सण, व्रते, उत्सव, दैवत कल्पना भूमीशी किती जोडलेली आहेत याची जाणीव तसेच आपल्या सांस्कृतिक वैभवाची संपन्नता या व्रतांमागील भूमिकेतून आपल्या लक्षात येते.
 सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता : शिवशक्तीच्या स्वंतत्र अस्तित्वात आणि एकरूपतेत -
 स्त्रीतील सर्जन सामर्थ्यांचे गूढ तिच्या योनीत आहे हे जाणल्यावर योनिपूजा रुढ झाली. पुरुषलिंगातील सर्जन सामर्थ्याचे ज्ञान झाल्यावर लिंगपूजा श्रद्धेय झाली. जगभरच्या अति प्राचीन संस्कृतीत लिंगयोनिपूजा रुढ होती. मोहंजोदारोच्या उत्खनात सापडलेल्या योनी मूर्ती सुफलीकरणाच्या देवता होत्या. भारतात आर्य येण्यापूर्वी एतद्देशीय आर्येत्तर समाज सुफलीकरणाच्या देवता म्हणून योनी व लिंगपूजक होता. त्यांना आर्य हेटाळणीने शिश्नपूजक असे म्हणत. आर्य आणि आर्येतरांच्या संघर्षातून, देवाणघेवाणीच्या प्रक्रियेतून आर्यांचा रूद्र आणि आर्येतरांचा शिश्नदेव यांच्या संकरातून शिवशंकर अस्तित्वात आला. महादेवी, भूदेवी, लक्ष्मी या देवता योनिपूजेच्या उन्नयनातून अस्तित्वात आल्या. शंकराची सहचारिणी गौरी. ती महादेवी भूदेवीचे रूप. महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्ताने गायिल्या जाणाऱ्या गाण्यांत ओव्यांत तिचा सहचर म्हणून शंकराचा उल्लेख आहे. कारण ही महालक्ष्मी म्हणजे गणपतीची आई, महादेवी गौरी ऊर्फ पार्वती आहे. मात्र या शंकराच्या सहचारिणीचे अस्तित्व सहचराइतकेच स्वतंत्र आणि स्वयंभू आहे. शिवलिंग आणि योनी विश्वसर्जनाचे महालय आहे. शिवात शक्ती आहे तर शक्तीत शिव समाविष्ट आहे. सृष्टीजीवनाची सुफल संपूर्णता त्यांच्या एकरूपत्वात आहे आणि याचा प्रत्यय धरणीच्या सुफलीकरणाशी निगडित व्रतसण, उत्सवांतून पदोपदी जाणवतो.

एषा भगवती देवी सर्वेषां कारणं हि नः ।
महाविद्या महामाया पूर्ण प्रकृतिर् व्यया !!

असे पोथीपुराणांतून म्हटले आहे ते तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचा प्रत्यय येतो म्हणून.
 कुलस्वामिनींच्या मंदिरांचे वेगळेपण -
 कुलस्वामिनींची मूळ ठाणी वा मंदिरे वा शक्तिपीठे यांच्या बाह्य स्वरूपात आजवर बरेच बदल झाले तरी एक अत्यन्त महत्त्वाची गोष्ट कायम आहे. लोकसाहित्य आणि लोकपरंपरांच्या चिकित्सक अभ्यासक डॉ. तारा भवाळकर 'लोकसंचित' मध्ये नोंदवतात. सर्व आदिशक्तिपीठे ही फक्त स्त्रीदेवतांतीच मंदिरे आहेत. कोणताही पुरुषदेव वा सहचर त्यांच्या शेजारी नाही. पुरुष देव असला तर तो काही अंतरावर दूर स्वतंत्रपणे उभा आहे. स्त्रीदेवता स्वंतत्र आहे आणि तरीही ती माता आहे. आई आहे आणि पुरुषदेवनिरपेक्ष असलेले तिचे हे मातृरूप पूजनीय आहे. यातला गूढार्थ अत्यन्त क्रान्तिकारक असा आहे.
 मानवाने स्त्रीरूप आणि भूमिरूप परस्पर रूपात पाहिले. स्त्रीरूपाच्या विविध अवस्था कुमारिकेपासून वृद्धेपर्यंत त्याला लक्ष्मीरूपीच वाटल्या.
 मनुष्य हा मूलतः प्राणीच.'आहार निद्रा भय मैथुनंच' यामूलभूत प्रेरणा त्यालाही असतातच. संस्कृतीच्या विकासात या मूलभूत प्रेरणांचे शमन करीत उदात्तीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निसर्गातील अनाकलनीय घटनांबद्दलचे भय आणि म्हणून त्यापासून सुरक्षितता. या दोन भावनांच्या ताण प्रतिताणांतून देवकल्पनांचा उदय झाला. स्त्रीत निर्मिती करण्याची यातुशक्ती असते, या कल्पनेतून मानवाला स्त्रीबद्दल भय वाटले. पण त्याच वेळी स्तन्य पाजणारी, बालकांची काळजी घेणारी, त्याच्यावर कोसळणाऱ्या अशुभाचा संहार करण्यासाठी जागरुक असलेली स्त्री सुरक्षितता देणारी आहे याचा प्रत्यय आला. त्यातूनच तिची विविध रूपे पूजनीय ठरली. अन्न,वस्त्र, निवारा यांसाठी सुरुवातीला निकराचा संघर्ष करावा लागे. तेव्हा स्त्रीपुरुष दोघेही समान स्थितीत होते. विविध साधनांच्या शोधांमुळे हा संघर्ष कमी होऊन त्याबाबतची शाश्वती वाढली. ज्ञानाच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावत असताना. निर्मितीत असलेल्या पुरुष सहयोगाची कल्पना त्याला आली. निर्मिती आणि नंतरची अपत्याची काळजी यात गुंतलेल्या स्त्रीला नव्या साधनांची कळ हस्तगत करणे शक्य झाले नाही: एकीकडे अन्न, वस्त्र, निवान्यासाठी मनुष्यबळ निर्माण करणारी तीच होती. त्याची गरज होतीच. यांतून स्त्रीवर स्वामित्व असेल तरच आपण सुरक्षित राहू याची जाण पुरुषाला आली आणि प्रारंभी स्त्रीच्या पूजनीय असलेल्या निखळ मातृत्वाविषयीची धारणा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्त्रीचे पुरुषनिरपेक्ष मातृत्व त्याला जाचक वाटू लागले. स्वामित्वाची संकल्पना त्यातून आली. अपत्यावर त्याच्या जन्माला कारणीभूत असलेल्या पुरुषाच्या, पित्याच्या नावाचे शिक्कामोर्तब होऊ लागले. ती स्त्री कुणाच्या स्वामित्वाखाली आहे त्याला महत्त्व आले, म्हणजेच पितृप्रधान वा पुरुषप्रधान व्यवस्था आली. देवता मंडलात पुरुषदेवांचा शिरकाव होऊन त्यांचे महत्त्व वाढले. तरीही मातृदेवांचे महत्त्व मात्र कमी झाले नाही.
 समाजातील स्त्रीभोवती पावित्र्य-अपावित्र्य, सातित्व-पातिव्रत्य या कल्पनांचे जाळे वेढले गेले. ती पुरुषाश्रयी आणि अपत्य निर्मितीचे व मैथुनसुख घेण्याचे एक साधन बनली.
 असे असले तरी बुद्धीचा विकास करणारी सरस्वती, दुष्ट व अशुभाचा संहार करणारी दुर्गा, समृद्धी देणारी लक्ष्मी, निर्मिती व पोषण करणारी धरणी, यांच्याबद्दलची श्रद्धा मानवी मनात मूळ धरून राहिली. ती या व्रतांतून जाणवते.
 ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा का आली? -
 लक्ष्म्या वा गौरीच्या कुलाचाराचा, सणाचा शोध घेताना ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचा मूळ रूपबंध पाहणे महत्त्वाचे ठरते. अमृत प्राप्तीसाठी देवासुरांनी समुद्रमंथन केले. तेव्हा समुद्रातून लक्ष्मीच्या जन्माआधी अलक्ष्मीचा जन्म झाला. समुद्रातून प्रगट होताच तिने 'किं कर्तव्यं मया?' असा प्रश्न केला त्यावर देवांनी तिला तिच्या दृष्टीने योग्य अशा अशुभ, अनिष्ट, दुःखमय अशा ठिकाणी संचार करण्यास सांगितले. हे सांगत असताना तिचा उल्लेख ज्येष्ठा, पापदारिद्र्य दायिनी, कलुषदायिनी शुभा असा केला. ती लक्ष्मीपूर्वी जन्मली म्हणून ज्येष्ठा. शुभा हे तिचे शोभन नाव. शुभा याचा अर्थ शेण असाही आहे.
 अलक्ष्मीनंतर लक्ष्मी बाहेर आली. तिच्यावर विष्णु भाळले. त्यांनी विवाहाचा प्रस्ताव मांडला. परंतु ज्येष्ठे आधी कनिष्ठेचा विवाह सन्मान्य नव्हता. म्हणून लक्ष्मीच्या आग्रहाखातर विष्णूने अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी लावला. परंतु आश्रमातील सात्विक वातावरणात तिची घुसमट होऊ लागली. तिला ते वातावरण सोसेना. तिने उद्दालकाला आपल्या आवडी निवडी सांगितल्या. त्या ऐकून उद्दालकमुनी अस्वस्थ झाला. त्याने तिला एका अश्वत्थवृक्षाखाली बसविले आणि तुझ्या योग्य जागा शोधून तुला घेऊन जातो. असे सांगून गेला तो पुन्हा आलाच नाही. पिंपळाखाली बसलेली ज्येष्ठा पतीची वाट पाहून थकली व आक्रोश करू लागली. तिचा आक्रोश ऐकून लक्ष्मी व विष्णू भेटण्यास आले. विष्णूने तिला सांगितले की तू याच झाडाखाली स्थिर हो. प्रती शनिवारी लक्ष्मी तुला भेटण्यास येईल त्या दिवशी हा वृक्ष पूज्य मानला जाईल. जे गृहस्थ तुझी नित्य पूजा करतील त्यांचे ठायी तुझी बहीण लक्ष्मी स्थिर होईल. अशीच कथा लिंग पुराणातही आहे. त्यात पतीचे नाव मात्र दुःसह आहे.
 आद्यपूजेचा मान ज्येष्ठेला का ? -
 'दुर्जनं प्रथमं वन्दे' ही मानवी प्रवृत्ती आहे. त्यातूनच विघ्नदेवतांची पूजा प्रथम करून त्यांना संतुष्ट करून त्यांनी आपल्यावर वक्रदृष्टी होऊ नये याची काळजी घेण्याची परंपरा निर्माण झाली. ज्येष्ठेचे रूप अलक्ष्मीला तिच्या विघ्नस्वरूपात लाभले आहे. बौधायनगृह्य सूक्तातील तिचे रूप 'कुंभिनी हस्तिमुखा विघ्नपार्षदा' असे आहे. हे रूप गणेशाशी जुळणारे आहे. दैवत शास्त्राचे मान्यवर अभ्यासक श्री. रा. चिं. ढेरे लिहितात श्रीसूक्तानुसार लक्ष्मी हस्तिनादप्रबोधिनी असून गजलक्ष्मीच्या रूपात आहे. गज हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे. कनिष्ठ लक्ष्मीचा सहचर म्हणून गज समृद्धीकारक ठरला. तर ज्येष्ठा अलक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी एकाच देवी संकल्पनेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. यातून दैवत कल्पनांचा विकासक्रम जाणवतो. तसेच परस्परसंबंधीची कूटे उलगडण्यास मदत होते.
 ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा दोन दिवसांची पाहुणी -
 लक्ष्म म्हणजे शुभ. शुभगुणांनी युक्त ती लक्ष्मी.
 ज्येष्ठेच्या कथाबंधानुसार 'भर्तृत्यागेन दुःखिता' अशा अलक्ष्मीकडे, ज्येष्ठेकडे कनिष्ठा लक्ष्मी येते. लक्ष्म्या घरी आणताना 'ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली' 'सोन्याच्या पावलांनी आली' असा मंत्र म्हटला जातो. पाहुणी आलेली माहेरवाशीण लक्ष्मी दोन दिवसांची पाहुणी असते. मोठ्या बहिणीकडे आलेली धाकटी बहीण माहेरवाशीण असते. लक्ष्मी दोन दिवस येते. घराघरात शेताभातात हिंडून समृद्धी देऊन स्वतःच्या घरी निघून जाते.
 लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे समाजाची पाहण्याची दृष्टी -
 लक्ष्मी या कल्पनाबंधाकडे सामाजिकदृष्ट्या... आर्थिकदृष्ट्या शेवटच्या स्तरातला समाज 'संहारक देवता' म्हणून पाहतो. तिचा कोप होऊन घरात, शेताभातात अनिष्ट होऊ नये या भूमिकेतून पूजा होते.
 मध्यमवर्गीय समाज तिच्याकडे शुद्धीची देवता म्हणून पाहतो. केरसुणीला लक्ष्मी मानले जाते. विवाह पूजा यांत सूप महत्त्वाचे असते. सूप समृद्धीचे प्रतीक. ते कचरा आणि धान्य यांना वेगळे करते. दृष्ट आणि अनिष्ट यांना वेगळे करून इष्टाकडे नेते ती लक्ष्मी. शुभा म्हणजे शेणाची गोवरी. घर गाईचे शेणाने घर सारवतात. शुद्ध करतात. गोवरीच्या धुराने घर शुद्ध होते. किडामुंगी नष्ट होतात. आर्थिकदृष्ट्या वरचा थर तिला समृद्धीची देवता मानतो. या तीनही रूपांत लक्ष्मी सर्वत्र पूजनीय असते.
 भादव्यातील समृद्धी -
 आषाढात पेरलेली पिके भाद्रपदात दाण्यात भरू लागतात. उडीद मूग, मका, भात या पिकांचा बहार शिगेला पोहोचलेला असतो. चैत्रापासून ते आषाढापर्यंत शेतकरी शेतीच्या मशागतीत, पेरणीत गुंतलेला असतो. कामात आकंठ बुडालेल्या शेतकऱ्याला श्रावणात क्षणाचा विसावा मिळतो. तरीही त्याचे मन शेतात गुंतलेले असते जणु भूमी त्याच्याशी बोलते. पुढे काय पेरायचे याचा मन कौल घेत असते. आषाढात पेरलेल्या धान्याला बरकत यावी आणि भाद्रपद अखेर आणि आश्विनात पेरावयाच्या हरभरा, करडई, गहू, ज्वारी आदी बियाणांचा पेरा उत्तम व्हावा यासाठी भूमीची सुफलनशक्ती वाढावी अशी मंगलकामना या पूजेच्या पाठीशी असते. पिकांना कीड न लागता, काही अनिष्ट न घडता उत्तम पैदास व्हावी यासाठीच्या शुभेच्छा लक्ष्म्यांच्या मांडणीतून, नैवेद्यातून व्यक्त होतात. उदा. -
 १. लक्ष्म्यांचे धड म्हणून धान्याच्या कोठ्या, घागरी, डबे यांचा वापर. त्यात फराळाचे पदार्थ भरण्याचा रिवाज.
 २. लक्ष्म्यांसमोरच्या चौकात धान्याच्या राशी घालून त्या पूजतात.
 ३. लक्ष्म्यांच्या डोक्यावर भोपळा, पडवळ, केवडा, ठेवतात. भोपळा रुंदावणारा, पडवळ लाबंणारे, दोन्ही समृद्धीदर्शक. केवडा सुगंधी. धरेचा गुणधर्म सुगंध. 'गंधवती धरा' असे म्हटले जाते.
 ४. दोन वेगळे पदार्थ एकत्र आले तर वृद्धी होते ही संकल्पना प्राचीन समाजातही होती. आदल्या सायंकाळी मिसळीची भाकरी, दुसरे दिवशी खिचडी, सार हे पदार्थ नैवेद्यात असतात. या काळात भाज्या विपुल येतात. त्यातून भरपूर भाज्या करण्याची प्रथा.
 ५. ब्राह्मण समाजात अनेक घरांतून लक्ष्भ्यांच्या जेवणाच्या दिवशी दोन सवाष्णी बोलावतात. त्यातील एक शेतकरी समाजातील असते. ही भूमीची पूजा असल्याने त्या निमित्ताने शेतात श्रमणाऱ्या स्त्रीचा लक्ष्मी म्हणून सन्मान केला जातो.
 ६. सायंकाळी येणारा पाहुणा मुक्कामाला येतो. लक्ष्मी सायंकाळी येते. पुढच्या दाराने येऊन घरात थेट गोठ्यापर्यंत फिरते.

आली आली लक्ष्मीबाई चालली गाईच्या गोठा
दिली भक्ताला हाक सोन्याचं तेच फाकं
माझी लक्ष्मीबाई....

ती जिथे जिथे फिरते तिथे तिची पावले रेखतात. पावलांचे रेखाटन सर्वसाधारणपणे असे असते.

 या तीनही आकृतीत भरलेले मापटे, त्यातील धान्य, दिवा असे संकेत मिळतात.
 ७. लक्ष्म्यांच्या पोवत्यात गाठी मारताना ज्या वस्तू बांधतात त्यांत रेशीम, घोंगडीचा लोकर, धागा, हरळी,आघाडा, धोतऱ्याचे फूल, झेंडूचे पान, लवंग, खोबर, आदींचा समावेश असतो. आघाडा, हरळी जमिनीत रुजल्या की वाढतच जातात. जमिनीचा कस वाढविणाऱ्या या वनस्पती. रेशीम आणि लोकर चिवट आणि लांबत जाणारे धागे. ८. लक्ष्म्यांचे निर्माल्य, उरलेले अन्न, पोवते शेतात नेऊन पुरतात. या जणु सुबत्तेच्या खुणा. त्या शेतात पुरून शेताची सुफलन शक्ती वाढवावी ही त्या मागची सद्भावना.
 जमीन आणि पाणी यांच्या एकरूपततेतून -
 पाणी असेल तरच जमिनीची उर्वराशक्ती सुफलित होणार. कोकणात, वऱ्हाड, खानदेशात गौर पाण्याजवळ नेऊन विसर्जित केली जाते. मराठवाड्यात मात्र मुखवटे सन्मानाने उतरवून तुळशीपर्यन्त नेतात. मराठवाडा तसा नेहमीच दुष्काळाच्या छायेखाली. त्यातही शेकडो वर्षे निझामशाहीच्या अमलाखाली असणारा भूभाग. त्यामुळे काही रीतीत फरक आहे. कोकण, वऱ्हाड, कोल्हापूर या प्रदेशातील स्त्रिया गौर मिरवीत पाण्यापर्यंत नेतात.
 ज्येष्ठाकल्पातील ज्येष्ठेचे रूप -
 विघ्न देवतांचे विश्व या टिपणांत रा.चिं.ढेरे नोंदवितात की मध्ययुगात सारा दक्षिण भारत ज्येष्ठा या विघ्न देवतेच्या उपासनेने भारलेला होता. प्राचीन तामिळ निघंटूत तिच्यासाठी मुगडी, भूदेवी, केदाई अशी नावे आहेत. तिला 'खरारुढा' मानले असून तिचे आयुध 'मार्जना' म्हणजे केरसुणी हे असे निघंटू सांगतो.
 ज्येष्ठाकल्पातील तिचे रूप पुराणकाळापेक्षाही प्राचीन आहे -

यस्यास्सिंहा रथे युक्ता व्याघ्राश्चाप्यनुगामिनः ।
तामिमां पुंडरीकाक्षी ज्येष्ठामावाह्याम्यहम ॥

 तिची कुंभी, प्रकुंभी ही नावे विश्वाचा गर्भ उदरी वाहणाऱ्या महामातृत्वाचा संकेत देणारी आहे. म्हणून तिचे उदर लांब आहे. ती विघ्नपार्षदा कपिलमुनींची पत्नी आहे. तिला श्री, वरदा, सत्या असेही म्हटले आहे. ज्येष्ठेच्या या रूपाशी आणि कार्याशी विघ्नहर्त्या विनायकाचे साम्य आहे. गणेशचतुर्थीनंतर लगेच गौरी वा लक्ष्म्यांचा सण येतो. ज्येष्ठेचा सण येतो. यांतील अनुबंध महत्त्वाचा आहे. या अनुबंधावर श्रीमती स्टेला क्रामरिश यांनी 'भारतीय महादेवी' या बृहत् लेखात अलक्ष्मी निऋक्तीच्या वर्णनप्रसंगी सूचक टीपं लिहिली आहे. ती पुढील प्रमाणे -
 The dread name of Nirrti also carried by Jyeshtha, the inauspicious, pot-bellied goddess with an elephant face whose retinue are obstacles. In this respect she prefigures Ganesa the lord and remover of obstacles. How ever, the chariot of Jyeshtha, drawn by lions and follows by tigers, is proper to the great goddess. (लोक दैवतांचे विश्व : . रा. चिं. ढेरे पान ३१).
 गणेश आणि ज्येष्ठा यांच्यातील साम्यावर श्रीमती क्रामरिश यांनी नेमके बोट ठेवले आहे.
 प्राचीन भारतातील लोकजीवनाचे वैशिष्ट्य मातृसत्ता -
 वैदिक आर्य भारतात स्थिर होण्यापूर्वी भारतात मातृसत्ताक समाज होता. विशिष्ट सामाजिक आर्थिक स्थितीत वाढलेल्या गणसमाजांचा मातृसत्ता हा विशेष होता. स्त्रियांचे उत्पादन व्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान होते.
 हळूहळू गणराज्यांचा लोप होऊन राजाला प्रमुख प्रशासक मानणारी शासन व्यवस्था अस्तित्वात आली. महाभारतकाळात ही शासन व्यवस्था स्थिर होत गेली. काही गणसमाज अस्तित्वात होते. महाभारतातील एक प्रसंग असा -
 युधिष्ठिराने केलेल्या यज्ञात सहभागी होण्याचे जरद्गवा या महिलेने नाकारले. तेथे जाण्यासाठी युवाश्व राजाने बळजबरी केली. फुलावर आलेली शेते आणि विक्रीसाठी तयार असलेले लोणी वाऱ्यावर सोडून जाणे तिला मान्य नव्हते. यावर डॉ. गणेश शिटे लिहितात, शेतातील भराला आलेल्या गव्हाचा आणि साठलेल्या लोण्याचा नाश होऊ नये. अशी तिची स्वाभाविक इच्छा आहे. त्यावरून तिचे शेती व व्यापार यांकडे असलेले लक्ष जाणवते.मातृसत्ताक समाजात स्त्रीचे स्थान का श्रेष्ठ होते हे या उदाहरणावरून जाणवते.
 मातृसत्तेचा लोप -
 गण हा सामूहिक जीवन जगणारा समाज होता. गणातील लोक गणसभेत नियमितपणे एकत्र येत. विचारविनिमय करून एकत्रितपणे व्यवहार पार पाडीत. ही गणनीती जोवर अबाधित होती तोवर त्यांचा पराभव झाला नाही. कालौघात राजाला सार्वभौम मानणारी राजसत्ता विकसित होत गेली. उत्पादन साधनांचा विकास होत गेला. त्यातूनच मातृसत्ताक समाज व्यवस्था, जी प्राचीन गणजीवी समाजाचा एक विशेष होती, ती लोप पावली. असे असले तरीही पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीदेवतांचे माहात्म्य टिकून राहिले. त्यांचे चिवटपणे टिकून राहण्याचे महत्त्वाचे कारण हेच असावे की बहुसंख्य भारतीय समाज कृषिजीवी होता. कृषिसमृद्धी, जमिनीचे सुफलीकरण आणि भूमीरूप स्त्री देवता यांच्यातील अतूट एकतेच्या कल्पनेचा आदिबंध समाजमनातून नाहीसा होऊ शकला नाही त्याचा प्रत्यय या सणांतून येतो.
 आर्य येण्यापूर्वी भारतात मातृसत्ताक समाज व्यवस्था होती हे अनुमान सिंधू संस्कृतीच्या उत्खननातून सिद्ध झाले आहे. या व्यवस्थेतच स्त्री देवतांचा संप्रदाय निर्माण झाला असावा. सिंधूच्या खोऱ्यापासून ते नाईल नदीच्या खोऱ्यापर्यंत स्त्रीदेवतांचे अवशेष सापडतात. मध्य आशियातील देवी संप्रदाय आणि भारतातील शक्तीसंप्रदाय यात साम्य आहे. हे दोन्ही संप्रदाय एकाच आर्थिक व सामाजिक परिस्थितीत उदयाला आले असावेत असे मत 'लोकायत' या ग्रंथात लोकायत दर्शनाचे थोर अभ्यासक डॉ. स. रा. गाडगीळ नोंदवितात.
 आपल्याकडील श्रावण भाद्रपदात आचरावयाच्या व्रतांचे सूक्ष्म अवलोकन केल्यास स्त्रीमाहात्म्य आणि कृषिसमृद्धी यांचा अन्योन्य संबंध लक्षात येतो. गणेशचतुर्थी व्रतात गणेश या पुरुष देवतेला स्थान असले तरी खरे महत्त्व गौरींना असते. कुलाचार लक्ष्म्यांचा निमित्ताने साजरा होतो. कोकणांत दीड दिवसांचा गणपती असतो. गणपतीला निरोप देतात आणि गौर आणतात. गौरीची काही गीते अशी...

गणोबा आला आला
गवर का ग नाही?
साखळ्या लेती लेती
पाठीमागून येती
गवर आली शेतापाशी गवर ss

शेतवाला विचारतो

"का ग गौराई एकली
का ग हुईन एकली
मी का हुईन एकंली
पुढे हाय गणेश बाळ मागं शंकर भ्रतार"

 कोकण-कोल्हापूरकडे गौरी गणपतीला जायचे असा वाक्प्रचार आहे. तर मराठवाड्यातही लक्ष्म्यांसाठी घरी जायचे असे म्हणतात. अवघे घर एकत्र जमते. या स्त्रीप्रधान व्रताचे वैशिष्ट्य श्री. गुप्ते१८ यांनी नमूद केले आहे ते असे -
 In regard to chief Goddess Gauri, the Goddes of harvest, one great peculiarity remains to be mentioned. She supposed to have been followed by her husband shiva, secretly, who remains hidden under the outer fold of her sari and is represented by Lota (Pot) covered by coconut and filed with rice.
 या स्त्रीप्रधान व्रतात गणेश आणि शिव अनुपस्थित असतात. या व्रतातून वनस्पतीसृष्टीची समृद्धी अभिप्रेत आहे. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीतून त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पदार्थातून हे जाणवते. कोल्हापूर, कोकण भागात गौरच तेरड्याची, गौरीफुलांच्या झाडांची असते. हे वनस्पतींबद्दलचे प्रेम गौरी वा लक्ष्मीच्या गाण्यांतून सतत प्रगटते.

लक्ष्मी आई आली शेता नि शिवारात
लाडक्या बाळा माझ्या पाणी तुज्या घागरीत

 शेत आणि पाणी यांतूनच लक्ष्मी.... समृद्धी फुलणार

लक्ष्मी आई आली शेताच्या बांधासाठी
सावळा बाळराजा हाती गोफण पाया पडी

 बांधासडीला उभी राहून भराला आलेल्या शेताकडे कौतुक भरल्या डोळ्यांनी पाहणारी लक्ष्मी आणि पिकांच रक्षण करण्यासाठी गोफण हाती घेऊन पाया पडणारा बाळराजा, यातून स्त्रीमनाच्या प्रतिमासृष्टीचे वैशिष्ट्य लक्षात येते.

माज्या हे गऽ शेतात
हाल्या बैलाचं आऊत
माझ्या हे गऽ घरी
लक्ष्मी येती धावत

 बैलांच औत ज्याच्या शेतात त्याच्या घरी लक्ष्मी धावतच जाणार ना ?

पाऊस पडला चिखल झाला
व्हात आली गंगा
गौराय पावनीला जेवायला
भाजी भाकरी सांगा

 शेतातील भाकरी आणि भाजी हाच खरा लक्ष्मीचा नैवेद्य. तिचे स्वागत मराठवाडा, कोकण, वऱ्हाड, पश्चिम महाराष्ट्रात भाजी भाकरीनेच होते.
 शेताची सुफलशक्ती वाढवणाऱ्या या गौरीला निरोप देतांना शेतकरी म्हणतो -

आज गौरी जाशील ती परत कधी येशील?
पाऊस पडे गंगा भरे येईन मी भादव्यात
नारळीच्या फुलावरनं येईन थाटात

 स्त्री आणि प्राथमिक अवस्थेतील कृषिकर्म यांतील नैसर्गिक नाते, भूमीच्या सर्जनशीलतेचा सन्मान, लक्ष्म्या, गौरी यांसारख्या व्रतातून आपले आदिम आणि मनोहारी अस्तित्व दाखवते.
 नवरात्र:
 आश्विनातले नवरात्र मराठवाड्यात सर्व जातिजमातीतून साजरे होते. हा उत्सव मूलतः जमिनीच्या सुफलीकरणाशी संबंधित आहे. शेतातील माती, गोठा, तबेला, वारूळ, चौरस्ता या ठिकाणांची माती एकत्र मिसळतात. ती पत्रावळीवर गोलाकार पसरतात. त्यात सात वा नऊ प्रकारचे धान्य मिसळतात. ज्यांचे घरी शेत नाही अशांना नवरात्रात पत्रावळीवरील मातीत मिसळण्यासाठी मिसळाचे धान्य बीज म्हणून देणे शुभ मानले जाते. पूर्वी देशमुख, पाटील यांच्या घरातील प्रमुख स्त्री नवरात्रापूर्वी मिसळीचे बीजकरण एकत्र करून ठेवी. मधोमध मृत्तिकेचा कलश मांडतात. त्यात सप्तसरितांचे पाणी ठेवतात. विविध विहिरींचे पाणी ठेवतात. त्या मातीवर पाणी शिंपडतात.या कलशात विड्याची पाने आणि नारळ ठेवतात. माती व पाणी विविध ठिकाणची असावी असा संकेत आहे. विविधता एकत्र आली तर त्यातील सुफलन शक्ती वाढते अशी लोकमनाची श्रद्धा हजारो वर्षांपासून आहे. याची प्रचीती त्यातून मिळते. मृत्तिका म्हणजेच माती. ती ब्रह्मदेवाने निर्माण केली. कश्यपमुनींनी तिला अभिमंत्रित केले. हत्तीघोडे यांच्या पायाखालचा रस्ता, वारुळ, संगम, डोह, गाईचा गोठा येथील मातीला सप्तमृत्तिका म्हणतात. तिच्यात चव्हाट्यावरची माती मिसळली की ती 'अष्टमृद्' होते. माती चार प्रकारची असते. पांढरी, पिवळी, लाल व काळी. पांढरी माती घरासाठी चांगली. ती फुटत नाही व तिच्यावर अग्नीचा परिणाम होत नाही. भृगू कश्यप मुनींनी वास्तु ग्रंथात मातीचा विचार मांडला.
 मंगलकार्यासाठी सुवासिनी रानात जाऊन माती आणून चूल घालतात. तिला 'मृत्तिका मंगल' म्हणतात. माती सुवर्णाइतकीच महत्त्वाची असते. म्हणूनच धर्मकृत्यांत मातीच्या कलशाला महत्त्व असते.
 घट बसविणे असे लोकभाषेत नवरात्राविषयी बोलले जाते. घट हे गर्भाशयाचे प्रतीक आहे. हे व्रत स्त्रियांचे आहे नवरात्रात विशेष करून कुमारिकांची पूजा केली जाते. भूमीच्या स्त्रीरूपांची आराधना या काळात करतात. कुमारिकांचे प्रतीक सरस्वती, लक्ष्मी ही सुवासिनी आणि अनिष्टापासून रक्षण करणारी काली. ज्येष्ठ आषाढात पेरलेले धान्य भाद्रपदात सतेज होऊ लागते. जणु त्याची कौमार्यावस्था संपून ते पणात येऊ लागते. आश्विनात दाण्यातले दूध पक्व होऊ लागते आणि दिवाळीत धान्यलक्ष्मी दाराशी येते. कौमार्यवस्थेतील धान्यलक्ष्मी, धान्याने शेतेभाते बहरलेली असतात, अशी सुवासिनी मातृरूपा धान्यलक्ष्मी या धान्याचे अनिष्टापासून रोगापासून रक्षण करणारी विघ्नहर्ती भवानी. ही तीन रूपे नवरात्रात पूजिली जातात. घटाचे वर नागवेलीच्या पानांची वा फुलांचीमाळ बंधतात. रोज एक नवी माळ असते. लोकभाषेत नवरात्राचा तिसरा वा सहावा दिवस असे म्हणण्या ऐवजी आज चौथी माळ पाचवी माळ आहे असे म्हणतात. काहींच्या घरी फक्त विड्याच्या पानांचीच माळ असते.
 मराठवाड्यातील व्रतांवर दक्षिणेचा प्रभाव -
 मराठवाड्यात देवीच्या साडेतीन पीठांपैकी तुळजापूर आणि योगेश्वरी ही पीठे आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव थाटात होतो. मात्र तुळजाभवानीचे मूळ नवरात्र शाकंभरीचे. चंपाषष्ठीपासून सुरू होणारे तर योगेश्वरी चे नवरात्र मार्गशीर्ष पौर्णिमेस संपणारे. असे असले तरी आश्विनातील नवरात्र या देवळांतूनही थाटात बसते.
 मुळात देवी हे पार्वतीचे रूप. भव म्हणजे शंकर आणि भवानी म्हणजे पार्वती. ही दोनही लोकदैवते आहेत. विंध्यपर्वताने भारताचे उत्तर आणि दक्षिण असे निसर्गतः दोन भाग पाडले आहेत. विंध्य पर्वताच्या अलीकडे महाराष्ट्र आहे.
 कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू आणि केरळ हे दाक्षिणात्य प्रदेश. या दक्षिणात्य प्रदेशांच्या आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, ओरिसा बंगाल आदि उत्तरेकडील प्रान्त यांच्या मध्यात महाराष्ट्र येतो. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनावर या दोनही भागांच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा प्रभाव पडलेला आहे. जळगाव, धुळे जिल्हे जे पूर्वी खानदेश या नावाने ओळखले जातात, त्यावर उत्तरेच्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा प्रभाव आहे. उदा. खानदेशातील कानबाईचा कुलाचार, उत्सव जो रण्णा सण्णा या सूर्यदेवतांशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात एकूण सात जिल्हे, लातूरमधील उदगीर - निलंगा हे तालुके, उस्मानाबादेतील उमरगा हा तालुका, तसेच नांदेडमधील देगलूर व किनवट हे तालुके कर्नाटक व आंध्राला लागून आहेत. मराठवाड्यातील भूमीशी निगडित व्रते, सण, उत्सव तत्संबंधी गाण्यांवर तेलंगण, आंध्र कर्नाटक या दाक्षिणात्य संस्कृतीचा प्रभाव असल्याचे जाणवते. या संदर्भात नांदेडच्या डॉ. ताराबाई परांजपे यांच्या 'आंध्र महाराष्ट्र सांस्कृतिक अनुबंध' या संशोधन प्रबंधाच्या प्रस्तावनेत लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासक दुर्गा भागवत नोंदवतात, महाराष्ट्र - आंध्र - कर्नाटक हा दख्खनच्या अखंड पठाराचाच एक सलग भूभाग आहे. त्या तीन प्रांतांच्या भाषा भिन्न असून संस्कृती एकात्म आहे. जगाच्या कुठल्याही खंडात जा युरोपात, अमेरिकेत कुठेही जा, भाषा बदलली की संस्कृती बदलते. म्हणजे संस्कृतीचे मूळ भाषा असते. पण या विस्तीर्ण भूभागात तीन भिन्न भाषा असून संस्कृती एकरूपच आहे. १९पोचम्मा ही देवी तेलंगणातून मराठवाड्यात आली आहे. धुरपतामाय हे तिचे दुसरे नाव. धुरपता हा द्रौपदीचा अपभ्रंश, मराठवाड्यात जमिनीची उर्वराशक्ती म्हणजेच सुफलन शक्ती वाढण्याशी संबंधित विधीत दगडांचे पाच पांडव आणि कुंती, द्रौपदी करून मांडणे हे फार महत्त्वाचे आहे. त्या संदर्भात विषयानुरूप चर्चा पुढे येईलच.
 आंध्र कर्नाटकातील लिंगायत, रेड्डी, वडार, कोमटी आदी अनेक जातिजमाती महाराष्ट्रात येऊन स्थिरावल्या आहेत. अंबाजोगाईजवळील धर्मापुरी येथील शिलालेख कन्नड भाषेतील आहेत. या सातही जिल्ह्यांवर शेकडो वर्षे निजामाची सत्ता होती. त्यामुळे हैदराबाद तेलंगणाशी राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शासकीय संबंध अनेक वर्षांपासून आहेत. तेलंगणातील जमिनीशी निगडित चळवळ, आर्यसमाजी चळवळ या भागातही होत्या. जिल्ह्यांच्या वेगळपणावर मात करणारे आगळे असे मराठवाडीपण या सातही जिल्ह्यांतील लोकमानसात सतत जागे असते. त्यातून सण उत्सव व्रते विधी विशेषकरून शेतीशी संबंधित विधीत एकता आहे. उदा. मार्गशीर्ष महिन्यात येणारी इळा आवस. त्याची चर्चा पुढे केलेली आहेच.
 मराठवाड्यात चार नवरात्रे -
 मराठवाड्यात चार नवरात्रे मांडतात. १. चैत्री नवरात्र प्रतिपदा ते नवमी, २. आश्विन-नवरात्र प्रतिपदा ते नवमी , ३. मार्गशीर्ष चंपाषष्ठी ते पौर्णिमा, ४. शाकंभरी नवरात्र - पौष महिन्यात पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी फक्त आश्विनातील नवरात्राची नोंद घेतली आहे.

दसरा दिवाळी माझ्या जिवाला आसरा
माय माऊली बाई मूळ धाडू नगं उशिरा
नऊ दिसांच्या नऊ माळा अंबा बसली नऊ चंडी
तिच्या नंदादीपासाठी तेल जळलं सवाखंडी

 आईचा जोगवा मागीन -
 अशा शेकडो ओव्या स्त्रियांच्या ओठावर असतात. देवीच्या नावाने जोगवा मागितला जातो. दसऱ्याच्या दिवशी योगेश्वरीची पालखी निघते. त्यात आराधनी हातात दिवटे घेऊन पुढ्यात असतात त्या जोगतिनी जोगवा मागणाऱ्या असतात. जोगवा मागणाऱ्यात सवर्ण वा उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या समाजातल्या स्त्रिया अभावानेच असतात. मांग, महार, ढोर या दलित समाजातल्या तसेच रंगारी, वंजारी, गुरव आदी समाजातील स्त्रिया जोगवा मागणाऱ्यात असतात. नवस बोलल्यामुळे एखाद दुसरी उच्चभ्रू स्त्री पाच घरी जोगवा मागताना दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावाने नवबौद्ध झालेल्या कुटुंबातील स्त्रियांनी जोगवा मागणे सोडून दिले आहे. डॉ. सुभाष खंडारे लोकसाहित्य माला पुष्प २८ मध्ये इनाई या व्रतोत्सवाची माहिती देत असताना नोंदवतात की, इतिहास काळात दसरा हा सण पूर्णपणे दलित आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाचा होता. खालील गाणे पाहता वरील मताला.पुष्टी मिळते.

देवीतुळजा
भावई तुळजा
देवाच्या मागती
गोंधळ घालती
आई बसली नवरात्री
दहा दिवसांची भरती
दहा दिवसांची भरती
आल्या आल्या मांगनी जोगनी
हाती कुक्कांचं करंड
भांग भरीला मोत्यानं
पाटील पांड्या मिळोनी
शिलंगणा जाती
धानाचे तुरे नेती
म्होर मशाली जळती

 नवरात्र खरिपाच्या पिकांचे स्वागत आणि रबीच्या बियाण्याची उगवणशक्ती मोजणारी प्रयोगशाळा आहे. पूर्वी शेतातील परिपुष्ट निरोगी कणसे पक्क झाल्यावर फडक्यात अलगद बांधून आळ्याला अधांतरी बांधून ठेवीत. अशा कणासांचे दाणे काढून ते नवरात्रात मातीत मिसळून त्यावर मातीचा घट मांडतात. मृत्तिकेच्या घटातून योग्य तऱ्हेने बियाण्याला पाणी मिळते. घटातून ते झिरपते. नऊ दिवसांत त्यातून अंकूर फुटतात. ज्या बियाण्याचे अंकुर रसरशीत, जोमदार असतील ते पीक त्यावर्षी चांगले येणार असा आडाखा बांधला जातो. अशी श्रद्धा लोकमानसात आहे. हे अंकुर डोक्यात खोवून सायंकाळी शिलंगणाला जातात. ते प्रसाद म्हणून खातातही.
 कोजागिरी : कोण आहे जागे? -
 दसऱ्यानंतरची पौर्णिमा कोजागिरीची. या दिवशी पार्वती घरादारातून हिंडते, शेताभातातून हिंडते आणि विचारते, कोजागर्ती ? कोण जागे आहे ?

आई लक्ष्मी आली
सोन्याच्या पावलानं
कणगी पेवाला लागुनिया
जोतं चढली डवलानं....
आई तू लक्ष्मी
इथं काय उभी
चल वाड्यात जाऊ दोघी
माझ्या बाळ राजसाच्या....
आई तू लक्ष्मी
आली तशी जाऊ नको
धरला पदर सोडू नको
बाळ राजसाचा.....

 आश्विनी पौर्णिमा चांदण्यासारखीच धनसमृद्धीची पौर्णिमा. समजली जाते. प्राकृतिक सौंदर्य पूर्णत्वाला पोहोचलेले असते. शेते भराला आली असतात, दूधदुभते भरपूर असते. गुरांना चरण्यासाठी उदंड हिरवे... कडबा असतो. ही समृद्धी टिकवायची असेल तर घरातील माणसांनी जागे राहायला हवे. त्या सुबत्तेचे रक्षण करीत, स्वैरतेने उपभोग न घेता सुजाणपणे तिचा उपयोग वा उपभोग घेतला पाहिजे, हा संस्कार कोजागिरी देते. श्रमातून धनलक्ष्मी निर्माण होते. तिचे रक्षण केले पाहिजे.
 कोजागिरीला ज्येष्ठ अपत्याला औक्षण करतात. ती मुलगी असली तरी तिला सन्मानाने ओवाळतात.
 दिवाळी -
 मराठवाड्यातील किंबहुना महाराष्ट्रातील दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे. दिवाळी आली की, खेड्यातील मुलांच्या ओठावर गाणे नाचू लागते.

दिन् दिन दिवाऽऽळी
गाई म्हशी ओवाऽऽळी

गाई म्हशी कोणाच्या ?
लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा?
आई बापाचा

 शेतीतून निघणारे धान्य आणि पशुधन या दोहोंच्या एकात्म समृद्धतेचे प्रतीक म्हणजे दिवाळी.
 इ.स.१ ते ४०० या काळात हा सण यक्षरात्री म्हणून रुढ होता. वात्स्यायनाने कामसूत्रात या सणासाठी हे नाव वापरले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धनाने नागानंद नाटकात या सणाला 'दीपप्रतिपदुत्सव' असे नाव दिले आहे. हा काळ इ.स.६०० चा. नीलमत पुराणात या सणास दीपमाला असे संबोधले असून त्याचे विस्तृत वर्णन आहे. या पुराणाचा प्रचार काश्मीरमध्ये होता. नवी वस्त्रे परिधान करणे, घर स्वच्छ आणि सुशोभित करणे, देवळे घरे दिव्यांनी सजवणे, द्यूत खेळणे आणि भाईबंदांनी एकत्र येऊन मिष्टान्न सेवन करणे ही या सणाची वैशिष्ट्ये वर्णिली आहेत. अल्बेरुनीने प्रवासवर्णनात या सणाचा उल्लेख केला आहे. कन्नड शिलालेखात या सणाचा उल्लेख आहे. महमद गझनी व अफगाण राजेही हा लोकोत्सव साजरा करीत असा उल्लेख आहेत.
 अबुद फाजल याच्या 'ऐने अकबरीत' या इतिहास ग्रंथात लिहिले आहे की दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण, वैश्य समाज हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करी. घरोघरी दिवे लावीत. दिवाळीचे महत्त्वाचे सहा दिवस असतात. वसुबारस, धनतेरस, नरकचतुदर्शी, अमावास्या-दीपपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. वसुबारसेला गाईंची पूजा करतात. गायवासरांना स्वच्छ करतात. गोठा स्वच्छा करतात. गुरांना पंचारतीने ओवाळतात. पुरणावरणाचा नैवेद्य करतात. गोठ्यातील मोकळ्या जागेत शेणाचा सडा घालून त्यावर शेणाचे गोकुळ उभे करतात. त्यात गौळणी तयार करून त्यांना सजवून मांडतात. या गोकुळाला वेस असते. शेतात जाणारी, पाणी भरणारी, स्वयंपाक करणारी, बाजार मांडून बसणारी अशा गौळणी त्यात असतात. त्यांत पेंद्या असतो आणि शेणाचा बळिराजा असतो. खेड्यातील शेतकऱ्यांच्या घरात शेणाचे गोकुळ मांडून त्यात पेंद्या व बळिराजा मांडणे शुभ मानले जाते. मराठवाड्यात हे गोकुळ विधिपूर्वक मांडले जाते.

गाई म्हशीने भरले वाडे
दह्या दुधानं भरले डेरे
बळीचं राज्य येवो.

 एकूण स्त्रियांच्या सणांत शेणाचे महत्त्व आढळून येते. शेण हे सुफलनासाठी अत्यन्त प्रभावी खत होते. याची जाण स्त्रीला अनुभवातून आली होती. खेड्यातल्या शेणाच्या गोकुळाची जागा शहरात किल्ल्याने घेतली आहे.
 धनतेरस -
 धनत्रयोदशीला स्त्रियांची न्हाणी असतात. शेताशी, सर्जनाशी जोडलेल्या सर्व सणांत स्त्रियांचा सहभाग विशेषत्वाने असतो. त्या निमित्ताने घरातील सगेसोयरे एकत्र येतात. स्त्रिया आपले मन दगडी जात्याजवळ ओवीरूपाने मोकळे करतात. दिवाळीचे पदार्थ बनवायचे म्हणजे जात्याशी पहाटेपासून बसावे लागते. लेकीची वाट पाहणारी आई म्हणते -

जवारीपरीस तुरीचं पीक भारी
लेकापरीस लेक प्यारी...

 पहाटेच्या वेळी पहिला दिवा लावून लेकीसुनांना तेल उटण्याने नाहू घालताना . घरातील वडीलधारी स्त्री म्हणते -

दिवाळीचा दिवा, दिवा ठिवा दिवठणी
हिरवी नेसली पैठणी माय माझ्या लक्ष्मीनं....

 ही माय म्हणजे धरित्री. तिच्यातून निर्माण होणाऱ्या धनाचा सन्मान स्त्रीला नहाण्याचा पहिला मान देण्यातून व्यक्त होत असेल का? नक्कीच होत असेल !
 नर्कचतुर्दशी -

दिवाळी दिवाळी
आंघुळीची जल्दी करा
आज मारील नरकासुरा
किसन देव -

 धनत्रयोदशीचा दिवा नर्कचतुर्दशीला घरातून फिरतो या दिवशी पुरुषांच्या आंघोळी असतात. त्यांना तेल चोळून, उटणं लावून, सुंगधी आंघोळ घालून ओवाळतात. या दिवशी घरातील घाण, दुर्गंधी दूर होवो अशी प्रार्थना करतात.
 दिवाळीची अमावास्या ऊर्फ लक्ष्मीपूजन -
 लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वात महत्त्वाचा या दिवशी खरी दिवाळी. लक्ष्मीचे.... सुबत्तेचे पूजन. पण ही सुबत्ता येते कुठून ?

लक्ष्मी आई आली शेताच्या बंधाऱ्यानं
शालू भिजला दवरांन माय माझ्या लक्ष्मीचा....
आई लक्ष्मी आली बैलाच्या खालती
माज्या बाळाला बोलती अवंदा माल झाला किती?
आई लक्ष्मी आली सोन्याच्या पावलानं
वाडा चढे डौलानं,माझ्या राजसाचा:..
आई लक्ष्मी आली, वाडा सोडून दुकानाला
सोनं मागे काकणाला, बाळ राजसाला

 अमावास्येला लक्ष्मीपूजन असते. घर पणत्यांनी सजवतात. रांगोळ्यांनी अंगण सजते. रांगोळ्यांच्या संदर्भातील विवेचन भोंडला भुलाबाई या प्रकरणात सविस्तरपणे आले आहे. या दिवशी सायंकाळी दिव्यांची पूजा असते. ताट भरून मातीच्या पणत्या चेतवून देवासमोर वा बैठकीत लक्ष्मीची प्रतिमा ठेवून तिच्यासमोर खाली तांदूळ गहू ठेवून त्यावर पणत्यांचे ताट ठेवतात. ताटात ७,११,१५ अशा पणत्या स्वस्तिक काढून त्यावर मांडतात. पणत्यांची पूजा फक्त स्त्रियाच करतात. तसेच दौत, वही यांची पूजा करतात. वहीवर श्री लिहून नव्या वर्षाचे हिशेब लिहिण्यास प्रारंभ करतात. वैश्य... व्यापारी समाजाचे वर्ष कार्तिक प्रतिपदेपासून सुरू होते. प्रसाद म्हणून साळीच्या लाह्या, बत्तासे, खडीसाखर वाटतात. पूजेत धने, मूग, गूळ यांचा समावेश असतो.
 बलिप्रतिपदा -
 बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू. तो सत्तेने माजला त्याने देवांना जिंकून लक्ष्मीला दासी केले. तेव्हा विष्णूने वामनाचा अवतार घऊन त्याचा नाश केला. बळीकडे तो यज्ञात याचक म्हणून गेला व तीन पावले जमीन मागितली. एक पाऊल स्वर्गात दुसरे मृत्युलोकात तर तिसरे बळीच्या डोक्यावर ठेवले. त्याला पाताळात पाठवले. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला समाज तुझे स्मरण करील असा वर दिला. परंतु बळीचे राज्य येवो अशी शुभेच्छा शेतकरी समाज विविध विधीतून सतत करत असतो. कारण बळी हा शेतकरी होता. आपल्याकडे शेतकऱ्याला बळिराजा म्हणत. केरळात श्रावणात ओणम् हा सण दिवाळी इतक्या थाटात साजरा होतो. अंगणात बळीचे प्रतीक म्हणून मातीचा ओटा तयार करतात. त्याभोवती रांगोळी घालतात. फुलांनी सजवतात. रात्री फेर धरुन कैकद्विकळी हे नृत्य करतात, घरापर्यंत मातीची फुलांची पावले काढतात. या दिवशी पाताळात ढकलला गेलेला बळिराजा भेटायला येतो अशी समजूत आहे. पूर्वी बाली बेट भारताला लागून होते त्याला पाताळ म्हणत. बाहेरुन आलेल्या टोळ्यांनी बळिराजाला रेटत रेटत बाली बेटांत नेले. थर्स्टन नावाच्या शास्त्रज्ञाने तर ऑस्ट्रेलियातील लोकांचे व वनस्पतीचे दक्षिण भारतातील लोकांशी साम्य असल्याचे दाखवून दिले आहे.
 बळिराजा शेणाचा करतात. शेणाला शुभा म्हणतात. शेण हे सर्वात उत्तम खत. या सर्व बाबींचा अनुबंध महत्त्वाचा आहे.
 भाऊबीज ऊर्फ यमद्वितीया -
 जी स्त्री भूमीस्वरूपा सर्जनतेचे प्रतीक मानली गेली. सन्माननीय मानली गेली ती काळाच्या प्रवासात दुय्यम दासीसमान झाली. तिचे जगणे अत्यन्त दुःखमय झाले. रात्रंदिवस कष्ट करणे आणि खाली मान घालून समाजात व कुटुंबात दुय्यम दर्जाचे जिणे जगणे एवढाच तिच्या जीवनाला अर्थ उरला. निदान प्रत्यक्षात तरी तिने आपले दुःख दगडी जात्याजवळ मोकळे केले. तेवढाच तिला आधार होता.
 ती स्त्रीचा जन्म दिल्याबद्दल परमेश्वराला म्हणते -

बाईचा जलम कुनी घातला येड्यानं
बैल राबतो भाड्यानं, परक्याचे दारी ....
लेकीचा जलम नको घालू श्रीहरी
मोठी कठीन चाकरी परक्याचे दारी....

 पण माहेर म्हटले की तिचा जीव गलबलून जातो. भाऊबीज आली की तिचे डोळे भावाच्या वाटेकडे लागतात.

दिवाळीच्या दिशी ओवाळित बंधु तुला
तुज्या शेल्याची चोळी मला ....
सोनसळे गहू रवा काढते दाणेदार
धाकला बंधुराया आज फेण्या जेवनार ....
पिंपळपानांची सावली पड़े जोत्यावरी
भाचा मामाचे कडेवरी ....

 भाऊबीज महाराष्ट्रात अत्यन्त भावुकतेने साजरी होते. राजस्थान, उत्तर, मध्य प्रदेशात राखीपौर्णिमेचे वा भाई पांचचे महत्त्व ते महाराष्ट्रात भाऊबीजेचे.धावतपळत भाऊ भाऊबीजेला बहिणीचे घर गाठतोच. न आला तरी ती रागवत नाही. चंद्राला ओवाळते व भावाला आयुष्य चिंतिते.

भाऊबीजेच्या दिशी ओवाळीलं चांदाला
दूरदेसीच्या बंधवाला आयुख चिंतिते ....

 हे खरे असले तरी तिला जाणीव असते.

माय तो माहेर, बाप तो येऊजाऊ
पुढे नेतील ग भाऊ, लोकलाजे...
आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावरच्या सायी
भावजयींच्या राज्यात ताक घेण्याची सत्ता नाही.

 बहीण भावाचे नाते नितान्त निरामय आणि आंतरिक नात्याने ओलावलेले असते.

बहीण भावाचे प्रेम ते शुद्धबुद्ध
अपुरे होती शब्द वर्णावया
दुबळा पाबळा भाऊ बहिणीला न्यारा
पुनवेच्या दिशी चंद्र मोहरला प्यारा
बहिणीला भाऊ कसा रागावेल ?
चंद्र आग का ओंकेल काही केल्या....

 भाऊ बहिणीच्या नात्यांचा ओलावा सांगणाऱ्या हजारो ओव्या महाराष्ट्रातील स्त्रियांनी रचल्या आहेत.
 यमद्वितीयेच्या कथेचे विवेचन यापूर्वी केलेच आहे.
 माती आणि माहेर यांच्याशी दृढ नाते -
 मानवी विकासाच्या प्रवासात नात्यांचे निश्चितीकरण, त्यांना दिलेली भावनिक प्रतीकात्मकता हा टप्पा अत्यन्त महत्त्वाचा आहे. मानसिक संवेदन शक्तीची आणि स्वरयंत्राच्या साहाय्याने निर्माण केलेल्या भाषेची स्पंदने माणसाला निसर्गाने दिली. त्याद्वारे त्याने इतर प्राणिमात्रांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध केले.
 मानवी संस्कृतीच्या आदिपर्वातील यातुश्रद्धा ही समूह श्रद्धा होती. जीवनातील सारेच प्रश्न समूहाचे होते. 'मी' जन्माला आलेला नव्हता. मानवी जीवनाचे अस्तित्व 'आम्ही' त सामावलेले होते. जीवनाला सुख देणारे सुलभ करणारे अन्न देऊन मृत्यूचे भय नाहीसे करणारे तीन महत्त्वाचे आधार होते - एक वनस्पती शेती, दुसरा पशुधनाचा आणि तिसरा अग्नीचा. या तिहींचा संगम दिवाळीत आहे.
 निसर्गाशी त्याच्या संहारक रूपाशी संघर्ष करून उरण्याची दुर्दम्य प्रेरणा यातुश्रद्धेने मिळाली आणि यातुश्रद्धा या समूहप्रधान असतात. स्त्रियांची बहुतेक व्रते, विधी, उत्सव हे समूहाने साजरे केले जातात.
 स्त्री ही सर्वार्थाने सृजनशक्ती होती. धान्य पेरणारी, काढणारी, ते जास्तीतजास्त दिवस टिकवण्यासाठी विविध प्रयोग करणारी आणि त्याचे अग्नीच्या साहाय्याने पूर्णान्न बनवणारी तीच. दूधभत्याची निर्मिती त्यापासून विविध पदार्थ तयार करणारी तीच. वस्त्र विणणारी तीच. त्यामुळे जमिनीची सुफलता वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या यातुश्रद्धा तिच्याशी जोडलेल्या दिसतात. या विधींशी जोडलेली गीते स्वरसमूह तिनेच निर्माण केले असावेत. तिचे भावविश्व जसजसे बदलत गेले तसतसे त्या गाण्यांतील संदर्भ बदलत गेले. पण माती आणि माहेर यांच्याशी असलेले तिचे अतूटपण गीतामधून सतत जाणवते. काळाच्या ओघात मातृसत्तेची जागा पितृसत्तेने घेतली. स्त्री घर सोडून पतीच्या घरी कायमची आली. पण या घरी तिला तिचे अवकाश मिळाले नाही. त्यामुळे तिच्या ओव्यांत माती आणि माहेर सतत डोकावते.

पड़ पड़ मेघराजा बंधवाच्या शेतावरी
आलिया दिवाळी भयनीचा खर्च भारी
जोंधळ्या बरुबरी किती वाढशील उसा
आस दिवाळीची माले बंधू संगे भासा....

 सासरी डोक्यावरचा पदर कपाळ झाकेपर्यंत घ्यायला हवा. ती तिची मर्यादा. पण माहेर म्हणजे मोकळपणा. भाऊबीजेसाठी येणारा भाऊ पाहून ती म्हणते -

खांद्यावरचा पदर डोकीवर मी झोकीला
शेताच्या बांधाला बंधुराजा मी देखीला ....
दिल्या घेतल्यानं नाही पुरत एरावती
बंधूराजाची ग्वाड बोलांची रसवंती....

 भारतीय सण : ऋतुचक्राशी जोडलेले आणि ऋतुचक्र कृषिशी-
 ज्येष्ठ,आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक या सहा महिन्यांत भूमीवर्षन यांच्या संयोगातून होणारे, सर्जन या अनुबंधाशी जोडलेले सण, व्रते, उत्सव येतात. ज्येष्ठी पौर्णिमेला नांगर शेतात घालायचा. आषाढ़ात पेरणी आणि वृक्षपूजा. श्रावणात वारुळाची, शेताची संरक्षक नागदेवता आणि मांगल्याची पानाफुलांच्या माध्यमातून पूजा. भाद्रपदात धान्य कणसे निसवतात. धान्यलक्ष्मीची चाहूल स्पष्ट होते. म्हणून गौरीगणपती, लक्ष्म्या यांची पूजा. आश्विनात या धान्यात... दाण्यांत दूध भरू लागते आणि रब्बीच्या पेरणीची तयारी सुरू होते. लक्ष्मीच्या त्रिरूपांची पूजा आश्विन नवरात्रात. आश्विनाच्या अखेरी व कार्तिकात धान्य घरात येते. ज्या धान्याचा विनिमय पैशाने होतो असे पीक म्हणजे कापूस (कपाशी, शेंगदाणे इ.) त्यामुळे लक्ष्मीपूजनास रूपयाची पूजा होते. कृषिवर आधारित व्यवहार या काळात होऊन पैसे घरात येतात. व्यापाराला चालना मिळते. म्हणून धनलक्ष्मीचे पूजन.
 एकूण भारतीय सण ऋतुचक्राशी जोडलेले आहेत आणि ऋतुचक्र कृषीशी जोडलेले आहे. काळाच्या विकासात या सणांना नवे आयाम दिले गेले. श्रावण पौर्णिमा उत्तरेत राखी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. भाऊबहीण या नात्याला धर्म, जात या पलीकडचा संदर्भ मिळाला. दर्यावर्दी जीवन जगणाऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात ती नारळी पौर्णिमा झाली परंतु उत्तर भारतातून आलेली राखी पौर्णिमा आज मराठवाडा, महाराष्ट्रात रुजली आहे.
 इतर प्रांतांतील सणांवर ओझरता दृष्टिक्षेप : मूलभूत साम्य -
 भूमी वर्षन आणि सर्जन यांच्याशी जोडलेल्या मराठवाडा व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्रतोत्सवविधी, सणांचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केला आहे. भारतातील भूमीच्या सुफलेतेशी जोडलेल्या सणांत मूलभूत एकात्मता असल्याचा प्रत्यय पदोपदी येतो. त्या दृष्टीने या अनुबंधाशी जोडलेल्याया काळात येणाऱ्या इतर प्रांतांतील सणांवर दृष्टिक्षेप टाकणेही महत्वाचे ठरेल. कर्नाटकात ज्येष्ठी पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा केली जाते: दक्षिणेत ज्येष्ठी पौर्णिमा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा दिवस असतो. आंध्रात या दिवशी जमिनीत प्रथम नांगर घालतात. सायंकाळी बैल सजवून शेतात नेतात. शेत चांगले पिकावे, वर्षभर शेतावर संकटे येऊ नयेत म्हणून मातीची प्रार्थना करतात. उमरगा, सोलापूर भागातील शेतकरी, विशेष करून लिंगायत समाजातील शेतकरी हा रिवाज पाळतात. श्रावणातील पंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया वारूळाला जातात.
 सांतेरीचे मंदिर वारुळाचे असल्याचे पूर्वी नोंदविले आहे. श्रावण शुक्रवारी स्त्रिया मातीच्या घटांची पूजा करतात. ही गौरीपूजा असते. आंध्रात श्रावण अष्टमीस मातीच्या घड्यात निंबाची पाने ठेवून त्यावर लहान गाडगे ठेवतात. त्यात दिवा लावून त्याची मिरवणूक काढतात. नागपंचमीला वारूळाची पूजा होते. भाद्रपद शुद्ध तृतीयेस महाराष्ट्रात हरितालिका साजरी करतात. आंध्रातही कुमारिका हे व्रत पाळतात. त्याला अटलतट्ट किंवा सोळा गौरीनामू असे म्हणतात. आंध्रात गणेशचतुर्थीला विनायक चौथ म्हणतात. दुसऱ्या दिवशी नंदादीपाजवळ ठेवलेली ही मूर्ती जवळच्या विहिरीत विसर्जित करतात. जेथे मूर्ती विसर्जित केली जाते तेथील थोडी रेती आणून ती सर्वत्र शिंपडतात. धान्याच्या कोठीत ठेवतात. त्यामुळे धान्य सुबत्ता वाढते अशी श्रद्धा आहे. ती मराठवाडा वा महाराष्ट्रातही आहे.
 नवरात्राला 'नाडहब्बे' म्हणतात. या उत्सवास दक्षिणेत राष्ट्रीय उत्सव मानले जाते. तामिळनाडूत आषाढ कृष्णाष्टमीपासून तिरुकल्याणपर्व सुरू होते. हा सोहळा १७ दिवसांचा असतो. त्यात स्त्रिया तैवारम ही गाणी गातात. समूहाने गातात. आंध्रातील गणेश चवथीस मुगाची डाळ व गुळाचे पाणी हा प्रसाद असतो तर कर्नाटकात गणेशचतुर्थीचे आदले दिवशी तृतीयेला घुगऱ्या करतात. त्या उंदरांसाठी शेतात जाऊन टाकतात. नवरात्र दसरा हे उत्सवही स्त्रियांचे असतात. दहा दिवस हळदीकुंकू असते. बोम्मल कोलुकु म्हणजे नवरात्र. आंध्रातील तेलंगणात नवरात्रात खास मुलींचा उत्सव साजरा करतात. त्याला बदकम्मा म्हणतात. या उत्सवाचे नाते महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या भोंडला, हादगा, भुलाबाई यांच्याशी फार जवळचे आहे. तेलंगणात दिवाळी हा उत्सव धान्यलक्ष्मीचा. भाताची कापणी या काळात झालेली असते. धान्याच्या लोंब्या आणून त्यांचा कुंचला करून तो झुलता कुंचला दारावर तोरण म्हणून लावतात. त्यातील दाणे चिमण्यांनी खावेत व धान्याची आबादी आबाद व्हावी ही इच्छा या मागे असते. कर्नाटकात दसऱ्यानंतरच्या अमावास्येस, आश्विन अमावास्येस बुक्कव्वाची पूजा करतात. पुरणाचा नैवेद्य करून तो शेतात नेतात. घरातील सर्वांनी शेतात जायचे असते. झाडाखाली पाट, दगड स्वच्छ करून मांडतात. चण्याच्या डाळीचे मुटके करून ते त्यांना वाहतात. हळदकुंकू कापसाची माळ घालतात. या दिवशी शेताची ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो.
 या काळातील सर्व भारतीय व्रते, उत्सव, सण शेताच्या सुफलीकरणाशी जोडलेले आहेत याचा प्रत्यय या सणांतून, विधींतून मिळतो.