भारतीय लोकसत्ता/मानवत्वाची प्रतिष्ठा

विकिस्रोत कडून

प्रकरण दुसरें

मानवत्वाची प्रतिष्ठा


अद्भुत घटना

 गेल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे या भरतभूमींत सध्यां जी लोकसत्ता प्रस्थापित होत आहे, ती प्राचीन परंपरेंतून उद्भवलेली नाहीं. प्राचीन काळीं येथें जीं लोकराज्ये निर्माण झाली होतीं तीं पुढें नष्ट झालीं आणि त्यांची स्मृतीहि नाहींशी झाली, त्यामुळे अर्वाचीन काळांत भारतांतील नेत्यांना सगळी नवी सृष्टी उभारावी लागली. ती सृष्टी उभारतांना त्यांनी ब्रिटिश लोकसत्तेचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवला होता. त्यांनीं आपल्या सर्व प्रेरणा तेथून घेतल्या होत्या. सुदैव असे की, हे अत्यंत बिकट कार्य करण्यास या भूमीला राममोहन रॉय, दादाभाई, रानडे, टिळक, विवेकानंद, लजपतराय, महात्माजी, सुभाषचंद्र, पंडित जवाहरलाल यांच्यासारखे अद्वितीय कर्ते पुरुष लाभले. पाश्चात्य जीवनांतील लोकसत्तेचें अमृत तत्त्व घेऊन ते आत्मसात् करून या देशांतील जनतेच्या मनावर आज शंभर- दीडशे वर्षे त्यांनी सारखे त्याचें सिंचन चालविलें आहे आणि त्यामुळेच गेली पाचसहा वर्षे या भरतभूमींत एक चमत्कार घडून येत आहे. एक अगदीं असामान्य, अलौकिक, किंबहुना जवळजवळ अगदीं अद्भुत अशी घटना येथें घडून आली आहे व येत आहे. स्वातंत्र्यप्रस्थापना ही ती घटना नव्हे. ती आपल्या दृष्टीने असामान्य व अलौकिक अशी असली तरी जगाच्या दृष्टीने व एकंदर इतिहासाच्या दृष्टीने अनन्यसाधारण अशी ती घटना नाहीं; पण त्या स्वातंत्र्य- प्रस्थापनेनंतर येथे लोकसत्ता प्रस्थापित झाली आहे आणि ही घटना मात्र त्रिखंडाच्या आतांपर्यंतच्या इतिहासांत अगदीं निस्तुळ अशी आहे.
 गेल्या नऊशें वर्षात ही भरतभूमि अगदीं स्वतंत्र अशी केव्हांच नव्हती. राजस्थानांतील रजपूत, विजयनगरचे कर्नाटकी व महाराष्ट्रांतले मराठे यांनी अधूनमधून स्वातंत्र्याच्या चित्कळेचे दर्शन येथील जनतेला घडविले; पण एकतर तें अल्पकालिक होते व दुसरे म्हणने अखिल भारतीय जनतेला असे हें दर्शन केव्हांच घडलें नाहीं. त्या त्या प्रांतापुरतेच ते मर्यादित होते. या नऊशे वर्षांच्या काळांत येथे ज्या राजसत्ता होत्या त्यांना स्वसंरक्षणाखेरीज दुसरे फारसे कांहीं साध्य झालें नव्हतें. लढाया करणे, करवसुली करणें व बंदोबस्त ठेवणें यापेक्षां जास्त कांहीं करण्यास त्यांना अवसरच नव्हता आणि तशी त्यांची दृष्टीहि नव्हती. स्वकीय सत्तांची ही स्थिति. मग परकीय सत्तांचें काय सांगावयाचे आहे ? त्यांतील बहुतेक जुलमी, अविवेकी, अज्ञ, हेकट व मदांध अशाच होत्या. ब्रिटिशांच्या पूर्वीच्या आक्रमकांना राज्य चालविण्यापलीकडे समाजसंवर्धन म्हणून सत्ताधाऱ्यांचा कांहीं उद्योग असतो, याची जाणीवहि नव्हती आणि अशा आक्रमकांच्या वर्चस्वाखालींच हा देश सातआठशे वर्षे पिचत पडला होता. इतक्या दीर्घकाळपर्यंत पारतंत्र्यांत कुजत पडलेल्या या भूमीने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एकदम लोकसत्ता प्रस्थापिली आणि गेलीं पांचसहा वर्षे, अगदी प्राथमिक निकषानें पहातां, ती यशस्वी करून दाखविली, जगांत तिला थोडी प्रतिष्ठाहि प्राप्त करून दिली, या यशाला जगाच्या इतिहासांत तोड नाहीं.

अपूर्वत्व कशांत आहे ?

 कसलीहि पूर्व परंपरा नसतांना आपल्या लोकांनीं स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतरच्या लगतच्या पांचसहा वर्षात लोकसत्ता प्रस्थापित करून ती टिकवून दाखविली, या यशांत जसे या लोकसत्तेचें असाधारणत्व आहे तसेंच दुसऱ्याहि एका दृष्टीनें तिचें असाधारणत्व प्रतीत होईल. पाकिस्तान वगळले तरी हिंदुस्थानची लोकसंख्या ३५-३६ कोटीच्या आसपास आहे. एवढी प्रचंड जनता लोकायत्त शासनाच्या अधीन झाल्याचे जगांतले हे पहिलेच उदाहरण आहे. ब्रिटनची आजची लोकसंख्या ५॥- ६ कोटी आहे आणि सर्वात मोठे लोकायत्त राष्ट्र जें अमेरिका त्याची लोकसंख्या १३-१४ कोटी आहे. रशियांत लोकसत्ता आहे असे काहीं लोकांचे मत आहे. क्षणभर खरें मानले तरी भरतभूमीचें असामान्यत्व भंगत नाहीं. कारण रशियाची लोकसंख्या वीस कोटींपर्यंत आहे. चीनमध्ये लोकसत्ता प्रस्थापित झाली असती, तर ती मात्र भरतभूमीच्या तुळेला उभी राहिली असती; पण दुर्दैवाने तेथे रशियाप्रमाणेच दण्डसत्ता, अगदीं शुद्धं मार्क्सवादी दंडसत्ता प्रस्थापित झाली आहे. त्यामुळे ३५-३६ कोटी जनतेचे आपल्या भूमीत प्रस्थापित झालेले स्वयंशासन जगाच्या इतिहासांत पहिलेच आहे.
 भारतीय जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीची स्थिति आणि तिच्या लोकसंख्येचा अफाट व्याप एवढ्या दोनच गोष्टी ध्यानांत घेऊन आपल्या लोकसत्तेकडे पाहिले, तरी तिची अपूर्वता ध्यानात येईल. मग येथले धर्मभेद, पंथभेद, प्रांतभेद, जातिभेद, भाषाभेद यांचा विचार केला, येथले संस्थानिक, येथले जमीनदार व येथले भांडवलदार हे जमेस धरले; येथले अज्ञान, दारिद्र्य; येथली शास्त्रविमुखता, येथली रूढिप्रियता लक्षांत आणली; आणि या देशाचा १६ लक्ष चौरस मैलाचा अफाट विस्तार ध्यानांत घेतला म्हणजे एवढ्या विरोधी व विधातक शक्ति विद्यमान असूनहि त्यांच्यावर मात करून यशस्वी होणाऱ्या आपल्या लोकशासनाची अपूर्वता कांहीं निराळी आहे, ही खरोखरी कांहीं अद्भुत घटना घडली आहे व घडत आहे, या विधानाच्या सत्यतेची वाचकांना काही अंशी तरी प्रतीति येईल.

तुलनेनें पहा

 हे सर्व तुलनेनें लिहिलेले आहे. सध्यां भारतांत कमालीचे दारिद्र्य आहे; बेकारी वाढत आहे; गुन्हेगारी प्रवृत्ति वाढत आहे; प्रत्येक प्रांतांतील काँग्रेसपक्षांत दुही माजली आहे; सरकारच्या प्रत्येक खात्यांत हृदयविदारक गोंधळ माजला आहे; नीति या भूमींतून नाहींशीच झाल्यासारखी भासत आहे. असे सर्वत्र दिसत असतांना भारताची लोकशाही यशस्वी झाली असे कोणत्या तोंडाने म्हणावे असा आपल्याला प्रश्न पडतो. तो प्रश्न खराच आहे. त्याविषयीं कांहीं निराळें मत असल्यामुळे आपल्या लोकशाहीचा हा गौरव केला असें नाहीं; पण मेक्सिको, ब्राझील, चिली, पेरू येथे अर्वाचीन काळांत स्थापन झालेल्या लोकसत्ता; फ्रान्ससारखी जुनी लोकसत्ता; पोलंड, झेकोस्लोव्हाकिया या देशांत दोन युद्धांच्या मध्यंतरांत स्थापन होऊन विलय पावलेल्या लोकसत्ता रशिया, चीन येथें तेथील लोकांच्या व विशेषतः नेत्यांच्या मते उदयास आलेल्या नव्या लोकसत्ता या सर्वोच्या तुलनेने पाहिलें तर कसलीहि पूर्व परंपरा नसतांना, अनंत भेदांनीं समाज जर्जर झालेला असतांना, लोकशाहींच्या जडयंत्रणेचे सर्व नियम पाळून, सरकारच्या मागें बहुमत टिकवून धरून, ते सरकार स्थिर व दृढ असे टिकवून धरण्यांत आपल्याला जे यश आले आहे ते खरोखरच अतुल असें आहे, हा विचार लोकांच्या गळीं उतरेल अशी आशा वाटते.
 अर्थात् झाली ही गोष्ट अपूर्व असली तरी ही अपूर्वाई अशीच टिकून राहील अशी शाश्वती देणे कठीण आहे. आपल्यापुढे दुर्लध्य असे अनेक पर्वत उभे आहेत. कामगार, किसान व अस्पृश्य यांचे प्रश्न सोडविल्यावांचून आपल्या शासनाच्या यशाचे मोजमाप करणे सयुक्तिक ठरणार नाहीं. येथील बहुसंख्य जनता दारिद्र्यांत आहे, अज्ञानांत आहे, अंध आहे. ती सुखी, सज्ञान व विवेकी झाल्यावांचून भरतभूमीच्या लोकसत्तेला सामर्थ्य प्राप्त होणार नाहीं. याशिवाय काश्मीरचा प्रश्न, पाकिस्तानच्या संभाव्य आक्रमणाचा प्रश्न, जातीयतेचा प्रश्न, भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न, निर्वासितांचा प्रश्न असे अनेक बिकट प्रश्न आपल्यापुढे उभे आहेत. या समस्यांची उत्तरे दिल्यावांचून आपली लोकसत्ता दृढ व बलशाली होणे शक्य नाहीं. या सर्व समस्या सोडवावयाच्या तर आपल्याला भारतीय लोकसत्तेचा फार सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे; तरच जगांतील इतर राष्ट्रांना जे निधान प्राप्त झाले नाहीं आणि आपल्या सुदैवानें जे आपल्याला प्राप्त झाले आहे, त्या निधानाचे आपल्याला रक्षण करतां येईल.
 या निधानाचें रक्षण करावयाचे, त्याची जपणूक करावयाची तर तें निधान आपल्या हातीं आले कसे याचा इतिहास पहाणें अवश्य आहे. लोकशाहीचा जो रोपा आपल्या हातीं आला आहे तो आम्रवृक्षाचा आहे हे खरे, पण त्याची एका महावृक्षांत परिणति घडवून आणण्यास फार कष्ट करण अवश्य आहे आणि म्हणूनच या रोप्यासाठीं पूर्व काळीं पूर्वसूरींनीं कोणते कष्ट घेतले ते आपणांस समजले पाहिजे, ते समजले तरच कोणत्या जीवनद्रव्यामुळे हा रोपा आतांपर्यंत पोसत आला, कोणत्या सत्त्वामुळे त्यानें आपली अलौकिक जाति टिकवून धरली हे आपणांस कळेल, आणि तींच जीवनद्रव्ये त्याला अखंड पुरवीत राहून त्याची यापुढेहि जोपासना कशी करावी याविषयींचे धोरण आखतां येईल. जगांत जे घडलें नाहीं, ते तेथे पांचसहा वर्षांत घडत आहे अर्से, इतर देशांचा निर्वाळा देऊन जें वर सांगितले तें जर सत्य असेल तर ते घडविण्याचे श्रेय गेल्या शंभर- दीडशे वर्षांत अर्वाचीन भारतांचा इतिहास ज्या महाभागांनी घडविला त्यांनाच आहे हे निर्विवाद आहे. म्हणूनच राजा राममोहन रॉय यांच्यापासून पंडित जवाहरलाल यांच्या पर्यंतच्या सर्व पुरुषांनी या लोकसत्तेच्या जोपासनेसाठीं कोणते परिश्रम केले, कोणतीं तत्त्वे सांगितलीं, कोणतीं व्रते आचरली व कोणत्या निष्ठा येथे दृढमूल केल्या हे समजून घेणं फार अगत्याचे आहे. हें आपणांस समजले तर भावी काळांत आपल्याला आपल्या लोकसत्तेचा विकास करून भरतराष्ट्र हें एक प्रबल व दुर्जय असे लोकसत्ताक राष्ट्र बनविण्यांत यश येईल.
 मागें सांगितल्याप्रमाणें सध्यांच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणा पाश्चात्यांकडून आलेल्या आहेत. आपण लोकशाहीचे पाठ युरोपीयांकडून व विशेषतः ब्रिटिशांकडून घेतले आहेत. गेल्या शंभर वर्षात आपल्याकडचे हजारों लोक युरोप-अमेरिकेचा प्रवास करून आले, हजारों लोकांनीं त्यांच्या राजकीय व इतर संस्थांचा ग्रंथांतून अभ्यास केला, लक्षावधि लोकांवर शाळा-कॉलेजांतील शिक्षणामुळे त्या विचारांचे संस्कार झाले आणि ब्रिटिशांनी गेल्या पन्नास वर्षात येथे ज्या अर्ध्यामुर्ध्या लोकायत्त संस्था स्थापन केल्या, त्यामुळे अखिल समाजाच्या डोक्यांवरून केव्हांना केव्हां तरी या विचारांच्या लाटा जाऊन तो बहुजन समाजहि या नव्या विचारांच्या रसायनांत थोडाफार भिजून निघाला आहे. अशा रीतीने सध्यांच्या आपल्या लोकशाहीच्या प्रेरणांच्या बाबतींत आपण सर्वस्वी पाश्चात्यांचे ऋणी आहो. म्हणून आपल्या लोकसत्तेचा अभ्यास करतांना आपण पश्चिमेंत विकसित झालेल्या लोकसत्तेची तत्त्वें कोणची व त्यांना भारतांत आणतांना आपल्या नेत्यांनी त्यांच्यावर कोणचे संस्कार केले, त्यांना कोणचे रूप दिले व तो आत्मसात् करून या देशांत तीं कशीं प्रसृत केलीं तें पाहिलें पाहिजे. यासाठी गेल्या शतकांत पश्चिमेकडून या भूमीत आलेल्या लोकशाहीच्या भिन्नभिन्न प्रेरणांच्या विवेचनास आतां आरंभ करतो.

सामुदायिक जीवन

 लोकसत्ता हें सामुदायिक जीवन आहे. सार्वजनिक जीवन आहे. सर्व समाजाचे हिताहित एक आहे, ते हिताहित त्या समाजांतील व्यक्तींच्या परस्परांतील संबंधावर अवलंबून आहे आणि म्हणून ते संबंध चांगले राखून सर्वांच्या सहकार्याने समाजाच्या उन्नतीची कार्ये केली पाहिजेत ही जाणीव ठेवून ज्या जनसमूहांतील घटक कार्यप्रवृत्त होतात, त्या समूहांत सामुदायिक जीवन निर्माण झाले आहे असे म्हणतां येईल. अशा समाजांतील प्रमुख व्यक्ति समाजाच्या उन्नतिअवनतीर्चे नेहमीं चिंतन करीत असतात, समाजांतील घडामोडीचे निरीक्षण करीत असतात व समाजाच्या भवितव्याविषयीं सदैव जागरूक राहून त्याला वेळोवेळी कार्यप्रवृत्त करीत असतात. समाज असा कार्यप्रवृत्त झाला म्हणजे तो सामाजिक जीवन जगत आहे असे आपण म्हणत. राजसत्तेमध्ये व्यक्तींच्या सहकार्याची अशी अपेक्षाच नसते. राजा व त्याचे अधिकारी आपल्या दृष्टिकोनांतून समाजाची व खरें म्हणजे आपल्या राज्याची काळजी वहातात व कांहीं कारणाने प्रजेच्या साह्याची आवश्यकता आहे असे दिसले तर आज्ञापत्र काढून सक्तीनें वा मोलाने, युद्धकाळीं ब्रिटिश सरकार जशी भारतीयांची सेवा घेत असे, त्याप्रमाणे, प्रजेची सेवा घेत असतात. अशी सेवा करण्यापलीकडे समाजांतील व्यक्ति सामाजिक किंवा सार्वजनिक असे कोणचेंच कृत्य करीत नाहींत आणि तसें करावयाचें नसल्यामुळे त्यांच्यांत सहकार्यांची भावनाहि फारशी निर्माण झालेली नसते. समाजाच्या परिस्थितीचें वा भवितव्याचे चिंतन हें तर त्यांच्या कधीं गांवींहि नसतें. त्यामुळे अशा समाजांत जीवन हें फुटीर व वैयक्तिक स्वरूपाचे असतें. सार्वजनिक जीवनाचा तेथे अभाव असतो आणि हें सार्वजनिक जीवन निर्माण झाल्यावांचून लोकशाहीच्या प्रवृत्ति निर्माण होणे शक्य नसते.

त्याचें लक्षण

 अशा सार्वजनिक जीवनाचे मुख्य प्रतीक, दृश्य स्वरूपांत गोचर होणारे पहिले प्रतीक म्हणजे त्या समाजांतील भिन्नभिन्न संस्था हें होय. अर्वाचीन समाजाचे जीवन हें संस्थांचे जीवन आहे. त्यांचा इतिहास म्हणजे त्यांतील प्रमुख संस्थांचा इतिहास होय व त्याची संस्कृति ही त्यांतील संस्थांची संस्कृति होय. आपले शरीर हें रक्ताच्या किंवा मांसाच्या कणाकणांनी घडलेले नाहीं. त्या रक्तमांसाच्या प्रथम पेशी होतात आणि त्या पेशी हेच शरीराचे आद्य घटक असतात. त्याचप्रमाणे समाजांतील भिन्नभिन्न संस्था याच खरोखर समाजशरीराच्या मुख्य घटक असतात. त्यांतील फुटीर व्यक्ति या नव्हेत. आपले शरीर हें उत्तम सहकार्याचे एक अत्युत्कृष्ट उदाहरण आहे. समस्त जीवनाच्या उन्नतिअवनतीची जबाबदारी त्यांतील प्रत्येक घटकावर आहे आणि एका घटकाचे सुखदुःख तेंच प्रत्येक घटकाचे सुखदु:ख आहे असा सक्त दण्डक असल्याचें दुसरें इतके चांगले उदाहरण सांपडणे फार कठीण आहे. अशा या शरीराचे आद्य घटक फुटीर असे मांसकण हे नसून त्या मांसाच्या किंवा जीवनरसाच्या बनलेल्या पेशी हे होत, पेशी विघटित झाल्या तर रक्तमांसाचे कण विद्यमान असूनहि शरीरव्यापार चालणार नाहींत. शरीरांत हें जें पेशींचे स्थान आहे तेच समाजांत संस्थांचे आहे. या संस्था मुळांतच नसल्या किंवा असून विघटित झाल्या तर, संस्थांचे कण म्हणजे ज्या व्यक्ति त्या जरी अस्तित्वांत असल्या तरी समाजाचे जीवन हे चालू शकणार नाहीं; ते स्थगित होईल, कुंठित होईल व अंतीं विनाश पावेल.

संस्थांचा जन्म

 गेल्या शतकांतील लोकशाहीच्या सिद्धतेचे पहिले लक्षण म्हणजे सार्वजनिक जीवन निर्माण करणाऱ्या अशा संस्थांचा जन्म हें होय. २६ ऑगस्ट १८५२ रोजी मुंबईला 'बॉम्बे असोसिएशन' नांवाची संस्था स्थापन झाली. पितामह दादाभाई, जगन्नाथ शंकरशेट, डॉ. भाऊ दाजी या मंडळींनी ही संस्था स्थापून हिंदुस्थानच्या अर्वाचीन राजकारणाचा पाया घातला. याच सुमारास बंगालमध्ये प्रसन्नकुमार ठाकूर, राजेंद्रलाल मित्र, हरिश्चंद्र मुकर्जी इ. कार्यकर्त्यांनी अशीच 'ब्रिटिश इंडिया असोसिएशन' नांवाची संस्था स्थापन केली होती आणि मद्रासमध्येहि 'मद्रास नेटिव्ह असोसिएशन' ही संस्था याच वेळीं उदयास आली होती.
 लोकशाही हे जे सामुदायिक जीवन आहे त्याला धार्मिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशी विविध अंगे अत्यंत अवश्य असली तरी प्रधानतः ते राजकीय जीवन आहे आणि म्हणूनच वर प्रथम राजकारणी संस्थांचा उल्लेख केला आहे. १८५० च्या आधीं सार्वजनिक जीवनाचे लक्षण म्हणजे ज्या संस्था त्या आपल्या भूमींत अस्तित्वांत आल्या होत्या; पण त्या धार्मिक, सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रांतल्या होत्या. त्यांना महत्त्व नाहीं असे नाहीं. त्यांचा विचार आपणांस करावयाचा आहेच. पण राजकारण हा लोकसत्तेचा गाभा असल्यामुळे त्याचें प्रवर्तन करणाऱ्या संस्थाचे महत्त्व जास्त आहे. आणि म्हणूनच त्यांचा निर्देश प्रथम केला आहे.
 ब्रिटिशांची सत्ता येथें प्रस्थापित होण्यापूर्वी हजार वर्षांच्या काळांत अशा प्रकारच्या संस्था आपल्या देशांत केव्हांच निर्माण झाल्या नव्हत्या आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे या अर्वाचीन संस्था स्थापन करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मनापुढे जे ध्येय होते त्या ध्येयाने या देशांत मागल्या काळांत कोणतेच लोक प्रेरित झालेले नव्हते. समाजाच्या उत्कर्षापकर्षाचें चिंतन करावे, त्याच्या भवितव्याची चिंता वहावी, घडलेल्या व घडणाऱ्या इतिहासाचे अनुभव जमेस धरून त्यांवरून कांहीं निष्कर्ष काढावे आणि त्याअन्वये समाजाची नवी घडी बसवावी हा जो समाजांतील तत्त्ववेत्त्यांचा प्रधान उद्योग तो या भरतभूमींत प्रायः लुप्तच झाला होता. आपल्या भूमीवर शेकडों वर्षे आक्रमणे कां होत आहेत, तीं मारून काढण्याचे पूर्वीसारखें सामर्थ्य आपल्या अंगीं कां नाहीं, आपली समाजरचनाच कांहीं बिघडली आहे काय, चातुर्वर्ण्य, जातिभेद, जन्मनिष्ठ उच्चनीचता यांचा याच्याशी कांहीं संबंध आहे काय, ही भूमि सुवर्णभूमि असूनहि येथे कायमची अन्नान्नदशा कां असावी, परकीय व्यापारी येथे येऊन येथून अमाप धन घेऊन जातात याचा अर्थ काय, हे कोण आहेत, कोठून येतात, यांचे व्यापार व कारभार सुयंत्रपणें चालविणारी यांच्यामागें कोणची शक्ति आहे, ती शक्ति त्यांच्या समाजरचनेचेंच विशिष्ट फल आहे काय, आपण आपला धर्म सर्वश्रेष्ठ समजतो ते बरोबर आहे काय, त्यांतील संन्यासप्रवृत्ति, आचारकांड व शब्दप्रामाण्य यांनीं आपला घात तर केला नाहींना, तसें असेल तर आपल्या धर्मात कोणच्या सुधारणा करणे अवश्य आहे, आपल्या समाजांत स्त्रीचें जे स्थान आहे ते आपल्या समाजाच्या कल्याणाला बाधक नाहीं काय, बालविवाह, असंमत वैधव्य इ. रूढी स्त्रीच्या जीवनाच्या परिणतीच्या आड येत नाहींत काय, आपण जी विद्या आपल्या समाजांत आहे असे म्हणत तिची खरोखरी काय किंमत आहे, विद्या या नांवाला तरी ती पात्र आहे काय, त्याहून पाश्चात्य विद्या कांहीं निराळ्या प्रकारची आहे काय, त्यांच्या बंदुका, त्यांचीं जहानें, त्यांचे छापखाने हीं त्या निराळ्या विद्येचीं तर फलें नव्हेत ना, हे व या तऱ्हेचे हजारों प्रश्न, जे त्या काळच्या समाजनेत्यांच्या व इतरहि अनेक घटकांच्या चित्तांत प्रादुर्भूत व्हावयास हवे होते, ते येथें कधीं झालेच नाहींत. शिवछत्रपती व समर्थ रामदासस्वामी या दोन विभूति सोडल्या तर समाजजीवनाचे अनुभवप्रमाणानें चिंतन करणारी व्यक्ति या हजार वर्षाच्या इतिहासांत दिसतच नाहीं आणि जेथे समाजाच्या चालूं प्रपंचाचे व भवितव्याचे चिंतनच नाहीं तेथे त्या भवितव्याला वळण लावणाऱ्या संस्था निर्माण होण्याचा संभव कोठला ?

चिंतनाचा अभाव

 मागल्या काळांत या भूमींत कोणी चिंतनच करीत नव्हते, येथे तत्त्वमंथनच होत नव्हतें, याचा अर्थ असा कीं इतिहास, अनुभव, अवलोकन, तर्क यांच्या साह्याने कोणी चिंतन करीत नव्हते. या दृष्टीनें कोणी तत्त्वमंथन करीत नव्हते. नाहींतर भोवताली घडणाऱ्या बऱ्यावाईट घटना पाहून प्रत्येक व्यक्तीच्या मनांत कांहीं तरी विचारचक्रे सुरू होतातच व आपल्या मगदुराप्रमाणे ती त्यांवरून कांहीं निष्कर्षहि काढीत असते. या तऱ्हेचे चिंतन व मनन ब्रिटिश पूर्वकाळांत येथे चालू होतें. येथे भिन्नभिन्न जातींच्या पंचायती व कधीं कधीं ब्रह्मवृंदांच्या सभाहि भरत असत. पण त्या पंचायती व त्या सभा जे निर्णय देत ते ठरीव चाकोरीच्या बाहेर कधी जात नसत. कांहीं आचारधर्मनियमांचा भंग झाला म्हणून समाज रसातळाला चालला आहे असा त्यांचा कायमचा निष्कर्ष असे. इतरहि विचारवेत्यांची ठरीवच विचारसरणी असे. 'सांप्रत विचार करतां हें युग विपरीत. तेव्हां दिवसेंदिवस धर्म क्षयास जाणार' असा सिद्धान्त पूर्वीच्यांनीं गृहीतच धरला होता. 'पुढे होणार भविष्य बलवंत. यास्तव नानासाहेबांस अशी बुद्धि झाली' अशा तऱ्हेची दैवाधीन विचारसरणी अवलंबूनच मागले लेखक घटनांची मीमांसा करीत असत. जे वाईट घडेल तें कलियुगामुळें, आणि चांगले होईल तें स्वामींच्या पुण्यप्रतापामुळे, हीच इतिहास मीमांसा त्यांना माहीत होती. तत्त्वमंथन किंवा चिंतन हे शब्द वापरतांना आपल्याला जो अर्थ अभिप्रेत असतो तो हा नव्हे. ब्रिटिश सत्ता येथे प्रस्थापित होऊन पाश्चात्यविद्येचा थोडाफार प्रसार झाल्याबरोबर पहिल्या पांचपन्नास वर्षांत येथल्या समाजधुरीणांच्या चित्तांत विचारांच जे तुफान माजलें, पुराणकालीं झालेल्या समुद्रमंथनापेक्षां सुद्धां जास्त प्रबल असें जें तत्त्वमंथन येथे सुरू झाले, नव्या विचारांच्या तीव्र उष्णतेमुळे येथल्या समाजाचीं कवचें उकलून ज्वालामुखीसारखे येथे जे स्फोट होऊं लागले, समाज, धर्म, नीति, अध्यात्म या क्षेत्रांत युगानुयुगे अविचलित मानलेले पहाडासारखे सिद्धांत एकदम गडगडल्यामुळे येथे जे प्रलयकंप अनुभवास येऊं लागले ते विचारांत घेतले म्हणजे मागल्या काळीं तत्त्वमंथन, मनन, समाजाच्या भवितव्याविषयींची चिंत्ता ही शून्यप्रायच होती हें कोणालाहि मान्य होईल. १८२५ ते १८८५ या पहिल्या काळखंडांत राजा राममोहन रॉय, ईश्वरचन्द्र विद्यासागर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, दादोबा पांडुरंग, ज्योतिराव फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर, टिळक, पंडित अयोध्यानाथ, स्वामी दयानंद, लाला हंसराज, लाला लजपतराय, आनंदाचार्लू, सुब्रह्मण्य अय्यर इ. अनेक नेत्यांना, कार्यकर्त्यांना व विचारवेत्त्यांना गेल्या हजार वर्षात जे प्रश्न येथल्या लोकांना प्रतीत झाले नाहींत म्हणून वर सांगितले तेच नेमके प्रतीत झाले. आणि त्यामुळे आपल्या समाजाचे अत्यंत अवनत रूप पाहून त्यांच्या पायाखालची धरणी हादरून गेली. पूर्वीच्या काळी वर निर्देशिलेले कांहीं अपवाद वगळतां या तऱ्हेनें पायाखालची धरणी हादरत नसे.
 आणि याचे प्रधान कारण म्हणजे सामुदायिक जीवनाची कल्पनाच त्या समाजांतून नष्ट झाली होती हें होय. येथें माणसें फुटीर अशा गटांनी भिन्नभिन्न कोंडाळ्यांतून आपापले कोंझें जीवन जगत होती. ब्राह्मणाला अंत्यजाच्या बऱ्यावाईटाची चिंता तर नव्हतीच, पण अखिल ब्राह्मण- समाजाच्या उत्कर्षाची चिंता तो वहात होता असेही नव्हतें. आणि हीच गोष्ट इतर जातींची होती. लग्नकार्य, बहिष्कार, ग्रामण्य येवढ्यापुरतेंच जातीय जीवन येथे होते. इंग्रज येथे आला तर तो कोण आहे हे जाणावें, त्याची विद्या हस्तगत करावी अशी चिंता ब्राह्मणांना कधींच लागली नव्हती आणि त्याचे युद्धशास्त्र अवगत करून घ्यावे असे क्षत्रियांना कधी वाटले नव्हतें. म्हणजे अखिल समाजाची चिंता येथे नव्हती येवढेच नव्हे तर जातींचें जें मर्यादित सामुदायिक जीवन त्याचीहि चिंता, कांहीं ठराविक विषयांपलीकडे, कोणी करीत नसत. येथे सर्वत्र व्यक्ति रहात होत्या. येथे समाज होता हें म्हणणे सत्याला फार सोडून होईल.
 पाश्चात्य संस्कृतीच्या व विशेषतः ब्रिटिश विद्येच्या प्रसारामुळे या भरतभूमींत जें मन्वंतर झाले त्याचे पहिले लक्षण हें कीं या भूमींत फार काळ लुप्त झालेले सामुदायिक किंवा सार्वजनिक जीवन पुन्हां अवतीर्ण झालें. आणि त्याचे प्रत्यक्ष कारण हेच की, येथें विचारी लोकांनी समाजाच्या भवितव्याचे चिंतन व तत्त्वमंथन करण्यास प्रारंभ केला आणि त्यामुळे गेले शतक संपण्याचें आतच या देशाच्या जवळजवळ प्रत्येक प्रांतांत धर्मकारण, समाजकारण, राजकारण, वाङ्मय, शिक्षण, इतिहास, विज्ञान इ. क्षेत्रांत कार्य करून आपल्या समाजाला आपापल्या दृष्टीने वळण लावण्याच्या हेतूने शेकडो संस्था निर्माण झाल्या व त्यांनीं भरतखंडाचे रूप अगदीं अल्पावकाशांत आपादमस्तक पालटून टाकलें.
 १८८५ सालीं काँग्रेसची स्थापना झाली व दोनच वर्षांनी सामाजिक परिषदहि निर्माण झाली. सुमारे ८/१० वर्षांत म्हणजे १८९५ पर्यंत या दोन्ही संस्थांचे आसन स्थिर होऊन त्यांच्या रूपरेषाहि थोड्याफार निश्चित झाल्या आणि त्यामुळे या भूमित अखिल भरतखंडाचे सामुदायिक जीवन निर्माण झालें. अखिल भरतभूचें धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक- सर्व तऱ्हेचे प्रश्न एकच आहेत. सर्व प्रांतांतील लोकांची सुखदुःखें, आशा- आकांक्षा, रागद्वेष एकच आहेत, व सर्व भारतीयांना सारख्याच आपत्तीशीं झुंजावयाचे आहे अशी अखिल भारतीय भावना, अखिल भारताच्या ऐक्याची व त्याबरोबरच पृथगात्मतेची भावना त्या सुमारास निर्माण झाली. पण हा जो अखिल भारतीय सार्वजनिक जीवनाचा महासिंधु निर्माण झाला तो कांहीं एकदम निर्माण झाला नाहीं. त्यापूर्वी सुमारे ६०/७० वर्षे लहान- लहान गांवांतून त्या जीवनाचे बिंदु तयार होत होते. मोठमोठ्या शहरांतून त्यांचे जलौघ वाहूं लागले होते आणि भिन्नभिन्न प्रांतातून सामुदायिक जीवनाच्या सरिताहि त्या महासिंधूच्या रोखाने मार्ग क्रमूं लागल्या होत्या. या सर्वाचाच १८८५ ते ९५ या काळांत संगम होऊन भारतीय सामुदायिक जीवनाचा महासागर निर्माण झाला आणि पुढील पन्नास वर्षात त्याला उधान येऊन त्यांतूनच शेवटीं लोकसत्तेचा अमृतकलश भारतीयांच्या हातीं आला. तो सर्व इतिहास आपणांस पुढे पहावयाचा आहे. आतां प्रथम भिन्नभिन्न प्रांतांत नानाविध संस्थानीं हें सामुदायिक जीवन निर्माण कसें केले आणि त्या वेळीं त्यांच्यापुढे प्रधान उद्दिष्ट कोणचें होतें याचा विचार करूं.
 या जीवनाच्या प्रधान प्रेरणा पाश्चात्यांकडून आल्या याचें प्रत्यक्ष गमक हेंच की, ज्या प्रांतांत पाश्चात्यविद्येचा प्रसार प्रथम झाला तेथे या नवजीवनास प्रथम प्रारंभ झाला. अर्वाचीन भारताच्या बहुतेक सर्व जीवनाच्या क्षेत्रांतील आदिशक्तींचा उदय बंगालमध्ये झालेला आहे. राजा राममोहन रॉय यांनी धर्मसुधारणेसाठी ब्राह्मसमाजाची स्थापना केली (१८२८) आणि त्यांतूनच पुढे देवसमाज, नवविधान इ. संस्था निघाल्या. प्रसन्नकुमार ठाकूर यांनी स्थापन केलेल्या कलकत्त्याच्या ब्रिटिश इंडिया असोसिएशनचा (१८५१) उल्लेख वर आलाच आहे. अशा रीतीने एकदां प्रारंभ झाल्यानंतर सर्व प्रांतांत पुढील पन्नाससाठ वर्षात शेकडों संस्था भराभर उदयास आल्या. दादोबा पाडुरंग यांनी १८४३ साली स्थापन केलेली मानवधर्मसभा, १८५० साली स्थापिलेली परमहंससभा, त्यांचेच बंधु डॉ. आत्माराम पांडुरंग यांनी स्थापिलेला प्रार्थनासमाज (१८६७); महात्मा जोतिराव फुले यांचा सत्यशोधकसमाज (१८७३); स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईस स्थापन केलेला, पण पंजाबांत दृढमूल झालेला आर्यसमाज (१८७५); संयुक्त प्रांतांतील भार्गवसभा, पंजाबांतील आगरवाल व जाट यांच्या सभा, रजपुतान्यांतील माळीसभा, जैतपूरची महाजनसभा, बल्लारीचा सन्मार्गसमाज, गाझीपूर, मीरत, अजमीर येथील सभा, सिंधमधील संध असोसिएशन, अयोध्या प्रांतांतील कायस्थ सभा- या सर्व सभा सामाजिक व धार्मिक सुधारणा करण्याचा हेतूने प्रस्थापित झाल्या होत्या. वर उल्लेखिलेली कलकत्त्याची ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मुंबईची बाँबे असोसिएशन, मद्रासची मद्रास नेटिव्ह असोसिएशन, कलकत्त्यास १८७६ साली निघालेली इंडियन असोसिएशन, पुण्याची सार्वजनिक सभा (१८७२) व मद्रासची महाजनसभा या राजकीय संस्था होत्या. ज्ञानप्रसारकसभा, स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, हिंदू युनियन क्लब इ. संस्था ज्ञानोपासनेच्या उद्देशाने निघाल्या होत्या.

वृत्तपत्रे- दुसरें लक्षण

 संस्थांप्रमाणेच वर्तमानपत्रे व एकंदर नियतकालिके हीं पण सार्वजनिक जीवनाची प्रतीकेंच आहेत. राष्ट्रपुरुषाच्या शरीरांत विचारांचे अभिसरण कायम चालूं ठेवण्याचे काम ही वृत्तपत्रेंच करीत असतात. अर्वाचीन काळांत वृत्तपत्रावांचून सामुदायिक जीवन क्षणभरहि चालू राहाणार नाहीं. अशा या वृत्तपत्रांचा उदय व वाढ वर निर्देशिलेल्या काळांतच झालेली आहे. राजा राममोहन रॉय यांच्या संस्थेचे 'बंगाली हेरल्ड' हें मुखपत्र होतें. १८४० च्या सुमारास कलकत्त्यास 'प्रभाकर' नांवाचे एक पत्र ईश्वरचंद्र गुप्त यांनी काढले होते. उमेशचंद्र बॅनर्जी यांनी १८६२ साली बंगाली' हे पत्र सुरू केले. हेंच पत्र पुढे १८७८ साली सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी घेतले व त्याच्या साह्याने बंगाल हलवून सोडला. बाबू शशिकुमार घोष यांच्या 'अमृतबझार पत्रिके' चा जन्म १८६८ साली झाला होता. महाराष्ट्रांत बाळशास्त्री जांभेकर व भाऊ महाजन यांनी १८३२ साली 'दर्पण' नांवाचे पाक्षिक काढले आणि पुढे १८४० साली भाऊ महाजन यांनीं 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक एकट्यांनीच चालू केले. पुढे १८४९ साली 'ज्ञानप्रकाश' १८६२ साली 'इंदुप्रकाश' १८६४ साली मंडलिकांचें 'नेटिव्ह ओपिनियन' १८७७ साली कृष्णराव भालेकरांचे 'दीनबंधु' हीं पत्रें निघालीं आणि १८८१ या साली 'केसरी' व 'मराठा' या पत्रांचा जन्म झाला. १८७९ साली सुब्रहाण्य अय्यर यांनी मद्रासला 'हिंदु' हें पत्र चालू केलें. डॉ. पट्टाभींच्या मतें मद्रास प्रांतांत सार्वजनिक जीवन या पत्रामुळेच निर्माण झाले. १८८२ साली अय्यर यांनीच 'स्वदेश मित्रम्' हें दैनिक चालू केले. प्रयागचे पंडित अयोध्यानाथ यांच्या नेतृत्वाने १८७९ साली 'इंडियन हेरल्ड' हें पत्र निघाले होते आणि 'हिंदुस्थान' हें पत्र हातीं घेऊन १८८७ सालीं मालवीयजींनी आपले कार्य चालू केले होते. स्वामी दयानंदांपासून स्फूर्ति पावलेले लालाहंसराज यांनी 'री जनरेटर ऑफ आर्यावर्त' या पत्राच्या साह्याने १८८१ सालींच जागृतीच्या कार्यास प्रारंभ केला होता.
 हा सर्व इतिहास हिंदु समाजांतील जागृतीचा आहे. पण अगदीं याच मार्गाने मुसलमान, पारशी हेहि समाज जागृत झाले होते व असेच कार्यप्रवृत्तहि झाले होते. सर सय्यद अहंमद यांनी पाश्चात्य ज्ञानाच्या प्रसारासाठी १८६३ साली 'सायंटिफिक् सोसायटी' स्थापन केली आणि १८७१ साली 'सोशल रिफॉर्मर' हे पत्र मुसलमान समाजाच्या सुधारणेच्या हेतूनें चालू केलें. १८७७ सालीं त्यांनी आपल्या प्रसिद्ध 'अलीगड विद्यापीठाची' स्थापना केली. १८५१ साली 'राहनुमाई मझदेस्तन' ही पारशी समाजाची धर्मसुधारक सभा स्थापिली गेली. दादाभाई नौरोजी, वाच्छा, नौरोजी फर्दूनजी ही मंडळी या सभेच्या प्रवर्तकांत अग्रेसर होती; 'रास्त गोफ्तार' हें पत्रहि तिनें चालू केले.

मानवत्वाची प्रतिष्ठा

 मागें सांगितलेच आहे कीं, गेल्या शतकाच्या पूर्वार्धातच या देशांत पाश्चात्य संस्कृतीच्या आगमामुळे पूर्वकाळच्या समुद्रमंथनापेक्षांहि जास्त वेगानें तात्त्विक विचारांचे मंथन सुरू झालें होतें आणि त्या पौराणिक मंथनांतून जशीं महार्हरत्नें निघालीं तशींच या अर्वाचीन वैचारिक मंथनांतूनहि अनेक तत्त्वरूप रत्नें निघाली. या रत्नांतील अत्यंत श्रेष्ठ व लोकसत्तेच्या दिव्य तत्त्वाची प्रभा सर्वत्र विकिरित करणारें रत्न म्हणजे 'मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति' हे होय.
 समाजांतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला स्वतंत्र महत्त्व आहे, केवळ समाजाचा एक घटक या दृष्टीने तिच्याकडे पहावयाचे नसून एक स्वत: सिद्ध व स्वयंपूर्ण मानव या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिले पाहिजे, समाजरचनेचीं तत्त्वे दुसऱ्या कोणत्या तरी पारलौकिक दृष्टीने ठरवून मग त्यांत जेथें कोठें चौकटींत वा सापटीत मानव बसेल तेथे त्याला बसवावयाचा असे धोरण न अवलंबिता मानवाचे सुख, त्याचा गुणविकास, त्याच्या व्यक्तित्वाचा उत्कर्ष हेंच मूलभूत ध्येय ठेवून त्याला अनुसरूनच समाजरचनेंची तत्त्वें ठरविली पाहिजेत हा जो विचार तो म्हणजे लोकशाहीचा आदिसिद्धांतच आहे. पण मानवाच्या जीविताला एक विशेष प्रतिष्ठा आहे, ही जाणीव झाल्यावांचून या सिद्धांताला कोणी मान देणार नाहीं. म्हणूनच 'मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति' हे सर्वात श्रेष्ठ असें तत्त्वरत्न होय असे वर म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रुमन यांनी अमेरिकेतील उच्च शिक्षणाची पुनर्घटना करण्यासाठी १९४८ सालीं एक समिति नेमली होती. तिचें इतिवृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्यांत 'व्यक्तिजीवनाचे स्वयंसिद्ध महत्त्व व मानवी जीवनाची प्रतिष्ठा यांवरील दृढ श्रद्धा हेंच लोकसत्तेचें मूल महातत्त्व होय, आणि उच्च शिक्षणांत त्याचा प्रामुख्याने अंतर्भाव झाला पाहिजे' असे आग्रहाने सांगितले आहे. (संडे न्यूज १२ | १२ | ४८) नेमक्या याच तत्त्वाचा उपदेश न्या. रानडे यांनी आपल्या सामाजिक परिषदांतील भाषणांतून केला आहे.

 मानवाच्या मानवत्वाची ही जी स्वयंसिद्ध प्रतिष्ठा तिच्यावर समाजनेते श्रद्धा ठेवतात कीं न ठेवतात, ती त्यांना मान्य आहे कीं नाहीं, यावरच त्या त्या समाजांतील बंधने, नियंत्रण, नियमने हीं सर्वस्वी अवलंबून असतात. आणि या दृष्टीने विचार करून १८५० च्या पूर्वीच्या अनेक शतकांत आपल्या देशांत जीं समाजबंधने रूढ होतीं त्यांचे परीक्षण केलें तर असें दिसून येते की त्या बंधनांच्या प्रणेत्यांना मानवी जीवनाची प्रतिष्ठा मान्य तर नव्हतीच पण ती त्यांना ज्ञातहि नव्हती. त्या काळीं भारतीय समाजांतील सर्व श्रेष्ठ व कनिष्ठ जातींमध्ये व्यक्तींच्या सर्व क्षेत्रांतील व्यवहारावर जीं अनंत बंधने होतीं त्यांचा नुसता विचार सुद्धां आज आपल्याला दुःसह वाटतो. स्नानाविषयीं नियम, भोजनाविषयीं नियम, शौचाविषयीं नियम, मुखशुद्धिविषयीं नियम, निजण्यासंबंधींचे निर्बंध उठण्यासंबंधींचे निर्बंध, कपड्यासंबंधींचे निर्बंध, जन्माच्या आधींच बंधनें, मरणानंतरची बंधने, तिथि, वार, नक्षत्र, महिना यांविषयींचीं नियंत्रण, विवाहविषयक आज्ञा, जातिभेद- विषयक आज्ञा, परस्परव्यवहाराविषय आज्ञा, प्रवास, परदेशगमन, भक्ष्याभक्ष्य, पेयापेय, स्पर्श यांचे विधिनिषेध– हे सर्व निर्बंध आणि त्यांच्या अल्पशा भंगाबद्दलचीं तीं शेकडों प्रायश्चित्तें हीं मानवी प्रतिष्ठेला इतकीं उपमर्दकारक आहेत, मानवाच्या व्यक्तित्वाचा त्यामुळे इतका अवमान होतो, आणि त्या बंधनांच्या प्रणेत्यांची मानवाबद्दलची तुच्छताबुद्धि त्यांमुळे इतकी स्पष्ट होते कीं, असल्या समाजांत लोकशाही तर लांबच राहिली, पण कोणत्याहि प्रकारचे श्रेष्ठ मानवी कर्तृत्व निर्माण होणे कालत्रयीं शक्य नाहीं असा एखाद्यानें तर्क बांधला तर इतिहास सर्वतोपरी त्याचा पाठपुरावाच करील.

तर्कशून्य बंधने

 मानवी समाजाचे व्यवहार सुरळित चालावयाचे तर त्यासाठी बंधनें असणें अवश्य आहे, पण त्या बंधनांना कांहीं तर्काचा, उपयुक्ततेचा, सद्हेतूचा पाठिंबा असला पाहिजे. तो पाठिंबा जेव्हां नसतो आणि धर्मसिंधु, निर्णयसिंधु या ग्रंथांतल्याप्रमाणे हीं बंधनें जेव्हां हेतुशून्य, अर्थशून्य, तर्कशून्य व केवळ धर्माज्ञेवर तगणारी अशीं असतात त्या वेळीं तीं मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक अशीं ठरतात. या बंधनांनी मानवाचे मानवत्वच संपुष्टांत येते. एखाद्या सुतावर पाय पडला, एखादा पाण्याचा थेंब अंगावर पडला, कोणाची सावली अंगावर पडली किंवा कसल्या तरी धान्याचा कण पोटांत गेला, किंवा नुसता कोणाचा शब्द कानावर आला तरी तेवढ्यामुळे मानव पतित ठरावा, अमंगळ ठरावा आणि त्याबद्दल त्याला प्रायश्चित्त घेणे भाग पडावे अशा प्रकारच्या धर्माज्ञा प्रचलित करणाऱ्यांच्या मनांत मानवी जीवनाच्या मूलभूत महत्त्वाची किती दखल असेल तें सहन कळून येईल. मानव म्हणजे त्याची बुद्धि, त्याचे मन, त्याचा आत्मा, त्याच्या निष्ठा, त्याची श्रद्धा, त्याची विचारसरणी, त्याच्या आशा आकांक्षा हा सर्व जगतांतल्या तत्त्ववेत्यांना मान्य असलेला सिद्धान्त वरील प्रकारच्या धर्मपंडितांनी पायदळी तुडविला आहे. लोकसत्तेच्या कल्पना त्यांना माहीत नसतील, पण देहबुद्धि ही खोटी आहे, मानव म्हणजे मानवाचा देह नसून मानव म्हणजे अंतरांतील आत्मा होय, हा वेदान्तसिद्धान्त तर त्यांना माहीत होता ना ? पण तो धर्मग्रंथांत होता. प्रत्यक्षांत त्यांच्या मतें मानव म्हणजे त्याचा देह, त्याचॆं जड शरीर ! कारण त्याला केवळ एका सुताचा स्पर्श झाला कीं, तो मानव पतित होतो आणि केवळ त्या शरीरावर कांहीं संस्कार केले की तो शुद्ध होतो. मानवाच्या प्रतिष्ठेचा उपमर्द तो हाच. ही विचारसरणी मानवाला देहप्रधान मानते, पशुवत् लेखते. ती मन, बुद्धि, श्रद्धा, आत्मा या मानवत्वाच्या उच्च घटकांची दखलच घेत नाहीं. मनुष्य म्हणजे मनुष्याचा आत्मा, देह नव्हे, देह म्हणजे मी अशी भावना ठेवल्यामुळे मनुष्य मोक्षाला अपात्र ठरतो; अशा प्रकारचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान एका तोंडाने सांगणाऱ्या या धर्मवेत्त्यांनी दुसऱ्या तोंडाने मानवाला जो धर्म सांगितला तो फक्त त्याचा जड देहच विचारात घेऊन सांगावा आणि नुसत्या स्पर्शाने किंवा सांवलीने त्याला पतित मानण्यास प्रवृत्त व्हावे यापरता जास्त अधःपात तो काय ? आणि जेथें धर्मवेत्तेच असे हीन, पतित व प्रज्ञाहत होते तेथे मानवाची प्रतिष्ठा कशी सुरक्षित राहणार !
 न्या. रानडे यांच्या सर्व सुधारणेचे 'मानवी प्रतिष्ठेचें पुनरुज्जीवन' हें आदिसूत्र होतें. 'आपल्या अधःपाताचे मूल कारण म्हणजे आपणांवरची सर्व बंधने हीं विवेकबंधने नसून तीं बाह्य व जड अशी बंधने आहेत, हें होय. यामुळे आपली मनें बाल्यावस्थेतच राहिली. स्वयंशासन, आत्मसंयम यांमुळे येणारी मानवी प्रतिष्ठा आपल्याला आलीच नाहीं' असे उद्गार त्यांनी कलकत्याच्या दहाव्या सामाजिक परिषदेत भाषण करतांना काढले आहेत. (मिसलेनियस रायटिंग्ज् पृ. १९२-९३) आणि श्रेष्ठ मानवी प्रतिष्ठेची जाणीव हाच या अधःपातावर उपाय आहे, असा संदेश सांगितला आहे. वरील ग्रंथांत त्यांचीं जीं सामाजिक परिषदांत झालेली दहाबारा भाषण दिलीं आहेत, त्यांत तीनचार ठिकाणी या तत्त्वाचा त्यांनी उल्लेख केला आहे. यावरून त्यांना त्याचे किती महत्त्व वाटत होते कळून येईल.

मानवत्वाचा अवमान

 ब्रिटिशांच्या पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळांत येथे समाजरचनेचीं जीं तत्त्वें मान्य व रूढ झाली होतीं, त्यांतील जवळजवळ प्रत्येक तत्त्व मानवी प्रतिष्ठेला घातक असेंच होर्ते. कलियुगाची कल्पना, जन्मनिष्ठ उच्चनीचता, दैववादाचे किंवा नियतिवादाचे तत्त्व, संसाराविषयींची व विशेषतः स्त्रियांविषयींची उपेक्षाबुद्धि, तर्कांची अवहेलना, शब्दप्रामाण्य, यांतील प्रत्येक तत्त्व मानवाच्या स्वत्वाची पायमल्ली करणारे आहे आणि याच्या जोडीला या सर्वांच्या आधाराने उभारलेलें तें कर्मकांड, तो अत्यंत अमंगळ असा आचारप्रधान धर्म !
 असल्या अधम व हीन धर्माचे जे अनुयायी त्यांच्यांत लोकसत्ता तर राहोच, पण मानवी कर्तृत्वाचा निदर्शक असा कोणचाच गुण निर्माण होणे शक्य नव्हते आणि पाश्चात्य विद्येनें ज्यांना नवी दृष्टि प्राप्त झाली होती, अशा सर्व धर्मवेत्यांना हीच भयावह गोष्ट प्रथम जाणवली. राममोहन, केशवचन्द्रसेन, ईश्वरचन्द्र विद्यासागर, पंडित सीतानाथ, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले, लोकहितवादी, सर सय्यद अहंमद, रानडे, भांडारकर, स्वामी दयानंद, लाला हंसराज, आगरकर, विवेकानंद इ. गेल्या शतकांतील सर्व प्रमुख समाजनेते हे प्रामुख्याने धर्मसुधारक होते त्याचें कारण हे आहे. प्रत्येकाने पहिला घण त्या कर्मकांडप्रधान जडधर्मांवर घातलेला आहे. त्यांच्या धर्मसुधारणेचे लक्षण एकच होते. मानवाला देहप्रधान गणून आधींच्या जडधि अशा धर्मपंडितांनी सांगितलेला हीन व अपवित्र असा आचारधर्म नष्ट करून त्या जागीं त्याच्या मनाची, बुद्धीची, आत्म्याची प्रतिष्ठा वाढविणारा तात्त्विक धर्म प्रस्थापित करणें हेंच ते लक्षण होय. धर्म हे मनाचे संस्कार आहेत देहाचे नव्हेत. धर्म म्हणजे मनोजय, धर्म म्हणजे आत्मसंयमन, धर्म म्हणजे भूतदया, धर्म म्हणजे श्रद्धा, भक्ति, प्रेम हा महनीय विचार त्यांना सांगावयाचा होता; आणि वेद, उपनिषदे, गीता, आवेस्ता, कुराण या आपल्या आदि धर्मग्रंथांच्या आधाराने त्यांनीं तो सांगितला. मधल्या काळांत मानलेला आचारधर्म हा मूळवृक्षावर माजलेल्या बांडगुळाप्रमाणे होय, हेंच मत राममोहन, स्वामी दयानंद, विवेकानंद, खरशेडजी रुस्तुमजी कामा, सर सय्यद अहंमद या गेल्या शतकांतील प्रमुख धर्मसुधारकांनी सांगितले आणि धर्म ही मुख्यतः मानसिक उन्नति आहे आणि तिच्यासाठी विवेक, बुद्धि, तर्क यांचाहि उपयोग श्रद्धा, भक्ति यांचे बरोबर झाला पाहिजे, हा विचार आपापल्या सधर्मीयांच्या मनावर बिंबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
 आणि यांतच कळून वा नकळून त्यांनी लोकायत्त शासनाच्या सिद्धतेला बहुमोल साह्य केले आहे. ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स येथील लोकसत्ताकांचा इतिहास आपण पाहिला तर मानवाच्या मनाभवतीं असलेल्या अनेक जाचक अशा शृंखला तुटून पडल्यावांचून ते मन लोकायत्त शासनाची अवघड जबाबदारी पेलण्यास समर्थ होऊं शकत नाहीं, हा विचार त्या इतिहासांत अनेक वेळां आपणांस दिसून येईल. त्या अनेक शृंखलापैकीं जड आचारधर्मांची शृंखला अत्यंत जाचक असते. विज्ञानाच्या साह्याने ती शृंखला त्या त्या देशांतील पंडितांनी तोडून काढली, तेव्हांच त्यांचे पाऊल पुढे पडलें. आपल्या भरतभूमीत येथल्या पूर्वसूरींनीं नेमकी याच स्वरूपाची धर्मक्रान्ति घडवून आणली आणि त्यायोगे मानवाच्या मानवत्वाची प्रतिष्ठा वाढवून भारतीय लोकसत्तेचा पाया घातला.




प्रकरण तिसरें
समतेचा महामंत्र

 लोकसत्ता हें अत्यंत क्रांन्तिकारक असे तत्त्व आहे. त्याच्या आगमना- बरोबर समाजाच्या सर्व रचनेत आमूलाग्र परिवर्तन घडून येत असते. धर्म, नीति, शिक्षण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था या क्षेत्रांतील कोणचीहि संस्था लोकायत्त युगांत जुन्या रूपांत टिकूं शकणार नाहीं, आणि तशी ती टिकून राहिली तर लोकसत्ता यशस्वी होणार नाहीं. जुन्या काळच्या या संस्थांनी त्या काळच्या मानवी मनावर शेकडो वर्षे संस्कार करून त्या मनाची एक विशिष्ट घडण बनविलेली असते, आणि ती घडण लोकसत्तेस सर्वस्व प्रतिकूल असते. 'लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नसून लोकशाही म्हणजे प्राधान्याने एक मनोवृत्ति, एक विशिष्ट विचारप्रणाली आहे.' हें विड्रोविल्सन यांचे वचन मागें एकदां उद्धृत केलें आहे. ही जी त्यांनी सांगितलेली मनोवृत्ति ती जुन्या पीठिकांतून निर्माण होणे शक्य नसते. जुन्या पीठिकांचे संस्कार घेऊन त्याच धोरणाने कार्यप्रवृत्त झालेली माणसे लोकशाही कधींच यशस्वी करूं शकणार नाहींत. लोकशाही यशस्वी होण्यास माणसांची नवीनच पिढी निर्माण होणें अवश्य असते. नव्या संस्था व नवीन समाजरचना यांना नव्याच माणसांची आवश्यकता असते. हा नवा माणूस गेल्या शतकांत कसा निर्माण झाला व गेल्या शतकांतील विचारवेत्त्यांनी त्याच्या स्वागताची तयारी कशी केली तें आपण पहात आहों, ते पहातांना पहिली