Jump to content

भारतीय लोकसत्ता/समतेचा महामंत्र

विकिस्रोत कडून
अनेक वेळां आपणांस दिसून येईल. त्या अनेक शृंखलापैकीं जड आचारधर्मांची शृंखला अत्यंत जाचक असते. विज्ञानाच्या साह्याने ती शृंखला त्या त्या देशांतील पंडितांनी तोडून काढली, तेव्हांच त्यांचे पाऊल पुढे पडलें. आपल्या भरतभूमीत येथल्या पूर्वसूरींनीं नेमकी याच स्वरूपाची धर्मक्रान्ति घडवून आणली आणि त्यायोगे मानवाच्या मानवत्वाची प्रतिष्ठा वाढवून भारतीय लोकसत्तेचा पाया घातला.




प्रकरण तिसरें
समतेचा महामंत्र

 लोकसत्ता हें अत्यंत क्रांन्तिकारक असे तत्त्व आहे. त्याच्या आगमना- बरोबर समाजाच्या सर्व रचनेत आमूलाग्र परिवर्तन घडून येत असते. धर्म, नीति, शिक्षण, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था या क्षेत्रांतील कोणचीहि संस्था लोकायत्त युगांत जुन्या रूपांत टिकूं शकणार नाहीं, आणि तशी ती टिकून राहिली तर लोकसत्ता यशस्वी होणार नाहीं. जुन्या काळच्या या संस्थांनी त्या काळच्या मानवी मनावर शेकडो वर्षे संस्कार करून त्या मनाची एक विशिष्ट घडण बनविलेली असते, आणि ती घडण लोकसत्तेस सर्वस्व प्रतिकूल असते. 'लोकशाही हा केवळ शासनसंस्थेचा प्रकार नसून लोकशाही म्हणजे प्राधान्याने एक मनोवृत्ति, एक विशिष्ट विचारप्रणाली आहे.' हें विड्रोविल्सन यांचे वचन मागें एकदां उद्धृत केलें आहे. ही जी त्यांनी सांगितलेली मनोवृत्ति ती जुन्या पीठिकांतून निर्माण होणे शक्य नसते. जुन्या पीठिकांचे संस्कार घेऊन त्याच धोरणाने कार्यप्रवृत्त झालेली माणसे लोकशाही कधींच यशस्वी करूं शकणार नाहींत. लोकशाही यशस्वी होण्यास माणसांची नवीनच पिढी निर्माण होणें अवश्य असते. नव्या संस्था व नवीन समाजरचना यांना नव्याच माणसांची आवश्यकता असते. हा नवा माणूस गेल्या शतकांत कसा निर्माण झाला व गेल्या शतकांतील विचारवेत्त्यांनी त्याच्या स्वागताची तयारी कशी केली तें आपण पहात आहों, ते पहातांना पहिली गोष्ट आपल्या ध्यानांत आली ती अशी की, त्या समाजधुरीणांनी प्रथमतः त्या मानवाला स्वतःच्या मानवत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति आणून दिली. त्याचें स्वत्व, त्याच्या मनुष्यत्वाचा अहंकार हा प्रथम त्यांनी जागृत केला आणि अशा रीतीनें या भूमीत त्यांनी नवयुग निर्माण केले.
 मानवाची प्रतिष्ठा जागृत करण्यासाठी त्या कार्यकर्त्यांनी या प्रतिष्ठेचा पहिला शत्रु जो अंध आचारधर्म त्यावर प्रथम हल्ला चढविला, हें मागें सांगितलेच आहे. पण एवढे करून ते स्वस्थ बसले नाहीत. या आचारधर्माइतकीच आपल्या समाजरचनेच्या बुडाशी असलेली जन्मनिष्ठ उच्चनीचता हीहि लोकसत्तेला विघातक आहे, हे ध्यानीं घेऊन याहि रोगाचें निर्मूलन करण्याचे त्यांनीं शक्य ते प्रयत्न सुरू केले व समतेच्या महामंत्राच्या जपयज्ञाला प्रारंभ केला.

विषमतेवर आघात

 या बाबतीत पहिला कांहींसा संघटित प्रयत्न महाराष्ट्रांत मराठी भाषेचे पाणिनि दादोबा पांडुरंग यांनी केला. जातिभेदाने आपल्या समाजाचा नाश झाला आहे हा विचार त्यांनी सुरतेस 'मानवधर्मसभा' स्थापन केली त्याच वेळी त्यांच्या मनाशीं निश्चित झाला होता. या सभेचे जे सात सिद्धांत आहेत त्यांत 'मनुष्यमात्राची जाति एक आहे' व 'मनुष्यामध्यें उत्तम कोण व अधम कोण हें गुणावरून ठरवावें' असे दोन आहेत. पण याप्रमाणे केवळ सिद्धांत सांगून दादोबांचें समाधान झाले नाहीं. हा विचार कृतींत आणण्यासाठी त्यांनी १८५० च्या सुमारास 'परमहंस सभा' या नांवाची संस्था स्थापन केली. १८४६ मध्ये शाळा-शिक्षक तयार करण्याचा जो नॉर्मल क्लास निघाला त्याचे डायरेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्या शिक्षकांना ते जातिभेदाची अनिष्टता पटवून देऊन तो नष्ट करून टाकण्याची आवश्यकता किती आहे ते समजावून देत असत आणि याच विचाराने प्रेरित होऊन त्यांनी ही 'परमहंस सभा' स्थापन केली होती. या सभेंत सर्व जातीच्या व धर्माच्या लोकांना प्रवेश असे. प्रथम सभासद होतांना नव्या गृहस्थाला 'मी जातिभेद मानणार नाहीं.' अशी प्रतिज्ञा करावी लागे. नंतर त्यास किरिस्तावानें केलेल्या पावाचा एक तुकडा खावयास देत. अशा रीतीने सभासद झालेल्या लोकांचें वर्षातून बऱ्याच वेळां सहभोजनहि होत असें. पण हे सर्व गुप्तपणे चाले. समाजांत व्याख्यानरूपानें वा लेखरूपाने या संस्थेचा मतप्रचार चालत नसे. दादोबांचे नॉर्मल क्लासमधील शिष्य आपापल्या गांवीं जाऊन शिक्षक म्हणून काम करूं लागल्यावर आपल्या परमहंस मताचा प्रचार करीत. पण यापेक्षां जास्त व्यापक रूप या प्रयत्नाला आलें नाहीं. (दादोबा पांडुरंग चरित्र, प्रियोळकर, पृ. २४९-२८२.)
 भारतीय समाजांतील जन्मनिष्ठ विषमता नष्ट करून समतेच्या पायावर त्याची पुनर्घटना केली पाहिजे, हा विचार इतर अनेक क्रान्तिकारक विचाराप्रमाणेंच राजा राममोहन रॉय यांनी सांगितला आहे. मात्र या क्षेत्रांत त्यांनी जोराची चळवळ केली नाहीं. ती पुढे केशवचंद्र सेन यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. त्यांनी ब्राह्मसमाजामार्फत अनेक भिन्नजातीय विवाह घडवून आणले आणि त्यांना मान्यता देण्यासाठी १८७२ साली सरकारकडून तसा कायदाहि करवून घेतला. याच सुमारास पंडित सीतानाथ यांनीहि जातिभेदनाशाची चळवळ जोरांत सुरू केली होती. आधुनिक राष्ट्रनिर्मितीच्या आड येणाऱ्या ज्या अनेक रूढि हिंदुधर्मात आहेत, त्यांत जातिभेद ही प्रमुख आहे असें त्यांचे निश्चित मत होते. जातिबंधनांमुळे व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत नाहीं, म्हणून आपल्या समाजरचनेत आमूलाग्र क्रान्ति झाली पाहिजे असे ते सांगत. त्यांच्या मते मूर्तिपूजा, बलिदान व चातुर्वर्ण्य हा हिंदुधर्माचा पाया होय. तेव्हां एकतर तो पाया उखडून काढला पाहिजे किंवा ब्राह्मांनी त्यांतून बाहेर तरी पडले पाहिजे असे प्रतिपादन ते करीत. (नवयुगधर्म- फडके पृ. ६६२-६७)
 गेल्या शतकांतील बहुतेक सर्वच समाजसुधारकांनीं जातिभेदावर व विषमतेवर हल्ला केला असला तरी त्यांत लोकहितवादी यांनी केलेल्या हल्ल्याला आपल्या दृष्टीनें विशेष महत्त्व आहे. इतर सुधारकांनी कोणीं मानवतेच्या दृष्टीनें कोणीं भूतदयेच्या दृष्टीनें तर कोणीं राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीनें जातिभेदाचा विचार केला आहे. आणि त्या विचारसरणींना महत्त्व आहे यांतहि शंका नाहीं. पण लोकहितवादींचा विशेष निर्देश करण्याचे कारण असे की त्यांनी लोकशाहीचे तत्त्व प्रतिपादून त्यासाठी म्हणून जातिभेदाचें निर्मूलन व समतेची प्रस्थापना यांचें महत्त्व वर्णिले आहे. 'राज्यसुधारणा' या आपल्या पत्रांत त्यांनीं असा विचार मांडला आहे कीं, येथील लोकांनीं विलायतेतील राणीसाहेबांस अर्ज करून कळवावें कीं, 'सध्यांच्या राज्यपद्धतीपासून आमचा फायदा नाहीं. याकरितां हिंदुस्थानचे देशांत पार्लमेंट ठेवावें. दर एक शहरांतून व जिल्ह्यांतून दोनदोन असामी घेऊन त्या सर्वांस कौन्सिलांत बसवावे. हे जे लोक आणावयाचे ते सर्व जातीतील सारखे असावे. या लोकांत भट, गृहस्थ, शास्त्री, परभू, कुळंबी, मुसलमान इंग्रज इ. जे शहाणे असतील ते नेमावे. म्हणजे लोकांचा फार फायदा होईल. आणि राज्याची सुधारणा होऊन राजाचे अमलांत सुख काय व लोकसत्ताक राज्यांत सुख काय ते सहज दृष्टोत्पत्तीस येईल.
 जन्मनिष्ठ उच्चनीचतेवर त्या काळांत लोकहितवादींनी जेवढा भडीमार केला, तितका दुसऱ्या कोणी क्वचितच केला असेल; त्यांतहि त्यांनी एकंदर ब्राह्मण जातीवर जे इत्यार धरले त्यामुळे त्या समाजाची दृष्टि अंतर्मुख होऊन त्याला आत्मनिरीक्षणाचे जे बाळकडू मिळाले, ते अगदी आजपर्यंत आपला प्रभाव दाखवीत आहे. गेल्या शंभर वर्षात इतर जातींनी ब्राह्मणांना ज्या शिव्या दिल्या त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शिव्या ब्राह्मणांनी स्वतःच्या स्वतःलाच दिल्या आहेत. समाजांत जागृति कायम रहाण्यास अशा तऱ्हेचे कठोर आत्मपरीक्षण अवश्य असतें. व त्याचे सर्व श्रेय लोकहितवादींना आहे असें वाटते. 'जे ब्राह्मण ज्ञानशून्य आहेत. ते कैकाड्यासारखेच असून कैकाडी हे सुधारले तर ब्राह्मणासारखेच मानावें-' असें ते प्रतिपादितात. अर्थ न समजतां वेदांचे अध्ययन करणारे जे ब्राह्मण ते त्यांना केवळ जनावरें वाटतात. 'ब्राह्मणांनी आपल्या मूर्ख समजुती सोडून देऊन लोकांस सारखे मानून विद्या शिकण्याचा हक्क सर्वांना आहे, हें त्यांनी कबूल करावें' असा उपदेश त्यांनी केला आहे. 'चार ब्राह्मण लावून अभिषेक करावा त्यापेक्षां चार मजूर लावून रस्ता नीट करावा हें चांगले, कारण ती लोकहिताची मजुरी आहे. यास्तव स्नानसंध्या करण्यांत पुण्य नाहीं.' असली सनातनी लोकांना आजहि न पेलणारी मतें त्यांनी सांगितली आहेत. 'भटांत व अतिशूद्रांत मला इतकेंच अंतर दिसते की, एक बोलता राघू व एक न बोलता राघू; परंतु ज्ञान एकच.' जर या देशांत पार्लमेंट झाले आणि त्यांत सर्व जातीचे लोक पाठविले तर त्यामध्ये महारापेक्षां भट अधिक शहाणपणाने आपल्या देशांचे हिताविषयीं बोलतील काय ? अशा तऱ्हेची जहरी टीका करून ज्याच्या त्याच्या गुणकर्मावरून वर्ण ठरवावा असा उपदेश लोकहितवादींनी केला आहे. (शतपत्रे पृ. ५५, ६४, १२९, २१३)
 लोकहितवादींच्या नंतर समतेचें तत्त्व तितक्याच आग्रहानें सांगणारे गृहस्थ म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी हे होत. १८५९-६० च्या सुमारास लिहिलेल्या आपल्या 'वेदोक्तधर्मंप्रकाश' या ग्रंथांत त्यांनीं आपली हीं मतें निःसंदिग्ध शब्दांत मांडली आहेत. विष्णुबुवा हे लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेतच. पण लोकशाहीच्याहि पलीकडे जाऊन त्यांनीं शुद्ध कम्यूनिझमचाहि पुरस्कार केला आहे आणि समतेच्या तत्त्वाची पराकोटी गांठली आहे. 'प्रजा हें एक कुटुंब आहे. असे मानून सर्वांनी कष्ट करावे, व त्या कष्टांनी निर्माण झालेले धन राज्याच्या कोठारांत भरून ठेवावे व सर्व गांवकऱ्यांस पोटास लागेल तसे द्यावे' अशी व्यवस्था (राजनीति) त्यांनी सांगितली आहे. 'जातिभेद ही राजनीति बिघडल्याचीच निशाणी आहे.' 'जातिभेद, मूर्तिपूजा, व अनेकप्रकारचीं धर्माचीं ढोंगें यांचा नाश, 'सर्व प्रजा एक कुटुंब' या खऱ्या राजनीतीवांचून होणार नाहीं;' असे अस्सल मार्क्सवादी मत विष्णुबुवांनी सांगितले आहे. ही राजनीति स्वीकारली तर चोऱ्यामाऱ्या थांबतील एवढेच नव्हे तर युद्धेहि थांबतील, हाहि विचार त्यांनी सांगितला आहे. आणि शेवटीं अशी व्यवस्था केल्यास कायद्याची व शासनसंस्थेची गरजच रहाणार नाहीं असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. (सुखदायक राज्य प्रकरणी- निबंध)
 वेदोक्तधर्माच्या नवव्या प्रकरणांत, चातुर्वर्ण्य, जातिभेद यांविषयीं त्यांनी आपली मते सांगितली आहेत. त्यांचे असे मत आहे कीं, मुलामुलींना पांचव्या वर्षांपासून शिक्षण द्यावें. अकराव्या वर्षापर्यंत विद्या झाल्यावर त्यांच्या गुणावरून त्यांचा वर्ण ठरवावा व त्याअन्वये पुढे समवर्णीयांची लग्ने लावून द्यावीं व त्यांचा व्यवसायहि त्यावरूनच निश्चित करावा. गुणकर्माचा असा विचार न करतां केवळ ब्राह्मणाच्या किंवा क्षत्रियाच्या पोटी जन्म झाला म्हणून तरुणतरुणींना एकवर्णीय मानून त्यांचा विवाह त्या त्या जातींत करणें हा विष्णुबुवांच्या मते वर्णसंकर होय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या पोटी जन्मलेल्या अपत्यांना केवळ जन्मावरून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र मानले, तर दुष्टाला गुरु मानल्याने किंवा भित्र्यास शूर मानल्याने जे तोटे होतात ते होतील असे त्यांनी सांगितले आहे.

बहुजन समाजाची मनःक्रांति-

 विषमता नष्ट करून समतेची प्रस्थापना करण्याचे गेल्या शतकांत जे प्रयत्न झाले त्यापैकी तीनचार प्रयत्नांची हकीकत वर सांगितली आहे. यापेक्षांहि जास्त महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा होय. वरील प्रयत्न हे उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या व पांढरपेशा वर्गातल्या लोकांनीं केलेले आहेत; पण बहुसंख्य असा जो बहुजनसमाज त्याच्यांतल्याच एका थोर समाजसेवकाने केलेल्या प्रयत्नाचे महत्त्व केव्हांहि जास्तच असणार. विषमव्यवस्थेत जो समाज दलित असतो त्याचा आत्मप्रत्यय शेकडो वर्षाच्या संस्कारानें नाहींसा झालेला असतो. आपण खरोखरच हीन आहो, आपल्याला मिळाली तीच पायरी योग्य आहे अशी त्याच्या मनाची भावना झालेली असते. कळत वा नकळत त्याने विषमतेला मान्यता दिलेली असते व त्यामुळे वरिष्ठ वर्गाला त्याचा छळ करण्यास मोकाट रान सांपडते. अशा वेळीं त्यांच्यांतलाच एक कार्यकर्ता- त्यांच्या जातीचा व विशेषतः स्वतःला त्यांचा म्हणवून घेण्यांत अभिमान बाळगणारा असा कार्यकर्ता निर्माण होतांच त्या समाजाच्या मनाचे मालिन्य नष्ट होते. आणि आपल्या श्रेष्ठत्वाची प्रतीति त्याच्या मनांत निर्माण होऊन विषमतेच्या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास तो सिद्ध होतो. ज्योतिराव फुले यांच्या उद्योगाचे या दृष्टीनें विशेष महत्त्व आहे. स्वजनांचाच नव्हे तर पित्याचाहि विरोध सोसून या पुरुषानें शंभर वर्षो पूर्वीच्या काळी अस्पृश्यांची शाळा चालविली आणि त्यांच्यासाठीं स्वतःच्या घरापुढचा पाण्याचा हौद खुला केला. पण ज्योतिरावांचें खरें सामाजिक कार्य म्हणजे 'सत्यशोधक समाजाची' स्थापना हें होय. हिंदूंच्या विषमतेवर उभारलेल्या वर्णव्यवस्थेविरुद्ध व जातिभेदाविरुद्ध असंतोष निर्माण करून त्याविरुद्ध खेड्यापाड्यांतील सर्व खालच्या वर्गापर्यंत बंडाची वृत्ति पसरून देण्याचे मोठे कार्य या समाजाने केले आहे.
 जन्मनिष्ठ उच्चनीचता नष्ट करण्याचे गेल्या शतकांत या भूमीत जे प्रयत्न झाले त्यांचा इतिहास आपण पहात आहे. या इतिहासांत स्वामी दयानंदांनीं प्रस्थापिलेल्या आर्यसमाजानें पंजाबांत जे कार्य केले त्याला फार महत्वाचे स्थान आहे. वेदाचा अधिकार अखिल हिंदुमात्रास आहे, हें उच्च तत्त्व प्रसृत करून या समाजाने त्याअन्वये मागासलेल्या व अस्पृष्ट जातींनाहि समाजांत सामील करून घेऊन त्यांना यज्ञोपवीताचा अधिकार दिला व त्यांचें द्विजत्व मान्य केले; आणि शिक्षणाचा प्रसार सर्व जातींत करून त्यांच्यांत रोटी व बेटीव्यवहार सुरु करण्याचे धोरण आखले. हा समाज वर्ण मानतो पण समाजाच्या मतें वर्ण हा जन्मावरून ठरत नसून धंदा व वेदज्ञान यावरून ठरतो. आर्यसमाजाची स्थापना मुंबईस झाली; पण त्याचा खरा प्रसार पंजाबांत झाला. आजमितीला समाजाचे तीन लक्ष सभासद आहेत आणि त्याने प्रस्थापिलेल्या शिक्षणसंस्थांची संख्या तर सहज शंभरापर्यंत जाईल. समतेचा मंत्र जपून जातीय विषमता नष्ट करण्याच्या बाबतींत या समाजाने केवढे कार्य केले आहे, ते यावरून ध्यानीं येईल. (लाला हंसराजचरित्र- श्रीराम शर्मा)

समता आणि कर्तृत्व

 समतेचे महत्त्व समाजरचनेत किती आहे याचें मागें विवरण केलेच आहे. कोणच्याहि प्रकारची विषमता ही समाजाला घातकच ठरते; पण त्यांतल्या त्यांत जातिभेदामुळे आलेली विषमता ही समाजाचे सर्व कर्तृत्वच नष्ट करून टाकते. अशा समाजांत हीन जातीच्या लोकांना पराक्रम करण्यास स्फूर्ति येणें शक्य नसतें. आपण जे परिश्रम करणार, जो त्याग करणार, जी हानि सोसणार, तिचें पुरेपूर फल आपणांस मिळेल ही खात्री असेल तरच माणूस श्रम करण्यास उद्युक्त होतो. मी रणांत पराक्रम केला तर सेनापतीचें पद मला मिळू शकेल, विद्यावंत झालो तर धर्मपीठावर मी आरोहण करू शकेन, व कार्यक्षमता प्रगट केली तर राजा किंवा अध्यक्षहि होऊं शकेन- सारांश माझ्या गुणाप्रमाणे मला समाजांत स्थान निश्चित मिळेल ही भावना कर्तृत्वाची खरी प्रेरक असते. ब्रिटिशापूर्वीच्या भारतीय समाजांत, साधारणतः इ. स. १००० पासून पुढल्या सातशेंआठशे वर्षात ही भावना निर्माण होणें शक्य नव्हते; कारण जातिभेदांच्या बंधनांना या कालांत फार कडक रूप प्राप्त झालें होतें, मराठेशाहीत भागवतधर्मीय संतांच्या तत्त्वोपदेशामुळे समतेची भावना कांहींशीं रूढावत चालली होती. संतांना मुख्यतः पारमार्थिक क्षेत्रांतलीच समता अभिप्रेत असली तरी तिचा कांहींसा प्रसार ऐहिक व्यवहारांतहि होत होता आणि त्यामुळे महाराष्ट्रांत तरी पुष्कळच सुपरिणाम झालेला दिसून आला होता. संतांनीं परमार्थात लोकसत्ताच प्रस्थापिली होती असे अनेक पंडितांनीं म्हटले आहे; त्याला बराच अर्थ आहे. महाराष्ट्रांत तरी तो निश्चित आहे. कारण त्या पारमार्थिक लोकशाहीची वृत्ति हळू हळू ऐहिक व्यवहारांत पसरून महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्याचे बंध एकदम ढिले झाले आणि धनगराचें राजपद, शुद्राचे धर्मगुरुत्व व ब्राह्मणाचे सेनाध्यक्षत्व जनतेने एकदम मान्य केलें. लोकशाहीमुळें समाजाच्या कर्तृत्वाला एकदम उमाळे येऊन सर्वत्र त्याला बहर येतो असें म्हणतात तें किती सार्थ आहे ते येथे दिसते. इतर संत व रामदास यांच्या कार्याचे विवेचन करतांना रामदासाने महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्याची पुन्हां प्रस्थापना केली, असें राजवाडे यांनी म्हटले आहे आणि त्या विवेचनावरून राजवाड्यांना जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्यच अभिप्रेत होते, असे दिसते. तसें असेल तर राजवाड्यांचे मत अगदीं भ्रामक व निराधार असे आहे. रामदासाने काय केले हा भाग वेगळा, महाराष्ट्रांत चातुर्वर्ण्य पुष्कळ नाहींसेंच होत होते आणि त्यामुळेच महाराष्ट्राला भारतीय इतिहासांत अतुल असा पराक्रम करतां आला. पण हे सर्व जरी खरे असले तरी जी समता आज आपण अपेक्षिता तिच्या मानानें महाराष्ट्रांतली ती समता कांहींच नव्हती. ज्या जातींनीं स्मृति ऐकल्या, तर त्यांच्या कानांत तापलेल्या शिशाचा रस ओतावा असे मनूनें सांगितले आहे त्या जातीचाच एक थोर पुरुष- डॉ. आंबेडकर- आज या आर्यावर्तात त्याच मनूच्या पदवीला जाऊन पोचला आहे. लोकशाहीला जी समता अवश्य आहे ती ही होय. जातीय विषमतेचें मुख्य शल्य हें कीं त्या व्यवस्थेत हीन गणलेल्या जातींना उत्कर्षांची संधि मिळत नाहीं आणि मग त्यांचे कर्तृत्व कुजत पडते. ही दुरवस्था नष्ट होऊन सर्वाना उत्कर्षांची समसंधि मिळू लागली की जातीय विषमतेचा विषार बव्हंशी नष्ट झाला असें म्हणण्यास हरकत नाहीं. सर्व जाति रक्तानें एक झाल्यावांचून हा विचार कायमचा नष्ट होणार नाहीं हें खरे आणि भरतभूमींत तेच होणें अवश्य आहे. ज्या वर्णसंकराची भीति भारतीयांना पावलोपावली वाटते तो येथे घडून येणें हेंच समाजाला हितावह आहे. युद्ध झाले तर वर्णसंकर होईल ही भीति श्रीकृष्णाने गीतेत प्रगट केली आहे. पण त्यावेळचे त्याच्या भोवतालचे कर्ते पुरुष पाहिले तर ते सर्व वर्णसंकरजन्यच होते असे दिसेल. व्यास, विदुर, धृतराष्ट्र, पांडु, पांडव, कौरव- सर्वांचा इतिहास हेच दाखवितो. व्यावसायिक वर्णसंकर द्रोण, कृप, आणि स्वतः श्रीकृष्ण यांनी केलाच होता. तेव्हां वर्णसंकर अत्यंत हितावह होय यांत शंकाच नाहीं आणि तोच येथे घडला पाहिजे. पण शंभर वर्षांच्या अल्प काळांत आपण समसंधीची पायरी गांठली आहे ही प्रगति कांहीं थोडी नाहीं. तिच्यामुळे भिन्नभिन्न जातींत सांस्कृतिक समता निर्माण होऊन पुढेमागें सर्व जाति रक्ततः एक होऊन नातील अशी आशा धरून तसा नेटानें प्रयत्न करणें हें आतां आपले काम आहे.
 मानवी जीवनाची प्रतिष्ठा म्हणजे काय हे वाचकांनीं एकदां नीट समजावून घेतले आणि ती कल्पना मनाशीं दृढपणे आकळून ठेवली तर त्यांना लोकसत्तेविषयींचे अनेक सिद्धान्त अगदी सुलभ होऊन जातील. लोकशाहीचा सारा ग्रंथ या एका सूत्राने सहन लावतां येईल, इतके या तत्त्वाचें महत्त्व आहे. वर ज्या विषम समाजव्यवस्थेचे वर्णन केले आहे, ती प्रत्यक्ष व्यवहाराच्या दृष्टीनें तर घातक आहेच पण मानवी प्रतिष्ठेच्या दृष्टीने ती जास्तच घातक आहे. कारण जड कर्मकांडाप्रमाणेच या विषमतेमुळे मानवाच्या उच्च गुणांचा उपमर्द होतो. ही व्यवस्था फक्त त्याचा देहच ध्यानांत घेते. हृदयाचे, मनाचे, बुद्धीचे गुण हे तिला गौण वाटतात. 'दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् ।' असे आत्मिक हुंकाराचे दिव्य बोल या समाजव्यवस्थेमुळें गुदमरून टाकले जातात आणि त्यामुळे समाजांतील कांहीं विशिष्ट जाति सोडून दिल्या की बाकीच्यांच्या जीवनाला प्रतिष्ठाच रहात नाहीं. प्राचीन गणराज्यांत जातिभेद होते म्हणूनच तेथें खरी लोकसत्ता होती असे म्हणणे सयुक्तिक नाहीं असें ज पहिल्या प्रकरणांत सांगितलें तें याच कारणासाठी.

स्त्री-पुरुष समता

 आचारधर्म व विषमसमाजरचना यांचे हीन गणलेल्या जातीवर जसे अत्यंत अनिष्ट परिणाम होतात तसेच स्त्रीजीवनावरहि त्यांचे अनिष्ट व घातक परिणाम होतात. या जातींप्रमाणेच स्त्रियांनाहि अशा समाजांत जवळजवळ शून्य प्रतिष्ठा असते आणि त्यामुळे त्यांचें जिणें म्हणजे जिवंत नरकवासच होऊन बसलेला असतो. जुन्या धर्माने व रुढींनी स्त्रियांवर जीं अनंत बंधने लादली आहेत, त्यावरून स्त्री ही एक मानवी व्यक्ति आहे हा विचारच त्यांना मान्य नव्हता असे स्पष्टपणे दिसतें. मग तिच्या स्वतंत्र व्यक्तित्वाची जुनीं धर्मशास्त्रे व रूढी परवा करीत नसतील यांत काय नवल आहे !
 पती मृत होतांच स्त्रीनें सती गेलें पाहिजे, असें सांगणारा धर्म व ती जात नसल्यास तिला सक्तीने सती घालविणारी रूढि यांना स्त्रीच्या जीविताबद्दल किती महत्त्व वाटत असेल हे काय सांगावयास पाहिजे ? धर्माची आज्ञा शिरसावंद्य मानून भरतभूमींतल्या अनेक सुकन्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्या त्यांच्या दिव्य त्यागाबद्दल त्यांना शतशः अभिवादन केले पाहिजे यांत वादच नाहीं; पण तरीसुद्धां त्या त्यांच्या आत्मत्यागाच्या पाठीशी धर्मांनें जें तत्त्व उभे केले आहे त्याचा सुज्ञ माणसानें निषेधच केला पाहिजे. स्त्रीचे आपल्या पतीवर कितीहि अलौकिक प्रेम असले तरी पतीच्या मागें तिला आपल्या संसाराची जबाबदारी असते व सामाजिक कर्तव्येहि असतात. तेव्हां स्त्री अगदीं पूर्ण राजीखुशीनें व केवळ पतिप्रेमानें जरी सती जात असली तरी आचार्य जावडेकर म्हणतात त्याप्रमाणे, तिची ही कर्तव्यबुद्धि तामसच म्हटली पाहिजे, कारण या विचारसरणींत स्त्रीला स्वतंत्र व्यक्तित्व नाहीं असे गृहीत धरलेले आहे. स्त्रीस्वातंत्र्याच्या श्रेष्ठ ध्येयाच्या दृष्टीनें 'सती' हा कोणत्याहि स्वरूपांत अधर्मच ठरतो, असें अगदी निर्भयपणे आचार्यानी जें मत मांडले आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. (आधुनिक भारत पृ. ८२)
 पडद्याची चाल, बालविवाह, विधवाविवाहाची बंदी, स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध या सर्व नियमनांच्या मागें स्त्री-जीविताविषयींचा तो एकच दृष्टिकोन आहे. त्यांच्या पुरस्कर्त्यांच्या मतें स्त्रीच्या जीविताला स्वतंत्र अर्थच नाहीं. स्त्री ही पुरुषाची एक पडछाया आहे. संसार- मग तो राष्ट्रीय असो वा व्यक्तिगत असो- तो मूळ पुरुषांचा आहे आणि स्त्री है एक त्याचे साधन आहे हीच कल्पना या बंधनांच्या बुडाशीं गृहीत धरलेली आहे. संरक्षणासाठी स्त्रीवर बंधने घालणे हे केव्हांहि योग्य ठरेल, पण जेथें तो प्रश्न नाहीं तेथेहि ह्रीं बंधने जारी असतात आणि त्यामुळे कर्मकांडाप्रमाणेंच, हीं बंधने स्त्रीचा जड पार्थिव देह ध्यानीं घेऊनच सांगितलेलीं असतात यांत शंका रहात नाहीं. स्त्रीचें मन शुद्ध कीं अशुद्ध हा त्या वेळी प्रश्नच नव्हता. तिच्या देहावर दुसऱ्यांची दृष्टि पडली की ती भ्रष्ट होते असा विचार मनांत असल्यावांचून तिला पडद्यांत ठेवावे असे कोणाच्याच मनांत येणार नाहीं. मानवी प्रतिष्ठेचा उपमर्द तो हाच होय आणि हे जाणूनच गेल्या शतकांतील समाजधुरीणांनी जातीय- विषमतेविरुद्ध जशी मोहीम सुरू केली त्याचप्रमाणे स्त्रीपुरुषविषमतेविरुद्ध हि तितक्याच निकराने मोहीम सुरू केली.
 हिमालयाच्या उदरांतून निघालेल्या जलवाहिन्यांनी ज्याप्रमाणे भारतवर्षांचे पोषण होते, त्याचप्रमाणे राजा राममोहन राय यांच्या हिमनगाप्रमाणेच विशाल असलेल्या मनांतून उगम पावणाऱ्या वैचारिक जलवाहिन्यांनीं आधुनिक भारतवर्षाचे पोषण होत आहे याविषयीं कोणी वाद करील असे वाटत नाहीं. कर्मकांड, मूर्तिपूजा, जातिभेद, सती, जुनी शाद्विक विद्या, तज्जन्य शब्दप्रामाण्य अशा ज्या अनेक घातक रूढी हिंदुसमाजाने शिरोधार्य मानल्या होत्या, त्यांतील एकहि त्या महापुरुषाच्या क्रान्तिप्रवण दृष्टींतून सुटली नव्हती. स्त्रीस्वातंत्र्याचा प्रश्न तर त्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा वाटत असे. सतीची चाल नष्ट करण्यासाठीं त्यांनी लॉर्ड बेंटिक यांनकडे जो अर्ज केला होता त्यांत, शास्त्राच्या दृष्टीने किंवा सारासार विचारानें, कसेहि पाहिले तरी सती हे सर्व खूनच आहेत, असे मत दिलें होतें. भटाभिक्षुकांच्या सक्तीमुळे चितेवर दीनपणें बळी जाणाऱ्या अबलांकडे पाहून त्यांच्या जिवाचा केवढा तळतळाट झाला असेल त्याची यावरून कल्पना येईल. राममोहन यांनी स्त्रीला दास्यांत ठेवणाऱ्या सर्व रूढींच्या विरुद्ध चळवळ सुरू केली होती पण त्यांत त्यांना फारसें यश आलें नाहीं. सतीची चाल कायद्याने बंद झाल्याचे पाहाण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले होते.
 स्त्रीदास्यविमोचनाच्या क्षेत्रांत पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीं जे प्रयत्न केले, त्यांना फार महत्त्व आहे. आपल्या हयातीत त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकंदर चाळीस शाळा काढल्या आणि सर्व बंगालभर स्त्रीशिक्षणाच्या चळवळीचा पुरस्कार केला; त्याचप्रमाणे विधवाविवाहाची चळवळ करून सन १८५६ सालीं विधवाविवाहाचा कायदा सरकारकडून करून घेतला. बहुपत्नीकत्वाच्या दुष्ट चालीविरुद्धहि त्यांनी फार परिश्रम केले, पण त्यांत त्यांना फारसे यश आले नाहीं. त्यांच्या मागून ब्राह्मसमाजाचे पुढारी केशव चन्द्रसेन यांनीहि समाजांत स्त्रीस्वातंत्र्याचे सर्वांगीण प्रयत्न करून बराच पल्ला गांठला.
 बंगाल मागोमाग महाराष्ट्रांत आणि त्यानंतर पंजाब व मद्रास प्रांतांत स्त्रीस्वातंत्र्याच्या सर्व प्रकारच्या चळवळी सुरू झाल्या. महाराष्ट्रांत पुण्याला महात्मा फुले यांनी १८५१ सालीं मुलींची शाळा घातली व आपल्या पत्नीला शिक्षण देऊन तिला तेथे शिक्षिकेचे काम सांगितलें. विष्णुशास्त्री पंडित यांनी जुन्या शास्त्रांचें मंथन करून त्यांतून विधवाविवाहास शास्त्राधार काढून त्यासाठी महाराष्ट्रांत मोठी चळवळ केली; अनेक वाद केले, लेख लिहिले, व्याख्याने दिली व स्वतः पुनर्विवाहहि केला. लोकहितवादी, भांडारकर, रानडे, आगरकर यांनी आणि वाच्छा, मलबारी या पारशी गृहस्थांनीं स्त्रियांचे शिक्षण, प्रौढविवाह आणि त्यांचे आर्थिकस्वातंत्र्य यांसाठी अखंड परिश्रम करून लोकमताला नवीन वळण लावले. पंजाबांत दिल्ली येथे सर सय्यद अहंमद आणि त्यांचेच अनुयायी चिराग अल्ली, मुस्ताफा खान व खुदाबक्ष यांनी इस्लाम धर्मात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य अशाच जोमाने सुरूं केलें होते. स्त्रियांचा पडदा, बहुपत्नीकत्व, त्यांचें दास्य, अज्ञान यावर त्यांनी जोरानें टीकास्त्र चालवून इतके क्रांतिकारक विचार सांगण्यास प्रारंभ केला कीं, मुसलमान समाज खवळून जाऊन त्यानें सर सय्यद यांना खुनाच्या धमक्या देण्यापर्यंत मजल आणली. पण ते किंवा त्यांचे अनुयायी स्वीकृत कार्यापासून ढळले नाहींत. पंजाबातील हिंदु समाजांत स्वामी दयानंद व त्यांचे शिष्य लाला हंसराज, गुरुदत्त विद्यार्थी व लाला लजपतराय यांनीं स्त्रीजीवनांत अशीच क्रान्ति घडवून आणण्यासाठीं अनेक उद्योग आरंभिले. सत्यार्थप्रकाश या दयानंदाच्या ग्रंथांत बालविवाहाचा निषेध केला असून विधवाविवाहांस अनुमति दिली आहे. स्त्रीशिक्षणाचा तर त्यांत फारच जोराने पुरस्कार केला आहे.
 स्त्रीस्वातंत्र्याच्या ज्या चळवळी गेल्या शतकांत झाल्या, त्यांचा समग्र इतिहास येथे पहावयाचा नाहीं. साधारण बहुश्रुत वाचकास तो ठोकळ मानानें ज्ञात असतो. लोकशाहीच्या दृष्टीने या चळवळीमुळे येथल्या समाजाची मनोवृत्ति कशी बदलत गेली, स्त्रीकडे पहाण्याची दृष्टीच कशी आमूलाग्र फिरून गेली ते आपणांस पहावयाचे आहे. सतीचा विचार करतांना याचें थोडेसे दिग्दर्शन वर केलेंच आहे. इतर पंडितांच्या उद्गारांवरून त्याचाच पाठपुरावा कसा होतो ते आतां पाहूं.

स्त्रीदास्यविमोचन

 स्त्रीजविनाविषयीं जेवढे म्हणून नवीन आणि क्रान्तिकारक विचार आहेत तेवढे बहुतेक लोकहितवादी यांनी सांगून टाकले आहेत. संसारांत व समाजांत स्त्रियांचे अधिकार पुरुषांच्या पूर्ण बरोबरीचे आहेत हा विचार त्यांनी अनेक वेळां सांगितला आहे. 'जसे पुरुष तशा स्त्रिया आहेत हें आंधळया हिंदु लोकांस समजो' (शतपत्रे पृ. ३७९) 'ज्या देशांत स्त्रियांचे अधिकार लोक मानीत नाहींत त्या देशांत लोकांची स्थिति वाईट असते.' (३७९) 'याकरितां माझे ऐका आणि स्त्रियांस पुरुषांसारखे अधिकार आहेत असे ठरवा आणि हा धर्म चालू करा.' (३८६) अशा तऱ्हेचे समान अधिकाराचे प्रतिपादन लोकहितवादींनी केले आहे. स्त्रीशिक्षणाचे व विधवा पुनर्विवाहाचे अनेक पुरस्कर्ते गेल्या शतकांत झाले. पण त्यांतील अनेकांनी जुन्या शास्त्रांतील वचनें काढून त्यांच्या आधारें स्त्रियांची स्थिति सुधारण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या व एकंदर समाजाच्या दृष्टीने हे कार्य मोठे आहे यांत शंका नाहीं. पण त्यांत लोकशाहीचीं व व्यक्तित्वाचीं बीजें नाहींत. तीं वरच्यासारख्या प्रतिपादनांत आहेत. म्हणूनच आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांना महत्त्व आहे. लोकहितवादींनीं अनेक ठिकाणी असा स्पष्ट उपदेश केला आहे की सुधारणेच्या आड धर्मशास्त्र येत असेल तर त्यास बाजूस सारून आपण सुधारणा केली पाहिजे. 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरितां रीति घातली आहे त्यांहून जर कांहीं विपरीत असेल तर एकीकडे ठेवल्यास चिंता काय ?' असा त्यांनी निर्भयपणें प्रश्न केला आहे (३९८). स्त्रीचा विवाह प्रौढपणीं व्हावा एवढेच ते सांगत नाहींत, तर तिचें 'स्वयंवर व्हावें हेंच प्रशस्त. लग्न हें ज्याचे त्याचे काम आहे. त्यांत इतरांनीं पडणें योग्य नव्हे' असा विचार सांगतात. (३८८) यांत स्त्रीच्या व्यक्तित्वास त्यांनी मान्यता दिल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यांच्या मतें, सुखाविषयींचाहि अधिकार पुरुषाप्रमाणेच स्त्रियांना आहे. अमेरिकन व ब्रिटिश लोकशाहीचे विवेचन करतांना 'प्रत्येक व्यक्तीस सुखाचा समान अधिकार आहे' हेंच तत्त्व लोकसत्तेच्या बुडाशीं कसें आहे आणि एकोणीसाव्या शतकांत जुन्या मतांत क्रांति होऊन हें नवें मत मान्य होतांच लोकशाहीची वाढ कशी झपाट्याने झाली तें अनेक पंडितांनी सांगितलें आहे. त्यावरून लोकहितवादींच्या या विचारार्चे मह्त्त्व ध्यानांत येईल. स्त्रिया, हीनजाती, अस्पृष्ट यांचा समाजांत निर्माण होणाऱ्या सुखावर अधिकारच नाहीं अशी विचारसरणी लोकसत्तापूर्व युगांत सर्वत्र रूढ होती. तिला या लेखकानें धक्का दिला आहे. जो अधिकार संसारासंबंधीं व सुखाविषयीं पुरुषांस आहे तोच स्त्रियांस असावा असें त्यांचे पूर्ण पुरोगामी मत होते (३९८). एके ठिकाणी ते म्हणतात की, 'स्त्रिया सुशिक्षित होतील तेव्हां आपला अधिकार स्थापतील आणि संसारसुखास हानि करणाऱ्या पंडितांपासून तहनामाच करून घेतील. जेव्हां स्त्रिया विदुषी होतील तेव्हां या पंडितांस चरण- संपुष्टांनी पूजा अर्पण करतील यांत संशय नाहीं; परंतु याच कारणास्तव ब्राह्मण लोक स्त्रियांस शहाण्या करण्यास प्रतिकूल आहेत' (४०३).
 विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी स्त्रियांनीं विवाह केलाच पाहिजे असे नाहीं, असा विचार आपल्या वेदोक्तधर्मात सांगितला आहे. विष्णुबुवांनीं विवाहविच्छेदालाहि मान्यता दिली होती; पण याहिपेक्षां विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मांडलेले मत कालौघ फिरल्याचे खरे द्योतक म्हणतां येईल. विधवा स्त्रियांना आपल्या समाजांत अगदीं अमंगळ व हीन लेखतात. शुभप्रसंगी त्यांचे दर्शन अगदीं त्याज्य असें अजूनहि मानले जाते. याचा शास्त्रीबुवांना फार संताप येत असे. लोकभ्रम या निबंधांत त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले आहे कीं, आपल्या पतीच्या मार्गे वर्षोनुवर्ष एखाद्या तपस्व्याप्रमाणे राहणाऱ्या या योगिनीचे दर्शन अपवित्र तर नाहीच, पण ते अत्यंत शुभ मानले पाहिजे. अशी खडतर तपश्चर्या करून कालक्रमणा करणारी ही स्त्री खरोखर आपल्या कुलास व मानवजातीस भूषणच आहे. (निबंधमाला पृ. २०४) आगरकरांचे विचार या बाबतींत किती क्रांतिकारक होते हें सर्वांस विदितच आहे. स्त्री ही पुरुषास मोह घालणारी, त्याला मोक्षमार्गापासून च्युत करणारी, त्याच्या उत्कर्षाच्या आड येणारी अशी कोणी दुष्ट शक्ति आहे म्हणून तिचा सहवासच नव्हे दर्शनहि शक्य तो टाळावे अशी त्याकाळीं सनातनी रूढी असतांना, स्त्रीपुरुषांचा सहवास हरएक प्रसंग घडून यावा, पाश्चात्य समाजास जी एक उल्हासवृत्ति प्राप्त झाली आहे ती स्त्रीपुरुषांच्या मिश्रणामुळेच होय, असा उपदेश त्यांनी केला आहे आणि जुनी कुटुंबव्यवस्था स्त्रीच्या व्यक्तित्वाच्या आड येते हे जाणून 'सासुरवासाचें घोडें मुळींच नाहींसे झाले पाहिजे. लग्न झाल्यावर मुलीने आईबापांचे घर सोडावें तें एकदम नवऱ्याच्या स्वतंत्र संसाराचे आधिपत्य पत्करावे' असें आजहि फारसें अमलांत न येणारे मत त्यांनी मांडलें आहे. (निबंधसंग्रह पृ. २२९)
 याच सुमारास स्त्रीच्या व्यक्तित्वविकासास पोषक अशी एक निराळीच विचारप्रणाली आपल्याकडे सुरू झाली. आतांपर्यंतचे सुधारक बहुधा, पाश्चात्य समाजांत स्त्रियांचा दर्जा श्रेष्ठ आहे, असे सांगून त्या रीतीचे आपण अनुकरण केले पाहिजे असे प्रतिपादन करीत. पण १८९० च्या सुमारास ही लाट फिरली. या वेळीं अनेक पंडितांनी असे प्रतिपादन सुरु केलें कीं आमच्या पूर्वीच्या धर्मशास्त्रांत स्त्रियांचा जो दर्जा सांगितला आहे, त्यांना जी प्रतिष्ठा आहे तशी जगांत कोठेच नाहीं. त्यामानाने पाश्चात्य स्त्रियांची स्थिति फारच अनुकंपनीय आहे. तेव्हां आम्हांला पाश्चात्यांपासून कांहींच शिकावयाचें नाहीं. डॉ. ए. के. कुमारस्वामी यांनी हा विचार मोठया अट्टाहासाने मांडला आहे (इंडियन नेशन बिल्डरस, भाग ३ रा. पृ. ३२०- ३२३). यावेळीं हिंदुस्थानांतल्या सर्वच जमातींत ही विचारप्रणाली प्रादुर्भूत झाली होती. मुसलमान समाजांतील नेतेहि याच तऱ्हेचे प्रतिपादन करूं लागले. 'इस्लाम धर्माने स्त्रियांना जो मान दिला आहे, तो इतर कोणत्याहि धर्मांनें दिला नाहीं' 'इतर कोणच्याहि समाजांत मुसलमान समाजाइतकें स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य मिळत नाहीं.' अशीं विधाने मुस्लीम समाजधुरीणांनीं याच काळांत केली. (मॉडर्न इस्लाम इन् इंडिया- स्मिथ पृ. ७८)
 या सगळ्याचा तात्पर्यार्थ असा कीं स्त्रीचें व्यक्तित्व व तिचे स्वतंत्र अस्तित्व या काळांत सर्वांना मान्य होऊं लागले होते. डॉ. कुमारस्वामींनीं जुन्या धर्मग्रंथांचा अभिमान धरला तरी तो नवे विचार सांगण्यासाठींच घरला. 'प्रत्येक क्षेत्रांत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने संधि मिळाली पाहिजे. स्त्रियांना समाजाने आर्थिक स्वास्थ्य प्राप्त करून दिले पाहिजे. स्त्रियांनीं पुरुषांचे अनुकरण करण्याच्या भरीस न पडतां स्त्रीत्वाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठीं- खऱ्याखुऱ्या स्त्रिया होण्यासाठी लढा केला पाहिजे.' अशाच विचारांचा त्यांनीं पुरस्कार केला आहे. तेव्हां स्त्रियांचे स्वतंत्र स्थान, त्यांचे व्यक्तित्व, त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा राम मोहन रॉयापासून डॉ. कुमारस्वामीपर्यंत सर्वांनाच या काळांत मान्य झाली होती असे दिसतें. कोणी तीं पाश्चात्यांच्या आधारे सांगितली, कोणी पौर्वात्यांच्या. ती मान्य झाली हाच भाग महत्त्वाचा आहे. लोकसत्ताक शासनाच्या प्रगतीस महत्त्व त्याचे आहे.
 गेल्या शतकांत लोकशाहीची सिद्धता कशी होत होती, तें आपण पहात आहों. माववत्वाच्या प्रतिष्ठेची प्रतीति हा लोकसत्तेच्या तत्त्वांचा मूलाधार आहे, हें आरंभींच सांगितलें आहे. त्या प्रतिष्ठेच्या विवेचनांतूनच आपण समतेच्या विचाराकडे आलो. कारण अंध कर्मकांडाप्रमाणेच जन्मनिष्ठ विषमता ही मानवाच्या प्रतिष्ठेला घातक आहे.

विषमतेला सुरुंग - भौतिकज्ञान

 हीं विषमता नष्ट करावी म्हणून कोणी कसे प्रयत्न केले ते येथवर आपण पाहिले. आतां विषमता नष्ट करणाऱ्या आणखी एका शक्तीचा विचार करावयाचा आहे. भौतिक ज्ञान ही ती शक्ति होय. मानवामानवांत उच्चनीचता निर्माण होते ती त्यांच्या जवळच्या विषम धनामुळे होते. विषमतेला कारण होणारीं हीं धनें अनेक प्रकारचीं आहेत. उच्च कुलांत जन्म, पारमार्थिक अधिकार व भौतिक संपत्ति, या धनांची महती लोकशाही पूर्वयुगांत फार होती आणि अजूनहि ती समूळ नष्ट झालेली नाहीं. या धनांची प्राप्ति होणे हे पुष्कळसे नशिबावर अवलंबून असल्यामुळें तीं विषमतेला कारणीभूत होतात. पण ज्ञानधनाचे तसे नाहीं. ते मानवाच्या स्वाधीन आहे आणि त्यामुळेच सर्व प्रकारच्या विषमतेवर ज्ञानधन हा मोठा प्रभावी उतारा आहे. सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रांत समता निर्माण झाल्यावांचून लोकसत्तेला अर्थ नाहीं हें मागें अनेक वेळा सांगितले आहे. ही सर्व प्रकारची समता प्रस्थापित करण्याचे एक प्रभावी साधन म्हणजे भौतिक ज्ञान हें होय. स्वतःला शूद्र गणणारे ज्योतिबा फुले उंच स्थानी जाऊन बसले ते यामुळेच. याच्याच जोरावर दादोबा पांडुरंग हे वैश्य असून पाणिनीच्या पदवीला गेले आणि याच्याच साह्याने डॉ. आंबेडकर हे भरतभूमीचे मनु झाले आहेत. या ज्ञानामुळेच पुढेमार्गे सांस्कृतिक समता निर्माण होऊन जातिभेद नष्ट होण्याचा संभव आहे.
 शास्त्रीय ज्ञानाचा लोकसत्तेशीं किती निकटचा संबंध आहे, ते ब्रिटिश लोकसत्तेचा इतिहास वाचणाऱ्यांना सांगावयास नको. सर्व प्रकारच्या दास्यांत अज्ञानजन्य दास्य हे मानवी प्रतिष्ठेला अत्यंत घातक आहे. कारण त्यामुळे मानवाचें मनच प्रज्ञाहत होते. आणि मग प्रज्ञासंपन्न व प्रज्ञाहत असे समाजाचे दोन गट होऊन तेथे विषमता निर्माण होते. लोकशाहींत प्रत्येक मनुष्य समभूमीवर असून तत्वतः तरी तो भावी राज्यकर्ता आहे असे गृहीत धरलेले असते. आणि राज्यकर्त्या पुरुषाच्या मनाला जी रग असणे अवश्य आहे ती ज्ञानांवाचून दुसऱ्या कशानेंहि उत्पन्न होणे शक्य नाहीं. भोळे- भाबडे, वेडेवांकुडे, अज्ञ, साधे, बालमनाचे, निष्पाप, निष्कपटवृत्तीचे लोक अध्यात्मक्षेत्रांत कितीहि उंच पातळीवर असले तरी राष्ट्रीय व्यवहारांत आणि विशेषतः लोकायत्त शासनांत अशा लोकांना कसलेहि स्थान प्राप्त होणें शक्य नाहीं.
 

ज्ञानाविषयींचा हा महासिद्धांत गेल्या शतकांतील धुरंधरांनी पूर्णपणें जाणला होता. आणि म्हणूनच त्यांनी या भौतिक ज्ञानाचा जणूं ध्यास घेतला होता. गेल्या शतकांतील कोणच्याहि क्षेत्रांतील कोणचाहि कार्यकर्ता घेतला तरी त्याचा ज्ञानप्रसाराशी कोठे ना कोठें संबंध आलेलाच आहे असे दिसते. या ज्ञानावांचून आपल्या समाजाची उन्नति होणें अशक्य आहे, याविषयी त्या विचारवेत्यांना तिलप्राय संदेह नव्हता. ज्ञान हीच संजीवनी होय, ज्ञान हेच सामर्थ्य होय, ज्ञान हाच राष्ट्रीय मोक्ष होय, हा सिद्धांत त्यांच्या मनःपटलावर अगदी कोरून गेला होता आणि म्हणूनच त्यांनी अशा या चिंतामणीच्या अधिगमासाठी विश्वप्रयत्न केलेले दिसतात.
 १८३३ सालीं विलायत सरकारने हिंदी लोकांमध्ये विद्याप्रसार व्हावा यासाठी मंजूर केलेल्या रकमेचा विनियोग कसा करावा, ती रक्कम कोणत्या विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावी याविषयीं हिंदुस्थान सरकार विचार करीत होतें. त्यावेळीं ही सर्व रक्कम पाश्चात्य विद्येच्या प्रसारासाठींच खर्च केली जावी असा राममोहन यांनी सरकारकडे अर्ज केला. त्या अर्जात, "गणित, रसायन, शरीरशास्त्र, भौतिकविद्या इ. ज्या शास्त्रांना पूर्णत्वास नेल्यामुळे युरोपीयन राष्ट्र जगाच्या पुढे गेलीं, तीं शास्त्रें आम्हांस शिकवावी. जुनें व्याकरण, किंवा तत्त्वज्ञान यांचा आज ते शिकणाराला किंवा समाजाला कांहीं उपयोग नाहीं. वेदांताच्या सिद्धांतापासून तरुणांना समाजाचे उत्कृष्ट घटक कसे बनवावे याचे शिक्षण मिळणार नाहीं. लॉर्ड बेकनच्या पूर्वीच्या काळी जें ज्ञान युरोपांत होते ते इकडे विपुल प्रमाणांत आहे. येथे उणीव आहे ती भौतिक विद्येची आहे." अशा तऱ्हेचे विचार त्यांनी सांगितले आहेत. यावरून अनुभवशून्य ग्रंथप्रामाण्याचे युग संपून येथे अनुभवगम्य व बुद्धिगम्य ज्ञानाचे युग सुरू व्हावे याविषयीं राममोहन यांना कशी तळमळ लागून राहिली होती ते दिसून येते.

विद्येची महती

 दादोबा पांडुरंग यांनी महाराष्ट्रांत याच तऱ्हेचे विचार प्रसृत करून भौतिकज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी 'स्टूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक् सोसायटी' ही संस्थाहि १८४८ साली काढली होती. हिच्या मराठी शाखेचे अध्यक्ष दादोबा असून गुजराथी शाखेचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी हे होते. दादोबांचे मित्र गोवर्धनदास हे एका प्रसंगी म्हणाले, 'इंग्रजांच्या राज्यापासून प्रजा निर्धन होऊन गेली आहे. व्यापार सर्व बुडाला. इंग्रजी राज्य आणखी पांचपन्नास वर्षे राहील तर प्रजा दरिद्री होऊन जाईल.' यावर दादोबांनी उत्तर दिले, 'तुम्ही म्हणतां ही गोष्ट खरी आहे; पण यांत सारा दोष आपल्याच लोकांचा आहे, हे लक्षांत ठेवले पाहिजे. हे सर्व लोकांच्या दुर्बलपणामुळें व विद्यारहितपणामुळे झाले आहे. आपल्या देशांतील लोक विद्यांचा अभ्यास करीत नाहींत. निरनिराळ्या देशांचे वृत्तांत वाचीत नाहींत. जुन्या शास्त्रांवर फाजील विश्वास ठेवतात. त्यामुळे अज्ञान वाढले आहे. आतां हाच उपाय राहिला आहे की, आम्ही विद्या व कला यांचें ज्ञान संपादन करावें, नीतिमान् व्हावें आणि सरकारजवळ स्वतःचे खरे हक्क मागावे.' वरील संस्थेच्या सभेत पहिल्या वर्षी रसायनशास्त्र, मराठ्यांचा उत्कर्षापकर्ष, हिंदुस्थानांतील विद्या व कला अशा तऱ्हेच्या विषयांवर निबंध वाचले गेले. त्यावरून तिच्या कार्याचे स्वरूप समजून येईल. (दादोबा पांडुरंग- प्रियोळकर पृ. ३८०, ४०४)
 सर सय्यद अहंमद यांनी १८६२ साली गाझीपूर येथे 'सायंटिफिक सोसायटी' नांवाची संस्था स्थापन केली. ती आपल्या लोकांत पाश्चात्य विद्येचा प्रसार करावा या हेतूनेच केली. या संस्थेच्या द्वारा इंग्रजीतील अनेक उत्तम ग्रंथांचे उर्दूत भाषांतर झाले. पुढे अलीगड विद्यापीठ स्थापन झाले. त्यांतहि भौतिक विद्येच्या प्रसारास फारच महत्त्व होते आणि वरील संस्थेची प्रगतीहि त्या विद्यापीठाच्या अनुषंगाने होत होती. गेल्या शतकाच्या शेवटच्या चरणांत मुसलमान समाजांत पाश्चात्य विद्येचा जो कांहीं प्रसार झाला त्याचें पुष्कळसे श्रेय वरील संस्थांनाच आहे.
 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे, आतांपर्यंत वर ज्या सामाजिक सुधारणा सांगितल्या त्यांना त्या अकाली घडत आहेत म्हणून फारसे अनुकूल मत नव्हते; पण भौतिक ज्ञानाच्या बाबतींत मात्र त्यांची दृष्टि सर्वथैव पुरोगामी होती. 'इंग्लिश लोकांच्या उत्कर्षाचा हेवा करण्यापेक्षां त्यास कारणीभूत जे त्यांचे गुण त्यांचा हेवा करणे हितावह होईल. तेव्हां आपल्या सुदैवानें ज्ञानप्रसाराचीं जीं अमोलिक साधने आपल्या हाती आहेत, त्यांचा उपयोग करून घेण्यास आमच्या देशबंधूंनी कसूर करूं नये. असे केलें असतां त्यांनी आपला धर्म जगविला व आपल्या देशास मोठे भूषण आणले असे होईल.' अशा तऱ्हेचीं मतें सांगून शास्त्रीबुवांनी ज्ञानाची महती गायिली आहे. 'आमच्या देशाची स्थिति' या निबंधांत विष्णुशास्त्री म्हणतात, 'अमेरिकेतल्या लोकांनी गेल्या शतकांत काय प्रकार केला तो तर जगजाहीरच आहे. असो. तर एकंदरींत सांगावयाचे काय कीं सज्ञान दशेचें फळ देशोन्नति हें होय. यास्तव आपल्या देशांत नो जो इंग्रजी विद्येचा प्रसार होत जाईल तों तों सुधारणा, स्वातंत्र्य, सुख, यांचा अवश्य प्रसार होत जाणार ! एक इंग्रजी विद्येचें वज्र आमच्या हातीं असले, म्हणजे मग लिटनशाही, टेंपलशाही, चाटफिल्डशाही, मूरशाही वगैरे शंभर शाह्यांनासुद्धां आम्ही दाद देणार नाहीं !'
 वर तीनचार कार्यकर्त्यांचाच उल्लेख केला आहे. पण तेवढ्यांनाच भौतिक ज्ञानाची महती समजली व पटली होती असें नाहीं. ब्रिटिश अंमल येथें सुरू होऊन जो जो कोणी इंग्रजी विद्या पढूं लागला त्याला त्याला त्या विद्येचें अतुळ सामर्थ्य प्रतीत झाले होते. आणि पाश्चात्यांचे सर्व बळ या विद्येत असून आपल्या अधःपाताचे कारण म्हणजे तिचा अभाव हेंच होय असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झाला होता. गेल्या शतकांत धार्मिक, सामाजिक व राजकीय अशा सर्व प्रकारच्या सुधारणा चालू झाल्या होत्या व प्रत्येक क्षेत्रांत भिन्न भिन्न मतांचे लोक आपल्या दृष्टीने कार्य करीत होते. पण त्यांतील प्रत्येकानें शाळा, कॉलेज आणि वर्तमानपत्र या त्रयीचाच आश्रय केला होता. सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी 'बंगाली' हे पत्र व 'रिपन' हें कॉलेज यांच्या साह्याने राजकीय चळवळ केली. टिळक-आगरकर यांनी 'केसरी, व मराठा' ह्रीं पत्रे व 'फर्ग्युसन' हे कॉलेज याच साधनांचा आश्रय केला. स्वामी दयानंदांचे अनुयायी लाला हंसराज, लाला लजपतराय व गुरुदत्त विद्यार्थी यांना प्राधान्याने धार्मिक चळवळ करायची होती. पण त्यांचीं साधनें 'रीजनरेटर ऑफ आर्यावर्त' हें पत्र व 'दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज' हें विद्यालय हींच होतीं. सर सय्यद अहंमद यांचें पत्र 'सोशल रिफार्मर' व 'अलीगड कॉलेज' यांचा उल्लेख वर आलाच आहे. या सर्वांवरून हे स्पष्ट दिसतें कीं चळवळ कोणच्याहि प्रांतांतली असो, कोणच्याहि धर्मपंथाची असो, कोणच्याहि क्षेत्रांतली असो, तिची प्रगति पाश्चात्य विद्येवरच अवलंबून होती; आणि हे जाणूनच येथल्या नेत्यांनी त्या भौतिक विद्येचा आश्रय केला होता.
 भौतिक विद्या नसली कीं मनुष्य निसर्गाचा व त्यामुळेच अनेक शक्तींचा गुलाम होतो. आणि मग लोकसत्तेस अवश्य ती मनोवृत्ति निर्माण होणें अशक्य होते. इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञांची अखंड परंपरा निर्माण झाली, भौतिक विद्येच्या प्रगतीला कधीं खंड पडला नाहीं, म्हणूनच तेथली लोकसत्ता यशस्वी होऊं शकली. भारतांत याच कार्यकारण संबंधाची पुनरावृत्ति होत आहे. अजून ही विद्या अल्पशा सुशिक्षितांच्याच कक्षेत आहे. तिचा प्रसार बहुजनांत जसजसा होत जाईल त्या त्या प्रमाणांत त्यांचे कर्तृत्व वाढून समाजांतील विषमता नष्ट होईल आणि त्यामुळे लोकसत्तेची बैठक जास्त विस्तृत आणि म्हणूनच जास्त दृढ व दुर्भेद्य अशी होत जाईल.
 जगांतल्या कोणच्याहि प्रांताचा, कोणत्याहि कालखंडाचा इतिहास पाहिला तरी, समता तेथें उन्नति व विषमता तेथे अधोगति हा महासिद्धान्त आपल्याला दिसून येतो. राजशासन कोणच्याहि प्रकारचें असले तरी हा सिद्धान्त ढळलेला दिसत नाहीं. मग लोकायत्त शासनाला समतेची किती आवश्यकता असेल, याची सहज कल्पना येईल. येथल्या पूर्वसूरींना ही कल्पना आली होती, आणि म्हणूनच आपल्या समाजांतील जन्मनिष्ठ विषमता नष्ट करण्याचे त्यांनीं यावत्शक्य प्रयत्न केले. त्या प्रयत्नांचा इतिहास आपण येथवर पाहिला. पुढील प्रकरणांत वरील प्रकारच्या विशेष अंगांच्या सुधारणेच्या नादी न लागतां समाजाचे मूळ अधिष्ठानच बदलून टाकण्याचे आगरकरांनीं जे महनीय प्रयत्न केले, त्यांचे स्वरूप विशद करून त्यानंतर लोकशाहीच्या राजकीय अंगाच्या अभ्यासाकडे आपण वळू.




प्रकरण चौथें

भौतिक अधिष्ठान
आगरकर व विवेकानंद यांचे कार्य



धर्मनिरपेक्ष शासन

 आज भरतभूमीच्या राजशासनाचीं सूत्रे ज्यांच्या हातीं आहेत, त्या पुरुषांनीं एकमुखान असे जाहीर केलें आहे कीं, या भूमीचें शासन है धर्मनिरपेक्ष असच राहील. शासनसंस्था धर्माधिष्ठित असेल तर लोकसत्ता