बळीचे राज्य येणार आहे!/शेतकरी एकजुटीच्या निकडीचा काळ

विकिस्रोत कडून

शेतकरी एकजुटीच्या निकडीचा काळ



 श्री. श्रीरंगनाना मोरे यांच्या या अमृतमहोत्सव सत्कार समारंभात मला उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी या समारंभाच्या सत्कार समितीचे आभार मानतो. आभार यासाठी की मी काल येथे आल्यापासून, शेतकरी संघटनेच्या कामात १९८० पासून ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ती सगळी मंडळी, विशेषत: मराठवाड्यातील मला भेटत होती. एवढेच नव्हे, तर काही समजांमुळे किंवा गैरसमजांमुळे थोडी वेगळी झालेली मंडळीसुद्धा नानांच्या प्रेमामुळे, नानांच्या या कार्यक्रमामुळे येथे आवर्जून हजर आहेत त्यांचीही भेट झाली. या कार्यक्रमाला हजर असलेले हे सगळे नानांचे प्रेमी आहेत; आणि हजर राहणार म्हणून ज्यांची नावे चर्चेत होती त्यापैकी जे आलेले नाहीत ते बहुतेक माझ्यावरच्या रागामुळे आले नसावेत. माझ्यामध्ये इतर अनेक गुण आहेत, पण मी माणसे सांभाळणारा नाही असे बरेच लोक म्हणतात. हे खरे असावे. रामदास स्वामींनी संभाजी महाराजांना लिहिलेल्या एका पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गुणाचा मोठा आवर्जून उल्लेख केला आहे. 'शिवरायांची सलगी देणे कैंचे असे!' श्रीरंगनानांनी एखाद्याला सलगी दिली म्हणजे तो जन्मभर त्यांचा मित्र आणि प्रेमी राहणार. माझ्या एका अध्यक्ष कार्यकर्त्याने मला एकदा सांगितले होते की, 'साहेब, तुम्ही आमच्यापैकी कोणाचंही कौतुक करीत जाऊ नका. तुम्ही कौतुक केलं म्हणजे ती माणसं बिघडतात.' हा 'सलगी' देण्याचा गुण मला जमला नाही आणि म्हणून कदाचित मला मानणारे बरेचसे लोक बाजूला बसले असण्याची शक्यता आहे.
 हे खरे आहे की नानांच्या स्वागताध्यक्षपदाखाली १९८४ साली परभणीला जे अधिवेशन झाले त्या अधिवेशनाने शेतकरी संघटनेला 'रुमणेधारी शेतकऱ्यांचे चिन्ह आणि छातीला लावायचा बिल्ला दिला. आजही माझ्या दिल्लीच्या कार्यालयात त्या शेतकऱ्याची प्रतिकृती आहे आणि १९८४ साली छातीवर लावलेला बिल्ला रात्री झोपतानाही माझ्या छातीवर असतो. त्यामुळे, नानांची आठवण सतत मनात जागत असते, याबद्दल कोणी शंका घेण्याचे कारण नाही.
 तरीसुद्धा या सत्कार समारंभाच्या सुरुवातीला मी, थोडेसे औचित्यभंग करण्यासारखे वागलो त्याबद्दल सर्वांची माफी मागून खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला पुष्पहार, शाल-श्रीफळ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम होता. या सत्कारसमितीचे अध्यक्ष डॉ. शेषराव मोहिते यांना विनंती करून मला या कार्यक्रमातून वगळावे अशी विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. १९८४ साली परभणीला झालेल्या शेतकरी संघटनेच्या अधिवेशनात आपण पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. नंतर सगळ्या पक्षांनी त्याची नक्कल करायला सुरुवात केली; पण 'कर्जमुक्ती'ची खरी मांडणी पहिल्यांदा झाली ती शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनात. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जी काही कर्जमाफीची योजना जाहीर केली ती फाटकीतुटकी, शेतकऱ्याशेतकऱ्यांत केवळ फूट पाडणारी, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता ठेवून पुढाऱ्यांच्या बँकांची आणि सहकारी संस्थांचीच फक्त भर करणारी योजना पाहिल्यानंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीने पुन्हा एकदा कर्जमुक्तीचे आंदोलन प्रखर करण्याचा निश्चय केला आणि जोपर्यंत हिंदुस्थानातील समग्र शेतकरी सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त होत नाही तोपर्यंत शेतकरी संघटनेच्या मंचावर कोणीही हारतुरे, शाल-श्रीफळांचा सत्कार स्वीकारणार नाही असा ठराव केला. ज्या अर्थी श्रीरंगनाना या मंचावर आहेत त्या अर्थी हा मंच, सत्कार समितीने उभा केला असला तरी तो शेतकरी संघटनेचाच मंच आहे असे मी मानतो आणि म्हणून मी सुरुवातीला हारतुऱ्यांचा सत्कार अव्हेरला.
 मला नानांचेही आभार मानायचे आहेत, नानांनी या समारंभाला मान्यता दिली त्याबद्दल. त्यांनी जर 'हो' म्हटले नसते तर तुम्हा सर्वांना भेटण्याचा योग आला नसता. आज सकाळी माझ्या मनात आले की नानांचा अमृतमहोत्सव सत्कार करायला, खरे तर, सर्वांत योग्य जागा ज्या जागी पहिल्यांदा आमचे सूर खऱ्या अर्थी जुळले तीच असायला पाहिजे. म्हणून नानांना भेटण्यासाठी मी मोरेवाडीला नानांच्या वाड्यावर गेलो. नाना वाड्यावर नव्हते, ते त्यांच्या नव्या घरी बसलेले होते. मी त्यांना फोनवरून म्हटले की, "ज्या देवडीमध्ये आपण पहिल्यांदा भेटलो, जेथे पहिल्यांदा शेतकरी संघटनेच्या सिद्धांताच्या चर्चा झाल्या तेथेच मला तुम्हाला फूल देऊन तुमचा सत्कार करायचा आहे" आणि नानांचा मोठेपणा म्हणजे ते त्यांच्याभोवती जमलेल्या प्रेमीजनांच्या गराड्यातून उठून आपल्या वाड्यावर त्वरेने आले आणि त्यांनी माझ्या भावनांची कदर केली. नानांनी जर का या सत्कार समारंभाला मान्यता दिली नसती तर या सगळ्याच अनुभवाला मुकावे लागले असते.
 आजकाल दिवस असे आहेत की तालुक्याच्या, पंचायत समितीच्या किंवा जिल्ह्याच्या एखाद्या फडतूस कार्यकर्त्याचा ५१वा किंवा ५२वा जरी वाढदिवस असला तरी दूरदर्शनवर त्याच्या जाहिराती दिवसभरात पन्नास वेळा दाखवतात. हे दाखवणारे काही प्रेमाने दाखवतात अशीही काही गोष्ट नाही ; ज्याचा सत्कार असतो त्यानेच, बहुधा, त्याच्या खर्चाची आणि जाहिराती देण्याची व्यवस्था केलेली असते. अशा या जाहिरातींच्या युगात नानांसारखा कार्यकर्ता फक्त शेतकरी संघटनेच्याच मुशीतून तयार होऊ शकतो. शेतकरी संघटनेच्या संपूर्ण इतिहासात कधी कोण्या कार्यकर्त्याची अशी जाहिरात दूरदर्शनवर कोणी दिली नाही आणि शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही अशा अपेक्षेने काम करीत नाहीत. नानांनी आपल्या भाषणात अत्यंत विनम्रपणे सांगितले की आम्ही काय फार मोठे काम केले असे आम्हाला खरोखरच वाटत नाही आणि त्याकरिता पाच पैसे खर्च करून त्याचे नगारे बडवणारी कोणी जाहिरात लावावी हे आमच्या धर्मात बसत नाही.
 या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी सुरुवातीला मुद्दा काढला की नानांची शेतकरी-शेतमजूर संघटना आधी चालू झाली का शरद जोशींची शेतकरी संघटना आधी? हा काय वाद आहे? एव्हरेस्टवर पहिल्यांदा हिलरी गेला का तेनसिंग याबद्दल एखादवेळेस वाद होऊ शकतो; पण हा वाद सुदैवाने माझ्यामध्ये आणि नानांमध्ये कधी आला नाही. त्याचे स्पष्टीकरण अगदी साधे आहे. नानांचा हा सत्कार ज्या सभागृहात होत आहे त्याला ज्या मुकुंदराजांचे नाव दिले आहे त्या मुकुंदराजांनी ज्ञानेश्वरांच्या आधी २००-३०० वर्षे 'विवेकसिंधु' ग्रंथ लिहिला. भक्तिमार्गाचा खरा सिद्धांत मुकुंदराजांनी 'विवेकसिंधु'च्या रूपाने जगासमोर पहिल्यांदा मांडला; पण विठोबाच्या दर्शनाला जाणाऱ्या सगळ्यांच्या तोंडी ज्ञानोबाचे नाव येते, तुकोबाचेही येते; मुकुंदराजाचे कधी येत नाही. काव्यामध्येसुद्धा 'ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा' असेच वर्णन येते. मुकुंदराजांची उपेक्षा झाली हे खरे आहे. मराठवाड्यात इतरही अनेक मोठेमोठे साहित्यिक होऊन गेले; पण त्यांना मिळायला हवी तशी मान्यता मिळाली नाही. मराठवाड्याचे हे दुर्दैवच आहे!
 या निमित्ताने मला एक गोष्ट आठवते. जेरुसलेममध्ये ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तो दिवस नाताळचा सण म्हणून साजरा केला जातो. ज्या वेळी येशूचा जन्म झाला त्याच्या आधी आकाशामध्ये एक तेजस्वी तारा दिसला होता. त्यावेळी तो तारा पाहून येशूच्या आधी जन्माला आलेले जे पाच संत पुरुष होते त्यांना कळले की जेरुसलेम येथे परमेश्वराचा जन्म होणार आहे आणि ते सगळे तिकडे जायला निघाले. ते जेरुसलेमला पोहोचले आणि त्यांनी त्या नवीन बाळाचे कौतुक केले. या पाचही संतांची कथा ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट दोन्हीमध्येही लिहिलेली आहे. पण, एक सत्य त्यात आलेले नाही की सामिरतान नावाचा त्याच प्रकारचा एक संत त्याच वेळी हा पश्चिम युरोपातून जेरुसलेमला जायला निघाला होता. वाटेत घनदाट जंगलांचा प्रदेश, त्याच्याबरोबरचे यात्रेकरू पुढे निघून गेल्याने तो एकटा पडला, जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडले, मारहाण केली, त्याचे कपडे वगैरे काढून घेतले आणि त्याला समुद्रकिनाऱ्यावर गुलामांचा व्यापार करणारांपैकी एकाला विकले. येशू ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्यासाठी निघालेल्या या माणसाला गुलामांच्या त्या व्यापाऱ्याने बोटीत घालून आफ्रिकेला नेले. अनेक वर्षे चाबकाचे फटके खात गुलामगिरीच्या यातना सोसल्यानंतर त्याला एक दिवस संधी मिळाली आणि त्याने त्या गुलामांच्या व्यापाऱ्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि पुन्हा जेरुसलेमची वाट धरली. पुन्हा अत्यंत कष्ट करत अखेरी तो जेरुसलेमला पोहोचला. त्याला आशा होती की ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी आकाशातील तारा पाहून निघालो होतो त्या जन्मवेळी नाही जमले तरी त्या स्थळीतरी आता आपण जाऊन आता त्याचे दर्शन घेऊ; पण सामिरतान जेरुसलेमला पोहोचला त्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुळावर दिले होते. सामिरतानच्या नशिबी सुळी दिलेल्या येशू ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचे काम आले.
 ज्ञानेश्वर मोठा का झाला आणि मुकुंदराज मागे का पडले हे प्रश्न कोणी विचारते का? असले प्रश्न त्यांच्या विचारांची दुकानदारी करणारांनाच पडतात.
 एक काळ असा होता, एकोणीसशे सत्तर-ऐंशीच्या दशकाचा, की शेतकऱ्यांच्या लक्षात यायला लागले की, 'आता आपण अडाणी शेतकरी राहिलो नाही, जेथे दोनतीन क्विंटल पिकत होते तिथे आता वीसवीस, तीसतीस क्विंटल पिकवू लागलो आहोत; पण जितके जास्त पिकवावे तितकी कमी मिळकत होते आहे, आपण अधिकच गाळात जात आहोत.' तेव्हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानामध्ये शेतकरी आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहू लागले. हे नवीन आंदोलन सुरू करण्याचे श्रेय कोणाला द्यायचे झालेच तर ते तामिळनाडूच्या नारायणस्वामी नायडूंना द्यावे लागेल; आजसुद्धा मी त्यांना माझे गुरू मानतो. महाराष्ट्रात कोणाला देणार ? नानांनी 'भूमिसेवक' सुरू केले त्याच वेळी नागपूरच्या शरद पाटलांनी 'अन्नदाता' सुरू केले होते. आम्हीदेखील काही प्रयत्न करीत होतो. त्यापैकी कोणाच्या गळ्यात श्रेयाची माळ टाकावी या वादात काही अर्थ नाही. पुढे जाणाऱ्यांमध्ये कोणी पुढे जाण्याला आधी सुरुवात केली याबद्दल वाद असत नाही, पुढे जाणाऱ्यांमध्ये वाद निर्माण करू पाहणाऱ्या कुंठितांच्याच मनात असले प्रश्न तयार होतात.
 मी आता नानांच्या वयाचा नसलो तरी सत्तरीच्या वर आलो आहे आणि मलाही आता नदीच्या पलीकडील दृश्ये दिसू लागली आहेत. तारुण्याच्या भरात पटले नव्हते पण मला आता वाटू लागले आहे की आपण प्रयत्न करतो हा एक भाग असतो, त्याला यश किती मिळावे हे ठरवणारी शक्ती वेगळी असते. नानांचा जन्म मराठवाड्यात अंबाजोगाईला शेतकऱ्याच्या घरात झाला, त्याऐवजी माझ्याप्रमाणेच मध्यमवर्गीय सुशिक्षित घरात झाला असता तर त्यांनाही माझ्यासारखा परिस्थितीचा फायदा मिळाला असता. मी मध्यमवर्गीय घरात जन्मल्यामुळे मला शिक्षणाची चांगली संधी मिळाली, मी परदेशात गेलो आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी एकाच वेळी शेतकऱ्यांशी आणि पत्रकार, बुद्धिवादी यांच्याशीही संवाद साधू शकतो म्हणून माझे नाव पुढे राहिले; इतर कमतरता असूनही पुढे राहिले. संघटक म्हणून गुण द्यायचे झाले तर नानांना माझ्यापेक्षा दसपट गुण द्यावे लागतील. इतका त्यांचा जनसंपर्क आहे.
 श्रीरंगनानांच्या अमृतमहोत्सव सत्काराच्या निमित्ताने सगळे लोक पुन्हा एकदा एकत्र आले. या निमित्ताने तुम्हा सर्वांना काय सांगावे? नानांच्या काळात शिबिर झाले आणि त्यावर आधारित, तुम्ही ज्याला शेतकऱ्यांची गीता म्हणता असे 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' हे पुस्तक तयार झाले; पण तो काळ आता संपत आला आहे. हे विसरू नका. कोणत्याही धर्माचा कितीही पवित्र ग्रंथ असो - बायबल असो, कुराण असो वा भगवद्गीता असो जो असे धरून चालतो की हा ग्रंथ म्हणजे अखेरचा शब्द आहे, त्यापलीकडे काही नाही त्याचा विनाश जवळ आला आहे असे धरावे. ज्यांना असे वाटते की, 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' या पुस्तकात जे लिहिले आहे ते आपल्याला सगळे समजले आहे आणि त्याच्या आधारे आपण आता शेतकऱ्यांसमोर बोलू शकतो आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या ८० सालच्या गीतेतले शब्द आपण बोलतो आहोत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या टाळ्या आपल्याला पडणार आहेत आणि आपले कौतुक होणार आहे.' त्यांना मी एक धोक्याचा इशारा देऊ इच्छितो. 'काळ बदलला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न बदलले आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर त्याच त्याच ऐंशी सालच्या घोषणा आणि भाषणे करू लागलात तर १९८० मध्ये शरद पवार जितके हास्यास्पद झाले तितकेच हास्यास्पद तुम्हीही झाल्याखेरीज राहणार नाही, हे निश्चित. काळ बदलला आहे आणि जोपर्यंत तुम्ही नवीन शेतीची भाषा, नवीन शेतीचे व्याकरण, नवीन शेतीचा शब्दकोश शिकत नाही, वाचत नाही, त्याच्या मदतीने शेतीच्या परिस्थितीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या पुढारीपणाचा आव आणला तर येत्या काळात तुमच्याकडून शेतकऱ्यांचा घात होणार आहे. बदलत्या शेतीचा अभ्यास करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देणे भलत्यासलत्याला पेलणारे धनुष्य नाही.
 आपण १९८० मध्ये शेतकरी आंदोलनाला सुरुवात केली तेव्हा जागतिक हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ हे शब्दसुद्धा कोणी ऐकले नव्हते. पंचवीस वर्षांनी महाराष्ट्रातील तापमान ४८ ते ५० अंशांपर्यंत चढेल आणि त्यामुळे आपली नेहमीची पिके घेता येणे शक्य होणार नाही हे १९८० साली आपल्याला माहीत नव्हते. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे असे म्हणताना त्या काळी गणकयंत्राचे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते; गणकयंत्राच्या साहाय्याने वायदेबाजारात उतरून आपल्या मालाची रास्त किमत घरबसल्या मिळवणेही त्या काळी शक्य नव्हते. शेतकऱ्यांविषयी मनात द्वेष बाळगणारे सरकार त्या वेळी होते आणि आजही आहे. पण, शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची त्याची हत्यारे आता बदलली आहेत. आता कृषि उत्पन्न बाजार समितीत शेतकरीविरोधी कारस्थाने चालत नाहीत. आता नवीन परिस्थितीत सरकार वायदेबाजारावरच बंदी घालून शेतकऱ्यांना आपल्या हक्काचा भाव मिळू नये अशी तरतूद करते. शेतात पिकणाऱ्या सगळ्या हिरवळीतून शेतकरी इथेनॉलच्या म्हणजे 'शेततेला'च्या रूपातील इंधन तयार करू शकतो पण तसे स्वातंत्र्य शेतकऱ्याला मिळू नये असे धोरण आखते. शेतकऱ्याला लुटण्याची सरकारची ही नवीन साधने आहेत. या संबंधात ज्यांचा अभ्यास आहे, या मुद्द्यांवर आपण चांगले बोलू शकतो अशी ज्यांना खात्री आहे त्यांनी त्यांचा त्यांचा आंदोलनाचा मार्ग चालू ठेवावा. त्यांनी माझ्याच सोबत आले पाहिजे असा काही माझा आग्रह नाही; पण तुमच्यापैकी कोणाच्या मनात असे असेल की शेतकरी संघटनेमध्ये तुम्हाला योग्य तो मान मिळाला नाही किंवा तुम्हाला सावत्रपणाची वागणूक दिली गेली तर श्रीरंगनानांच्या साक्षीने, मी कुटुंबप्रमुख म्हणून ती माझी चूक मानतो आणि तुमची माफी मागतो आणि परत या अशी हाक देतो.
 शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुढचे दिवस अत्यंत कठीण आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याची ही वेळ नाही. १९८९ मध्ये, आता दोन वर्षांत शेतकरी कर्जमुक्ती होऊ शकेल अशी शेतकरी आंदोलनाची ताकद तयार झाली होती त्या वेळी महेंद्रसिंह टिकेत यांनी हल्ला केला आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. आज ते पाप तुम्ही करू नका, तुम्ही कोणत्याही पक्षात गेला असा किंवा नसा. शेतकरी संघटना जर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करीत असेल तर 'कर्जमुक्ती' आणि 'कर्जमाफी' या दोन शब्दातील भेदसुद्धा न समजता '२५००० पर्यंत कर्जमाफी द्या' म्हणणाऱ्या पक्षांसोबत एक दिवससुद्धा तुम्ही राहू नका.
 श्रीरंगनानांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगता त्यांची शेतकरी-शेतमजूर संघटना पिंपळगाव-बसवंतच्या १९८०च्या सभेत शेतकरी संघटनेत मिसळून टाकली, आपले नाव ठेवण्याचाही आग्रह त्यांनी धरला नाही. त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की, 'तुमच्या मनात प्रामाणिकपणे शेतकऱ्यांविषयी तळमळ असेल, केवळ अहंभाव नसेल' दुसऱ्या कोणाचा हवाला घेऊ नका, तुमच्या आत्म्याला विचारा केवळ काही रुसवेफुगवे झाले म्हणून दूर झाला असाल तर मी तुमची माफी मागितली आहे तर शेतकऱ्यांमध्ये वेगळ्या चुली करू नका. कारण १९८० मध्ये शेतकऱ्यांवर जितकी कठीण परिस्थिती गुजरली होती त्याहीपेक्षा जास्त कठीण वेळ पुढील पाच वर्षांत येणार आहे. त्यासाठी, सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला तरच शेतकरी जगू शकतो.

(शेतकरी संघटक, ६ जानेवारी २००९)