Jump to content

प्रशासननामा/हेचि फल काय मम तपाला?

विकिस्रोत कडून



हेचि फल काय मम तपाला?



 ‘माफ करा सर, तुम्हाला अपरात्री फोन करून त्रास देत आहे; पण परवा जनसुनवाई कार्यक्रमात 'तुम्ही मला केव्हाही, कुणीही नागरिक फोननेसुद्धा खबर देऊ शकतो; त्याची मी दखल घेऊन कार्यवाही करीन,' असं नि:संदिग्धपणे सांगितले; ते खरं मानून आज मी फोन करतो आहे...'

 रात्री अकराचा सुमार. चंद्रकांत पुस्तक वाचीत बेडवर पडला होता आणि फोनची घंटा वाजली. पलीकडे रिसीव्हरवर एका वृद्धाचा थरथरता आवाज होता. तो चंद्रकांतला ‘जनसुनवाई' कार्यक्रमाचा संदर्भ देत काही बातमी देऊ इच्छित होता.

 जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्यानं सूत्रं हाती घेतली तेव्हा आयुक्त व जिल्हाधिका-यांनी त्याला एकच ब्रीफ दिलं होतं - ‘हर संभव पावलं उचल! आणि गल्फ वॉरमुळे उद्भवलेली व बरीचशी कृत्रिम असलेली रॉकेलटंचाई संपुष्टात आण. त्याचा होणारा काळाबाजार रोख. त्यासाठी तुला दोन महिन्यांची मुदत देत आहोत!'

 एक आव्हान म्हणून त्यानं ही जबाबदारी स्वीकारली होती; पण या शहरातील रॉकेलटंचाईची गुंतागुंत जेव्हा त्याच्या ध्यानात येऊ लागली तसा तो काही काळ सुन्न झाला होता. शहरात लोकसंख्येच्या मानानं मुबलक नव्हे पण पुरेसा म्हणता येईल एवढा रॉकेल पुरवठा होत असूनही, सतत रॉकेलटंचाईच्या बातम्या यायच्या. रॉकेलच्या हातगाड्यांपुढे, दुकानांत रांगा लागायच्या. दर महिन्यादोन महिन्याला विविध संघटनांमार्फत मोर्चे निघायचे, निदर्शने व्हायची. शहरातील नगरसेवक, विविध जातीधर्माच्या संघटना आणि पक्षप्रमुख रॉकेल प्रश्नात नको तेवढा रस घ्यायचे. जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून त्याला दररोज पन्नास शंभर माणसे भेटत राहायची. एकूणच केरोसिन समस्येचा प्रश्न कॅन्सरच्या भाषेत सांगायचे झालं तर 'थर्ड स्टेजला' पोचलेला होता आणि कितीही कार्यक्षम अधिकारी असू दे, त्याचा इथं निश्चितपणे 'वॉटरलू' व्हायचा- असा गेल्या पंधरा-वीस वर्षाचा इतिहास होता.

 यात भर पडली ती इराकनं कुवेतचा कब्जा करून भडकवलेल्या गल्फ युद्धाची. भारताचा तेलपुरवठा विसकळीत झाल्यामुळे टंचाई वाढली होती. त्याचा परिणाम या शहरावर अधिक झाला होता. मुळातच काळाबाजारवाले व राजकारणी धंदेवाईकांची भ्रष्ट युती व रॉकेल धंद्यातील प्रचंड ‘ऑन मनी' मुळे नित्य टंचाई निर्माण करणे हा या युतीचा हातखंडा प्रयोग होता. त्या आगीत गल्फ वॉरच्या निमित्तानं अपु-या रॉकेल पुरवठ्याचं तेल पडलं आणि रॉकेल टंचाईनं भीषण रूप धारण केलं!

 या पार्श्वभूमीवर चंद्रकांतनं पदभार स्वीकारल्यावर तडफेनं कामास प्रारंभ केला. प्रथम स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना दिल्या व दररोज स्वत: हिंडून तपासणी करणं व अकस्मात धाडी घालणं सुरू केलं; पण टंचाईचे खरे सूत्रभार हे बडे रॉकेल एजंट आहेत हे त्याला माहीत होतं; पण ते स्वत: नामानिराळे राहून ते सब एजंट व किरकोळ विक्रेत्यांकडून काळाबाजार करतात हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य होतं आणि त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करता येत नव्हती व वेसण घालता येत नव्हती.

 अचानक त्याला 'जनसुनवाई' ची कल्पना सुचली. राजस्थानमध्ये गावकरी एकत्र येऊन अधिकारी-पुढाऱ्यांना ‘जनसुनवाई' च्या माध्यमातून जाब विचारतात, असं त्यानं वृत्तपत्रांतून वाचलं होतं. या कल्पनेचा उपयोग करून घेण्याचं त्यानं ठरवलं आणि वार्ताहर परिषद घेऊन, रॉकेल टंचाई निवारणार्थ प्रशासनातर्फे पुढाकार घेत ‘जनसुनवाई' कार्यक्रम घेण्याचे जाहीर केलं. शहरातील नागरिकांनी प्रश्न बंद पेटीत टाकावेत. काही गुप्त बातमी-रॉकेलच्या काळाबाजाराच्या संदर्भात असेल तर तीही या पेटीत टाकावी. कार्यक्रमातून त्यावर कार्यवाही करून सभेमध्ये अहवाल दिला जाईल, असं त्यानं जाहीर केलं.

 ‘जनसुनवाई' चा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाला. कारण बंद पेटीत नागरिकांनी ज्या खबरी दिल्या होत्या, त्याबाबत चंद्रकातनं कार्यवाही करून एक सबएजंट व तीन स्वस्त धान्य दुकानांवर धाडी घालून त्यांचा रॉकेलचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता आणि त्यांचे परवाने रद्द केले होते. या ‘जनसुनवाई' साठी तेल कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी व शहरातील सर्व ठोक एजंट व सब एजंट यांना उपस्थित राहणे चंद्रकांतनं सक्तीचे केले होते. हेतू हाच की, त्यांना नागरिकांच्या रोषाची जाणीव व्हावी आणि त्यांनी स्वत:हून गैरव्यवहार थांबवावा!

 आणि आज एक वृद्ध गृहस्थ फोनवर ‘जनसुनवाई' चा संदर्भ देत काही बातमी देऊ इच्छित होता.  ‘माफीचा प्रश्न येतोच कुठे? उलट आपल्यासारखे जागरूक समाजहितैषी नागरिक आपणहून शासनाला मदत करू इच्छितात-हे आमच्यासाठी चांगलेच आहे. चंद्रकांत मनापासून म्हणाला, 'मी तुमच्या बातमीवर पूर्ण विश्वास ठेवून योग्य ती कार्यवाही करीन!'

 त्या वृद्धानं सांगितलेली बातमी ऐकताना चंद्रकांतला जाणवलं की, ती जर खरी असेल व आपल्याला भक्कम पुरावा सापडला तर रॉकेल रॅकेटमधील 'बडी मछली' पकडता येईल. पहिले बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर स्वारी का करायची हे पटवून देताना जे सूत्र सांगितले ते तर सर्वकालीन सत्य आहे. 'मुळावर घाव घातला की फांद्या आपोआपच खाली पडतात.' बाजीरावांचे हे प्रसिद्ध वाक्य रॉकेल टंचाई प्रकरणातही लागू पडणार होतं. शहराचा काळा बाजार करणारा केरोसीन किंग' जर पकडला गेला तर कृत्रिम टंचाईवर परिणामकारक मात करता येणार होती. शहरातील केरोसीन किंग बद्रीप्रसादनं प्रत्यक्षात वडगाव भागासाठी सब एजंट मानेंना रॉकेलचे टँकर न देता ते बाहेरगावी काळ्याबाजारात वळते केले होते, अशी बातमी त्या अनाम वृद्धानं देत पुढे म्हणलं, ‘सर-आपण उद्याच मानेच्या ऑफिसवर धाड टाकली व गावात चौकशी केली तर कळेल की, मागील आठ दिवसात जेमतेम शे-पाचशे लीटर रॉकेल जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी वाटप केलं असेल. एवढेच!'

 चंद्रकांतनं आपल्या पुरवठा निरीक्षकासह दुसऱ्या दिवशी सकाळीच वडगावला जाऊन मानेच्या ऑफिसातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. पंधरा दिवसापूर्वी दोन टँकर्सनं चोवीस हजार लीटर रॉकेल बद्रीप्रसाद कडून त्याला प्राप्त झाल्याची व ती पुढील तीन दिवसात वडगाव सर्कलमधील चौतीस स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांना वाटप केल्याच्या नोंदी होत्या. रेकॉर्ड एकदम आलबेलं होतं; पण जेव्हा त्या ३४ दुकानदार व एजंटपैकी आठ-दहा जणांच्या गावी जाऊन तपासणी केली तेव्हा गावकऱ्यांनी गावात रॉकेल आलेच नाही असा जबाब लिहून दिला. तेव्हा किरकोळ विक्रेते व स्वस्त धान्य दुकानदारांनी कबूल केलं की, त्यांनी रॉकेल गावी आणलेच नाही आणि आपणावर प्रकरण शेकू नये म्हणून त्यांनी आपण रॉकेल विकत घेतलेच नाही असा जबाब दिला.

 तूर्त चंद्रकांतनं त्यांचा खुलासा मान्य करून यापुढे असे प्रकार करणार नसल्याची हमी घेऊन व त्यांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड करून सोडून दिले. कारण त्यांचं लक्ष होतं माने व बद्रीप्रसाद.

 पूर्ण चौकशीअंती चंद्रकांतनं हे सिद्ध केलं की, मानेनं बद्रीप्रसादकडून विकत घेतलेलं रॉकेल वाटप न करता काळ्या बाजारात वळतं केलं. कलेक्टरांच्या आदेशानं मानेंचा रॉकेल परवाना निलंबित करण्यात आला. निलंबनाचे आदेश घेताना माने चंद्रकांतला स्पष्ट कबुली देत म्हणाला,

 ‘सर, आजवर मला कोणी हात लावायची हिंमत केली नव्हती. पण एक सांगतो, जितका मी दोषी आहे, त्याच्या दसपट बद्रीप्रसाद दोषी आहे. पण तुम्हाला त्याच्याविरुद्ध पुरावा सापडणं शक्य नाही. कारण पाहुण्या हाती साप मारावा तसा माझ्या नावेच नव्हे, तर बऱ्याच सब एजंटच्या नावे तोच काळाबाजार करतो, अडकतो मात्र आम्ही.'

 ‘मला त्याची तुम्ही मोडस ऑपरंडी-कार्यपद्धती सांगितली तर चौकशीच्या वेळी तुमचा सहानुभूतीने विचार करता येईल.

 मधाचं बोट लावीत चंद्रकांतनं मानेला बोलतं करण्याचा प्रयत्न केला.

 ‘सर, मी सहीपुरता साक्षर आहे. मला लिखापढी कळत नाही आणि ही बद्रीप्रसाद त्यात उस्ताद आहे.' माने म्हणाला, 'पण त्याच्यापर्यंत जर कुणी पोचू शकत असेल तर ते तुम्हीच. त्याला जरूर पकडा व शिक्षा करा सर!'

 चंद्रकांत दिवसभर विचार करत होता तो बद्रीप्रसादचा! हिंदुस्तान पेट्रोलियम् कंपनीचा जिल्हा एजंट होता. त्यांच्या मार्केटिंग अधिकाऱ्यांशी बोलला; पण तो चंद्रकांतच्या ताकास तूर लावू देत नव्हता. तो बद्रीप्रसाद व इतर एजंटच्या रॅकेट मध्ये सामील असणार.

 माने प्रकरणाचा शहराच्या रॉकेल टंचाईवर काही प्रमाणात का होईना अनुकुल परिणाम झाला होता. सर्व ठोक एजंट सावध झाले होते. त्यांनी बऱ्याच प्रमाणात रॉकेलचा पुरवठा, काळाबाजार करणे कमी केले होते. शहरातील रॉकेल टंचाई जवळपास संपुष्टात आली होती. आयुक्तांनी त्याचं अभिनंदन केलं होतं; चंद्रकांत समाधानी नव्हता. कारण ही तात्पुरती जीत होती. अजूनही 'बडी मछली' कायद्याच्या जाळ्यात गवसली नव्हती.

 माने प्रकरणात त्याच्या इतकाच दोषी असलेला बद्रीप्रसाद अजूनही पुराव्याअभावी मोकळा होता. त्याचं रेकॉर्ड स्वच्छ होतं. त्यानं मानेला दोन टँकर्स दिल्याची कागदोपत्री नोंद होती व ते मिळाल्याबद्दल मानेंची स्वाक्षरी होती.

 'होय, ती सही माझी आहे; पण केवळ पाच हजार देऊन त्यांनी माझी सही घेतली व स्वत: त्यानं दोन टॅकर्सचा काळाबाजार करून किमान पन्नास हजाराची चांदी केली असणार.

 मानेचं हे वाक्य त्याला बोचत होतं आणि बद्रीप्रसादला पकडून, शिकवल्याखेरीज खऱ्या अर्थानं या मोठ्या माशाला वेसण बसणार नव्हती की शहर व जिल्ह्यातील रॉकेल टंचाई संपणार नव्हती. पण बद्रीप्रसादविरुद्ध काही पुरावा सापडत नव्हता.

 रात्री साडेदहाची वेळ. पुन्हा फोनची घंटी. तोच अज्ञात वृद्धाचा थरथरता स्वर.

 'अभिनंदन सर, मी आजच गावाहून परत आलो व जुने पेपर्स वाचले; पण बद्रीप्रसाद खरा गुन्हेगार आहे, तो अजूनही मोकळाच आहे.'

 'होय पण त्याच्याविरुद्ध काही पुरावा सापडत नाही. तुम्ही काही टीप्स देऊ शकाल का त्याच्या मोडस् ऑपरेंडीबाबत?'

 'टीप नाही, पण एक प्रयत्न करून पाहावा असं वाटतं. तुम्ही त्याच्या बँकेचे रेकॉर्ड का तपासत नाही?'

 पण त्यानं काय होणार आहे, हा प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी कार्यालयीन कामकाज करत असताना हा प्रश्न त्याच्या डोक्यात घोळत होता.

 त्याच्या दालनात बद्रीप्रसादचा कार्यालयीन काम करणारा मुनीम आला. बद्रीप्रसादच्या नावे ठोक परवान्यासोबत किरकोळ परवानाही होता. त्यासाठी त्यांना पाच टँकर्सचे आदेश पाहिजे होते. ते नियमानुसार असल्यामुळे देण्यात काही अडचण नव्हती. पण चंद्रकांतनं मुनीमला बसवून घेत विचारलं, ‘सेठ, बद्रीप्रसादचं सारं काम तुम्हीच पाहता वाटतं ? आय मीन इथलं? बँकेचं?'

 'हो, मी त्यांच्या विश्वासातला आहे.'

 'आता किरकोळ एजंट म्हणून तुम्हाला पाच टँकर्सचा परवाना दिला आहे. पुढील तुमची प्रोसिजर काय आहे?'

 ‘सर, या पाच टॅकर्सचे कंपनी भावाने जे पैसे होतात तेवढ्याचा डिमांड ड्राफ्ट काढायचा व तो डी.डी. कंपनीत जमा करून टॅकर्स घ्यायचे.'

 मुनीमला हे सांगताना नवल वाटलं होतं. एवढा मोठा अधिकारी, त्याला ही साधी प्रोसिजर माहीत नाही?

 ‘सर, हे पाहा या पाच टॅकर्ससाठी डी.डी. काढण्याचं बँकेचं व्हाऊचर बनवलं आहे.'

 चंद्रकांतनं बँकेचं ते लाल रंगाचं व्हाऊचर हाती घेऊन पाहिलं. तिथे ‘फॉर बद्रीप्रसाद अँड कंपनी!' असा रबर स्टॅप मारलेला होता व तिथे मुनीमची झोकदार सही होती. अचानक त्याच्या मनात एक विचार चमकून गेला आणि तो चकित झाला. एकेकाळी बँकेत काम केलं असूनही हे आपल्या लक्षात येऊ नये?

 ‘मुनीमजी, चला, आपण तुमच्या बँकेत जाऊ. माने प्रकरणात पैसे कोणी भरले हे व्हाऊचर्सच्या आधारे तपासून पाहू व खात्री करून घेऊ.'

 चंद्रकांतनं खडा टाकून पाहिला. तो अचूक लागला होता. क्षणार्धात मुनीमजी भीतीनं पांढराफटक पडला.

 ‘स..सर...आपण तर पूर्ण तपास केला आहे... पुन्हा हे काय?'

 ‘मनात शंका आली म्हणून. तिचं निरसन करून घ्यायचं एवढंच!'

 ‘मला दुसरं एक अर्जंट काम आहे. जरा दुकानात जाऊन आलं पाहिजे. तो कसाबसा म्हणाला,

 चंद्रकांतनं मनाशी विचार करून त्याला परवानगी दिली. बरोबर बारा वाजता बँकेत येण्याची सूचना केली. तो अक्षरश: धावतच दालनाबाहेर गेला.

 चंद्रकांतला खात्री होती की, मुनीमजी आता बद्रीप्रसादकडे जातील व बँकेला फोन करून कदाचित डॉक्युमेंट्स दाखवू नयेत, असं कळवतील. बँकही ‘व्यक्तिगत ग्राहकाची गोपनीयता जपण्याच्या नावाखाली नाही म्हणेल...हे सारं घडलं तर नक्कीच माने प्रकरणाचा खरा सूत्रधार बद्रीप्रसाद आहे हे सिद्ध होईल व त्याच्याविरुद्ध पुरावा सापडू शकेल.

 तो कलेक्टरकडे गेला व त्यांना सारं कथन करून म्हणाला,

 ‘सर, आपण बँकेच्या रिजनल मॅनेजरला बोलावून मला ते व्हाऊचर पाहण्याची परवानगी देण्याची सूचना करा. मला खात्री आहे, माझा अंदाज खोटा ठरणार नाही.'

 चंद्रकांत बँकेत पोचला तेव्हा तिथं बद्रीप्रसाद व मुनीमजी हजर होते; पण त्याच्याशी न बोलता तो सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्यांना रिजनल मॅनेजरचा फोन आल्यामुळे त्यांनी व्हाऊचर काढून ठेवले होते. त्यावरून मानेच्या नावाने दोन टँकर्सचे पैसे बद्रीप्रसादच्या मुनिमाने भरले होते व तो डी.डी. घेऊन मूनिमानेच रॉकेल कंपनीच्या कार्यालयात जाऊन रॉकेलचे भरलेले टँकर्स घेतले होते, हे आता कागदोपत्री सिद्ध होत होतं! कारण मानेच्या नावाने डी.डी.साठी व्हाऊचर्स भरताना मुनीमने नेहमीच्या सवयीने ‘बद्रीप्रसाद अँड कंपनी' चा रबर स्टॅप मारून आपली सही केली होती. तिथंच तो फसला होता.

 चंद्रकांतनं रुद्रावतार धारण करताच मुनिमानं कबुली जबाब दिला. चंद्रकांत मग अधिक खोलात गेला व त्यानं एक वर्षाचे सर्व व्हाऊचर्स तपासले. तेव्हा अनेक किरकोळ आणि सब एजंटांच्या नावाने ‘बद्रीप्रसाद अँड कंपनीने पैसे भरण्याचे व ते टँकर्स उचलल्याचे निष्पन्न झाले. एवढा भरभक्कम पुरावा हाती आल्यावर बद्रीप्रसादचा परवाना रद्द करताना काही अडचण आली नाही

 शहराच्या केरोसिन किंगचा रॉकेलचा ठोक व किरकोळ परवाना रद्द होणे ही धक्कादायक बातमी होती. त्याचा परिणाम जसा अपेक्षित होता तसाच दिसून आला. रॉकेल टंचाई संपुष्टात आली व प्रत्येक एजंट व विक्रेत्याकडे  मुबलक रॉकेल मिळू लागले.

 चंद्रकांतवर नागरिकांनी पत्र लिहून वा भेटून अभिनंदनाचा वर्षाव केला.

 चंद्रकांतचं धाड सत्र अधिक वेगानं चालू राहिले. ते अर्थातच राजकारणी व एजंटाच्या अभद्र युतीस पचनी पडणं शक्यच नव्हतं.

 बद्रीप्रसादच्या प्रकरणानंतर तीनच महिन्यांनी चंद्रकांतची तडकाफडकी बदली करण्यात आली आणि काही काळातच 'येरे माझ्या मागल्या' परिस्थिती आली.

 चंद्रकांत बदलीच्या जागी रुजू होण्यासाठी जाताना इनसायडरपुढे आपलं मन मोकळं करताना म्हणाला,

 'मित्रा, बदलीचे काही वाटत नाही; पण अवघ्या पाच महिन्यात बदली व्हावी- तीही कठोरपणे कर्तव्यपालन केलं म्हणून? ही तर चांगलं काम केलं म्हणून पनिशमेंट झाली. मी यातून काय अर्थ काढावा? आजवर बद्रीप्रसादसारख्यांशी समझोता करून सुखेनैव काम करणारे अनेक पुरवठा अधिकारी होऊन गेलेच की! मी हा जो काही अट्टाहास केला तो कशासाठी? ज्या गोरगरिबांची चूल त्याविना पेटत नाही, ते रॉकेल त्यांना योग्य दरात नियमित मिळावे म्हणून ना? मग का नाही माझ्यामागे त्या जनतेचं किंवा माझ्या वरिष्ठाचं बळ उभं राहिलं? अजून माझी जिद्द कायम आहे. मी हिंमत नाही हरलो; पण असेच दोन-चार अनुभव पुढे आले तर कदाचित मीही प्रवाहपतित होण्याचा धोका आहेच ना? ती कोणाची हार असणार आहे? माझी, का प्रशासनाची ?"

 चंद्रकांतला दिलासा देण्यासाठी इनसायडरजवळ शब्द नव्हते; चंद्रकांत म्हणत होता, 'हेचि फल काय मम तपाला?'

 इनसायडरनं या संदर्भात एक पत्र सर्व वृत्तपत्रांना पाठवलं. ते केवळ हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेत्यांनी चालवलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या जिल्हापत्रात तेवढं छापून आलं, त्यात इनसायडरनी या प्रकरणाचा बोध काय हे सांगताना लिहिलं होतं,

 ‘प्रत्येक प्रशासकानं आपणं काम चोख करावं हे अपेक्षित आहे. त्या साठीच त्याला जनतेच्या करातून जमा होणाऱ्या पैशातून पगार व पर्स दिले जातात. चंद्रकांतनं फार कांही जगावेगळं केलं असं मी म्हणणार नाही. त्यानं आपलं कर्तव्य चोख बजावलं. पण तोच त्याचा अपराध ठरावा व त्याची तडकाफडकी बदली व्हावी ही शोकांतिका म्हणायला हवी. पण त्याचे समाजमनाला भान आहे का?'