प्रशासननामा/कहाँ राजा भोज...?

विकिस्रोत कडून



कहाँ राजा भोज...



 कलेक्टर वा जिल्हाधिकारी ही फार महत्त्वाची प्रशासकीय संस्था आहे. ब्रिटिशकालीन पंरपरा आणि दबदब्यामुळे या पदाचा कल्पक समाजोपयोगी वापर करू शकतो. तर आत्मकेंद्री ब्युरोक्रेटिक कलेक्टर चांगल्या कामातही घोळ घालू शकतो. वेळकाढूपणा करीत निर्णय लांबवू शकतो. त्याला अपवाद असलेले दुर्मीळ जातीचे कलेक्टर म्हणून राजे होते.

 राजे वेळेच्या बाबतीत पक्के इंग्रज होते. त्यांनी पहाटे पाचला राऊंड घेण्याची सूचना दिली, म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ठोंबरे त्यांच्या बंगल्यावर बरोबर पावणेपाचला हजर झाले.

 खरं तर, आदल्या दिवशी सकाळीच राज्यस्तरीय महिला क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाले होते! त्या सोहळ्याची आखणी स्वत: राजेंनी केली होती आणि त्याबरहुकूम ठोंबरे यांनी ती राबवली होती. राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून सर्व खेळांसाठी तीन हजार शालेय मुली नांदेडला, तीन दिवसासाठी हजर झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा प्रथमच भरत होती. ठोंबरे जिल्हा क्रीडा अधिकारी होते. जिल्हा बहुविध खेळ समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कलेक्टर स्पर्धेचे यजमान होते. तीन हजार मुलींची निवास-भोजनाची व्यवस्था, खेळाच्या स्पर्धेसाठी नगरपरिषदेचे स्टेडियम व इतर मैदाने तयार करून घेणे आणि उद्घाटन समारंभाची कल्पक आखणी करणे, अशी अनेक कामे होती. कलेक्टर राजे दररोज सायंकाळी पाच नंतरचा वेळ क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी देत होते.

 या नियोजनबद्ध कामाचे फळ म्हणजे भव्य उद्घाटन समारंभ. ठोंबरे भरून पावले होते. सर्वच अधिकारी थक्क झाले होते. त्यासाठी लागणारा खर्च राजे सरांनी स्मरणिकेच्या जाहिरातीतून उभारला होता. मंजूर रकमेच्या चौपट रक्कम गोळा केली होती. साऱ्या महिला खेळाडू, त्यांचे संघ प्रशिक्षक, टीम मॅनेजर व विविध जिल्ह्यांतून आलेले सारे क्रीडा अधिकारी चोख व निर्दोष व्यवस्थेने चंद्रकांत म्हणाला, 'हे रोजचं आहे. आमचे कलेक्टर तर गमतीनं म्हणतात, ज्या दिवशी ऑफिसला येताना उपोषणासारखे प्रकार व तंबू दिसत नाहीत, त्यादिवशी चुकल्यासारखं होतं!'

 ऑफिसला आल्याआल्या चंद्रकांतने गृहशाखा सांभाळणाऱ्या पेशकरांना बोलावून विचारले, 'आज सर्व उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी झालीय ना? काल दोघांचा बी.पी. वाढला होता. ते कसे आहेत? गुड! त्यांना दवाखान्यात भरती केलं ते ठीक झालं. होम डी.वाय.एस.पी.ला सांगून पोलिसांचा बंदोबस्त वाढवा. त्यांना सांगून तंबूत बसवलेली माईक सिस्टिम काढून टाका. उगीच दिवसभर घोषणांच्या मोठ्या आवाजानं ध्वनिप्रदूषण तेवढं वाढत जातं आणि काम डिस्टर्ब होतं.'

 साडे अकराच्या सुमाराला एक स्थानिक नगरसेवक आला. पन्नास बेरोजगार तरुण उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी दखल का घेत नाही, असा जाब निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत याला विचारू लागला. चंद्रकांतच्या उत्तराने तो क्षणभर हतबुद्ध झाला, काय करावे हे त्याला उमगेना!

 स्वर खाली आणून तो म्हणाला, 'साहेब, काहीतरी तडजोड करून उपोषण मिटवलं पाहिजे, नाहीतर नस्ती आफत ओढवेल.'

 'ठीक आहे. तुम्ही त्यांच्या नेत्यांना दालनात घेऊन या. आपण चर्चा करून मार्ग काढू या!'

 नगरसेवकाचा चेहरा उजळला. 'मी त्यांच्याशी बातचीत करून त्यांना राजी करतो व अर्ध्या तासात त्यांना इथे चर्चेला घेऊन येतो.'

 तो बाहेर गेल्यावर चंद्रकांत इनसायडरला म्हणाला, 'तुला कदाचित वाटत असेल, प्रशासन एवढं असं संवेदनाहीन कसं? तीन दिवस झाले उपोषण चालू आहे, तरी आम्ही दखल का घेत नाही? मी राजकी बात सांगतो. कोणतेही उपोषण पहिल्या दिवशी कधीच समाप्त होत नाही. तसं ते झालं तर त्याला पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही. त्याचं महत्त्व राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. आणि सुरवातीला उपोषणकर्ते पण जोशात असतात. त्यामुळे ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. म्हणून त्यावेळी चर्चा करून काही उपयोग नसतो.

 'लोखंडावर ते तापल्यावरच घाव घालायचा असतो, तरच तुकडा पडतो, या न्यायानं थोडी प्रसिद्धी झाल्यावर आणि भुकेचे चटके बसू लागल्यावर सारे हबकतात. कोणीतरी स्वयंभू पुढारी मध्यस्थीसाठी येतो. मग मी उपोषण मिटविण्याचा प्रयत्न सुरू करतो. कारण तीच अनुकूल वेळ असते. अनुभवाने उपोषण मिटवण्याचा हा मंत्र शिकलो आहे.' पुरवायचं मान्य केलं आहे.'

 ‘छान. मुलींना वेळेवर नाष्टा, जेवण मिळायला हवं याची पूर्ण काळजी घ्या. या खेळाडू मुलींचे कोवळं, वाढतं वय आहे. त्यात पुन्हा प्रॅक्टिस सेशन आणि प्रत्यक्ष स्पर्धेचा खेळ यामुळे त्यांना प्रचंड भुका लागत असणार. आपण त्यांच्या भुकेची काळजी घेतली पाहिजे.'

 राजेंची ती 'पर्सनल टच' असलेली प्रशासनशैली पाहून सर्व थक्क झाले.

 राऊंड पूर्ण झाला. ठोंबरेंना वाटलं की आता सर बंगल्यावर जातील. पण त्यांनी तहसीलदारांना सूचना केली, 'चला तुमच्या ऑफिसला. तुमच्या कस्टडीतला तो माणूस मला पहायचा आहे.'

 ठोंबरेंना कसलाच अर्थबोध झाला नाही. त्यांची गोंधळलेली मुद्रा पाहून खुलासा करीत राजे म्हणाले,

 ‘ठोंबरे, काल मध्यरात्री मी, तुम्ही जाऊन आल्यानंतर शाळांचा राऊंड घेतला होता. मुलींसाठी सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी. रात्री अकराच्या सुमारास डावरे हायस्कूलमध्ये एका जिल्ह्याचा संघ प्रशिक्षक जाम प्यालेला दिसून आला. तो एका दारावर थापा मारीत एका मुलीला नशेमध्ये ‘बाहेर ये' म्हणत होता. मी त्याची गचांडी पकडून त्याला पोलीस सबइन्स्पेक्टरच्या गाडीत टाकलं आणि रावसाहेबांच्या मॅजेस्ट्रिअल कस्टडीत रवानगी केली.

 मॅजेस्ट्रिअल कस्टडीतल्या त्या शिक्षकाला पाहताच ठोंबरे म्हणाले, 'सर, याला मी चांगला ओळखतो. कारण त्या जिल्ह्यात मी क्रीडा अधिकारी होतो. पक्का बेवडा आहे. चारित्र्यही संशयास्पद आहे. मी तेव्हाच शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी अहवाल देऊन याला संघाबरोबर कुठे पाठवू नये असे म्हटले होते.

 ‘तुम्ही इथं थांबा आणि काही व्यवस्था करून त्याला परत पाठवून द्या. मी तिथल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी बोललो आहे. हा जेव्हा तिथे पोचेल, तेव्हा निलंबित झालेला असेल.'

 'सर, प्लीज माझ्यावर दया करा. मला निलंबित करू नका. मी पुन्हा अस वर्तन करणार नाही.' कोठडीत रात्रभर राहून नशा पार उतरलेला, संघ प्रशिक्षक म्हणून मुलींच्या टीमसोबत आलेला शिक्षक चक्क राजेंच्या पाया पडला.

 ‘तुम्हाला दया नाही. इथं माझ्या जिल्ह्याच्या इभ्रतीचा आणि त्या कोवळ्या निष्पाप मुलीच्या जीवनाचा प्रश्न होता. मी रात्री राऊंडला आलो नसतो तर...आय जस्ट कान्ट इमॅजिन. तुम्हाला क्षमा नाही...'

 ‘राजे सरांच्या या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर येथे त्यानंतर पाच-सहा वर्षांनी प्रधान नावाचे कलेक्टर असताना झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची हकीकत सांगतो.' ठोंबरे चंद्रकांत व इनसायडरला सांगत होते. ठोंबरे म्हणाले, 'तेव्हा मी पुण्याला हेड ऑफिसला क्रीडा व युवक सेवा संचालनालयात सहायक संचालक होतो. एके दिवशी मला संचालकांनी बोलावून घेतलं.

 'त्यावेळी आमच्या क्रीडा खात्याचे संचालक लाटकरसाहेब होते. तो दिवस मला चांगलाच आठवतो. मी त्यांच्या दालनात गेलो, तेव्हा ते चांगलेच गंभीर दिसत होते. मला म्हणाले, ‘मराठवाड्यातले एक छत्रपती अवॉर्ड विजेते क्रीडा संघटक राज्याचे क्रीडामंत्री झाले म्हणून त्यांच्या ऑनरसाठी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमधील दोन खेळांचे आयोजन या शहरात केले होते. पण कलेक्टर प्रधानांचा मला फोन आला. ते माझ्यावर सख्त नाराज झाले होते. ते धमकीवजा स्वरात म्हणाले,

 'या जिल्ह्याचा मी कलेक्टर. मला न विचारता तुम्ही स्पर्धा माझ्या जिल्ह्यात आयोजित करता? मी पाहातोच त्या कशा नीट पार पडतात ते.'

 ठोंबरे चांगलेच गंभीर झाले होते. कारण या स्पर्धा व्हाव्यात म्हणून तेच आग्रही होते. स्पर्धेसाठी हे शहर उत्तम होते. मोठे सुसज्ज स्टेडियम आणि निवास व्यवस्थेची सोय होती.

 नव्यानं झालेले क्रीडामंत्री हे बऱ्याच वर्षापासून क्रीडा संघटक होते. मंत्री झाले म्हणून त्यांचा गौरव क्रीडा स्पर्धा घेऊन करावा ही कल्पना लाटकर साहेबांना आवडली. त्यांनी कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन खेळांचे यजमानपद महाराष्ट्राच्या वतीने स्वीकारले.

 पण कलेक्टर प्रधानांच्या अनपेक्षित विरोधाच्या पावित्र्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. स्पर्धेचे ठिकाण क्रीडामंत्री व संचालकांनी नांदेडला कलेक्टरांसोबत चर्चा करून जाहीर करावं असं ठोंबरेंनी सुचवलं होतं. पण लाटकरांनी उत्साहाच्या भरात क्रीडामंत्र्यांची संमती असल्यामुळे परस्पर जाहीर केलं. कलेक्टर प्रधानांना ते खटकलं असणार.

 लाटकरांनी ठोंबरेला हे कथन करीत म्हटलं, 'मी प्रधानांना खूप समजावयाचा प्रयत्न केला. पण ते ऐकायच्या मन:स्थितीत नाहीत. आता हा क्रीडा खात्याच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. तुम्ही पूर्वी तिथे काम केले आहे, तेव्हा स्पर्धा होईपर्यंत तिथे जिल्हा क्रीडा अधिकारी व उपसंचालक यांच्यासोबत राहून स्पर्धा पार पाडा. तुम्हाला मी फ्री हँड देतो. कलेक्टरविनाही आपण त्या स्पर्धा यशस्वी करून दाखवू.' ठोंबरे मग त्यांनी कशी स्पर्धा पार पाडली हे चंद्रकांतला सांगू लागले, 'सर, मी त्याच रात्री नांदेडला आलो. मागे राजे सरांनी महिला क्रीडा स्पर्धा घेतल्या होत्या, तशाच नेटकेपणाने स्पर्धा पार पाडल्या. प्रधानांचा जबरदस्त विरोध व कलेक्टर ऑफिसचं असहकार्य असूनही मी सरळ जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सारा प्रकार कथन केला व त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. खऱ्या स्पोर्टस्मनप्रमाणे त्यांनी मदतीचा हात दिला. नगराध्यक्ष लालाणी माझे जुने मित्र, त्यांच्यामुळे नगरपालिकेची यंत्रणा मदतीला मिळाली. स्पर्धा यशस्वी केल्या.

 उद्घाटन सोहळ्याला प्रधानांनाही मानानं बोलावून स्टेजवर बसवले. त्यांच्या मदतीविना झालेला तो नेत्रदीपक सोहळा पाहून कदाचित त्यांनाच मनोमन संकोच वाटला असावा. त्यांनी समारोपाच्या दिवशी सांयकाळी सर्व खेळाडूंना त्यांच्यामार्फत जेवण देण्यात येईल असं जाहीर केलं.

 प्रधानांनी महसूल खात्याच्या परंपरेनुसार तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भोजन समारंभासाठी मुक्रर केलं. दुपारपासून त्यांच्या तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला लागला. भोजनासाठी केटरर नेमला होता. समारंभ सुरू होण्यापूर्वीच कलेक्टर ऑफिसचे व तहसीलचे तमाम कर्मचारी जेवणावर हात मारून गेले. याची मला कल्पना नव्हती. कारण मी समारोप समारंभात गुंतलो होतो.

 समारोपानंतर खेळाडू भोजनासाठी गेले. हजार लोकांचे भोजन झाले आणि सारे अन्न संपून गेले. कारण महसूल कर्मचाऱ्यांनी मारलेला भोजनावरचा ताव.

 अजून पंधराशे खेळाडू जेवायचे होते. जेवण नसल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्याच वेळी फरकॅप चढवून प्रधान आले. त्यांनी हौसेने बोलावलेला स्थानिक वाद्यवृंद योजल्याप्रमाणे धून आळवू लागला. ‘स्वागतम्-शुभ स्वागतम्.'

 खेळाडू संतापले. त्यांना कलेक्टरांच्या स्पर्धेवरील अघोषित बहिष्काराची व असहकाराची कुणकुण लागलेली होतीच आणि मोठ्या ऐटीत जाहीर केलेल्या भोजन समारंभात त्यांना जेवण मिळत नव्हतं आणि वाद्यवृंद खेळाडूऐवजी यजमान कलेक्टरांचं स्वागत करीत होता. एक पंजाबी खेळाडू मला म्हणाला,

 ‘सर, कमाल हो गया. महेमान हम है । स्वागत हमारा होना चाहिए होस्टही खुदको वेलकम करता है और हमे भूखा रखता है?'

 त्यानं साऱ्यांच्या संतापाला जणू वाचाच फोडली होती. पाहता पाहता वातावरण स्फोटक बनलं. प्रधानांना त्याची खबर नव्हती. ते स्टेजवर झोकात बसले होते. पण प्रांत अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिका-यांनी प्रसंगाच गांभीर्य जाणलं होतं. ते माझ्याशी काय करावं याबाबत चर्चा करीत असताना खेळाडूंचा एक जथा स्टेजवर गेला आणि कलेक्टरांना हूट आऊट करू लागला. एकानं माईक हाती घेत भोजनाची व्यवस्था न केल्याबद्दल कलेक्टरांचा जाहीर निषेध नोंदवला.

 मी व प्रांत ताबडतोब स्टेजवर गेलो. आणि कसेबसे खेळाडूंना शांत केलं व माईकवरूनच जाहीर केलं. 'अर्ध्या तासात भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. तोवर शांत राहून वाद्यवृंदाचा आस्वाद घ्यावा.' प्रांताला सांगून कलेक्टरांना तेथून संरक्षणात घरी पाठवलं आणि दोन-तीन हॉटेल्समधून अन्न मागवून कसंबसं साऱ्यांना जेवू घातलं. पण गालबोट लागायचं ते लागून गेलं.

 स्पर्धा उत्तमरीतीनं पार पडल्याच्या समाधानावर यामुळे पाणी पडलं गेलं, याची मला आजही खंत आहे.'

 ठोंबरेंनी आपलं कथन संपवलं, तेव्हा प्रवास संपत आला होता. शहर दृष्टिक्षेपात आलं होतं. दुरून विजेचे लखलखते दिवे दिसू लागले होते. क्षणभर तिघेही मूक होते. मग एक दीर्घ नि:श्वास टाकीत चंद्रकांत आत्मचिंतनाच्या सुरात म्हणाला,

 'व्यक्ती-व्यक्ती मधला हा फरक आहे असं म्हणून या घटनेकडे कानाडोळा करता येणार नाही. किंबहुना येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यावेळी वरच्या पातळीवर प्रशासनाने याची दखल कशी घेतली, का घेतलीच नाही, मला माहीत नाही. बहुतेक घेतली नसणार. कारण कलेक्टर हा डझनवारी शासकीय समित्यांचा अध्यक्ष असतो. जिल्हा बहुविध खेळ समिती त्यापैकी एक. पुन्हा, आपल्या समाजात कला-क्रीडा याकडे प्रशासनानं मन:पूर्वक पहावं असं वातावरण खचितच नाही. त्यामुळे प्रधानांनी फार लक्ष घातलं नसतं, तर नवलाचं नव्हतं, पण मला विचारलं नाही' म्हणून विरोध करणं व अडथळे आणणं ही कोतेपणाची बाब झाली! ती खास परंपरा असणा-या कलेक्टरपदावर बसणाच्या व्यक्तीला शोभणारी नाही आणि प्रशासनाला कमीपणा आणणारी आहे.'

 'लोकशाही प्रणालीत चांगले संकेत व पंरपरा पालनाचं महत्त्व मी तुम्हाला सांगायला नको. जिल्हाधिकारी हे पद जिल्हा पातळीवर राज्य व केंद्र शासनाचं प्रतिनिधित्व करते. म्हणूनच कुठल्याही खात्याचा प्रश्न असो, लोक मोर्चे काढतात ते कलेक्टर कचेरीवर. उपोषणाला बसतात ते त्यांच्या कार्यालयासमोर. सर्व खात्यांचा समन्वयक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जिल्ह्याचे प्रथम व आद्य अधिकारी असतात व लोकंही तसं मानतात. ही परंपरा ब्रिटिश काळापासूनची आहे. त्यात जसे तोटे आहेत, तसेच फायदेही आहेत. सर्वात मोठा तोटा म्हणाल तर 'जॅक ऑफ ऑल ट्रेडस् ॲन्ड मास्टर ऑफ नन्’ याप्रमाणे जिल्हाधिकारी सर्वत्र असतात आणि कुठेच नसतात. सुमार दर्जाचे जिल्हाधिकारी काही न करता, केवळ सत्ता भोगून सुखेनैव आपला कालावधी आरामात पाडू शकतात. कारण ते व्यक्तिश: कोणत्याच बाबीला जबाबदार नसतात. यशाचं, चांगल्या कामाचं श्रेय त्यांना जरूर घेता येतं, मात्र अपयश इतर खातेप्रमुखांवर ढकलून मोकळं होण्याची पळवाटही त्यांना उपलब्ध असते.

 ‘पण सर्व खात्याचे समन्वयक असणं ही कलेक्टरांची फार मोठी ताकदही असते. कल्पक व उत्साही प्रशासक असणारा कलेक्टर त्याचा जिल्ह्याच्या कामासाठी वापर करू शकतो.

 ‘राजे सरांचं तुम्ही उदाहरण दिलंत. मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा ही जिल्ह्याच्या प्रतिष्ठेची बाब समजून त्यांनी सारी शासनयंत्रणा तिच्या आयोजनासाठी राबवली व एक उत्तम स्पर्धा आयोजित केली. असं प्रत्येक क्षेत्रात कलेक्टरांना करता येतं.

 ‘प्रधान हे या दोन पेक्षा भिन्न अशा तिस-या प्रकारच्या प्रशासकाच्या वर्गात मोडतात. ही माणसे आत्मकेंद्रित असतातच, पण प्राप्त अधिकारामुळे इगोइस्टही असतात आणि ‘अहं ब्रह्मास्मि' या अभिमानाने ते स्वत:ला जिल्ह्याचे अनभिषिक्त राजे समजतात आणि केवळ अहंकारापोटी इतरांचं चांगुलपण सहन होत नाही. त्यांना विचारलं नाही म्हणून क्रीडास्पर्धेत अडथळे आणणं ही त्याचीच परिणती होती. दुर्दैवाची बाब एवढीच आहे की, अशा एक्सेंट्रीक व इगोईस्ट कलेक्टरांना, त्यांच्या लहरी वागण्याला आणि 'हम करेसो कायदा' वृत्तीला प्रचलित प्रशासन प्रणालीत वेसण घालता येत नाही, हे दुर्दैव म्हटलं पाहिजे!'