प्रशासननामा/समाजमनाची विकृती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchसमाजमनाची विकृती रोम जळत असताना नीरोनं फिडल वाजवीत बसावं, तसा हा संतापजनक प्रकार आहे. सारा मराठवाडा किल्लारीच्या प्रलंयकारी भूकंपानं व हजारो लोक मृत्युमुखी पडल्यामुळे शोकाकुल असताना आमच्या कलेक्टरांना मात्र साक्षरता अभियानाच्या मीटिंग घेण्याचे सुचत आहे.'

 जिल्ह्यातील एका लोकप्रिय सत्ताधारी नेत्याचे हे उद्गार सर्व वृत्तपत्रात ठळक मथळ्यांसह प्रसिद्ध झाले होते. किल्लारी - उमरग्याच्या भूकंपाचा आज चवथा दिवस होता. अजूनही वृत्तपत्रात पानेच्या पाने भरून त्या भयंकर दुर्घटनेची चित्रे व बातम्या येत होत्या. त्या बातम्यांमध्ये चौकटीतील ही बातमी वाचकांना प्रशासनाबद्दल संतप्त करीत होती.

 चंद्रकांत त्या बातम्या वाचून अस्वस्थ झाला. त्या दिवशी कलेक्टर संतोष सिंग हे एका तालुक्यावरून दौरा आटोपून दुपारी कार्यालयात येणार होते. त्यांचा हा दौराही साक्षरता अभियानाच्या संदर्भात होता.

 हा दिवस साप्ताहिक साक्षरता अभियान बैठकांचा होता. कलेक्टरांनी सर्व जिल्हा प्रमुखांना एक-एक तालुका या कामासाठी वाटून दिला होता. त्या तालुक्यात आजच्या दिवशी सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्याचा व पुढील कार्यक्रम ठरविण्याचा होता. त्यानुसार चंद्रकांतने मुख्यालयात बैठक घेतली होती.

 बैठकीच्या वेळी काही शिक्षकांनी हा प्रश्न उपस्थित करून म्हटले, "सर, जरी आपल्या जिल्ह्यात भूकंपाची तीव्रता नसली व जीवितहानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र, खास करून ग्रामीण भागात लोक भीतीनं घराबाहेर उघड्यावर झोपत आहेत, आणि सारं जनजीवन ठप्प झालं आहे. आपले साक्षरतेचे वर्गही बंद पडले आहेत. अशावेळी हा अट्टाहास का?”

 ‘मला परिस्थितीची कल्पना आहे!'

 चंद्रकांत शांतपणे म्हणाला, म्हणूनच आजच्या बैठकीचे प्रयोजन आहे. काल शहरात एका नामांकित भूकंपशास्त्रज्ञाचे व्याख्यान होते. त्यात त्याने भूकंपाची शास्त्रीय कारणे सांगून आता नजीकच्या भविष्यात पुन्हा भूकंपाचा महाराष्ट्राला धोका नाही असे स्पष्ट केले आहे. ही माहिती आम्ही एका पत्रकात संकलित केली आहे. त्याच्या प्रती तुम्हाला आज मिळतील. त्या आधी आपणापुढे सायन्स कॉलेजचे एक प्राध्यापक विवेचन करतील. ते आपण समजून घेऊ व प्रत्येक गावात साक्षरता केंद्रामध्ये पुढील आठ दिवसात त्याची माहिती देऊन जनतेच्या मनातील भूकंपाची निराधार भीती काढायचा प्रयत्न करू. साक्षरता अभियानानंतर साक्षरोत्तर कार्यक्रम आपणास पुढील वर्षी घ्यायचा आहे. त्यात कार्यात्मक साक्षरता ही कल्पना आहे. लोकांना जीवनोपयोगी व्यावहारिक माहिती व ज्ञान देणे म्हणजेच कार्यात्मक साक्षरता. त्याची आज आपण सुरुवात करणार आहोत असे समजा.'

 चंद्रकांतच्या स्पष्टीकरणानं अनेक शिक्षक स्वयंसेवकाचं समाधान झालेलं दिसले नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, 'हे पहा, एक अरिष्ट होऊन गेले आहे. लातूर, उस्मानाबाद मधील ५०-६० गावांचे भारी नुकसान झाले आहे. पण आपल्या मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात थोडीफार पडझड झाली आहे, एवढचं! त्यामुळे बावरून जाण्याचं कारण नाही. प्रशासनाने जनतेला धीर दिला पाहिजे व जनजीवन सुरळीत केले पाहिजे. त्यासाठी हा खटाटोप आहे. साक्षरता केंद्रात निरक्षर, प्रौढ, स्त्री-पुरुष आहेत. त्यांना भूकंपाबद्दल सत्य माहिती देणे यामुळे सुलभ होईल!'

 त्या नामांकित शास्त्रज्ञाने भूकंपावर रंगीत पारदर्शिकेच्या मदतीने सप्रयोग व्याख्यान दिले होते. ते व्याख्यान ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. चंद्रकांतला अचानक एक कल्पना सुचली! त्याने कलेक्टरांना म्हटले,

 ‘सर, आपल्या जिल्ह्यात जीवितहानी झालेली नाही, पण लोकांच्या मनात भय आहे. पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसतील... त्यांचा हा भ्रम व्याख्यानाने ब-याच अंशी दूर झाला आहे. पण हे सारे मुद्दे गावात पोचवायचे असतील तर उद्याच्या साप्ताहिक तालुका बैठकीत शिक्षकांना या व्याख्यानाच्या आधारे माहिती देऊ. म्हणजे ते साक्षरता केंद्रावर पुढील आठवड्यात जाऊन व्याख्याने देतील. आणि लोकांच्या मनातील भीती दूर करायचा प्रयत्न करतील.'

 ‘गुड! व्हेरी गुड!' कलेक्टर म्हणाले.

 ‘याचा दुसरा फायदा म्हणजे साक्षरता वर्ग बंद पडणार नाहीत.'

 पण यावर लोकप्रतिनिधींची ही विचित्र प्रतिक्रिया आली होती. त्या पुढा-यानं चक्क पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर टीकेची झोड उडवली.  ‘आता मात्र प्रशासनाच्या बेपर्वाईचा कळस झाला आहे. भूकंप पुनर्वसन हा या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि साक्षरता अभियान, राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या धावक पथकांचे स्वागत या सारख्या गोष्टीत कलेक्टर रस घेत आहेत. आणि हे मुद्दाम, माझ्या पहिल्या प्रतिक्रियेमुळे चिडून जाऊन होत आहे. असा माझा आरोप आहे.'

 अर्थात हे खरं नव्हतं. थोड्याशा ख-याला मीठमसाला लावून या नेत्याने टीका केली होती.

 भूकंप झाला त्यादिवशी सायंकाळी पाच वाजता शहरात १५ जिल्हे व हजार किलोमीटर दौड करून खेळाडूंचे पथक आले होते. त्याचे कलेक्टर, पोलीस अधीक्षक इत्यादींनी स्वागत केले होते, यावेळी चंद्रकांतही उपस्थित होता.

 १९९४ साली महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. त्या निमित्ताने पुण्यात बालेवाडी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. बांधकामही पूर्ण होत आले होते. त्यासाठी वातावरणनिर्मिती व्हावी म्हणून सप्टेंबर-ऑक्टोबर ९३ मध्ये काही खेळाडूचे एक पथक महाराष्ट्रभर दौड करीत होते. ते नेमके भूकंपाच्या दिवशी आले.

 जिल्ह्यात रात्री मुक्काम करून सकाळी औरंगाबादकडे रवाना होणार होते. त्यासाठी पंधरा दिवसांपूर्वी बैठक झाली होती. कलेक्टर हे क्रीडाप्रेमी व स्वत: खेळाडू असल्यामुळे त्यांनी खेळाडूंच्या पथकाचे शहराच्या सीमेवर स्वागत करावं व शहरातील क्रीडाप्रेमी नागरिकांनी त्यांच्यासोबत दौड करून, वाजतगाजत स्टेड्यिमला क्रीडा ज्योत आणावी व रात्री नगरपालिकेने भोजन द्यावे असं कार्यक्रम ठरविला होता.

 बैठकीत ठरल्याप्रमाणे खेळाडूंच्या स्वागतासाठी शहराच्या सीमेवर एक कमान व ठिकठिकाणी पोस्टर्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली होती.

 पण पहाटेच भूकंपाची दुर्घटना झाली होती. त्याची भीषणता लक्षात घेऊन, बाकी सर्व सोहळा रद्द करून, केवळ खेळाडूचे साधे स्वागत करावे व त्यांना निरोप द्यावा असे कलेक्टरांनी ठरविले. कमानी आधीच उभारल्या होत्या व पोस्टर्सही लावण्यात आली होती. त्याला उद्देशून त्या नेत्याने असत्याच्या वेष्टणात लपेटून जनतेपुढे पेश केलं होतं. त्यांच्या परमिट रूमला ती शाळेच्या जवळ असल्यामुळे कलेक्टरांनी परवानगी नाकारली होती, त्याबद्दलचा राग होता. यावेळी मोठ्या चतुराईने त्यांनी जनतेच्या भावनेला हात घालणारा मुद्दा मिळताच त्याचे भांडवल करून, कलेक्टर हे असंवेदनाक्षम आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.  चार वाजता चंद्रकांतची कलेक्टरांशी भेट झाली, तेव्हा चंद्रकांतने हा विषय काढला.

 ‘तद्दन मूर्ख व खोट्या विपर्यस्त टीकेला उत्तर देण्यापेक्षा अनुल्लेखाने मारलेले व दुर्लक्ष केलेले बरे!' कलेक्टर म्हणाले.

 ‘त्याचा तुमच्या प्रतिमेवर अकारण विपरीत परिणाम होण्याची भीती वाटते. चंद्रकांत म्हणाला.

 ‘नेत्यांनी दुस-यांदा सरळ प्रेस कॉन्फरन्स घेऊन टीका केली आहे; त्यामुळे मला वाटतं...'

 'ठीक आहे. लेट मी थिंक.' कलेक्टरांनी म्हटलं.

 तेव्हा चंद्रकांतने ओळखलं की त्यांना हा विचार पसंत पडलेला नाही.

 संतोष सिंगच्या या कृती व वृत्तीमागे एक विचार होता. 'ब्युरोक्रसी शुड बी फेसलेस! आपण शासनाचे पेड़ सर्व्हन्टस् आहोत. शासनाने आखलेल्या धोरणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणं आपलं काम आहे... त्यासाठी प्रसिद्धी नको.'

 कलेक्टर चंद्रकांतशी मैत्रीच्या नात्याने वागत असत, त्यामुळे चंद्रकांत अनेकदा चर्चेत असहमती दर्शवीत आपली मते मांडायचा. त्याला संतोष सिंगनी कधी हरकत घेतली नव्हती. त्यामुळे या संदर्भातही चंद्रकांतने आपले मत त्यांच्या नाराजीची पर्वा न करता नोंदवत म्हटले, 'ब्रिटिश काळात हे धोरण कदाचित योग्य असेल, पण आजचा जमाना हा विकास प्रशासनाचा आहे सर. लोकप्रतिनिधी जरी धोरण आखत असले तरी त्यात वरिष्ठ सचिवस्तरीय अधिका-यांचा सहभाग असतो. नियम-कायदे-योजना करण्यात त्यांची मदत होत असते. मुख्य म्हणजे, अंमलबजावणीची पूर्ण जबाबदारी अधिका-यावर असते; त्यामुळे त्यांना पूर्णतः फेसलेस राहून चालत नाही. नाहीतर नागरिकाचे गैरसमज वाढीस लागतात. अधिका-यांनी प्रसिद्धीच्या मागे लागू नये, हे ठीक. तरी चांगली व कठोर जनहिताची कामे करायची असतील तर अधिकाऱ्यामागं जनमताचं पाठबळ आवश्यक ठरतं. त्यासाठी त्याची तशी इमेज असायला हवी. ती निर्माण होते प्रसिद्धी माध्यमामुळे! आपण 'पब्लिसिटी हंग्री' राहू नये, तसंच ‘पब्लिसिटी शाय' पण राहू नये. योग्य कामाची योग्य प्रसिद्धी हवीच. तर अधिका-यांना काम करायला सुलभ जातं.'

 'तू म्हणतोस ते मला नवं नाही. किंबहुना ते खरं आहे. संतोष सिंग म्हणाले, पण माझा स्वभाव वेगळा आहे. मला आपणहून टिमकी वाजवता येत नाही आणि मीडिया नेहमी सेन्सेशनल बातमीत रस घेतो, याची मला राग येतो. म्हणून मी स्वत:हून पत्रकारांशी बोलत नाही.'

 त्यामुळे चंद्रकांतचा निरुपाय झाला. तरीही नेत्यांच्या आक्षेपांचे खंडन व्हावे अशा त-हेने बातम्या येतील याची व्यवस्था त्याने केली. क्रीडापटूच्या पथकप्रमुखानं औरंगाबादहून दिलेली प्रतिक्रिया दोन दिवसांनी वृत्तपत्रात आली.

 “भूकंपामुळे वातावरण सुन्न असताना कर्तव्यबुद्धीनं आमचं साधं पण गंभीर स्वागत कलेक्टरांनी करून आमच्या मार्गात ठिकठिकाणी जनतेला भूकंपनिधीस सढळ हातानं साहाय्य करावं हा संदेश देण्याची सूचना केली. त्यामुळे आम्हाला अंशमात्रानं का होईना सामाजिक जबाबदारी निभावता आली."

 ही प्रतिक्रिया मुद्दामून छापवून आणली होती, तरी ती खरी होती. संतोष सिंगांनी खरोखरच क्रीडापटूना तशी सूचना केली होती. त्या प्रतिक्रियेनं नेत्यांच्या त्या विधानाला परस्पर चांगल्यापैकी काटशह दिला गेला होता.

 भूकंप झाल्यावर सकाळी चंद्रकांतनं कलेक्टरांच्या सल्ल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांमार्फत पाच ट्रक धान्य, कपडे व बिस्कीट, ब्रेड, केळी इ. साहित्य मदतरूपाने जमा करून तातडीने किल्लारीला पाठवले होते. आज जिल्हा पुरवठा अधिकारी परत आले होते. त्यांना गाठून पत्रकारांनी किल्लारीची अद्ययावत बातमी घ्यावी असं चंद्रकांतनं सुचवून, अनौपचारिक वार्ता परिषद घडवून आणली. तेव्हा जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणाले,

 ‘किल्लारीला सर्वप्रथम धान्य व वस्तू घेऊन मीच पोचलो होतो. आमच्या जिल्ह्याच्या मदतीमुळे दोन दिवस सुमारे आठ गावांना धान्य पुरवता आलं व गरम कपड्यांनीही त्यांच्या थंडीची सोय झाली. बाकी मदतीचा ओघ दोन-तीन दिवसांनी सुरू झाला. पण सर्वात प्रथम आपण मदत पोचवू शकलो याचं समाधान वाटतं.'

 चंद्रकांतनं पुढे म्हटलं, आणि ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर या दोन दिवसात व्यापारी व जनतेच्या मदतीने एक लाख रुपये मदतीप्रीत्यर्थ शहरातून जमा केले व मुख्यमंत्री निधीला आपण दिले. प्रत्येक तालुक्यातून अशा त-हेने रोख मदत जमा करण्याचे काम सुरू झालं आहे. विभागीय आयुक्तांनी इतर सर्व जिल्ह्यांना आमच्याप्रमाणे काम करावं असं सूचित केलं आहे.

 दुस-या दिवशी सर्व वृत्तपत्रात या बातम्यांना व्यापक प्रसिद्धी मिळाली. संतोष सिंग चंद्रकांतला म्हणाले, 'हे तुझंच काम असणार. पण, त्यामुळे त्या नेत्यांचे आरोप किती खोटे होते हे वाचकांना कळून आलं असेल.'

 'थँक यू, सर!'

 ‘पण चंद्रकांत, या प्रकरणाचा मी बराच विचार केला आहे. भारतीयांत वर्क कल्चर फार कमी आहे आणि भावनांचे प्रकटीकरण करायचे असेल तर काम बंद केलं पाहिजे ही भ्रामक कल्पना रुजली आहे. मोठा नेता मरण पावला तर दोनतीन दिवस काम ठप्प होतात, त्यामुळे किती नुकसान होत समाजाचं, उत्पादकांचं, हे कुणी पाहत नाही. किती दिवस जनजीवन ठप्प होतं, यावर त्या मेलेल्या नेत्याचं मोठेपण मोजलं जातं, ही माझ्या मते सामाजिक विकृती आहे.

 कलेक्टर चाकोरीबाह्य विचार करणा-या पंथामधले होते. त्यामुळे त्यांचं मत त्याला साजेसं होतं. ते चंद्रकांतला अंतर्मुख करायला प्रवृत्त करीत होते.

 ‘त्या नेत्याचे काय वैयक्तिक हिशोब असतील याची मला माहिती नाही. पण त्याच्या टीकेतून हीच विकृत सामाजिक जाणीव व्यक्त होते. किल्लारीउमरग्याला भूकंप झाला म्हणून पूर्ण राज्यात इतर सर्वच्या सर्व काम ठप्प करायची? त्यामुळेच का त्यांच्याबद्दलची सहवेदना प्रकट होते ? त्यांना आपण तातडीने मदत पाठवली, रोख निधी जमा केला व आपल्या जिल्ह्यातील जनतेच्या मनातलं भूकंपाचं भय निघून जावं म्हणून साक्षरता अभियानाचा उपयोग करून घेतला आणि भूकंप मदतीबरोबर जिल्ह्यातील दैनंदिन कामकाजही सुरळीत ठेवलं. ऐन भरात आलेल्या साक्षरता अभियानाची गती आपण मंदावू दिली नाही. नाहीतर ती पुन्हा गतिमान करायला बराच वेळ लागला असता. संकट व आपत्तीच्या प्रसंगाला पुरेशा गांभीर्याने, भावनेचं प्रदर्शन न करता सामोरे जाण आणि आपलं काम धैर्यानं करणं हे समाजाच्या मोठेपणाचं लक्षण असतं! या प्रसंगानं आपण भारतीय माणसे किती छोटी आहोत हे दिसून आलं आहे. चंद्रकांत, अॅन्ड आय अॅम अशेम्ड फॉर द फॅक्ट देंट आय बिलाँग टु इट!'