प्रशासननामा/वक्त करता जो वफाँ

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchवक्त करता जो वफाँ चंद्रकांतला तो फोन घ्यायचा नव्हता, पण घेणे व बोलणे भाग होते. कारण त्या वजनदार नेत्याला टाळणे शक्य नव्हते. पुन्हा सकाळपासून दोनवेळेस ‘साहेब फिरायला गेले आहेत' व 'बाथरूममध्ये आहेत' अशी दोन पटणारी कारणे सांगून संपली होती. ते नेते धूर्त व मुरब्बी असल्यामुळे त्यांना चंद्रकांत टाळत आहे असे वाटू देणे योग्य नव्हते. त्यांची नाराजी त्याला महागडी पडू शकली असती.

 “सॉरी सर, आपला दोनदा फोन येऊन गेला पण", चंद्रकांतनं वाक्य अर्धवट तोडलं होतं. दिलगिरी तर व्यक्त करायची पण माघार घेतल्याचे दाखवायचं नाही, हा हेतू त्यामागे होता.

 “ठीक आहे," त्यांनी त्यात वेळ न घालवता सरळ सूचनावजा आज्ञाच केली, "त्या भाऊच्या प्रकरणात चौकशी अहवाल देताना नीट विचार करा, तो काही ओ.बी.सी. नाहीय. मी खात्री करून घेतली आहे आणि मला तो प्रेसिडेंट म्हणून नको आहे."

 “आज दोन्ही पक्षाचा अंतिम युक्तिवाद त्यांचे वकील पेश करणार आहेत. तेव्हा ते काय पुरावा देतात हे पाहून मग निर्णय घ्यावा लागेल सर." चंद्रकांतने त्यांच्या सूचनेला वाट लावत केवळ वस्तुस्थिती निर्देशक कथन केलं.

 “पण तुम्ही मारे लायब्ररीत जाऊन विश्वकोश-ज्ञानकोश, वैश्य समाजाच्या इतिहसासाची पुस्तकं पाहात होता असं मला समजलं."

 त्या नेत्यांचा जिल्ह्यातील दांडगा संपर्क चंद्रकांतला माहीत होताच. पण त्याचं हेरखातं एवढं जबरदस्त असेल असं वाटलं नव्हंत. नक्कीच काल आपण लायब्ररीत गेलो असताना भेटलेल्या नगरसेवकांचा चोंबडेपणा असणार, तो नक्कीच भाऊच्या विरोधी कॅपमध्ये सामील झाला असणार.

 “पुन्हा सांगतो, भाऊ काही वाणी जंगममधील बेडा उपजातीचा नाही. आणि तो मला पसंत नाही."  “सर, मी योग्य तोच निर्णय देईन याची खात्री बाळगा." आणि चंद्रकांतनं आपणहून फोन ठेवून दिला. त्याला आता त्या नेत्याचा राग आला होता आणि आपण या पद्धतीनं तो व्यक्त करण्याखेरीज काय करू शकतो या क्षणी? पण त्याच्या मनाला एक पीळ बसला गेला होता. आपला ज्ञानकोश व विश्वकोश अभ्यासात भाऊ हा त्या विशिष्ट जातीचा असणार, या पक्कं होत असलेल्या मताला अनपेक्षितपणे त्या वजनदार नेत्यानं भाऊ विरोधात मत व्यक्त केल्यामुळे दुजोरा मिळाला होता.

 गेली तीन वर्षे या जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी असल्यामुळे चंद्रकांतचा भाऊशी चांगलाच संपर्क आला होता, त्याची नगरपालिकेतली नगरसेवक पदाची ही तिसरी टर्म होती व तो नुकताच नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आला होता. कारण यंदाच्या वर्षी शहराचे नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होतं आणि भाऊनं तहसीलदाराकडून मिळालेलं जातीचे प्रमाणपत्र जोडून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला होता. विरोधीगटात कुणीही इतर मागासवर्गीय नगरसेवक नसल्यामुळे भाऊ बिनविरोध निवडून आला होता. आणि शहराचा प्रथम नागरिक बनला होता.

 चंद्रकांतनंही त्याचं अभिनंदन करताना म्हटलं होतं, “योग्य पदी सुयोग्य माणूस असणं हे तसं दुर्मीळ असतं. तुम्ही नगराध्यक्ष होणं हा असाच दुर्मीळ योग आहे, त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन!"

 भाऊ हा अजातशत्रू वर्गातला लोकप्रतिनिधी होता. पु.लं.चा दुसरा नारायण होता. इतरांच्या सदैव उपयोगी पडणं हा त्याचा स्वभावधर्म होता. घरचा खाऊनपिऊन सुखी असलेल्या भाऊवर पंधरा वर्षात कधीही भ्रष्टाचार वा वाईट वागणुकीचे आरोप झाले नव्हते. त्याची एक वर्षाची कारकिर्द शहरासाठी लाभदायी ठरणार अशी चिन्हे दिसत होती. भाऊनं एकामागून एक लोकोपयोगी कामांचा धडाका लावला होता. सर्व अधिका-यांशी नम्रतेने वागत असल्यामुळे त्याच्या कित्येक योजनांना त्यांचं पूर्ण सहकार्य मिळत होतं.

 तो लोकप्रिय होणं म्हणजे पक्षातलं त्याचं स्थान अधिक मजबूत होणं, असा अर्थ काढून पुढील सार्वत्रिक निवडणुकीत त्याचाही आमदारकीसाठी विचार होऊ शकतो, या विचारानं अस्वस्थ झालेली काही स्वपक्षीय त्याच्याविरुद्ध गेली आणि त्यांना त्या वजनदार नेत्याचा आशीर्वाद व सक्रीय प्रोत्साहन मिळालं आणि भाऊनं दाखल केलेलं इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र हे बोगस व खोटं आहे; त्यानं तहसीलदाराला हाताशी धरून ते मिळवलं आहे, अशी कारणं देत विरोधी गटाच्या नगरसेवक प्रतापने जिल्हाधिका-यांकडे अर्ज केला आणि भाऊचं जातीचे प्रमाणपत्र रद्द करावं अशी विनंती केली. त्याबाबत सविस्तर चौकशी करून निकाल द्यावा असं त्यांनी चंद्रकांतला आदेशित केले आणि चौकशी अंतिम टप्प्यात असताना आज त्या वजनदार नेत्याचा सकाळीच फोन आला होता.

 चंद्रकांतनं चौकशी सुरू केली, तसं प्रताप व भाऊने शहरातले नामांकित वकील त्यांच्या बाजू मांडण्यासाठी नियुक्त केले. त्यामुळे शहरात व जिल्ह्यात हे प्रकरण गाजू लागलं होतं. कारण भाऊचं इतर मागासवर्गीय जातीचे तहसीलदारानं दिलेलं प्रमाणपत्र रद्द होणं म्हणजे त्याचे नगराध्यक्षपद संपुष्टात येण्यासारखं होतं. भाऊला नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा होता. तसं प्रतापनं भाऊविरोधात वृत्तपत्राच्या माध्यमातून त्याच्या चारित्र्यहननाची मोहीमच उघडली होती. या गदारोळामुळे चंद्रकांतपुढे चौकशीच्या वेळी कितीही नाही म्हटलं तरी गर्दी व्हायची आणि त्याच्या दालनाबाहेरही कितीतरी अधिक लोक जमा व्हायचे. दुस-या दिवशी वर्तमानपत्रात दोन्ही वकिलांनी काय पुरावे दिले आणि ते काय काय बोलले याची माहीती यायची. सा-यांच्या नजरा चंद्रकांत काय निर्णय घेतो याकडे होत्या.

 प्रतापच्या वकिलांनी भाऊनं शाळा-कॉलेजमध्ये कधीही जंगम बेडा असा आपल्या नावापुढे जातीचा उल्लेख केला नव्हता, याकडे लक्ष वेधीत म्हटलं, “आता केवळ जंगममधील बेडा ही उपजात इतर मागासवर्गात येते, या नव्या शासन निर्णयाचा राजकीय फायदा घेण्यासाठी भाऊनं तहसीलदारांच्या मदतीने खोटे प्रमाणपत्र मिळवलं हेच यामुळे सिद्ध होतं, भाऊ खरंच बेडा जंगम असेल तर शाळा-कॉलेजमधील नोंदीत तसा उल्लेख जरूर आला असता."

 भाऊचे वकील अत्यंत निष्णात होते. त्यांनी हाच मुद्दा धरून असा युक्तिवाद केला की ज्यावेळी भाऊ शाळाकॉलेजमध्ये होता तेव्हा इतर मागासवर्गात जंगम बेडा जात नव्हती. त्यामुळे त्यांनी केवळ वाणी हीच मुख्य जात लिहिली. पुन्हा आपण उच्च जातीचे आहोत हे दाखविण्याची यामागे प्रबळ पण मूलभूत भावना असणार. जेव्हा जंगम बेडा जातीबाबात शासन निर्णयाला व नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण आले, तेव्हा नगरसेवक असलेल्या भाऊने जातीचे प्रमाणपत्र मिळवले यात काय चूक आहे? वकिलांनी पुढे असेही दाखवून दिले, की ज्याकाळी जंगमबेडा ही इतर मागास जात नव्हती तेव्हाही त्याच्या काही नातेवाईकांनी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी या जातीचे प्रमाणपत्र काढलं होतं. पुन्हा बेडा जंगम जातीचा इतिहास, धर्म, देव व परंपरेबाबत ज्ञानकोशाचा हवाला देत आणि त्यांच्या पुजा-यांचे शपथपत्र दाखल करीत भाऊची जात जंगम बेडाच आहे, असं ठासून सांगितलं.  त्या रात्री चंद्रकांतनं घरी रात्र जागवत, पूर्ण अभ्यास करीत स्वत:च्या हातानं निकाल लिहून काढला. अंतिम आदेश जारी करण्यापूर्वी बातमी लीक होऊ नये म्हणून त्याने स्टेनोला बोलावून डिक्टेशन देण्याचं टाळलं होतं.

 दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला कलेक्टरांचा फोन आला होता. “चंद्रकांत, मी तुला ‘अॅडिशनल डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट' म्हणून या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी आदेश दिला होता. तो मी रद्द करत आहे. उगीच कायदेशीर गुंतागुंत नको म्हणून. मी स्वत:च डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून निर्णय द्यायचे ठरवले आहे. तरी तू आदेश देऊ नकोस. तर तुझा चौकशी अहवाल माझ्याकडे सादर कर. मी त्या आधारे पुन्हा एकवार दोन्ही बाजू ऐकून निर्णय देईन."

 चंद्रकांतला क्षणभर अर्थबोध झाला नाही. तर मग त्याच्या लक्षात आलं की कलेक्टरांनी तो निर्णय दबावाला बळी पडून घेतला असणार; कारण त्या वजनदार नेत्यांनीच तर त्यांना इथं कलेक्टर म्हणून प्रयत्न करून आणलं होतं. आणि त्याच्या मर्जीविना ते इथं फार काळ राहू शकले नसते. काल बराच वेळ ते नेते व प्रताप त्यांच्या चेंबरमध्ये होते. चंद्रकांतला कलेक्टरांच्या निर्णयामागची भूमिका स्पष्टपणे समजून आली होती. पण त्याचा नाईलाज होता.

 भाऊ व त्याच्या वकिलांनी चंद्रकांतची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली; तेव्हा न राहवून चंद्रकांत म्हणाला, “आय अॅम सॉरी! मी तुम्हाला न्याय देऊ शकलो असतो, पण-,"

 कलेक्टरांनी आठच दिवसात निकाल दिला व भाऊचे प्रमाणपत्र अवैध ठरवून ते रद्द केलं आणि त्याचे नगराध्यक्षपद काढून घेतलं. पुढील अध्यक्षांची निवड होईपर्यंत चंद्रकांतलाच त्यांनी प्रभारी नगराध्यक्ष केलं.

 चंद्रकांतनं कलेक्टरांचा आदेश वाचला आणि तो चकित झाला. त्यांनी चंद्रकांतचा अहवाल जसाच्या तसा उधृत केला होता, पण अंतिम निष्कर्ष पूर्णत: भिन्न म्हणजे विरुद्ध काढला होता. मात्र त्यापूर्वी चंद्रकांतच्या अहवालाशी आपण का सहमत नाही किंवा चंद्रकांतचे निष्कर्ष कसे बरोबर नाहीत याची त्यांनी कारणमीमांसा निकालपत्रात देणे जरूरीचे होते. अन्यथा त्यांचा निकाल कायद्यापुढे टिकू शकला नसता.

 भाऊंच्या निष्णात वकिलांना आदेशातील ही विसंगती लक्षात आली नसती तरच नवल म्हणावं लागलं असतं! त्यांनी जराही वेळ न घालवता उच्च न्यायालयात अपील केलं व कलेक्टरांच्या आदेशाला आव्हान दिलं.

 उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करून घेतलं जाणं व सुनावणीसाठी प्रकारण तारखेवर येणं यात जवळपास दोन महिने गेले. पुन्हा त्यात सुनावणीच्या तीन तारखा झाल्या. त्यांचा निकालही अनपेक्षित आला. उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मधल्या काळात शासनाने स्थापन केली असल्यामुळे व त्यावर जातीचा अभ्यास असणारे तज्ज्ञ असल्यामुळे त्याकडे प्रथम दाद मागावी व त्यानंतर हवे असेल तर उच्च न्यायालयात दाद मागावी, असा निकाल दिला. येथे निकाल भाऊच्या बाजूने निर्णायक लागला असता तर कदाचित त्याला वर्षभराच्या कालावधीत शिल्लक असलेल्या तीन महिने दही दिवसांसाठी नगराध्यक्षपद मिळू शकले असते.

 भाऊने उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अपील केलं, पण त्याचवेळी तो चंद्रकांतला म्हणालाही होता, “सर, मी खरंच बेडा जंगम जातीचा आहे व मी केवळ पद मिळविण्यासाठी खोटं प्रमाणपत्र मिळवलं नाही, हे सिद्ध व्हावे म्हणून अपील केलंय. पण त्याचा निकाल केव्हा येईल देव जाणे; तोवर माझं व्हायचं ते नुकसान झालंच ना आधीच नव्या कायद्याप्रमाणे नगराध्यक्षाचा कालावधी अवघा एक वर्षाचा. मला जेमतेम तीन महिनेही ते मिळाले नाहीत."

 "आय अॅम रिअली सॉरी भाऊ! जर कलेक्टरसाहेबांनी प्रकारण काढून घेतलं नसतं तर..."

 “नो. मी तुम्हाला दोष देत नाही!" भाऊ विमनस्क हसत म्हणाला,

 माझं नशीबचं फुटकं, त्याला कोण काय करणार? ही घटनेची ७३ व ७४ वी दुरुस्ती येईपर्यंत मी कधी नगराध्यक्षपदाची स्वप्नंही पाहू शकलो नव्हतो, कारण मी सत्ताधारी जातीत जन्मला आलो नाही ना! तीन टाईम निवडून आलेल्या टीममध्ये अध्यक्षपदांपासून वंचित असलेला मी एकटाच नगरसेवक आहे. दुस-या दोघांनी सलग पाच वर्षे ते पद भूषविले. आता नव्या कायद्याने मला तो प्राप्त झाला आणि फक्त एका वर्षासाठीच. तर माझ्याच पक्षातील काही जणांनी घात केला. मी आमदारकीला लायक झालो असलो तरी कधी त्याची स्वप्नंही पाहिली नव्हती. तरीही माझ्यावर ही वेळ यावी, याचा मला खेद वाटतो."

 आणि चंद्रकातच्या मनातली ही खदखद त्याच्या नकळत ओठावर आली.

 "मला खरंच आमच्या कलेक्टर साहेबांचं कळत नाही. त्यांनी किती चुकीचं आणि बोलू नये असं, पण माईंड अप्लाय न करता जजमेंट दिलं."

 “हा तुमचा निरागस, भाबडा समज आहे सर!" भाऊचे वकील किंचित हसून म्हणाले, “तुम्हारा कलेक्टर बहोत पहुँची हुई चीज है। वो तो नगरनारायणका भगत है।”  चंद्रकांत चूप होता. त्याच्या कानावर कलेक्टरांबाबत बरेच काही विविध माध्यमातून यायचे, आज त्याचा रोकडा पुरावा मिळाला होता. अन्यथा एवढा विचित्र निकाल आय.ए.एस.श्रेणीतील अधिका-यानं दिलाच नसता.

 सुमारे दीड वर्षांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं कलेक्टरांचा निकाल रद्द करून, भाऊचं बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र वैध ठरवलं होतं. आणि त्यांनी निकालपत्रात चंद्रकांतच्या चौकशी अहवालाचा आधार घेतला होता व त्यानं त्यात दिलेले ज्ञानकोशाचे संदर्भ व बेडाजंगम जातीचे देव, देवस्की व परंपरेचे दाखले ग्राह्य मानले होते. तेव्हा कलेक्टरही बदलून गेले होते व चंद्रकांतही. तरी भाऊ त्याला भेटायला आला होता. तेव्हा तो बोलला, ते त्याला सुन्न करून गेलं होतं.

 “सर, न्यायशास्त्रात एक म्हण आहे, जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनाईड. मी त्याचा या प्रकरणात पुरता अनुभव घेतला आहे. आता पुन्हा इतर मागासवर्ग जातीला रोटेशननं नगराध्यक्षपद येईल, ते ८-१० वर्षांनी. मी तेव्हा राजकारणात असेन याचा काय भरवसा ? आजची संधी गेली याची खंत आहे, पदासाठी असे नाही पण शहरासाठी फारसं काही क्षमता असूनही करता आलं नाही याची! पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून नागरी समस्येचा अभ्यास केला, पण तो नगराध्यक्षपदाच्या रूपाने, सोडवायचा अधिकार जेव्हा प्राप्त झाला तो मला पुरेसा लाभलाच नाही, ही माझी दुहेरी खंत आहे."

 नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. त्यावेळी भाऊनं आपण या निवडणुकीत उभं राहणार नाही असे जाहीर करून राजकीय जीवनातून निवृत्त होण्याचे जाहीर केलं.

 दुसऱ्या जिल्ह्यात बदलून गेलेल्या चंद्रकांच्या वाचनात ही बातमी आली आणि त्याला उदासीनतेमुळे भरून आलं. त्यातून बाहेर येण्याचा एक हुकमी मार्ग होता इनसायडरशी बातचीत.

 “मित्रा, भाऊ प्रकरणातून दोन-तीन बाबी प्रकर्षाने जाणवतात, त्या खचितच निरोगी राजकारण व आदर्श प्रशासनासाठी योग्य नाहीत. भाऊंच्या पक्षांतर्गत काही नगरसेवकांनी व त्या बड्या वजनदार नेत्यांनी त्यांची राजकीय कारकिर्द अतिशय घाणेरडे राजकारण खेळून संपविली. तुलनेने इतरांपेक्षा चांगला असणारा माणूस या शहराला नगराध्यक्ष म्हणून आणखी काही काळ लाभला असता तर काही विकासाची कामे निश्चितच मार्गी लागली असती. पण 'कु-हाडीचा दांडा गोताळ काळ' प्रमाणे त्याचीच माणसे त्याच्या आड आली.

 तरीही त्यांचा डाव सफल झाला नसता, जर मी निकाल दिला असता तर! आणि माझा चौकशी अहवाल व दिलेले संदर्भाच्या आधारे भाऊचं बेडा जंगम जातीचे प्रमाणपत्र नंतर जात प्रमाणपत्र पडताळणी पथकानं योग्य ठरवलं तेव्हा मला आनंद जरूर झाला. माझ्या नीरक्षीरविवेकी, निर्णय शक्तीवर शिक्कामोर्तब झालं! पण त्यावेळी कलेक्टरांनी माझ्याकडून केस काढून गेतली व उलटा निकाल अयोग्य हेतूने दिला. पुढे तो कायद्याच्या कसोटीला टिकला नाही, पण तोवर वेळ निघून गेली होती. भाऊचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं होतं."

 "त्याहीपेक्षा चंद्रकांत, शहराचं जादा झालं. कारण शहरवासीयांना पुन्हा तेवढा चांगला नगराध्यक्ष मिळणं दुर्मीळच होतं! कलेक्टरांचं हे वर्तन हा प्रशासनावरील कलंक आहे. तहसीलदारसारख्या छोट्या अधिका-यानं योग्यरीतीने जातीचे प्रमाणपत्र द्यावं, पण कलेक्टरांसारख्या वरिष्ठानं अयोग्य हेतूने ते रद्द करावं ही प्रशासनाची दारुण म्हणावी अशी शोकांतिका आहे" इनसायडर म्हणाला.

 “या प्रकरणात माझं चांगलं सँडविच झालं होतं. एका बाजूला तो वजनदार नेता, जो मला अनेक बाबतीत सहकार्य करायचा, तो नाराज झाला व माझ्या नव्या कल्पना साकार करण्यासाठी मिळणारं राजकीय बळ संपलं. दुस-या बाजूला मी कलेक्टरांच्या रोषाला पात्र झालो. कारण त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड वृत्तपत्रातून आली होती. त्यामागे मी असावा, असा त्यांचा अकारण ग्रह झाला होता. त्यामुळे मला त्यांच्याकडून अत्युत्कृष्ट सी.आर.(गोपनीय अहवाल शेरे) काही मिळाले नाहीत. त्यामुळे माझं आय.ए.एस. चे प्रमोशन वर्षभरानं लांबलं गेलं आणि नको तेवढा सेन्सेटिव्ह असल्यामुळे भाऊची आठवण आली, की प्रत्येकवेळी एक दारुण निराशा व पराकोटीची हतबलता जाणवते. आय गेट फ्रस्टेटेड टेंपरिली!” चंद्रकांत.

 “हो मित्रा! भाऊ आणि त्या प्रसंगामुळे तुझ्या नशिबात हे असं यायला नको होतं." इनसायडर म्हणाला, “मला मुकेशचं एक गीत आठवतं, वक्त करता जो वफाँ, आप हमारे होते... वेगळ्या संदर्भात म्हणावसं वाटतं, तू व भाऊ दोघांसाठी वक्त बेवफाँच निघाला."

 चंद्रकांत खिन्न हसला आणि तेच गीत गुणगुणू लागला, “वक्त करता जो वफाँ,