प्रशासननामा/एका दंगलीमागची कहाणी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchएका दंगलीमागची कहाणी “सर, इथे तालुका मुख्यालयात दंगल पेटली आहे. बाबरी मस्जीद पाडल्याच्या निषेधार्थ मुस्लिमांनी मोर्चा काढला होता. मघाशी अकरा वाजता त्यांनी अचानक हिंसक होत जाळपोळ सुरू केली. तेव्हा पोलिसांना गोळीबार करून दंगल आटोक्यात आणण्याचे मी आदेश दिले. फायरिंगमध्ये दोन मरण पावले व पाच जखमी..."

 पलीकडे फोनवर कवडे उत्तेजित पण कापऱ्या स्वरात बोलत होते आणि निवासी उपजिल्हाधिकारी (आर.डी.सी) चंद्रकांत अवाक होऊन ऐकत होता.

 “आता परिस्थिती कशी आहे?" चंद्रकांतने विचारले.

 "टेन्स, बट अंडर कन्ट्रोल." टिपिकल ब्युरोक्रेटिक उत्तर.

 "तुम्ही मोर्चाला परवानगी मुळात का दिली रावसाहेब?" चंद्रकांतने काहीशा रोषाने विचारले, “एक औरंगाबद शहर वगळले तर सारा मराठवाडा शांत आहे. आपला जिल्हाही. पण आज तुमच्या तालुक्यातील दंगलीने गालबोट लावले. व्हाय डिड यू गिव्ह परमिशन फॉर प्रोसेशन ?"

 "सर, माझं जजमेंट थोडं चुकलं. पण..."

 क्षणभर थांबून कवडे म्हणाले, “प्लीज, कलेक्टरसाहेबांना आपण सूचित करा. माझी सांगायची हिंमत नाही. आणि दुपारी चार वाजता शांतता कमिटीची बैठक ठेवली आहे, तुम्ही, डी.एम. (कलेक्टर) व एस.पी.साहेब आलात तर वातावरण झपाट्याने निवळायला मदत होईल."

 "ठीक आहे. तुमचे प्रांत कुठे आहेत?"

 “ते इथे यायला निघाले आहेत. लवकरच पोचतील."

 “ओ.के., परिस्थितीवर नीट लक्ष ठेवा व कंट्रोल करा."

 चंद्रकांत कलेक्टरांच्या चेंबरमध्ये गेला. तिथे पोलीस अधीक्षकही होते.

 मी तुलाच बोलावणार होतो, चंद्रकांत. काय खबर आहे?

 त्याने कवडेशी दूरवध्वनीवरून झालेले संभाषण व होम डी.वाय.एस.पी.कडून घेतलेली माहिती यांच्या आधारे घडलेला वृत्तांत थोडक्यात कथन केला.

 बाबरी मस्जीद पडली त्यादिवशी दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांतला एस.टी.डी.वरून एक फोन आला. तो सबइनस्पेक्टर जोशी यांचा. तो फैजाबाद, उत्तरप्रदेशावरून होता. अयोध्येला महाराष्ट्रातून गेलेल्या रामभक्तांवर नजर ठेवण्यासाठी राज्यशासनाने त्यांना पाठवले होते. त्यांनी दिलेली बातमी धक्कादायक होती.

 “सर, येथे रामभक्तांनी बाबरी मशिदीचा विध्वंस सुरू केला आहे. तीनपैकी एक घुमट नुकताच जमीनदोस्त झाला आहे. आणि पोलीस व लष्कर बघ्याच्या भूमिकेत आहेत. हीच स्थिती राहिली तर संध्याकाळपर्यंत पूर्ण बाबरी मशिदीचा ढाचा आडवा होईल. मोठ्या मुश्किलीने एका खाजगी बूथवरून बोलतोय. तुम्ही प्लीज एस.पी.ना व राज्य पोलिसांना कल्पना द्या. उद्या ही वार्ता पोचली की दंगल भडकण्याची शक्यता आहे. आपला मराठवाडा हा मुस्लीमबहुल असल्यामुळे मी मुद्दाम कळवले आहे."

 'थँक यू, जोशी. तुम्ही खरंच समयसूचकता दाखवली आहे. किमान आपला जिल्हा तरी शांत राहील."

 चंद्रकांतने कलेक्टरांना ही खबर दिली. त्यांना क्षणभर खरे वाटले नाही. पण जोशी हे कर्तव्यनिष्ठ व नावाजलेले पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे ही वार्ता खरी समजून पुढील कार्यवाही करण्याचे ठरले.

 “सर, सर्वप्रथम आपण केबल टि.व्ही. बंद करू या दोन दिवस, कारण बाबरी मशीद पडल्याचे दृश्य पुन्हा पुन्हा दाखवले जाईल व ते पाहून मुस्लिमांची मने प्रक्षुब्ध होतील!”

 “आणि १४४ कलम लावण्याची ऑर्डर ताबडतोब काढ.' कलेक्टरांनी आदेश दिले. “एस.पीं.शी बोलून मी रात्रीचा कर्फ्यू लावतो. सर्व प्रकारच्या प्रोसेशनवर बंदी घाला. सर्व तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना सूचना द्या."

 चंद्रकातने वेळीच पावले उचलली. जिल्हा कालपरवा दोन्ही दिवस शांत राहिला. तुरळक दगडफेक वा चाकूमारीचे प्रसंग सोडले तर सर्वसाधारण परिस्थिती नियंत्रणात होती.

 आणि आज तिसऱ्या दिवशी एका तालुक्यात दंगल उसळली हेती. गोळीबार झाला. दोघे मरण पावले. पाच जण जखमी झाले होते.

 कलेक्टर व एस.पी.यांच्यासह तो तालुक्याला पोचला तेव्हा विश्रामगृहावर तहसीलदार कवडे स्वागताला हजर होते. ते अत्यंत तणावाखाली वाटत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवधी दोन वर्षे उरली होती. कारकुनापासून चढत ते तीन वर्षांपूर्वी तहसीलदार म्हणून येथे रुजू झाले होते. एक कर्तबगार व धडाडीचा महसूल अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता, तो या प्रकरणानं मातीस मिळाला होता. त्यामुळे ते साहजिकच अस्वस्थ होते.

 त्यांनी सारा प्रकार सविस्तरपणे कथन केला.

 "सर, परवा दुपारीच आर.डी.सी. साहेबांनी बाबरी मशीद पडत असल्याची खबर दिली. त्यावेळेपासूनच १४४ कलम लावले. रात्रीचा कर्फ्यूही होता. पण इथले मुस्लीम कमालीचे प्रक्षुब्ध झाले होते! काल-परवा दोन्ही दिवस मशिदीमशिदीतून खलबते होत होती. इथल्या शाही दर्ग्याच्या मुतवलीनं मोर्चा काढून शासनाकडे निषेध नोंदवण्याची परवानगी मागितली तेव्हा, मी ती नाकारली होती. पण आज पुन्हा त्यांनी विनंती केली. नाराजीला वाट दिली तर पेटलेली तरुण पिढी शांत होईल असे वाटले, सर, एक प्रकारे हा प्रेशरकुकरचा सेफ्टी व्हॉल्व्ह जरा सैल करून, कोंडलेली वाफ काढून देण्यासारखा प्रकार होता. काल रात्री दोन भोसकण्याचे व चार सुरामारीचे प्रकार कर्फ्यू असतानाही घडले होते."

 “पण कवडे, अशावेळी कडक कर्फ्यू एनफोर्स केला पाहिजे. अधिक पेट्रोलिंग करून सर्व समाजकंटक पकडले पाहिजेत.'

 “ते तर मी केलंय सर. तरीही हा निर्णय मी व पोलीस निरीक्षक मराठेनी मिळून घेतला. परिस्थितीचा सांगोपांग विचार करून घेतला. मुख्य म्हणजे मुतवली व शहरातील उपनगराध्यक्ष (जे मुस्लीम समाजाचे आहेत) त्यांनी कुराण शरीफची कसम खाऊन शांतता राखण्याची हमी दिली होती. मोर्चातील एक-एक माणसाची झडती घेऊन तो नि:शस्त्र आहे याची आम्ही खात्रीही केली होती."

 “मग मोर्चा एकदम हिंसक कसा झाला? अर्ध्या रस्त्यातून लोकांनी जाळपोळ लुटालूट का सुरू केली? '

 इतका वेळ शांत उभे असलेले पोलीस निरीक्षक मराठे म्हणाले,

 'मी त्याची माहिती काढली आहे सर. एका वळणावर गल्लीतून चारपाच जणांचं एक टोळकं मोर्चात सामील झालं. ही हद्दपार केलेली गुंड पोरं- त्यात तीन मुस्लिम व दोन हिंदू. त्यांचा दाऊद इब्राहिम टोळीशी मुंबईला गेल्यानंतर संबंध आला होता. त्यांनी सोबत तलवारी व सुरे आणले होते. एकाजवळ रॉकेलचा डबा व पेटते पलिते होते. त्यांनी जाळपोळ व दगडफेक सुरू केल्यानंतर इतका वेळ शांत असलेला जमाव बेकाबू झाला आणि..."

 “सर, हे जे दोन लोक मृत्युमुखी पडले ते हद्दपार केलेलं गुंड होते. दाऊद टोळीशी संबंधित होते." कवडे म्हणाले.  "मेलेले दोघेही मुस्लीमच होते ना?' एस.पी.पुटपुटले.

 "उद्या पेपरवाले आणि बाबरी बचाव कमिटीचे लोक आरोप करणार की पोलिसांनी टिपून मुस्लिमांना मारले."

 कलेक्टर शांतपणे ऐकत होते. चंद्रकांत त्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया पाहात होता. कवडे कमालीचे भेदरले होते. विभागीय चौकशी मागे लागली तर चारदोन वर्षे पेन्शन बोंबलली. शिवाय इज्जतीचा फालुदा.

 “ठीक आहे मि. कवडे, हे आपण नंतर पाहू. आता शांतता समितीची बैठक घेऊन लोकांना आवाहन करू. पुढील चारसहा दिवस डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. ओ.के.?"

 शांतता समितीमध्ये कलेक्टरांनी आवाहन केलं. “आजची हिंसक घटना का व कशी घडली याची जरूर आम्ही दंडाधिकारीय चौकशी करू. पण ती ही वेळ नाही. याक्षणी शांततेची व सौहार्दाची गरज आहे. सर्व जखमींना आम्ही औषधोपचार करू, जाळपोळीत ज्यांच्या घरे-दुकानांना झळ पोचली आहे त्यांना नियमाप्रमाणे मदत करू. तिचे वाटप उद्याच होईल."

 कलेक्टर पंजाबी होते. त्यांचे उर्दूवर प्रभुत्व होते. त्यांनी कुराण-हादिसचे दाखले देत आणि शेर सुनावीत लोकांच्या भावनांना हात घातला.

 "हिंदु-मुसलमान एक है, रास्ते दो हुवे तो क्या हुवा! मंजिल एक है।" असा फडकता शेर सुनावला, तेव्हा परिस्थितीचे गांभीर्य विसरून काहींनी ‘वा, बहोत खूब' म्हणत उत्स्फूर्त दाद दिली.

 “मघाशी शहरात येताना टुरिंग टॉकीजवर एक पिक्चरचं पोस्टर पाहिलं. अभिताम बच्चनच्या 'हम' पिक्चरचं. “उसका मेसेज अच्छा है. हम जो दो दिल, दो इन्सान और दो कौम को मिलाता है, हम मधलं पहिला अक्षर आहे 'ह' - जे माझ्या मते हिंदूचे प्रतीक आहे, तर दुसरं अक्षर आहे 'म' म्हणजे मुसलमान. मतलबकी बात यह हुवी की हिंदू का 'ह' और मुसलमान का 'म' मिलावो तो 'हम' बनता है, हम यानी मैं और तू-हम और तुम -हमसब एक है-ये बताने की जरूरत नही."

 त्यांनी भावनेला हात घालीत साऱ्याना शांत केलं. त्यानंतर एस.पी.बोलले. शेवटी आभाराच्या निमित्तानं चंद्रकांतनही हिंदी कवितांचा आधार घेऊन भाईचा-याचं व सौहार्दाचे आवाहन केलं.

 परतीच्या प्रवासात एस.पी. म्हणाले, “सर, तुमचा तहसीलदार व आमचा इन्स्पेक्टर या दोघांनाही सस्पेंड केलं पाहिजे. त्यांनी प्रोसेशनला कोणत्याही परिस्थितीत परवानगी द्यायला नको होती."  कलेक्टरांनी त्यांच्या विधानाला कोणत्याही प्रकारे ‘रिअॅक्ट' न होता चंद्रकांतला विचारले,

 तुझं काय मत आहे?"

 काही क्षण चंद्रकांत स्तब्ध होता, मग हलकेच म्हणाला,

 'आपल्या जिल्ह्यातील घटना किंवा मराठवाड्यात काही ठिकाणी घडलेल्या घटना घ्या. सर्वत्र कर्फ्यू असताना हिंसक प्रकार घडले आहेत. भोसकल्यामुळे काही बळी गेले आहेत. म्हणजेच मुस्लीम मानस प्रक्षुब्ध होतं व ते कर्फ्यू ही जुमानत नव्हतं. पुन्हा आपल्या विभागात मदरसा ही संस्था वेगानं फोफावते आहे हे विसरून चालणार नाही. तेथे फॅनाटिझमचे धडे कोवळ्या व तरुण पिढीला दिले जातात. त्यांच्या भावना भडकणं स्वाभाविक आहे, कवडेंनी त्याला वाट देण्याचा विचार केला. त्यांनी दिलेली उपमा सार्थ आहे. प्रेशर कुकरची शिटी सैल होऊन कोंडलेल्या वाफेला वाट दिली नाही तर स्फोट होऊ शकतो. हा तालुका स्फोटक व संवेदनाक्षम आहे. त्यामुळे कर्फ्यूतही हिंसक प्रकार घडले असते. प्रोसेनशला सर्व खबरदारी घेऊन परवानगी देणं ही कॅलक्युलेटेड रिस्क होती. अशी रिस्क घेण्याचे धैर्य किती अधिकारी दाखवितात? ती हिंमत कवडे व मराठे यांनी दाखवली. अर्थात हद्दपार केलेले आणि ‘डी’ गॅंगशी संबंध आलेले पाच तडीपार गुंड अचानक आत घुसले व त्यांनी दंगल पेटवली. अन्यथा मोर्चा शांततेत पार पडला असता. वातावरण झपाट्यानं निवळले असतं. खैर. त्यांचं जजमेंट थोडं चुकलं. तडीपार गुंडांचा अँगल त्यांच्या ध्यानी आला नाही. तो वरिष्ठांच्याही ध्यानात आला नसता. तो ध्यानात आला नाही म्हणून त्यांना दोष देणे योग्य होणार नाही."

 तो पुढे म्हणाला, “म्हणून मी एस.पी.साहेबांशी सहमत होऊ शकत नाही. या दोन अधिका-यांना सस्पेंड न करता त्यांच्या पाठीशी वरिष्ठांनी ठामपणे उभे रहावे, असे माझे मत आहे."

 जिल्हा मुख्यालयात ते पोचले तेव्हा वार्ताहर त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. त्यांचा सामना करीत कलेक्टर म्हणाले,

 “घडलेली घटना दुर्दैवी असली तरी ‘डी’ गॅंगशी संबंधित तडीपार गुंडांमुळे हा प्रकार घडला असे तपासाअंती आढळून आले आहे. पण त्याही परिस्थितीत तहसीलदार व पोलीस इन्स्पेक्टर यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळली व योग्य ती उपाययाजेना केली. त्यामुळे अत्यंत कमी विध्वंस झाला आहे. बळी पडलेले दोन्ही तडीपार गुंड होते. त्यांची नावे मी जाहीर केली तर तुम्हालाही ते मान्य होईल. त्यामुळे कुणाही निरपराध माणसाचा प्राण गेलेला नाही. जे पाच जखमी झाले ते सुखरूप आहेत. त्यांच्या जीवाला कसलाच धोका नाही. हां, काही वित्त व घरांची हानी झाली आहे. शासकीय नियमाप्रमाणे सर्व आपद्ग्रस्तांना उद्याच मदत केली जाईल."

 वातावरण निवळल्यानंतर दंडाधिकारी चौकशीचे शासनाने आदेश दिले. त्या चौकशीमध्ये मराठे व कवडे यांच्यावर कसलाही ठपका ठेवला गेला नाही, ते त्या अग्निदिव्यातून सहीसलामत सुटले.

 चंद्रकांतने इनसायडरला हा प्रसंग कथन केला.

 "मित्रा, कवडे व मराठे यांच्यासारखे रिस्क घेणारे महसूल व पोलीस अधिकारी आहेत, म्हणून प्रशासनाचा कणा ताठ आहे. अशा आणीबाणीच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी ऑन द स्पॉट डिसिजन घ्यावा लागतो. तोही तत्काळ-क्षणार्धात, तो घेणारे फार थोडे असतात. बहुतेकांचा कल तो टाळण्याकडे असतो. कारण नंतर परिणामाला तोंड देता देता नाकी नऊ येतात. उतारवयातील कवडेंनी असाधारण धैर्य दाखवले. खरंच ते प्रशंसनीय आहे.

 “आणि आमच्या कलेक्टरांनीही, शासनाकडून प्रेशर आलं तरी मराठे व कवडे यांना डिफेंड केलं. त्यांना निलंबित होऊ दिलं नाही. त्यांच्या समवेत मी त्या कालखंडात होतो हे माझं भाग्य म्हणायला हवं!”

 कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी क्षेत्रीय अधिका-यांनी निश्चित मनाने परिस्थितीचे आकलन करून ‘ऑन द स्पॉट' निर्णय घ्यायला हवेत. ते निर्णय घेण्यात वा परिस्थितीचे आकलन करण्यात चुकले तरी त्यांच्यामागे भक्कम पाठबळ उभे करणारे वरिष्ठ अधिकारी पण हवेत. तरच क्षेत्रीय अधिकारी खंबीरपणे, परिणामाची तमा न बाळगता परिस्थिती हाताळू शकतील.

 अशा प्रसंगी वातावरण नको तेवढं भावनात्मक बनतं. निलंबित करून वा बदली करून क्षेत्रीय अधिका-यांचा बळी दिला जातो. सवंग प्रसिद्धीकडे राज्यकर्ते व वरिष्ठ अधिका-यांचा कल असतो; मागचा पुढचा सारासार विचार न करता ते खुशाल काही अधिका-यांचा बळी देतात. त्यामुळे एकूण प्रशासनाचीच हानी होते. कार्यक्षम, धाडसी अधिका-यांचं भवितव्य पाहून इतर दहाजण कचरतील. आणीबाणीच्या प्रसंगी कसोटीला उतरण्यास व स्वत:ला पारखण्यास संकोच करतील. तेव्हा अधिक तीव्र हिंसक प्रकार संभवतील. म्हणून मराठे व कवडे आणि कलेक्टर व चंद्रकांत यासारखे रिस्क घेणारे अधिकारी प्रशासनासाठी आवश्यक ठरतात.