प्रशासननामा/प्रिय सर
प्रिय सर,
पु. ल. देशपांडे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने भारावून गेलेल्या अवस्थेत म्हटलं होतं की, 'मी विशाखा नक्षत्रावर जन्मलो आहे.' तसंच मला म्हणावंसं वाटतं की मी 'राजा' नक्षत्रावर जन्माला आलो. तुमच्या हाताखाली प्रोबेशन अधिकारी म्हणून आलो आणि खऱ्या अर्थाने द्विज झालो. ट्वाईस बॉर्न. गुरू शिक्षण देतो, तेव्हापासून विद्यार्थ्याचा नवा जन्म सुरू होतो. माझ्यातला जो प्रशासक आहे, त्याचा जन्म तुमच्या सहवासात आल्यापासून झाला आहे यात शंकाच नाही.
बँक सोडून महसूल खात्यात अधिकारी म्हणून थेट आपल्या जिल्ह्यात प्रोबेशनसाठी आलो. कलेक्टर कचेरीतला पहिला दिवस आजही स्मरणात आहे. तो दुसरा शनिवार होता. शासकीय सुटीचा दिवस. बँकेत काम करणारा मी, सुटीची कल्पना मला नव्हती. एका लॉजवर सामान टाकून, फ्रेश होऊन दहा वाजता ऑफीसला गेलो तर तिथं सारा शुकशुकाट. एक शिपाई, कलेक्टरांचा स्टेनो. चिटणीस नामक एका अधिकाऱ्यानं माझं स्वागत केलं. 'सर, सकाळी बस स्टॅडवर कलेक्टर साहेबांच्या सूचनेप्रमाणे जीप पाठवली होती. पण आपणास आम्हाला ट्रेसआऊट करता आलं नाही. तुम्ही कुठं उतरलात? विश्रामगृहात आपल्या नावानं सूट रिझर्व करून ठेवला आहे आम्ही.' मी आ वासून त्याच्याकडे पहात राहिलो. सर, मी हे विसरून गेलो होतो की, आज रुजू होत असल्याबद्दलची मी तुमच्या नावानं तार केली होती. तुम्ही किती आत्मीयतेने माझी व्यवस्था केली होती! सुट्टी असूनही तुम्ही कार्यालयात काम असल्यामुळे आला होता. माझी तुमची भेट झाली आणि का कोण जाणे, मला एकदम निश्चिंत वाटलं. तुमच्या व्यक्तिमत्त्वात असं काही रसायन आहे की, समोरचा माणूस आश्वस्त होतो. समोरच्याला ‘ॲट इझ' करीत संपर्क साधण्याची तुमची अनोखी शैली नंतर अधिक तपशिलाने जाणवत गेली. पण पहिल्या भेटीत एवढा मला दिलासा जरूर मिळाला की, बँकेची आरामशीर नोकरी सोडून प्रशासनाच्या धकाधकीत येण्याचा आपला निर्णय चुकला नाही. अँड आय डीपली फेल्ट देंट, आय ॲम इन सेफ हँडस् हू कॅन मोल्ड मी इन राईट डायरेक्शन!
त्यानंतर पुढील आठवड्यात तुम्ही बोलावलेली व माझी पहिलीच असलेली महसूल अधिकाऱ्यांची बैठक मला आठवते. जवळपास शंभर विषय कार्यक्रमपत्रिकेवर होते. दोन दिवस ती मीटिंग सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालली होती. ती मीटिंग माझ्यासाठी सर, एक ग्रेट अशी ‘लर्निंग प्रोसेस' होती. हीच काय, पण तुमच्या कलेक्टरशिपच्या काळातली प्रत्येक बैठक मला काही ना काही शिकवून गेली. सर, मी तोंडदेखली तारीफ करणार नाही, पण खरंच, बैठक कशी घ्यावी याचा वस्तुपाठ म्हणून तुमच्या बैठकीकडे मी अंगुलीनिर्देश करीन. तुम्ही खरंच हाडाचे शिक्षक आहात. तुमची बैठक ही केवळ कामाचा आढावा घेणारी व काम कमी झालं, शासकीय उद्दिष्टांची पूर्ती झाली नाही म्हणून अधिकाऱ्यांना केवळ झापाझापी करणारी नसते, तर प्रत्येक विषयाचं महत्त्व समजावून सांगणं, तिचं स्वरूप लक्षात येऊन कामाचं नियोजन करणं आणि अंमलबजावणी कशी, किती टप्प्यात व किती वेळात करावी, सारं तुम्ही प्रभावीपणे सांगता. त्यामुळे कुणाही अधिकाऱ्याच्या मनात काही शंका उरत नाही आणि त्यामुळे सर्वांचं काम उंचावलं जातं!
सर, त्या बैठकीचा एक विषय होता. 'सातबाराचे पुनर्लेखन.' जमिनीच्या मालकीचा आणि पीकपाण्याची नोंदी असणारा हा महत्त्वाचा अभिलेख शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. एक सातबारा नोंदवहीं साधारणपणे दहा वर्ष चालते. त्यानंतर जागा संपल्यामुळे नव्याने सातबारा लिहून अंमलात आणावा लागतो. त्यावेळी तलाठी प्रचंड घोटाळे करतात, काही नोंदी उडवतात. त्यामुळे अपील प्रकरणे उद्भवतात. हे सारे संभाव्य धोके तुम्ही बैठकीत पोटतिडकीने मांडले होते.
‘सातबाराचे पुनर्लेखन करताना एकही चूक होणार नाही याची काळजी तहसीलदारांनी घेतली पाहिजे. गावात खऱ्या अर्थानं ग्रामसभासदृश सभा बोलावून गावकऱ्यांसमक्ष जाहीर वाचन करा आणि लोकांना जुना व नवा सातबारा द्या. सर्व तलाठ्यांना लेखी सूचना द्या, पुनर्लेखनानंतर याबाबत ज्या गावाचं चुकीच्या नोंदी बाबतचे अपील दाखल होईल, त्या तलाठ्याला तत्काळ निलंबीत करण्यात येईल.'
सर, आपण या विषयावर अर्धा तास चर्चा केली. तुम्ही यातले से संभाव्य धोके व शेतकऱ्यांचे होणारे हाल याबाबत जे बोललात त्याचा ठसा मनावर कायम आहे.तुमच्या बैठका दोन-दोन दिवस चालत, पण त्या कधीच बोअर होत नसत. नंतर चार महिन्यांसाठी तहसीलदार म्हणून, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एका दुष्काळी भागात रुजू झालो. दोन दिवसातच जाणवलं की मला तहसील कार्यालयातील प्रत्येक विषय ठाऊक आहे. नेमकं काय करायचं हे ठाऊक आहे. कर्मचारी व अनेक नागरिकांनी निरोपाच्या भाषणात माझा गौरव केला. 'रावसाहेबांनी आल्या-आल्या सखोल जाणकारीनं एकेका प्रश्नाला ज्या तडफेनं हात घातला व तो सोडवला, त्याचं कौतुक करावसं वाटतं!' सर, हे खरं तर तुमचं श्रेय होतं.
प्रोबेशन कालावधी म्हणजे पेड़ हॉलिडे असं मानलं जातं. पण माझ्यासाठी तो ‘राजा नामक प्रशासन विद्यापीठात शिकण्याचा कालखंड होता.' माझे प्रशासकीय कामाचे धडे या काळात चालू होते! तुम्ही त्या काळात मला एवढे भरभरून देत होतात की, माझी फाटकी झोळी ते ग्रहण करायला कधी कधी अपुरी पडायची. तुमच्या परीसस्पर्शानं माझं सोनं झालं. बँकेत ओव्हरटाईमही न करणारा आणि निरुद्देश कवचातलं सुरक्षित जिणं जगणारा चंद्रकांतला पाहता पाहता तुम्ही बदलून टाकलं होतं. तुमच्यातल्या ज्ञानप्रखरतेनं माझी ज्ञान घेण्याची लालसाही उफाळून आली होती. विंदा करंदीकरांच्या कवितेची एक ओळ आठवते. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.' सर, तुम्ही केवळ मला एकट्यालाच भरभरून देत नव्हतात, तर तुमच्याजवळ असलेलं साऱ्यांपुढे मुक्तपणे उधळत होतात. त्यांच्यातलाच मी एक. मी तो जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून, हे नक्की.
सर, आज पंधरा वर्षांनी हे पत्र लिहायला घेतलं. दीड वर्षाच्या तुमच्या सहवासातला तो कालखंड पुन्हा एकदा जिवंत झाला. काय लिहू नि काय नको असं मला होत आहे.
तुमच्या सहवासातला प्रशिक्षण कालावधी गुरुकुल आश्रमासारखा ठरला. आज महसूल अधिकाऱ्यांबद्दल व एकूणच सरकारी अधिकाऱ्यांबद्दल जो तुच्छ उपहासाची भाव समाजमनावर आहे, मीही कदाचित त्यातलाच एक झालो असतो. पण मला तुम्ही योग्य वेळी, योग्य वळणावर भेटलात. प्रशासनातही सामाजिक बांधिलकी जपता येते, याचा गुरुमंत्र दिलात. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही अचूक नियोजनाचा ध्यासच घेता येतो असं नाही, तर तो जपता येतो, हे तुमच्या कामातून शिकलो. त्याचे धडे मी आजही गिरवत आहे.
महात्मा गांधींबद्दल बर्नाड शॉ जे म्हणाला ते तुम्हालाही लागू पडतं. 'यू आर टू ग्रेट टु बिलीव्ह...'एक आठवण राज्यपालांच्या दौऱ्याची आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुखापुढे सनदी अधिकाऱ्याने कसे पेश यावे याचे ते लोभस दर्शन होते! प्रत्येक कार्यक्रम नेटका, वक्तशीर आणि नियोजनबद्ध. रात्री भोजनोत्तर राज्यपालांना निरोप दिल्यानंतर तुम्ही अकरा वाजता ऑफिसला गेलात. मला 'बरोबर या' म्हणालात. खरं तर तीन दिवस सतत राज्यपालांसोबत आपण होता व या तीन दिवसात कार्यालयात जाता आले नाही म्हणून राज्यपालांचे प्रयाण होताच तुम्ही रात्रभर कार्यालयात बसून साचलेल्या फायलींचा ढिगारा उपसला. मी अनिमिष नेत्राने पाहात होतो. त्या थकल्या देहाची, चुरचुरणाच्या नेत्रांची रात्र आजही लक्षात आहे.
तुमची कार्यतत्परता सतत जाणवायची. सायंकाळी घरी परतताना 'आज मला वाटतं की, पगाराएवढं काम नक्कीच केलंय.' असे तुमचे उद्गार कैक वेळा ऐकले आहेत, ते हृदयावर अमिट असे कोरलेले आहेत. तुम्हाला मध्यंतरी नागिणीचा दुर्धर आजार झाला. कमरेवर दोन्ही बाजूने लालसर पट्टे उठले. अंगात शर्ट घालणेही शक्य नव्हते. घरी लुंगी लावून वावरत होतात. हसतमुखानं, वेदना सोशीत घरातून कामकाज पाहात होतात. फोनवर प्रत्यक्ष भेटीसारखं बोलून लोकांची काम करीत होतात. तशी कार्यसिद्धी दुर्मीळच. तसा आजही माझा प्रयत्न असतो. एक गमतीची बाब सांगतो. नंतर मलाही भूमला असताना नागीण झाली. कुठेतरी मी तुमच्याशी जुडलो गेलो होतो. मीही तुमचं अनुकरण करीत घरातून कामकाज बघितलं.
तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे रूपच पालटून टाकलं होतं. ते लोकाभिमुख व पारदर्शी केलं. त्यासाठी जनतेच्या नित्य कामाबाबत तहसील कार्यालय माहितीफलक लावून जनतेची कामे जलदगतीने करण्याचा प्रयत्न केला. आज नगरचा कार्यालयीन कामकाजाची लखिना पॅटर्न म्हणून ओळखला जातो, तो प्रथम तुम्ही सुरू केला. त्यांनीही तुमचं ऋण व प्रेरणा मान्य केली आहे. पण मला खंत वाटते की, पद्मश्रीसारखा सन्मान लखिनांना मिळाला. खरं तर त्यावर तुमचा प्रथम अधिकार होता. तुमची प्रसिद्धीपराङ्मुखता आणि अकिंचन साधुवृत्ती स्वप्रसिद्धीचा डिंडिम करण्याआड आली. आणि त्याचे श्रेय इतरांना मिळालं त्याची, तुमचा शिष्य म्हणून आजही मला मनस्वी खंत वाटते.
भेटणारा प्रत्येक माणूस म्हणजे तुम्हाला एक प्रश्न, एक दुःख वाटायचं आणि तो प्रश्न सुटला पाहिजे, ते दुःख मिटलं पाहिजे, अशी आपली भावना असे.
प्रश्नाचं, त्या दु:खाचं मूळ जाणून त्याचा या व्यक्तीप्रमाणे इतरांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर त्याचा निपटारा करायची मोहीम तुम्ही हाती घ्यायचा. कितीतरी कळीच्या मुद्द्यांना तुम्ही हात घातलात. साधी दरवर्षीची सातबारावर पीकपाहाणी नोंदीची बाब. तलाठी चावडीवर बसून, चार लोकांना विचारून प्रत्येक कास्तकरानं काय पिकं घेतली याची नोंद करतात, त्यांना तुम्ही हनुमान पाहणी म्हणायचात. त्यावर्षी तुम्ही जाहीर केलंत की, अधिकाऱ्यांनी स्वतः एकेका गावाची जातीनं क्षेत्र नं क्षेत्र हिंडून पाहणी करून पीक नोंदी कराव्यात. तुम्ही स्वत:ला त्यातून वगळलं नाही हे विशेष. एका वृद्ध तहसीलदारासह मी सोळाशे सर्व्हे नंबर असलेल्या गावाची पीक पाहणी केली, तेव्हा तेच काय, मीही थकून गेलो होतो. पण तो अनुभव ‘आय ओपनर' होता.
तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी दौऱ्याच्या वेळी दरमहा खेडेगावात काही मुक्काम करावेत असा नियम आहे. पण रेस्ट हाऊस व जीप-गाड्यांच्या जमान्यात कोणी खेडेगावी मुक्काम करीत नाही. पण तुम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे प्रशासन लोकांच्याजवळ सफलतेनं गेलं. काही आडवळणी गावांना, मी सायकलवर गेलो, त्यामागे आपली प्रेरणा होती. एका गावी रात्रभर मी चक्क दारूड्यांच्या संगतीत चावडीत झोपलो होतो, छे! जागा होतो; तर दुसऱ्या एका गावी मारुतीच्या मंदिरासमोरील कट्टयावर पोलीस पाटलानं दिलेल्या नवारीच्या बाजेवर झोपलो होतो. आजही ते सारं फार दूरचं वाटतं, इतका काळ बदलला आहे. खरं सांगू, आज मीही असे मुक्काम करीत नाही.
सर, आपला सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर गुणग्राहकतेचा! हाताखालच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आपण मनापासून कौतुक करायचा. होय! या गुणांची वरिष्ठांमध्ये किती कमतरता आहे हे मी बघितलं आहे. याबाबत सर्वात मोठे दोषी अर्थात आय.ए.एस. वाले आहेत. तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद आहात, म्हणून सिद्ध होणारं हे आजच्या काळातलं सत्य आहे. ते जर प्रशासकीय टीमचे कॅप्टन असतील तर यशाचं जरूर श्रेय घ्यावं, पण त्याचवेळी अपयशाचीही जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवावं ही अपेक्षा या आय.ए.एस. नामक केडरनं कधीच पुरी केली नाही. कायम श्रेय, यश व प्रसिद्धी याचा झोत केवळ आपल्यावरच पडावा याबाबत ते दक्ष असतात. पण सर, आपण मात्र 'तो राजंहस एक' या जातकुळीचे. त्यांच्यापासून अलग! म्हणूनच आपण एक यशस्वी आदर्श प्रशासक ठरलात, पण प्रसिद्ध नाही. अर्थात त्याची तुम्हांला कधी खंत नव्हती. कारण तुम्ही खरे निष्काम कर्मयोगी.
प्रशिक्षण कालावधीत दोन महिने मंडल अधिकारी म्हणून फेरफार नोंदी व फेरफार अपिलांचा निपटारा मोहीम हाती घेऊन मी गावोगाव मुक्काम करून महसुली कामे हातावेगळी केली, त्याचं आपण किती कौतुक केलेत! सर्व मंडल अधिकाऱ्यांची तुम्ही बैठक बोलावलीत. दिवसभर स्वतः उपस्थित राहिलात. मंडल अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप व अंमलबजावणीवर मी दिवसभर बोललो. ते तुम्ही स्टेनोग्राफरला सांगून शब्दशः लिहून घेतले. त्या आधारे मंडल अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शिका' माझ्याकडून लिहून घेतली आणि स्वतःच्या विवेचक प्रस्तावनेसह प्रकाशित करून सर्वांना पाठवली. घरी आपल्या पत्नीला आवर्जून सांगितले, 'तू म्हणत असतेस ना, मी दिवसभर अखंड न थकता बैठकांमधून बोलत असतो. आज माझ्या चंद्रकांतनं माझ्यावर ताण केली आहे. किती छान लेक्चर दिलं!' असं कौतुक माझ्या वाट्यास पुन्हा आलं नाही.
सर, आपला ध्येयवाद मला मोह घालतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांत मोजके अपवाद वगळले तर तो इतिहासजमा झाला आहे, असं मला खेदानं म्हणावल वाटतं! ध्येयवाद कृतीत आणण्यासाठी लागणारी व्यावहारिकताही तुमच्याजव होती. नेमकं नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याबाबत तुम्ही 'या सम हो' होतात. प्रशासनात काम करताना केवळ 'मी प्रयत्न करीन, फळाची आशा धरणार नाही' हा गीताप्रणीत अनासक्त कर्मयोग चालत नाही. कारण विकास कामात लक्ष्यं ठरवावी लागतात आणि प्रयत्नपूर्वक गाठावी पण लागतात: आपण या अर्थाने आसक्त कर्मयोगी होतात. विकास कामाचे लक्ष्यरूपी फळे मिळण्याची आशा धरणारे, पण ही फळं आम नागरिकासाठी होती. म्हण दुसऱ्या अर्थानं अनासक्तही. ही छानशी गुंतागुंत म्हणजे तुमचं वेगळं, लोभस दुर्मीळसं व्यक्तिमत्त्व. सर, हे लिहिताना मी यत्किंचितही अतिशयोक्ती करा नाही. बिलीव्ह मी!
अण्णा हजारे यांना आपल्याबद्दल माहीत आहे की नाही, याची मला कल्पना नाही. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या लढाईत त्यांच्यासारखाच आपल्या क्षेत्रात शांतपणे, कोणतीही पोझ न घेता लढणारा एक खंदा लढवय्या म्हणजे तुम्ही आहात सर! तुम्ही किती नि:स्वार्थी आहात हे मी अनुभवलं आहे. कलेक्टर दौ-यात रेस्ट हाऊस टाळून कुठे चहा-फराळ आपण करीत होता. जेव्हा बिल द्यायला पुढे सरसावलो तेव्हा तुम्ही मला, 'मी सिनियर आहे. बिल देणार' असे म्हणून ते आपण सहजतेनं दिलंत, हे कुणाला सांगितले तर वाटेल? दौऱ्यामध्ये आपल्या बंदोबस्तात कुणाला एक पैची तोशीश लागू याची दक्षता घेणारा अधिकारी तुमच्या रूपात दिसला. आपल्या कार्यक्षेत्रात कुठे व कसा भ्रष्टाचार होतो हे जाणून ती सारी छिद्रे लिंपण्याची आप प्रशासनशैली अजोड होती. तुमच्या बदलीनंतर शहरात जाहीर नागरी निरोप समारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने निरोप देताना निवासी उपजिल्हाधिकारी गहिवरले होते, तेव्हा तुम्ही अवघ्या दोन मिनिटात शांतपणे सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानून निरोप घेतला. भावभिजल्या प्रदीर्घ भाषणाची आमची अपेक्षा. पण तुम्ही कमळाप्रमाणे पाण्यापासून अलिप्त रहाणाऱ्या जातीचे. आम्हीच तुमच्यामध्ये नको तेवढे गुंतलो होतो.
आजही तुमच्यासोबत तेव्हा काम करणारे तेवढेच गुंतलेले आहोत. माझी खात्री आहे. पण तरीही तुमच्या तटस्थतेचे अनुकरण करीत आहोत. पण आज परिस्थितीच एवढी विपरीत आहे की, तुमच्या ध्येयमार्गाप्रमाणे चालताना दमछाक होते. प्रसंगी तत्त्वाला मुरड घालावी लागते. डोळ्यासमोर कातडे ओढत, काही गोष्टी समजल्याच नाहीत असे दर्शवावे लागते. आपण पण हताश, उदास, निराश तर झालो नाहीत ना अशी कधी शंका येते. छे! असा विचार मनात आलाच कसा? म्हणून मी स्वत:वरच रागावतो. माझ्या हातून हे पत्र कधीच पोस्ट होणार नाही. कारण तुमच्यावर लिहिण्याच्या बहाण्याने माझी मलाच शोधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न आहे. तुमच्या परिपूर्णतेच्या ध्यासात तो बसणार नाही, याची मला कल्पना आहे. म्हणून ते मी माझ्याजवळच ठेवणार आहे. आणि दरवर्षी शिक्षक दिनी ते वाचून तुम्हाला माझे प्रशासनातले आदर्श गुरू म्हणून वंदन करीत भावांजली वाहणार आहे.