प्रशासननामा/एका सेक्युलर रोडची अजीब दास्तां

विकिस्रोत कडून



एका सेक्युलर रोडची अजीब दास्तान!



 मराठवाड्यातील एक दुर्लक्षित तालुका. एकेकाळचं मराठवाड्याचं अंदमान. जिल्हा विभाजनानंतर अचानक त्या तालुक्याचं नशीब फळफळलं. इतर दोन मोठ्या तालुक्यांपैकी प्रांत ऑफिस कुठे करावे हे राजकीय स्पर्धेमुळे ठरवणे कठीण झाले. दोन्ही तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची इच्छा की, काही झालं तरी दुसऱ्या तालुक्याला प्रांत ऑफिस मिळू नये, त्यामुळे या तालुक्याला ते मध्यवर्ती असल्याकारणाने न मागताही प्रांत कार्यालय मिळाले. त्यापाठोपाठ उपपोलीस अधीक्षक व इतरही उपजिल्हा कार्यालये क्रमाने आली आणि तालुक्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला.

 चंद्रकांत हा तिथला खऱ्या अर्थानं पहिला प्रांतअधिकारी. तो येण्यापूर्वी चार-सहा महिने दुसऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार होता. चंद्रकांतचे हे पहिलेच पोस्टिंग. प्रशिक्षण कालावधीत व्ही. पी. राजा यांच्यासारख्या आदर्श कलेक्टरांच्या हाताखाली त्याने जे आत्मसात केला, ते प्रत्यक्षात उतरविण्याची त्याला इच्छा होती. मंत्री, पुढारी, अधिकाऱ्यांचे दौरे यापासून बराचसा मुक्त असलेला हा प्रांत-विभाग त्याला कामासाठी अत्यंत अनुकूल होता. जलद विकासाच्या उद्देशाने जिल्हा विभाजन व प्रांत कार्यालय निर्मिती झाली, त्याच्या पूर्ततेसाठी तिन्ही तालुके हिंडून, लोकनेते व नागरिकांना भेटून आपल्या तीन वर्षाच्या कालावधीत काय करता येईल हे चंद्रकांतने ठरवलं. अंमलबजावणीसाठी अॅक्शन प्लॅन करून धडाक्यात तो राबवायला सुरुवात केली.

 तालुका मुख्यालयाच्या गावी नगरपालिका असली तरी ते पंधरा-वीस हजार लोकवस्तीचं मोठं खेडंच होतं. पेठ व कसबा अशा दोन भागात त्याचा विभागणी झालेली, मध्ये छोटी नदी. तिच्यावर एक छोटा फरशी पूल होता, पण तसे हे दोन भाग अलग पडलेले होते. दोन्ही भागात मातीचे - क्वचित कुठे गिट्टीचे रस्ते होते. सोलापूर-औरंगाबाद राजरस्त्याला जोडणारा एकमेव डांबरी रस्ता कसबा विभागला स्पर्शून जात होता. त्यामुळे धुळीचा, कच्चा व अरुंद रस्ता ही शहराची सर्वांत मोठी समस्या होती.

 कसबी व पेठ भाग जोडणारा प्रमुख रस्ता आणि फरशी पुलाचे पक्क्या पुलात रूपांतर करण्याची योजना चंद्रकांतने आखली. आमदाराच्या स्थानिक विकास निधीतून या कामासाठी रक्कम मंजूर करून घेतली. बांधकाम विभागामार्फत ज्या दिवशी प्रत्यक्षात डांबरी रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा सगळ्या शहरात आनंदोत्सव साजरा केला गेला.

 काम सुरू झाले, त्याच्या तिसऱ्याच दिवशी बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रकांतकडे आले, आणि म्हणाले,

 ‘सर, एक समस्या उद्भवली आहे. नगरपालिका कार्यालयासमोर रस्त्याच्या मध्यभागी मारुतीचं एक छोटं, चौथाऱ्यावरचं उघडं मंदिर आहे. ते हलवायला हिंदू समाजाचा विरोध आहे. त्यामुळे काम बंद पडलंय.'

 रस्त्याचे काम मंजूर करून घेताना चंद्रकांतने ही समस्या जाणून नगराध्यक्ष व इतर नेत्यांशी चर्चाही केली होती. त्यांनी रस्त्याचे काम होणार असेल तर मंदिर हलवता येईल असे आश्वासन दिलं होतं. पण प्रत्यक्षात ती वेळ आली तेव्हा नगराध्यक्ष मुंबईला काहीतरी ग्रँटचे काम काढून गेले, तर इतर काही नेते मंडळी मूग गिळून चूप होती. काही धार्मिक नेत्यांनी हिंदूंच्या भावना दुखावत असल्यामुळे मंदिर न हलवता तेथे वाहतूक बेट (आयलंड) करून रस्ता पुढे न्यावा अशी मागणी केली. आणि हिंदू समाजाची धार्मिक भावना फुलवीत काम बंद पाडलं.

 चंद्रकांत तातडीने तेथे गेला. उपस्थित झालेल्या नेत्यांना म्हणाला, 'हे पहा, रस्ता अत्यंत अरुंद आहे, त्यामुळे इथे वाहतूक बेट करणे शक्य नाही. रस्ता होईल तेवढा रुंद करण्याचा माझा प्रयत्न आहे. दुतर्फा असलेल्या दुकानांचे कट्टेही काढायला सुरुवात केली आहे.'

 ‘पण साहेब, हनुमान ही ग्रामदेवता आहे.'

 ‘तिचं मंदिर तर बाजारपेठेत आहे.'

 चंद्रकांत समोरच्या उघड्या कड्यावरील शेंदूर फासलेल्या मूर्तीकडे बोट दाखवत म्हणाला,

 'हे काय मंदिर आहे? हे पहा - इथे कुत्र्यामांजरांनी लघवी केल्याच्या खुणा दिसतात.'

 तावातावानं बोलणारा पुढारी नरमला.
 ‘यापुढे आम्ही मंदिराच्या पावित्र्याची, रक्षणाची जबाबदारी घेऊ. त्यासाठी आम्ही हनुमान भक्त मंडळ स्थापन करू. पण काही झालं तरी हे मंदिर हलवायला आमचा ठाम विरोध आहे.'

 'जरा विचार करा, रस्त्याची शहराला केवढी गरज आहे! पावसाळ्यात अक्षरश: चिखलातून तुम्हीं लोक जा-ये करता. नदीला जराही पूर आला की कसबा व पेठेचा संपर्क तुटतो. अरुंद रस्त्यामुळे एक मोठा ट्रक आला की तासन्तास वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आपला हा आग्रह अनुचित आहे. मी तुम्हाला पर्याय देतो. हे मंदिर नगरपालिका कार्यालयाच्या भिंतीला लागून असलेल्या कट्टयावर स्थलांतरित करू. हवं तर तेथे तुम्ही छोटंसं मखर उभारून त्याला मंदिराचा आकार द्या. त्यासाठी मी मदत करीन, पण हे काम अडवणं योग्य होणार नाही.'

 पण हिंदू समाजाची नेते मंडळी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. त्यामुळे चर्चा वांझोटी ठरली.

 चंद्रकांत आपल्या कार्यालयात येऊन बसला. आणि विचार करू लागला. ‘अशा परिस्थितीत आपले राजासाहेब असते तर त्यांनी काय केले असते? कोणती नवी प्रशासकीय गुरुकिल्ली त्यांनी चालविली असती?'

 चंद्रकांतनं स्वत:ला प्रश्न केला आणि बऱ्याच विचाराअंती त्याला उत्तर गवसत गेलं.

 त्या रात्री त्याने पोलीस बंदोबस्तात दोन्ही बाजूंनी रस्ते कामासाठी म्हणून बंद केल्याचे दर्शवीत कुणाला कळू न देता ते रस्त्यावरचे उघडे मंदिर हटविले. साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा करीत ते नगर परिषद कार्यालयाच्या भिंतीबाहेरील कट्टयावर स्थलांतरित केले. त्यावर झटपट छोटे देवालय मखरासह बांधून काढले. या साऱ्याचं त्यानं आठवणीने व्हिडिओ शूटिंग करवून घेतले आणि एका पुजाऱ्याच्या हस्ते पूजा घडवून आणली. याची शहरवासीयांना यत्किंचितही चाहूल त्या रात्री लागली नाही. मंदिर स्थलांतरित करून तो रस्त्याचा भाग, यापुढे जवळपास शंभर मीटर, रात्रीतूनच डांबरी करून टाकला.

 सकाळी शहरात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. विरोध करणारी हिंदू नेते मंडळी संतप्त झाली होती. त्यांनी शहर बंद ठेवण्याचे जाहीर केले. एक मोर्चा काढला. प्रशासनाचा निषेध करणारे निवेदन दिले. मंदिर पुन्हा रस्त्याच्या मध्यभागी वाहतूक बेटासह उभारण्याचा पुनरुच्चार केला. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला.

 चंद्रकांतने शांतपणे ते शक्य नाही, असे सांगितले.

 तसा एक जहाल नेता आवेशाने म्हणाला,  ‘बरोबर आहे साहेब. कु-हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना? तुम्ही हिंदूंच्या बाबतीत असं वागणारच. पण हाच न्याय तुम्ही मुस्लिमांना लावणार का? कसब्यात मुस्लिमांनी रस्त्याचा एक चतुर्थांश भाग व्यापून मशिदीचा विस्तार केला आहे. तो आपण पाडणार का?'

 ‘तेथेही हाच न्याय लावला जाईल.'

 मोर्च्यातील हिंदूचे त्या आश्वासनाने समाधान झाले नाही; पण त्याची बातमी मुस्लिमात हा हा म्हणता गेली.

 तो शुक्रवार होता. दुपारच्या नमाजानंतर मौलवींनी आवाहन केले. मशिदीचा रस्त्यात येणारा तथाकथित भाग प्रशासनानं पाडायला प्राणपणाने मुस्लिमांनी विरोध करावा. रात्रीतून मंदिर हलविले तसा प्रकार होऊ नये म्हणून चोवीस तास मशिदीचे रक्षण करण्यासाठी पहारा बसविण्याचे ठरविले.

 मराठवाडा हा एकेकाळी निजामाचा भाग होता. हैदराबादशी जवळचा संबंध आजही आहे. मार्गदर्शनासाठी येथील मुस्लीम समाज हैदराबादच्या मौलवींकडे व राजकीय नेत्यांकडे पाहात असतो. त्यांनी तातडीने शहरास भेट दिली आणि वातावरण तापत गेले.

 पंधरा दिवसांनी रस्त्याचे काम कसब्यात पोचले. चंद्रकांतने प्रथम एकशे चव्वेचाळीस कलम लावीत बाहेरच्या पुढाऱ्यांना शहरबंदी केली. तापलेले वातावरण शांत करून शहरातील महत्त्वाच्या दोन्ही समाजांच्या नेत्यांची बैठक बोलावली.

 ‘हा रस्ता तुम्ही सर्व शहरवासीयांसाठी आहे. अनधिकृत मशिदीच्या विस्तारामुळे अडथळा निर्माण झालेला आहे, हा विस्तारित भाग मोकळाच आहे, तेथे कोणतेही धार्मिक कार्य होत नाही. हा भाग पाडला तरी मूळ मशिदीला व त्याच्या पावित्र्याला धक्का पोहोचत नाही. तरी तुम्ही विचार करावा. मी आवाहन करतो की, आपण स्वत:हून रस्त्यामध्ये असलेला भाग पाडावा.'

 ही आमच्या मजहबमध्ये ढवळाढवळ आहे, सर.'

 'हे पहा, हा धार्मिक प्रश्न नाही, रस्त्याच्या बांधकामाचा व त्यावरील अतिक्रमण दूर करण्याचा प्रश्न आहे. रस्ता होणारच हे लक्षात घ्या. रस्त्यामध्ये हिंदूचे मंदिर होते, ते मी स्वतः हटवले आहे. तुमच्या मशिदीचा केवळ एक कोपरा रस्त्यात येत आहे, तो फक्त मागे घ्यायचा आहे. इथे मशीद हटविण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा समजुतीनं घ्यावं, अशी इच्छा आहे. नाही तर प्रशासनाला कठोर व्हावं लागेल.'  चंद्रकांतच्या बोलण्यात सडेतोडपणा आणि कठोर निश्चय होता. हिंदूंचे मंदिर लोकांना न जुमानता हलविल्याचे ताजे उदाहरण समोर असल्यामुळे चंद्रकांत जे बोलतो ते करून दाखवेल अशी मुस्लिमांची खात्री झाली होती.

 मुंबईत शिकून आलेला एक तरुण मुस्लीम नगरसेवक विचाराने डावीकडे झुकलेला होता. त्याने सर्वप्रथम ‘मशिदीचा रस्त्यात येणारा भाग काढून घ्यायला काही हरकत नाही' अशी उघड भूमिका चर्चेच्यावेळी घेतली. मग मुस्लिमांनी बरीच चर्चा करून आपणहून मशिदीचा भाग पाडू असं कळवलं. त्याप्रमाणे कृतीही केली.

 आठ दिवसात रस्ता रुंदीकरणासह आणि नदीवरील पुलासह पूर्ण झाला.

 त्या घटनेला पंधरा वर्षे झाली असतील आता, पण अजूनही शहरवासी चंद्रकांतला विसरले नाहीत. हा रस्ता त्याच्या पहिल्या पोस्टिंगमधला विजयाचा टप्पा ठरला. तोही हिंदू-मुस्लिमांच्या जातीय तणावाच्या संवेदनक्षम संदर्भातला.

 वाचकहो, ‘एका सर्वधर्मसमभाव रस्त्याची ही कहाणी इनसायडरला प्रशासननाम्यातील एका महत्त्वाच्या प्रशासन कौशल्याची द्योतक वाटते. ते म्हणजे - कायदा व सुव्यवस्था. त्यातील सर्वात ज्वालाग्रही पैलू म्हणजे धार्मिक व जातीय संघर्ष.

 हा रस्ता व्हावा असं हिंदू-मुस्लिम समाजातील सर्वसामान्य नागरिकांना तीव्रतेनं वाटत होते. ती त्यांची भौतिक गरज होती. ती नेमकी हेरून चंद्रकांतने पावले उचलली. उपक्रम तडीस नेला. त्याने जे प्रशासनकौशल्य दाखवलं, त्याचे पैलू पाहण्यासारखे आहेत. हिंदू-मुस्लिम संघर्ष ही भारतीय प्रशासनापुढे कायम डोकेदुखी आहे. या संघर्षाला बगल देणेच बहुसंख्य प्रशासक श्रेयस्कर मानतात. ही संघर्ष चिघळला, दंगल पेटली, कोणी जखमी वा मृत झाले तर प्रशासकाची चौकशी व बदली अटळ असते; पण प्रश्न जास्तच पेटला आणि विधानसभेपर्यंत गेला तर संबंधित मंत्री चर्चेला उत्तर देताना सरळ त्याच्या निलंबनाची व खातेनिहाय चौकशीची घोषणा करतात. त्या संभाव्य भीतीमुळे कुठलाही प्रशासक असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करतो.

 चंद्रकांतने हे आव्हान यशस्वीपणे पेलले नसते तर नोकरीच्या प्रारंभीच त्याचे खच्चीकरण झाले असते. हिंदूनी बंद पाळून निषेध केला तरी ते उघड्यावर शेंदूर फासलेल्या मारुतीचं तथाकथित मंदिर होते, म्हणून एका मर्यादेपलीकडे हिंदू समाजाचा रोष गेला नाही. मशीद मात्र भव्य व भरभक्कम होती आणि बाहेरच्या नेत्यांमुळे व धर्मगुरूमुळे वातावरण तापले होते. 'मी दोन्ही धर्मांना समान तराजू लावतो व प्रशासन धर्मनिरपेक्ष व तटस्थ आहे. हे चंद्रकांतने केवळ बोलण्यातून नव्हे तर कृतीतून मुस्लीम समाजावर प्रभावीपणे बिंबविण्यात यश मिळवले. निमित्तमात्र तो डाव्या विचाराचा नगरसेवक ठरला, तरी मनोमन कुठेतरी मुस्लीम समाजमन रस्त्याच्या ऐहिक गरजेच्या निर्णयाप्रत येऊन ठेपले होते. त्याला चंद्रकांतने आवाहन केले, तेव्हा अनुकूल प्रतिसाद मिळाला.

 या प्रश्नाचा एक जटिल पैलू म्हणजे अनधिकृतपणे रस्ते अडवून वा सार्वजनिक ठिकाणी मंदिर, मशिद, पुतळे वा मदरसा यासारख्या धर्मसंस्था उभारण्याची वाढती प्रवृत्ती. साऱ्या समाजाची व प्रशासनातील धार्मिक वृत्तीच्या स्थानिक अधिकाऱ्यांची अशा धर्मस्थळांच्या बांधकामासाठी मूक संमती असल्यामुळे त्यांची उभारणी होते. प्रशासनासाठी ती कायमची डोकेदुखी ठरतात. ती पाडणे वा स्थलांतरित करणे हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असतो. शंभरपैकी नव्याण्णव प्रकरणात ही धार्मिक बांधकामे कायम राहतात. प्रस्तुत प्रकरणासारख्या एखाद्या ठिकाणी ती हटवली जातात. एरव्ही दंगली होतात, तणाव वाढतो.

 सतत तीन टर्म निवडून येणाऱ्या मराठवाड्यातील एका आमदाराला निवडणुकीत जबर आव्हान निर्माण झाले. त्यावर यशस्वीपणे मात करून चवथ्यांदा निवडून येण्याचा त्याने विक्रम केला. त्यासाठी त्याने अभिनव अशी पुतळा स्ट्रेटेजी वापरली. तो स्वतः मराठी. ती मते पक्की होती. विरोधी उमेदवार मागासवर्गीयांत लोकप्रिय होता. त्यावर मात करण्यासाठी त्याने एक अफलातून उपाय शोधला. मतदारसंघात मातंग व दलितांची मते बरीच होती, त्यांना आपलंसं करण्यासाठी त्याने चक्क ठोक भावाने अण्णाभाऊ साठे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाचपन्नास अर्धपुतळे बनवून घेतले आणि प्रत्येक गावात त्यांच्या वस्तीत जाऊन ते पुतळे भेट दिले. पुतळे देताना आश्वासन दिले, 'मी निवडून आल्यावर चौथरा, भोवताली बगीचा व बांधकामासाठी आमदार फंडातून मदत करीन. तोवर तुम्ही कच्चा चौथरा उभारा व पुतळा बसवा.'

 त्याची ही पुतळा 'स्ट्रॅटेजी’ यशस्वी ठरली व तो भरघोस मताने निवडून आला.

 गणेशोत्सव, शिवजयंती, नवरात्र महोत्सव, आंबेडकर जयंती व आता वाढीस लागलेली अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव हे अनेक दिवस चालतात. महसूल व पोलीस प्रशासन वर्षातून किमान चार महिने तरी अशा महोत्सवाच्या बंदोबस्तात गुंतून पडलेले असतात. त्यासाठी समाजाला अप्रत्यक्षपणे फार मोठी किंमत मोजावी लागते.

 वाचकहो, शहरातील तो रस्ता पूर्ण झाल्यावर त्याचा समारंभही स्थानिक आमदारांच्या हस्ते थाटात पार पडलाय; पण सुदैवानं त्या रस्त्याला कुणातरी देशभक्त पुढाऱ्याचे वा गेला बाजार दिवंगत नगराध्यक्ष - नगरसेवकाचे नाव देण्याचे कुणाला सुचले नाही. समारंभानंतर आमदार प्रांजळपणे म्हणाले, 'या रस्त्याला एकच नाव सार्थ राहील', 'सर्वधर्मसमभाव रस्ता किंवा सेक्युलर रोड..! बरोबर ना?' त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला.

चंद्रकांत मात्र त्यांच्या कथनातील सत्यदर्शनानं घायाळ होत होता. त्यांच्याकडे टाळीला प्रतिसाद न देता सुन्नपणे पाहतच राहिला.

वाचकहो, तुमचं काय मत आहे? त्या रोडला तुम्हीही ‘सेक्युलर रोड' म्हणणार ना?