प्रशासननामा/आपत्ती व्यवस्थापन नेतृत्वाची कसोटी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to searchआपत्ती व्यवस्थापन - नेतृत्वाची कसोटी चंद्रकांतचा अवतार पाहण्यासारखा झाला होता. तीन दिवसांची वाढलेली दाढी, चुरगळलेले कपडे, दोन रात्री- तीन दिवस अहोरात्र कलेक्टर कचेरीत थांबून परिस्थितीवर लक्ष ठेवायचे काम असल्यामुळे घरी जाता आले नव्हते! आज मात्र सायंकाळी घरी जाऊन थोडी विश्रांती घेऊ, असे मनाशी ठरवून तो निघाला. तेवढ्यात कलेक्टर भावे साहेबांनी बोलावून सांगितले, “मी आताच सर्किट हाऊसवरून आलोय. तिथे केंद्रीय नियोजन मंत्र्यांनी बैठक घेऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याने वेढलेल्या गावांची ते उद्याच सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान हेलिकॉप्टरमधून हवाई पाहणी करणार आहेत. त्यावेळी पुरानं वेढलेल्या गावांत अन्नाची पाकिटे टाकायची आहेत. ती तयार करायचे काम ती तुला देतोय. सुमारे दहा हजार अन्नाची पाकिटे करायची आहेत. आज रात्री तुझ्या दिमतीला तहसीलदार व त्यांचा पूर्ण कर्मचारी वर्ग देतो. गाड्या आहेतच; कॅशबॉक्समध्ये पैसा आहे. आय अॅम कॉन्फिडंट, यू कॅन डू इट!

 प्रोबेशनवर असणा-या चंद्रकांतला नाही म्हणणे शक्यच नाही.

 गेले पाच दिवस सतत पाऊस पडत होता. पन्नास इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. गोदावरी व तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहत होत्या. सीमेवरच्या आंध्र प्रदेशातील पोचमपाड धरणाच्या बॅकवॉटरने परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. शंभरेक गावे पाण्याने वेढली गेली होती. त्यांचा जगाशी संपर्क तुटला होता. तीन दिवसांपूर्वी कार्यालयात सकाळी आलेल्या चंद्रकांतला दर तासाला पूररेषेची पातळी तपासून त्याची माहिती मुंबईतील मंत्रालयाला आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयाला कळवावी लागत होती. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे संदेश घेणे आणि ते कलेक्टरांना पोचते करून, त्यांचे आदेश पुन्हा तहसीलदारांना देणे ही कामे करायला एकटे निवासी उपजिल्हधिकारी पुरे पडत नव्हते. त्यांच्या मदतीला प्रशिक्षणार्थी चंद्रकांत दिला होता. तोही पुराची आपत्ती म्हणजे आव्हान समजून मनापासून काम करत होता. एवढा, की रात्री आपणहून कार्यालयात थांबत होता. कारण पावसाला खंड नव्हता.

 वयोवृद्ध असलेले निवासी उपजिल्हाधिकारी अतिश्रमानं आजारी पडले होते. त्यामुळे चंद्रकातंचं काम वाढलं होतं. आता सायंकाळी सात वाजता कलेक्टरांनी दहा हजार अन्नाची पाकिटे रात्रीतून तयार करून सकाळी सात वाजता विमानतळावर पोचती करायची अवघड कामगिरी सोपविली होती.

 चंद्रकातनं शांतपणे मनोमन काम कसं पार पाडायचं याचा दहा मिनिटं विचार केला. तहसील कार्यालय हे कलेक्टर ऑफिसच्या परिसरातच होते. सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना बोलावून कामाची कल्पना देत म्हणाले, “आता आपल्यापैकी कुणालाही घरी जाता येणार नाही. महसूल खात्याला जी नानाविध कामे करावी लागतात त्यात आज एका नव्या कामाची भर पडणार आहे.खानसामा, महाराजाची. आपणा सर्वांनी मिळून हा रोल अदा करायचा आहे."

 आणि विद्युतवेगानं निर्णय घेत त्यानं कामं भराभर वाटून दिली. तलाठी व जुन्या शहरामध्ये राहणा-या पेशकरांना (अव्वल कारकून) जीप देऊन मिळतील तेवढे स्वयंपाक करणारे आचारी- महाराज घेऊन येण्यासाठी पाठवलं. दुस-या ग्रुपला लाकडे, मोठमोठी चुल्हाणं व भांडी आणण्याची सूचना दिली. तहसीलदार व महिला कर्मचा-यांशी मसलत करून, आचारी येताच कोणते अन्नपदार्थ तयार करायचे हे निश्चित केले. पुरी-भाजी, व्हेज बिर्याणी सदृश खमंग भात अर्थात चित्रान्न हे पदार्थ लवकर होतील असं वाटल्यामुळे तो मेनू ठरविला.

 वेळ वेगानं निघून जात होता. वरीलप्रमाणे कामाला सुरुवात झाली तेव्हा नऊ वाजले होते. सहा-सात चुल्हाणे पेटली होती. आचारी पुरी-भाजी करत होते व त्यांना तहसीलचे कर्मचारी मदत करत होते.

 पण तयार होणाच्या पदार्थांची गती पाहता दहा हजार पाकिटे तयार होणे शक्य नाही हे काही वेळाने लक्षात आले. तेव्हा चंद्रकांतनं तिथं सहज काय चाललंय हे पाहण्यासाठी आलेल्या नगराध्यक्ष लालाणींना मदतीची विनंती केली आणि शहरातील सर्व बेक-यांमधून चार गाड्या पाठवून ब्रेड, बिस्किटे, टोस्ट व खारी जमा करावीत असं ठरवलं. पण बहुतेक सर्व बेकऱ्या बंद होत्या. तेव्हा बेकरीवाल्यांच्या घरी जायचं व त्यांना उठवून, त्यांच्या दुकानात जाऊन त्यांच्याजवळील सर्व पदार्थ विकत घ्यायचे, असा द्राविडी प्राणायम सुरू झाला.

 चंद्रकांतने आणखी एक शक्कल लढवली. मुरमुरे, गूळ, शेंगदाणे, फुटाणे, बत्तासे, लाह्या एकत्र तयार करून त्याची किलो किलोची पाकिटे तयार करायची सूचना दिली. त्यासाठी पुन्हा या वस्तूंच्या ठोक व्यापा-यांना घरून उठवून आणणे आणि ते पदार्थ मिळवणे सुरू झाले.

 रात्र चढत होती. चंद्रकांत व तहसीलदार आवारात खुच्र्या टाकून कामावर देखरेख करत होते. लालाणीही त्यांना सामील झाला व आपल्या विनोदी ढंगात तहसीलदारांना म्हणाला, “आजतक तहसीलदारोंको बहुत सारे काम करते हुवे मैने देखा है. आज तुम लोगोंको पपडी बेलनेको लगानेवाला पहला डिप्टी कलेक्टर देखा। कल मैं मिनिस्टर साबको ये जरूर बताऊँगा!"

 तहसीलदार व सर्व कर्मचारी लालाणीच्या या विधानाशी शंभर टक्के सहमत होते. ते सर्व दिलखुलास हसले. एक नवा जोम त्यांच्यात संचारला होता.

 पहाटे सहा वाजता पोत्यांमध्ये अन्नाची पाकिटे भरून दोनशे पोती ट्रकमध्ये भरून विमानतळाकडे रवाना केली तेव्हा चंद्रकांतने सुटकेचा नि:श्वास टाकला.

 विमानतळावर केंद्रीय नियोजन मंत्री बरोबर सात वाजता आले. त्यांच्यासोबत कलेक्टर भावे व काही आमदार, खासदार होते. ते हेलिकॉप्टरनं पाण्याने वेढलेल्या गावाची पाहणी करून अन्नाची पाकिटं टाकणार होते. कलेक्टरांनी चंद्रकांतला हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची सूचना दिली. नव्याने, अवघ्या पाचसहा महिन्यांपूर्वी, रुजू झालेल्या चंद्रकांतला अनपेक्षितपणे मंत्र्यांसमवेत हवाई सफर घडणार होती.पण ऐनवेळी जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विमानतळावर आले. त्यांना हेलिकॉप्टरमध्ये घेणे भाग होते. त्यामुळे चंद्रकांतला त्यांच्यासाठी जागा खाली करून द्यावी लागली. तो चांगलाच हिरमुसला. त्याची समजूत काढताना वयोवृद्ध समंजस निवासी उपजिल्हाधिकारी म्हणाले,

 “चंद्रकांत, ही तर तुझ्या करिअरची सुरुवात आहे. प्रशासनात कलेक्टरांना, आय.ए.एस.वाल्यांना महत्त्व असतं. त्यांच्यानंतर आपण असतो. हे सूत्र लक्षात ठेव, की कलेक्टरांना मान मिळाला की त्यातच आपला मान आहे असं समजायचं?"

 केंद्रीय मंत्र्यांची हवाई पाहणी चांगल्यारीतीने पार पडली होती. पाण्यानं वेढलेल्या गावांना अन्नाची पाकिटे संजीवनीप्रमाणे वाटली होती. पूर ओसरल्यानंतर अशाच एका गावचा सरपंच म्हणाला होता. "तुम्ही लोकांनी अन्नाची पाकिटं टाकली, ते लई बेस केलं. लहान मुलं, बायको, झालंच तर म्हातारी-कोतारी भुकेली होती. कारण गावातलं रॉकेल संपलं होतं. व सरपण ओलं म्हणून पेटत नव्हतं. तुम्ही सायब लोकांनी अन्नदान करून लई पुण्याचे काम केलं बगा."

 आंध्र प्रदेशातील ताज्या पुराने झालेल्या हाहाकाराच्या संदर्भात चंद्रकांत हा पंधरा वर्षांपूर्वीचा किस्सा सांगून इनसायडरला म्हणाला, “मित्रा, या सरपंचाची ती प्रशस्ती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. कारण करिअरच्या सुरुवातीलाच प्रचंड पुराच्या आपत्तीला तोंड द्यावं लागलं होतं. रात्रीतून साऱ्या कर्मचा-यांना कामाला लावून दहा हजार अन्नाची पाकिटं तयार करणं सोपं काम नव्हतं. तिथे मी कसोटीला खरा उतरलो. अंगभूत गुणांनी म्हणा, की करुणाबुद्धीनं, चाकोरीबाहेरचे निर्णय घेऊन काम करता आलं हे माझे नशीब व भाग्य! अन्न पाकिटं कमी पडली तेव्हा मुरमुरे, गूळ, शेंगदाणे वा चणेफुटाणे, बत्तासे देणं हे मला सुचलं हे महत्त्वाचं; कारण वेळेची मर्यादा व केंद्रीय मंत्र्यापुढे प्रशासनाची तत्परता जाणवणं आणि त्याहीपेक्षा पूरग्रस्त जनतेला खराखुरा दिलासा मिळणं हे महत्त्वाचं काम माझ्या हातून झालं. आदर्श आपत्तीव्यवस्थापन दुसरं काय असतं? प्रसंगाला खरं उतरणे व काम करणं!"

 त्याच पुराच्या काळातला दुसरा प्रसंग त्यानं कथन केला.

 पूर ओसरल्यानंतर प्रशासनापुढे प्रचंड कामे होती. जिल्ह्यात दीडशेच्या वर गावात पुराचं पाणी शिरून घरांची खूप हानी झाली होती. त्यांना तातडीची मदत - खावटी - म्हणून वाटायचं काम आता सुरू करायचं होतं आणि परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर गावाचे पुनर्वसन व घरांची दुरुस्ती व बांधणी करायची होती.

 खावटी मदत म्हणजे अनुदान. घरात पुराचं व पावसाचे पाणी शिरलं तर भांडीकुंडी व धान्य-कपडे वाहून नष्ट होतात व घरात राहणं अशक्य होतं. परिणामी त्यांचा रोजगार बुडतो. म्हणून पंधरा दिवस माणशी-प्रतिदिनाच्या हिशोबाने काही रोख रक्कम दिली जाते. तिला खावटी म्हणतात.

 ते खावटी वाटपाचे काम करायचं होतं. त्याची प्रक्रिया बरीच किचकट होती. प्रथम गावात जाऊन घरांची पाहणी करणं, किती घरात पुराचं पाणी जाऊन नुकसान झालं याचा पंचनामा करणं, घरातील माणसांची संख्या मोजणे व परत तहसीलला येऊन अहवाल तयार करणे. रक्कम मंजूर करून ती गावी जाऊन वाटणे. या बाबीसाठी कितीही तातडीने काम करायचं म्हटलं तरीही आठ-दहा दिवस किमान लागतात. त्यात सर्वेक्षणात काही गडबड झाली वा तक्रार आली, की तिच्या चौकशीत व निर्णय घेण्यात पुन्हा आणखी आठदहा दिवस सहज जातात.

 जिल्ह्यात पुरामुळे एवढी प्रचंड वाताहत झाली होती की पूरग्रस्त कुटुंबांना तातडीनं खावटी वाटण्याची नितांत गरज होती.

 एका तालुक्याची जबाबदारी चंद्रकांतवर कलेक्टरांनी सोपवली होती. त्या तालुक्यात सुमारे बत्तीस गावे पूरग्रस्त झाली होती. सुमारे पाच हजार घरांची पाहणी करून त्यांना खावटीची मदत वाटायची होती व तीही पाच दिवसात. कारण सहाव्या दिवशी जिल्हा मुख्यालयी पुनर्वसन मंत्री त्यांचा आढावा घेणार होते.

 चंद्रकांतला ज्या तालुक्याचे काम दिले होते. तिथे अजूनही अनेक गावात रस्ते-पूल वाहून गेल्यामुळे जीप गाडीने जाणे शक्य नव्हते. तरीही पाच दिवसात बत्तीस गावांना मदत वाटप निर्दोष रीतीनं करायचं त्यांना मनोमन ठरवलं.

 या बत्तीस गावांसाठी त्यानं तीन-तीन कर्मचा-यांच्या अकरा तुकड्या केल्या. त्यात एक तलाठी, एक ग्रामसेवक व तहसीलचा अव्वल कारकून किंवा नायब तहसीलदार असे तिघे होते. त्यांनी रोज एकेका गावात जाऊन काम करायचं होतं.

 “पण सर, मदत वाटपाची प्रोसीजर पाहता तीन दिवसात फारतर सर्वेक्षण होईल व पंचनामा करता येईल. पुन्हा तहसीलला येऊन याद्या तयार करणं, तहसीलदारांची मंजुरी घेणं व पैसे वाटप करणं या कामाला आणखी सहा ते आठ दिवस, तातडीने काम केली तरी लागू शकतात. एका मध्यमवयीन नायब तहसीलदारांनी अडचणी सांगत शंका उपस्थित केली.

 "असे असताना केवळ तीन दिवसात हे काम पूर्ण होणं कसं शक्य आहे?"

 साऱ्या कर्मचा-यांनी माना डोलवित त्याला दुजोरा दिला होता. किंचित हसून चंद्रकांत म्हणाला, “मला मदतवाटपाची ही प्रक्रिया माहीत आहे व त्यासाठी तीन दिवसांचा वेळ अपुरा आहे, हेही मान्य आहे, पण एक कोटेशन सांगतो, जे भारतीय आयुर्विम्याच्या सर्व कार्यालयात पाहायला मिळतं. 'साधारण काम तो सभी करते है, काम असाधारण है इसिलिए करने योग्य है' त्यानुसार आपण काम करायचे आहे. ती तुम्हाला मार्ग व उपाय सांगतो. मात्र तुमच्याकडून मला एक वचन हवंय!"

 सारे कर्मचारी कान टवकारून ऐकत होते!

 “या अभूतपूर्व पुरामुळे अनेक गावात लोकांना त्याचा जबर फटका बसला आहे. हे मी तुम्हाला पुन्हा सांगायची गरज नाही. आणि त्यांना तातडीने मदत केली नाही तर त्यांचे हाल होतील. काहींची उपासमार होईल. अशा वेळी आपलं कर्तव्य आहे, त्यांना जलद गतीनं मदत करणे व त्यात कसलाही गैरप्रकार व भ्रष्टाचार न करणं. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, म्हणून एक नवा मार्ग आपण चोखाळायचा आहे, पण त्यासाठी तुम्ही मला वचन द्या की, एकही टीम कितीही दडपण आलं तरी खोटा पंचनामा करणार नाही. मदत जादा मिळावी म्हणून घरातील माणसांची संख्या वाढवून देणार नाही आणि वाटपात एका  पैसाही अपहार होणार नाही, ही वेळ प्रेताच्या टाळूवरील लोणी खायची नाही. आपण सारी माणसं आहोत व हे काम योग्य तव्हेने केलं तर लोकांचा लाखमोलाचा दुवा मिळणार आहे."

 चंद्रकांतच्या त्या अनोख्या, स्पष्ट पण भावनात्मक आवाहनाने भारावून जाऊन त्यांनी वचन दिले.

 “थँक्यू ऑल ऑफ यू! माझी हीच अपेक्षा होती. आता मी दोन दिवसात मदत वाटपाचा चाकोरीबाहेरचा मार्ग सांगतो. माझ्यावर नियंत्रक अधिकारी म्हणून फार मोठी जबाबदारी आहे. रिस्क आहे, पण ती तुमच्या विश्वासावर घेत आहे."

 क्षणभर थांबून चंद्रकांतने आपला बेत विशद केला.

 “मी तुम्हा सर्वांना अंदाजाने किती मदत करावी लागेल याचा हिशोब लावून रोख रक्कम देतो. सोबत अॅक्वेन्टन्स रोल देतो. तुम्ही तीन दिवसात तीन गावी जा. बसंन, पायी वा बैलगाडीनं. सर्व घरांची पाहणी पाचपंचवीस जणांच्या सोबत करा. खराखुरा पंचनामा करा आणि पूरग्रस्तांची यादी तयार करून ती सर्व गावक-यांसमोर वाचून दाखवा. नेहमी पंचनाम्यावर चारपाच जणांची सही असते यावेळी उपस्थित जे पन्नाससाठ गावकरी असतील त्या सर्व गावक-यांच्या सह्या घ्या. प्रत्येक कुटुंबाचे नाव, घरातील माणसांची संख्या व त्याला देय असलेली रोख मदत जाहीर करा. त्यांचा काही आक्षेप नसेल तर सर्वांसमक्ष तिचे वाटप करा.

 “एखादं घर पूरग्रस्त झालेलं नाही वा घरात माणसांची संख्या फुगवून सांगितली आहे असा आक्षेप वा तक्रार, पंचनाम्याचे जाहीर वाचन होताना आली तर तिची पुन्हा शहानिशा करा. खात्री करून त्याबाबत निर्णय घ्या. घरनिहाय किती रोख मदत वाटप करायची हे ठरवा आणि त्याचं, त्याच दिवशी रात्री रोख मदतीचं-खावटीचे वाटप करा. तुम्ही परतल्यावर कागदपत्रांवर सह्या करून ही रिस्क मी तुमच्या भरवशावर घ्यायला तयार आहे. शेवटी पंचनामा तुमचाच असणार आहे आणि काही गैरप्रकार झाला तर पहिली जबाबदारी तुमचीच असणार आहे. पण तुमच्या बरोबरीनं मलाही चौकशीला सामोरं जावं लागेल. पण पूरग्रस्तांची दयनीय अवस्था व मदतीची तातडी पाहता मी माझी करिअर पणाला लावायला तयार आहे."

 एकाच महिन्यापूर्वी आलेल्या चंद्रकांतचं धाडस व तळमळ पाहून सर्व कर्मचारी थक्क झाले होते.

 बैठकीच्या शेवटी एकमुखानं योग्य रीतीनं सर्वेक्षण करून मदत वाटप केली जाईल असे आश्वासन सर्वांनी चंद्रकांतला दिलं.  तीन दिवसात त्या अकरा टीमनी बत्तीस गावात तातडीने रोख मदतीचं वाटप केलं. चवथ्या दिवशी तहसील कार्यालयात येऊन बाकीची कागदी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली आणि सहाव्या दिवशी जिल्हा मुख्यालयी बैठकीच्या वेळी केवळ चंद्रकांतनं त्याच्या तालुक्यात वाटपाचे काम पूर्ण केलं होतं असं दिसून आलं.

 मंत्र्यांनी व कलेक्टर भावेंनी पण त्याला हे कसं केलं याबाबत विचारलं, तेव्हा चंद्रकांत शांतपणे एवढेच म्हणाला,

 “सर, मी व्यवस्थित नियोजन करून काम केलं एवढंच. पण खात्रीनं हे जरूर सांगेन की, एकाही गावात एकाही घराबाबत चुकीचे सर्वेक्षण झालेलं नाही. आपण कुणालाही पाठवून खात्री करून घेऊ शकता."

 त्या रात्री कलेक्टरांनी चंद्रकांतला त्यांच्या बंगल्यावर बोलावून पुन्हा एकट्यानं विचारलं, तेव्हा त्यानं सारं काही, कसलाही आडपडदा न ठेवता कथन केलं! कलेक्टरांनी त्याची पाठ थोपटून म्हणाले, “वेल डन! आपत्ती व्यवस्थापन दुसरं . काय असतं? असं इनोव्हेटिव्ह काम करणं."

 चंद्रकांतची ही हकीकत ऐकल्यावर इनसायडर त्याला म्हणाला,

 "मीही तुला सॅल्यूट करतो. किल्लारी व उमरग्याच्या भूकंपानंतर राज्य शासनाने जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनवला आहे, तो कागदावर एकदम आदर्श व नमुनेदार आहे. पण ती राबवणारे कल्पक, धाडसी, सामान्य नागरिकांची कणव असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी हवेत, तरच अशा आपत्ती काळात जनतेला गरजेच्या वेळी तातडीची मदत व दिलासा मिळू शकतो. पण अनेक गावात त्याचा बोजवारा उडाला. मदतीच्या नियमांची क्लिष्टता, रिस्क घेण्याची तयारी न दर्शविणं, रिस्क घेणा-या अधिका-यांना पाठिंबा न देणं आणि कर्मचा-यांना अशा वेळी निष्पक्ष बनविण्यासाठी आणि गैरप्रकार आणि अपहार टाळण्यासाठी मोटिव्हेट न करणं, यामुळे प्रशासनाची नेहमी नाचक्की होत जाते. त्या पाश्र्वभूमीवर तुझं उदाहरण नमुनेदार केस स्टडी होऊ शकतं?”

 त्याचा निरोप घेताना इनसायडरनं शेवटी एवढंच म्हटलं, “आपत्तीव्यवस्थापन हे नेतृत्वगुणाची कसोटी पाहतं. त्यावर चोख उतरायचं असेल तर मनात जनतेबद्दल करुणा व मदत करण्याची वृत्ती आणि चाकोरीबाहेरचे निर्णय घेण्याची व अमंलबजावणीमधील वेळकाढूपणा कमी करण्याची कल्पकता दाखवावी लागते. त्याविना आपत्तीव्यवस्थापन हे केवळ कागदावरच राहतं!"