पोशिंद्याची लोकशाही/मेंढरे नव्हे, माणसे म्हणून जगा

विकिस्रोत कडून



मेंढरे नव्हे, माणसे म्हणून जगा


 फार दिवसांनी मला बरं वाटलं. कारण, माझा मूळचा पेशा शिक्षकाचा आहे आणि मी हाडाचा शिक्षक आहे. त्या शिक्षकाला या शिबिरात आनंद मिळाला. शेतकरी संघटनेचे प्रणेते, शेतकऱ्यांचे पंचप्राण, आंदोलनाचे नेते वगैरे वगैरे विशेषणे चिकटली, की मी संकोचून जातो. आयुष्याची सुरुवात मी शिक्षक म्हणून केली आणि शेतकरी संघटनेचे काम सुरू केले, तेव्हा, "मधला एक पंधरा वर्षांचा काळ विसरून, मी पुन्हा शिक्षक झालो," असे मी आग्रहाने मांडतो.
 पहिल्यांदा मी शिक्षक झालो, तेव्हा पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकवायला गेलो. उच्च पदवी मिळालेली, पहिला वर्ग मिळालेला, सुवर्णपदक मिळालेले आणि मोठ्या आत्मविश्वासाने महाविद्यालयात शिक्षक म्हणून उभा राहिलो, तेव्हा 'हेच ते बरं का, गेल्या वर्षीचे गोल्ड मेडलिस्ट!' असे अभिमानाने पाहणारे विद्यार्थी सभोवार होते. त्या काळी माझी अशी ख्याती होती, की आमच्या कॉलेजामधले विद्यार्थीतर 'मी आल्यानंतर वर्गात कुणी यायचे नाही,' असा मी आग्रह धरीत असल्यामुळे वर्गात वेळेवर आत येऊन बसणारच; पण दुसऱ्या कॉलेजातले विद्यार्थी, अर्थशास्त्राचा अभ्यास न करणारेसुद्धा, इंग्रजी ऐकण्याकरिता म्हणून आधीच येऊन बसत. इतक्या तयारीने मी पहिल्यांदा शिक्षक झालो आणि समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आपले जे काही ज्ञान आहे, ते जास्तीत फुलोऱ्याने पसरवून, जास्तीत जास्त चांगल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला.
 दोनतीन महिन्यांमध्ये माझ्या असे लक्षात आले, "ज्या पिलांना उडायला शिकवायचा मी प्रयत्न करतो आहे, त्यांचे पंख आधीच कुणीतरी छाटलेले आहेत आणि कितीही, कोणत्याही भाषेत शिकवायचा प्रयत्न केला, तरी मी जे काही अर्थशास्त्र त्यांना शिकवायचा प्रयत्न करतो आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या मनातला विचार वेगळा आहे. आज कसेतरी करून अभ्यासक्रम संपवावा, पेपरात पास व्हावे, पदवीचा शिक्का घ्यावा, नोकरी लागावी म्हणजे मोकळे झालो, अशा तयारीने ते आलेले..." आणि त्यामुळे, सर्वोच्च पदव्या, सर्वोच्च पात्रता असूनही माझ्या पहिल्या शिक्षकाच्या व्यवसायामध्ये मी संपूर्णतः अपयशी आणि अपात्र ठरलो.
 मग मध्ये पंधरा वर्षे गेली. आयएएसमध्ये गेलो, संयुक्त राष्ट्रसंघात गेलो. परत आलो, शेतकरी बनलो.
 आणि शेतकरी बनल्यानंतर शेतकीच्या अनुभवातून लक्षात यायला लागले, की अरे, हे पूर्वी आपल्याला माहीत नव्हते. हे काहीतरी वेगळे आहे. शेतकरी म्हणून जन्मभर जरी राबलो, तरी त्यातून वर यायची काही शक्यता नाही. त्यातील मर्म लक्षात यायला लागले; मग वाटायला लागले, की हे लोकांना सांगायला पाहिजे. म्हणजे, एका तऱ्हेने पुन्हा एकदा मी शिक्षक बनायला लागलो आणि या वेळी जेव्हा शिक्षक बनलो, तेव्हा पहिल्या वेळी शिक्षक बनण्याच्या नेमकी उलटी परिस्थिती होती. म्हणजे, या क्षेत्रात माझ्याइतका अपात्र, ना-लायक शिक्षक शोधून मिळणे अशक्य. मी जन्माने शेतकरी नाही, शेतकीचा माझा अनुभव फक्त चारपाच वर्षांचाच; मी शेतकरी जातीचा नाही, एवढेच नव्हे तर, ज्या जातीच्या लोकांनी शेतकऱ्यांना हजारो वर्षे पिळले आणि छळले त्या जातीचा आणि तरीदेखील, आपल्याला काही नवीन समजले आहे आणि ते शेतकऱ्यांपुढे मांडावे म्हणून मी आलो. ज्या भाषेत मांडायचे, त्या भाषेचा मी पंधरा वर्षे उच्चार केला नव्हता; परदेशी भाषा बोलत होतो; पण शेतकऱ्यांसमोर मी उभा राहिल्यानंतर तार अशी जुळली, की सर्व तऱ्हांनी अपात्र असूनसुद्धा मी जे सांगितले, ते त्या 'विद्यार्थ्यां'ना समजले. समजले म्हणजे नुसते परीक्षेत पास होण्याइतपतच नाही, तर पोलिसांची लाठी, पोलिसांची गोळी खाण्याची तयारी दाखवून, त्यांनी आपल्याला विषय समजल्याची पावती दिली. माझ्या दुसऱ्या शिक्षकीला इतके प्रचंड यश मिळाले.
 आज पुन्हा फार दिवसांनी शिक्षक व्हायची संधी मिळाली. पाचसहा वर्षे आंबेठाणच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये अभ्यासक्रमात ज्ञानाचा सिद्धांत वगैरेसारखे तत्त्वज्ञानाचे विषय शिकवीत असे. दिवसातून फार तर चाळीसपंचेचाळीस मिनिटे बोलायची संधी मिळे. त्यापेक्षा जास्त वेळ बोलले, तर विद्यार्थ्यांच्या डोक्याला मुंग्या येतात; पंचेचाळीस मिनिटे म्हणजे फार झाले. त्यात प्राध्यापक मंडळींना सवयच अशी लागते, की कोणत्याही विषयावर बोलायचे झाले तर, पंचेचाळीस मिनिटे बोलायचे. महिनोन् महिने बोलले तरी त्यावर आम्हा प्राध्यापकांना पंचेचाळीस मिनिटांच्यावर बोलता येत नाही, हे जितके खरे तितकेच जो विषय पाच मिनिटांत सहज सांगण्यासारखा आहे, त्याही विषयाला पंचेचाळीस मिनिटे लावायचीच, हीही आमची सवय!
 या शिबिरात आपण तीन दिवस बोललो; माझी अपेक्षा अशी होती, की समारोपाच्या समारंभाला तुम्ही म्हणाल, की आता पुरे, तीन दिवस पुष्कळ ऐकले; पण ती चुकली. मी या शिबिरात तीन दिवस बोललो, एवढेच नव्हे तर, जो विषय बोललो, तो विषय पदव्युत्तर वर्षांच्या वर्गातच शिकवला जातो; त्याआधी नाही. आपल्या शिबिरामध्ये या दीडशेदोनशे विद्यार्थ्यांपैकी बी. ए. एम. ए. झालेले फारसे कोणी असतील असे वाटत नाही; पण मी बोलत असताना हे विद्यार्थी एका कानातून ऐकून, दुसऱ्या कानातून सोडून देत आहेत असे कधी वाटले नाही. उलट, आश्चर्यजनक अनुभव आले. शिबिर दोनच दिवसांत आटोपायचे असे ठरले होते; पण तिसरा दिवस लागेल असे म्हटल्यावर सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. इथल्या व्यवस्थापिका भगिनींनासुद्धा मोठे आश्चर्य वाटले. कारण, आजवरचा त्यांचा अनुभव असा आहे, की शिबिराचे उद्घाटन झाले, की लोक इथून जायचाच विषय काढतात; पण शिबिराचा कालावधी वाढला आणि प्रशिक्षणार्थीना त्याचा आनंद झाला, हे पाहून त्यासुद्धा कुतूहलाने या शिबिरात आवर्जून बसू लागल्या.
 आपण ठरवले, की प्रशिक्षण शिबिर घ्यायचे. मुळात, निवडणुकीच्या जाहीरनाम्याकरिता प्रशिक्षण शिबिर ही हिंदुस्थानात मोठी अद्भुतच गोष्ट आहे. जाहीरनामा म्हणजे नुसती यादी बनवायची - कुणाला काय पाहिजे आणि कुणाकुणाला काय काय पाहिजे याची - असे आजकाल स्वरूप झाले आहे. मग त्याला प्रशिक्षण कशाला हवे? त्यामुळे जाहीरनाम्यावर शिबिर आणि तेही तीन दिवसांचे ही मोठी अद्भुत गोष्ट.
 जाहीरनाम्यावर बोलायला लागल्यानंतर जी काही मांडणी झाली, तिची सुरुवात आम्ही अक्षरशः विश्वाच्या उत्पत्तीपासून केली आणि गंमत म्हणजे शेतकरी संघटनेचा जो एककलमी विषय आहे - शेतीमालाला भाव - तेवढा सोडून या शिबिरात आम्ही जगातल्या सर्व विषयांवर बोललो. सबंध शिबिरात कांद्याचा विषय निघाला नाही आणि साहजिकच आहे, कारण शिबिरात आपण स्वतंत्र भारत पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी बोलत होतो.
 शिबिराच्या संयोजकांनी एक मोठी चांगली गोष्ट केली. आपण प्रशिक्षण शिबिर घ्यायचे ठरवले. शिबिर आंबेठाणला भरलं, तर त्याला एक स्वतंत्र वातावरण असते. दुसरीकडे जर कुठे एखाद्या मंगल कार्यालयात, एखाद्या शहराच्या ठिकाणी, व्यवस्था चांगली व्हावी या उद्देशाने भरवले असते, तरी या शिबिराला जितकी रंगत चढली, तितकी चढली असती किंवा नाही, याबद्दल मला शंका आहे. अपघाताने असो की योजनेने असो; पण महात्मा गांधींच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आश्रमात हे शिबिर भरविण्यात संयोजकांनी समयोचितपणा दाखवला आहे. कारण, या जाहीरनाम्याच्या सुरुवातीलाच म्हटले आहे, की स्वातंत्र्यानंतर गांधीवाद बाजूला टाकून, समाजवादाच्या नावाखाली देशाला ओढले गेले आणि साऱ्या देशाचे वाटोळं झाले; आता या नुकसानीतून देशाला वर कसे काढायचे आणि देशाला पुढे विकासाकडे कसे न्यायचे, हे ठरविण्याचा हा कार्यक्रम आहे. १९८० मध्ये एका पत्रकार बाईंनी माझी मुलाखत घेतली होती, त्या वेळी त्यांनी माझे वर्णन 'Gandhi in dennims' असे केले होते. याच्यापेक्षा मोठा सन्मान काही होऊ शकत नाही, असे मला त्या वेळी वाटले. इतिहासातील एक महत्त्वाचा नियम आहे. इतिहासामध्ये एकच काम पुढे चालविणारे गुरू म्हणा, शिष्य म्हणा किंवा पिढ्यांच्या अंतराने जन्मणारी दोन वेगवेगळी माणसे एकच वेशभूषा घालून कधी येत नाहीत. शिवाजीने जिरेटोप आणि चिलखत घालून, घोड्यावर बसून, जे काम केले ते करणारा शिवाजीचा जो वारस येईल, तो घोड्यावर बसणारा आणि जिरेटोप-चिलखत घालणारा असण्याची शक्यता काहीही नाही. तसेच, एक पंचा नेसून, बापूंनी देशासाठी जे काम सुरू केले, ते काम पुढे चालविणारा मनुष्य पंचा नेसणारा असण्याची शक्यता फार कमी आहे. मी प्रामाणिकपणे मानतो, की गांधीजी ते असताना ते जे काही बोलले, त्याच्याशी मी सांगतो आहे ते सुसंगत आहे किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे; पण गांधीजी आज जिवंत असते तर ते जी भाषा बोलले असते, ते मी बोलतो आहे. माझ्या या विश्वासावर, स्व. रविशंकर महाराज या निदान एका गांधीवाद्याने शिक्कामोर्तब केले आहे. आमच्या दोघांच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. गांधींनी कोणताही मार्ग ठरविताना, दिशा ठरविताना, कार्यक्रम ठरविताना, विचार पुढे मांडताना जग काय म्हणते आहे, याचा कधी विचार केला नाही. ते उत्तरदायित्व मानीत स्वतःच स्वतःशीच. ते अध्यात्मवादी होते, धार्मिक होते, आत्म्यावर विश्वास ठेवत होते; म्हणून ते आतल्या आवाजाबद्दल बोलत होते. मी धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही आणि त्यामुळे मी आतल्या आवाजाविषयी बोलत नाही; पण माझी निष्ठा ही फक्त माझ्या स्वतःशी आहे.
 गेले तीन दिवस आपण ज्या विचारांची मांडणी करीत आहोत, तो मोठा कठीण विचार आहे. चांदवडच्या महिला अधिवेशनात जमलेल्या लाख लाख स्त्रियांनी जाहीर केले, की 'आम्ही माणूस आहोत,' हे म्हणण्याची हिंमत स्त्रियांनी केली; पण मला चिंता ही आहे, की मिशा वाढविणाऱ्या पुरुषांमध्ये माणसे किती आणि मेंढरे किती याची गणना करू गेलो, तर माणसे मिळणे कठीण आहे. 'आम्हाला कोणी मेंढपाळ मिळतो का?' याच्या शोधात ही सगळी माणसे हिंडत आहेत. मेंढपाळसुद्धा मेंढरे गोळा करायला येत नाहीत; पण 'आम्हाला तुमच्या कळपात घ्या हो,' म्हणून सगळी माणसे धावत सुटलेली आहेत. अशी सगळी देशभर अवस्था असताना, मी तीन दिवस लावून निवडणुकीचा जाहीरनामा म्हणजे एका कागदावर लिहून काढलेली 'आमच्याकडून मिळेल'ची यादी; ती मतदारांना दाखवून, मते मिळवायची अशी आजची पद्धत आणि आमचा जाहीरनामा अठ्ठेचाळीस पानांचा. मलाही समजते, की या अठ्ठेचाळीस पानांतील 'अर्थज्ञान' त्या मतदारापर्यंत पोहोचणार नाही, त्याला समजणार नाही. 'एकच प्याला'मधील तळीराम जसा 'दारू पी' असे सांगणाऱ्या वैदूची निवड करतो, तसे आपले मतदार 'दारू पी' सांगणाऱ्या उमेदवाराला निवडणार आहेत आणि 'कडक पथ्य पाळावी लागतील, व्यवस्थित औषधे घ्यावी लागतील,' असे सांगणाऱ्या आपल्या उमेदवाराला बाजूला सारतील हे मलाही माहीत आहे; मग, या यज्ञाचा, या शिबिराचा खटाटोप मी का केला? हा खटाटोप मी तुमच्याकडे पाहून केला. आपले उमेदवार आणि त्यांचे प्रचारक यांच्याकडे साधने नाहीत, पैसे नाहीत, गाड्या नाहीत; पण या निवडणुकीच्या निमित्ताने सगळ्या हिंदुस्थानच्या लोकांना सांगायचे आहे, "अरे, समोर संकट 'आ' वासून उभे आहे." नदीचा एखादा प्रवाह शांतपणे वाहत असतो; पण जरा पुढे गेल्यानंतर एका प्रचंड कड्यावरून धबधब्याच्या रूपाने ते पाणी पडणार असते; पण पुढे कडा आहे याची जाणीव त्या नदीच्या प्रवाहाला नसते. तसाच, सगळा देश पुढे येणाऱ्या संकटाची जाणीव न ठेवता, चाललेला दिसतो. त्यांना त्या संकटाची जाणीव करून देण्याकरिता तुम्ही जायचे आहे, येते सहा आठवडे धावपळ करायची आहे. कोणी उमेदवार तुम्हाला पिठलं-भाकरीसुद्धा देऊ शकणार नाही; घरची भाकरी खाऊन, कदाचित घरचीच सायकल वापरून, चाक पंक्चर झाले, तर आपले आपण दुरुस्त करून फिरायचे आहे. ते काम करताना तुमच्या मनात जाणीव तयार व्हावी, की मी आता जो फिरती आहे तो कोणी उमेदवार निवडून यावा म्हणून नाही, कोणी पंतप्रधान ठरावा म्हणून नाही, कोण्या पक्षाला बहुमत मिळावे म्हणून नाही; तर सगळा इतिहासाचा हेतू पुढे नेण्याकरिता मी फिरतो आहे. एवढी जाणीव जर तुमच्या अंगी तयार झाली, तर तुमच्या अंगात फिरण्याची थोडी ताकद राहील, या उद्देशाने तीन दिवस तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचविला. निवडणुकीच्या जाहीरनाम्याची वेगवेगळी मांडणी मी तुमच्यापुढे केली. त्यातले सगळेच्या सगळे विषय तुम्ही शेवटपर्यंत पोहोचवू शकणार नाही, हे मला माहीत आहे; पण मग या तीन दिवसांच्या प्रशिक्षणातून तुम्ही काय घ्यावे, अशी अपेक्षा आहे?
 या तीन दिवसांत सर्व मिळून मी काय सांगितले? मी जी काही वाक्ये वापरली, अर्थशास्त्र मांडले, ते काही फार महत्त्वाचे नाही. कोणी म्हणाले, रुपयाच्या अवमूल्यनासंबंधी मी केलेले विश्लेषण सर्वांत चांगले झाले. दुसरे कोणी दुसरा कोणता भाग चांगला झाला म्हणाले. मी जे बोलला, त्यातले एकही वाक्य पाठ करून बोलायचा प्रयत्न तुम्ही करू नका. या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात मी गांधींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवला. मी स्वतः तो पाळतो अशी माझी खातरी आहे. कोणी म्हणतात, "तुम्ही नेहमीच जगाच्याविरुद्ध बोलता!" खरे आहे. कारण, "भेकड माणसांना सोबत लागते. आपल्याबरोबर एकदोन माणसेसुद्धा नाहीत, तेव्हा त्यांना भीती वाटायला लागते. त्यांना वाटू लागते, आपले काही चुकले तर नाही ना, आपल्याबरोबर कोणीच कसे येत नाहीत." माझ्या मनाचा विपरीतपणा असा आहे, की एखाद्या विषयावर विचार करताना माझ्या बरोबरीने तोच विचार दुसरा कोणी करतो आहे असे दिसले, की मला शंका वाटू लागते, की आपले काही चुकत तर नाही ना? मी एकटा आहे, तोपर्यंत मी चुकत नाही याची मला खातरी असते, लोक जमायला लगले, की माझ्या मनात शंका तयार होते, की काही तरी गोंधळ असला पाहिजे.
 आजकाल माणसाचे मोजमाप करण्याच्या अनेक फूटपट्ट्या आहेत - पैसा गोळा किती केला? पदे किती मिळवली? खासदारकी मिळवली का? वगैरे, वगैरे. या सर्व फूटपट्ट्यांपेक्षा एक चांगली महत्त्वाची फूटपट्टी आहे. स्वतःचे मूल्यमापन करायचे झाले, तर फक्त एका प्रश्नाचे उत्तर शोधा. या आयुष्यामध्ये स्वतःशी निष्ठा जास्तीत जास्त तुम्ही बाळगली का आणि त्यातला आनंद तुम्ही मिळवला का? आपला जाहीरनामा म्हणजे, 'आजादी अभियान' आहे; स्वातंत्र्याचा कार्यक्रम आहे. त्यात आपण काय म्हणतो? "स्वतंत्र भारत पक्षाचे दर्शन सर्व स्त्रीपुरुष समान आहेत हे मानते; पण त्या समानतेचा पाया 'प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण आहे म्हणून समान आहे,' हा आहे," हे अनन्यसाधारणत्व कायम टिकवून, "आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे काम करीत क्रियाप्रक्रिया करीत," स्वतःबरोबरच सर्व समाजाचे भले करण्याचा त्यांचा त्यांचा मार्ग खुला राहावा हे स्वतंत्र भारत पक्षाचे उद्दिष्ट आहे; पण तुम्ही ते अनन्यसाधारणत्व पुसून, जर का स्वतःला शाडूच्या मूर्तीसारखे एखाद्या ठशामध्ये घालून, चारचौघांसारखे करून टाकीत असला, तर तुम्ही स्वतःच्या जन्माच्या हेतूचाच मुळी पराभव करता आहात. मी जन्माला आलो हा असा आहे, मी असा आहे, याबद्दल मला अभिमान आहे असे तुम्ही म्हटले पाहिजे. एका कळपाचा घटक म्हणून 'हिंदू' असल्याचा अभिमान कसला बाळगता, तुम्ही 'मी आहे याच्याबद्दल मला अभिमान आहे,' असे म्हणा आणि त्या व्यक्तित्वाचा परिपोष करताना फायदा होणार आहे का तोटा होणार आहे याचा विचार न करता, 'माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करणे' या यात्रेपरता दुसरा आनंद नाही आणि ही यात्रा करताना मी जरी खड्यात पडलो, अत्यंत वेदनामय परिस्थितीत पडलो, नरकात पडलो तरीसुद्धा त्याची जी काही वेदना असेल ती माझी स्वतःची आहे आणि ती सहन करण्यातही मला आनंदच वाटतो, असे म्हणण्याची हिंमत ठेवली पाहिजे. एका इंग्रजी विचारवंताचे वाक्य आहे, "This is my private hell and I am proud of it." स्वतःशी निष्ठा बाळगताना संकटांचा वर्षाव झाला, तरी हा जो काही नरक आहे तो माझा स्वतःचा नरक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. दुसऱ्या माणसांच्या मदतीने स्वर्ग मिळाला, तरी तो मला नको; पण माझ्या व्यक्तित्वाचा परिपोष करताना होणाऱ्या दुःखातही जो काही आनंद आहे, त्याच्या पलीकडे दुसरा आनंद असूच शकत नाही. या शिबिरात मी तीन दिवसांत एकच गोष्ट सांगितली, "स्वतःच्या व्यक्तित्वाला जपा."
 हे सांगण्यासाठी मी तुम्हा शेतकऱ्यांसमोरच का आलो? मी काही शेतकरी नाही. कापसाला भाव मिळाला तर मला काही जादा पैसे येणार नाहीत; मी वातीपुरतासुद्धा कापूस पिकवीत नाही. मी ऊस पिकवीत नाही... तुमच्या जातीचा नसताना, तुमच्या व्यवसायातला नसताना मी तुमच्याकडे का आलो? हे काम करताना माझा सगळा संसार पेटला, तरी मी तिकडे लक्ष का दिले नाही? मला स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगायचे असेल तर त्यासाठी उभ्या करावयाच्या स्वातंत्र्यलढ्यात सोबतीने लढायला तयार झालेली माणसे भेटलीच, तर ती फक्त या शेतकरी समाजातच भेटतील, अशा आशेने मी तुमच्याकडे आलो आहे. गेल्या सतरा वर्षांत तुम्हा शेतकऱ्यांना काहीही दिले नाही आणि तरीसुद्धा आजच्या या निवडणुकीच्या वातावरणामध्ये, मोठमोठी राष्ट्रभक्त म्हणणारी मंडळी देशभर वाटेल त्याच्याशी साटेलोटे करून, सत्ता हस्तगत करण्याच्या धावपळीत असताना महाराष्ट्राच्या या माधानसारख्या कोपऱ्यातील गावात तुम्ही दीडदोनशे माणसे तरी 'व्यक्तिस्वातंत्र्या'च्या या विचाराने भारावून जाता आणि शिबिर लांबले, तर जांभई देण्याऐवजी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करता. गेली वीस वर्षे तुम्ही मला 'आयुष्याचे सार्थक झाल्याचे' आनंदाचे क्षण अनेकदा दिले, आज असाच आणखी एक क्षण दिला, याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो.
 निवडणुकीचे निकाल उद्या काय लागतील, ते लागोत? आपण जिंकूच याची खातरी नाही. लोक म्हणतात आपण हरणार असलो, तरी तसे म्हणू नका, आम्ही जिंकणारच आहोत असे म्हणा!
 मी जिंकणार आहे; त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आजची चकमक जिंकेन किंवा नाही याची मला खातरी नाही आणि त्याची मला पर्वाही नाही; पण मी युद्ध जिंकणार आहे याबद्दल माझ्या मनात तीळमात्रही शंका नाही. आज मोठे वाटणारे, आज सिंहासनावर बसणारे, आज हत्तीवर बसणारे उद्या पायउतार झाले, की त्याचे इतिहासात नावसुद्धा राहत नाही. औरंगजेबानंतर दिल्लीच्या तख्यावर किती शहाजादे बादशहा बनून बसले; ते बादशहा होते तेव्हा सगळे त्यांना वाकून वाकून मुजरे करीत असणार, दरबारातले कवी, शायर त्यांच्या पराक्रमाची स्तुतिस्तोत्रे गात असणार. आज इतिहासामध्ये त्या बादशहांपैकी एकाचेही नाव लक्षात येत नाही. म. जोतीबा फुले खांद्यावर घोंगडे टाकून कोणत्या गव्हार्नर जनरलच्या दरबारात गेले असे विचारले, तर त्याचे नाव कोणाला माहीत असत नाही; पण जोतीबांचे नाव मात्र सर्वतोमुखी आहे. इतिहासात कोण जिंकले ते पाहा. आज जी टिनपाट माणसे सत्तेच्या खुर्चीवर बसून, मोठी झालेली दिसतात, त्यांची नावे ज्या वेळी इतिहासाच्या पटलावरून पुसली गेलेली असतील, त्या दिवशी 'व्यक्तिस्वातंत्र्याच्या लढाई'करिता धडपडणारे लोक म्हणून तुमचे नाव त्या इतिहासात राहणार आहे.

(२१ फेब्रुवारी १९९८)

◆◆