Jump to content

पान:Aagarakar.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार ૨૪ नवकोटनारायण होता हें पुनःपुन्हां सांगितल्यानें त्याचें केविलवाणें दैन्य आधिकच उघडें पडतें. आपला समाज या भिकाऱ्यासारखेंच लाचारीचें वर्तन करीत आहे अशी आगरकरांची खात्री होऊन चुकली होती. म्हणे प्राचीन काळीं आमच्यामध्यें गार्गी-मैत्रेयी सारख्या विदुषी निर्माण होत असत आणि त्या मोठमोठ्या महर्षींशीं तत्त्वज्ञानासारख्या गहन विषयांवरसुद्धां वादविवाद करीत असत. स्त्रीला चूल आणि मूल यापलीकडे दुसरें कांहींही कर्तव्य नाहीं असे समजणाऱ्या आणि साध्या अक्षरओळखीला तिला पारखें करणाऱ्या समाजानें ही जुनीपुराणी बढाई मारण्यांत काय अर्थ होता ? म्हणे चंद्रगुप्त, विक्रम, शालिवाहन,प्रताप आणि शिवाजी असे वीरपुरुष आमच्यांत होऊन गेले, त्यांनीं बलाढय शत्रूंना धूळ चारून आर्यांचा स्वातंत्र्यध्वज या सस्यश्यामल भूमीत डौलानें फडकत ठेवला.कंबरेशीं काटकोन कुरून युनियन जॅकपुढे माना लवविणाऱ्या प्रौढांनीं आणेि अदबीनें जोडलेल्या हातांत पदवीची सुरळी घेऊन 'युअर मोस्ट ओबिडियंट् सर्व्हंट'हा मंत्र जपत सरकारी नोकरीकरितां कलेक्टरच्या नाहीं तर मामलेदाराच्या कचेरींत हेलपाटे घालणाऱ्यांनीं त्या स्वातंत्र्यध्वजाचे स्मरण करावें हें एक प्रकारचें विडंबनच नव्हतें काय ? ज्या देशांतल्या दर्यावर्दी लोकांना मासे मारण्याशिवाय दुसरा धंदा उरलेला नाहीं तो देश एके काळीं साऱ्या जगाशीं व्यापार करीत होता, किंवा ज्या देशांतल्या कोटयवधि लोकांना धड लाज राखण्यापुरतें सुद्धां वस्त्र मिळत नाही, त्या देशांत आंब्याच्या कोयींत मावणारी तलम धोतरजोडी तयार होत होती, ही फुशारकी आपल्या अधोगतीची आणि कर्तव्यशून्यतेची द्योतक आहे, हें आगरकरांनीं पूर्णपणे ओळखलें. जगाच्या मागें पडलेले लोकच जुन्याची पूजा करण्यांत दंग होऊन जातात. शर्यतींत ईर्षेनें धांवणारांची नजर नेहमीं पुढें पाहत असते. या हतभागी हिंददेशाला पुन्हां वैभवाच्या शिखरावर चढायचें असेल, या दुर्दैवी हिंदु समाजाला माणुसकीला शोभणाऱ्या सुखाचा आणि स्वातंत्र्याचा पुनः अनुभव घ्यायचा असेल, तर ज्या अनेक जुनाट गंजलेल्या शृंखलांनी त्याचे जीवन जखडून टाकलें आहे, ज्या शृंखला नसून फुलांचे हार आहेत असें मानण्यापर्यंत त्याच्या अंधत्वाची मजल गेली आहे, त्या शृंखलांचे सत्यस्वरूप त्याला पटविले पाहिजे, तीक्ष्ण शस्त्रांनी त्या तटातट तोडून टाकल्या पाहिजेत, आणि