पान:Aagarakar.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३ गोपाळ गणेश आगरकर विषमतेविषयीं सतत विचार केला असावा. कॉलेजमध्यें मोठया आवडीनें केलेल्या इतिहासाच्या अभ्यासानें आणि मिल्ल-स्पेन्सर इत्यादींच्या तत्त्वज्ञानाच्या परिचयानें त्यांच्या विचारांतलें धुकें साहजिकच नाहींसें झालें.आपली मातृभूमि ही एके काळीं सुवर्णभूमि होती; पण आज ही सुवर्णभूमि धुळीला मिळाली आहे, हें आगरकरांना उघडउघड दिसत होतें. या अधःपाताची मीमांसा त्यांची बुद्धि करूं लागली. रोग्याच्या विकाराचे निदान करतांना आंधळ्या जिव्हाळ्याचा कांहीं उपयोग नसतो, तिथें वैद्यक शास्त्राचें ज्ञानच हवें हें लक्षांत ठेवून त्यांनी दलित आणि गलित अशा आपल्या समाजपुरुषाची कसून परीक्षा केली. त्यांची खात्री होऊन चुकली कीं, आपल्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीचे मूळ एकाच दीर्घकालीन हटवादी रोगांत आहे. तो रोग म्हणजे पुराणप्रियता-अंधश्रद्धा-मुलामा उडून गेलेल्या जुन्या पितळेलाही सोनें मानून कवटाळून बसण्याची वेडी प्रवृत्ति ! आमचा धर्म श्रेष्ठ, आमचा देश श्रेष्ठ, आमची संस्कृति श्रेष्ठ, असे ढोल बडवीत आणि त्या ढोलांच्या ढुमढुमाटांत स्वतःला बधिर करून घेऊन काळाच्या हांकेकडे दुर्लक्ष करीत हिंदुसमाज शतकानुशतकें जीवन कंठीत आला आहे. डोळे असून आंधळा, कान असून बहिरा आणेि पाय असून पांगळा झाला आहे तो! अशा समाजाच्या कपाळीं लाजिरवाण्या गुलामगिरीशिवाय दुसरें काय लिहिलेलें असणार ? >く * × X उज्ज्वल भूतकालाचे पोवाडे गाऊन कांहीं कुणी वर्तमानकाळावर अधिराज्य गाजवू शकत नाहीं:व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय आपलें भाग्यमंदिर घडवावें लागतें. तें घडवितांना आपल्या रक्ता-मांसाचा चिखल करावा लागतो, प्रसंगीं पोटचे गोळे बळी द्यावे लागतात. आगरकरांच्या पूर्वी अनेक लहान मोठे समाज-सुधारक महाराष्ट्रांत आणि महाराष्ट्राबाहेर होऊन गेले असले तरी आपलें जीवन आंधळेपणानें जुन्या चाकोरींतून चालविण्याचा अट्टाहास करणे अत्यंत आत्मघातकीपणाचे आहे, हें त्यांच्या इतकें पूर्णतेनें कुणीच जाणलें नव्हतें आणि क्वचित् कुणी जाणलें असलें तरी त्यांच्या इतक्या परिणामकारकतेनें तें समाजाला कुणीही समजावून दिलें नव्हतें. रस्त्यांत भीक मागून पोट भरणाऱ्या भिकाऱ्यानें आपला बाप