पान:Aagarakar.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३ गोपाळ गणेश आगरकर

एका काळच्या जिवलग मित्राकडून होणारा आपल्या हेतूंचा विपर्यास आणि आपल्या व्यक्तित्वाचे विडंबन पाहून आगरकरांना दु:ख होणे आणि राग येणें स्वाभाविक होतें. पण त्यांच्या ह्या दु:खांतून आणि रागांतून द्वेष कधींच निर्माण झाला नाहीं. अशा द्वेषाचा आरोप आपल्यावर होत आहे असें वाटतांच त्यांनी लिहिलें, 'टिळक आणि आगरकर यांचा खाजगी द्वेष ! आणि तो कशासाठीं ? टिळक आगरकरांचे किंवा आगरकर टिळकांचे कांहीं एक लागत नाहीत, आणि म्हणून एकाला दुस-याचा खाजगी द्वेष करण्याचे कारण आजपर्यंत झालेलें नाहीं. इतकेंच नाहीं, त्यांपैकी निदान एकाच्या मतानें तरी तें केव्हांच होण्याचा संभव नाही....................खुद्द आगरकरांच्या किंवा आगरकरांच्या निकट अाप्तांच्या डोळ्यांस पाणी येण्यासारखी कांहीं अनिष्ट गोष्ट घडेल तेव्हां इतरांपेक्षां टिळकांस व जेव्हां टिळकांचे घरीं तसा अनिष्ट प्रकार घडेल, तेव्हां आगरकरांस, विशेष वाईट वाटून डोळ्यांस पाणी येईल, व मतभेदांमुळे उत्पन्न झालेल्या वैराचा एका क्षणांत विसर पडून एक दुस-याला मदत करण्यास सहज प्रवृत्त होईल !' केवळ लिहिण्याच्या ओघांत आगरकरांनी हीं वाक्यें लिहिली नव्हतीं. त्यांच्या हळुवार हृदयाचे आर्त उद्गार होते ते. त्यांमुळे आपला अंतकाळ जवळ आला असे वाटतांच केवळ कर्तव्यासाठीं टिळकांना करावा लागलला विरोध विसरून जाऊन डेक्कन कॉलेजांत किंवा डोंगरीच्या तुरुंगांत ज्या जिव्हाळ्यानें आपण आपल्या या जिवलग मित्राशीं तास न् तास बोलत होतों तो एकदांच-शेवटचा गोड घांस म्हणून-अनुभवावा अशी तीव्र इच्छा त्यांच्या मनांत उत्पन्न झाली. ही हृदयस्पर्शी हकीकत सांगतांना यशोदाबाई म्हणतात, "मरणसमयीं सुखानें मरण यावें यासाठी त्यांनी एकच इच्छा ठेवली होती, आणि ती म्हणजे टिळकांशीं झालेले वितुष्ट नाहींसें करणें". ते सारखे म्हणत, टिळकांशीं वांकुडपणा ठेवून मला शांतपणे मरण यायचे नाहीं. ह्यांच्या मृत्यूच्या आधीं टिळक आमच्याकडे आले, भेटले, बसले, कितीतरी बोलले आणिं मग हे गेले. ? आगरकरांच्या ह्या असामान्य सहृदयतेचा वाङमयीन आविष्कार म्हणजे त्यांची सर्वस्पशीं रसिकता. " व्यापाराखेरीज आपला तरणोपाय नाहीं" हें