पान:Aagarakar.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १४ समाजाला समजावून सांगत असतांनाही त्यांचें काव्यप्रेम कधीं कमी झालें नाहीं.' कवि, काव्य, आणि काव्यरति' या विषयावरला त्यांचा लेख त्यांच्या रसिक व मर्मज्ञ वृत्तीचा द्योतक आहे. अर्थशास्त्रदृष्टया बालविवाहाचा विचार करीत असतांनाच शेक्सपीयरच्या हॅम्लेटचा सुरस अनुवादही ते करीत होते. इतकें कशाला, गांवांत चांगला हरिदास आल्याची बातमी लागली कीं आगरकरांची स्वारी हटकून त्याच्या कीर्तनाला हजर व्हायचीच ! ज्यांच्या अंगीं रसिकता असते अशा अनेक बुद्धिमान् लोकांना रसिकता आणि रंगेलपणा यांतलें अंतर प्रथम कळत असलें तरी तें पुढे पुढे जाणवेनासें होतें. या दोन्ही प्रवृत्तींत एक अतिशय सूक्ष्म सीमारेषा आहे. प्रवाहपतिताप्रमाणे जीवन कंठणा-यांना किंवा शरीरसुखाच्या मोहाला बळी पडणारांना ती सहसा दिसत नाहीं. ज्यांनीं जीवनाचा व्यापक दृष्टीनें विचार केला आहे, आत्म्याचे स्वातंत्र्य म्हणजे शरीराचा स्वैराचार नव्हे हें ज्यांना पुरेपूर उमजलें आहे, त्यांच्याच लक्षांत ती येते. रसिकता व अंतर्मुख वृत्ति यांचे मोठे मनोहर मिश्रण आगरकरांत झालें होतें. त्यामुळे कुठल्याहि बाह्य सौंदर्याला त्यांनी कधींच भलती किंमत दिली नाहीं. सामाजिक क्रांतीचा पुरस्कार हिरीरीनें करीत असूनही त्यांचा पोषाख अत्यंत साधा राहिला याचे मर्म हेंच होतें. ते एकदां मुंबईला गेले असतांना सुधारक म्हणून जिकडे तिकडे गाजलेले आगरकर कसे दिसतात हें पहाण्याकरितां जमलेल्या तमासगीरांची त्यांच्या मूर्तीच्या दर्शनानें मोठीच निराशा झाली.' हेच का ते सुधारक ? त्यांच्या तर पागोट्याचे बंद गळ्याला लोंबताहेत !' असे म्हणत त्या बिचाऱ्यांना आपला रस्ता सुधारावा लागला. दुसऱ्या एका गृहस्थाची अशीच गंमत सांगतात. 'स्त्रियांनीं जाकिटें घातलीं पाहिजेत' हा आगरकरांचा लेख त्यानें वाचला होता. स्त्रियांच्या जाकिटांबद्दल इतका अट्टाहास करणारा हा पुरोगामी गृहस्थ घरीं सुटाबुटांत वावरत असेल आणि त्याच्या तोंडांत अहोरात्र चिरूटाशिवाय दुसरें अग्निहोत्र दिसत नसेल अशी स्वाभाविकच त्यानें आपली कल्पना करून घेतली. आगरकरांना भेटण्याकरितां तो मुद्दाम त्यांच्या घरीं आला. आगरकर घरीं आहेत कीं नाहींत याची चौकशी करण्याकरितां तो त्यांच्या घराजवळच असलेल्या एका स्वतंत्र खोलीकडे वळला. त्या खोलीत धाबळीची बाराबंदी