पान:Aagarakar.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १२

बसते, हा जगाचा नित्याचा अनुभव आहे. पण आगरकरांच्या स्वभावांत या दोन दुर्मिळ वृत्तीचा मधुर संगम झाला होता. मुलानें घोडा घोडा करण्याचा हट्ट धरला तर तो पुरवायला स्वारी एका पायावर तयार व्हायची. इतकेंच नाहीं, तर खेळतां खेळतां मुलानें पाठीवर कोरडा उठविला म्हणजे "सामाजिक सुधारणा घोड्याच्या धावेप्रमाणें लवकर अंमलांत याव्या म्हणून मी लोकांना शब्दांचे चाबूक मारतों. त्याची प्रतिकृतीच यशवंत माझ्या पाठीवर करीत आहे !" असें त्याच्यावर भाष्यही व्हायचे. याच यशवंताचे गणित कच्चे होतें. मधून मधून आगरकर स्वतः त्याला उदाहरणे सांगत, तीं समजावूनही देत; पण कांहीं केल्या त्याची समजूत पटत नसे. अशा वेळीं रागावून ते एकाद दुसरी चपराक त्याला देत. पण मग दिवसभर ही गोष्ट त्यांच्या मनाला लागत असे. अशा वेळीं ते यशोदाबाईंना म्हणत, "त्याला समजलं नाहीं यांत त्याचा काय दोष ? उगीच मारायला नको होतें मी !" आगरकरांच्या आयुष्यांत अपत्यवात्सल्यापासून समाजसुधारणेच्या तळमळीपर्यंत या सहृदयतेचा आविष्कार सदैव उत्कटत्वानें होत गेला. ' केसरी’ आणि 'सुधारक' यांच्यांतलें भांडण हा सामाजिक दृष्टया आवश्यक असा एक विचारकलह होता. त्यांत आवेशाला जागा होती; अपशब्दांना नव्हती. तें वाग्बाणांचे युद्ध असलें तरी वैयक्तिक कुचेष्टला त्यांत वाव नव्हता. पण प्रत्येक युद्ध आरंभीं धर्मयुद्ध असलें तरी लढतां लढतां त्यांत अधर्माचा प्रवेश होऊं लागतो. टिळक-आगरकरांच्या वाग्युद्धांतही हेंच घडलें. 'असले विसंगत वर्तन, कायद्याचा हिशेब चोख रीतीनें करतां येणा-या गणित्याला साधण्यासारखें आहे; व त्याच्या या शास्त्रांतील पांडित्याला जर कायद्याची थोडीशी फोडणी दिलेली असेल तर त्याला त्या वर्तनाची कुरूपता सामान्य लोक चकतील अशा रीतीनें छपवितां येणार आहे हें आम्ही कबूल करते.' असा आगरकरांनी टिळकांना टोमणा मारला. टिळक त्यांच्याप्रमाणे भावनाशील नव्हते. त्यांनी ‘गंजीवरला कुत्रा ' असा अहेर करून या टोमण्याची परतफेड केली. इतकेंच नव्हे, तर आगरकरांना "स्वार्थसाधु" हा किताब बहाल केल्यावर तो आरोप कमी तिखटपणाचा वाटूनच कीं काय, "माळावरला महारोगी" म्हणूनही त्यांनी एकदां त्यांचा उल्लेख केला !