पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/151

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्थिती का? शेतीमालाच्या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांची अशी गोंधळलेली अवस्था आहे; पण त्याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या मुखवट्यांच्या अबकडईफ- संपूर्ण बाराखडीच्या काँग्रेस पक्षांच्या विचारात असा गोंधळ असणारच. मतांच्या शितांकरिता भुंकणारी कोणत्याही मागणीप्रमाणे शेपटी हलवीत जातात. त्यांना ना सैद्धांतिक आधाराची गरज, ना तर्कशुद्धतेची आवश्यकता.

 पण स्वत:ला मार्क्सवादी म्हणवणाऱ्या शेकापला अशी सुटका करून घेता येणार नाही. त्यांच्या मार्क्सवादी विचारात, शिस्तीत शेतीमालाच्या भावाचा प्रश्न नेमका कोठे बसतो हे शेकापने दाखवून द्यावयास हवे. आजपर्यंतच्या त्यांच्या खंडीभर ठरावात शेतीमालाच्या भावाचा प्रश्न सैद्धांतिकदृष्ट्या देशोदेशीच्या समाजाच्या इतिहासात कोठे बसतो याचा ऊहापोह चुकूनसुद्धा सापडत नाही. हे विश्लेषण खुल्या मनाने केले तर शेकापच्या गोंधळाचे कोडे स्पष्ट होते.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / १४४