घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश ।
अवघे मिळोनी आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥
तैसा जीवात्मा आणी शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळात्मा ।
अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥
घटीं व्यापक जें आकाश । तया नांव घटाकाश ।
पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥
मठीं व्यापक जे आकाश । तया नाव मठाकाश ।
तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥
मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश ।
ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥
उपाधीवेगळे आकाश । तया नांव चिदाकाश ।
तैसा निर्मळात्मा परेश । तो उपाधीवेगळा ॥ ५२ ॥
उपाधीयोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न ।
तैसा आत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥
दा. ८. ७. ४ ४-५३.
सर्व उपाधीचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट ।
निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळा ठाई ॥ ११ ॥
उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला ।
मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥
देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण ।
निर्गुणज्ञाने विज्ञान । होत असे ॥ १३ ॥
कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ ।
मिथ्यत्वे दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥