Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८
[§२१
रामदासवचनामृत-दासबोध.

पर्वताऐसे ढग उचलती । सूर्यबिंबासी आच्छादिती ।
तेथें सवेंचि वायोची गती । प्रगट होये ॥ २४ ॥
झिडकझिडकु[] धांवे वारा । जैसा काळाचा म्हणियारा[]
ढग मारुनी दिनकरा । मोकळे करी ॥ २५ ॥
बैसती विजांचे तडाखे । प्राणीमात्र अवचिता धाके[]
गगन कडकडून तडके । स्थळांवरी ॥ २६ ॥
येहलोकांसी एक वर्म केलें । महदूभूतें महदूभूत आळिलें ।
सकळां समभागें चालिलें । सृष्टिरचनेसी ॥ २७ ॥
ऐसे अनंत भेद आत्मयाचे । सकळ जाणती ऐसें कैंचे ।
विवरतां विवरतां मनाचे । फडके[] होती ॥ २८ ॥
ऐसी माझी उपासना । उपासकी आणावी मना ।
अगाध महिमा चतुरानना । काये कळे ॥ २९ ॥

दा. २०. ८. २३-२९.


२२. देव कोणास म्हणावें?

बहुत देव सृष्टीवरी । त्यांची गणना कोण करी ।
येक देव कोणेपरी । ठाई पडेना ॥ ८ ॥
बहुविध उपासना । ज्याची जेथें पुरे कामना ।
तो तेथेंचि राहिला मना । सदृढ करूनी ॥ ९ ॥
बहु देव बहु भक्त । इच्छ्या झाले आसक्त ।
बहु ऋषि बहु मत । वेगळालें ॥ १० ॥
बहु निवडतां निवडेना । एक निश्चय घडेना ।
शास्त्रे भांडती पडेना । निश्चय ठाई ॥ ११ ॥


  1. सोसाट्याने.
  2. शिपाई.
  3. भितो.
  4. तुकडे.