नेणता प्राणी संव्हारितो । नेणीव तमोगुण बोलिजे तो ।
तमोगुणे रुद्र संव्हारितो । येणेप्रकारें ॥ २७ ॥
कांही जाणीव कांहीं नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव ।
जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८ ॥
जाणीवेनें होतें सुख । नेणीवेनें होतें दुःख ।
सुखदुःख आवश्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥
जाणण्यानेणण्याची बुद्धी । तोचि देहीं जाणावा विधी ।
स्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥
ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगें बोलिला विचार ।
परंतु याचा निर्धार । प्रत्ये[१] पाहावा ॥३१॥
दा. १०. १. २६-३१.
स्वामीने विचार दाखविला । येथे विष्णूचा अभाव दिसोन आला ।
ब्रह्मा विष्णु महेशाला । उरी[२] नाहीं ॥ १ ॥
उत्पत्ति स्थिति संव्हार । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥
दा. १०. २. १-२.
ब्रह्मा जन्मास घालितो । विष्णु प्रतिपाळ कारतो ।
रुद्र अवघे संव्हारितो । ऐसें बोलती॥ १० ॥
तरी हे प्रवृत्तीचे बोलणे । प्रत्ययास आणी उणें ।
प्रत्यय पाहातां श्लाघ्यवाणे । होणार नाहीं ॥ ११ ॥