येक देव जापाणिला[१] । येक देव उदकीं टाकिला ।
येक देव नेऊन घातला । पायातळीं ॥ ३५ ॥
काय सांगों तीर्थमहिमा । मोडूनि गेला दुरात्मा ।
थोर सत्व होतें तें मा[२] । काय जाले कळेना ॥ ३६ ॥
देव घडिला सोनारी । देव वोतिला वोतारी ।
येक देव घडिला पाथरी । पाषाणाचा ॥ ३७ ॥
नर्बदागंडिकातीरी । देव पडिले लक्षवरी ।
त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८ ॥
चक्रतीर्थी चक्रांकित । देव असती असंख्यात ।
नाहीं मनीं निश्चितार्थ । येक देव ॥ ३९ ॥
बाण तांदळे तांब्रनाणे । स्फटिक देव्हारा पूजणें ।
ऐसे देव कोण जाणे । खरे किं खोटे ॥ ४० ॥
देव रेसिमाचा केला । तोही तुटोनियां गेला ।
आतां नवा नेम धरिला । मृत्तिकेचा ॥ ४१ ॥
आमचा देव बहु सत्य । आम्हां आकांती पावत ।
पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२ ॥
आतां याचे सत्व गेलें । प्राप्त होतें तें जालें ।
प्राप्त न वचे पालटिले । ईश्वराचेनि ॥ ४३ ॥
धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा ।
तेथे देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४ ॥
हे आपुली कल्पना । प्राप्ताऐसी फळे जाणा ।
परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याची ॥ ४५ ॥
दा. ६.६.३३-४५.