तें सुख अंतरीं घेऊनी । पुढे चाल करी संगमी ।
तेथे विजु ऐशा कामिनी । चमकताती सुवर्णरंग ॥१९॥
तेहि जाणोनि मागें सारी । पुढें सूर्यबिंब अवधारी ।
ज्वाळा निघती परोपरी । दंडळू नको कल्पांतीं ॥२०॥
अनंतभानु तेज अद्भुत । खदिरांगार ज्वाळा उसळत ।
धारिष्ट तेथें न निभत । दुर्घट विभु तेथींचा ॥२२॥
तेथें हुशारीचे काम । अग्री लक्ष घालूनि नेम ।
तीर लावून सुगम । मागें सारी सूर्यातें ॥२३॥
पुढे दिसेल जें नवल । ते पाही हंसमेळ ।
चंद्रकिरण शीतळ । पाहसी तूं मम वत्सा ॥२४॥
तेव्हां मागील दाह शमेल । शीतलाई सर्वांग होईल ।
चंद्राची प्रभा सुढाळ । फडफडीत चांदणे ॥२५॥
तोचि डोळियाचा डोळा पाही । देहातीत वर्म विदेही ।
चिन्मय सुखाची नवाई । भोगी आपुलें की गा ॥२६॥
अनुभवाची शीग भरली । आग्रापरी उसळली ।
भूमंडळी प्रभा पडली । कर्पूरवर्ण नभ झालें ॥२७॥
तया मध्यभागी सघन । अढळ पद दैदीप्यमान ।
उर्वरित ब्रह्म जाण । ध्रुव बैसला अढळते ॥२८॥
ते तुझें स्वरूप नेटबोटें । जेथें समस्त जाणणे आटे ।
ऐके जालासि धिटे । बळकटपणे बलाढ्य ॥२९॥
ऐसें सुख योगियां लाधलें । तेव्हां देहाचे मरण गेलें ।
सांगणे ऐकणे मुराले । एकत्वपणे एकचि ॥३०॥
- सॉलीव अर्थ १५-३०.