म्हणानीयां सदा सावध असावें । विमुख नसावें राघवेंसीं ॥५॥
राम पूर्वपुण्ये जालीया सन्मुख । मग तो विमुख होऊ नेणें ॥६॥
होऊ नेणे राम सर्वांगें सुंदर । नित्य निरंतर मागे पुढे ॥७॥
मागे पुढे सन्मुखची चहुंकडे । भेटी हे निवाडें राघवाची ॥८॥
राघवाची भेटी जाल्यां नाहीं तुटी । मग कल्पकोटी चिरंजीव ॥९॥
चिरंजीव होये राघवी मिळतां । तेथें पाहों जातां मृत्य नाहीं ॥१०॥
नाहीं जन्म मृत्य नाही येणे जाणे । स्वरूपी राहाणे सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ मन तदाकार होय । जरी राहे सोये श्रवणांची ॥१२॥
श्रवणाची सोये संतांचेनि संगें । विचार विभागे अहंभाव ॥१३॥
अहंभावें राम भेटला न जाये । जवळींच होये दुरी कैसा ॥१४॥
दुरी कैसा होये अहंभावें करी । जवळीच चोरी आपणासी ॥१५॥
आपणासी चोरी सबाह्यअंतरीं । आणि सृष्टीभरी नांदतसे ॥१६॥
नांदतसे अंत नाही तो अनंत । जाणतील संत अनुभवी ॥१७॥
अनुभवी जाणे येथीचीये खुणे । ये वीटवाणे वाटईल[१] ॥१८॥
वाटईल सुख संत सज्जनासी । रामीरामदासी भेटी जाली ॥१९॥
एथे उभा कां श्रीराम । मनमोहन मेघश्याम ॥१॥
काय केले धनुष्यबाण । कर कटावरी ठेवून ॥२॥
काय केली सीताबाई । येथे राहीरखुमाई ॥३॥
काय केलें वानरदळ । एथे मेळविले गोपाळ ॥४॥
काय केली अयोध्यापुरी । एथे वसविली पंढरी ॥५॥
काय केली शरयूगंगा । एथे आणिली चंद्रभागा ॥६॥
रामदासी जैसा भाव । तैसा झाला पंढरिराव ॥७॥
- ↑ वाटेल.