Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०८
§ १२०
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.

अणूपासूनि ब्रह्मांडा । एवढा होत जातसे ।
ब्रह्मांडाभोंवतें वेढे । वज्रपुच्छे करूं सके ॥ ११ ॥
तयासी तूळणा कोठे । मेरु मंदार धाकुटे ।
तयासी तूळणा कैंची । ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळां । गिळिलें सूर्यमंडळा ।
वाढता वाढता वाढे । भेदिलें शून्यमंडळा[] ॥ १३ ॥
भूतप्रेतसमंधादि । रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता । आनंदें भीमदर्शने ॥ १४ ॥
हे धरा पंधरा श्लोकी । लाभली शोभली भली ।
दृढ देहो निसंदेहो । संख्या चंद्रकळा[] गुणें ॥ १५ ॥
रामदासी अग्रगण्यू । कपिकूळासि मंडणू ।
रामरूप अंतरात्मा । दर्शनें दोष नासती ॥ १६ ॥

१२१. छत्रसिंहासनी.

छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रिलोकीं समर्थ । सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा । नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम । सांपडलें वर्म थोर भाग्ये ॥४॥
थोर भाग्य ज्याचें राम त्याचे कुळीं । संकटी सांभाळी भावबळे ॥५॥
भावबळे जिहीं धरिला अंतरीं । तया क्षणभरी विसंभेना ॥६॥
विसंभेना कदा आपुल्या दासासी । रामीरामदासी कुळस्वामी ॥७॥

१२२. रामाचे दर्शन कव्हां होईल ?
आज्ञेप्रमाणे परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥

  1. आकाश.
  2. सोळा.