Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§९८ ]
१७७
करुणाष्टके.
१३ करुणाष्टके.

९७. रघुनायेका मागणें हेंचि आतां.

उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेवा करावी ।
सदा प्रीति लागो तुझे गुण गातां । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥१॥
तुझें रूपडें लोचनी म्या पहावें । तुझें गूण गातां मनासी रहावें ।
उठोआवडी भक्तिपंथेचि जातां । रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥२॥
मनी वासना भक्ति तुझी करावी । कृपाळूपणे राघवें पूरवावी ।
वसावें मज अंतरीं नाम घेतां । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥३॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा ।
नुपेक्षी मज गुणवंता अनंता । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥४॥
नको द्रव्यदारा नको येरझारा । नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा ।
सगुणीं मज लाविरे भक्तिपंथा । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥५॥
भवें व्यापलों प्रीति छाया करावी । कृपासागरे सर्व चिंता हरावी ।
मज संकटीं सोडवावें समर्था । रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥६॥
मनी कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी ।
नको संशयो तोडिं संसारवेथा । रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥७॥
समर्थापुढे काय मागों कळेना । दुराशा मनी बैसली हे ढळेना ।
पुढे संशयो नीरसी सर्व चिंता । रघुनायेका मागणें हेंचि आतां ॥८॥
ब्रिदाकारणे दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उधरावें ।
सुटो ब्रीद आम्हासि सांडूनि जातां । रघुनायेका मागणे हेंचि आतां ॥९॥

९८. उदासीन हा काळ कोठे न कंठे.
समाधान साधुजनाचेनि योगें । परी मागुते दुःख होतें वियोगें ।
घडीने घडी सीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥१॥


 १३