पान:रामदासवचनामृत.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

“१२ रामदासवचनामृत मेवमाळा, चंद्रबिंब, रविमंडळ ही आपापल्या ठिकाणी स्थित आहेत, त्यासच देव म्हणावें; देव्हारीच्या देवास उठून ब्रह्मकटाव रचतां येणार नाहीं; जो अंतर्बाह्य व्यापून असणारा अंतरात्मा आहे, त्यासच देव म्हणावें; देव आला, देव गेला ही भाषा दुरिताची आहे (क्र. २२ ); देह, आत्मा, व ब्रह्म यांचा संबंध जड चंचळ निश्चळाप्रमाणे आहे (क २3 ); ज्याप्रमाणे घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश मिळून सर्व एकच आकाश होते, त्याप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा व निर्मळात्मा मिळून सर्व एकच आत्मा होय • (क्र. २४); केवळ भिडेस पडूं नका; ज्याने राजा ओळखिला तो भलत्यास राव म्हणणार नाही (क्र. २५ ) असे सांगून मुख्य देवास शोधून काढणे हेच तत्त्वज्ञानाचे लक्षण होय असें रामदासांनी सांगितले आहे. ..१२. या देवाचा साक्षात्कार कसा करून घ्यावा हा एक मोठा प्रश्नच आहे. जगांतील नाशिवंत वस्तूंचा भरंवसा नसल्याने ज्यास सुख पाहिजे असेल त्याने केवळ रघुनाथभजन केले पाहिजे ( क्र. २६); या संसाराच्या यात्रेत देवाचा फायदा करून घेतला नाही तर आपले कष्ट सफल होणार नाहीत (क. २७); या देहाचे हे एक बरें आहे की जी जी परमार्थवांछा या देहामध्ये करावी ती ती तृप्त होते, या नरदेहास येऊन हजारों लोक उद्धरागतीस गेले आहेत ( क. २८); शिवाय मृत्यूच्या वेदना सोसवत नाहीत हे सगळ्यांच्या अनुभवाचेंच आहे (क्र. २९). या मृत्यूपुढे महापराक्रमी राजे, महान् व्युत्पन्न पंडित, मोठमोठे योगाभ्यासी, महान् महान् संत, कोणीच टिकले नाहीत. फक्त एकच . टिकले की ज्यांनी स्वरूपसाक्षात्कार करून घेतला (क्र. ३०). यामुळे सर्व गोष्टी सोडून देवास धुंडणे हेच आपले संसारांतील मुख्य कर्तव्य आहे (क्र. ३१). याच जन्मी ईश्वरसाक्षात्कार झाला तर त्याचा उपयोग; पुढील जन्मावर कोगी भिस्त ठेवावी ? उधार आणि रोकडें धन यामध्ये जो फरक आहे तोच विदेहमुक्ति व जीवन्मुक्ति यांच्यामध्ये आहे (क्र. ३२); परंतु मनुष्याची दृष्टि अंध झाली असल्याने द्रव्यहारा नेत्राने पाहणे, द्रव्यदारा कानाने ऐकणे, यांखेरीज दुसरा व्यापारच त्यास सुचत नाहीं (क्र. ३३). या बद्भुस्थितीतून विनिर्मुक्त होण्यास गुरूची आवश्यकता आहे. मागें महान महान् संतसाधु, रामकृष्णादिक . "अवतार, यांनी गुरूचाच आश्रय केलेला आहे (क्र. 3). सद्गुरुरूपा झाल्याखेरीज अनुभवचिद्रत्नांच्या भांडारगृहाची किल्ली हातास येत नाही ( क्र. ३५).