Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६२
[§९०
रामदासवचनामृत-संकीर्ण ग्रंथ.

वाटे एकांतासी जावें । पुनः हे अनुभवावें ।
उगें निवांत असावें । कल्पकोटी ॥ २५ ॥
नको वक्तृत्व उपाधि । पांगुळली स्वरूपी बुद्धि ।
लागली सहज समाधि । हेतुरहित ॥ २६ ॥
गुरु शिष्य एक झाले । अनुभवबोधी बुडाले ।
त्यांचे शुद्धीस जे गेले । तया तीच गती ॥ २७ ॥
तुटला संसारबंधु । आटोनि गेला भवसिंधु ।
बुडाला बोधी प्रबोधु । विवेकबळें ॥ २८ ॥
ज्ञानाग्नि प्रगट झाला । मायाकर्पूर जळाला ।
विवेकें अविवेक ग्रासिला । तये ठायीं ॥ २९ ॥
झालें साधनाचें फळ । चुकले जन्माचें मूळ ।
निष्कलंक आणि निर्मळ । तोचि आत्मा ॥ ३० ॥

पं. स. ४. १८-३०.

९१. सर्वत्र रामदर्शन.
एवं ज्ञाता समाधानी । प्रारब्धयोगें वर्ते जनीं ।
परि अनुसंधान मनीं । वेगळेचि ॥ ५ ॥
वृत्ति गुंतली स्वानुभवें । जनीं तेंचि भासे आघवें ।
सबाह्य व्यापिलें देवें । ब्रह्मांड अवघे ॥ ६ ॥
वृत्ति मुळाकडे पाहे । त्यास राम दिसताहे ।
स्तब्ध होवोनियां राहे । रामचि दिसे ॥ ७ ॥
मन मुरडे आटे । तव मार्गी राम भेटे ।
मागे पुढे प्रगटे । रामचि अवघा ॥ ८ ॥