Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
[§७४
रामदासवचनामृत-दासबोध.

मागां बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।
प्रबोधशक्तीचे लक्षण । पुढे चाले ॥ ३८ ॥
बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करून बोलणें ।
तयाची वचनें प्रमाणे । मानिती जनीं ॥ ३९ ॥
जें जें मनास मानेना । तें तें जनही मानीना ।
आपण येकला जन नाना । सृष्टिमधे ॥ ४० ॥
म्हणोन सांगाती[] असावें । मानत मानत शिकवावे ।
हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१ ॥

दा. १२. १०. १४-४१.

७५. महंतलक्षणे.
जयास येत्नचि आवडे । नाना प्रसंगी पवाडे[]
धीटपणे प्रगटे, दडे । ऐसा नव्हे ॥ १२ ॥
सांकडीमधे वर्तो जाणे । उपाधीमधे मिळों जाणे ।
अलिप्तपणे राखों जाणे । आपणांसी ॥ १३ ॥
आहे तरी सर्वां ठाई । पाहों जातां कोठेंचि नाहीं ।
जैसा अंतरात्मा ठाईंचा ठाईं । गुप्त जाला ॥ १४ ॥
त्यावेगळे कांहींच नसे । पाहों जातां तो न दिसे ।
न दिसोन वर्तवीत असे । प्राणीमात्रांसी ॥ १५ ॥
तैसाच हाही नानापरी । बहुत जनांस शाहाणे करी ।
नाना विद्या त्या विवरी । स्थूळ सूक्ष्मा ॥ १६ ॥
आपणाकरितां शाहाणे होती । ते सहजचि सोये धरिती ।
जाणतेपणाची महंती । ऐसी असे ॥ १७ ॥

  1. सोबती.
  2. शिरतो.