Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§७४]
१३१
कर्मयोग.
आपुल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।
परंतु कष्टी करावें । हे राक्षसी क्रिया ॥ २७ ॥
दंभ दर्प अभिमान । क्रोध आणि कठिण वचन ।
हे अज्ञानाचे लक्षण । भगवद्गीतेत बोलिलें ॥ २८ ॥
जो उत्तम गुणे शोभला । तोचि पुरुष माहा भला ।
कित्तेक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥
क्रियेवीण शब्दज्ञान । तेंचि श्वानाचें वमन ।
भलें तेथें अवलोकन । कदापि न करिती ॥ ३० ॥
मनापासून भक्ति करणे । उत्तम गुण अगत्य धरणें ।
तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥
ऐसा जो माहानुभाव । तेणे करावा समुदाव ।
भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥
आपण आवचिते[] मरोन जावे । मग भजन कोणे करावें ।
याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥
आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।
आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥
याकारणे समुदाव । जाला पाहिजे मोहोछाव ।
हातोपातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥
आतां समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणे ।
श्रोतीं येथे सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥
जेणे बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति[]
बहुतांचे मनोगत हातीं । घेतले पाहिजे ॥ ३७ ॥

  1. अवचित, एकदम.
  2. उद्बोधन.