Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§६४ ]
१११
साक्षात्कार.
कुल्लाळ पावला राज्यपदवी । आतां रासमें कासया राखावी ।
कुल्लाळपणाची उठाठेवी । कासया पाहिजे ॥ १८ ॥
तैसा अवघा वृत्तीभाव । नाना साधनाचा उपाव ।
साध्य जालियां कैंचा ठाव । साधनासी ॥ १९ ॥
साधने काय साधावें । नेमें काये फळ घ्यावें ।
आपण वस्तु, भरंगळावें[] । कासयासी ॥ २० ॥
देह तरी पांचां भूतांचा । जीव तरी अंश ब्रह्मींचा ।
परमात्मा तरा अनन्याचा । ठाव पाहा ॥ २१ ॥
उगेंचि पाहातां मीपण दिसे । शोध घेतां कांहींच नसे ।
तत्वे तत्व निरसें [] । पुढे निखळ[] आत्मा ॥ २२ ॥
आत्मा आहे आत्मपणें । जीव आहे जीवपणे ।
माया आहे मायापणें । विस्तारली ॥ २३ ॥
ऐसें अवघेचि आहे । आणी आपणही कोणीयेक आहे ।
हे सकळ शोधून पाहे । तोचि ज्ञानी ॥ २४ ॥
शोधू जाणे सकळांसी । परी पाहों नेणे आपणांसी ।
ऐसा ज्ञानी येकदेसी[] । वृत्तिरूपें ॥ २५ ॥
ते वृत्तिरूप जरि पाहिलें । तरी मग काही नाही राहिलें ।
प्रकृतिनिरासें अवघेचि गेलें । विकारवंत ॥ २६ ॥
उरलें तें निखळ निर्गुण । विवंचितां तेंचि आपण ।
ऐसी हे परमार्थाची खूण । अगाध आहे ॥ २७ ॥
फळ येक आपण येक । ऐसा नाहीं हा विवेक ।
फळाचें फळ कोणीयेक । स्वयेंचि होईजे॥ २८ ॥

  1. भटकावे.
  2. निघून जाते.
  3. शुद्ध.
  4. एकदेशी, अपूर्ण.