Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§५६ ]
९५
साक्षात्कार.
परी तें धरितांहि धरेना । ध्यानी येती वेक्ति[] नाना ।
उगेंच कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६ ॥
मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें येकाचे येकचि दिसे ।
भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥
ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्याचे[] करावें ।
हेचि बरें विवरांवें । आपले ठाई ॥ २८ ॥
देह देऊळ आत्मा देव । कोठे धरू पाहातां भाव ।
देव वोळखोन जीव । तेथेचि लावावा ॥ २९ ॥
अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान[] अनारिसें[]
प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
अनुमाने अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेचि मोडे ।
उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥
देवास देहधारी कल्पिती । तेथे नाना विकल्प उठती ।
भोगणे त्यागणे विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥
ऐसें मनी आठवते । विचारिता भलतेंचि होतें ।
दिसों नये ते दिसते । नाना स्वप्नी ॥ ३३ ॥
दिसतें तें सांगतां नये । बळें भावार्थ धरितां नये ।
साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥
सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।
मनामधे विकल्पदर्शन । होऊच नये ॥ ३५ ॥
फुटक[] मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें ।
तेथे कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥३६॥

  1. व्यक्ति.
  2. देवालयाचें.
  3. रूढींचें.
  4. निराळे.
  5. फुटकें