Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§५३
९१
साक्षात्कार.

भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी ।
कळावंतां तैसी परी । कळेने केली ॥ ३६ ॥
मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।
तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥

दा.१४. ५. २१-३७.

५३. भक्तियुक्त काव्य हेच प्रासादिक काव्य होय.
वैभव कांता कांचन । जयास वाटे हे वमन ।
अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥
जयास घडीने घडी । लागे भगवंतीं आवडी ।
चढती वाढती गोडी । भगवद्भजनाची ॥ २३ ॥
जो भगवद्भजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण ।
सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगे रंगलें ॥ २४ ॥
जया अंतरीं भगवंत । अचळ राहिला निवांत ।
तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥
अंतरीं बैसला गोविंद । तेणे लागला भक्तिछंद ।
भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥
आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी ।
भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥
भगवंती लागलें मन । तेणें नाठवे देहभान ।
शंका लज्जा पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥
तो प्रेमरंगे रंगला । तो भक्तिमदें मातला ।
तेणें अहंभाव घातला । पायातळीं ॥ २९ ॥
गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक ।
दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥