Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
§३९ ]
५९
साक्षात्कार.
स्वरूप होऊन राहिजे । तया नांव सिद्ध बोलिजे ।
सिद्धस्वरूपींच साजे । सिद्धपण ॥४ ॥
वेदशास्त्रीं जे प्रसिद्ध । सस्वरूप स्वतःसिद्ध ।
तयासिच बोलिजे सिद्ध । अन्यथा न घडे ॥ ५ ॥
तथापि बोलों कांहीं येक । साधकास कळाया विवेक ।
सिद्धलक्षणाचे कौतुक । तें हे ऐसें असे ॥ ६ ॥
अंतरस्थित स्वरूप जाली । पुढें काया कैसी वर्तली ।
जैसी स्वप्नीची नाथिली[] । स्वप्नरचना ॥ ७ ॥
तथापि सिद्धाचे लक्षण । कांहीं करूं निरूपण ।
जेणे बाणे अंतर्खूण । परमार्थाची ॥ ८ ॥
सदा स्वरूपानुसंधान । हें मुख्य साधूचे लक्षण ।
जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥
स्वरूपी दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता ।
पुढे लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥
हे साधकाचे लक्षण । परी सिद्धाआंगीं असे जाण ।
सिद्धलक्षण साधकेंविण । बोलोंच नये ॥ ११ ॥
बाह्य साधकाचे परी । आणी स्वरूपाकार अंतरीं ।
सिद्धलक्षण तें चतुरीं । जाणिजे ऐसें ॥ १२ ॥
संदेहरहित साधन । तेंचि सिद्धाचे लक्षण ।
अंतर्बाह्य समाधान । चळेना ऐसें ॥ १३ ॥
अचळ जाली अंतरस्थिती । तेथे चळणास कैंची गती ।
स्वरूपी लागतां वृत्ती । स्वरूपचि जाली ॥ १४ ॥

  1. नश्वर.