Jump to content

पान:रामदासवचनामृत.pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५८
[§३८
रामदासवचनामृत-दासबोध.

याहीवरी अध्यात्मश्रवण । हरिकथानिरूपण ।
जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७ ॥
जेथें सारासार विचार । जेथें होये जगोद्धार ।
नवविधा भक्तीचा आधार । बहुत जनासी ॥ ४८ ॥
म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठिलें साधन ।
हें सद्गुरूचें लक्षण । श्रोतीं ओळखावें ॥ ४९ ॥
अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन ।
तेथें बहु भक्तजन । विश्रांति पावती ॥ ५० ॥
नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।
कर्मेविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१ ॥
म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्म कर्म आणि साधन ।
कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२ ॥
यामधें येक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे ।
म्हणौन सर्वहि विलसे । सद्गुरूपासीं ॥ ५३ ॥

दा. ५. २. ४४-५३.

३९. साधुलक्षण.
अंतरीं गेलियां अमृत । बाह्य काया लखलखित ।
अंतरस्थिति बाणतां संत । लक्षणें कैसीं ॥ १ ॥
जालें आत्मज्ञान बरवें । हें कैसेनि पां जाणावें ।
म्हणोनि बोलिलीं स्वभावें । साधुलक्षणें ॥ २ ॥
ऐक सिद्धाचें लक्षण । सिद्ध म्हणिजे स्वरूप जाण ।
तेथें पाहातां वेगळेपण । मुळींच नाहीं ॥ ३ ॥