पान:माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो... (Mazya Shetkari Bhavanno Mayabhaininno...).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि आंबेठाणच्या अंगारमळ्यात जो काही प्रथमपुरुषी अनुभव येईल त्याच अनुभवापासून शिकणे. दुसऱ्यांच्या अनुभवांच्या आणि विचारांच्या काजळीने आपला विचार मलिन होऊ नये याची काळजी मला घ्यायची होती. ग्रामीण भागाचा प्रश्न आपल्याला संपूर्ण समजला अशी खात्री असलेली बरीच माणसं इतर शहराप्रमाणे पुण्यातही बरीच होती. त्यांच्यापासून दूर राहाणे एवढीच मुख्य काळजी त्यावेळी मला घ्यावी लागत होती.
 यावेळी परिस्थिती बरीच वेगळी आहे. यावेळी शेतकरी संघटना आणि तिचं गेल्या दहा वर्षांचं आंदोलन, तिचं दहा वर्षांचं यश यांचं गाठोडं घेऊन पुढची कपार, पुढचा पहाड मी चढायला निघालो आहे. शेतकरी संघटना पूर्णपणे बाजूला ठेवणे तर शक्य नाही. एकीकडे संघटनेची फौज वेगवेगळ्या संकटामधून, जातीवाद्यांच्या हल्ल्यामधून शक्य तितकी सांभाळून ठेवायची आहे. आज आपण जातीयवाद्यांचा हल्ला परतवून लावू शकलो म्हणून जर त्याच जागी बसून राहिलो तर उद्या, परवा, त्यानंतरच्या एका दिवशी कोणत्या ना कोणत्या हल्ल्यात संघटना नामशेष होईल यात काही शंका नाही. कारण संघटना काय किंवा माणूस काय चालता फक्त भला.' जोपर्यंत तुम्ही पुढे जाता तोपर्यंत तुम्ही टिकून राहू शकता. एका जागीच उभं राहून जे काही पूर्वी करत होतो तेच करत राहिलो तर संपून जाऊ. थांबला तो संपला.
 शेतकरी आंदोलनाची पुढील वाटचाल सुरू करायची तर नवीन मार्ग कोणता असावा हा प्रश्न सोडवायला घेताना मला असं वाटतं की तेरा चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा मी 'अंगारमळ्याच्या अवस्थेत आलो आहे. गेल्या तेरा चौदा वर्षांत सर्वांना सांगितलेली, व्याख्यानांत मांडलेली, पुस्तकांत लिहिलेली अशी कोणतीच उत्तरं मी मानत नाही. त्या सगळ्या पुस्तकांवर, विचारांवर काट मारून दहा वर्षांनंतर बदललेल्या परिस्थितीत त्यांची आणखी व्यापक उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात मी आहे. अंगारमळ्याचा प्रयोग सुरू करताना त्याकाळी जसं मी ग्रामीण भागाच्या तज्ज्ञांना भेटलो नाही तसंच नवीन विचारांचा मार्ग तयार करताना जुन्या विचारांच्या पठडीशी एका ठराविक मर्यादेपलीकडे संबंध ठेवणे शक्य नाही. एक मोठं शिल्प तयार करायचं आहे, पुनः पुन्हा जर का छोट्या छोट्या शाडूच्या मूर्तीना हात लावू लागलो तर त्या महाशिल्पामध्येसुद्धा या छोट्या छोट्या मूर्तीच्या ठराविकच रेखा यायला लागतील. हा धोका टाळण्याची आवश्यकता आहे.
 नवीन प्रश्न काय आहे? आजपर्यंत आपण स्वतःला अर्थवादी आंदोलन म्हटलं; पण अर्थवादी आंदोलनाचं ध्येय आणि अर्थवादी आंदोलनाची साधनं

माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो / ४२